Wednesday, November 17, 2010

"असल्या फंदात पडू नकोस..."

मध्यवर्गीय लोकांना सुरक्षिततेबाबत "पझेसिव्हनेस" तयार झाला आहे. एका सुरक्षित कवचात राहून आयुष्य जगण्याची सवय आणि आवड सगळ्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे जरा कोणी त्या कवचातून बाहेर पडून काही वेगळे करू लागला की त्याला मागे खेचत सुरक्षित कवचात आणण्याची स्पर्धा मध्यमवर्गीय करतात.
माझ्या ओळखीत कित्येक मुलं अशी आहेत की जे सुरुवातीला देशासाठी/समाजासाठी काहीतरी करावं या विचाराने आमच्या परिवर्तन संस्थेत आले, आणि नंतर "असल्या फंदात पडू नकोस" अशी घरून सक्त ताकीद मिळाल्यावर येण्याचे बंद झाले. त्यामुळे पहिल्या दिवसापासून परिवर्तन मध्ये असणारी स्वयंसेवकांची उणीव आज दोन वर्षांनतरही कायम आहे. घरात बसून सिस्टीम वर टीका करणं, मतदानालाही बाहेर न पडणं...बोलण्यात "हुकुमशाहीच हवी खरं तर.." असे उद्गार काढणं आणि एका बाजूला टिळकांपासून गांधींसकट सावरकरांपर्यंतच्या "स्वातंत्र्य" सैनिकांचे गुणगान करणं आणि कोणी काही चांगलं काम करू लागला की "बाकी काही उद्योग नसतील" अशी खोचक टीका करणं यापलीकडे मध्यमवर्ग काहीही विशेष करत नाही.

मध्ये एकदा अभय बंग यांचं एक भाषण ऐकलं... "सध्या समाज pleasure च्या मागे लागला आहे.. 'MORE pleasure, INTENSE pleasure, CONTINUOUS pleasure आणि UNENDING pleasure' हेच मध्यमवर्गाच्या आयुष्याचं ध्येय झाल्यासारखं झालं आहे." असं त्यावेळी अभय बंग यांनी सांगितलं. यामधल्या "Pleasure" या शब्दाच्या जागी "security" हा शब्द टाकला तरी ते सत्यच आहे...

परिवर्तन च्या माध्यमातून आम्ही नुकतेच राजकीय पक्षांच्या अतिक्रमणाबाबत चा प्रश्न हाती घेतला आहे. आमच्या एका सदस्याला त्याच्या लंडन मधल्या भावाचा फोन आला... "असल्या फंदात पडू नकोस.."!! राजकीय पक्ष म्हणले की मध्यमवर्गीय लोकांच्या मनात धडकी भरते. इतकी दहशत खरोखरच जर राजकीय पक्षांनी निर्माण केली असेल तर परिवर्तनचे काम दुप्पट गतीने आणि खरं तर दुप्पट आक्रमकतेने करायची आवश्यकता आहे. कारण दहशत असेल तिथे लोकशाही नांदू शकत नाही.
एका अत्यंत मागासलेल्या, स्वार्थी आणि क्षुद्र मनोवृत्तीचे दर्शन मध्यमवर्गीय लोकांशी बोलताना होते... आणि हे मध्यमवर्गाच्या रक्तातच आहे की "मध्यमवर्ग" या नावातच आहे कळायला मार्ग नाही... शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी एका माणसाने आपले आयुष्य लोकांसाठी खर्च करायचे ठरवले. पुण्यातल्या मध्यमवर्गीय क्षुद्र लोकांनी त्या माणसाची हुर्यो उडवली, टोमणे मारले, मागे खेचायचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला कुचेष्टेने ठेवलेले "सार्वजनिक काका" हे नाव पुढे मात्र अत्यंत आदराने घेतले जाऊ लागले ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ज्योतिबा फुले, टिळक, आगरकर, महर्षी कर्वे,  आंबेडकर, गांधी, सावरकर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील... असंख्य.....!!!

