Monday, July 8, 2024

नशिबातले ‘स्टार्स’!

वर्तमानपत्रात सिनेमाच्या परीक्षणाखाली त्या सिनेमाला ‘स्टार्स’ दिलेले असतात. ही पद्धत बरीच जुनी आहे. जी व्यक्ती परीक्षण लिहिते तीच ते स्टार्स देखील देते. आणि आपण सगळे केवळ वाचक या नात्याने त्यात सहभागी. एखादं हॉटेल थ्री-स्टार आहे की फाईव्ह स्टार आहे हे आपण ठरवत नाही. कोण ते ठरवतं हे जाणून घेण्याच्या फंदातही आपण फारसे पडत नाही. ते कोणीतरी आपल्यासाठी ठरवून दिलेलं असतं जणू. इथेही केवळ ग्राहक या नात्याने आपण त्यात सहभागी. अशा काही मोजक्या जागा सोडल्या, किंवा वर्तमानपत्रातले वाचकांचा पत्रव्यवहार वगैरे विभाग सोडले तर सामान्य माणसाची भूमिका बघ्याचीच असे. इंटरनेट क्रांतीने या व्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला. इंटरनेटच्या लाटेवर स्वार होत सोशल मिडियाची त्सुनामी आली आणि तिने पारंपरिक व्यवस्थेला नुसता धक्का दिला असं नव्हे तर ती व्यवस्था उध्वस्त करून टाकली.


वर्तमानपत्र असो किंवा कोणत्याही पारंपरिक व्यवस्था, सगळीकडे नियंत्रण ठेवणाऱ्या संपादक नामक यंत्रणा असते. म्हणजे कोणता मजकूर वाचकांपर्यंत पोहचणार आणि कोणता नाही हे संपादक, मालक मंडळींच्या मर्जीवर अवलंबून. सोशल मिडियाने हे नियंत्रण हटवले. आणि ‘युझर जनरेटेड कंटेंट’ म्हणजे वापरकर्त्यांनी तयार केलेला मजकूर असणाऱ्या वेबसाईट्स, सोशल मिडिया आला. यूट्यूब हे त्याचं एक अव्वल उदाहरण. स्वतः यूट्यूब कंपनी व्हिडीओ, गाणी, सिनेमे तयार करत नाही. पण तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक व्हिडीओ तयार करतात आणि यूट्यूबवर टाकतात. म्हणजेच जे वापरकर्ते आहेत तेच निर्मातेही आहेत! युट्यूबवर दररोज साधारणतः तब्बल ७ लाख २० हजार तासांचा व्हिडीओ मजकूर लोकांकडून अपलोड होतो म्हणजे नव्याने बघण्यासाठी उपलब्ध केला जातो. यूट्यूबचे छोटे व्हिडीओज् म्हणजे ज्यांना YouTube Shorts म्हणतात ते दिवसाला सरसरी ७,००० कोटी वेळा बघितले जातात. हे आकडे एका दिवसातले आहेत! वर्षाला जवळपास ३००० कोटी डॉलर्स एवढा यूट्यूबचा जाहिरातीतून येणारा महसूल आहे. वापरकर्त्यांनी तयार केलेला मजकूर असणाऱ्या वेबसाईट्सने काय क्रांती केली आहे त्याची कल्पना यावी म्हणून ही आकडेवारी दिली.

या अभूतपूर्व आणि चक्रावून टाकणाऱ्या प्रकाराबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाने अजून एक गोष्ट आणली ती म्हणजे, ज्याप्रमाणे वापरकर्ते हेच मजकूर निर्माते झाले, त्याचप्रमाणे वापरकर्ते हेच परीक्षकही झाले. सिनेमाचं परीक्षण वर्तमानपत्रात काय आलं आहे यापेक्षा वेगवेगळ्या वेबसाइट्सवर प्रेक्षकांनी काय रेटिंग दिलं आहे ते आता आपण बघू लागलो. स्विगी किंवा झोमॅटो मोबाईल अप्लिकेशन वापरून घरी जेवण मागवलं तर जेवणाला, आणि जेवण पोचवण्याची सेवा यालाही आपण स्टार्स देऊ लागलो. उबर किंवा ओला वापरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅबने गेलो तर ती सेवा कशी वाटली याबद्दल स्टार्स देऊन मत व्यक्त करू लागलो. गुगल असो नाहीतर फेसबुक सारखं सोशल मिडिया, आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू लागलो. किंबहुना कोणतीही सेवा निवडताना ‘रेटिंग काय आहे हे बघणं त्याचा आपल्या निर्णयावर कळत-नकळतपणे परिणाम होणं हे आपल्या आयुष्याचा आज भाग बनलं आहे. अगदी डॉक्टर मंडळींनाही प्रॅक्टो सारख्या वेबसाईट्सवर आपलं रेटिंग नीट राहील यासाठी प्रयत्न करावे लागतात. फेसबुकचा जन्म २००४ चा, यूट्यूबचा २००५ चा. झोमॅटो आलं २००८ मध्ये, तर स्विगी आलं २०१४ मध्ये. उबरचा जन्म २००९चा तर पाठोपाठ ओला कॅब्स आल्या २०१० मध्ये. डॉक्टरांसाठी प्रॅक्टो आलं २००९ मध्ये. गेल्या अवघ्या वीस वर्षांत अवतरलेलं हे युग आहे. हे सांगायचा उद्देश हा की आज लग्नाला उभी असणारी पिढी त्यांच्या कळत्या वयात हे टप्पे आणि बदल बघत मोठी झाली आहे. गेल्या वीस पंचवीस वर्षांत अवतरलेल्या या युगात आपण सगळे ‘परीक्षण करणारे’ झालो आहोत.

नव्या युगातल्या आपल्या बदललेल्या सवयींचा आपल्या लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. जाता येता अनेक गोष्टींवर आपण निकाल देणारे न्यायाधीश असल्याच्या अविर्भावात आपण निवाडे देऊन मोकळे होतो. कधी कपड्यांवर, कधी वागण्यावर, कधी बोलण्यावर तरी कधी सवयींवर. आणि स्वाभाविकपणे या आपल्या सवयीचा परिणाम नातेसंबंधांवरही होतो म्हणून याविषयीची सविस्तर चर्चा आवश्यक आहे. माझ्या कामाच्या निमित्ताने मी लग्नाच्या प्रक्रियेत असणाऱ्या अनेक मुला-मुलींना भेटतो. ते लग्न ठरवण्याच्या दृष्टीने ज्या मुला/मुलींना भेटलेले असतात, ज्यांची स्थळं त्यांनी बघितलेली असतात त्याविषयी आम्ही चर्चा करतो. आणि मला अनेकदा जाणवतं ते हे, की पुरेशा विश्लेषणाआधीच त्यांचा सकारात्मक (किंवा बहुसंख्यवेळा नकारात्मक) निकाल देऊन झाला आहे! जोडीदार शोधताना तीन सेकंदात अंतिम निकाल देऊन मोकळी होणारी मुलं मुली मी बघतो तेव्हा मला आश्चर्यच वाटतं. थेट ‘हो किंवा नाही’चा अंतिम निवाडा! जेव्हा आपण निकाल देतो तेव्हा`तेव्हा तो अंतिम निवाडा असल्यासारखा अपरिवर्तनीय असतो. आपणच नकळतपणे आपल्या अहंमुळे त्यात अडकतही जातो. आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या घटनेच्या सर्व कंगोरे समजले आहेत, आणि सर्व बाजू, साक्षी पुरावे समजून घेऊन आपण निवाडे देत आहोत अशा अविर्भावात आपण निकाल जाहीर केलेला असतो. पण खरोखरच आपण हे सगळं केलेलं असतं का? कि पराचा कावळा करतो? मुला-मुलीच्या पहिल्या भेटीत कॉफीमध्ये तीन चमचे साखर घातली यावरून त्या मुलीच्या आयुष्यातल्या सगळ्या सवयींचा आडाखा बांधून तिच्याबाबत अंतिम निकालपत्र तयार करणारा मुलगा मला मागे भेटला होता. किंवा ज्या अर्थी मुलगा उशिरा आला त्या अर्थी तो नेहमीच असा वागणारा असला पाहिजे असा निकाल पक्का करणारी मुलगीही मला माहित आहे. अशी शेकडो उदाहरणं आहेत.

