Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Tuesday, September 6, 2016

विजयी मी, पराभूत मी

समजले जणू आपल्याला विश्वाचे सूत्र
सत्य हे की, निसर्गासमोर मानव एक क्षुद्र

निसर्गात जावे ते भावतालाशी एकरूप होण्यासाठी
शांतता ऐकावी कधीतरी
शांततेच्या सूरांत तल्लीन होण्यासाठी

आम्ही मात्र चंद्राचा स्पॉट लाईट सोडून
इलेक्ट्रिक बल्बसाठी झुरणार.
शांततेचं संगीत सोडून
इलेक्ट्रॉनिक म्युझिकवर थिरकणार

हा पर्वत, हा तलाव, हे ढग आपल्याला काहीतरी सांगतायत
आपण ऐकायला कधी शिकणार?
जनरेटरच्या या कृत्रिम धडधड आवाजात
वाऱ्याने सांगितलेल्या कानगोष्टी कशा बरं ऐकणार!?

गणितं मानवाची चुकलीएत बरीच
भवतालापासून दूर नेलंय ज्यांनी.
प्रगती प्रगती ओरडत स्वतःचीच
वाट चुकायला हातभार लावलाय यांनी.

या विश्वातला एक कण आपण
भवती अथांग सिंधू
कुठेतरी काठावर तरंगतोय
बनून अवघा एक बिंदू

खोल तळाशी काहीतरी आहे,
ज्याचा शोध घ्यायला हवा.
समुद्रात नाही वेड्या, मनात बुडी मार
तिथे खरा शोध घ्यायला हवा.

पण त्यासाठी आपल्याच उथळ प्रगतीच्या
अहंकारातून बाहेर यावं लागतं
आकलनापलीकडे आपल्या असणाऱ्या उर्जेचं
लक्ष देऊन ऐकावं लागतं.

या ऊर्जेला नावं दिली अनेक
कोणी ईश्वर म्हणे कोणी अल्लाह.
निसर्ग हेच त्याचं सत्य रूप,
त्याचं ऐकूया, एवढा माझा सल्ला.

'कसला बुढ्ढा झालाय हा'
थट्टेने म्हणेल कोणी
उत्साहाने म्हणेल नाचूया,
लावूया गाणी

हरकत नाही,
पण साला सूर हवा निसर्गाचा, मानवी गळ्याच्या स्वरयंत्रातला.
नको कलकलाट स्पीकरचा
नको स्वतःच्याच क्षुद्र धुंदीतला

प्रश्न मनात अनेक-
कोण मी, कुठून आलो मी?
अमूर्त अशा या ऊर्जेचा
एक अंशच नव्हे का मी!?

मी पर्वत, मी चंद्र
मीच निसर्ग, मीच सर्वत्र

मानव अन् निसर्ग हा झगडा
कधी थांबणार?
दोन्ही वेगळे नाहीतच स्वतःशीच
किती लढणार?

निळ्याशार तलावाकाठी बसून सुचणारी अक्कल ही,
खरंतर,
शहरी अपराधी भावनेला दूर ठेवण्याची
शक्कल ही.

पहाडांमधून शहरात परत गेलो की,
सगळी नेहमीची चक्र सुरु होतात
निष्फळ धावाधाव, लोभ, मत्सर
अन् विध्वंसाची चक्र सुरु होतात

आपल्याच अहंकाराच्या धुरात घुसमटतो जीव माझा
'स्व'च्या पलीकडे जाऊन मोकळ्या श्वासासाठी झुरतो जीव माझा

दुसऱ्यांना मी दोष का द्यावा?
माझ्यात तरी कुठे हिम्मत आहे?
सरळ वेगळा मार्ग निवडावा एवढी
माझ्याच विचारांना कुठे किंमत आहे?

न लढताच पराभूत झालो मी
जमत नाहीए म्हणून नव्हे
तर प्रयत्नच न केल्याने
साफ साफ पराभूत झालो मी

पराभवाची ही जाणीव
पहाडांत आल्यावर होते
पहिल्यांदाच झालीये असं नव्हे
दर वेळी आलो की होते

परत जाताना परिवर्तनाचा निश्चय घेऊन जातो
जसजसा वेळ जातो तसतसा निश्चय क्षीण होत जातो

मग पुन्हा पहाड, पुन्हा निश्चय, पुन्हा पराभव या चक्रात अडकलोय मी
पण खरं सांगू? आताशा हे सगळं चक्र एन्जॉय करू लागलोय मी

पुन्हा पुन्हा निश्चय करायची ऊर्जा आहे हे काय कमी आहे?!
पराभवाने खचून जात नाहीए मी
हे काय कमी आहे?!

