Monday, April 23, 2012

क्रांतीचे दूत कोणास म्हणावे?

क्रांतीचे दूत ?!

मूर्ख आहेत ते जे काम करतात, परिस्थिती सुधारण्यासाठी,
शत्रू आहेत क्रांतीचे जे लढतात, अन्याय थांबवण्यासाठी.
कुठे कुठे चुकून परिवर्तन घडते आहे,
यानेच खरी क्रांती दूर जाते आहे.

समाज आपला निवांत आहे, आपल्याच आनंदात मश्गुल आहे.
चोऱ्या दरोडे बलात्कार झाले, कोणी कोणालाही ठार मारे,
मारू दे नां, आपण बरे अन आपले काम बरे..!
असे म्हणणारेच खरे क्रांतीचे दूत आहेत,
बाकी 'बदल घडवतो' म्हणणारे झूठ आहेत.

क्रांतीसाठी वातावरण कसे पोषक हवे,
त्यासाठी समाजात पुरेसे शोषक हवे.
म्हणून मतदान न करून शोषक निवडून द्यायलाच हवेत,
कसलीही कसर नको
म्हणून भंपक विरोधकही आपण निवडायलाच हवेत.

भ्रष्टाचार आम्हीच करतो कारण,
क्रांती जवळ यायला हवी आहे.
थंडपणे बसून राहतो कारण,
क्रांती जवळ यायला हवी आहे.

दूत होण्या क्रांतीचे, किती कष्ट करावे लागतात.
समोर कितीही काही घडले, मूग गिळावे लागतात.
परिस्थिती बिघडू देणे हेच आमचे ध्येय आहे
कारण आमचा विश्वास- यानेच क्रांती येणार आहे.

पण कोणालाच किंमत नाही, निष्क्रिय लोकांच्या योगदानाची.
सामाजिक कार्यकर्त्यांना तर कळतंच नाही, सतत बोंब आमच्या नावाची.
सामाजिक कार्यकर्ते म्हणे, अक्कल यांची दोन अणे.
काम करून कधी बदल होत नसतो,
निष्क्रियता हाच मंत्र- यानेच बदल घडत असतो!  

---------

या दूतांना वाटतं,
क्रांती म्हणजे नवीन पहाट असेल, क्रांती म्हणजे नवनिर्मिती असेल.
त्यांना कोणीतरी सांगायला हवे,
क्रांती म्हणजे अंधार असेल. क्रांती म्हणजे विध्वंस असेल.
सुक्याबरोबर ओलेही जळणार...
आणि ओले जळल्यावर धूर तेवढा होणार!

पैशासाठी अन्नासाठी पोटासाठी
होतील भीषण मारामाऱ्या
पाण्यासाठी, हवेसाठी.. रक्तासाठीही
होतील भीषण मारामाऱ्या
क्रांती म्हणजे काय असेल? यापेक्षा वेगळे काही नसेल.

क्रांतीचे हे दूत तेव्हा कपाळाला हात लावून बसतील.
कपाळ तरी शिल्लक असेल का??
की सगळ्यात आधी यांची डोकी उडवलेली असतील?

खरे सांगू?
क्रांतीसाठी वेळ यावी लागत नाही.
मुहूर्त पाहून सुरुवात करणारा क्रांती घडवत नाही.
परिस्थिती बिघडण्याआधीच ती सावरता येते.
त्या प्रयत्नांनाही क्रांतीच  म्हणले जाते.

निष्क्रिय राहून विध्वंस होण्यास खत पाणी द्यायचे,
की कृतीशील होऊन क्रांतीचे खरे दूत व्हायचे?
तुम्हीच आहे ठरवायचे,
क्रांतीचे दूत कोणास म्हणावयाचे...!


- तन्मय कानिटकर 
२३ एप्रिल २०१२ 

Tuesday, April 10, 2012

मुक्ती



किती वर्ष अडकून राहणार
बंधनात या?

उखडा व्यवस्था बुरसटलेल्या
मुक्त करा जिवांना घुसमटलेल्या.

खोटे वागणे, खोटे बोलणे, खोटे ऐकणे
सारे काही खोटे,
तरीही त्यासच 'सत्य' म्हणणारे
नर्मदेचे गोटे.

