आजकाल उठसूट लोक ‘केजरीवाल आणि कंपनीवर कसे ते प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत
आणि त्यांच्या नुसती आरोपांची राळ उठवण्याच्या प्रकारामुळे काहीही बदल होणार नाही’
असे म्हणत याविषयी बेताल आणि संदर्भहीन बडबड करताना आढळतात. मुळात राजकीय पक्ष
काढण्याची आणि राजकीय पर्याय देण्याची केजरीवाल यांची कल्पना न समजलेले, न पटलेले
किंवा न पचलेले लोक अशी भाषा करत आहेत असे माझे निरीक्षण आहे. किमान माझ्या
संपर्कात आलेले तरी!
जिथे लोकशाही नांदत आहे, तुमच्या माझ्या आयुष्यावर प्रमाणाबाहेर परिणाम करणारे
निर्णय जी व्यवस्था आज घेत आहे त्यात परिवर्तन करायचे तर ते नुसते बसून किंवा
काहीच न करून होणार नाही. किंवा ते व्यवस्थेबाहेरून प्रयत्न करूनही होणार नाही.
परिवर्तन करायचे तर ते व्यवस्थेत शिरूनच करावे लागेल. आणि त्या दृष्टीने केजरीवाल
यांच्या राजकारणात यायच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे.
सध्या केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने राजकीय नेत्यांवर आणि त्यांच्या
गैरप्रकारांवर जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केली आहे याचा प्रधान हेतू लक्षात
घ्यायला हवा. केजरीवाल यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्टपणे सांगितलं की
हे सगळं उघड केल्याने या लोकांवर कारवाई होईल अशी त्यांची मुळीच अपेक्षा नाही.
केजरीवाल यांच्या या ‘हल्लाबोल’चा मुख्य हेतू हा ही राजकीय व्यवस्था किती पोखरलेली
आहे हे परत परत ओरडून सांगणे... माल चांगला असेल तर ओरडावे लागत नाही अशी जुनी
म्हण आपल्याकडे पूर्वी होती. त्यात आता मुक्त अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झाला.
ओरडण्याला आज महत्व आहे. आणि का असू नये? उगीच मार्केटिंगला वाईट ठरवण्यात काय
हशील आहे? माल चांगला असेल तर माल चांगला आहे हे ओरडून सांगावेच लागेल. नाहीतर
सध्याच्या राजकीय व्यवस्थेत हा आवाज कधी बंद पडून जाईल कळणारही नाही.
केजरीवाल यांचा तुमची आमची, सामान्य नागरिकांची माथी भडकवण्याचा आटापिटा चालू
आहे. आजपर्यंत भुक्कड भावनिक मुद्दे उचलत राजकीय पक्षांनी माथी भडकावण्याचेच तर
काम केले आहे की. मग या नवीन पक्षाने तेच काम अधिक तर्कशुद्ध विचार आणि प्रामाणिक
हेतूच्या सहाय्याने करायचा प्रयत्न केला की आमचे भंपक बुद्धिवादी त्यांच्यावर टीका
करणार? हा कसला दुटप्पीपणा? राजकीय पक्षांना, बुद्धिवादी मंडळींना, आणि
नागरिकांनाही एक भीषण स्थैर्य आले आहे. आणि पाणी स्थिर झाले की गढूळ होणार या
न्यायाने आमची मानसिकताच गढूळ होऊन गेली आहे. कोणी काही वेगळे प्रयोग करू लागला की
त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी खाली कसे खेचता येईल यावर बहुतांश वेळ खर्ची घालणार.
त्या प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला हिणवणार, घाबरवून सोडणार. आणि हे केवळ राजकीय
बाबतीतच आहे असे नव्हे. तर अगदी करिअर निवडण्यापासून वेगळे चित्रपट करण्यापर्यंत
आणि वेगळ्या प्रकारचे कपडे घालण्यापासून रूढी परंपरांमध्ये, सवयींमध्ये वेगळेपण
आणण्यापर्यंत, सर्वत्र आम्ही स्थितिप्रिय झालो आहोत. आहेत ते बरं चाललंय! शिवाय
असं म्हणत दुःख उगाळत बसायचं आणि त्या दुःखांनाच चक्क ग्लोरिफाय करायचं! केजरीवाल
आणि कंपनी वर होणारी टीका ही याच स्थितिप्रिय आणि दुःखलोलुप मानसिकतेतून आली आहे.
गडकरी-पवार यांच्यात लागेबांधे आहेत असे केजरीवाल यांनी सांगितल्यावर ‘हे काय
आम्हाला माहितीच आहे की, नवीन काय?’ अशी प्रतिक्रिया काही महाभागांनी दिली. अशा
वेळी त्यांना मला प्रश्न विचारावा वाटतो- तुम्हाला हे माहितीच होतं तर गोट्या खेळत
होतात का इतके दिवस? तुम्ही का पुढे होऊन हे जगाला सांगितलं नाहीत? की तुमच्यात
तेवढी धमक नव्हती? आज आता केजरीवाल नामक एक धडपड्या माहिती अधिकारात काही
डॉक्युमेंटस् मिळवून लोकांसमोर थेट मांडतो आहे आणि एकूण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित
करतो आहे तर त्याला साथ द्यायचं सोडून त्याच्यावर टीका करण्यात आणि एक प्रकारे
दुसरी बाजू नकळतपणे उचलून धरण्यात काय बहादुरी किंवा हुशारी आहे, कळत नाही.