पहाड मला आशावाद देतात
प्रेमाने मला कुशीत घेतात
बर्फाळ थंडीतही वेगळीच ऊब देतात
पराभवाची जळमटं शोषून घेतात

जोवर हे चक्र चालू आहे तोवर
पराभूत असूनही विजयी मी
आणि मार्ग नवीन सापडेपर्यंत

विजयी असूनही पराभूत मी.

Thursday, September 10, 2015

धावाधाव

डोळ्यावर झापड पण धावण्यात तुफान वेग
झिंग पुरती चढली तरी और एकेक पेग.
धडपडलो तरी कळत नाही, मार्केटिंगची करामत आहे,
हीच खरी प्रगती, हे सांगणाऱ्यांची ही शक्कल आहे.
पैसा हेच सर्वस्व स्वतःला सतत बजावतोय,
कळत नाहीये काही, मी नक्की कुठे धावतोय.

मिळेल ते, अधाशासारख लावतोय सट्टयावर 
युधिष्ठीर सगळे, मांडलाय डाव अड्ड्यावर.
राजवाड्यात डाव मांडला म्हणून नियम बदलत नाही,
पुढच्या डावात नक्की जिंकू ही धुंदी काही उतरत नाही.
अमर्याद ओढीने विजयाच्या, सगळंच सट्टयावर लावतोय.
कळत नाहीये काही, मी नक्की कुठे धावतोय.




गुगल फेसबुक माझा पिच्छा सोडत नाही.
त्यांना का दोष द्यावा, मलाही त्यांना सोडवत नाही.
सगळी माझी माहिती मी त्यांच्या हातात देतो.
माझ्याही नकळत मी गुलाम त्यांचा बनून जातो.
विचार माझे प्रभावित करणाऱ्या बातम्या ते मला दाखवतील,
माझ्या आवडी निवडी ठरवणाऱ्या जाहिराती मला दाखवतील.
झोपेचं सोंग घेऊन आहे ते मी चालवून घेतोय
कळत नाहीये काही, मी नक्की कुठे धावतोय.

मी धर्मवादी हे गर्वाने म्हणा असं म्हणणारे भेटतात.
तथाकथित ‘पुरोगामित्व’ कट्टरपणे पाळणारे भेटतात.
एका क्षणी या दोहोंतील भेदही दिसेनासा होऊ लागतो. 
तलवारी परजून तयार, संधी येताच दुसऱ्याला कापू पाहतो.
चार क्षण शांतपणे विचार करणंही मी आता टाळू लागलोय,
खरंच सांगतो, कळत नाहीये काही, मी नक्की कुठे धावतोय.


एक दिवस पृथ्वीची उर्जा संपणार आहे हे कोणी वेडा बोलून गेला.
आजचं अर्थकारण शुद्ध ‘फ्रॉड’ आहे असं कोणी वेडा सांगून गेला.
पटून बोलणे हे हतबलता आली, मग कान बंद करून घेतले,
मनातल्या विचारांनाही लाथा घालून पार हाकलून लावले.
तरीही नैराश्याचा अदृश्य डोलारा खांद्यावर माझ्या साचतोय
कळत नाहीये, त्याही अवस्थेत, मी नक्की कुठे धावतोय.

