आमच्याकडे सगळेच खवय्ये आहेत. त्यामुळे दिवाळी फराळ हा प्रकार जोरदार असतो..! त्यातही आजीकडे एक दिवस फराळ कार्यक्रम असतो. त्यामुळे दिवाळी फराळ हा एकदम जिव्हाळ्याचा विषय... पण चकली-लाडू यापलीकडे जाऊन एका वेगळ्या प्रकारच्या फराळाची आमच्याकडे पद्धत आहे... अगदी वर्षानुवर्षे चालू असा वैचारिक फराळ...!
आमच्याकडे दर वर्षी दिवाळी अंकांची मेजवानीच असते... दिवाळी अंक बाजारात आले की कपड्यांच्या दुकानात सेल लागल्यावर बायकांची जी अवस्था होते तीच माझी होते..
लहानपणी शाळेत असताना मी मला जे दिवाळी अंक हवे असायचे (उदा. छात्र प्रबोधन, किशोर, ठकठक, कुमार इ.) ते मी 'कमवायचो'..!
शाळेला दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत सगळेच दिवाळी अंक बाजारात यायचे. त्याची किमतीसह यादी बाबा आणून ठेवायचे. आणि मी घरोघर फिरून दिवाळी अंकांची ऑर्डर घ्यायचो. सुरुवात अर्थातच नातेवाईक-मित्र अशी व्हायची. त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळाल्या की मग आईच्या मैत्रिणी, त्यांच्या सोसायट्या, मग दिसेल त्या बिल्डींग मध्ये घुसून सेल्समनगिरी करायचो. सहावी सातवीतला मुलगा घरपोच दिवाळी अंक विक्री करतोय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. माझा मित्र सोहम हा ज्ञान प्रबोधिनीत होता. त्यांना त्यांच्या शाळेने फटाके विक्री करायला सांगितलेली असे. त्यामुळे एक दोन वर्ष आम्ही एकत्रच बाहेर पडायचो. फटाके आणि दिवाळी अंक, घरपोच विक्री! दोघांच्याही हातात आपापल्या याद्या आणि एक ऑर्डर घ्यायची वही.
ऑर्डर्स घेतल्या की मग अप्पा बळवंत चौकात जायचे, तिथल्या 'संदेश एजन्सी' मधून सगळे दिवाळी अंक विकत घ्यायचे आणि मग सगळ्या घरांमध्ये ते पोचते करायचे हा उद्योग दिवाळीचे आधी २ दिवस चालायचा... 'संदेश' मधून मला सवलतीच्या दरात अंक मिळायचे. प्रत्येक अंकामागे २०% सुटायचे. मग हे पैसे वापरून मी माझी दिवाळी अंकांची खरेदी करायचो...! जास्तीत जास्त दिवाळी अंक खरेदी करता यावेत म्हणून मी अक्षरशः दिवसभर ऑर्डर्स घेत भटकायचो. सतत हिशोब करून किती ऑर्डर्स अजून घ्यायला लागतील ते बघायचो. पण एकदा का माझे दिवाळी अंक हातात आले की मग पुढची सुट्टी जी जायची त्याला तोड नाही...!!! दिवसभर तंगड्या पसरून वाचत पडायचे...!!! तेव्हा लागलेली ही सवय आता आयुष्यात कधी सुटेल असं वाटत नाही...
नेहमीप्रमाणेच याही वर्षी भरपूर दिवाळी फराळ झाला...! अंतर्नाद, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, अनुभव, साप्ताहिक सकाळ, जत्रा, माहेर, मानिनी, प्रपंच, आवाज, अनुवाद, चिन्ह अशा एकसे एक अंकांनी यावेळची दिवाळी भन्नाट गेली...!
त्यातले काही खास लेख प्रत्येकाने वाचावेत असेच आहेत. साप्ताहिक सकाळ मध्ये असलेला पुण्याच्या नदीवरचा लेख तुफान आहे. अतिशय अभ्यासपूर्ण...! पुण्यातली नदी, नदीचे प्रदूषण आणि सरकारची भूमिका अशा विविध गोष्टी या लेखात आहेत.
महाराष्ट्र टाईम्स तर विलक्षण आहे... गेल्या ५० वर्षातले मटा मध्ये छापून आलेले उत्तमोत्तम लेख एकत्र करून छापले आहेत. गोविंदराव तळवलकरांच्या चीन हल्ल्यावारच्या एखाने या अंकाची सुरुवात होते... मग पु. ल., तेंडूलकर, हृदयनाथ मंगेशकर, इरावती कर्वे, आर के लक्ष्मण, नरहर कुरुंदकर, गदिमा, सुहास पळशीकर, कुमार केतकर, कुसुमाग्रज, सुनीताबाई देशपांडे, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर, नाना पाटेकर, व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गजांचे लेख एकाच अंकात मिळणे ही फारच मोठी मेजवानी होती...! यापैकी पुलंनी लिहिलेला बालगंधर्व यांच्यावरचा लेख, गदिमांचा आचार्य अत्रेंवरचा लेख, विजय तेंडूलकर, नारळीकर आणि नानाचा लेख तर फारच सुंदर. गोविंद तळवलकर यांचे सर्वच लेख अफाट..! महाराष्ट्र टाईम्स चा अंक हा नुसता वाचायचा अंक नसून संग्रही ठेवायचा अंक आहे.
इतरही सगळ्याच दिवाळी अंकात खजिनाच आहे. अक्षर मधला मटा च्या ५० वर्षातल्या ३ प्रमुख संपादकांवर लिहिलेला प्रकाश अकोलकरांचा लेख, किंवा अक्षर मधला सोशल मिडिया वरचा स्वतंत्र विभाग, प्रपंच मधला "जगण्यावर शतदा प्रेम करावे" या विभागातले आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, अच्युत गोडबोले यांचे लेख, अंतर्नाद मधले लेख, चिन्ह मधले नाडकर्णी आणि भालचंद्र नेमाडे यांचे लेख, माहेर मधला डॉ अभय बंग यांच्या मुलाचा लेख, लोकसत्ता मधला गिरीश कुबेर यांचा लेख हे सर्वच फार वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहे.
लोकांनी दिवाळी अंकाचे वाचन केले तरी दिवाळीच्या महिन्याभरात लोकांची प्रगल्भता कित्येक पटींनी वाढेल. दिवाळीच्या निमित्ताने विचारवंत, तज्ञ, पत्रकार, जाणकार लोक आपण होऊन माहितीचा, विचारांचा खजिना उघड करत असतात. तो भरभरून घेणे आणि स्वतःला प्रगल्भ करणे आपल्याच हातात आहे.
वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कालच एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. बोलता बोलता तो म्हणाला ते एकदम पटलं. तो म्हणाला, आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात. एक फोटो कोणीतरी 'शेअर' करतो त्यावर कोणाचीतरी बदनामी असते. आणि कसलीही शहानिशा न करता असंख्य लोक त्याचा प्रसार करतात. आणि बेधुंदपणे या गोष्टी पसरतात लोक त्यावर विश्वासही ठेवतात. हे सगळं मुळीच चांगलं नाही असं माझं मत आहे. सर्वांगाने विचार करून, माहिती घेऊन, खोलवर वाचन केले गेले पाहिजे. समाज प्रगल्भ आणि सुसंस्कृत होणे गरजेचे आहे.