फेब्रुवारी २०१२ मधल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकांसमोर येण्यासाठी लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी राजकारणी मंडळी फेसबुक वर येऊ लागली आहेत... असंख्य नगरसेवक नुकतेच फेसबुक वर आले आहेत. 'मनसे' त्यामानाने खूप आधीपासून इथे आहे. अगदी ऑर्कुट जेव्हा जोशात होते तेव्हाही मनसे बर्यापैकी नजरेसमोर असायचे. पण आता सगळ्याच पक्षाची मंडळी फेसबुक सारख्या खुल्या जागेवर येऊ लागली आहेत. यातले धोके अजून त्यांच्या लक्षात आले नाहीएत. आणि हे लोकांसमोर येणे धोक्याचे आहे हे लक्षात आल्यावर ही मंडळी इथून गायब होतील याबद्दल मला जराही शंका नाही.
फेसबुक सारख्या खुल्या व्यासपीठावर येणाऱ्या या राजकारण्यांना आता आपल्या मनातले प्रश्न विचारून भंडावून सोडूयात... त्यांना जाब विचारूया... असंख्य गोष्टींचा... पुण्यात गेल्या पाच वर्षात न झालेल्या विकासाबद्दलचा जाब... पुतळा वगैरे सारख्या भावनिक गोष्टींचा मुद्दा करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना जाब विचारूया... पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था का सुधारू शकले नाहीत?? वाट्टेल तेव्हा सत्तेसाठी वाट्टेल त्या पक्षाबरोबर युत्या करत पॅटर्न बनवणाऱ्या लोकांना आपण जाब विचारायला नको? गल्ली बोळांमध्ये नगरसेवक निधी वाट्टेल तसा वापरत सिमेंटचे रस्ते करणाऱ्या नगरसेवकांना पुणेकरांचे पैसे वर आलेत का हा प्रश्न आपण विचारायला नको? निरुद्योगी लोकांना फुटपाथ वरची जागा अडवून बसायला बाकडी टाकण्यात आणि आधीच चालू अवस्थेत असलेले रस्त्यावरच्या दिव्यांचे खांब उखडून तिथेच परत नवीन खांब लावण्यात आपल्या नगरसेवकांनी किती पैसा पाण्यात घातला हे आपण विचारायला नको? आपले नगरसेवक कोणत्याही प्रश्नावर सखोल आणि अभ्यासपूर्ण भूमिका का मांडत नाहीत??? आपल्या नगरसेवकांची ऑफिसेस / संपर्क कार्यालये फुटपाथवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलेली का असतात??? आणि ज्यांची नसतात ते अशा लोकांविरुद्ध आवाज का नाही उठवत??? गावागावांमध्ये महिला एकत्र येऊन दारूचे गुत्ते बंद करत असताना एकाही नगरसेवकाला आपला वॉर्ड व्यसनमुक्त असावा असे वाटत नाही?? आपल्या वॉर्ड मधला कचरा उरुळीला कचरा डेपो मध्ये जाणार नाही तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही असा निश्चय गेल्या पाच वर्षात किती नगरसेवकांनी केला? आणि किती नगरसेवकांनी त्यासाठी यशस्वी प्रयत्न केला? आपल्या वॉर्ड मध्ये आपण होऊन वॉर्ड सभा घेत जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न किती नगरसेवकांनी केला? आपल्या वॉर्ड मध्ये एकही अनधिकृत हातगाडी/टपरी असणार नाही असे ठरवून तसे कर्तृत्व कोणत्या नगरसेवकाने घडवले आहे??? आपल्या वॉर्ड मध्ये एखादे रस्त्याचे वगैरे काम सुरु झाल्यावर किती नगरसेवकांनी माहिती अधिकार कायद्यानुसार कामाच्या सर्व माहितीचे तपशील कामाच्या जागी दर्शनी भागात लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत??? आपल्या नगरसेवकांची महापालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थिती किती...???
प्रश्न विचारून भंडावून सोड्यात...!!! |
असे कितीतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत... ते विचारूया इथेच खुले आम.... त्यावर त्यांना जाब विचारुयात... एक नागरिक म्हणून या मंडळींना जाब विचारणे आपले कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला फेसबुक वर बसल्या बसल्या काही मिनिटांचा वेळ द्यावा लागणार आहे.. एवढेही करायची ज्याची तयारी नाही, तो या समाजव्यवस्थेचा, लोकशाहीचा आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू असेल.. स्वतःच्या आयुष्यात गुरफटून जाण्यात काहीही भूषण नाही... आज तुम्हाला आम्हाला फेसबुक मुळे या राजकारण्यांना जाब विचारायची संधी मिळाली आहे... ठरवले तर या संधीचे सोने करायची ताकद आपल्यामध्ये...सामान्य जनतेमध्ये आहे... प्रश्न हाच आहे की तुम्ही आम्ही ही संधी वाया घालवणार की या संधीचे सोने करणार...???