Saturday, October 25, 2014

भक्तीसंप्रदाय

एखादा मनुष्य ‘भक्ती में शक्ती है |’ असं म्हणत वैयक्तिक आणि अध्यात्मिक पातळीवर
कशाविषयी भक्तीभाव राखत असेल तर त्याचा कोणाला फारसा उपद्रव होण्याचं कारण नाही. ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हणत भक्ती करणाऱ्या वारकऱ्याचा कोणाला त्रास का बरं होईल? पण भक्तीभाव जेव्हा सामाजिक बनू लागतो, त्याला राजकीय रंग चढू लागतो तेव्हा तो उपद्रव निर्माण करू लागतो. जगाच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा भक्ती-शक्ती, म्हणजेच धर्म आणि राजकारण, या दोन्ही गोष्टी वेगळ्या केल्या जात नसत. त्यामुळेच राजाला धर्माचे अधिष्ठान लागत असे, आणि धर्माला राजाश्रय. समजूत अशी की राजा हा थेट देवाने नेमलेला आहे. आणि मुख्य धर्मगुरू हा देवाचा दूत आहे. त्या काळात या सगळ्या गोष्टी लोकांच्या अंगवळणी पडल्या होत्या, त्यांना समाजमान्यता होती. हळूहळू काळ बदलला. युरोपातल्या रेनेसांस मध्ये म्हणजे प्रबोधन काळात धर्मसंस्थेला आव्हान दिलं गेलं. जसजशी आधुनिक लोकशाही विकसित होऊ लागली तशी राजकीय भक्तीसंप्रदायाची पीछेहाट होत गेली. राजसत्तेपासून धर्म वेगळा केला गेला. आणि युरोपियन लोकांनी जगभर राज्य केल्याने हीच विचारधारा जगभर पसरली. पण जिथे जिथे लोकशाहीचे थडगे खणले गेले तिथे तिथे या ना त्या स्वरुपात भक्तीसंप्रदाय वाढत गेला. इराणसारख्या देशांत तो पारंपारिक धार्मिक स्वरुपात दिसून आला तर जर्मनी, इटली या ठिकाणी तो एकतंत्री हुकुमशाहीच्या स्वरुपात दिसून आला. रशिया-चीन इथे तो कम्युनिझमच्या नावाखाली उदयाला आला. भारतातही लोकशाही राज्यव्यवस्था रुजली तरी लोकशाही मानसिकता कधीच न रुजल्याने राजकीय भक्तीसंप्रदाय कधी संपलाच नाही. आणि मी जेव्हापासून राजकीय घडामोडी बारकाईने बघतो आहे, तेव्हापासून हा संप्रदाय वेगाने फोफावतो आहे. इतकेच नव्हे तर याला प्रतिष्ठाही प्राप्त होत आहे.

काही भक्तीप्रसंग मला इथे नमूद करावेसे वाटतात-
(१) २००९ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार धडाक्यात सुरु होता आणि आम्ही राजकारणात रस असणारी मित्रमंडळी सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रचार सभा ऐकायला जात होतो. त्यावेळी पुण्यात राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या सभांना आम्ही हजेरी लावली होती. राज ठाकरे यांची सभा नदी पात्रात होती आणि अजून त्यांच्या भाषणात तोचतोचपणा यायचा होता. सभा अप्रतिम झाली आणि राज यांचे भाषणही चांगलं झालं. आम्ही सभेच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना मी सहज माझ्या मित्राला म्हणलं, “राज ठाकरेची वक्तृत्व शैली प्रभावी आहे हं !”. शेजारून जाणारा एक भक्त थबकला आणि मला दरडावून म्हणाला- “राजसाहेब ठाकरे म्हण... अरे-तुरे काय करतोस आमच्या साहेबांना..”
(२) महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आम आदमी पक्षाने लढवावी अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती डावलून निवडणूक लढवणार नसल्याचं केजरीवालने जाहीर केलं तेव्हा कित्येक भक्तांनी “अरविंदने घेतला आहे ना निर्णय मग तो योग्यच असणार. अरविंद चुकू शकतच नाही” असा सूर लावला. वास्तविक केजरीवालने चुका झाल्यावर त्याचे परिणाम भोगल्यावर त्या चुका खुलेपणे मान्यही केल्या आहेत. ही पार्श्वभूमी असतानाही ही भक्ती !
(३) मोदी निवडून आल्यावर एकदा एका भक्ताशी गप्पा मारत होतो. मी त्याला म्हणलं मोदी केंद्रात निवडून आले आणि त्यांनी तिथला भ्रष्टाचार संपवला तर उत्तमच. पण महापालिकेतले नगरसेवकही भ्रष्टाचार न करणारे निवडून जाईपर्यंत काम करावे लागेलच. शिवाय मोदींपासून ते अगदी नगरसेवकांपर्यंत कोणाचाही पाय घसरू न देणं ही आपली जबाबदारी नाही का? त्यावर त्याने मोठे नमुनेदार उत्तर दिलं, “छे छे... नमोंचा पाय घसरणं केवळ अशक्य. ते चूक काही करूच शकत नाही. इतकी व्हिजन असलेला, देशप्रेमी मनुष्य चूक करूच कसा शकेल? आणि त्यांचे सगळे गुण हळू हळू ट्रिकल डाऊन होत, झिरपत झिरपत नगरसेवकापर्यंत पोहचतील. पाच वर्षात भारत सुपर पॉवर होणार बघ!”
(४) शरद पवारांना कोणीतरी थोबाडीत मारण्याची घटना घडली तेव्हा अण्णा हजारे यांनी “एकही मारा?” अशी प्रतिक्रिया दिल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर पुण्याच्या खुद्द महापौरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक-पदाधिकारी मंडळींनी स्वारगेट चौकात आंदोलन करून सगळी वाहतूक ठप्प करून ठेवली होती. अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारणे वगैरे प्रकार करण्यात आले होते त्यावेळी.
(४) टाईम मासिकाने आपल्या एका अंकाच्या मुखपृष्ठावर मनमोहनसिंग यांना ‘अंडर अचिव्हर’ म्हणल्यावर आपली भक्ती दर्शवण्यासाठी ओडिशा मधल्या काही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचे ऑफिस फोडले. वास्तविक पाहता टाईम मासिक आणि टाईम्स ऑफ इंडियाचा दुरान्वयेही संबंध नाही. असो.
(५) तामिळनाडूच्या अम्मांना अटक झाल्यावर पाच-सात भक्तांना हृदयविकाराचा झटका बसला तर तेवढ्याच मंडळींनी थेट आत्महत्या केली. अम्मांच्या पक्षाच्या नवीन मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना रडू आले. चेन्नई मध्ये काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ पण झाली.