आपण जेव्हा आपला जोडीदार निवडतो तेव्हा आपण त्या व्यक्तीकडे माणूस म्हणून बघणं गरजेचं असतं; आणि एखादी सेवा घेण्याइतका माणूसप्राणी सोपा सुटसुटीत थोडीच आहे? सगळं काळं-पांढऱ्यात बघायचा प्रयत्न करणं हा शुद्ध गाढवपणा आहे; कारण माणसात गुणदोष दोन्हीही असणारच! म्हणजे ‘जे काही असेल ते आपलं नशीब असं म्हणत आहे तसं स्वीकारा आणि पुढे व्हा’ असा अर्थ बिलकुल नाही. सारासार विचार करूनच अनुरूप जोडीदार निवडायला हवा याबाबत मुळीच दुमत नाही. पण जजमेंटल म्हणजेच निकालखोर असणं, आणि आणि विश्लेषक असणं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. विश्लेषणामध्ये दुरुस्तीची शक्यता असते. आधी काढलेला निष्कर्ष चुकीचा होता हे म्हणण्याची सवलत असते. समोरच्या व्यक्तीला भेटल्यावर आपल्याला जे दिसतं, समजतं ते आपण घेत जातो. पण तेच अंतिम सत्य समजण्याचा प्रकार आपण करणं शहाणपणाचं नाही. सत्याचे अनेक पैलू असू शकतात, अनेक आयाम असू शकतात, जे आपल्यापर्यंत पोहचले नाहीत, ही शक्यता आपण विचारात घेणार की नाही? मुलाला उशीर झाला या घटनेकडे आपण वेगवेगळ्या नजरेने बघू शकतो. मुद्दाम उशीर केला, नेहमीच उशिरा जातो सगळीकडे, वाहतूक कोंडीत अडकला असेल, आज नेमकी गाडी बंद पडली, आजच नेमका उशीर झाला, निघता निघता काम आलं, काहीतरी करण्यात आज नेमका एवढा गुंतला की घड्याळाकडे लक्षच गेलं नाही; अशा कितीतरी शक्यता आहेत ना! त्या शक्यतांचा विचार करणं आणि त्यांचा वेध घेणं म्हणजे तर्कशुद्ध विचार करणं. माणसावर लेबल चिकटवून निर्णय दिला की दुरुस्तीची शक्यता मावळते. झापडं लावल्यासारखे आपण तेवढ्यालाच अंतिम सत्य मानतो. सोशल मिडियावर निकालखोर मतप्रदर्शन करण्याचा परिणाम तुलनेने छोटा असेल, पण लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत मात्र जोडीदार निवडीवर आणि पर्यायाने आपल्या आयुष्यावर फार मोठा परिणाम आपण करून घेत असतो. हे निकालखोर वागणं टाळणं शक्य आहे. आणि त्यासाठी गरज आहे ती म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तीची कृती यात विभागणी करण्याची.

सोशल मिडिया असो वा इतर संकेतस्थळं, आपण रेटिंग देतो, स्टार्स नोंदवतो, प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण त्या विशिष्ट सेवेविषयी बोलत असतो, व्यक्तीविषयी नाही. आपल्याला हॉटेलमधून जेवण आणून देणाऱ्या व्यक्तीशी आपली ओळखही नसते, तर आपण त्या व्यक्तीला वाईटसाईट का बरं बोलू? पण तरीही एखाद्या वेळेस आपण एकच स्टार देत असू तर त्या मागे त्या व्यक्तीची सेवा आपल्याला आवडली नाही असा त्याचा अर्थ असतो. आणि हेच सगळ्या सेवांना लागू होतं. ‘व्यक्ती’ आणि ‘त्या व्यक्तीने दिलेली सेवा’ या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याने स्वतंत्रपणे बघता यायला हव्यात. अगदी तसंच लग्नात आणि नात्यांत एखाद्या व्यक्तीची कृती पसंत नाही पडली म्हणून संपूर्ण व्यक्तीवर काहीतरी लेबल लावून फुली मारणं, किंवा व्यक्ती पसंत पडल्यावर भक्तीभाव बाळगणं शहाणपणाचं नाही. व्यक्तीच्या चांगल्या-वाईटाकडे विश्लेषक दृष्टीने बघणं, तर्कशुद्ध पद्धतीने जोखणं, आणि त्या पुढे जात यातलं माझ्यासाठी काय अनुरूप आहे आणि नाही याचा विचार करणं हे अनुरूप जोडीदार निवडताना आवश्यक आहे. व्यक्तीकडे एक स्वतंत्र गुणदोष असणारी व्यक्ती म्हणून बघूया, रेटिंग किंवा स्टार्स द्यायची संधी म्हणून नव्हे. एवढं केलं तर आपलं लग्न आणि नात्यांचे स्टार्स चमकण्याची शक्यता वाढेल, हे नक्की!  

(दि. ७ जुलै २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)

Friday, May 17, 2024

नात्यातल्या ‘स्पेस’चं गौडबंगाल...

अपेक्षांबद्दल बोलताना कोणत्याही लग्नाळू मुलाकडून किंवा मुलीकडून बोलण्यात हमखास येणारा शब्द म्हणजे ‘स्पेस. नात्यात स्पेस देणारी व्यक्ती जोडीदार म्हणून सर्वांनाच हवी आहे. हे स्पेसचं गौडबंगाल नेमकं आहे काय? स्पेस देणं म्हणजे नेमकं काय हे मुला-मुलींना फार तपशीलांत नीट सांगता येत नाही आणि पालक तर याबाबत अजूनच गोंधळलेले दिसतात. पण हा मुद्दा जसा लग्नाआधी महत्त्वाचा आहे तसा कित्येक घटस्फोट प्रकरणांमध्येही प्राधान्याने बोलला जातो. आणि म्हणून लग्न टिकवणे आणि फुलवणे यासाठीही या ‘स्पेस’च्या विषयात खोलवर डोकवून गांभीर्याने बघणं आवश्यक आहे.

