Saturday, June 30, 2018

एकमेकांसाठी आणि एकमेकांसोबत


मा‍झ्या मित्रमंडळींत गप्पांमध्ये नुकताच एक विषय चर्चेला आला. नवरा-बायको/ गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हे एकमेकांसोबत जगण्याला प्राधान्य देतात की एकमेकांसाठी? मला आमच्या लग्नाला उभ्या मुला मुलींच्या घेतल्या जाणाऱ्या गट चर्चा आठवल्या. त्यात कधीकधी आम्ही एक अर्धवट वाक्य देतो. “मला लग्न करायचंय, कारण की.....” हे ते वाक्य सहभागी मुला-मुलींनी पूर्ण करायचं असतं. आणि मग याच्या उत्तरांमध्ये अनेक वेगवेगळी उत्तरं येतात. “साथ देणारं कोणी तरी हवं”, “आयुष्यभराची मैत्री मिळावी म्हणून”,शेअरिंगसाठी, हक्काचा माणूस हवा म्हणून” वगैरे वगैरे. “माझ्यासाठी जगणारी व्यक्ती असावी म्हणून” किंवा “मला कोणासाठी तरी जगायचंय म्हणून” असं उत्तर काय आजवर कोणीही दिलं नाही. मग मला प्रश्न पडला, अरेंज्ड मॅरेज असो नाही तर लव्ह मॅरेज , अमुक अमुक व्यक्ती माझ्यासाठी काय करेल आणि मी त्या व्यक्तीसाठी काय करू शकेन या प्राथमिक आधारावर जोडीदार निवडला जातो का?

या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराकडे जाताना आपली कुटुंब व्यवस्था बदलली आहे काय? आणि असल्यास कशी आणि का बदलली आहे या प्रश्नाकडे जाऊया. मार्च मध्येमैफल पुरवणीत लिहिलेल्या लिव्ह इन विषयीच्या लेखात आपण लग्न व्यवस्था निर्माण कशी झाली याबद्दल चर्चा केली होती. लग्न व्यवस्था आणि त्यातून निर्माण होणारी कुटुंब व्यवस्था या तयार झाल्या त्या काळाच्या गरजांमुळे. टोळ्यांनी राहणारा माणूस शेती करत स्थिरावल्या वर; वारसा हक्क, शेती उद्योगासाठी हक्काचं मनुष्यबळ, सुरक्षितता या आवश्यकता निर्माण झाल्या होत्या. लग्न व्यवस्थेने वारसा हक्काचा प्रश्न निकाली लागत होता. कुटुंब नावाची चीज तयार होऊन, कुटुंबातल्या व्यक्तींनी एकमेकांसाठी काही गोष्टी करण्याच्या प्रथा पडत गेल्या असणार ज्याचं प्रतिबिंब आजही जगभरच्या संस्कृतींमध्ये अनेक सणवार यामधून दिसतं. कुटुंब व्यवस्था तयार होत गेली आणि ती अधिकाधिक घट्ट होत गेली ती या परस्परावलंबित्वामुळे. गेल्या तीस एक वर्षात या सगळ्या गोष्टीला चांगलाच धक्का पोचला तोच मुळी हे परस्परावलंबित्व जवळ जवळ संपल्यामुळे!

माणसाला माणसाची गरज वेगवेगळ्या गोष्टींसाठी आजही आहे. पण एकोणिस आणि विसाव्या शतकातल्या यंत्र युगाची आणि त्या पाठोपाठ आलेल्या बाजारपेठ युगाची देणगी अशी की, व्यावहारिक दैनंदिन गोष्टींसाठी असणारी इतर माणसांची गरज तुलनेने कमी झाली आहे. अवलंबून असणं कमी झालं आहे. आणि दुसरं म्हणजे पूर्वी जन्मामुळे तयार झालेल्या नातेवाईक मंडळींवरच अवलंबून राहण्याची गरज आता शहरीकरण, जागतिकीकरण आणि संपर्क क्रांतीच्या पार्श्वभूमीवर उरलेली नाही. याचा अर्थ असा की पारंपारिक कुटुंब व्यवस्था आता गरजेचा पाया नसल्याने जवळ जवळ मोडीत निघाली आहे. आणि हे आपल्याला विभक्त कुटुंब पद्धतीत दिसतंच की. आता सामान्यत:, एकत्र कुटुंबामध्येही नवरा-बायको, त्यांची मुले यांच्यासह केवळ मुलाचे आई-वडील धरले जातात. अशी उदाहरणे फारच कमी आहेत जिथे सगळी भावंडे, त्यांची मुले, नातवंडे असे आगळेच एकत्र एका मोठ्या घरात राहतात. हे घडत गेलं कारण व्यावहारिक पातळीवर एकमेकांसोबत असण्याची गरज कमी होत गेली. व्यक्ती स्वतंत्र होत गेल्या, स्वावलंबी होत गेल्या. आजच्या माझ्या पिढीच्या आधीच्या पिढीनेच हे बदल अनुभवले आहेत. पण नवरा-बायको नात्यांत असणारं परस्परावलंबित्व काही गेलं नव्हतं. पण आत्ताची आमच्या पिढीतल्या व्यक्ती, स्त्री-पुरुष दोन्हीही, या अधिकच स्वतंत्र आणि स्वावलंबी होत गेल्या. आणि म्हणूनच माझ्या मते आमच्या पिढीला लग्न व्यवस्थेची पारंपारिक दृष्ट्‍या वाटणारी गरज आता फारशी उरलेली नाही. 