अनुयायी असणं, एखादी व्यक्ती आवडणे, एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घेणं, त्या व्यक्तीसंबंधी विश्वास वाटणं या सगळ्या गोष्टी अतिशय स्वाभाविक आहेत. पण विश्वास जेव्हा अंधविश्वासाकडे जाऊ लागतो, प्रेरणा आणि उन्माद यातला फरक जेव्हा पुसट होत जातो, आपण ज्या व्यक्तीचे अनुयायी आहोत ती व्यक्ती अस्खलनशील आहे असं जेव्हा वाटू लागतं, जेव्हा टीका करणाऱ्यावर उलट टीका, टिंगलटवाळी, बहिष्कार किंवा थेट हिंसाचार अशी अस्त्र उगारली जातात तेव्हा समजावे की आपण भक्तीसंप्रदायाचा भाग बनू लागलो आहोत.
राजकीय भक्ती संप्रदायाची खासियत म्हणजे तो टोकाची भूमिका घेऊन आपल्यावर टीका करणाऱ्यांना थेट आपला शत्रू मानू लागतो. आणि शत्रूला नामोहरम करण्यासाठी सर्व उपलब्ध शस्त्रास्त्रांचा वापर करू लागतो. यातले सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे टिंगलटवाळी आणि प्रतिमाहरण. स्टालिनने सुरुवातीच्या काळात रशियामध्ये याचा तुफान वापर केला. आपल्या राजकीय विरोधकांची सुरुवातीला वर्तमानपत्रातून निंदा नालस्ती सुरु होत असे. मग पद्धतशीरपणे त्यांच्या विचारांची, कृत्यांची टिंगल सुरु होई. हळूहळू ते कसे मार्क्सवादाच्या विरोधातले आहेत आणि स्टालिन हाच कसा खरा मार्क्सवादी, लेनिनचा पट्टशिष्य हे ठसवलं जाई. आणि मग एवढं झाल्यावर लोकांच्या मनातून विरोधकांची प्रतिमा खालावल्यावर त्यांना गोळ्या घातल्या जात. हे तंत्र स्टालिनने एवढं प्रभावीपणे वापरलं की एखाद्या नेत्याच्या विरोधात वर्तमानपत्रात एखादा जरी टीकात्मक लेख छापून आला की तो थेट स्टालिनचे पाय धरायला धावू लागे. स्टालिनचे अवास्तव कौतुक सुरु करे. स्टालिनला अवतारी पुरुष मानू लागे. माओने चीनमध्ये हेच केलं. त्याने तर घोषणाच दिली- ‘बम्बार्ड द हेडक्वार्टर्स’- मुख्यालयावर हल्ला बोल. पक्षातल्या आपल्या विरोधकांना निंदा नालस्ती, टिंगलटवाळी करत सामाजिक जीवनातून उठवणे आणि मग गोळ्या घालून ठार करणे हे तंत्र माओने देखील यथेच्छ वापरले. इतके थोर गांधीजी. पण या महात्म्याला तरी सुभाषबाबूंनी केलेला विरोध सहन कुठे झाला? कॉंग्रेस मध्ये त्यांना काम करणे अशक्य व्हावे अशी परिस्थिती गांधीजींनी निर्माण केलीच. आणि ती ते करू शकले कारण ‘गांधीजी वाक्यं प्रमाणं’ म्हणत असंख्य भक्त मंडळी त्यांच्या आजूबाजूला उभी होती. टीका ऐकून घेणं, त्यावर पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार करणं, टीकाकारांबद्दल सहिष्णुता दाखवणं, टीका लक्षात घेऊन आपल्यातले दोष दूर करायचा प्रयत्न करणं या गोष्टी सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक अशा आहेत. या नसतील तर प्रगल्भ आणि चांगली लोकशाही व्यवस्था या देशात कधीही निर्माण होऊ शकणार नाही.

थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे कितीही जरी तुकोबांनी सांगितले तरी ते स्वीकारण्याची तयारी आमच्या राजकीय भक्ती-सांप्रदायिकतेच्या विळख्यात अडकलेल्या लोकांची नाही. ‘सुदृढ लोकशाही हवी’ यावर एकमत असल्यास आपल्याला त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील. आरोपाचे प्रत्युत्तर आरोप असू शकत नाही हे आपल्याला शिकावं लागेल. आपल्या धोरणाला, विचारधारेला होणारा विरोध म्हणजे त्यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याची संधी असते हे समजून घ्यावं लागेल. मतभेद आणि दर्जेदार वादविवाद यामुळेच आपले विचार अधिक सुस्पष्ट करण्याची आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी आपल्याला मिळत असते हे लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला चांगल्या लोकशाही मानसिकता असलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी, भक्ती-संप्रदायात न अडकण्याची काळजी घ्यावी लागेल.

समर्थांचा दासबोध आणि मंगेश पाडगांवकरांचा उदासबोध यातून प्रेरणा घेत “भक्तलक्षण” सुचले- 

- भक्तलक्षण -

करून टिंगल विरोधकांची
कवने रचून नेत्यांची
घोषणा गोंधळ ज्याने केला
तो येक भक्त

भक्ती हाच एकमेव धर्म
भक्ती हेच एकमेव कर्म
नेता ज्याचा शिव-विष्णू-ब्रह्म
तो येक भक्त

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रतिमेच्या प्रेमात रमले मर्कट
सोडून दिले सर्व तर्कट
तो येक भक्त

झापड लावून घोड्यासारखा
डोले नंदीबैलासारखा
बहिरा ठार नागासारखा
तो येक भक्त

चर्चाखोर भांडखोर
शंकाखोर टीकाखोर
यांना शत्रू ज्याने मानले
तो येक भक्त


(ता.क. - फेसबुकवर जेव्हा मी मोदीभक्तांचा उल्लेख केला तेव्हा अनेकजण एकदम उसळले- आम आदमी पक्षात काय भक्त नाहीत का वगैरे वगैरे. यातले अनेकजण मला बऱ्याच वर्षांपासून ओळखणारेही होते याचं मला आश्चर्य वाटलं. मी नेहमीच सर्व प्रकारच्या राजकीय भक्ती संप्रदायावर टीकाच केली आहे आणि करत राहीन. मग ते मोदी भक्त असो नाहीतर राज-भक्त असो किंवा केजरीवाल भक्त. २०११ मध्येही अण्णा आंदोलनाच्या वेळी मी लेख लिहून ‘मसीहा मानसिकतेवर’ टीका केली होती. तेव्हा माझ्या या लेखनाचा रोख निव्वळ मोदी भक्तांवर नाही हे सर्व भक्तांनी समजून घेणे आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व लेखन हे ‘भक्त केंद्रित’ आहे. त्यांच्या त्यांच्या नेत्यांवर ही टीका नाही हेही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अर्थात सर्वच गोष्टी पूर्वग्रहाच्या चष्म्यातून बघायच्या असतील तर मग बोलणेच खुंटले!)