भ्रष्टाचार नको असे प्रत्येकाला वाटते, पण एका बाजूला भ्रष्टाचार नसेल तर आपण इतर अल्प उत्पन्न गटाच्याच दर्जाचे होऊ या भितीमाधेही मध्यमवर्ग बुडाला आहे... 'समजा एखादे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सामान्यतः लोकांना जर ४ दिवस लागत असतील तर मला पण तेवढेच लागतील...त्यापेक्षा २०० रुपये देऊन २ दिवसात का ते करून घेऊ नये.' अशी मध्यमवर्गीय मनोवृत्ती भ्रष्टाचार शाबूत ठेवते. किंबहुना भ्रष्टाचाराला अभय देते. आणि तरी भ्रष्टाचार विषयावर व्याख्यान झोडणारे आणि ऐकणारे दोघेही मध्यमवर्गीयच असतात...!!!

शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्याच्या घरात... असं म्हणलं जातं... आजकाल तर अशी परिस्थिती आली आहे की शेजारी जरी शिवाजी जन्माला आला तरी आपले महाभाग त्यांच्याकडे जातील आणि त्या शिवाजी च्या आईला म्हणतील," काकू, तुमच्या मुलाला आवरा, फार व्रात्य झाला आहे. आत्ताच करा काहीतरी नाहीतर नंतर मुलगा पार वाया जाईल."
असे किती शिवाजी जन्माला येऊन बँक, सरकारी ऑफिस किंवा आय टी कंपनीत कारकुनाचं काम करत असतील काय माहित...
सगळ्यांचेच हे केवढे तरी मोठे नुकसान आहे....

मध्यमवर्ग बदलाला घाबरतो. वेगळेपणाला घाबरतो. पण अतिशय मोठा विरोधाभास असा की या बदलाचे, वेगळेपणाचे विलक्षण आकर्षण याच वर्गाला वाटत असते.(परिवर्तन बद्दल विलक्षण कुतूहल असणारे आणि कौतुक करणारे असंख्य भेटले. पण आपण होऊन काम करायची तयारी दाखवणारे जवळपास नाहीच...) पण त्यामुळे त्या बदलाचा एक भाग व्हावे असे मात्र त्यांना वाटत नाही. कारण सदैव कुठल्यातरी भीतीने मध्यमवर्ग ग्रासलेला असतो.. आणि ही “गमावण्याची” भीतीच सुरक्षिततेबाबतचा पझेसिव्हनेस निर्माण करते....

'मी आणि माझे छोटेसे कुटुंब... माझ्या कुटुंबाचं सुख...आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक सामाजिक वगैरे वगैरे सर्व प्रकारची सुरक्षितता या पलीकडे पहायचे नाही..' या क्षुद्र मनोवृत्तीच्या दलदलीत सगळा मध्यमवर्ग पुरता रुतलेला आहे... यातून या समाजाला बाहेर काढायचे काम जवळपास अशक्य आहे... कारण ही मनोवृत्ती सामान्य मानवी स्वभावाचा भाग आहे... त्यामुळे जोवर मध्यमवर्ग आहे तोवर ही मनोवृत्ती असेल... आणि म्हणूनच कोणत्याही परिवर्तनाच्या, बदलाच्या कार्यात मध्यमवर्गाचा पाठींबा कधीच मिळणार नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे... पाठींबा किंवा सहकार्य तर सोडाच उलट विरोध सहन करावा लागेल... पण ज्या दिवशी परिवर्तनाच्या तुमच्या उद्दिष्टांमध्ये तुम्ही सफल व्हाल तेव्हा हाच वर्ग नाकं मुठीत धरून तुमच्यासमोर लोटांगण घालायला येणार आहे याबद्दल मला जराही शंका नाही...

Friday, November 5, 2010

अंधश्रद्धेच्या विळख्यात...

