Sunday, December 30, 2012

डेंटेड-पेंटेड दिल्ली आणि पुढे बरंच काही...


ज्येष्ठ काँग्रेसी नेते आणि सध्याचे आपल्या देशाचे राष्ट्रपती आदरणीय श्री प्रणब मुखर्जी यांच्या सुपुत्राने एक विधान केले ज्यात आंदोलनकर्त्या मंडळींना डेंटेड आणि पेंटेड बायका असे संबोधले. एकूणच या प्रकाराने मोठा गहजब झाला. पुढे माफीनामा वगैरे प्रकरण झाले आणि तो वाद शमला. त्याचबरोबर दिल्ली मधील बलात्कार आणि पाशवी अत्याचारांना बळी पडलेल्या दुर्दैवी मुलीची मृत्यूबरोबरची झुंजही शमली.

ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. लोक मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. माझ्या कित्येक मैत्रिणी आणि अनेक मित्रही प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. काहीतरी केले पाहिजे या असह्य तळमळीने अस्वस्थ झाले आहेत. मीही अस्वस्थ आहे. पण माझी अस्वस्थता केवळ दिल्लीत घडल्या प्रसंगाबद्दल नाही. माझी भीती हे प्रकार असे चालूच राहतील याविषयी नाही. पण माझी खरी भीती, मला अस्वस्थ करणारी खरी गोष्ट ही आहे की हा राग, हा संतापही शमेल. एवढा उद्रेक होऊनही फारसे काही बदलणार नाही अशी शक्यता मला अस्वस्थ करते आहे. असंवेदनशील वक्तव्ये आणि कृत्ये आमचे सरकार करतच राहिल आणि तरीही आमची शांती ढळणार नाही अशी भीती वाटते आहे. आणि म्हणून हा लेखन प्रपंच.

दिल्लीतल्या झाल्या प्रकारामुळे ज्यावेळी विद्यार्थी आणि स्त्रिया रस्त्यावर येऊ लागल्या तेव्हा काही स्वतःला बुद्धिवादी समजणाऱ्या मंडळींनी नेहमीप्रमाणे बिनडोक मुद्दे उपस्थित केले. ‘इतर वेळी बलात्कारांविषयी कोणी काहीच बोलत नाही मग याचाच एवढा का गदारोळ’ इथपासून ते ‘आजकाल मेणबत्ती घेऊन बाहेर पडायची फैशनच झालीये’ इथपर्यंत भंपक बडबड केली. काही लोकांनी याने काय होणार असा एक अतिशय नकारात्मक मुद्दा उपस्थित करून आपल्या अकलेचे तारे तोडले. लोक प्रत्येक वेळी काहीतरी rational आणि मुद्देसूद मागण्या घेऊनच तुमच्याकडे यायला हवेत अशी अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांना महामूर्ख म्हणावे लागेल. दिल्ली मध्ये स्त्रिया रस्त्यावर उतरून निषेध नोंदवतात याचा अर्थ त्या ‘निषेध’ नोंदवत आहेत, तुमच्याबरोबर गोलमेज परिषद भरवून चर्चा करायला त्या आलेल्या नाहीत. त्यांचा निषेध सम-अनुभूतीने लक्षात घेऊन आणि मोकळे होऊन त्यांच्यात थेट मिसळून त्यांच्याशी संवाद साधणे तर दूरच आमचे सरकार या आंदोलनकर्त्यांवर थेट लाठीहल्ला करवते? पाण्याचे फवारे मारते? अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात?
काय म्हणावे याला?

नुसते मोर्चे काढणे आणि मेणबत्त्या घेऊन सरकारच्या नावाने बोंब मारणे मलाही मंजूर नाहीच. पण याचा अर्थ ते करायचेच नाही असा होत नाही. शिवाय आता लोक रस्त्यावर येत आहेत ते केवळ एका प्रसंगामुळे नव्हे. तर गेली कित्येक वर्ष साचलेल्या सामाजिक-राजकीय नैराश्यातून उफाळून आलेला हा उद्रेक आहे. अर्थात म्हणून हा काही फार काळ टिकेल असे नाही. पण एक मात्र नक्की, हा संताप अप्रामाणिक नाही. देशभर वेगवेगळ्या लोकांनी रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त केल्या हे खोटे नक्कीच नाही. काहींनी पेपर मध्ये फोटो यावे म्हणून केलेही असेल, पण निदान हा मुद्दा आपण ठामपणे मांडला आणि रस्त्यावर उतरलो तर आपला फोटो येऊ शकतो हा विचार तरी लोक करत आहेत. आणि रस्त्यावर उतरत आहेत. (लक्षात घेण्यासारखी बाब ही की राष्ट्रकुलपासून ते आदर्शपर्यंत आणि आदर्श पासून ते पूर्ती आणि आयआरबी पर्यंत इतके घोटाळे उघडकीस आले पण लोकांना किमान फोटोसाठी तरी रस्त्यावर उतरावे वाटले नाही.) लोक निषेध करायला रस्त्यावर उतरतात जेव्हा त्यांना वाटते की जे घडले ते उद्या माझ्याही बाबतीत घडू शकते. त्यांच्या या भावना समजून घेतल्या पाहिजेत. कारण त्या भावना असुरक्षिततेतून आलेल्या आहेत. सुरक्षित आयुष्य जगण्यास आवश्यक वातावरण जर हा समाज आणि हे सरकार देऊ शकत नसेल तर आम्ही या दोहोंना आव्हान देतो आहोत हा त्या आंदोलनकर्त्यांचा संदेश समजून घेतला पाहिजे आणि खरेतर नुसते समजून न घेता त्यांच्या साथीने उभे राहिले पाहिजे. या समाजातली प्रत्येक अनिष्ट आणि भंपक गोष्ट झुगारून दिली पाहिजे. आणि होय, सरकार जर बेजबाबदारपणे वागत असेल तर संविधानिक मार्गाने ते उखडून टाकण्याचे सर्व प्रयत्न आपण केले पाहिजेत.
समाजव्यवस्था आहे तशीच ठेवून कोणी राजकीय परिवर्तन करू म्हणले तर ते शक्य नाही. आणि राजकीय व्यवस्था राहू देत आहे तशी आपण समाज बदलू अशी भाषा कोणी करत असेल त्याच्याही अकलेची तारीफच करायला हवी. घरांमध्ये हुकुमशाही आणि असमानता पण राजकीय व्यवस्थेत मात्र लोकशाही आणि समानतेचे गुणगान असे थोतांड करून कोणताही बदल घडू शकत नाही. लोकशाहीमध्ये राजकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था वेगवेगळ्या असूच शकत नाहीत. त्या एकमेकांना पूरक नसतील तर सारेच डळमळीत होऊन जाते. तशीच काहीशी आजची अवस्था आहे. आणि या सगळ्या बिकट वाटेवर कसाबसा उभा आपल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा. सारेच कठीण.