Tuesday, March 25, 2014

मला हसायला आवडतं... तुम्हाला?

कधी कधी चिंता मला वाटते
हसणे फार दुर्मिळ झाले.
कारण काय? मला वाटते,
नीट ‘बघणे’ फार दुर्मिळ झाले.

आजुबाजू बघता, न हसावे असे काय आहे?
विसंगतींनी भरले जग, रडावे असे काय आहे?

पुराणे एक सत्य सांगतो,
दृष्टी तशी सृष्टी.
मनातले मळभ दूर सारले की,
हवी तितकी हास्यवृष्टी !

‘मळभ’ सरले की वृष्टी??
ही पहा, आणखी एक विसंगती.
अरेच्चा कोणीच हसलेही नाही..
कधी कधी चिंता मला वाटते,
हसणे फार दुर्मिळ झाले
आता वाटते, बघणेच काय,
नीट ‘वाचणेही’ फार दुर्मिळ झाले.

पोलीसदलाचा प्रमुख एक गुंड,
कायदेमंडळाचा प्रमुख एक पुंड,
डबक्याला म्हणावे पवित्र कुंड,
जनता म्हणावे, असली जरी झुंड.
इतक्या हास्यास्पद गोष्टी असोनही
हसणे आम्ही विसरलो.
हसणाऱ्यांना मारून-झोडून-चोप देऊन चक्क,
जगणे आम्ही विसरलो.

चित्रातून हसवले म्हणून मारले
शब्दातून हसवले त्याला कापून काढले.
हसवण्या बंदी घालणारे फतवे कोणी काढले,
दुर्दैव, फतवे ते बिनबोभाट आपण पाळले.

खरा प्रश्न सांगू काय आहे?
स्वतःच स्वतःवर हसणे बंद झाले,
मग दुसऱ्याने आपल्यावर हसणे सुद्धा
आम्ही धाक दाखवून बंद पाडले.

पुन्हा एक पुराणे सत्य सांगतो,
जे गांधीबाबा बोले ते सांगतो,
सुरुवात स्वतःपासून करणे आहे.
दुसऱ्याच्या आधी स्वतःवर हसणे आहे.

स्वतःवर खळखळून हसूया.
व्यंगावर हसूया
अडाणीपणावर हसूया
भाबडेपणावर हसूया
वेडपटपणावरही हसूया
तुम्ही हसलात तर जग हसेल,
आधी तुमच्यावर आणि मग स्वतःवरही!

प्रश्न नि चिंता सर्वांनाच आहेत हो...
पण त्यात रडण्याचा भार का घ्यावा?
त्यापेक्षा भरपूर हसा!
हलकं वाटेल नक्की, विश्वास ठेवा.

मला तर हसायला आवडतं... तुम्हाला?

Thursday, May 2, 2013

किल्ले केविलवाणे


बुरुज पडले, तट खचले,
दार गंजले, किल्ले केविलवाणे.

सुरुंग लावून तटाला भगदाड पाडले,
कोण्या एका शत्रूने.
फुटक्या विटा, तुटके लाकूड विकले
खुद्द किल्लेदाराने. 

शत्रू कधी आला, कधी गेला
कळेना झाले.
शत्रू कोण, मित्र कोण
हेही कळेना झाले.

खिंडार बुजवण्या टेंडर निघाले,
प्रक्रियेत या झाले सारे हात ओले.
भंपक माल सगळा, काळजी पुरी घेतली
पुढल्या वेळी,

नुसत्या धक्क्यानेच तट कोसळे खाली.

मग पुन्हा टेंडर, पुन्हा हात ओले, पुन्हा भंपक माल.
आजही सगळे सगळे अगदी तसेच, जसे झाले होते काल.

बुरुज पडले, तट खचले,
दार गंजले, किल्ले केविलवाणे.

