Saturday, January 23, 2016

नेताजी

नेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव ऐकलं की मन उचंबळून येतं. अतुलनीय शौर्य, देशप्रेम आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेताजी. आयसीएस म्हणजे आजकाल ज्याला आयएएस म्हणलं जातं, त्यात निवड होऊनही, त्या ऐशोआरामाच्या नोकरीवर लाथ मारून देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेत रुजू होणारे सुभाषबाबू. मग त्यांचा आलेख चढताच राहिला. त्यांनी दोनदा कॉंग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. पहिल्यांदा कोणत्याही विरोधाशिवाय. तर दुसऱ्यावेळी महात्मा-सरदार-पंडित या महान त्रिमूर्तीच्या विरोधाचा प्रत्यक्ष निवडणुकीत साफ पराभव करून. पण दुर्दैव असं की पक्ष संघटनेची साथ नसतानाच प्रकृतीचीही साथ मिळेना. शेवटी अध्यक्षपद सोडावं लागलं. पुढे तर कॉंग्रेसमधून त्यांना काढून टाकलं गेलं. मग स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष. त्यानंतर अटक. मग एक दिवस अचानक इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन अत्यंत शिताफीने सटकून, पुढे कष्टाचा प्रवास करून काबूलमार्गे जर्मनीला जाणं, प्रत्यक्ष हिटलरची भेट घेऊन भारतीय स्वतंत्रसंग्रामाला मदत करण्याबाबत चर्चा करणं, त्याच्यावर इतकी छाप पाडणं की जर्मनीने त्यांच्यासाठी पाणबुडी देणं, त्या छोट्याश्या पाणबुडीतून हजाव मैलांचा धोकादायक प्रवास करून जपानला जाणं, सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकार स्थापन करणं आणि आझाद हिंद सेना घेऊन प्रत्यक्ष ब्रिटीश साम्राज्याला धडकी भरवणं आणि एकाएकी त्यांच्या मृत्यूची वार्ता येणं. अक्षरशः थक्क करणारा आयुष्याचा आलेख. इतकं विलक्षण आयुष्य जगणारे लोक विरळाच. पण नेताजींची कथा इथेच संपत नाही. वारंवार ते जिवंत असल्याचे बोलले जाते, त्याबाबत सत्य शोधण्यासाठी सरकारी समित्या बसवल्या जातात. तैवान इथेच बोस विमान अपघातात गेले हेच सरकार सांगत राहिले. आपणही आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात हेच शिकलो. पण तरीझी अधून मधून उठणाऱ्या बातम्यांमुळे सुभाषचंद्र बोस या नावाभोवती एक गूढ वलय आहे. आणि हेच गूढतेचं वलय अधिकच गहिरं होतं जेव्हा आपल्याला कळतं सरकार दफ्तरी सुभाषबाबूंविषयीच्या  काही फाईल्स गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. आणि वारंवार मागण्या होऊनही सरकारने त्या फाईल्स खुल्या करायला नकार दिला आहे. या सगळ्या गूढ गोष्टींवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे अनुज धर या पत्रकाराचं “What Happened to Netaji”.