पारंपारिक लग्न व्यवस्थेत नवरा-बायको यांच्यात परस्परावलंबित्व अपेक्षित असतं. त्यासाठी दोन्ही व्यक्तींसाठी समाजाने/ व्यवस्थेने/ परंपरेने काही एक भूमिका आखून दिलेल्या आहेत. आणि यात एक व्यक्ती आपली भूमिका वठवण्यात कमी पडली तर संसाराचा, सहजीवनाचा गाडा रूतून बसण्याची शक्यता खूपच अधिक असे. या परिस्थितीत गेल्या तीस वर्षात बदल झाला आहे. आणि तो अजून होणार आहेच. लग्नाच्या नात्यांत परंपरेने ठरवून दिलेल्या भूमिकाच वठवण्याची तयारी आता निदान शहरी मध्यमवर्गातल्या मिलेनियल जनरेशन मध्ये नाही. (साधारण ऐंशीचे दशक आणि नव्वद च्या दशकातली सुरुवातीची काही वर्षे या काळात जन्माला आलेल्या मंडळींना इंग्रजीत मिलेनियल जनरेशन असा शब्द आहे.) यातूनच घडतं असं की एका बाजूला पालक आणि एकूण समाज यांचा लग्न करण्यासाठी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष दबाव येत असला तरी लग्न पुढे पुढे ढकललं जातं. शहरी मध्यमवर्गीय मिलेनियल जनरेशन स्वतंत्र स्वावलंबी आयुष्य जगताना अत्यंत खुशीत आणि आनंदात आहे- कम्फर्टेबल आहे. अशावेळी पारंपारिक लग्न व्यवस्थेपासून आणि त्यासह येणार्‍या आखून दिलेल्या भूमिकांपासून ही मंडळी दूर पळणं साहजिक आहे.

बापरे! फारच गंभीर वक्तव्य झालं का हे? म्हणजे आता पुढची पिढी लग्न करणारच नाही की काय, अशी शंका मनात तरळून गेली? शंका रास्त आहे. पण, लग्न व्यवस्थेची गरज संपली असं मला तरी वाटत नाही. याची दोन महत्त्वपूर्ण कारणं आहेत. एक म्हणजे नवीन पिढीला जन्म देणे आणि दुसरं म्हणजे शेअरिंगची, एकत्र अनुभव घेण्याची माणसाची मानसिक-भावनिक इच्छा आणि गरज अजून संपलेली नाही. यातला पहिला मुद्दा अगदी सोपा आहे. नवीन पिढीला वाढवण्यासाठी लग्न आणि लग्नासह येणारं कुटुंब, याच्या इतकी सुरक्षित पर्यायी व्यवस्था आज तरी उपलब्ध नाही. पण दुसर्‍या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मला वाटतं लग्नाच्या बाबतीत, सहजीवनाच्या बाबतीत, असणार्‍या पारंपारिक भूमिका या एकमेकांसाठी काहीतरी करण्याच्या पारंपारिक गरजेतून आलेल्या आहेत. ज्याची आता गरज उरली नसली तरी एकमेकांसोबत काही गोष्टी करायची इच्छा आहे आणि त्यावर अधिक भर देत लग्नाची पारंपारिक व्याख्या थोडीफार बदलली तर सहजीवन तर सोपं होईलच पण लग्न ठरवण्याची प्रक्रिया देखील सोपी होईल. मला लग्न करायचंय कारण की, मला जोडीदार हवाय’, सोबती हवाय’, पार्टनर हवाय या उत्तरांमध्ये ज्या व्यक्ती सोबत नवनवीन अनुभव घेणे, मनातले बोलता येणे, हे शक्य होईल आणि आवडेल अशी व्यक्ती हवी आहे हे प्रतिध्वनित होतं. पण गंमतीचा एक भाग हा की अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत पुढाकार हा पालक वर्गाकडून घेतला जातो. आणि साहजिकच त्यांच्याकडून आपल्या मुला/मुलीसाठी जोडीदार शोधताना एकमेकांसाठी हा मुद्दा प्राधान्याने पुढे येतो. इथे दोन पिढ्यांमध्ये वाद होतात. नव्या पिढीच्या मानसिकतेमधे आणि गरजांमध्ये झालेला फरक समजून घेतला गेला तर हे वाद टाळता येणे शक्य आहे.

अर्थातच, नातं खुलवण्यासाठी, सुदृढ ठेवण्यासाठी, फुलवण्यासाठी दोघांनी एकमेकांसाठी काही गोष्टी करणे आवश्यकच आहे. पण तो रोमँटिक भाग झाला, व्यक्ती व्यक्तीनुसार खूपच बदलणारा! मात्र मला वाटतं, मूलभूत गरजांच्या बाबतीत अत्यंत स्वयंपूर्ण असणार्‍या आमच्या पिढीच्या सहजीवनाच्या बाबतीतल्या प्राथमिक अपेक्षांचा तराजू हलकेच एकमेकांसाठी कडून एकमेकांसोबतकडे झुकलाय, हे नक्की.

(दि. ३० जून २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)

No comments:

Post a Comment