केविलवाण्या किल्ल्याची किल्लेदारी पाहिजे
म्हणून मारकाट चालू आहे.
ढासळला किल्ला तरी अद्याप भरपूर काही बाकी आहे
म्हणून मारकाट चालू आहे.

गदारोळात किल्ल्यावरल्या राहावे कसे?
शहाणे सगळे गेले किल्ला सोडून.
उरल्या वेड्यांच्या भयभीत नजरा
बघती युद्ध हे दाराआडून.

बघतो मी उदासपणे.
निःश्वास सोडतो हताशपणे.
वाटते, किती दिवस चालणार आहे हे?
अजूनही लोक कसे सहन करतात हे?

तेवढ्यात दिसतात कोणी-
एकेक वीट चढवत तट मजबूत करणारे.
गंज चढल्या दरवाज्याला तेलपाणी करणारे.

पाहून हे दृश्य,
बुरुज माझ्या मनाचे बुलंद उभे राहतात,
दरवाजे निष्ठेचे भक्कम दिसू लागतात.
झेंडा कर्तव्याचा वाऱ्यावर फडकू लागतो,
उभारी येत मनाला, मी पुन्हा स्वप्ने पाहू लागतो.

स्वप्ने भक्कम किल्ल्याची, दुश्मनांना धडा शिकवण्याची.
स्वप्ने रयतेच्या भल्याची, स्वप्ने सुख अन् समृद्धीची.


Wednesday, February 20, 2013

शहाण्यांचा देश


साडेसहा दशकांची बघून ही दुरवस्था, मनी माझ्या संताप साठला,
षंढ थंड आपण, हृदयांत आपल्या का नाही अजून वडवानल पेटला?

निष्क्रीय जनता पाहून सत्तानगरीत हर्ष अपार दाटतो,
एकच नाही, हरेक रंगाचा झेंडा डौलाने फडकू लागतो.
कोणी म्हणे तिरंग्यात चरखा हेच भविष्य देशाचे,
कोणी म्हणे भगवा हेच जीवन या पवित्र भूमीचे,

तिसरे लाल विळे कोयते, तर निळे चक्र एकाचे.


कोठे अतिवृष्टी तर, कोठे दुष्काळी वैराण मुलूख सारा
थेंबासाठी तडफडे जीव कोठे, कोठे रस्त्यांवर वाहे धारा
वाहून जाती कोणी कधी तूफानात,
भटके शहरोशहरी कोणी भीषण दुष्काळात.
निसर्ग वारंवार असा सत्ताधाऱ्यां फळफळला,
दशदिशांनी पैशाचा पाऊस धो धो कोसळला. 

संपवण्या येथील अधर्म, धरतीवर कोणी अजून नाही अवतरला
इथले निष्क्रीय लोक पाहून तो केव्हाच आल्या पावली परत गेला.
बदल हवा तर तो आपणच घडवायचा, हे नाही जोवर समजायचे,
बडबड अन् चर्चा केली कितीही, परिवर्तन नाही तोवर व्हावयाचे.

भ्रष्ट सिस्टीमशी लढणाऱ्याला कोणी म्हणे हा ठार पागल आहे.
भोगणाऱ्याला कोणी म्हणे बिचारा, भ्रष्ट सिस्टीमचा बळी आहे.
पागल व्हावे की बळी जावे, निवड शेवटी तुमचीच असणार.
दुर्दैव हे, आज तरी बळी जायलाच सगळे लोक आहेत तयार.

आनंदात मश्गुल आपण की, आजचा दिवस जगता आला,
कोणी सांगावे, जर उद्या स्वार्थासाठी कोणी आपला बळी दिला.
थोडेफार भाग्य असेल तर होणार बातमी ती एका दिवसाची,
जास्त असेल भाग्य जरा, तर त्यात भर काही हजार मेणबत्त्यांची.
पुढे सगळे शांत होणार,
बळी जायला लोक रांगा तेवढ्या लावणार.

पोरगी सहज उचलून नेली, बंदूक दाखवत तिजोरी लुटून नेली,
पागल तुम्ही कधी होणार?

गांडीखाली बॉम्ब फुटला, विकून देश पुरता बरबाद केला,
पागल तुम्ही कधी होणार?
साडेसहा दशके चालू तमाशा, शहाणे होऊन बघितलात,
मला सांगा आता,
पागल तुम्ही कधी होणार?