"आदर्श" प्रकरणात अशोकरावांचे जे व्हायचं ते होवो... पण या प्रकरणामुळे किती गलिच्छ पद्धतीने काँग्रेस नेते वागत आहेत हे लक्षात येतं. काँग्रेस हा भारतातला सर्वात प्रमुख, सर्वात जुना आणि सर्वात ताकदवान पक्ष आहे. एखादा पक्ष भ्रष्टाचार,स्वार्थ आणि बिनडोकपणा या तीनही गोष्टी असूनही इतके वर्ष अधिसत्ता कशी काय गाजवू शकतो हे न उलगडणारे कोडे आहे... याचे एकमेव उत्तर म्हणजे भारतीयांची सडलेली मानसिकता. भारतीय अडाणी जनता काँग्रेसच्या बाबतीत अंधश्रद्धाळू बनली आहे. आणि फक्त अडाणी जनताच नव्हे तर शहरातले शिकले सवरलेले लोकही या बाबतीत अगदी अडाणी लोकांसारखे वागतात. राहुल गांधी याने मुंबईच्या लोकल मधून प्रवास केला, त्यासाठी तिकिटाच्या रांगेत तो स्वतः उभा राहिला या गोष्टींचे आपल्याकडे काय कौतुक... विरोधकही "ही तर स्टंटबाजी" असं म्हणत त्याची दखल घेतात. पण 'खासदार' असलेल्या राहुल गांधी यांना तिकीट काढायची काहीच गरज नव्हती, कारण खासदारांना लोकप्रतिनिधी या नात्याने लोकल रेल्वेचा प्रवास फुकट करता येतो....!!!! तर अशा बिनडोक माणसाला आपल्याकडे अंधश्रद्धाळूपणे देशाचा भावी पंतप्रधान म्हणलं जातं. विरोधकही तेवढेच निर्बुद्ध असल्याने त्याच्यावर टीका करत त्याला महत्व देतात.
 
काँग्रेस ही देशाला लागलेली कीड आहे आणि ती समूळ नष्ट करायची गरज आहे. काही लोक म्हणतील की मूळ काँग्रेस चांगला पक्ष आहे. त्यातल्या वाईट लोकांना काढले म्हणजे झाले. पण हे (असल्यास!)चांगले लोक जे काही टिकून आहेत, ते इतके मूर्ख आहेत का की त्यांनी अजूनही काँग्रेस सोडू नये?! काँग्रेस असं मी जेव्हा म्हणतोय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मी मुळीच वेगळं मानत नाही. एकातूनच दुसरा तयार झालाय म्हणल्यावर सगळे दोष याही पक्षात आहेतच.

माझा एक मित्र काँग्रेसच्या "हाय कमांड" ची फार स्तुती करतो. 'सगळे फार हुशार लोक आहेत, ते सरकार बनवतात दिल्ली मध्ये, त्यामुळे देश चांगल्या हातात आहे.' अशा काही त्याच्या भाबड्या समजुती... मुळात आपल्या देशात लोकशाही आहे, कितीही "हाय कमांड" वगैरे म्हणलं तरी लोकसभेत बसणारे आपल्या पक्षाचे २०० खासदार आणि वेगवेगळ्या विधानसभांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे हजारो लोकप्रतिनिधी  हेच सर्वात महत्वाचे आहेत याची जाणीव त्यांनाही आहे. तशी ती नसती, आणि क्षणभर हेही गृहीत धरू की खरोखरच ते लोक चांगले आहेत, तर त्यांनी अशोकरावांची केव्हाच हकालपट्टी केली असती. पण आज अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काही आमदारांची आणि समर्थकांची ताकद उभी आहे. प्रणव मुखर्जीला काही का वाटेना, ही शक्ती नजरेआड करणे अवघड आहे. विलासराव देशमुख राहुल गांधींच्या खास मर्जीतले नाहीत, पण महाराष्ट्र विधानसभेत त्यांना असणारा आमदारांचा पाठींबा हा इतका महत्वाचा आहे की केंद्र सरकार मध्ये त्यांचा पुनर्वसन करणं काँग्रेस "हाय कमांड"साठी क्रमप्राप्त होतं. थोडक्यात लोकशाही राज्यात "वरती" बसलेले किती चांगले आहेत याला किंमत नाही. चांगुलपणा खालपासून असायला हवा. आणि तसा तो नसेल तर निदान वरच्या पातळीवरच्या नेत्यांमध्ये कणखरपणा हवा. सोनिया गांधी/ राहुल गांधी हे लोक एवढे कणखर असले पाहिजेत की जे लोक भ्रष्ट असतील त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी माझे मत मी काँग्रेस पक्षाला देईन.

काँग्रेस पक्ष कुठलेही कणखर पाऊल घेण्याच्या दृष्टीने पूर्णपणे असमर्थ आणि दुबळा आहे. अशा दुबळ्या पक्षाला मी माझे मत का द्यावे? केवळ पंतप्रधान "पी एच डी" असावा म्हणून पुण्यातून उभ्या असलेल्या कलमाडीला मी मत द्यावे हे माझ्या तरी विवेक बुद्धीला पटत नाही.

