Thursday, June 5, 2014

आशेचा सूर आणि आता आपली जबाबदारी

नरेंद्र मोदी आणि भाजप यांचे त्यांच्या तुफानी विजयाबद्दल अभिनंदन केलेच पाहिजे. कोणी
काही म्हणो, २७२ पेक्षा जास्त जागा एकाच पक्षाने जिंकणे ही गोष्ट सोपी नाही. भाजपने निवडणूक जिंकल्यापासून सर्वत्र एक उत्साहाची लहर तयार झाली आहे. आता काहीतरी बदलेल, देश सुधारेल हा आशावाद निर्माण झाला आहे. निकालानंतरचे दोन तीन दिवस अगदी सामान्य नागरिक हॉटेल मध्ये भेटल्यावर, ऑफिसेस मध्ये भेटणाऱ्याच्या, अनोळखी असला तरी, हातावर पेढा ठेवत होते. आनंद व्यक्त करत होते. असे दृश्य मी बघितलेल्या कोणत्याही निवडणुकीत मला दिसलेले नाही. सामान्य नागरिक मोदींच्या विजयाच्या निमित्ताने तयार झालेल्या आशेच्या जोरावर राजकारणात, राजकीय घडामोडींमध्ये रस घेत आहेत या गोष्टीचे दिलखुलासपणे स्वागतच केले पाहिजे. 
हे सगळे मी म्हणत असताना प्रथमच नमूद करतो की मी आम आदमी पक्षाचा सदस्य आहे आणि संपूर्ण निवडणूकभर येडीयुरप्पा-बाबू बोखारीया यांना संरक्षण देणाऱ्या मोदी यांचे भ्रष्टाचार संपवण्याचे दावे खोटे आहेत असा मी प्रचार केला आहे. माझ्या त्या मतांपासून आजही मी तसूभरसुद्धा ढळलेलो नाही. त्याबाबत माझी स्वतंत्रपणे विचार करून तयार झालेली कारणमीमांसा आहे आणि मोदी यांचा विजय झाल्याने ती बदलण्याची शक्यता नाही. पण तरीही मी या नवनिर्मित आशावादाचे मनापासून स्वागत का करतो आहे?

माझ्या मते अगदी २-३ वर्षांपूर्वीपर्यंत आपला देश हा अभूतपूर्व अशा निराशावादाचे घर बनला होता, ‘इस देश का कुछ नहीं हो सकता’ ही भावना सर्वदूर पसरली होती, भ्रष्टाचार-असुरक्षा-गरिबी याच गोष्टी केवळ आपल्या नशिबात आहेत असं देशबांधवांना मनापासून वाटू लागलं होतं. या भावनेला तडा गेला तो दिल्लीमध्ये अण्णा आणि केजरीवाल यांनी जे जनलोकपाल आंदोलन उभारले त्यावेळी. पण त्यावेळी वेगाने निर्माण झालेल्या आशावादाचे रुपांतर तितक्याच वेगाने निराशेत झाले जेव्हा अण्णा आणि केजरीवाल यांनी स्वतंत्र रस्ते पकडले. केजरीवाल राजकारणात गेल्यावर कित्येकांची राजकारणाविषयीची घृणा उफाळून आली आणि राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन निराशावादीच राहिला. यामध्ये पुन्हा बदल घडून आला जेव्हा दिल्ली मध्ये आम आदमी पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. ४९ दिवसांचे आम आदमी पक्षाचे सरकार लंबकासारखे आशा-निराशेच्या टोकांना जाऊन येत राहिले. आणि ४९ दिवसांनी केजरीवाल यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा घोर निराशा पसरली. प्रचंड निराशावादी वातावरणात आशेचा किरण दिसणे आणि त्या मार्गावर पुन्हा निराशाच पदरी पडणे यामुळे लोक अधिकच निराशेच्या गर्तेत गेले नसल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीत आपल्या परीने केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी-कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आशावाद निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली ही वस्तुस्थिती आहे. पण ते घडले नाही. लोक राजकारणाविषयी निराशच होते. ही परिस्थिती फार धोकादायक. अशावेळी समर्थ आणि उज्वल भारताची स्वप्न साडेचारशे पेक्षा जास्त सभांमधून देशभर मांडणारे नरेंद्र मोदी हे आशेचा नवा किरण झाले नसते तरच नवल. आणि केजरीवालच्या नाही, तरी या आशावादाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला ही गोष्ट मोठीच आश्वस्त करणारी आहे. निवडून आल्यावर संसदेच्या सेन्ट्रल हॉल मध्ये केलेल्या मोदी यांच्या भाषणात भारताच्या नवनिर्माणाचा नारा आहे, देशाच्या अंतिम व्यक्तीला सोबत घेऊन विकासाच्या दिशेने जाण्याचा संकल्प दिसतो आहे, त्याचबरोबर १२५ कोटी नागरिकांना किमान एक पाउल पुढे येण्याचे आवाहनही आहे. अशा शब्दांसोबत ‘संसदेच्या पायऱ्या चढण्यापूर्वी नमस्कार करणे’ यासारख्या प्रतीकात्मक गोष्टींचाही जनतेवर परिणाम होत असतो, आशावाद निर्माण होत असतो हे नाकारण्याचा प्रकार मी करणार नाही.