बदलावे लागेल. सगळे मूळापासून तपासावे लागेल. परत परत तपासून पहावे लागेल. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारावे लागतील. प्रत्येक मूल्यांना, प्रत्येक व्यवस्थेला, प्रत्येक कृतीला प्रत्येक समजुतीला, प्रत्येक श्रद्धेला आणि प्रत्येक विचारधारेला प्रश्न विचारावे लागतील. ज्याची उत्तरे समाधानकारक नसतील त्याला फेकून देण्याचे सामर्थ्य आपण अंगी बाणवले पाहिजे. ते धाडस अंगी आणले पाहिजे. आपण फार स्थितिप्रिय आहोत. बदल होऊ लागला की आपण अस्वस्थ होतो. ही दुःखलोलुप मानसिकता बदलायला हवी. थोडेसे बदलू आणि बाकी सब ठीक है, एवढं केलं की झालं- बाकी सब ठीक है हे विचार आपण सोडले पाहिजेत कारण एवढ्या तेवढ्याने वरवरची मलमपट्टी होते आहे. सध्याच्या सामाजिक-राजकीय व्यवस्थांना मूळापासून गदागदा हलवल्याशिवाय कसलाही बदल होणार नाही. आणि त्याची तयारी आपण केली नाही तर हे आपले मोर्चे आणि आपला संताप विरून जाईल..........

Friday, December 7, 2012

‘गॉडफादर व्यवस्था’ उखडायला हवी


“I believe in America” या वाक्याने गॉडफादर सिनेमाची सुरुवात होते. पण देशातल्या व्यवस्थेने पैशापुढे हात टेकलेले असतात. आणि एक अन्याय झालेला बाप व्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याने न्याय मागण्यासाठी येतो गॉडफादर कडे, डॉन व्हिटो कॉर्लीओन कडे. व्यवस्थेवरचा विश्वास उडाला की गॉडफादर तयार होणारच!
कोणी एक बिल्डर शहराच्या काठावर असलेल्या एखाद्या गावातील शेतकऱ्याची जमीन हडप करतो. शेतकऱ्याकडे कोर्टात जाण्याची ऐपत नसते. अशावेळी तो जमिनीवर एकतर पाणी सोडतो किंवा एखाद्या गॉडफादर कडे जातो. आणि मग हे ‘गॉडफादर’ आपापल्या लायकीप्रमाणे, उपद्रवमूल्याप्रमाणे बिल्डर लोकांशी चर्चा करतात. अखेर जमिनीच्या निम्म्या किंमतीत सौदा होतो. शेतकऱ्याला काहीच मिळणार नसते तर त्याला निदान निम्मी किंमत मिळते. बिल्डर निम्म्या किंमतीत जमीन घशात घालतो आणि हे गॉडफादर लोक या व्यवहारात बिल्डर लोकांकडून मलई खातात. त्या जोरावर अजूनच सत्ता वाढवतात.

आज चार वर्ष महापालिकेशी संबंधित काम केल्यावर थोडेबहुत अधिकारी परिवर्तन ला ओळखू लागले आहेत. परिवर्तन चे सदस्य काय म्हणतायत याकडे लक्ष देऊन ऐकू लागले आहेत किंवा किमान तसा अभिनय तरी करत आहेत. या गोष्टीमुळे एक परिवर्तन सदस्य म्हणून कधी मला पोकळ बरे वाटलेही. पण नंतर मला वाटले की, केवळ एका गटाचा मी सदस्य झाल्यावर माझ्या अतिशय सामान्य आणि न्याय्य बोलण्याला महत्व दिले जात असेल तर नागरिक म्हणून हा माझा पराभव आहे. मला गटाची ओळख सांगितल्याशिवाय सरकारी अधिकाऱ्यांकडून आणि व्यवस्थेकडून महत्व मिळत नसेल, असे महत्व जे कोणत्याही नागरिकास अगदी सहजपणे मिळालेच पाहिजे, ते मिळत नसेल तर व्यवस्था पार गंजली आहे असाच त्याचा अर्थ होतो.


पाडगांवकरांनी आपल्या एका कवितेत म्हणले आहे-
झुंडीत असता बरे वाटे,
झुंडीत असता खरे वाटे,
झुंडीत असता त्वरे वाटे,
भडकून उठावे.

एकट्याचे कापती पाय
एकट्याचा होतो निरुपाय
एकट्याची कोठेची हाय
डाळ शिजेना.

नपुंसकही झुंडीत जाता
पौरुषाच्या करू लागे बाता
कोणासही मी भारी आता
म्हणू लागे.


पुण्यात काही संस्था संघटना अशा आहेत की त्यांनी फोन फिरवले तर वरिष्ठ अधिकारी अतिशय आदबीने बोलतात, काही तर मिटींगच्या वेळी तर चक्क उठून उभे राहतात. काही अधिकारी या संस्थांचे लोक आले की ताबडतोब चहा मागवतात आणि गप्पांचा फड रंगवतात, आणि संस्था अगदी महापालिकेच्या भ्रष्ट आणि भंपक कारभारावर टीका करायला आल्या असल्या तरी पुरत्या विरघळून जातात. कमिशनरने चहा पाजला आणि तब्बल तासभर आमचे म्हणणे ऐकून घेतले याचेच या मंडळींना फार कौतुक असते. बाकी बदल घडवणे बाजूलाच राहते. काहीतरी थातूर मातूर आश्वासन घेऊन हे संस्थांचे प्रतिनिधी बाहेर पडतात. आणि समाजात यांना कमिशनरच्या मांडीला मांड लावून बसणारे म्हणून उगीचच विलक्षण प्रतिष्ठा प्राप्त होते. अर्थातच काही सन्माननीय अपवाद आहेत जे असे नाहीत. पण ते अगदी थोडे. बाकी सगळे मात्र स्वतःला भ्रष्ट आणि किडलेल्या व्यवस्थेकडून काम करून घेऊ शकणारे गॉडफादर समजतात, किंवा होऊ बघतात. आणि या त्यांच्या प्रयत्नात चार दोन कामे मार्गी लागत असतीलही नाही असे नाही, पण मुळातली सामान्य नागरिकाला कसलीही किंमत न मिळण्याची समस्या तशीच राहते.
व्यवस्थेचा भाग असलेलेच लोक गॉडफादर बनू पाहतात किंवा बनतात, तेव्हा ते स्वतःची सत्ता वाढवण्यासाठी व्यवस्थेला अधिकाधिक कमजोर करायचा प्रयत्न करतात. शिवाय संस्थांच्यामार्फत मिनी गॉडफादर बनू पाहणारे लोकशाही व्यवस्थेला अधिकच पोखरतात. नागरिकांना कमजोर करून टाकतात. नागरिक जर सामान्य असेल, कुठल्या झुंडीचा सदस्य नसेल तर तो सरकारी बाबुंसमोर लाचार बनतो. अशावेळी कोणातरी गॉडफादर वगैरेंसमोर या बाबूंना लाचार बघून तो नकळतच त्या गॉडफादरचा आधी भक्त आणि मुख्य म्हणजे मतदार बनतो. आणि या दुष्टचक्रातून लोकशाही व्यवस्था अधिकाधिक पोखरून निष्प्रभ होण्याची प्रक्रिया घडते आहे. कुठल्याही झुंडीचा झेंडा खांद्यावर न घेता व्यवस्थेकडून न्याय मिळू शकतो? खरे तर लोकशाही व्यवस्थेत मिळालाच पाहिजे. तो आज मिळत नाहीये हीच मोठी खेदाची बाब आहे. आणि इथेच आपली लोकशाही किती कमजोर आणि पोकळ आहे याचा अंदाज येतो.