संस्कृती वगैरे शब्दांनाही
अडकवले संकुचित अर्थात,
मनात एक, तोंडात एक, वागण्यात तिसरेच,
अडकलो दांभिकतेच्या चक्रात.

म्हातारा बापू सत्याग्रह
म्हणत गेला,
आम्हा अजून सत्य उमजेना,
अन कसला आग्रह झेपेना!

आम्ही खरे बोलायला घाबरतो,
खोट्या नैतिकतेच्या कल्पनांमध्ये अडकतो.
हे पाप हे पुण्य असल्या कल्पनांनी
पुरता बट्ट्याबोळ केला.
पण माणसाचेच मन- रोखणार कसे?
यानेच सगळा घोळ केला.

सगळेजण नैतिकतेच्या फूटपट्टीवर
मोजणार, याची आम्हाला भीती...
गुपचूप, चोरून काहीपण करा.
नाही कसली क्षिती.
"शी! काय अश्लील हे वागणे, काय अश्लील हे बोलणे"
आमचा विशेष गुणधर्म-
जे मनापासून आवडते, त्याला शिव्या घालणे!

मला हे आवडते म्हणले,
तर संस्कृतीचे कसे होणार?!
मला हे आवडते म्हणले
तर मी नीतिवान कसा होणार?!

कोणी नैतिकतेचे गुलाम, कोणी इतिहासाचे गुलाम.
नसानसात आमच्या गुलामगिरी भरलेली,
आहे परिस्थिती स्वीकारलेली.

जसा खरा नाही, तसाच मी आहे
दाखवण्यात आयुष्य आपले व्यर्थ,
वेगवेगळे मुखवटे चढवत
जगल्या आयुष्याला कसला आलाय अर्थ?

आमची परंपरा भव्य आहे
आमचा इतिहास दिव्य आहे.
परंपरेचा आम्हाला (पोकळ) अभिमान,
इतिहास ऐकून ताठ मान!
वास्तवाचे न्यून झाकण्यासाठी
किती भोंगळ झालो आम्ही.
भविष्याची जबाबदारी झिडकारत
किती ओंगळ झालो आम्ही.

इतिहास-परंपरा- व्यवस्था-रूढी
किती वर्ष अडकून राहणार
बंधनात या?

बंधनात जखडून ठेवले आम्हाला
वर्षानुवर्ष,
हीच खरी 'मुक्ती', पटवले आम्हाला
वर्षानुवर्ष.
बंधनांची जाणीव नसे आम्हां,
तर मुक्त काय होणार?
नवनिर्मितीच्या बाता कितीही जरी,
आमच्या हातून काय घडणार?

देणे मुक्ती,
कोणाच्या हातात आहे?
देण्यापेक्षा
ही घेण्याची गोष्ट आहे.

तेव्हाच घडेल काही, जेव्हा भिरकावून देऊ
गाठोडी दांभिकतेची.
तेव्हाच घडेल काही, जेव्हा गाडून टाकू
भीती सत्याची.

अस्वस्थ होऊन आतून आतून जळतो आहे.
उर्जा मिळत नाहीये पण धूर मात्र होतो आहे...

कोठडीत या धुराने घुसमटायला होतंय...
माझ्यासारखे अनेक आहेत,
मस्तक फिरून जाणारे, अस्वस्थ होऊन जळणारे...

उखडा व्यवस्था बुरसटलेल्या
मुक्त करा जिवांना घुसमटलेल्या...

किती वर्ष अडकून राहणार
बंधनात या?
नवे विचार कुणी मांडेल का
अंधारात या?

- तन्मय कानिटकर



Thursday, April 5, 2012

८५ ते ९५...कोणी बंडखोर मिळतील का??