असो. तर सांगायचा मुद्दा हा की देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान हे आमच्यापेक्षा वेगळ्या पक्षाचे असले तरी आता ते संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. आणि त्यांनी निर्माण केलेल्या आशावादाचे मी व्यक्तीशः स्वागत करतो. सत्तेचे विकेंद्रीकरण, स्थानिक पातळीवर सहभागी लोकशाही, शासनात पारदर्शकता, भ्रष्टाचाऱ्यांना बाहेरचा रस्ता, पर्यावरणपूरक आणि समाजातील अंतिम नागरिकापर्यंत पोहचणारा शाश्वत विकास, सामाजिक सुरक्षा, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि उपासना स्वातंत्र्य या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे जतन या गोष्टी मोदी यांच्या भाजप सरकारने केल्या तर मोदींना विरोध करायचे आम आदमी पक्षालाही काहीच कारण उरणार नाही. पण हे घडेपर्यंत विरोधकच नव्हे तर भाजप समर्थकांनीही अतिशय सजग राहावे अशी माझे आवाहन असेल. किंबहुना केवळ सजग राहणे नव्हे तर या सगळ्या गोष्टी घडून याव्यात यासाठी सरकारवर, सरकारी पक्षावर दबाव तयार करावा लागेल, प्रसंगी लढावेही लागेल.
सत्ताधारी नसणाऱ्या पक्षांसाठी ‘विरोधी पक्ष’ हा शब्द मला खरे तर मुळीच आवडत नाही. यातून एक नकारात्मक भाव जातो. सरकार जे करणार त्याला विरोध तेवढा करायचा असा गैरसमज गेली अनेक वर्ष आपल्या देशात झाला आहे कदाचित. पण आता विरोधी बाकांवर बसणाऱ्या पक्षांनी आत्तापर्यंत घडत आले त्या पद्धतीला फाटा देत ‘विरोधासाठी विरोध न करता, मुद्द्यांच्या आधारे विरोध अथवा सहकार्याची भूमिका’ घेतली पाहिजे. मला अशी खात्री आहे की आम आदमी पक्षाचे ४ लोकसभा सदस्य याबाबत कमी पडणार नाहीत.

“सर्वांसाठी सूचना, सोमवार पासून कामाला लागा, मोदी देश चालवणार आहेत, तुमचे घर नाही!” असा एक विनोदी एसएमएस गेले काही दिवस फिरतो आहे. त्याच्याच पुढे जाऊन मला सांगायला आवडेल की मित्रहो मोदी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. पण आपल्या राज्याची, आपल्या शहराची आणि अगदी आपल्या मोहल्ल्याची जबाबदारी आपल्यालाच उचलायला हवी. खरोखरच जो आशावाद आहे तसेच मोदी यांनी कितीही जरी चांगले काम केले तरी ते एकटे कुठे कुठे पुरे पडणार? याची त्यांनाही जाणीव आहे असे त्यांच्या भाषणातून तरी दिसले. म्हणूनच त्यांनी १२५ कोटी लोकांना एक पाउल पुढे येण्याचे आवाहन केले. २०११ मध्ये जेव्हा जनलोकपालसाठी आंदोलन चालू होते त्यावेळी मी एक लेख लिहिला होता, ज्यात मी म्हणले होते की जनलोकपाल येईल न येईल माहित नाही पण जरी ते आले तरी एक ‘जनलोकपाल नामक सुपरहिरो येऊन आपले सारे प्रश्न सोडवेल’ अशी भावना लोकांमध्ये असेल तर ते घातक आहे.तेच माझे मत आजही आहे. तुम्ही आम्ही स्थानिक पातळीवर राजकीय दृष्ट्या जोवर सजग होत नाही, इथे होणाऱ्या सर्वपक्षीय भ्रष्टाचाराला नेस्तनाबूत करण्यासाठी खंबीरपणे, एकजुटीने कार्यरत होत नाही तोवर स्थानिक पातळीवर भ्रष्टाचार होतच राहणार. ‘वर’ मोदी आले की खालचे देखील सुधारतील हा आशावाद नसून भाबडेपणा आहे. वरती काहीही होवो, इथे सुधारणा होण्यासाठी इथले लोकप्रतिनिधीही प्रामाणिक आणि धडाडीचे हवेत. तुमचा नगरसेवक, तुमचा आमदार हे त्याला नेमून दिलेले काम करत नसेल तर, कोणत्याही पक्षाचा असो, त्याला आपण जाब विचारायला हवा. आणि तरीही कर्तव्य न बजावणाऱ्याला मतदानाचा अधिकार वापरून हाकलून लावले पाहिजे. ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यातही मोदी हे उत्तम आणि योग्य निर्णय केंद्र पातळीवर घेतील असा ज्या पाठीराख्यांचा दृढ विश्वास आहे त्यांनी तर या कामी विशेष लक्ष घालायला हवे. कारण नाहीतर केंद्र पातळीवरील निर्णयांचा फायदा लोकांपर्यंत न पोहचण्याचीच शक्यता अधिक. असे होऊ देणे आणि मोदींना तोंडघशी पाडणे या पाठीराख्यांना शोभेल काय? माझ्या मते, मुळीच नाही! किंबहुना मोदीच नव्हे तर कोणत्याच नेत्याच्या नशिबी पाठीराख्यांच्या कर्तव्यशून्यतेमुळे तोंडघशी पडण्याची वेळ येऊ नये. तेव्हा भाजप-मोदी समर्थक नागरिकांची निवडणुकीत मत देऊन झाल्यावर जबाबदारी संपली नसून उलट वाढली आहे. आपल्या सर्वांवर, हा आत्ताचा आशेचा सूर जाऊन निराशावाद पसरणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. आणि आपण ही जबाबदारी खंबीरपणे पार पाडू अशी मला आशा आहे.