प्रगल्भ समाजात नेता नसतो, तर सगळे ‘मित्र’ असतात. नेता म्हणजे झुंडीचा भाग बनणे. मग दुसरा नेता नवीन झुंड तयार करतो. पण मित्रत्व (Brotherhood) हे नेतृत्वापेक्षा आणि नेत्यामागे मेंढरांप्रमाणे जाणाऱ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे, प्रगल्भ आहे. कारण मित्रत्वाच्या संकल्पनेमध्ये प्रत्येकजण महत्वाचा प्रत्येकाला समान महत्व हे आधारभूत मूल्य आहे. आणि हेच मूल्य लोकशाहीचाही आधार आहे. झुंडीच्या जोरावर कोल्हेही वाघाला जेरीस आणतात. साहजिकच लोक कोल्हे बनायचा प्रयत्न करतात. पण आपण कोल्हेही नाही आणि वाघही नाही. आपण माणसे आहोत, सुसंस्कृत समाजात राहू इच्छितो. बुद्धीचे वरदान आपल्याला लाभले आहे. आपण ठरवले तर ही झुंडी आणि त्यांचे गॉडफादर निर्माण करणारी व्यवस्था आपण बदलू शकतो.
हे बदलण्यासाठी आज दोन गोष्टी आहेत ज्या करायला हव्यात. गॉडफादर बनू पाहणाऱ्या आणि बनलेल्या भंपक राजकारण्यांना आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना सामाजिक-राजकीय जीवनातून उखडून टाकायला हवे. आणि दुसरे म्हणजे व्यवस्था ही कोणाच्या हातातलं बाहुलं न बनता ती अधिकाधिक नागरिक केंद्रित बनली पाहिजे. नागरिकांना समर्थ करणारी बनली पाहिजे. एकटा मनुष्य एका बाजूला आणि उरलेले एकशेवीस कोटी लोक एका बाजूला अशी परिस्थिती आली तरी या देशात त्या व्यक्तीच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणारी, लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणारी प्रगल्भ व्यवस्था आपल्याला उभारावी लागेल. काम फार कठीण आहे. पाच-पन्नास-शंभर-दोनशे वर्षे लागतील हे मिळवायला. पण या दिशेने आपण जितक्या तीव्रतेने प्रयत्न करू तितकी ही वर्षे कमी होतील असा माझा विश्वास आहे.

आपण कोल्हे बनून जगायचे की माणूस म्हणून जगायचे हा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे. माझ्यापुरते बोलायचे तर मी एक विवेकी सुसंस्कृत आणि लोकशाही समाजात माणूस म्हणून जगू इच्छितो.
तुम्ही काय ठरवताय? 

Saturday, November 24, 2012

शाप


कोणी लांब असणं
हा केवळ भास आहे.
मनातून आपलं म्हणा
लांबचाही मग खास आहे.

माझा हात बघून
ज्योतिषी मला काय सांगणार?
भविष्य माझे तेच,
जे मी मनापासून ठरवणार.

दुःखाला माझ्या, सुखाला माझ्या
मीच जबाबदार असतो.
चुकांना माझ्या, कर्तृत्वाला माझ्या
मीच जबाबदार असतो.

लोक म्हणतात बघा न परिस्थिती अशी,
पण ही परिस्थिती आली तरी कशी?
तुमचे आयुष्य म्हणल्यावर केवळ तुमचाच निर्णय असतो.
निर्णय घेणे वा न घेणे हा सुद्धा एक प्रकारचा निर्णय असतो.

निर्णयापासून माझ्या मी वेगळे कसे होऊ शकतो?
सावलीपासून माझ्या मी वेगळे कसे होऊ शकतो?

प्रामाणिक होणे वाटते तितके सोपे नसते,
स्वच्छंदी होणे वाटते तितके कठीण नसते.
भूत भविष्याची भीती सोडली की सुख अपार बरसते आहे.
पण ते जमत नाही, तिथेच घोडे सगळे अडते आहे. 


स्वच्छंदी जिप्सी मी होऊ पाहतो,
पण साला भविष्याच्या भीतीचा मला शाप आहे.
वाटेतला चकवा मी टाळू पाहतो,
पण साला भूतकाळातल्या दुःखांचा मला शाप आहे.

वर्तमान आनंदात जगू नये हा शाप मला आहे.
जिप्सीला शाप असतील इतर कितीही
पण आला क्षण मस्त जगण्याचे मात्र
त्याला खरे वरदान आहे. 

Wednesday, November 21, 2012

गेट वेल सून !