 स्वतःहून विचार करून, स्वतःच्या मर्जीने स्वतःने निर्णय घेणे म्हणजे स्वयंनिर्णय असे म्हणता येऊ शकते.
मला माझं आयुष्य कसं हवं आहे, माझ्या आजूबाजूचा परिसर कसा असायला हवा आहे, माझं सरकार कसं हवं आहे हे मीच ठरवायला हवे नाही का? स्वयंनिर्णयाचा अधिकार नसेल तर लोकशाहीला आणि त्या सगळ्या नाटकाला काय अर्थ उरला? गेली कित्येक वर्ष आपला समाज स्वयंनिर्णय म्हणजे काय हे पुरता विसरलाच आहे की काय असा मला अनेकदा प्रश्न पडतो. याचं कारण म्हणजे आपण आपल्या आधीच्या पिढीने काय ठरवलं तेच पुढे ठरवत असतो. आपली नवीन पिढी स्वतःहून काही मूलभूत स्वरूपाचे निर्णय घेते की नाही? जीन्स घालणे हा मूलभूत स्वरूपाचा निर्णय असू शकत नाही. हा झाला वरवर केलेला निर्णय. हा आपल्या आधीच्या पिढ्यांनीही केलाच. अमिताभ बच्चन जोमात असताना आपल्या आधीच्या पिढीतल्या कित्येकांच्या हेअरस्टाइल बच्चन सारख्या होत्या. हा सगळा झाला वरवरचा बदल. खाण्यापिण्याच्या सवयी किंवा कपडे यातले बदल हे अपरिहार्यच आहेत. पण मी म्हणतोय ते मूलभूत वैचारिक बदल याविषयी.
मला वाटतं गांधींच्या किंवा नेहरूंच्या पिढीने त्याकाळी काहीतरी स्वतःहून निर्णय घेतला होता. आणि त्या पिढीने ठरवलं की आमच्या आधीच्या पिढीने ज्या गोष्टी अंगीकारल्या त्या आम्ही नाही स्वीकारणार. आम्हाला अस्पृश्यता नको आहे, आम्हाला इंग्रज नको आहेत, आम्हाला जमीनदारी आणि सरंजामशाही नको आहे, आमचा रोजगार बुडवणारे परकीय कपडे आम्हाला नको आहेत, आम्ही स्वदेशीच वापरणार या आणि अशा असंख्य गोष्टी त्याकाळच्या पिढीने ठरवल्या. ही भारतातली कथा.
सत्तरच्या दशकात अमेरिका आणि युरोपात प्रचंड लाट आली आणि त्याकाळच्या पिढीने ठरवले की आम्हाला वंशावरून वाद नको आहेत. त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला अधिकाधिक स्वातंत्र्य हवे आहे. आम्हाला युद्ध नको आहेत. त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला खोटी औपचारिकता, दांभिक नैतिकता नको आहे. नियमांत बांधलेली कला आम्हाला नको आहे. फ्रान्स-अमेरिका या देशांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर आले. त्यांनी नवीन पॉप संगीत तयार केलं, त्यांनी नवीन कलांना जन्म दिला. त्यांनी स्वतःचं भवितव्य ठरवलं, त्यांनी ठरवलं की माझ्यासाठी चांगलं काय आहे आणि काय नाही. त्यांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी उत्तम होत्या असे माझे मत मुळीच नाही. पण त्यांनी स्वयंनिर्णय अधिकार वापरला, माझ्या दृष्टीने त्याला जास्त महत्व आहे.