स्पेस म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर काही गोष्टी या फक्त माझ्या आणि व्यक्तिगत असू शकतात याला असणारी मान्यता आणि त्या गोष्टींसाठी अवकाश. आता या ‘काही गोष्टीं’मध्ये काय काय येतं? दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा ते एक प्रकारे स्वतःकडे असणारे स्रोत (रिसोर्सेस) वाटून घेण्याचं, शेअर करायचं ते मंजूर करतात. यात वेळ, ऊर्जा, माहिती, पैसा आणि प्रत्यक्ष स्पेस म्हणजे जागा (घर) या प्राथमिक गोष्टी झाल्या. समाजातलं एकमेकांचं, एकमेकांच्या कुटुंबांचं नेटवर्क, गुडविल हे रिसोर्सेसही वाटून घेतले जातात. पैसा आजपेक्षा उद्या जास्त-कमी मिळू शकतो, घर आज आहे त्यापेक्षा उद्या मोठं असू शकतं, ऊर्जा देखील मन आणि शरीराच्या तंदुरुस्तीनुसार वर खाली होऊ शकते. पण वेळ? ती एक गोष्ट अपरिवर्तनीय आहे. सर्वांसाठी दिवसाचे २४ तासच आहेत. वेळ नावाचा स्रोत मर्यादित असल्याने असेल कदाचित, पण ‘स्पेस बाबतच्या बहुसंख्य चर्चा एकमेकांना द्यायचा वेळ आणि स्वतःसाठी घ्यायचा वेळ या मुद्द्यांपाशी येऊन थांबताना मला दिसतात. पूर्वीच्या काळी स्त्री-पुरुष दोघांनाही व्यक्तिगत स्पेस किंवा प्रायव्हसी नावाचा प्रकार फारसा उपलब्ध नव्हता. जरा सुखवस्तू घरांमध्ये पुरुषांना ही चैन थोडीफार तरी उपलब्ध होती, स्त्रियांची मात्र सरसकट मुस्कटदाबी होती. विसाव्या शतकापासून हे चित्र टप्प्याटप्प्याने बदललं आणि एकविसाव्या शतकात तर खूपच बदल झाला. गेल्या शंभर वर्षांत ज्या प्रकारे अर्थकारणाने गती घेतली, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही कामासाठी घराबाहेर पडू लागल्या, तशी स्वतःच्या पैशाबाबत, स्वतःच्या वेळेबाबत स्वतःहून ठामपणे निर्णय घेण्याची स्त्री-पुरुष दोघांचीही ऊर्मी बळावली. त्यातूनच स्पेस देणाऱ्या जोडीदाराची अपेक्षा डोकावू लागली.

‘आता माझा सगळा वेळ तुझा, आणि सगळं एकत्र करू’ अशा कितीही आणाभाका लग्न करताना घेतल्या तरी व्यवहारात असं थोडीच होणार आहे? नोकरी, व्यवसाय असो किंवा अगदी घरगुती कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं असो; नवरा-बायको काय सदैव एकत्र नसतात. पण त्याबद्दल कोणी कधी आक्षेप घेत नाही. का नाही घेत? कारण तेच व्यावहारिक आहे हे सर्वमान्य आहे. पण काही गोष्टी या नवरा-बायकोने एकत्रच केल्या पाहिजेत अशी समजूत वर्षानुवर्षाच्या आपल्या मनावर ठसली गेलेली असते. ‘आणि ते नसेल तर लग्नच कशाला केलं?’ असा सवालही केला जातो. एक प्रकारे, त्या गोष्टी जोडप्याने एकत्र केल्या तरच त्यांच्या नात्याला अर्थ आहे असं मानलं जातं. गंमत अशी आहे की की यातल्या ‘त्या गोष्टींची यादी प्रत्येकाची वेगळी असू शकते. ती काळानुसार बदलते देखील! पूर्वीच्या काळी कॉफी शॉप मध्ये जाणं, हॉटेलात जाणं या गोष्टी आपल्या जोडीदाराबरोबरच कराव्यात असा प्रघात होता. आता ते उरलेलं नाही. म्हणजेच माझ्याकडे असणारे वेळ आणि पैसे यातले थोडे रिसोर्सेस मी लग्नाचा जोडीदार सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करणं हे आधीपेक्षा आता जास्त सहज स्वीकारलं जातंय. किंवा लग्नानंतर काही वर्षांनी हळूहळू नवरा-बायको सदैव एकत्र राहायचा प्रयत्न करण्याऐवजी अनेक गोष्टी एकमेकांशिवाय स्वतंत्रपणे करू लागतात. कालानुरूप नात्यांत झालेला हा बदल असतो. ही फक्त छोटीशी उदाहरणं दिली. पण यातून लक्षात येईल की स्पेसची मर्यादा एकदा ठरवली की काळ्या दगडावरची रेघ असा प्रकार नसतो. ती गोष्ट प्रवाही असते, बदलती असते, आजकालच्या भाषेत ‘Fluid’ असते. त्यामुळेच नुसत्या ‘मला स्पेस हवी’ या वाक्याला फारसा अर्थ नाही. आज प्रत्येक व्यक्तीला स्पेस आहेच. फक्त तुमची स्पेसची व्याख्या किती विस्तारलेली आहे हे बघायला हवं. आणि त्यासाठी मला स्पेस हवी म्हणजे नेमकं काय हवं, ते का हवं आहे याची स्पष्टता हवी.

एकदा स्पेस हवी म्हणजे नेमकं काय हवं आणि ते का हवं याची स्पष्टता आली की मग पुढचा फार महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे संवादाचा. एकविसाव्या शतकातली लग्न आधी असायची तशी सरधोपट असणार नाहीत. बदललेल्या जगातली नाती बहुरंगी, बहुढंगी आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच व्यक्ती व्यक्तीनुसार नात्यांच्या तऱ्हा बदलणार आहेत. पन्नास शंभर वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येकाचं काम ठरलेलं असायचं. तेच त्याने किंवा तिने करायचं ही रीत होती. अपवाद सोडून देऊ, पण रुळलेली वहिवाट हाच जगण्याचा मार्ग मानणारे बहुसंख्य होते. पण जगण्याच्या नवनवीन वाटा आजकालच्या पिढीने शोधल्या आहेत. यामध्ये नोकरी-व्यवसायाच्या वाटा तर आहेतच, पण मनोरंजनाच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, छंद-आवडी यातल्या आहेत. आता जेव्हा सरधोपट मार्ग सोडून आपण आडवाटेला लागतो तेव्हा अधिक कष्ट घ्यावे लागतात. कधी नवीन मार्ग तयारही करावे लागतात. आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद. आपल्या जोडीदाराशी दिलखुलास, मनमोकळा संवाद साधून आपल्याला स्पेस हवी म्हणेज नेमकं काय हवं ते सांगणं, त्यावर समोरच्याचं मत ऐकणं, विचारांची देवाणघेवाण करणं; आणि या सगळ्यातून विश्वासाचा पाया रचणं. त्या पायावरच स्पेसचा डोलारा उभा असणार आहे. हे नात्याच्या सुरुवातीला एकदाच करून पुरेसं नाही. कारण आपण बदलतो! तुम्ही, मी, आपले जोडीदार, आपल्यातली प्रत्येक व्यक्ती ही दोन वर्षांपूर्वी होती तशीच्या तशी असत नाही. आपल्याला येणाऱ्या भल्या बुऱ्या अनुभवांमुळे, नवीन शिक्षणामुळे, बघितलेल्या-वाचलेल्या-ऐकलेल्या नवीन गोष्टींमुळे, वयामुळे आपण सतत बदलत असतो. आणि म्हणून संवादाची ही सगळी प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्याला पर्याय नाही.

संवादाला धरूनच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जोडप्याची प्रायव्हसी’. आपण वैयक्तिक बाबतीत खाजगीपणाविषयी बोललो. पण खाजगीपणा ही गोष्ट जोडप्यांना आणि कुटुंबांनाही लागू होते. म्हणेज एखाद्या जोडप्याने त्यांच्यातल्या किती आणि कोणत्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तींसमोर उघड करायच्या, लग्नानंतर निर्माण झालेल्या त्यांच्या दोघांच्याच ‘स्पेस मध्ये तिसऱ्या व्यक्तीला वा व्यक्तींना किती आतपर्यंत येऊ द्यायचं हे त्या दोघांनी एकमेकांशी संवाद साधून ठरवायला हवं. प्रत्येक नात्याची आपापली एक स्पेस तयार होत असते. नवरा-बायकोसारख्या जवळीक असणाऱ्या (intimate) नात्यांत हे अवकाश जपणं, निरोगी राखणं अत्यावश्यक असतं. एकमेकांचे आई-वडील, नातेवाईक, जवळचे मित्र-मैत्रिणी यांना आपल्या दोघांच्या स्पेसमध्ये किती येऊ द्यायचं याविषयी चर्चा व्हायला हवी. नवीन नात्यासाठी तर हे अधिकच महत्त्वाचं.  