नुकत्याच घडून गेलेल्या काही घटना मला फार अस्वस्थ करत आहेत. मुख्यमंत्री ममता बानर्जी यांची थट्टा करणारा ईमेल पाठवणाऱ्या प्रोफेसरला अटक, आपल्या चित्रांतून संसदेवर आणि लोकशाहीवर काही भाष्य करणारा असीम त्रिवेदी, आणि ‘बंद’ वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मुलगी.....
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कितीही दिंडोरे पिटले तरी ते किती फुटकळ आणि बेभरवशी असे आहे हेच गेल्या काही दिवसांतल्या घटनांवरून दिसून आले. सध्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे '*' करून खाली कुठेतरी कोपऱ्यात 'अटी व शर्ती लागू' असे म्हणून फसवण्यासारखे आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाचे काही ना काही मत असते, आणि मनुष्य प्राण्याला व्यक्त होण्याची फार जुनी खोड आहे. अगदी पूर्वी जेव्हा त्याला कपडे घालायचीही अक्कल नव्हती तेव्हाही तो गुहेतल्या भिंतींवर शिकारीची चित्रे काढत व्यक्त होण्याचा प्रयत्न करत होता. कला हा व्यक्त होण्याचा राजमार्गच..! लोक चित्रे काढत होते, शिल्पे करत होते, गाणी गात होते, नाटके करत होते... गटेनबर्गने कमालच केली आणि छपाई तंत्र माणसाला अवगत झाले. तेव्हापासून व्यक्त होण्याच्या कक्षा वाढल्या. अधिकाधिक लोक व्यक्त होऊ लागले, मते मांडू लागले, आपले विचार इतरांपर्यंत पोहचवू लागले. पुढे पुढे जसजशी मनुष्य प्राण्याची प्रगती होत गेली तसतसे व्यक्त होण्याचे नवनवे मार्ग निर्माण होऊ लागले. रेडियो आला, टीव्ही आला, आणि मग आले इंटरनेट!
इंटरनेट आले आणि जग न भूतो न भविष्यति बदलून गेले. सारे काही इंटरनेटवर आले, इंटरनेटचा भाग झाले. आणि हे असे होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे इंटरनेटने प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी इथे खुले अवकाश दिले. स्काय इज द लिमिट! लोक व्यक्त होऊ लागले. सोशल नेटवर्किंगने तर हे सगळे अधिकच सोपे करून टाकले. लोक भसाभस मते मांडू लागले, आपले म्हणणे बोलून दाखवू लागले. ज्यांच्या कविता मासिकांचे संपादक घेत नव्हते अशांनी आणि ज्यांच्या कवितांना लोकांनी डोक्यावर घेतला असेही आपले म्हणणे खुल्या व्यासपीठावर सर्वांसमोर मांडू लागले. कधी मोफत कधी पैसे घेऊन. लोक लिहू लागले, वाचू लागले आणि भन्नाट क्रिया घडू लागल्या. हळूहळू सगळ्यांनाच या नव्या माध्यमाशी जुळवून घ्यावे लागले. वर्तमानपत्रेसुद्धा ईपेपर घेऊन आली. टीव्ही इंटरनेटवर आला, रेडियो सुद्धा आला. लोक सहजपणे मोबाईलवर सुद्धा शूटिंग करून व्हिडियो बनवू लागले, ते लोकांना दाखवू लागले. भन्नाट!
आणि मग पारंपारिक बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना वाटले, अरेच्चा हे काय झाले. बंधन सुटले म्हणल्यावर कोणीपण काहीपण लिहील इथे. असे कसे चालेल. जे विचार करतात, जे सुज्ञ आहेत, जे तज्ञ आहेत, जे विचारवंत आहेत जे शीलवंत आहेत अशांनीच लिहिले पाहिजे कारण तेच समाजासाठी योग्य आहे. आणि मग हे परंपरावादी, जीन्स घालत असतील पण विचारांनी परंपरावादी असलेले हे लोक मग या स्वातंत्र्याच्या मूळावर उठले. कधी यांनी स्वतःच्या लाठ्या उगारल्या, कधी यांनी व्यवस्थेच्याच काठीने व्यक्त होणाऱ्या जीवांना ठेचायला बघितले. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जबाबदार मंडळींचे असते’ असे म्हणत सामान्य माणसाने मांडलेले म्हणणे बेजबाबदार ठरवत त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटायचे काम या स्वघोषित समजारक्षणकर्त्या मंडळींनी करायचा प्रयत्न केला.
पूर्वी उच्च वर्णीय लोकांनी तथाकथित कनिष्ठ वर्गातील मंडळींना शिक्षणाचा अधिकार दिला नव्हता. ते तुमचे काम नव्हे असे सांगितले जात असे. अगदी त्याच पठडीतले बोलणे मला अनेकदा कानावर येते. ‘लोक वाट्टेल ते बोलतील विचार न करता बोलतील लिहितील.’ हा विचार किती जास्त संकुचित आणि जुन्या उच्चवर्णीय मंडळींसारखा आहे. जे तज्ञ नाहीत, ती माणसे नाहीत का? त्यांना नसेल तुमच्या एवढी बुद्धी, नसेल तुमच्या एवढे ज्ञान पण म्हणून त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार नाही का? ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतील. त्यांच्या भाषेत व्यक्त होतील. त्यांना वाटेल तेवढाच भाग बोलतील, पण म्हणून ते कनिष्ठ ठरत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गमक प्रत्येक व्यक्तीला समान महत्व देण्यामध्ये आहे, आणि त्याचवेळी प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि विशेष आहे असे मानण्यामध्ये आहे. Everyone is important. Every vote, every opinion is important.

ट्वेल्व अंग्री मेन हा चित्रपट मला आठवतो. यामध्ये एक जण असतो जो अगदी स्पष्ट निकाल आहे अशा खटल्यात इतर ज्युरींपेक्षा वेगळे मत नोंदवतो. आणि मग तिथून चर्चेला सुरुवात होते. नियम असा असतो की कोणताही निर्णय एकमतानेच घ्यावा. या एकट्या माणसाच्या विरोधी मतामुळे सगळे वैतागतात. पण तिथूनच चर्चेला सुरुवात होते. बघता बघता सगळ्यांच्या असे लक्षात येते की ज्या व्यक्तीला आपण दोषी मानत होतो ती व्यक्ती दोषी नाहीच! अखेर त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता होते. चर्चेचे आणि विरोधी मताचे महत्व ठसवणारा तुफान सिनेमा आहे हा.. यावरच आधारित पंकज कपूरचा ‘एक रुका हुआ फैसला’ नावाचा तितकाच भन्नाट सिनेमा आहे.