आपल्या आधीच्या पिढीने ठरवलेल्या बऱ्या वाईट गोष्टींना विरोध करायचं, आणि त्यात बदल करायचं थोडक्यात त्याविरोधात बंडखोरी करण्याचं धाडस आपली पिढी दाखवणार का हा मूलभूत प्रश्न आहे. आपल्या आधीच्या पिढीने जे ठरवले असेल ते तसेच्या तसे कोणताही साधक बाधक विचार न करता स्वीकारणे यासारखा दुसरा भंपकपणा नाही. आपल्या नव्वदीतल्या किंवा त्या आधीच्या सिनेमांमधेही "खानदानी दुष्मनी" वगैरे बाष्कळ कल्पनांचा सुकाळ होता. पुढे सिनेमे बदलले तरी विचारसरणी बदलली नाही.
आपल्या आधीच्या पिढीने एखादी गोष्ट चांगली असली तरी ती बाजूला का ठेवावी (Unloading) हे सांगतो. कारण तसे केले नाही तर आपल्याला इतर काही चांगलं पर्याय असू शकतो हेच मुळी विसरायला होतं. अगदी सोप्यात सोपं उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला सांगितलं की आंबा हे फार उत्तम फळ असतं आणि ते खायचं असतं..आणि आपण हे मानलं, यावरच विश्वास ठेवला तर आपण फक्त आंबाच खात राहतो. ज्या दिवशी आपण आज आंबा नको आज कलिंगड खाऊन बघूया असं म्हणत नाही तोवर आपल्याला आंबा आणि कलिंगड हे दोन्ही उत्तम असू शकतं आणि त्याचे स्वतःचे काही फायदे तोटे आहेत हे कळूच शकत नाही. हे अगदी सोपं उदाहरण झालं. जेव्हा असाच विचार आपण विचारधारा-रूढी-परंपरा आणि समजुती यांना लागू करतो तेव्हा त्याचं महत्व लक्षात येतं.
आपल्याला आपल्या आधीच्या पिढीने एक सामाजिक-राजकीय व्यवस्था दिली आहे. आपल्यासमोर ठेवली आहे. ही व्यवस्था अशीच असावी की नसावी, की यात पूर्णपणे बदल करावेत, की यात थोडेफारच बदल करावेत, की व्यवस्थाच असू नये... काहीही असेल, पण याबाबत आपण मूलभूत विचार करू शकतो का आणि स्वतःसाठी काही निर्णय घेऊ शकतो का? जी मंडळी १९८५ ते १९९५ च्या दरम्यान जन्माला आली आहेत ते साधारण १७ ते २७ वर्षे वयाचे आहेत. म्हणजेच यांच्यापुढे अजून किमान ५० ते ६० वर्षांचे आयुष्य पडले आहे. यातले बहुसंख्य सज्ञान आहेत. त्यामुळे याच पिढीने ठरवायचे आहे की त्यांची ही पुढची ५०-६० वर्षे त्यांना कशी हवी आहेत? मी याच पिढीचा आहे. आणि म्हणूनच माझ्याबरोबरच्या सगळ्यांना मला हा प्रश्न विचारावा वाटतो की नेमका या पुढच्या ५०-६० वर्षात आपल्याला काय हवं आहे?? हा विचार केल्याशिवाय केलेली आपली प्रत्येक कृती, आपले प्रत्येक पाउल हे अंधाराकडे नेणारे असेल. केवळ माझ्या आधीच्या पिढीने सांगितले म्हणून जर मी काही भुक्कड अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत असीन तर मी पुढे जात नसून मी मागे जात आहे असे मानायला हवे. एक पिढी म्हणून आपल्यावर जबाबदारी असते. माणसाची संस्कृती प्रवाही ठेवण्याची..! एखादा प्रवाह जितका वाहत असतो तितका तो निर्मळ राहतो हा निसर्गाचा नियम आहे. पण आपण आपल्या पिढीचे म्हणून काही मूलभूत निर्णय घेणार नसू तर आपली माणसाची संस्कृती प्रवाही राहणार नाही. ती स्थिर बनून जाईल. डबके बनून जाईल. आणि एकदा का डबकं झालं की पाणी दूषित व्हायला कितीसा वेळ लागतोय..!

आज आपल्या पिढीला काही निर्णय घ्यायचे आहेत. आणि मी नुसती चर्चा नाही म्हणत. चर्चा हा निर्णय प्रक्रियेतला एक भाग झाला. मी म्हणतोय की 'निर्णय' घ्यायचेत- आपल्याला निर्णय घ्यायचेत की जी जातीव्यवस्था आपल्या समाजात आहे ती उखडून फेकून द्यायचीये की आपणही ती घेऊनच जगायचं ठरवणार आहोत, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की ज्या पद्धतीने आपल्या आधीच्या पिढीने पर्यावरणाचा ऱ्हास केला तेच आपल्यालाही करायचं आहे की नाही, आपल्याला हे ठरवायचं आहे की स्त्री पुरुष समानता असे आपल्या आधीच्या पिढ्यांनी म्हणले असले तरी आपण ते मनापासून मानणार आणि त्यानुसार वागणार आहोत की नाही, आपल्या आधीच्या पिढ्यांनी स्त्री पुरुष संबंधांबाबत काहीएक सामाजिक नियम करून ठेवले आहेत त्याला आपण सुरुंग लावणार की आपण त्याच वाटेने जाणार, आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल की ज्या पद्धतीने आजपर्यंत आपल्या समाजात राजकारण घडत आले आहे त्यात आपल्याला बदल हवा आहे की नकोय, आपल्याला हा निर्णय घ्यायचा आहे की माझी पुढची आयुष्यातली ६० वर्ष सातत्याने कशाला तरी घाबरत जगायची आहेत की बिनधास्त होऊन जगायची आहेत, आणि यासगळ्याच्या आधी आपल्या पिढीला हे ठरवावे लागेल की, आपली पिढी प्रवाही होणार आहे की एक डबकं होण्यातच समाधान वाटणार आहे आपल्याला...?!