‘स्पेस’ची अपेक्षा ही नजीकच्या गेल्या काही दशकांमधली असल्याने ‘ही सगळी आजकालच्या मुलांची थेरं/फॅड्स आहेत’ असं म्हणत पटकन टीकाटिप्पणी करण्याचा मोह आधीच्या पिढीतल्या अनेकांना होऊ शकतो. स्पेस मिळण्याची, व्यक्तिगत अवकाश जपण्याची शक्यता आणि संधी गेल्या काही दशकांत वाढली असली तरी माणसाची प्रायव्हसीची गरज आदिम आहे. अगदी प्राचीन इतिहासातही याविषयी मंथन झालेलं आढळतं. काय खाजगी मानावं आणि काय नाही याचे नियम आडाखे बदलत गेलेले दिसतात. आपण सामाजिक प्राणी असलो तरीही स्वतःबरोबर वेळ घालवण्याची आपल्याला आवड असते. आणि तो वेळ कसा घालवायचा हे फक्त आपण ठरवतो. कधीही कोणाला न दाखवता केवळ स्वतःपुरती कविता करणारी एखादी आजी आपल्याला माहित असते बघा! तेव्हा हे काहीतरी नवीन ‘फॅड’ नसून मानवी गरज आहे हे नक्की.

एकुणात ‘स्पेस’ या गोष्टीकडे थोडं खोलात जाऊन बघणं गरजेचं आहे. नात्यात आवश्यक वाटणारी स्पेस निर्माण करण्यासाठी दोघांमध्ये निकोप संवाद असेल, सहभाग असेल तर अशी स्पेस नात्यासाठी आणि अर्थातच व्यक्तीशः दोघांसाठीही वरदान ठरू शकते. तेव्हा याकडे ‘कुठली ही नवी ब्याद’ असं न बघता सकारात्मकपणे बघितलं पाहिजे.

(दि. ६ मे २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)

Thursday, May 9, 2024

‘अनुरूप’शी लग्न !

रूढार्थाने ज्याला ‘व्यावसायिक दृष्टी’ म्हणतात त्याचा लवलेशही माझ्या मूळ स्वभावात नाही. नफा-नुकसान दृष्टी, व्यवहारात फसवणूक न होण्यासाठी लागणारं चातुर्य (किंवा धूर्तपणा), गोष्टीचं बाजारमूल्य ओळखणं अशा व्यवसायाला आवश्यक गोष्टी स्वभावतः माझ्यात नाहीत. उलट मी एक स्वच्छंदी वृत्तीचा माणूस. आवडेल ते करावं, किंवा कधी एखाद्या सामाजिक प्रश्नाला भिडावं आणि त्यात मनसोक्तपणे वाहवत जावं अशी वृत्ती. त्यामुळे ‘अनुरूप विवाहसंस्था’ या घरच्या १९७५ पासूनच्या व्यवसायात मी पडेन असं बिलकुल माझ्या डोक्यात नव्हतं. पण आयुष्यात एका टप्प्यावर माझ्या असं लक्षात आलं की मला माणसांमध्ये आणि माणसांशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे! लग्न हा माणसांच्या आणि विशेषतः भारतीय माणसांच्या आयुष्यातली एक फार मोठी घटना असते. आणि अशा विषयात काम करायची संधी अनुरूपमुळे मिळू शकते एवढा एक विचार मला अनुरूपमध्ये खेचलं जाण्यासाठी पुरेसा होता. अर्थात आपली आवड आणि आपली कौशल्ये याचा मेळ साधला तरच यश हाती लागू शकतं. आवड म्हणून अनुरूपमध्ये आलो खरा, पण कौशल्यांचं काय?

सुदैवाने माझ्या खात्यात दोन-तीन जमेच्या गोष्ट होत्या. २००८ मध्ये, कॉलजमध्ये असताना आम्ही काही मित्रांनी परिवर्तन या संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून सातत्याने चालू आमच्या सामाजिक-राजकीय कामामुळे एक व्यापक दृष्टीकोन तयार व्हायला मदत झाली होती. माझं पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर काही काळ स्वतःचं स्वतंत्रपणे काम मी केलं. त्यानंतर एका सामाजिक क्षेत्रातल्या सल्लागार कंपनीत नोकरी केली. नोकरीतली ही दोन वर्षं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. ९ ते ५ अशी साचेबद्ध नोकरी मी कधीही करणार नाही असं म्हणणारा मी नोकरीला लागलो कारण कंपनी सामाजिक क्षेत्रातली होती, म्हणजे माझ्या आवडीचा विषय. पण तरी ती ‘नोकरी होती. स्वच्छंदी वागण्याला मर्यादा होत्या. या नोकरीमुळे आपोआप माझ्यात शिस्त आली. ठरलेला दिनक्रम असल्यावर एक सहज लय येते आयुष्यात, तसं झालं. दुसरा मोठा फायदा झाला तो ‘सल्लागार’ कंपनीत काम केल्याचा. अशा कंपन्यांमध्ये एखाद्या विषयावर किती तास, किती मिनिटे काम केलं यानुसार कामाचं शुल्क क्लायंट कडून घेतलं जातं. याचा अर्थ असा तुमचं कंपनीसाठी असणारं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे आणि त्यात तुम्ही किती काम करू शकता यावर तुमची कार्यक्षमता ठरणार आहे. शिवाय ते काम कारकूनी पद्धतीचं नाही. सल्लागार नात्याने कामाचा दर्जाही घसरून चालणार नाही. दर्जा न खालावता, स्वतःच्या सर्वोत्तम कार्यक्षमतेने काम करण्याची पद्धतशीर शिकवण त्या दोन वर्षात मला मिळाली. मी थेट अनुरूपचं काम करायला लागलो असतो तर हे कधीही शिकलो नसतो. व्यवसायिक वृत्तीकडे जाण्याची सुरुवात नोकरीपासून झाली ती अशी!

माझ्या कामाची सुरुवात झाली ती डॉ गौरी कानिटकर म्हणजे माझ्या आईच्या मार्गदर्शनाखाली. अगदी लहानपणापासून, म्हणजे माझी आजी कार्यरत होती तेव्हापासून मी अनुरूपचं काम बघत आलो आहे. कॉलेजात असताना मी अनुरूपच्या वेबसाईटवर प्रोफाइल्स अपलोड करण्याचं काम करायचो, ज्याचे मला ५ रुपये प्रतिप्रोफाईल असे पैसे आईबाबा द्यायचे. तोच माझा पॉकेट मनी असायचा. त्यामुळे अनुरूपचं काम चालतं कसं याची मला माहिती होती. २०१४ मध्ये मी अनुरूपच्या कामाला लागलो तेव्हा मी २६ वर्षांचा होतो. मित्र-मैत्रिणींच्या घरी लग्नाबद्दल बोलणं चालू झालं होतं, त्यातले काहीजण अनुरूपचे सदस्य झालेही होते. त्याचा मला फारच फायदा झाला. अनुरूपकडून किंवा कोणत्याही विवाहसंस्थेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे मला अगदी सहज कळत होतं. नुसती माहिती मिळत होती असं नाही तर त्याच वयात मी असल्याने मला ते म्हणणं अधिक नीट समजतही होतं.

