मध्यंतरी मी एक ‘टेड टॉक’ बघितला. टेड टॉक्स हा एक जगभर चालणारा फारच
अफलातून उपक्रम आहे. ज्यात असंख्य विषयांवर जगातली तज्ज्ञ मंडळी बोलतात. मेगन
रामसे यांचा न्यूयॉर्क टेड टॉक मधला तो व्हिडीओ अक्षरशः हलवणारा आहे. त्या असं
सांगतात की दर महिन्याला किमान दहा हजार लोक ‘मी सुंदर आहे
की कुरूप’ असा प्रश्न गुगल वर विचारतात. कित्येक मुलं-मुली
आपले व्हिडीओ यूट्यूबवर टाकतात आणि विचारतात की सांगा मी सुंदर आहे का. मेगन यांनी
आपल्या बोलण्यात सांगितलं तो एक छोटासा भाग आहे. पण प्रत्यक्ष रोजच्या आयुष्यात
आपण आपल्या आजूबाजूला बघतो, सोशल मिडियाच्या उदयापासून आज
बहुसंख्य लोक या ‘सांगा मी कसा/कशी आहे’ या चक्रव्यूहात अडकले आहेत. फक्त माझी पिढी नव्हे तर आज किशोरवयात असणारी
आणि पालक वर्गात मोडणारी मंडळीही ‘माझी प्रतिमा काय आहे’ या गोष्टीला प्रमाणाबाहेर महत्त्व देत आहेत. “आपण अमुक अमुक करूया ना, म्हणजे इन्स्टाग्रामवर फोटो टाकता येईल”, अशा
प्रकारचे संवाद जेव्हा कानावर पडतात तेव्हा साहजिकच माझ्या मनात अनेक प्रश्न उभे
राहतात. विशेषतः जोडीदार निवड, लग्न या बाबतीत तर या प्रतिमेच्या चौकटींचं करायचं काय हा प्रश्न आ वासून
पुढे येतोच येतो.
मनात प्रतिमा तयार होणं हा खूप स्वाभाविक भाग आहे. सिनेमाचं
ट्रेलर बघून सिनेमाबद्दल प्रतिमा निर्माण करण्यापासून ते भाषण कलेवरून राजकीय
नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यापर्यंत आपला मेंदू काम करतच असतो. किंबहुना आपल्या
कल्पनाशक्ती आणि सृजनाचा तो अविभाज्य भाग आहे. तो टाळता येणार नाही. पण प्रश्न
निर्माण होतात जेव्हा प्रतिमेलाच वास्तव मानून आपण पुढे जाऊ लागतो. या प्रतिमेच्या
चौकटीत अडकल्याने होतं असं की, वास्तवापेक्षा
प्रतिमेच्याच प्रेमात पडायला होतं. त्यात स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलं की
ती प्रतिमा जपणं ओघानेच आलं. सेलिब्रिटी आणि नेते मंडळींच्या आयुष्यात असणारा हा
प्रतिमा जपण्याचा प्रश्न सोशल मिडियाच्या अस्तित्वामुळे सहजपणे आपल्याही घरात, मोबाईल मार्फत आपल्या हातात आणि अर्थातच आपल्या मनात मुक्कामाला आला.
माझ्या प्रतिमा निर्मितीसाठी अनेक गोष्टी करण्याचं बंधन आपण स्वतःवरच घालून घेऊ
लागलो. मी ठराविक पद्धतीचे फोटो सोशल मिडियावर टाकलेच पाहिजेत, मी अमुक अमुक भूमिका मांडलीच पाहिजे, मी किती मजा
करतोय/करते आहे किंवा किती दुःखात आहे हेही मी जाहीरपणे लिहिलं पाहिजे म्हणजे मला
हवी तशी मी प्रतिमा निर्माण करत जाईन हा विचार आपल्याही नकळतपणे आपल्यावर अधिराज्य
गाजवू लागला. हळूहळू आपल्यातला ‘पोलिटिकल करेक्टनेस’ वाढायला लागला. आपण एक समाज म्हणूनही दांभिक होऊ लागलो. आणि ही दांभिकता
हळूहळू झिरपत जाऊन सगळ्याच बाबतीत दिसू लागली. तशी ती लग्न,
नाती, सहजीवन या विषयांत देखील आली.
एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी एक गृहस्थ मला भेटायला आले
होते. त्यांना आपल्या मुलाचं लग्न करायचं होतं आणि त्या दृष्टीने ते आणि त्यांचा
मुलगा असे भेटायला आले होते. हे गृहस्थ आणि माझा, काही सामाजिक-राजकीय चळवळी, बैठका
यामुळे थोडाफार परिचय होता. विविध विषयांवर ते फेसबुकवर लिहित असतात जे मी बघितलं
आहे. जातिभेदाविरोधात ते अनेकदा बोलले आहेत. भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा वगैरे
बद्दल बोलताना नंतर ते हळूच चाचरत मला म्हणाले, “मुलगी
शक्यतो आमच्या जातीचीच शोधतोय हं...”. त्यांनी सोशल मिडियावर तयार केलेल्या
त्यांच्या प्रतिमेच्या फुग्याला टाचणी लागली त्या वाक्याने. सोशल मिडियावरच्या
प्रतिमेला वास्तव न मानण्याचा धडा मी पुन्हा एकदा मनात गिरवला त्या दिवशी. हाच धडा
सगळ्यांनीही लक्षात ठेवावा. विशेषतः लग्न करू बघणाऱ्या किंवा जोडीदार शोधणाऱ्या
मंडळींनी. आमचा असा अनुभव आहे की लग्न ठरवायच्या वेबसाईटवर एखादी प्रोफाईल आकर्षक
वाटली की ताबडतोब त्या व्यक्तीची फेसबुक प्रोफाईल देखील बघितली जाते. पूर्वी
मुलं-मुली हे करायचे. आता पालकदेखील करतात. फेसबुकवरून नुसता ‘अधिक अंदाज घेण्याचा प्रयत्न’ एवढ्यापुरतं हे
मर्यादित असतं तर प्रश्न आला नसता. पण फेसबुक प्रोफाईल बघून निष्कर्ष काढले जातात
आणि गडबड होते. फोटोंवरून, फोटोंमधले कपडे बघून, मित्रयादीतल्या लोकांकडे बघून. मनातल्या मनात आपण त्या प्रोफाईलमधून तयार
झालेल्या प्रतिमेला नकार किंवा होकार देऊन सुद्धा टाकतो. आपल्याला जोडीदार म्हणून
माणूस हवाय की फेसबुक/वेबसाईट प्रोफाईल मधून समोर येणारी प्रतिमा? हाडामांसाचा जिवंत माणूस जोडीदार म्हणून हवा असेल तर प्रत्यक्ष भेटायला
हवं, बोलायला हवं. भेटल्या बोलल्याशिवाय निष्कर्षाला येणं हे
काही शहाणपणाचं नाही. कधीकधी यात होतं काय की, जर त्या
प्रोफाईलमधल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं गेलं तर मुलं-मुली आपल्या मनात
तयार झालेली त्या व्यक्तीची प्रतिमा घेऊन भेटायला जातात. आणि भेटीचा पूर्ण वेळ
समोरच्याला समजून घेण्याऐवजी मनातल्या प्रतिमेशी पडताळणी करण्यात निघून जातो.
समोरच्या व्यक्तीला माणूस म्हणून जाणून घेणं राहतं दूर!
हे सगळं जसं सोशल मिडियावरच्या प्रतिमांच्या बाबतीत होतं
तसंच आपण आपल्या जोडीदाराबद्दल,
लग्नाबद्दल अनेक कल्पना रंगवलेल्या असतात. अनेक प्रतिमा तयार केलेल्या असतात. कथा
कादंबऱ्या आणि बॉलीवूडने आपण हे करावं यासाठी ‘मेरे ख्वाबों में जो आये...’ म्हणत भरीव कामगिरी
करून ठेवलीच आहे. जोडीदाराचा शोध घेताना या मनातल्या प्रतिमेला आपण आदर्शवत ठेवतो.
आणि जसं फेसबुक प्रोफाईलवाल्या प्रतिमेशी समोरच्या व्यक्तीची पडताळणी केली जाते; तसंच समोरची व्यक्ती आपल्या मनातल्या
प्रतिमेत बसते आहे का याची तपासणी सुरू होते. आणि पुन्हा तोच परिणाम होतो-
समोरच्या माणसाला माणूस म्हणून जाणून घेणं दूरच राहतं. जगात जेवढ्या व्यक्ती
असण्याच्या आणि जेवढ्या व्यक्ती आवडण्याच्या शक्यता आहेत तेवढ्या सगळ्यांचा
सविस्तर विचार करून आपण आपल्या मनातली प्रतिमा निर्माण केलेली असणं शक्यच नसतं.
म्हणजे, समोरच्या व्यक्तीमध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात
ज्या आवडू शकतात पण त्यांचा आधी कधी विचार केला नव्हता. पण हे असं असेल तरीही ते
समजणारच नाही कारण समोरच्याला जाणून घेण्यासाठी आवश्यक ती मोकळीक आपण मनाला
दिलेलीच नसते!
“लग्नाची कल्पना मला आवडते आहे पण कदाचित प्रत्यक्ष लग्न
नाही आवडणार” अशा आशयाचं एक वाक्य माझ्या एका मैत्रिणीने फेसबुकवर लिहिलं होतं. या
वाक्यातच वास्तवापेक्षा मनातली प्रतिमाच आवडत असल्याची खुली कबुली आहे बघा. आपल्या
पिढीला या प्रतिमांच्या प्रेमातून बाहेर यायला हवं. ‘आयडियल’ किंवा आदर्श
असं म्हणत प्रतिमांचे जे इमले रचले जातात त्यात वास्तव आयुष्यातला आनंद घेणं, समजून घेणं, जाणून घेणं राहून गेलं तर काय मजा? अनुभव घेण्यासाठी म्हणून अनुभव घ्यायला हवेत, सोशल
मिडियावर शेअर करण्यासाठी नव्हे. सोशल मिडिया हा आता आपल्या आयुष्याचा, एकुणात समाजाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे तो टाळता येणं कठीण
आहे. पण समोर उत्तम अन्नपदार्थ आल्यावर पहिला विचार त्याच्या स्वादाचा
असण्यापेक्षा, ‘याचा फोटो इन्स्टाग्राम
वर किती छान दिसेल’ हा येत असेल तर आपण आपल्या प्रतिमेच्या
आणि प्रतिमा निर्मितीच्या कार्यक्रमात फारच गुंतलो आहोत हे समजावे. जोडीदार
निवडताना आणि निवडल्यावर नात्यातही प्रतिमेच्या आधारे निष्कर्ष काढणार असू, मनातल्या प्रतिमेशी पडताळणी करणार असू तर प्रतिमांच्या चौकटीत आपण
चांगलेच अडकलो आहोत हेही जाणून घ्यावं.
शेवटी इतकंच की, अनुभवांना अनुभव म्हणून अनुभवण्यासाठी, माणसांना
माणूस म्हणून जाणून घेण्यासाठी प्रतिमेची ही चौकट वेळीच मोडीत काढणं आपल्या हिताचं
आहे एवढं नक्की.
(दि. २८ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत
प्रसिद्ध)
No comments:
Post a Comment