एक विरोधी मत सुद्धा महत्वाचे असते. प्रत्येक मताला महत्व आहे. बराक ओबामाने आपल्या भाषणात विरोधी मत मत नोंदवणाऱ्या मतदारांना सांगितले की “मी तुमचे मत ऐकले आहे, तुमचेही मत माझ्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे.”
परवा माझा सांगलीचा एक मित्र सांगत होता की त्याच्या भागातला जुना नगरसेवक जाऊन वेगळ्या पक्षाचा नवीन नगरसेवक आला आहे आता. तर आम्ही त्याचे पारंपारिक मतदार नसल्याने तो आमच्या भागात एकही काम करत नाही. आपल्या विरोधी मत नोंदवणाऱ्या मंडळींना आपण कसे वागवतो यावर आपली लायकी ठरते. मतभेद म्हणजे थेट शत्रुत्वच...! हो ला हो करणाऱ्या १० लोकांपेक्षा मतभेद व्यक्त करून, चर्चा करून नंतर एकमताने एखादे काम करणारे चारच लोक सुद्धा अधिक कार्य करतात असा माझा अनुभव आहे. इतकेच नव्हे तर मतभेद असणाऱ्या मंडळींनी वेगवेगळ्या दिशेने काम केले तरी मतभेद व्यक्त करणे आणि त्यावर चर्चा करणे यामुळे अनन्यसाधारण फायदे होतात.
चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढणे, एकत्र येऊन पुढे जाणे हे लोकशाहीत अत्यावश्यक आहे. पण आमच्यावर टीका करणारा तो आमचा शत्रू आणि त्याला हाणून पाडला म्हणजे माझे रान मोकळे असा विचार जोवर आपल्या समाजातील मनुष्य करत राहिल, किंवा असा भंपक विचार करणाऱ्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचेल तोवर आपला समाज दुर्धर अशा मानसिक रोगाने पोखरला गेलेला आहे असे म्हणावे लागेल.
कोणीतरी काहीतरी म्हणले की आमच्या भावना दुखावल्या जातात. सारख्या भावना दुखावल्या जाव्या एवढे नाजूक आणि असहनशील झालो आहोत का आपण आज एक समाज म्हणून? उठसूट कोणीही येऊन आपल्याला दुखावून कसे जाऊ शकतो? वैयक्तिक नात्यात पाळायच्या भावनेच्या गोष्टी जेव्हा सामाजिक जीवनात आणल्या जातात तेव्हा नको तिथे भावनिक होत आपण दुखावले जातो. आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत, भावनेचे भंपक राजकारण करण्यासाठी काहीजण सदैव तयारच असतात. अशांसाठी आपण भावनिक दृष्ट्या कमकुवत असणं म्हणजे हाताला लागलेले कोलीतच की!
एकुणात समाजाची विरोधी आवाज ऐकण्याची क्षमताच गळून पडली आहे. तुकारामांनी निंदकाचे घर असावे शेजारी असे कितीही सांगितले असले तरी ‘निंदक दिसला की त्याला ठेचा’ हेच आमच्या समाजाच्या पुढाऱ्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे ब्रीदवाक्य बनले आहे. प्रत्येक मताला किंमत आहे ही बाब एकदा का नाकारली की मग कसली आलीये लोकशाही आणि कसले प्रजासत्ताक. समाजाला शिकवण्याचे प्रगल्भ बनवण्याचे कार्य आमचे पुढारी करत नाहीत. समोरच्याच्या मताला किंमत देणे, त्याचा आदर करणे यात प्रगल्भता आहे. नागरिकाला निर्भयपणे व्यक्त होता आले पाहिजे हे बघणे हे सरकारचे संविधानिक कामच आहे. पण कुंपणच शेत खाऊ लागले तर कोण काय करणार. अशावेळी क्रांती होते. असंख्य लोकांचा बळी जातो, रक्तपात होतो, सारे राष्ट्रजीवन उध्वस्त होऊन जाते असा जगाचा इतिहास आपल्याला शिकवतो. पण विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायाने आपला समाज अधिकाधिक बुरसटलेला आणि बंदिस्त होत जाण्यात धन्यता मानतो आहे. झालेल्या भीषण दुर्धर रोगावर औषधपाणी करण्याऐवजी डॉक्टर मंडळींनाच शिव्या घालतो आहे.
जिथला नागरिक निर्भयपणे व्यक्त होऊ शकत नाही, कागदावर काहीही लिहिले असले तरी जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण सरकारला करता येत नाही तिथे खरेखुरे स्वातंत्र्य आणि लोकशाही नाही असेच म्हणावे लागेल. माझ्या दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्यांपैकी एक आहे. याचे महत्व न समजू शकणारा, याचे संरक्षण न करू शकणारा समाज हा आजारी आहे. आणि याबद्दल मी ‘Get well soon’ एवढेच म्हणू शकतो...
(या लेखामुळे मला जेल मध्ये जायची वेळ आली तर आश्चर्य वाटायला नको! ‘लाईक’ स्वतःच्या जबाबदारीवर करावे. नाहीतर कदाचित माझ्यासोबत तुम्हालाही जेलची सफर घडेल!)

Saturday, November 3, 2012

‘बस डे’ झाला... पुढे काय?


००० बसेस रस्त्यावर आणून लोकांनी एक दिवस आपल्या वैयक्तिक गाड्या बाजूला ठेऊन खरोखरंच काय होऊ शकते याचे ट्रेलर म्हणून या बस दिवसाकडे बघावे असा माझा दृष्टीकोन होता. आणि याच विचाराने मीही माझी पेट्रोल खाणारी दुचाकी न वापरता सायकलने ऑफिसला गेलो.
या बस दिवसाबाबत माझ्या नजरेस पडलेल्या /कानावर आलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया अशा-
“बस दिवस ही संकल्पना भुक्कड होती.”
“मी रोजंच बसने प्रवास करतो. आणि आज फरक इतकाच की मला बसायला जागा मिळाली.”
“रोज माझ्या चारचाकीने माला ऑफिसला जायला २५ मिनिटे लागतात. आज बसने गेले तर ७० मिनिटे लागली.”
“बसेस रिकाम्या धावत होत्या, आणि रस्त्यावर दुचाकींची तुडुंब गर्दी होती. साहजिकच खूप बसेस आणि नेहमी इतक्याच दुचाक्या यामुळे जास्तच ट्राफिक जाम झाला.”
“बस दिवस उत्तम होता उपक्रम. गेल्या २६ वर्षांच्या आयुष्यात मी प्रथमच बसने गेले. आणि इतकी सहज आणि सुटसुटीत बससेवा मिळाली तर मी बस वापरायला तयार आहे.”
“मी गंमत म्हणून डेक्कन वरून बसने कोथरूड पर्यंत जाऊन परत आलो. मज्जा आली. अर्थात कामं करायला गाडीच वापरली.(हे पुढचं वाक्य मी प्रश्न केल्यावर दिलेलं उत्तर आहे!)”
“बस डेपो मध्ये नेहमीच्या बस लावायला जागा नाही आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त बसेस आल्यामुळे लावायला जागाच नव्हती. वाट्टेल तिथे बस उभ्या केल्या होत्या. एकूणच गोंधळ होता सगळा.”
“बस दिवसामुळे थोडाफार कमी झाला होता ट्राफिक असं वाटलं तरी.”