सुरुवातीच्या काही पानातच हे पुस्तक आपली पकड घेतं. विषयच रंजक आहे. त्यात अनुज धर यांनी ‘मिशन नेताजी’ या आपल्या मंचामार्फत संपूर्ण विषयाचा अतिशय तपशीलवार अभ्यास केला आहे जो वारंवार या पुस्तकात जाणवतो. नेताजींच्या मृत्यूविषयी आलेल्या बातमीपासून कोणी कोणी काय प्रतिक्रिया दिली, सरकार दफ्तरी काय नोंदी आहेत, बोस कुटुंबीय काय म्हणत होते असा सगळा माहितीचा खजिना अनुज धर आपल्यापुढे उघडून ठेवतो. मग नेताजींविषयी सत्य शोधण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने कसे काम केले, कुठे कुठे जाणून बुजून चुका ठेवण्यात आल्या, सरकार पातळीवर कशी अनास्था होती याविषयी लेखक पुराव्यांनिशी विवेचन करतो. स्वतः गेली कित्येक वर्ष अनुज धर हे मिशन नेताजी अंतर्गत सगळ्या संशोधनाच्या कामात गुंतल्यामुळे या सगळ्या कथनाला चांगली खोली येत जाते. हळूहळू काळ पुढे सरकतो तसे आपण गुमनामी बाबा उर्फ भगवानजी या व्यक्ती पर्यंत येऊन पोहोचतो. अनुज धर याने बरंच संशोधन करून असा निष्कर्ष काढला आहे की ही गुमनामी बाबा नामक व्यक्तीच सुभाषबाबू होती. आणि हे सगळंच वाचणं अत्यंत रंजक आहे. अर्थात अनुज धर याने काढलेला निष्कर्ष हाच अंतिम मानावा असा त्याचा आग्रह नाही. त्याचा मुख्य रोख आहे तो सरकारकडे असणाऱ्या गुप्त फाईल्स खुल्या करण्यावर. त्या खुल्या झाल्या तर आपोआपच सुभाषबाबूंविषयी माहिती प्रकाशात येईल आणि त्यांच्या आयुष्याविषयीचे रहस्य उकलण्यात मदत होईल अशी लेखक मांडणी करतो.

अर्थात सुरुवातीपासूनच हे जाणवतं की अनुज धर याचा कॉंग्रेस पक्षावर आणि त्यातही विशेषकरून पंडित नेहरूंवर विलक्षण राग आहे. वारंवार नेहरूंनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला हे तो ठसवतोय हे जाणवतं. अर्थातच आधीचे सुभाषबाबूंचे अगदी जवळचे मित्र असणारे नेहरू, पहिले पंतप्रधान आणि सुभाषबाबूंचे १९३९ नंतरचे राजकीय विरोधक या नात्याने कित्येक सुभाषप्रेमींच्या रोषाचे मानकरी ठरतात यात नवल नाही. त्यात पुढेही बहुसंख्य वर्ष कॉंग्रेसच सत्तेत असल्याने गांधी-नेहरू घराण्याचे हित जपण्यासाठी सुभाषबाबूंना डावलण्यात आल्याची भावना अनुज धरच्या लेखनातून प्रतीत होते. त्यात काही अंशी तथ्य आढळलं तरी त्याचे म्हणणे बरेचसे पूर्वग्रह दुषित आहे हेही जाणवत राहतं. त्यामुळे निःपक्षपातीपणे मुद्देसूद मांडणी करण्याच्या बाबतीत हे पुस्तक कमी पडतं. अधून मधून तर चक्क प्रचारकी थाटाची मांडणी होते. सुदैवाने अथवा दुर्दैवाने पंडित नेहरू आणि इंदिरा यांच्यानंतर मध्ये मोरारजी यांचं सरकार आलं. गुमनामी बाबा यांच्या सांगण्यानुसार मोरारजींना गुमनामी बाबा हेच सुभाषबाबू असल्याचं माहित होतं. असं असेल तर त्याचवेळी, किंवा गुमनामी बाबा गेल्यावर तरी मोरारजींनी हे सत्य जगाला का नाही सांगितलं? असं मानलं की ते मूळचे कॉंग्रेसचे आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली काम केलेले नेते होते म्हणून त्यांनी हे टाळलं, तरी त्यांच्याच मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत असणारे अटल बिहारी वाजपेयी हे देखील गप्प कसे बसले? अनुज धर यांच्या लेखनातून सातत्याने दिसतं की सुभाषबाबू यांच्याशी संबंधित रहस्य हे परराष्ट्रव्यवहाराशी निगडीत आहे. अशावेळी वाजपेयींना सुभाषबाबू यांच्याविषयी माहिती असणारच. त्यात अनुज धर हेही सांगतात की संघाच्या गोळवलकर गुरुजींनी गुमनामी बाबांशी संपर्क ठेवला होता. वाजपेयी आणि गोळवलकर यांना जर सुभाषबाबूंविषयी सत्य माहित होतं तर त्यांनी ते उघड का केलं नाही. इथपर्यंत अनुज धर भाजप-संघालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. पण मग एकदम “कदाचित त्यांनी ‘व्यापक राष्ट्रहित लक्षात घेतलं असेल’ ‘काहीतरी खरंच महत्त्वाचं कारण असेल’” अशी समजुतीची भूमिकाही घेतो. अर्थात ही समजुतीची भूमिका आपल्या पूर्वग्रहांमुळे नेहरूंबाबत घेणं साफ नाकारतो. अर्थात वाजपेयी पंतप्रधान झाल्यावरही सुभाषबाबूंविषयी सत्य शोधनाला सरकार कॉंग्रेस सरकार प्रमाणेच उत्तरं देत होतं हे सांगून अनुज धर संताप व्यक्त करतो. बोस कुटुंबियांपैकी बहुतांश जण हे सरकारी भूमिकेच्या विरोधात असले तरी जे सरकारच्या बाजूने आहेत त्यांचे कॉंग्रेसशी लागे-बांधे आहेत हेही अनुज धर सूचित करतो. असं असलं तरी अनुज धर “नेहरूंनी सुभाषबाबूंचा सैबेरियात खून घडवून आणला” या सुब्रमण्यम स्वामींच्या आरोपाला फेटाळून लावतो. सुब्रमण्यम स्वामी यांचे आरोप बिनबुडाचे असून, ते सत्यापासून अधिकच दूर घेऊन जाणारे आहेत हेही अनुज धर ठासून सांगतो. 

