Friday, December 6, 2013

भूतकाळाचे भूत!

तिहास आठवला की आपले लोक एकदम भावनिक होतात. त्यांचे बाहू फुरफुरू लागतात आणि इतिहासात आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा ऐकून आम्ही मुळातच श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण व्हायला लागते. अशी भावना एकदा निर्माण झाली की, त्याच भावनेला खत-पाणी घालणारे नेते आवडू लागतात. मग त्यांनी वर्तमानकाळात भविष्यकाळ बिघडवणारा काही का गोंधळ घालेना, त्याने इतिहासाचे उदात्तीकरण करणारी भाषा अथवा कृती केली की आमचे महामूर्ख लोक त्याच्या मागे झेंडे नाचवत जातात. समाजाचा अभिमान हा समाजाने वर्तमानकाळात केलेल्या कृत्यांपेक्षा इतिहासावर अवलंबून राहू लागला की समजावे आपण निश्चितपणे अधोगतीकडे वाटचाल करत आहोत. या सगळ्यावर टीका केली की त्या इतिहासातील महान मंडळींचे आम्ही विरोधकच आहोत अशा नजरेने आमच्याकडे बघणे सुरु होते. मग अमुक व्यक्तीच्या नावाच्या वेळीच का टीका केली, तमुक वर का नाही केली, तुमची जात अमुक अमुक म्हणून बोललात हे, तमुक धर्म असता तर करू शकाल काय अशी टीका वगैरे वगैरे बिनबुडाच्या गोष्टी सुरु होतात. या ऐकल्या की आपण एक समाज म्हणून मानसिक रुग्ण आहोत याबद्दल खात्रीच पटते. मनोरुग्ण व्यक्तीप्रमाणेच मनोरुग्ण समाजानेही तातडीने मनोविकासतज्ञांची मदत घेणे आवश्यक असते. (मानसशास्त्रातील ख्यातनाम तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी ‘मनोविकारतज्ञ’ याऐवजी मनोविकासतज्ञ हा शब्द वापरतात. मला तो फार आवडतो. मनाचा विकार दूर करणं यामध्ये नकारात्मकता आहे. पण मनाचा विकास हा कसा सकारात्मक शब्दप्रयोग आहे!) समाजासाठीचे मनोविकासतज्ञ असू शकतात साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक-प्राध्यापक... या मंडळींनी पुढे यायला हवे. ठामपणे योग्य त्या भूमिका मांडायला हव्यात. समाजाला शहाणे करण्यात महत्वाची भूमिका बजावायला हवी.