नेमके काय घडले कसे घडले, याबाबत प्रत्येकाचे मत, अनुभव वेगळे असतील. शिवाय पुण्याच्या कोणत्या भागात काय घडले याबाबत तर नक्कीच मतांतरे असणार. या दिवशी व आधीही बहुसंख्य लोकांनी “याने काय होणार किंवा एक दिवस बस वापरल्याने ट्राफिक कमी होणार का” अशी मते मांडली. काहींनी “हा उपक्रम कसा सकाळने केवळ स्वतःची पब्लिसिटी करून घेण्यासाठी राबवला” असेही मला ठणकावून सांगितले. विरोधी मते काहीही असो. माझे अजूनही प्रामाणिक मत आहे की अशा प्रकारे उपक्रम घेणे स्तुत्यच आहे. या आणि अशा असंख्य ‘निमित्तांची’ निर्मिती करून एखादे चांगले काम पुढे नेता येऊ शकते, नेले जाते. याबाबत घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांकडे मी दुर्लक्ष करतो आहे असे नव्हे. किंवा त्यात तथ्य नाही असे माझे मत आहे असेही नव्हे पण तरीही यातून काय काय होऊ शकते, काय होऊ शकत नाही अशी मांडणी केल्यावर मला या उपक्रमाचे कौतुकच करावे वाटले आणि ते मी केलेच.
पण आता बस दिवस संपला. इथून पुढे काय होतंय हे अतिशय महत्वाचे आहे. नुसत्या बस दिवस साजरा करण्याने काहीही होणार नाही हे माझे मत आहेच. पण नुसता बस दिवस साजरा करणे हा जर ‘सकाळ’ने ठरवलेला उपक्रम असेल तर त्यालाच पहिले पाउल मानून पुढची पावले इतरांनी उचलायला हवीत. इथून पुढेही ‘सकाळ’नेच न्यावे हा अट्टाहास कशासाठी? तुमची आमची काहीच जबाबदारी नाही का? ‘सकाळ’ने इथून पुढचे काम केले तर तो बोनस! नाही केले तर उर्वरित काम आपण पूर्ण करू अशी धमक, असा विश्वास आणि इच्छा आपल्यामध्ये नसेल तर आपला समाज तद्दन भंकस करणारा पराभूत मनोवृत्तीचा आहे असा निष्कर्ष काढावा लागेल.

इथून पुढे माझ्यामते ७ गोष्टी व्हायला हव्यात, आपण करायला हव्यात.
1)  सकाळ सोशल फौंडेशनने या उपक्रमानिमित्त जमा झालेल्या पै पै चा हिशेब जाहीर करावा.
2) सध्याच्या अस्तित्वात असलेल्या पीएमएमएल मध्ये सुधारणा करण्यासाठी विवेक वेलणकर आणि जुगल राठींसारखे जे कार्यकर्ते लढत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहावे. ‘सकाळ’ सह इतर वर्तमानपत्रांनीही आता त्यांच्या लढण्याला अधिक प्रसिद्धी देण्याचे धोरण ठेवावे.
3) बससेवा सुधारण्यासाठी निधीची कमतरता आहे असली ओरड नेहमीच होत असते. त्यामुळे बाकडी टाकणे किंवा तत्सम भंपक खर्च कमी करून तो पैसा नवीन बस खरेदीकडे वळवण्यात यावा अशी आपापल्या नगरसेवकांकडे आग्रही मागणी करणे.
4) सर्वच नगरसेवकांनी आणि राजकीय पक्षांनी बस दिवसाला पाठींबा दिला होता. त्यामुळे हे लक्षात घेऊन आपल्या नगरसेवकाने महिन्यातून किमान एक दिवस बस/सायकल वापरावी असा आग्रह धरावा. विशेषतः ज्या दिवशी महापालिकेत सर्वसाधारण सभा असेल त्या दिवशी. (तसं त्या नगरसेवकाने न केल्यास तो नगरसेवक भंपक आणि केवळ दिखावा करण्याच्या लायकीचा आहे असे समजण्यास हरकत नसावी. लक्षात ठेवायला हवे की, गांधीजी म्हणायचे बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. जो नगरसेवक स्वतःत बदल करत नाही तो शहर काय बदलणार?)
5) आपल्या पातळीवर, आपल्या ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये मित्रांच्या ग्रुपमध्ये आठवड्यातून एक दिवस वैयक्तिक वाहने न वापरण्याचा एकत्रितपणे निर्णय घ्यायला हवा. आठवड्यातील इतर दिवशीही ‘कारपूलिंग’ करणे, सहज शक्य असल्यास बस वापरणे हे आवर्जून केले पाहिजे. बदल छोट्या छोट्या पातळीवरूनच होईल. परिवर्तन खालून वर झाले तरच टिकाऊ होईल.
6) इतर वर्तमानपत्र आणि माध्यमांनी या विषयाबाबत जे भीषण मौन बाळगले आहे ते तोडायला हवे. याविषयावर, उपक्रमावर इतर माध्यमांनी टीका केली असती तरी चालले असते. मात्र चर्चा-वादविवाद टाळण्याकडे आपला जर कल असेल तर ते लोकशाहीला घातक आहे.
7) आज ३ नोव्हेंबर रोजी ‘पीएमपीएमएल प्रवासी दिवस’ होता. सर्व बस डेपोंमध्ये तक्रारी देण्याची खास सोय आज होती. किती राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि बससेवा सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक काही केले हे बघणे फार रंजक ठरेल. कारण फ्लेक्स (मुळात पर्यावरण विरोधी मटेरिअल वापरून तयार केले जाणारे फ्लेक्स!) आणि कापडी फलक लावत गावभर या उपक्रमाला पाठींबा असल्याचे सांगणाऱ्या राजकीय पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे वर्तन किती पोकळ, उथळ आणि क्षुद्र होते याची पुरेपूर कल्पना आपल्याला येऊ शकेल. माझ्या माहितीनुसार दर महिन्याला हा पीएमपीएमएल प्रवासी दिवस असतो. बघुया यापुढे किती राजकीय नेते याकडे लक्ष देतात ते. विशेषतः विरोधी पक्षीय.

एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही. ज्या सकाळने गुरुवारी पुणेकरांनी वैयक्तिक वाहने वापरणे कमी करून बस वापरावी यासाठी बस दिवसाचे आयोजन केले होते त्याच सकाळने लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ‘सकाळ ऑटो एक्स्पो २०१२’ हे प्रदर्शन आयोजित केले होते. याला दुटप्पीपणा म्हणावे की निव्वळ व्यवसायाचा भाग की अजून काही?

एक मात्र नक्की... तुम्ही आम्ही हात पाय हलवल्याशिवाय काहीही परिवर्तन होणार नाही. कोणीतरी बाहेरून येईल आणि सगळे ठीक करेल ही अपेक्षाच चुकीची आहे आणि आपण काही करून काहीही बदल होणार नाही हा निराशावादही तितकाच भंपक आहे. बदल होणार, आपण काही केले तर बदल नक्की होणार! आणि त्यासाठी राजकीय व्यवस्थेत शिरून प्रयत्न करावे लागतील. यापासून दूर पळून चालणार नाही.  