या सगळ्या गोष्टी विचारांत घेऊन काही महत्त्वाचे बदल अनुरूपच्या कामात करावेत असं मला वाटत होतं. विशेषतः कामकाजाच्या पद्धतीत. आपण नवीन असतो तेव्हा आपण धडाधड निर्णय घेऊन गोष्टी बदलून टाकू असं वाटत असतं. तो उत्साह महत्त्वाचा असला तरी त्याला तारतम्याची जोड द्यावी लागते, हे तेव्हा कुठे कळत होतं! सुरुवातीच्या काळात माझे माझ्या आईशी (म्हणजे माझ्या बॉसशी!) असंख्य छोट्या मोठ्या गोष्टीवरून खटके उडायचे. कामकाजाच्या अनेक जुन्या पद्धतींवर मी कडाडून टीका करत तुटून पडायचो अगदी. पण हळूहळू अनेक गोष्टी ‘अमुक पद्धतीनेच का केल्या जातात’ यामागचा विचार माझ्या लक्षात येऊ लागला. कारणमीमांसा लक्षात आली. आणि त्याचवेळी त्या कारणमीमांसेला विचारात घेऊनही नवीन काही बदल आम्ही केले. आधीच्या पिढीतली आई आणि तरुण पिढीतला मी; या दोघांच्या विचारातून मध्यममार्ग काढले, जे कंपनीसाठी सर्वोत्तम होते. यात कोण किती पावलं मागे आलं हा मुद्दा दुय्यम ठरू लागला; पहिल्या वर्ष-दोन वर्षांच्या काळातच एकदा ही दिशा नक्की झाल्यावर पिढी वेगळी असूनही एकत्र काम करताना अडचण येईनाशी झाली. यात माझ्या मोठ्या भावाचं- अमेयचंही योगदान आहे. अनुरूपची पहिली वेबसाईट अमेयनेच बनवली होती आणि आजही तो अमेरिकेत राहून अनुरूपच्या टेक्निकल कामाचं नियोजन बघतो. त्याच्या जागतिक दृष्टिकोनामुळेही आमच्या कामाला अधिक चांगली दिशा येत गेली. आजही आम्हा तिघांमध्ये मतभेद होत नाहीत असं नाही. पण मार्ग काढला जातो, जो अंतिमतः अनुरूपच्या आणि अनुरूपच्या सदस्यांच्या भल्याचा विचार करून घेतलेला निर्णय असतो. गेल्या वर्षी आम्ही गुजराती भाषिकांसाठीही अनुरूप सुरू केलं आणि आजी-आई-बाबा या सगळ्यांनी अनुरूपमध्ये केलेल्या डोंगराएवढ्या पायाभूत कामाचा पुन्हा प्रत्यय आला. प्रस्थापित व्यवसायात येऊन प्रयोग करणं तुलनेने सोपं असतं. पण गुजरात माझ्यासाठी नवीन होतं. इथे सगळ्या जुन्या-जाणत्यांचा अनुभव पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरला!  

माझं पदव्युत्तर शिक्षण मिडिया आणि कम्युनिकेशन स्टडीज् यातलं असल्याचा थेट फायदा झाला आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून अनुरूपच्या मार्केटिंगची सूत्र हातात घेतली. एकविसाव्या शतकात अनुरूपचं ब्रँडिंग कसं असावं याविषयी आम्ही असंख्य वेळा चर्चा केली. आई आणि बाबा या दोघांनी अनुरूपचं काम करताना नुसतं वधू-वर सूचक मंडळासारखं काम करण्यापेक्षा एक सर्वसमावेशक विवाहसंस्थेसारखं काम करण्याचा ध्यास घेतला. दोघंही समुपदेशक म्हणून काम करायचे, आईने पुढे यातच तिचा अभ्यास वाढवून थेट पीएचडी देखील केली. मला वाटू लागलं की हे सगळं ब्रँडिंगमध्ये उतरलं पाहिजे. नुसता जोडीदार शोधून देण्यापेक्षा तुमचं लग्न टिकावं, फुलावं यासाठी अनुरूपकडून जे काम केलं जातं ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अनुरूपचा विचार लोकांपर्यंत पोहचवू हे डोक्यात ठेवून, गेली दहा वर्षं अनुरूपचं ब्रँडिंग केलं गेलं आहे. पारंपारिक जाहिरातींपासून ते सोशल मिडिया रील्स पर्यंत प्रत्येक माध्यमाचा मी खुबीने वापर केला. त्याचा फायदा असा झाला की पालक पिढीचा अनुरूपवर असलेला विश्वास तर अबाधित राहिलाच, पण नव्या पिढीला अनुरूपची एक वेगळीच ओळख झाली. “अरेंज्ड मॅरेज म्हणजे काहीतरी बुरसटलेले, जुने, कालबाह्य” अशी संकल्पना असणाऱ्या नव्या पिढीला त्यांचेच विचारही अनुरूपच्या मंचावर ऐकायला मिळाले तेव्हा दोन्ही पिढ्यांमध्ये सेतू बांधला गेला. मला वाटतं अनुरूपच्या ब्रँडिंगचं हे सर्वात मोठं यश आहे.

अनुरूपचे आगळेवेगळे कार्यक्रम ही अनुरूपची खासियत असली तरी त्यांची संख्या वाढवण्याची गरज होती. मी त्यावर भर दिला. अनुरूपचे काही मोजक्या शहरात वर्षाला जेमतेम १५ कार्यक्रम होत असत. आज जगातल्या भारत-अमेरिका-कॅनडा-ऑस्ट्रेलिया या चार देशातल्या २५ शहरांत मिळून वर्षभरात १०० पेक्षा जास्त कार्यक्रम होतात. लवकरच जर्मनी आणि इंग्लंड इथेही हे कार्यक्रम मी नेणार आहे. ऑनलाईन कार्यक्रमांची सुरुवात कोविड दरम्यान झाली आणि आता कोविडनंतरही ते सुरू आहेत! बहुतांश कार्यक्रम हे मुला-मुलींसाठी असल्याने आणि मी त्याच पिढीचा प्रतिनिधी असल्याने, त्यांना काय रुचेल-पटेल-आवडेल याचा विचार मला करता आला आणि त्यानुसार कार्यक्रमांची रचना बदलली. शाळेत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचा चांगलाच फायदा मला आज अनुरूपचे कार्यक्रम घेताना होतो! 

जो अडसर सुरुवातीला मी आणि माझ्या आईसाठी होता तोच, अनुभव आणि पिढीचा अडसर मी आणि अनुरूपमधल्या माझ्या सहकाऱ्यांमध्येही होता. घराणेशाहीचा फायदा घेऊन थेट डोक्यावर कोणीतरी येऊन बसणार हे कोणालाच फारसं आवडत नाही. इथे मी नवखा अननुभवी तरुण थेट संचालक म्हणून पदावर आलो होतो. तर दुसऱ्या बाजूला आईबाबांच्या बरोबरीने कंपनी मोठी करण्यात योगदान दिलेल्या सहकारी. माझी आणि आईची कामाची पद्धतही अनेक बाबतीत अगदी परस्परविरोधी असल्यानेही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. पण त्यांचं मला मोलाचं सहकार्य मिळत आलं आहे. माझ्या कधी अप्रगल्भ वागण्यालाही समजून घेतलं आहे. एकमेकांकडून शिकत आमची सगळी उर्जा कंपनी मोठी करण्यात आम्ही लावतो आहे. आज दहा वर्षांनी मागे वळून बघत मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं खरंतर लग्न म्हणजे वेगळं काय असतं? व्यक्तीबरोबर कुटुंबाशीही लग्न होतं. वेगवेगळ्या पिढीचे लोक एकत्र येतात. आचारविचारांची देवाणघेवाण होते. कधी खटके उडतात, वादही होतात. पण त्यावर आपण तोडगे काढतो, दोन्ही बाजू अहंभाव सोडून दोन दोन पावलं पुढे येतात आणि गुण्यागोविंदाने नांदतात. जरी कुटुंबातला व्यवसाय असला तरी अनुरूपच्या कुटुंबात येताना मी एक प्रकारे बाहेरूनच लग्न होऊन आलो होतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून जाणं टाळता येण्यासारखं नव्हतं बहुतेक. अनुरूपचं काम करताना कंपनी मोठी होण्याबरोबर मीही प्रगल्भ झालो, अनेक गोष्टी शिकलो. आधी होतो त्याहीपेक्षा मी अधिक चांगली व्यक्ती बनलो. कोणत्याही नात्याकडून हेच तर अपेक्षित असतं ना!

