Friday, September 16, 2011

मी लोकपाल


अण्णांचे आंदोलन सुरु झाले १६ ऑगस्टला. त्याला आज एक महिना झाला. जन लोकपाल-लोकपाल- भ्रष्टाचार याविषयी गेल्या महिन्याभरात हजारो काय लाखो पाने लिहिली गेली... २४ तास काही लाख-कोटी मंडळींनी याविषयी बडबड केली. अण्णा हजारेंना एक 'मसीहा' च्या रुपात बघितलं गेलं आणि तिथेच सगळी गडबड झाली. अण्णा हजारे आले म्हणजे भ्रष्टाचार संपला अशा भाबड्या समजुतीत आपली मंडळी मश्गुल होऊन गेली. याउलट असंख्य बुद्धीवादी मंडळी या भाबड्या विश्वासावर टीका करत बसले. पण प्रत्यक्ष भ्रष्टाचार किंवा प्रशासनातील गैरकारभार रोखण्यासाठी प्रत्येकाने काय करायला हवे याचा योग्य आणि व्यापक विचार फारच थोड्या लोकांनी केला. उपोषण योग्य की अयोग्य. हा जनतेचा विजय आहे की नाही असल्या भुक्कड आणि खरेतर वरवरच्या प्रश्नांवर सातत्याने या बुद्धिवादी मंडळींनी कोरडी चर्चा केली. आंधळ्या अण्णा समर्थकांप्रमाणेच हे बुद्धिवादी म्हणवून घेणारे निर्बुद्ध लोकही आज निर्माण झालेल्या सामान्य लोकांच्या निष्क्रिय मानसिकतेला जबाबदार आहेत. 
अण्णांनी तरुणांना आंदोलन करा असे सांगितले. पण आंदोलन म्हणजे काय करा याचा कोणताही ठोस कार्यक्रम देण्यात आला नाही. गांधींच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला असंख्य पैलू होते. काही ठोस कार्यक्रम गांधींनी दिले होते. स्वदेशी, दारूबंदी, साक्षरता, अस्पृश्यता निवारण, स्वावलंबन, परदेशी मालावर बहिष्कार, सरकारी कामकाजावर बहिष्कार, संप, बंद असे असंख्य कार्यक्रम गांधींनी लोकांपुढे ठेवले होते. त्यामुळेच लोक इतक्या प्रचंड संख्येने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहज सामील होऊ शकले. आणि स्वातंत्र्य संग्रामात सातत्य राहिले. दुसरे गांधी म्हणून माध्यमांकडून आणि आंदोलन कार्त्यांकडून गौरवले गेलेल्या अण्णांनी लोकांसमोर कोणताच ठोस कार्यक्रम ठेवला नाही. त्यामुळे ही चळवळ हळू हळू थंडावत चालली आहे. जागरूक होऊनही लोक नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यग्र होऊ लागले आहेत. सिग्नल तोडू लागलेत. कामे करून घेण्यासाठी पैसे चारू लागलेत. परिवर्तन आणायचे तर फक्त हातात मेणबत्ती घेऊन काही होत नाही तर त्याबरोबरच स्वताहून अनेक दिवस-महिने-वर्ष सातत्याने प्रयत्न करावे लागतात याची जाणीव टीम अण्णांनी आंदोलन कर्त्यांना करून द्यायला हवी होती. शिवाय अण्णांनी उपोषण सोडल्यावर जो विजयाचा उन्माद आपण सगळ्यांनीच सगळ्या देशभर पाहिला तो आक्षेपार्हच नव्हे तर भयावह होता. हाती काहीच लागलेले नसताना लोक स्वतःवर खुश होत, अण्णांवर जबाबदारी टाकून मोकळे झाले आणि घरी जाऊन झोपले...!