Monday, October 22, 2012

राजकारणाला पर्याय नाही


जकाल उठसूट लोक ‘केजरीवाल आणि कंपनीवर कसे ते प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत आणि त्यांच्या नुसती आरोपांची राळ उठवण्याच्या प्रकारामुळे काहीही बदल होणार नाही’ असे म्हणत याविषयी बेताल आणि संदर्भहीन बडबड करताना आढळतात. मुळात राजकीय पक्ष काढण्याची आणि राजकीय पर्याय देण्याची केजरीवाल यांची कल्पना न समजलेले, न पटलेले किंवा न पचलेले लोक अशी भाषा करत आहेत असे माझे निरीक्षण आहे. किमान माझ्या संपर्कात आलेले तरी!
जिथे लोकशाही नांदत आहे, तुमच्या माझ्या आयुष्यावर प्रमाणाबाहेर परिणाम करणारे निर्णय जी व्यवस्था आज घेत आहे त्यात परिवर्तन करायचे तर ते नुसते बसून किंवा काहीच न करून होणार नाही. किंवा ते व्यवस्थेबाहेरून प्रयत्न करूनही होणार नाही. परिवर्तन करायचे तर ते व्यवस्थेत शिरूनच करावे लागेल. आणि त्या दृष्टीने केजरीवाल यांच्या राजकारणात यायच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे.

सध्या केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने राजकीय नेत्यांवर आणि त्यांच्या गैरप्रकारांवर जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केली आहे याचा प्रधान हेतू लक्षात घ्यायला हवा. केजरीवाल यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे सांगितलं की हे सगळं उघड केल्याने या लोकांवर कारवाई होईल अशी त्यांची मुळीच अपेक्षा नाही. केजरीवाल यांच्या या ‘हल्लाबोल’चा मुख्य हेतू हा ही राजकीय व्यवस्था किती पोखरलेली आहे हे परत परत ओरडून सांगणे... माल चांगला असेल तर ओरडावे लागत नाही अशी जुनी म्हण आपल्याकडे पूर्वी होती. त्यात आता मुक्त अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झाला. ओरडण्याला आज महत्व आहे. आणि का असू नये? उगीच मार्केटिंगला वाईट ठरवण्यात काय हशील आहे? माल चांगला असेल तर माल चांगला आहे हे ओरडून सांगावेच लागेल. नाहीतर सध्याच्या राजकीय व्यवस्थेत हा आवाज कधी बंद पडून जाईल कळणारही नाही.

केजरीवाल यांचा तुमची आमची, सामान्य नागरिकांची माथी भडकवण्याचा आटापिटा चालू आहे. आजपर्यंत भुक्कड भावनिक मुद्दे उचलत राजकीय पक्षांनी माथी भडकावण्याचेच तर काम केले आहे की. मग या नवीन पक्षाने तेच काम अधिक तर्कशुद्ध विचार आणि प्रामाणिक हेतूच्या सहाय्याने करायचा प्रयत्न केला की आमचे भंपक बुद्धिवादी त्यांच्यावर टीका करणार? हा कसला दुटप्पीपणा? राजकीय पक्षांना, बुद्धिवादी मंडळींना, आणि नागरिकांनाही एक भीषण स्थैर्य आले आहे. आणि पाणी स्थिर झाले की गढूळ होणार या न्यायाने आमची मानसिकताच गढूळ होऊन गेली आहे. कोणी काही वेगळे प्रयोग करू लागला की त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी खाली कसे खेचता येईल यावर बहुतांश वेळ खर्ची घालणार. त्या प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला हिणवणार, घाबरवून सोडणार. आणि हे केवळ राजकीय बाबतीतच आहे असे नव्हे. तर अगदी करिअर निवडण्यापासून वेगळे चित्रपट करण्यापर्यंत आणि वेगळ्या प्रकारचे कपडे घालण्यापासून रूढी परंपरांमध्ये, सवयींमध्ये वेगळेपण आणण्यापर्यंत, सर्वत्र आम्ही स्थितिप्रिय झालो आहोत. आहेत ते बरं चाललंय! शिवाय असं म्हणत दुःख उगाळत बसायचं आणि त्या दुःखांनाच चक्क ग्लोरिफाय करायचं! केजरीवाल आणि कंपनी वर होणारी टीका ही याच स्थितिप्रिय आणि दुःखलोलुप मानसिकतेतून आली आहे.

गडकरी-पवार यांच्यात लागेबांधे आहेत असे केजरीवाल यांनी सांगितल्यावर ‘हे काय आम्हाला माहितीच आहे की, नवीन काय?’ अशी प्रतिक्रिया काही महाभागांनी दिली. अशा वेळी त्यांना मला प्रश्न विचारावा वाटतो- तुम्हाला हे माहितीच होतं तर गोट्या खेळत होतात का इतके दिवस? तुम्ही का पुढे होऊन हे जगाला सांगितलं नाहीत? की तुमच्यात तेवढी धमक नव्हती? आज आता केजरीवाल नामक एक धडपड्या माहिती अधिकारात काही डॉक्युमेंटस् मिळवून लोकांसमोर थेट मांडतो आहे आणि एकूण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतो आहे तर त्याला साथ द्यायचं सोडून त्याच्यावर टीका करण्यात आणि एक प्रकारे दुसरी बाजू नकळतपणे उचलून धरण्यात काय बहादुरी किंवा हुशारी आहे, कळत नाही.

रॉबर्ट वढेरा यांची संपत्ती, गडकरींच्या संस्थेला दिली गेलेली जमीन असे प्रश्न उपस्थित करून, आपल्यासमोर मांडून केजरीवाल आपल्याला आवाहन करू इच्छित आहेत की आता तरी वेगळे मार्ग आहेत त्यांच्याकडे बघा आणि परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा. एक प्रकारे केजरीवाल आपल्याला आव्हानही देत आहेत की नुसते घरात बसून टीका करण्यापेक्षा मैदानात या आणि या व्यवस्थेशी दोन हात करा. एवढेच नव्हे तर केजरीवाल आपल्या निष्क्रियतेवर घणाघाती टीका करत आहेत. एका बाजूला केजरीवाल संसदेचा आणि तिचा अपमान करणाऱ्या संसद सदस्यांचा मर्मभेदक उपहास करत आहेत. तर त्याचवेळी संसदेत शिरूनच आपल्याला बदल घडवायचा आहे हे ठासून सांगत आहेत. एका बाजूला नकळतच व्यवस्थेबद्दल अनास्था आणि द्वेष पसरवत आहे पण त्याचवेळी नवीन व्यवस्था निर्मितीची आशा दाखवत आहेत. आणि आपल्याकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
ज्या मध्यमवर्गीय बुद्धिवाद्यांच्या जोरावर केजरीवाल पुढे जाऊ इच्छितात त्यांच्या मनातील एक प्रश्न म्हणजे पुढे जाऊन केजरीवाल आणि त्यांचे साथीदार सुद्धा भ्रष्ट झाले तर काय? केजरीवाल सुद्धा भ्रष्ट होण्या न होण्याची शक्यता अगदी ५०-५० आहे असे गृहीत धरले तरीही, यासारखा दुसरा भंपक प्रश्न नाही. कारण यातून ‘केजरीवाल भ्रष्ट झाले तर त्यांनाही उखडून फेकून देऊ’ हा आत्मविश्वास नसल्याचेच तेवढे स्पष्ट होते आहे. उलट ‘नवीन भ्रष्ट होण्याची ५०% शक्यता असणाऱ्या माणसाला पाठींबा देण्यापेक्षा जुना १००% भ्रष्ट काय वाईट?’ अशी पराभूत मनोवृत्ती दिसते. आणि ही मनोवृत्ती पुढे जाऊन आपला अपेक्षाभंग होईल केवळ या विचारातून आलेली आहे. लोकांना (कदाचित होणाऱ्या) अपेक्षाभंगाचे दुःख एकूण सामाजिक-राजकीय परिस्थिती अधिकाधिक भीषण होऊ देण्यापेक्षा जास्त वाटते यापेक्षा दुर्दैव काय असावे!