(दि.२९ एप्रिल २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)

Thursday, April 11, 2024

अपेक्षा ठरवताना...

‘लापता लेडीज’ नावाचा एक सुंदर सिनेमा नुकताच येऊन गेला. त्यातल्या एका प्रसंगात सून आपल्या सासूने केलेल्या भाजीची स्तुती करते आणि त्यावर सासू ‘इश्श, स्वयंपाकाचं कौतुक थोडीच करतात’, असं म्हणत ते हसण्यावारी नेते खरी. पण सासूला ते कौतुक मनापासून आवडलेलं असतं. आणि मग ती सांगते की तिच्या माहेरी ती भाजी वेगळ्या पद्धतीने केली जायची जे तिला फार आवडायचं, पण इकडे सासरकडच्या मंडळींची वेगळी पद्धत होती. सून म्हणते की तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने भाजी करत जा की! सासू यावरही हसते आणि मग म्हणते, ‘खरंतर इतक्या वर्षात एवढं काय काय बदललं आहे की आता माझं मलाच लक्षात नाही की मला काय आवडत होतं.’ हे वाक्य पडद्यावरच्या सासूने उद्गारलं तेव्हा थिएटरमध्ये बसलेल्या तमाम स्त्रियांच्या तोंडून संमतीदर्शक उसासे बाहेर पडले. त्यांचा आवाज जाणवण्याइतका मोठा होता!

आज माझ्या पिढीच्या म्हणजे लग्नाळू वयातल्या मुला-मुलींच्या मनात लग्नाविषयीची जी काही भली-बुरी प्रतिमा असेल ती कशी बरं निर्माण होते याचा विचार केला तर त्याचं सर्वात पहिलं उत्तर म्हणजे त्यांचे आई-वडील. या मुला-मुलींनी त्यांच्या आई-वडिलांना स्वतःच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना ऐकलं आहे. “खरंतर मला अमुक अमुक करायचं होतं, पण लग्न झालं आणि राहून गेलं...”, “लग्न झाल्यावर ती एक इच्छा अपुरीच राहिली...”, “मला अमुकतमुक फार आवडायचं, पण लग्नानंतर ते करता आलं नाही...”, “मी माझा हा छंद जोपासायचो, पण लग्न झालं जबाबदाऱ्या आल्या आणि ते मागेच पडलं...”, “मी होते म्हणून निभावून नेऊ शकले,” ही आणि अशी अनेक वाक्यं कानावर पडतच ही पिढी मोठी झाली आहे. त्यांच्या मनात ‘लग्न ही एक जखडून टाकणारी व्यवस्था आहे’ किंवा ‘लग्न झालं की आवडीच्या गोष्टी सोडाव्या लागतात’ हा विचार मनात घर करणार हे स्वाभाविक नाही का? लग्न ही सुंदर गोष्ट आहे, लग्नामुळे माझ्या आयुष्यात काहीतरी मोलाची भर पडली असं ठासून म्हणणारे पालक विरळाच. याचा अर्थ सगळे स्वतःच्या संसाराला नावं ठेवतात असं नव्हे. किंबहुना बहुसंख्य पालक असंच म्हणतात की त्यांचं वैवाहिक जीवन छान आहे. पण वेगळे काही निर्णय घेतले असते तर आपल्या आयुष्यात याहून अधिक काहीतरी चांगलंही होऊ शकलं असतं, हा न उच्चारला जाणारा संवादही मुलं-मुली ऐकत असतात. मुला-मुलींच्या डोळ्यासमोर लग्नाच्या नात्याची, सहजीवनाची सर्वात पहिली आणि सर्वात जवळून बघण्यात असणारी ही प्रतिमा आहे. आपण वाचून-ऐकून-पाठांतर करून शिकतो त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी, जास्त प्रभावीपणे निरीक्षणातून शिकत असतो. पहिला शब्दही बोलता येण्याच्या आधीपासून आपण आपल्या आईवडिलांचं सहजीवन बघत मोठं होत असतो. आपण त्यातून जे शिकतो, त्याचं जे आकलन होतं त्याचा स्वाभाविक परिणाम आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवताना होत असतो.

पण गंमत ही की त्याचा सरसकट समान परिणाम होत नाही. म्हणजे जो परिणाम मुलावर होईल तोच मुलीवर होईल असं नाही. किंवा जो परिणाम सांगलीमधल्या मुलीवर होईल तोच पुण्यातल्या मुलीवर होईल असं नाही. कारण बघितलेल्या गोष्टींवर प्रक्रिया करण्याची पद्धत आणि क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. उदाहरणार्थ विचार करा की, एक घर आहे जिथे वडिलांना चहा अगदी हातात आणून देणारी आई आहे, ती जेवायलाही वाढते, जेवणानंतर स्वयंपाकघरातली आवराआवरही करते. आता अशा घरातल्या लहानपणापासून हे सगळं बघणाऱ्या मुलाला असं वाटण्याची शक्यता अधिक आहे की माझ्या बायकोने माझ्यासाठी हेच केलं पाहिजे. त्याच घरातल्या त्याच्या बहिणीला असं वाटू शकेल की लग्नानंतर हे असं करावं लागणार असेल तर मला मुळीच लग्न करायचं नाही! किंवा अजून एखाद्या मुलीला वाटेल की हे असंच असतं आणि मीपण हेच करायचं आहे. अशा अजून कितीतरी शक्यता आहेत! हे घडणं स्वाभाविक जरी असलं तरी आई-वडिलांच्या सहजीवनाबद्दलची आपली मतं, त्या आधारे तयार झालेली लग्नाविषयीची आपली मतं तर्काच्या कसोटीवर तपासून घ्यायला हवीत. यामध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही मतं आली. आपल्या आई-वडिलांचं सहजीवन अतिशय सुंदर आहे असं वाटत असेल तरी तो तुमच्या स्वतःच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवताना आधार म्हणून घेणं धोक्याचं आहे! आपल्या आई-वडिलांचं लग्न ज्या काळात झालं, तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लग्नाच्या नात्याकडून काय हवं ही अपेक्षाही कालानुरूप बदलत गेली आहे.

अनेकदा आम्हाला दिसून येणारी एक गोष्ट म्हणजे नवऱ्याबद्दल अपेक्षा ठरवताना वडिलांबद्दल असणाऱ्या प्रतिमेशी तुलना करणाऱ्या मुली आणि बायकोबद्दल अपेक्षा ठरवताना आईबद्दलच्या आपल्या डोक्यातल्या प्रतिमेशी तुलना करणारी मुलं. पन्नाशी-साठीला पोचलेल्या आपल्या आई-वडिलांकडे बघून पंचविशी-तिशीमधल्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे? या अशा अपेक्षांना खतपाणी घालणं पालकांनी देखील टाळायला हवं. मला माझ्या वडिलांसारखा कर्तृत्ववान मुलगा नवरा म्हणून हवा” असं आपल्या मुलीचं वाक्य ऐकून किंवा “माझ्या आई सारखी घर, कुटुंब, काम सगळं सांभाळणारी प्रगल्भ बायको हवी” असं आपल्या मुलाच्या तोंडून ऐकून आई-वडिलांना अगदी भरून येतं. आपल्या मुला-मुलीला आपली कदर आहे याचं त्यांना बरं वाटतं. ते स्वाभाविकच आहे. पण अशावेळी पालकांनी हे सांगणं गरजेचं आहे की ‘आई’ म्हणून किंवा ‘वडील’ म्हणून मी वेगळा असतो; ‘बायको’ किंवा ‘नवरा’ म्हणून मी वेगळा असतो. तेव्हा ‘पापा की परी’ आणि ‘आईचा लाडका सोन्या या दोन्ही वर्गवारीत बसणाऱ्या मुला-मुलींनी त्यातून बाहेर येऊनच आपला जोडीदार शोधणं आवश्यक आहे.