हे सगळे आज लिहिण्याचा उद्देश म्हणजे नुकतीच घडलेली घटना. पुणे विद्यापीठाचे नाव
बदलून आता ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव ठेवण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या सिनेटने बहुमताने पास करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. रस्त्याला, इमारतीला, विद्यापीठाला, एखाद्या शासकीय योजनेला ऐतिहासिक व्यक्तींचे नाव देण्याची पद्धत जगात सर्वत्र आहे. त्यात काही चूक नाही. यातून त्या व्यक्तींच्या कार्याची आठवण ठेवली जाते. समाजाने त्या व्यक्तींबद्दल व्यक्त केलेला आदर असेही या गोष्टीकडे बघितले जाते. त्यामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या रस्त्याला, विद्यापीठाला, योजनेला, इमारतीला ऐतिहासिक व्यक्तींचे नाव देण्यात काहीच गैर नाही. पण मुद्दा निर्माण होतो जेव्हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींचे नाव बदलले जाते. जुने अस्तित्वात असलेले नाव पुसून किंवा त्यास बाजूला सारून कोणत्याही इतिहासप्रसिद्ध व्यक्तीचे नाव देण्याची आवश्यकताच काय? मूलतः नावाची गरज असते ओळख निर्माण होण्यासाठी. ती ओळख निर्माण झाली की मग व्यवहार सोयीचा होतो. पण नव्याने नाव देणे ही जुनी ओळख पुसण्याची क्रिया करून आपण काय साध्य करतो? जुनी ओळख पुसून इतिहास प्रसिद्ध व्यक्तींचे नाव त्या जुन्याच वास्तूला देऊन आपण केवळ आणि केवळ इतिहासाचे उदात्तीकरण करत असतो, बाकी काही नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले. वास्तविक ती वास्तू बघितली तर व्हिक्टोरियन वास्तुशास्त्राचा अत्युत्कृष्ट नमुना आहे. ब्रिटीशांचे राज्य आले म्हणून रायगड हा ‘फोर्ट एडवर्ड’ झाला नाही किंवा शनिवारवाडा हा ‘किंग जॉर्ज वाडा’ झाला नाही. तसेच ब्रिटीश निघून गेले तरी त्यांनी बांधलेल्या व्हिक्टोरिया टर्मिनस हे व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणूनच राहिले असते तरी बिघडले नसते. शिवाय शिवाजी महाराजांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तूला त्यांचे नाव देणे हा प्रकार तर शुद्ध तर्कदुष्ट आहे. पण या आणि अशा नामान्तरातून इतिहासाविषयीचा अभिमान इतका फुलवायचा की वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष व्हावे. वर्तमानातही तोच तो इतिहास उगाळत बसावे म्हणजे मग आम्ही इतिहासाचा अभिमान असणारे म्हणून वर्तमानात वाटेल ते केले तरी मते मिळवून सत्ताखुर्ची उबवत राहता येऊ शकते. कोणत्याही विचारी मनाला अक्षरशः उबग आणणारी गोष्ट आहे ही.
इतिहास वाचून अशी जिद्द निर्माण व्हायला हवी की आम्ही नवा इतिहास घडवू. पण तशी धमक तर निर्माण होत नाही, तशी कृती करण्याचा विचार सुद्धा आमच्या मनात येऊ दिला जात नाही, शिवाय इतरांनी काही वेगळे करायचे ठरवले तर त्याला वेड्यात काढण्यापुरते आमचे शौर्य उरते. थोडक्यात वागण्यात भ्याड पळपुटेपणा आणि बोलण्यात मात्र इतिहासातील शौर्याची गाथा अशा विरोधाभासी आणि खोट्या वातावरणात आपला समाज अडकून पडला आहे. किंबहुना वर्तमानातल्या वागण्यात आलेले षंढत्व झाकण्यासाठी मग इतिहासातल्या बहादुरीचे दाखले देत बसायचे इतकेच काय ते आम्ही मंडळी करत आहोत आणि हा माझ्या दृष्टीने एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे.

मी अशा समाजाचे स्वप्न बघतो आहे जिथे इतिहासातून प्रेरणा घेतली जाते ती नवनिर्मितीसाठी. जिथे नव्याने उभारलेल्या रस्ते, विद्यापीठे, इमारती यांना इतिहासप्रसिद्ध महान लोकांचे नाव देण्यात येत आहे ते त्यातून स्फूर्ती घेण्यासाठी. इतिहास उगाळत बसण्यासाठी नव्हे. जिथले लोक, असे इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची नावे दिली असतील तिथला दर्जा त्या नावांना साजेसा करण्यासाठी अहर्निश झटतील. जिथे लोक ऐतिहासिक वैर जपण्यासाठी किंवा आपले ऐतिहासिक श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी जुन्या गोष्टींची नावे पुसण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी एका अशा समाजाचे स्वप्न बघतो आहे, जिथे इतिहासापेक्षा नागरिकशास्त्राला अधिक महत्व मिळते आहे. इतिहासातील श्रेष्ठत्वापेक्षा वर्तमानातील प्रगल्भ नागरिकत्वाचा जास्त गंभीरपणे विचार होतो आहे...
आयुष्याच्या अखेरीला वृद्ध माणूस जसा जुन्या आठवणींमध्ये रमतो तसा जगातील सर्वात तरुण देश असा नावलौकिक असलेला आपला देश भूतकाळात रमत बसू नये एवढीच इच्छा. भूतकाळाचे हे भूत जितके लवकर आपल्या मानगुटीवरून खाली उतरेल तितके आपण अधिक परिपक्व समाज बनत जाऊ हे निश्चित.