असंख्य भ्रष्टाचाराची आणि गैरव्यवहारांची प्रकरणं बाहेर येत आहेत. 'लावासा' पासून ते आता 'आदर्श' पर्यंत. सगळीकडच्या चिखलात काँग्रेस चे लोक पूर्णपणे बरबटलेले आहेत...कलमाडी, शीला दीक्षित, आणि आता अशोक चव्हाण सगळे "हाय कमांड" समोर रांगेत उभे आहेत... यांच्यावर काही ठोस कारवाई (निलंबन वगैरे पोकळ काही नको..ठोस कारवाई हवी..!) होते की नाही हीच वाट पहायची...

Monday, November 1, 2010

बिनडोक महापालिका...


 वाहतूक सुधारण्यासाठी रस्ता दुभाजक हा अतिशय महत्वाचा घटक असतो हे फारसे कधी लक्षात घेतले जात नाही.
रस्ता दुभाजक कशासाठी असतो???
- रस्त्याचे दोन सारखे भाग करणे आणि जायला-यायला गाड्यांना मार्ग ठरवून देणे.
- कोणत्याही गाडीने अचानक उजव्या बाजूला वळू नये आणि आणि वाहतुकीची शिस्त मोडू नये.
- कोणताही पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्यात येऊ नये.
- एकूणच वाहतूक निर्वेधपणे आणि शिस्तबद्ध रितीने सुरु राहावी यासाठी रस्ता दुभाजक अतिशय महत्वाचे असतात.
रस्ता दुभाजक कसा असावा यावर आजपर्यंत कोणी फार विचार केल्याचे ऐकिवात नाही... वाहतुकीची शिस्त पाळण्यासाठी रस्ता दुभाजकाचे असलेले अनन्यसाधारण महत्व आजवर दुर्लक्षितच राहिले आहे. त्यातच पुणे महापालिकेने ज्याकलात्मकपद्धतीने रस्ता दुभाजकांमध्ये वैविध्य ठेवले आहे, ते पाहता रस्ता दुभाजक ही रस्त्याच्या मध्यभागी उभारलेली एक अडगळीची किंवा काही ठिकाणी शोभेची गोष्ट आहे असे वाटते.
पुणे महापालिकेच्या कामाला निर्बुद्धपणा म्हणावा की निष्काळजीपणा?? की दोन्ही..??!!! (तीच शक्यता अधिक आहे..!!)
पुण्यातल्या रस्ता दुभाजकांची काही खास उदाहरणे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो.

) कर्वे रस्ता- खंडुजीबाबा चौक ते एसएनडीटी (पौड फाटा)
अनेक वर्षांपूर्वी या रस्त्यावर उंच रस्ता दुभाजक होता. उंच आणि अरुंद! त्यामुळे रस्ता दुभाजक रस्त्याचा कमी भाग व्यापत. - फूट उंच अशा या दुभाजकांमुळे समोरून येणाऱ्या गाड्यांचे प्रखर प्रकाश झोत आपल्या डोळ्यात जात नसत. तसेच अशा उंच दुभाजकांमुळेच पादचारीही वाट्टेल तिथून रस्ता ओलांडत नसत. त्याचवेळी एस एन डी टी येथे रस्ता ओलांडण्यासाठी एक उंच पूल उभारण्यात आला. अनेक वर्ष उलटून गेल्यामुळे इथला जुना रस्ता दुभाजक खराब झाला. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर नवा रस्ता दुभाजक टाकण्यात आला. सध्या या दुभाजकाची उंची -. फूट आहे. कोणताही पादचारी वाट्टेल तिथे सहजपणे पाय टाकून रस्ता ओलांडू शकतो. याच्यावर बसवलेले रिफ्लेक्टर केव्हाच खराब झाले आहेत. रात्रीच्या वेळी समोरच्या वाहनांचा प्रकाश झोत थेट डोळ्यात जातो. एकूणच हा रस्ता दुभाजक अत्यंत निर्बुद्ध पद्धतीने बसवण्यात आल्याचे स्पष्ट होते.

) कर्वे रस्ता- कर्वे पुतळा ते शिवाजी पुतळा.
या रस्त्यावर पक्का रस्ता दुभाजक नाही. सिमेंट चे ठोकळे रस्त्यावरच आडवे टाकण्यात आलेले आहेत. त्यातील काही आपली रांग सोडून बेशिस्त पद्धतीने बाहेरही आलेले आहेत. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशात या ठोकळ्यांना धडकून पडण्याचे चार चाकी गाड्यांचे नुकसान होण्याचे प्रकार अधून मधून घडत असतात. महापालिकेच्या निर्बुद्ध आणि निष्काळजीपणाची हद्द...!!