आपण मोठं होताना अनेक जोडप्यांना बघत असतो. आई-वडील हे सगळ्यात जवळून आणि लहानपणापासून बघितलेलं जोडपं त्यामुळे त्यांचा परिणाम मोठा असतो. पण जसजसे मोठे होत जातो तसतसे अनेक जोडपी बघतो. आई-वडील, मामा-मामी, भाऊ-वहिनी, मित्र-मैत्रिणी अशी कितीतरी उदाहरणं. आणि या जोडप्यांकडे बघून त्यातून आपल्याला आवडीच्या नावडीच्या गोष्टी एक एक गोळा करत आपली आपल्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षांची यादी बनत जाते, आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षेची एक प्रतिमा उभी राहते. मनात प्रतिमा तयार होणं हा खूप स्वाभाविक भाग आहे. सिनेमाचं ट्रेलर बघून सिनेमाबद्दल प्रतिमा निर्माण करण्यापासून ते भाषण कलेवरून राजकीय नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यापर्यंत आपला मेंदू काम करतच असतो. किंबहुना आपल्या कल्पनाशक्ती आणि सृजनाचा तो अविभाज्य भाग आहे. पण प्रश्न निर्माण होतात जेव्हा प्रतिमेलाच वास्तव मानून आपण पुढे जाऊ लागतो. या प्रतिमेच्या चौकटीत अडकल्याने होतं असं की, वास्तवापेक्षा प्रतिमेच्याच प्रेमात पडायला होतं. आणि आपल्या अपेक्षांची चौकट तर्कशुद्ध विचारांच्या आधारावर आहे का हे न तपासता, तीच चौकट घेऊन जोडीदाराचा शोध सुरू होतो. एकदा अशी चौकट तयार झाली की अपेक्षा या अपेक्षा न राहता मागण्या बनू लागतात आणि मग गडबड होण्याची शक्यता वाढते.

आपण, आपले आई-वडील, आपलं कुटुंब, आणि एकूणच आपलं अनुभवविश्व याबाहेरही बरंच मोठं जग आहे. जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही याच विश्वातून येणार आहे. ती आपल्याच चौकटीत बसते आहे का हे बघणं म्हणजे झापडं लावून चालण्यासारखं आहे. विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेमध्ये, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा डोळ्यावर आपल्याच अपेक्षा/मागण्यांच्या चष्म्यातून न बघता समोरच्या व्यक्तीकडे एक स्वतंत्र माणूस म्हणून बघत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अशाप्रकारे कोरी पाटी ठेवून भेट झाली तर समोरच्याला अधिक नेमकेपणाने जाणून घेण्याची शक्यता तर वाढेलच, पण त्याबरोबर आपली आणि त्या व्यक्तीची अनुरूपता अधिक विवेकनिष्ठ पद्धतीने तपासून घेणं शक्य होईल. थोडक्यात, अपेक्षांच्या मागण्या न होऊ देता त्यांना अपेक्षाच ठेवून, मोकळ्या मनाने जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत पुढे जाणं हिताचं आहे.

(दि. १ एप्रिल २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)

Friday, March 8, 2024

समानतेची ऐशीतैशी

अरेंज्ड मॅरेजच्या म्हणजे ठरवून लग्न करण्याच्या बाबतीत एक सातत्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे अपेक्षा ठरवताना आजच्या एकविसाव्या शतकातही डोकावणारा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा. ‘यातल्या कित्येक अपेक्षा कालबाह्य झालेल्या आहेत’ असं कट्ट्यावर गप्पांमध्ये ठामपणे म्हणतील, असेही लोक लग्नाच्या बाबतीत अचानक बुरसटलेल्या विचारांचे कसे बनतात हे माझ्यासमोर खरोखरं एक कोडंच आहे. “अरेंज्ड मॅरेजमध्ये आहोत म्हणून सगळ्या गोष्टी बघतो आहोत, लव्ह असतं तर हा प्रश्नच नसता आला” असा बाळबोध युक्तिवाद करून आपल्या अतार्किक आणि अवास्तव अपेक्षांचा बचाव केला जातो. स्त्री-पुरुष नातेसंबंधांतले आजच्या काळात बदललेले आयाम समजून न घेता जोडीदाराविषयीच्या अपेक्षा नक्की करणे म्हणजे भविष्यातल्या वैवाहिक कलहाचं बीजारोपणच. आणि म्हणूनच जोडीदार निवडीच्या प्रक्रियेच्या वेळीच याविषयीचं मंथन आवश्यक आहे.

हजारो वर्षांच्या लग्नाच्या इतिहासात, सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे लग्नात स्त्रियांचं काम काय आणि पुरुषांचं काम काय याची विभागणी झाली. सगळे धर्म आणि संप्रदाय हे मानवाचं जगणं नियंत्रित करण्याविषयी ठोस काही नियम सांगत असल्याने लग्नविषयक नियम आपोआप आले आणि त्यातून लिंगआधारित श्रमविभागणी पक्की झाली. त्याला राजसत्तेची म्हणजे कायद्याचीही जोड मिळाली. यात हजारो वर्षं मूलभूत आणि व्यापक असा बदल झाला नाही. पण आधी युरोपातली औद्योगिक क्रांती आणि गेल्या शतकात सुरू झालेली इंटरनेट क्रांती याने जगभरच्या हजारो वर्षांच्या सामाजिक व्यवस्थांना मुळापासून हादरवून सोडलं. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पारंपरिक श्रमविभागणी आता कालबाह्य झाली आहे.

अरेंज्ड मॅरेज मधल्या अपेक्षांची काही उदाहरणं देतो म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते अधिक स्पष्टपणे लक्षात येईल. लग्नानंतर मुलीने आपलं घर सोडावं आणि दुसऱ्या शहरातला नवरा असेल तर आपलं शहर आणि नोकरीही सोडावी ही अपेक्षा असते. पण हेच एक मुलगा का नाही करू शकत हा विचारही केला जात नाही! मुलाप्रमाणेच मुलीनेही अभ्यास केला आहे, शिक्षण घेतलं आहे, कष्टाने नोकरीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे पण लग्न म्हणल्यावर तिने मात्र या सगळ्यावर पाणी सोडायचं? ही कुठली मानसिकता? मध्यंतरी एका नाशिकमधल्या मुलाशी बोलत होतो आणि त्याची तक्रार होती की मुंबई-पुण्याच्या मुली नाशिकला जायला तयार नाहीत. ही तक्रार काही नवीन नाही. पण ‘एखाद्या मुलीशी तुझं जमत असेल तर तू का नाही जात पुण्याला?’ हा माझा प्रश्न त्याच्यासाठी नवीन होता. तो गडबडला. मग त्याला घर-आईबाबा-नोकरी हे सगळे बचाव आठवले. पण ‘यातल्या कुठल्या गोष्टी मुलीच्या आयुष्यात नाहीत?’ या माझ्या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. जी गोष्ट करण्याची अपेक्षा आपण समोरच्या व्यक्तीकडून करतो आहोत ती करण्याचं धैर्य आणि आत्मविश्वास स्वतःत आहे का हे तपासून बघायला नको का? मी करणार नाही, पण तुला हे जमायला हवं हा अट्टाहास तर्कशुद्ध आहे का? आणि दोष त्या मुलाचा नाही. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मुलगा देखील लग्नानंतर आपलं शहर नोकरी सोडून जाऊ शकतो, या शक्यतेची कल्पनाच त्याला कधी कोणी दिली नाहीये. मागे मला एक जोडपं साताऱ्यात भेटलं होतं. मुलगी साताऱ्यात व्यवसाय बघते आणि तिचा मूळचा पुण्यातला डॉक्टर नवरा तिथे काम करतो. तिने तिथून बाहेर पडण्याऐवजी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पुण्यातून साताऱ्यात जाऊन तिथे क्लिनिक सुरू करणे हा अधिक व्यवहार्य निर्णय असल्याचं त्यांनी चर्चा करून ठरवलं. हे उदाहरण आहे सामंजस्याचं, पुरुषी अहंकार दूर ठेवून तारतम्याने निर्णय घेतल्याचं. लग्न म्हणजे नवरा-बायको हे विरुद्ध बाजूचे दोन गट नसून, नवराबायकोची अशी आपली एक टीम आहे आणि दोघांनी मिळून काही निर्णय घ्यायचे आहेत हा भाव ठेवला म्हणजे अहंकार दूर ठेवून व्यावहारिक आणि समाधानकारक निर्णय घेणं शक्य होतं. दोघांपैकी कोण करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहे, कुठे कुठे कामाच्या संधी उपलब्ध आहेत किंवा नाहीत, अशा गोष्टींचा साधक बाधक विचार करून निर्णय घेणं शक्य आहे. ‘तू सून या नात्याने माझ्या आई-वडिलांची काळजी घेशील ना?’ या प्रश्नच चुकीचा आहे. त्या ऐवजी वाक्य असं असायला हवं की आपण दोघे मिळून चौघांची म्हणजे आपल्या दोघांच्याही आईवडिलांची काळजी घेऊ.    