रॉबर्ट वढेरा यांची संपत्ती, गडकरींच्या संस्थेला दिली गेलेली जमीन असे प्रश्न
उपस्थित करून, आपल्यासमोर मांडून केजरीवाल आपल्याला आवाहन करू इच्छित आहेत की आता
तरी वेगळे मार्ग आहेत त्यांच्याकडे बघा आणि परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा. एक
प्रकारे केजरीवाल आपल्याला आव्हानही देत आहेत की नुसते घरात बसून टीका
करण्यापेक्षा मैदानात या आणि या व्यवस्थेशी दोन हात करा. एवढेच नव्हे तर केजरीवाल
आपल्या निष्क्रियतेवर घणाघाती टीका करत आहेत. एका बाजूला केजरीवाल संसदेचा आणि
तिचा अपमान करणाऱ्या संसद सदस्यांचा मर्मभेदक उपहास करत आहेत. तर त्याचवेळी संसदेत
शिरूनच आपल्याला बदल घडवायचा आहे हे ठासून सांगत आहेत. एका बाजूला नकळतच
व्यवस्थेबद्दल अनास्था आणि द्वेष पसरवत आहे पण त्याचवेळी नवीन व्यवस्था निर्मितीची
आशा दाखवत आहेत. आणि आपल्याकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
ज्या मध्यमवर्गीय बुद्धिवाद्यांच्या जोरावर केजरीवाल पुढे जाऊ इच्छितात
त्यांच्या मनातील एक प्रश्न म्हणजे पुढे जाऊन केजरीवाल आणि त्यांचे साथीदार सुद्धा
भ्रष्ट झाले तर काय? केजरीवाल सुद्धा भ्रष्ट होण्या न होण्याची शक्यता अगदी ५०-५० आहे
असे गृहीत धरले तरीही, यासारखा दुसरा भंपक प्रश्न नाही. कारण यातून ‘केजरीवाल
भ्रष्ट झाले तर त्यांनाही उखडून फेकून देऊ’ हा आत्मविश्वास नसल्याचेच तेवढे स्पष्ट
होते आहे. उलट ‘नवीन भ्रष्ट होण्याची ५०% शक्यता असणाऱ्या माणसाला पाठींबा
देण्यापेक्षा जुना १००% भ्रष्ट काय वाईट?’ अशी पराभूत मनोवृत्ती दिसते. आणि ही
मनोवृत्ती पुढे जाऊन आपला अपेक्षाभंग होईल केवळ या विचारातून आलेली आहे. लोकांना (कदाचित
होणाऱ्या) अपेक्षाभंगाचे दुःख एकूण सामाजिक-राजकीय परिस्थिती अधिकाधिक भीषण होऊ
देण्यापेक्षा जास्त वाटते यापेक्षा दुर्दैव काय असावे!
आजच्या परिस्थितीत टोकाला जाऊन माथी भडकवणारे हवे आहेत. टोकाला जाऊन माथी
भडकून घेणारे हवे आहेत. आणि तुटपुंजे चार पाच नव्हेत तर घाऊक प्रमाणात हजारो
लाखोंच्या संख्येने लोकांची माथी सध्याच्या व्यवस्थेवर कृतीशीलपणे भडकायला हवीत.
कधीकधी एका टोकाला जाणे आवश्यक असते. कारण परिस्थिती दुसऱ्या टोकाला गेलेली असते.
ती मूळपदावर, मध्यम मार्गावर आणण्यासाठी हे करावेच लागेल. हे काम मोठे कठीण आणि
कौशल्याचे आहे. कारण यात तर्कशुद्ध आणि अहिंसात्मक मार्गाने या टोकाच्या विचारांची
गुंफण करावी लागेल, मार्केटिंग करावे लागेल. तर्कशुद्ध मार्गाने टोकाची भूमिका
मांडणे या गोष्टी स्वभावतः परस्पर विरुद्ध आहेत हे लक्षात घेतले म्हणजे हे काम
किती कठीण आहे याची कल्पना येते.
केजरीवाल आपला राजकीय पक्ष उभा कसा करतात हे बघण्यास मी उत्सुक आहे. त्यांचा राजकीय
पक्ष आणि कार्यकर्ते हे दिल्ली, मुंबई, बारामती किंवा नागपूर च्या इशाऱ्यावर चालणाऱ्या
इतर पक्षांप्रमाणेच निघू नये अशी इच्छा. हे टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्व
उभे करावे लागेल. लोकांमधून दूरदृष्टी आणि रचनात्मक कार्याची आवड आणि जाण असणाऱ्या
मंडळींनी पुढे येऊन हे आव्हान स्वीकारले पाहिजे. ‘कशी गंमत चालली आहे’ असे
बघण्यापेक्षा जबाबदारीने वागून जबाबदाऱ्या उचलल्या पाहिजेत. नुसत्या टीका अन्
टिप्पण्या करून काय होणार?
एक गोष्ट मात्र आपण आपल्या मनात अक्षरशः कोरून घेतली पाहिजे- लोकशाहीत राजकारणाशिवाय
पर्याय नाही. केवळ केजरीवाल नव्हे तर कोणत्याही पक्षाच्या आणि पार्श्वभूमीच्या राजकारणात
नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्यांना, नवे बदल घडवू पाहणाऱ्यांना आपण ‘सक्रीय’ पाठींबा
दिला पाहिजे. त्यातंच आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं हित आहे. आणि हे आपण
जितकं लवकर आत्मसात करू तितकं चांगलं.