व्यक्तीशः मला विचाराल तर आपण बंडखोर व्हायलाच हवे. सर्व, सर्वच्या सर्व विचार भिरकावून देऊन आपण नवे विचार आणायला हवेत. आपल्या पिढीमध्ये असलेली सर्व क्षमता आपण वापरली तर मागच्या पिढीच्या असंख्य टाकाऊ गोष्टींना एका झपाट्यातच भंगारात काढू शकू. पण हां, नवनिर्माणाची तेवढी तीव्र इच्छा असली पाहिजे. तरच हे होऊ शकतं. पण आपण आपली क्षमता समाजाला डबकं करण्यासाठीच वापरली तर मात्र आपण पुढच्या पिढ्यांसाठी वाट अधिकाधिक कठीण करतो आहोत एवढं लक्षात घ्यावं. आणि जितकं हे कठीण आणि वाईट होत जाईल तितकी होणारी बंडखोरी अधिकाधिक हिंसक आणि भयानक स्वरुपाची असेल.
फ्रेंच राज्यक्रांती..वर्षानुवर्षाची गुलामगिरी सरंजामशाही, पिळवणूक आणि त्यातून आली ती भयानक रक्तपात करणारी क्रांती... हीच कथा रशियाची...आणि चीनची सुद्धा... पुढचा क्रमांक भारताचाही असू शकतो!
आपल्या पिढीने प्रस्थापित गोष्टींविरोधात बंडखोरी न करणे याचाच अर्थ पुढच्या पिढ्यांसाठी टाईमबॉम्ब लावण्यासारखे आहे. आज ८५ ते ९५ या पिढीच्या हातात भविष्य घडवण्याच्या किल्ल्या आहेत. उद्या याच किल्ल्या ९५ ते २००५ यादरम्यान जन्माला आलेल्या पिढीच्या हातात असतील. आपण आपली जबाबदारी आपल्या पुढच्या पिढीवर टाकून चालत नाही. किंबहुना तसं करताच येत नाही. त्यामुळे आपण आज जे काही योग्य अयोग्य ठरवू त्याचा परिणाम पुढच्या पिढ्यांवर होणार आहेच. असं असेल तर योग्य गोष्टी ठरवण्याच्या मागे आपण का लागू नये? जबाबदारी टाळण्यापेक्षा सगळी सूत्रे हातात घेऊन आपणच ही जबाबदारी का पार पाडू नये?! 
Che Guevara
अर्नेस्टो चे गव्हेरा हा बंडखोरीचं एक प्रतिक मानला जातो. त्याच्या फोटोचे टी-शर्ट घालण्यातच आपण समाधान मानावे की खरोखरच नवे विचार घेऊन बंडखोरी करावी... निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.
८५ ते ९५ मध्ये जन्माला आलेल्या आपल्या सर्वांना ठरवायचे आहे की, आपण बंडखोर होणार की डबकं बनणार... बंडखोरीची मूठ उगारणार की मूठभर मूग गिळून गप्पा बसणार?? हा कोणा एकट्या दुकट्याने घ्यायचा निर्णय नाही... हा आपल्या पिढीने घ्यायचा आहे... पण हां, सुरुवात मात्र एकेकट्यापासूनच, स्वतःपासूनच होईल...