अजूनही, २०१६ मध्ये, माहिती अधिकार कायदा येऊनही ६ वर्ष झाली तरीही, सुभाषबाबूंविषयीच्या सगळ्या फाईल्स काही उघड होत नाहीत हे खरंच दुर्दैव आहे. याबाबत वारंवार मागणी करणारा भाजप आज अभूतपूर्व बहुमताने सत्तेत विराजमान आहे. पण तरीही फाईल्स काही उघड झालेल्या नाहीत. मोदींना फाईल्स उघड करण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अनुज धर अधोरेखित करतो, ती म्हणजे, जर नेहरू दोषी आहेत असं त्या फाईल्स उघड केल्याने निष्कर्ष निघाला तर केवळ नेहरूच नव्हे तर सरदार पटेल हेही तितकेच दोषी आहेत असं उघड होईल अशी शक्यता आहे. एकतर पटेल आणि सुभाषबाबू यांचं कधीच पटलं नाही. सुभाषबाबूंना कॉंग्रेस यंत्रणेत निष्प्रभ करण्यात आपलं सगळं राजकीय कौशल्य पणाला लावलं ते पटेलांनीच. सरदार पटेलांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाई हे सुभाषबाबूंच्या जवळचे होते. त्यांच्या मृत्यूपत्रात असणाऱ्या सुभाषबाबूंच्या उल्लेखामुळे त्यातून प्रकरण कोर्टात जाण्यापर्यंत गोष्टी गेल्याने तर सरदार आणि नेताजी यांच्यात व्यक्तिगत कटुता आली होती. शिवाय १९४५ला सुभाषबाबूंच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पटेल हेच सत्तेत होते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याआधीही पटेल संयुक्त सरकारात मंत्री होते. नुकतेच पश्चिम बंगाल सरकारने उघड केलेल्या काही कागदपत्रांवरून हे स्पष्ट झालं की १९४५ पासून ते पुढची जवळपास सतरा अठरा वर्ष भारतीय गुप्तचर विभाग बोस कुटुंबीयांवर लक्ष ठेवून होता. खुद्द पटेल यांच्याच गृहमंत्री या नात्याने अधिपत्याखाली हे सगळं चालू होतं. त्यामुळे अर्थातच केवळ नेहरूंवर दोषारोप करून चालणार नाही तर पटेलही तितकेच जबाबदार असतील, ही शक्यता लक्षात घेऊन मोदी कागदपत्र उघड करण्याच्या बाबतीत उत्साह दाखवत नसावेत असं लेखक सुचवतो. आणि दुसरं कारण म्हणजे गांधीजी. गांधीजींनाही सुभाषबाबूंबद्दल माहिती होती असे सुचवणारी कागदपत्र गुप्त फाईल्स मध्ये असतील तर चिखलाचे शिंतोडे गांधीजींवर देखील उडतील. आणि सध्या पटेल आणि गांधीजी या दोघांच्याही सध्याच्या प्रतिमेची नरेंद्र मोदी यांना आवश्यकता आहे अशी मांडणी अनुज धर करतो. पुस्तकाचा बहुतांश भाग हा नेहरू-कॉंग्रेस यांच्यावर टीका करण्यत घालवल्यावर शेवटच्या भागात भाजपही कॉंग्रेसच्याच वाटेवर जात आहे अशी टिपणीही अनुज धर करतो.