आजच्या परिस्थितीत टोकाला जाऊन माथी भडकवणारे हवे आहेत. टोकाला जाऊन माथी भडकून घेणारे हवे आहेत. आणि तुटपुंजे चार पाच नव्हेत तर घाऊक प्रमाणात हजारो लाखोंच्या संख्येने लोकांची माथी सध्याच्या व्यवस्थेवर कृतीशीलपणे भडकायला हवीत. कधीकधी एका टोकाला जाणे आवश्यक असते. कारण परिस्थिती दुसऱ्या टोकाला गेलेली असते. ती मूळपदावर, मध्यम मार्गावर आणण्यासाठी हे करावेच लागेल. हे काम मोठे कठीण आणि कौशल्याचे आहे. कारण यात तर्कशुद्ध आणि अहिंसात्मक मार्गाने या टोकाच्या विचारांची गुंफण करावी लागेल, मार्केटिंग करावे लागेल. तर्कशुद्ध मार्गाने टोकाची भूमिका मांडणे या गोष्टी स्वभावतः परस्पर विरुद्ध आहेत हे लक्षात घेतले म्हणजे हे काम किती कठीण आहे याची कल्पना येते.

केजरीवाल आपला राजकीय पक्ष उभा कसा करतात हे बघण्यास मी उत्सुक आहे. त्यांचा राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते हे दिल्ली, मुंबई, बारामती किंवा नागपूर च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या इतर पक्षांप्रमाणेच निघू नये अशी इच्छा. हे टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्व उभे करावे लागेल. लोकांमधून दूरदृष्टी आणि रचनात्मक कार्याची आवड आणि जाण असणाऱ्या मंडळींनी पुढे येऊन हे आव्हान स्वीकारले पाहिजे. ‘कशी गंमत चालली आहे’ असे बघण्यापेक्षा जबाबदारीने वागून जबाबदाऱ्या उचलल्या पाहिजेत. नुसत्या टीका अन् टिप्पण्या करून काय होणार?

एक गोष्ट मात्र आपण आपल्या मनात अक्षरशः कोरून घेतली पाहिजे- लोकशाहीत राजकारणाशिवाय पर्याय नाही. केवळ केजरीवाल नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या आणि पार्श्वभूमीच्या राजकारणात नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्यांना, नवे बदल घडवू पाहणाऱ्यांना आपण ‘सक्रीय’ पाठींबा दिला पाहिजे. त्यातंच आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं हित आहे. आणि हे आपण जितकं लवकर आत्मसात करू तितकं चांगलं. 

Saturday, October 20, 2012

षटके


दर ६ वर्षांनी एक बदलांचा मौसम येतो
असा सिद्धांत मी आत्ता (उगीचच) मांडला आहे.
१ ते ६, ७ ते १२, १३ ते १८ आणि १९ ते २४.
माझा आता हा बदलांचा मौसम आला आहे.

बघा विचार करून पटेल तुम्हालाही.
कदाचित अगदी ६ च असं नाही,
पण ४-६-८ असलं तुमचं काहीतरी
नक्की नक्की सापडेल तुम्हालाही.

१९ ते २४... अहाहा काय सुंदर षटक होतं हे.
बेभान होऊन नाचलो काय,
बेहोश होऊन गायलो काय,
बेफिकीर होऊन घुमलो काय,
अन् बेताल होऊन वागलो काय!

याच षटकात सारखे सारखे समजले,
शिक्षणात गती फारशी नव्हतीच कधी.
याच षटकात सारखे फुकट मिरवले,
जरी फारसे काही जमले नाही कधी.

सैतानालाही अंगावर घ्यायला दंड फुरफुरले,
कणभरही भीती कसली वाटली नाही कधी,
अजुनी वाटते, नक्की असते त्याला लोळवले,
हे खरेच, की समोर तो साला आला नाही कधी!

याच षटकात वास्तवाचे पुरते भान सुटले,
प्रेमही केले अगदी बेफाम होत कधी.
षटकात या स्वप्ने बघितली अन् रोमान्स केले,
षटकात या कधी आनंद, डोळ्यात पाणी कधी.

आता २५ ते ३० चे षटक आव्हान देते आहे.
खोटे का सांगू, काहीसा बावरतो मी कधी.
अपेक्षांचे बोजे उचलावे वाटते आहे, पण
अचानक कॉन्फिडन्स कमी पडतो कधी.

एक मन म्हणते आहे आता कळेल दुनियादारी.
दुसरे मात्र कुशीत घेत कुरवाळते कधी.
घाबरतो कशाला तुझीच तर आहे दुनिया सारी,
असे म्हणत मला आधार देते कधी.

षटकाला या सामोरे जाण्यास सिद्ध आता व्हायचे आहे.
‘सामोरे’ नको म्हणायला, खटकतोय हा शब्द.
षटकाला याही ‘आपलेसे करायला’ सिद्ध आता व्हायचे आहे.
असे म्हणूया! कारण पॉझिटिव्ह वाटतोय हा शब्द!

एक मात्र नक्की, अजून
बेभान होऊन नाचणे सोडवत नाही,
बेहोश होऊन गाणे सोडवत नाही,
बेफिकीर होऊन घुमणे सोडवत नाही,
अन् बेताल होऊन वागणे सोडवत नाही.

या सगळ्याची आपलीच एक मजा आहे.
उत्कटपणे जगणे यापेक्षा वेगळे काय आहे?
आहे मत हे आत्ताचे, गद्धेपंचविशीचे !
कोणी सांगावे? बदलला मौसम की,
बदलेल हे मत कदाचित उद्या.
‘बदलू नकोस’, सांगणे असले जरी मनाचे

बदलांचे हे मौसम येतंच राहणार
आपल्याला ते कवेत घेतंच राहणार.
स्वागत या षटकाचे दिलखुलासपणे करतो.
हसून मी या बदलांना आता आपलेसे करतो.


-    तन्मय कानिटकर
२० ऑक्टोबर २०१२