अण्णांच्या निमित्ताने जी जागृती या देशात, विशेषतः सुशिक्षित शहरी मध्यमवर्गीयांमध्ये झाली आहे त्याला योग्य दिशा देण्याचे मोठे कार्य करायची गरज आहे. दिल्लीत जन लोकपाल आवश्यक आहेच आणि त्यासाठी लोक रस्त्यावर उतरले ही उत्तमच गोष्ट आहे. पण दिल्लीत जन लोकपाल आला तरी गल्लीतला भ्रष्टाचार तुम्हाला आम्हालाच थांबवावा लागेल याची स्पष्ट जाणीव आज लोकांना करून देण्याची गरज आहे. परिवर्तन खालून वरती होते. वरून खाली नाही. त्यामुळे या निमित्ताने जागरूक झालेल्या लोकांनी किमान आपल्या भागाची तरी जबाबदारी घ्यायला हवी. माझ्या भागात मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही- असा निश्चय आपल्यातल्या प्रत्येकाने करायला हवा. "मी लोकपाल" अशी आपली यापुढच्या काळात घोषणा असली पाहिजे. आणि अशा लोकपाल मंडळींचा एका भागातला गट म्हणजे लोकपाल गट....!!! असे लोकपाल गट शेकडोंच्या संख्येने शहरभर सुरु व्हायला हवेत. सरकारी जमा खर्चावर नजर ठेवणे, होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणे, निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला काम करायला लावणे अशा विविध मार्गांनी लोकपाल गट स्थानिक पातळीवरचे प्रशासन सुधारू शकतात. एकदा स्थानिक पातळीवर बदल घडायला सुरुवात झाली की तो बदल हळू हळू वर जायला लागेल. स्थानिक पातळीवरचे खालच्या स्तरातली नोकरशाही आणि राजकारणी मंडळी हाच तर वरच्या भ्रष्टाचाराचा पाया असतो. म्हणूनच पायापासून सुरुवात! 
हजारो मुंग्या प्रचंड ताकदवान अशा हत्तीला जेरीला अनु शकतात ही साधी गोष्ट या लोकपाल गटाच्या कल्पनेमागे आहे...! जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येऊन भ्रष्टाचार मिटवण्याच्या दिशेने कृती करत नाही तोवर असले पन्नास अण्णा सुद्धा भ्रष्टाचार संपवू शकत नाहीत. म्हणूनच लोकपाल गटांची आवश्यकता आहे. मी लोकपाल बनून माझ्या भागात एकही गैरप्रकार होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. तरच लोकशाही मजबूत आणि प्रगल्भ होईल. 
Updates (Date: 18th Sept 2011): कालच संभाजी बाग इथे लोकपाल गट सुरु करण्याविषयी प्राथमिक बैठक झाली. शहराच्या विविध भागातून आलेले सुमारे १०० लोक या बैठकीला हजार होते. अगदी खराडी पासून कोथरूड पर्यंत आणि कात्रज पासून पिंपरी चिंचवड पर्यंत च्या भागातून लोक आले होते. घोले रोड, कोथरूड, वारजे कर्वेनगर आणि सहकारनगर या पुणे महापालिकेच्या चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक अशा पाच लोकपाल गटांची सुरुवात काळ करण्यात आली आहे. अशाच प्रकारे इतर क्षेत्रीय कार्यालये अगदी प्रत्येक वॉर्ड मध्ये लोकपाल गट स्थापन करण्यात यायला हवेत. फेब्रुवारी २०१२ पासून पुण्यात १५२ आणि पिंपरी चिंचवड मध्ये १२४ नगरसेवक असणार आहेत. तेवढे लोकपाल गट खरेतर असायला हवेत..!! अशा स्थानिक पातळीवर लोकपाल गट कार्यरत झाले आणि त्यांचे मजबूत जाळे तयार झाले तर पुणे पिंपरी चिंचवड परिसरात भ्रष्टाचार तर कमी होईलच पण खरीखुरी प्रगल्भ लोकशाही नक्कीच येऊ शकेल...!
विशेष नोंद घ्यावी:- ज्यांना खरोखरच भ्रष्टाचार संपावा असे वाटते त्यांनीच सहभागी व्हावे. हा "कार्यक्रम" नाही. मेणबत्त्या वगैरे पेटवून घरी जाण्याचा सोपा मार्ग इथे नाही. ही एक गंभीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार संपवण्यासाठी कृती कशी करावी याविषयी चर्चा केली जाईल आणि त्या दिशेने 'कृती' करण्यासाठी लोकपाल गट तयार असतील