शेवटी स्वच्छ दृष्टीने आणि निःपक्षपातीपणे पुस्तक वाचल्यास, आपण या निष्कर्षाला येऊन पोहोचतो की जोवर सरकारकडे असलेल्या या विषयातल्या सर्वच्या सर्व गुप्त फाईल्स सार्वजनिक होत नाहीत, त्यातली माहिती लोकांपर्यंत जात नाही तोवर नेहरू-पटेलच काय पण कोणावरच दोषारोप करण्यात अर्थ नाही. किंबहुना त्या फाईल्स लवकरात लवकर खुल्या झाल्यास स्वामींनी केले तसले बिनबुडाचे आरोप होणं तरी बंद होईल. आणि हो, दोष द्यायचाच तर तो सर्वांना द्यावा लागेल. त्या फाईल्स गुप्त ठेवून भारतीय इतिहासातल्या सर्वात उत्तुंग अशा नेत्यांपैकी एकाची माहिती भारतीय समाजापासून वर्षानुवर्षे लपवून ठेवण्याचा दोष नेहरूंपासून इंदिरा गांधी-वाजपेयी यांच्यासह नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्याच माथी लागतो. सुभाषबाबूंविषयीचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न करणारं हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे.

इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा आपल्या समाजाला आजार आहे. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवाजांपासून आपल्या समाजाला दूर ठेवणं म्हणजे त्या विकृतीकारणाला बळ देण्यासारखं आहे. त्यामुळे सर्व माहिती उघड करत सत्य काय आहे ते जनतेसमोर मांडायलाच हवं. आज मोदी सरकार १०० फाईल्स खुल्या करणार आहे. पण तेवढ्याच फाईल्स खुल्या करून संपूर्ण सत्याचा शोध लागेलच असं नाही. अर्धवट फाईल्स खुल्या केल्याने अर्धवट माहिती समोर येईल. आणि अर्धवट माहितीचे निष्कर्ष राजकीय फायद्यासाठी काढले जाणार नाहीतच असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल. त्यामुळे शंभर फाईल्स खुल्या केल्या तरी ते पुरेसं नाही. म्हणूनच हुरळून न जाता सुभाषबाबूंविषयीची सर्व माहिती आता तरी जनतेसमोर खुली व्हायलाच हवी ही मागणी लावून धरणाऱ्या अनुज धर याच्या ‘मिशन नेताजी’च्या पाठीशी आपण नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे. बापूंचा सत्याचा आग्रह त्यांचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेसने तरी जुमानला नाही. आता वारंवार गांधीजींचं नाव घेणारं मोदी सरकार तरी सुभाषबाबूंविषयीच्या सत्याचा आग्रह धरणार का हे बघायचे.

आज सुभाषबाबूंची जयंती. या भारतीय इतिहासातल्या लोकविलक्षण नायकाला आदरपूर्वक सलाम!