) पौड रोड
पौड रोड चे काम गेले अनेक वर्ष सुरूच आहे. तिथे राहणाऱ्यांनाही ते कधीपासून सुरु आहे ते आठवत नसावे!!! नव्यानेच होत असलेल्या किंवा झालेल्या या रस्त्यावर वरीलप्रमाणेच सिमेंट चे ठोकळे रस्ता दुभाजक म्हणून ठेवण्यात आले आहेत. फरक इतकाच की पौड रस्त्यावरचे हे ठोकळे जमिनीत पक्के करण्यात आलेले आहेत. एकूणच कर्वे रस्त्याप्रमाणेच इथेही पादचारी वाट्टेल तिथून रस्ता ओलांडत वाहन चालकांची परीक्षा पाहतात. पहिल्या लेन मधून नेहमीच वाहतुकीचा वेग जास्त असतो. अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राण गमवावा लागल्यावरच महापालिका जागी होणार आहे का????

) दांडेकर पूल ते पानमळा
हा रस्ता सिमेंट चा होऊन अनेक वारस उलटली. तेव्हाच हा रस्ता दुभाजक एखाद्या फुटपाथ सारखा का बनवण्यात आला हे खरोखरच उलगडणारे कोडे आहे. वाट्टेल तेथून रस्ता ओलांडणारे पादचारी, या रस्ता दुभाजकावर खेळणारी लहान मुले, किंवा तेथेच निवांत झोप काढणारे लोक या सगळ्यामुळे येथून गाडी चालवणे मोठे जिकीरीचे काम असते.

) औंध रस्ता आणि बाणेर रस्ता
काहीच वर्षांपूर्वी नव्याने करण्यात आलेले हे दोन प्रशस्त रस्ते. इथले रस्ता दुभाजक पौड रस्त्याप्रमाणेच करण्यात आले याचे कारण निष्काळजीपणा पेक्षा निर्बुद्धपणाच आहे. इथले रस्ता दुभाजक हे उंच आणि मध्ये झाडे लावता येण्या योग्य असे रुंदही करता आले असते. पण महापालिकेला विचार करायची इछाच नाही की काय असा प्रश्न पडतो.

"कॉमन सेन्स" या सदराखाली मोडणारा विचारही महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक करत नाही याची प्रचीती फक्त रस्ता दुभाजकांकडे बघितल्यावरही येते...
(मी जेव्हा "महापालिका" असे म्हणतो तेव्हा त्यात जसे प्रशासकीय अधिकारी येते तसेच नगरसेवक म्हणजेच लोकप्रतिनिधीही, येतात. कोणत्याही एकाच घटकाला पूर्ण दोष देणे अयोग्य ठरेल.)

चांगले रस्ता दुभाजक:
जसे निर्बुद्ध पद्धतीने लावलेले रस्ता दुभाजक आहेत तसेच काही ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ता दुभाजकही आहेत. त्याची नोंद करणे आवश्यक आहे.
) कर्वे रस्ता- पौड फाटा ते कर्वे पुतळा
) दांडेकर पूल ते सारसबाग.
) औंध- ब्रेमेन चौक ते परिहार चौक.
अशा प्रकारचे रस्ता दुभाजक सर्वच जागी लावणे आवश्यक आहे. अर्थात योग्य त्या अंतरावर पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याची जागा सोडणे आवश्यक आहे. दांडेकर पूल ते सारसबाग रस्त्यावर अशा जागा सोडण्याचा अतिरेक झाला आहे. दर दहा फुटावर रस्ता ओलांडण्याची जागा. याउलट परिस्थिती कर्वे रस्त्यावर पौड फाटा ते कर्वे पुतळा या भागात होती. रस्ता ओलांडायला जागाच नव्हती. अशा गोष्टी टाळून मध्यम मार्ग स्वीकारत रस्ता दुभाजक उभारले पाहिजेत.

"रस्ता दुभाजक" हे महापालिकेच्या निर्बुद्धपणाचे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. अशीच इतर असंख्य उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. अशा प्रकारची इतर उदाहरणे पुढच्या लेखांमधून द्यायचा माझा प्रयत्न असेल.