मागे एकदा मी एके ठिकाणी बोलताना हेच सगळं मी मांडत होतो आणि श्रोत्यांमधले एक काका मध्येच उठून म्हणाले, सगळा प्रश्न मुली फार शिकल्यामुळे निर्माण झाला आहे. मी हे वाक्य अनेकदा ऐकलं आहे. ‘रस्त्यावर वाहनांचे अपघात होतात याचं कारण माणसाने चाकाचा शोध लावला’ हे वाक्य जितकं हास्यास्पद आहे तेवढंच त्या काकांचा युक्तिवाद. अपघात चाकाच्या शोधामुळे होत नाहीत, तर वाहनं बेशिस्तपणे चालवल्यामुळे होतात. तसंच मुली शिकल्यामुळे प्रश्न निर्माण झाले नसून; मुली शिकल्या, स्वावलंबी झाल्या, स्वतंत्र विचार करू लागल्या ही गोष्ट मुलग्यांना आणि (त्यांच्या पालकांनाही) हाताळता येत नसल्याने, कालबाह्य अपेक्षा कवटाळून बसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. मुलीला ‘स्वयंपाक येतो का’ हा प्रश्न वरवर पाहता चुकीचा नाही. स्वयंपाक हे महत्त्वाचं जीवनकौशल्य आहे, ते मुलगा असो वा मुलगी दोघांनीही आत्मसात करायला हवं. पण तो प्रश्न इतका सोज्वळ थोडीच असतो? त्या प्रश्नाबरोबर ‘वेळ पडली तर तुलाच स्वयंपाक करावा लागेल’ हा गर्भित अर्थ मुलींना खटकणार, यात आश्चर्य काय?

मुलग्यांना आणि त्यांच्या पालकांना समानतेची तत्त्वं स्वीकारणं आणि आत्मसात करणं हे अत्यावश्यक
आहेच. पण तेच मुली आणि त्यांच्या पालकांनाही करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल बोलल्याशिवाय हे लेखन पूर्ण होऊ शकत नाही. लग्नाच्या जोडीदाराबाबत अपेक्षा ठेवताना घर चालवण्याची म्हणजे कमावण्याची ‘प्राथमिक जबाबदारी’ ही मुलाचीच आहे असं आजही बहुसंख्य मुली आणि त्यांचे पालक मानताना दिसतात. मुलाने काही न कमावता घर सांभाळलं तरी आमची काही हरकत नाही
, असं अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत म्हणणाऱ्या मुलींची संख्या जवळ जवळ शून्य आहे; पण आमची मुलगी फार काही कमवत नाही, आणि मुलानेच अर्थार्जनाचा भार उचलायचा आहे असं म्हणणारे पालक जागोजागी दिसतील. मुलाचा पगार, वय, उंची, शिक्षण मुलीपेक्षा जास्तच हवं ही काही समानतेच्या विचारांतून येणारी मागणी नाही. पुण्या-मुंबईत स्वतःचं घर आहे का हा प्रश्न नेहमी मुलांनाच विचारला जातो. मुलांनी ज्या समानतेची कास धरली पाहिजे असं मी वर म्हणलं आहे, तो मार्ग दुहेरी आहे. मुलींनी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे. समानतेची फळं चाखायची, पण त्याबरोबर येणारी जबाबदारी घ्यायची नाही, हा दुटप्पीपणा कामाचा नाही.

“स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत म्हणून ते समान असूच शकत नाहीत, त्यांना निसर्गाने दिलेल्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत” या फुटकळ वक्तव्याच्या आड स्त्री-पुरुष भेदाचं भोंगळ समर्थन काहीजण करताना दिसतात. ‘काळे-गोरे हा निसर्गाने केलेला भेद आहे’ या नावाखाली गुलामगिरीची भलामण करणारे गोरे वंशवर्चस्ववादी आत्ता आत्तापर्यंत मिरवत होते, त्याच पद्धतीचं हे वक्तव्य असतं. सारखेपणा (Similarity) आणि समानता (Equality) यात गल्लत करून ही असली वक्तव्यं केली जातात. नैसर्गिक सारखेपणा नाही हे उघड आहे, पण संधींबाबत, वागणूक आणि निवडीबाबत समानता असू शकते की नाही?

स्त्री-पुरुष समानतेचं वातावरण हा आजच्या आपल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीबरोबर आपल्या दैनंदिन जीवनपद्धतीचा भाग बनला आहे, आणि भविष्यातही असणार आहे. हे बदलायचं तर आपल्या समाजाचा ‘तालिबान’ करावा लागेल, आणि ते कोणालाच नको आहे! या बदललेल्या परिस्थितीत जुळवून घ्यायला काय करावं याच्या काही सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे एखाद्या अपेक्षेच्या मागे ‘मुलगी आहे म्हणून’ किंवा ‘मुलगा आहे म्हणून हा विचार असणार असेल तर ती अपेक्षा तर्कशुद्ध विचारांच्या कसोटीवर तपासून बघायला लागेल. दुसरं म्हणजे ‘हीच गोष्ट मी मुलाला/मुलीला सांगितली असती का?’ असा प्रश्न स्वतःला विचारून बघावा आणि आपलं आपल्यालाच उत्तर मिळेल! आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवात स्वतःपासून करणे आहे. जी अपेक्षा समोरच्याकडून आहे, त्याबाबत आपण स्वतः कुठे आहोत हे तपासणे. समजूतदारपणा आणि तारतम्य हे गुण आपल्या जोडीदारात असावेत ही अपेक्षा सगळ्यांची आहे, पण आपण सामंजस्य आणि तारतम्याने आपण आपल्या अपेक्षा ठरवतो आहोत का हेही तपासायला हवं.

एकविसाव्या शतकातली लग्नं ही विसाव्या शतकातल्या लग्नांसारखी असणार नाहीएत हे वास्तव जितकं लवकर मुलंमुली आणि त्यांचे पालक स्वीकारतील तितकी ही लग्नं टिकण्याची आणि नाती बहरण्याची शक्यता वाढेल. अन्यथा, घटस्फोट आणि उसवलेल्या नात्यांचं वाढलेलं प्रमाण इथून पुढे अधिकच वाढत जाईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही! 

(दि. २६ फेब्रुवारी २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध)