Tuesday, January 21, 2014

भली मोठ्ठी चावडी

गेल्या एक दोन वर्षातल्या बातम्या आणि घडणाऱ्या घडामोडी बघता भारतातल्या एकूणच
राजकारण आणि राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन यात मोठा बदल घडून येणार आहे याबद्दल शंका नको. सोशल मिडिया आणि राजकारण म्हणल्यावर माझ्या डोळ्यासमोर तीन गोष्टी येतात- एक म्हणजे नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया आणि इंटरनेटचा लोकांसमोर येण्यासाठी सातत्याने केलेला अप्रतिम वापर, दुसरे म्हणजे राहुल गांधी यांची प्रतिमा उजळण्यासाठी कॉंग्रेसने शेकडो कोटी रुपये सोशल मिडियावर खर्च करण्याचा घेतलेला निर्णय आणि तिसरे उदाहरण म्हणजे सोशल मिडियाच्या माध्यमातून आधी आंदोलनाचा पाया विस्तारणारा आणि मग त्यातून राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न करणारा आम आदमी पक्ष. राजकीय पक्षांना आणि राजकारणी मंडळींना सोशल मिडियावर यावे वाटले, इतकेच नव्हे तर याचा अधिकाधिक वापर करावा असे वाटले यातूनच सोशल मिडियाची ताकद अधोरेखित होते.

मागे एकदा राजदीप सरदेसाई आपल्या एका भाषणात म्हणाला होता की आजकालच्या दुनियेत कोणतीही गोष्ट लपून राहणं अवघड आहे. सगळा खुला मामला झालाय. खेडेगावात काय काय चालू आहे, नवीन काय घडते आहे, पिक-पाणी कसे आहे, कोणाचे कोणाशी पटत नाही, कोणाचे कुठे काय लफडे चालू आहे वगैरे असंख्य गोष्टींची माहिती गावाच्या मध्यभागी असणाऱ्या एखाद्या विशाल वृक्षाच्या पारावर किंवा चावडीवर मिळावी तसे इंटरनेटचे सोशल मिडियामुळे झाले आहे. इंटरनेटच्या विशाल आभासी दुनियेत आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईलवर सुद्धा सोशल मिडीयाचे दार खुले झाल्यावर ही चावडी अतिप्रचंड मोठी झाली आहे. आणि गावच्या चावडीचे गुण-दोष तर या नव्या चावडीवर आहेतच पण काही नवीन गुण-दोष सुद्धा आहेत.

सोशल मिडियाचा उदय हा लोकशाहीच्या दृष्टीने मोठी आश्वासक गोष्ट आहे असं माझं मत आहे. सोशल मिडियामुळे काय झालं, तर प्रत्येक मनुष्याला व्यक्त होण्याची संधी मिळू लागली. व्यक्त होण्यासाठी त्याला मूठभर व्यक्तींच्या हातात असणाऱ्या प्रसार माध्यमांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. हरेक व्यक्ती महत्वाची हा विचार तर लोकशाहीचा पाया आहे. आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. व्होल्तेअर म्हणायचा, “माझं तुमचं जमत नसेल कदाचित, पण तुमचं जे काय असेल ते मत तुम्हाला मांडू दिलं जावं यासाठी मी प्राणपणाने लढेन..” सोशल मिडियाच्या मंचावर प्रत्येक जण समान झाला. खुलेपणाने मत मांडू लागला. कारण सोशल मिडियाने प्रत्येकाला व्यक्त होण्याची ताकद दिली. आणि ही लोकशाही ताकद सोशल मिडियाकडे कोणालाच दुर्लक्ष करू देत नाही.
सोशल मिडिया आणि राजकारण याविषयी बोलताना मला महत्वाची गोष्ट अधोरेखित करावी वाटत आहे ती म्हणजे केवळ मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गच सोशल मिडियावर आहे असं नव्हे, तर निम्न मध्यमवर्ग, जो राजकारणाविषयी सजग आहे, आता हातातल्या मोबाईलवरून सोशल मिडियाशी जोडला गेला आहे. साहजिकच पारंपारिक एक गठ्ठा मतदान वगैरे जुन्या संकल्पनांना सोशल मीडियाशी जोडला गेलेला तरुण तुर्क धक्का देऊ शकतो यात काही शंकाच नाही.
पण या धक्का देण्यालाही मर्यादा आहेत. आकडेवारीवरून नजर टाकल्यासच याबाबत स्पष्टता येऊ शकेल. भारतात १२० कोटींपैकी ३० कोटींच्या आसपास लोकसंख्या शहरी भागात राहते, ज्यांचा इंटरनेटसारख्या आधुनिक गोष्टींशी संबंध येतो. देशात एकूण सव्वा आठ कोटींच्या आसपास फेसबुक वापरणारे लोक आहेत. एकूण देशाच्या पातळीवर याचा विचार करता हा आकडा नगण्य आहे. पण लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की हा आकडा वेगाने वाढतो आहे. शिवाय राजकारणाकडे बघण्याचा बदललेला आपला दृष्टीकोन, नागरिक सोशल मिडियावर मांडणार. वाद घालणार, भांडणार आणि कळत नकळतपणे मतदानावर सुद्धा परिणाम करणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक नवनवीन प्रश्न उपस्थित करणार. लोकांचे थेट प्रश्न जसे सत्ताधारी कॉंग्रेससाठी असतील, तसेच ते भाजपसाठी सुद्धा असतील. आणि नवीन आम आदमी पक्षालाही तितक्याच धारदार प्रश्नांचा सामना करावा लागणार. लोक कॉंग्रेसला धारेवर धरणारच की भ्रष्टाचार या मुद्द्यावर केवळ बडबडच होणार आहे की तुम्ही कधी काही ठोस कार्यही करणार आहात? तसेच लोक जाहीरपणे प्रश्न विचारणार आहेत भाजपला की, भ्रष्टाचारी आहे म्हणून कॉंग्रेस नको म्हणता तर येडीयुरप्पा हे परत भाजप मध्ये आलेच कसे? नव्याने उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाला लोक सांगणार आहेतच की भ्रष्टाचार हा मुद्दा सोडून तुमच्याकडे इतर विषयांवरही काही ठोस भूमिका नसेल तर चालते व्हा. प्रश्न विचारण्याची, मते मांडण्याची शक्ती सोशल मीडियामुळे लोकांना मिळते आहे. प्रत्यक्ष सामान्य लोक सोशल मीडियावर प्रश्न मांडत आहेत याकडे मुख्य प्रसार माध्यमांचे लक्ष असल्याने महत्वाचे प्रश्न मोठ्या स्तरावर सुद्धा उपस्थित केले जात आहेत. आणि साहजिकच या प्रचंड घुसळणीतून राजकीय चर्चांना, विचारांना आणि प्रक्रियांना दिशा मिळते आहे.

अर्थातच “with great power comes great responsibility” हे लक्षात ठेऊन, सोशल मिडीयाच्या काळ्या बाजूपासून सावध राहिलं पाहिजे. पटकन करोडो लोकांपर्यंत पोचायची क्षमता, तुफान परिणामकारकता या सोशल नेटवर्किंग वेबसाईटस फायदा लक्षात घेऊन खोट्यानाट्या गोष्टी पसरवल्या जातात. बिनबुडाच्या आणि काल्पनिक कथा रंगवून रंगवून मांडल्या जातात. यामध्ये नरेंद्र मोदी, राहुल गांधी, केजरीवाल या वर्तमानातल्या व्यक्ती सुटत नाहीतच, पण गांधी, नेहरू, सावरकर, हेडगेवार, शिवाजी महाराज या ऐतिहासिक व्यक्तीही सुटत नाहीत. यांच्याविषयी नाही नाही ते लिहिले जाते, पसरवले जाते. तेव्हा सोशल मिडियाचा वापर करताना लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे आपले ताळतंत्र न सोडणे, या मंडळींच्या वाट्टेल त्या गोबेल्स स्टाईल केल्या जाणाऱ्या प्रचाराच्या जाळ्यात न अडकणे. एकदा का हे पथ्य पाळले की सोशल मीडियावर मुक्त संचार करण्यास हरकत नाही.
कोणी काहीही म्हणो, सोशल मिडिया इथे राहणार आहे. मध्यमवर्गासह इतरही भारतीय समाज यात गुंतत जाणार आहे. आणि २०१४ मध्ये या भल्या मोठ्ठ्या चावडीवर होणाऱ्या गप्पांचा गावच्या राजकारणावर काही ना काही परिणाम होणारंच!

(दि २६ जानेवारी २०१४ च्या साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध- http://magazine.evivek.com/?p=4781)

Monday, January 6, 2014

आता सफाई सुरु

राजकारणात गेले पाहिजे, राजकारणाविषयी सजग झाले पाहिजे, राजकारण हा व्यापक परिवर्तनाच्या दृष्टीने टाळता येऊ शकत नाही असा मार्ग आहे, ही माझी मते यापूर्वीही मी माझ्या लेखनातून सातत्याने मांडली आहेतच. आणि त्याच माझ्या मतांना अनुसरून नुकतेच मी आम आदमी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.

या पक्षात जाण्याचा जेव्हा मी विचार करत होतो, अनेकांशी बोलत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की, बहुसंख्य लोक मला माझ्या विचारांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील. राजकारण हे कसं वाईट आहे आणि आपल्यासारखे लोक तिथे टिकू शकत नाहीत, हे सांगतील. पण यातलं काहीच घडलं नाही. उलट बहुसंख्य लोकांनी मला पाठींबाच दिला. काहींनी अगदी रास्त शंका उपस्थित केल्या आणि त्यांचे निराकरण झाल्यावर मात्र त्यांनी स्वच्छ मनाने शुभेच्छा दिल्या. मला वाटतं राजकारणात जाणाऱ्या व्यक्तीला रोखण्यापेक्षा, टोकण्यापेक्षा तिला मदत करण्याचा, पाठींबा देण्याचा विचार आजचे मध्यमवर्गीय करू लागले असतील तर तो ‘आम आदमी पक्षाचा’ पहिल्याच लढाईत मोठा विजय आहे. आणि हळूहळू इथेच या पक्षात जाण्याच्या दृष्टीने माझा कल झुकू लागला. काही महत्वपूर्ण शंका लोकांनी उपस्थित केल्या ज्याचे निराकरण या लेखाद्वारे मी करू इच्छितो.

आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या ५ प्रमुख राजकीय पक्षांपैकी एकामध्येही पारंपारिक राजकारण मोडीत काढत काहीतरी वेगळे करण्याची धमक नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. त्या त्या पक्षाच्या वरच्या फळीतल्या नेत्यांना जरी कितीही वाटले तरी नगरसेवक आणि वॉर्ड पातळीवर जहांगीरदार बनलेल्या नेत्यांमध्ये बदल होत नाही तोवर फार काही घडणार नाही. कारण हे जहांगीरदारच वरच्या पातळीवरच्या लोकांची सुभेदारी शाबूत ठेवत असतात. युती आणि आघाडीवाल्या चार पक्षांबद्दल बोलणेच नको. त्यांनी महाराष्ट्रासमोर कसले कसले ‘आदर्श’ ठेवले आहेत आणि त्यातून कोणा कोणाची इच्छा’पूर्ती’ झाली आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काहीतरी वेगळे करून दाखवेल असे वाटले होते. पुण्यात तब्बल २९ नगरसेवक निवडून आल्यावर अत्यंत वेगळे, नेत्रदीपक असे काहीतरी करून दाखवण्याची सुवर्णसंधी या पक्षाला होती. पण या पक्षाच्या नगरसेवकांत आणि इतर नगरसेवकांत फारसा काही फरक दिसून आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की, प्रमुख राजकीय पक्ष काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या दृष्टीने नालायक ठरत आहेत. यानंतर पर्याय उरतो तो अपक्ष निवडणुका लढवण्याचा. अविनाश धर्माधिकारी, अरुण भाटिया यांनी हे प्रयोग केले आहेत. पण माझ्या मते अपक्ष निवडणूक लढवण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे असे प्रयोग बहुतांश वेळा अयशस्वी ठरतात आणि यशस्वी झाले तरी अल्पजीवी ठरतात. भारतासारख्या देशातल्या लोकशाहीमध्ये एकेकट्याचे नव्हे तर लोकांना सोबत घेऊन जाणारे राजकारण केले पाहिजे. आणि अधिकाधिक लोक हवेत. सर्वांची मोट बांधत कुशलतेने संघटनात्मक राजकारण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘राजकीय पक्ष’ असण्याची नितांत आवश्यकता आहे. आजचा आम आदमी पक्ष हा असे राजकारण करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी फार मोठे व्यासपीठ ठरेल याबद्दल मला संदेह नाही.
या पक्षाची दुसरी खासियत म्हणजे इथे असणारी लवचिकता. शंभर टक्के पारदर्शकता, प्रमाणिकपणा आणि स्वच्छ राजकारणातून देशाचं भलं करण्याची इच्छा या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर बाकी बाबतीत पक्ष अजून तरी लवचिक आहे. एखाद्या विवक्षित बाबतीत पक्षाचे धोरण काय असावे, पक्षाची भूमिका काय असावी हे ठरवताना चर्चेला वाव आहे. वाद-संवाद होऊ शकतो. अधिकाधिक पक्ष सदस्यांना पटवून देऊन त्यांच्या मार्फत पक्ष नेतृत्वावर एखादा निर्णय घेण्यास भाग पाडता येण्याची शक्यता या पक्षात आहे. वरचे नेते काहीबाही ठरवतात आणि आमचे मत काहीही असले तरी स्थानिक पातळीवर आम्हाला त्याचा बचाव करायला लागतो असला हुकुमशाही मामला या पक्षात मला तरी आढळून आलेला नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभागातून सुदृढ लोकशाही या महत्वाच्या मुद्द्यांवर असणारी पक्षाची अधिकृत भूमिका ही माझ्या विचारांच्या जवळ जाणारी आहे. इतर कोणताही पक्ष आज याविषयी सविस्तरपणे भूमिका मांडून लढताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचा दृष्टीकोन अधिकच उठून दिसतो.
आम आदमी पक्षावर होणारा एक आरोप म्हणजे थेट लोकशाहीचे स्तोम हे लोक माजवतील. प्रत्येक निर्णय हा लोकांना विचारून घेतला जाऊ शकत नाही वगैरे. या आरोपात फारसे तथ्य नाही. खुद्द केजरीवालनेही हे स्पष्ट केले आहे की प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत असे करणे शक्य नाही. पण काही अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे असतील तर त्यावेळी लोकांना विचारलं गेलं पाहिजे. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवू की नको हे लोकांना विचारणं हा मुद्दा महत्वाचा होता. लोक मूर्ख असतात या अनेकांच्या गृहितकावर माझा विश्वास नाही. किंबहुना लोक अत्यंत हुशार असतात आणि मतपेटीतून ते सिद्ध होत असतं. याही वेळी लोकांनीही अतिशय हुशारीने एक प्रकारे आव्हान दिले आहे केजरीवालना की, करून दाखवा जे तुम्ही म्हणत होता निवडणुकीआधी. त्यामुळेच जवळ जवळ ७५% लोकांनी आम आदमी पक्षाला सरकार बनवण्याच्या बाजूने कौल दिला. मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच दिवशी ९ नोकरशहांची केजरीवालने बदली केली. त्यावेळी त्याने जनतेच्या बैठका नाही बोलावल्या. तेव्हा जनमताचा कौल वगैरे गोष्टींचे स्तोम माजवले जाईल हा मुद्दा बिनबुडाचा आहे. शिवाय अर्णब गोस्वामीशी बोलताना केजरीवालने हे स्पष्ट केले की आज तरी जनमताचा कौल मागताना फुलप्रूफ व्यवस्था नाही. पण त्यासाठी मोहल्ला/क्षेत्र सभा सारख्या यंत्रणा उभाराव्या लागतील. त्यामार्फत जनमत जाणून घेण्याची प्रभावी यंत्रणा उभी राहिल.
आम आदमी पक्षाने कॉंग्रेस चा बाहेरून का होईना पण पाठींबा घेतला या मुद्द्यावर भाजपने रान उठवले. मुळात सत्ता बनवण्याची सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जबाबदारी होती भाजपची. पण पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांनी माघार घेतली. यातली महत्वाची गोष्ट ही की, आज जर दिल्लीत आम आदमी पक्ष नसता तर आमदारांना विकत घेत, तडजोडी करत भाजपने सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. आता जरी ते ‘आम्ही फोडाफोडीचे अनैतिक राजकारण करणार नाही’ असे म्हणत असले तरी महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या वेळी मते फोडण्याचे राजकारण कोणी केले होते? उलट ‘काही मते का होईना फोडू शकलो याबद्दल आमचाच नैतिक विजय झाला’ अशी मुक्ताफळेही याच पक्षाच्या लोकांनी उधळली होती. तेव्हा दिल्लीत फोडाफोडीचे राजकारण झाले नाही याचे योग्य ते श्रेय आम आदमी पक्षाकडेच जाते. सरकार बनवून आश्वासने पूर्ण करून दाखवा असे आव्हान द्यायचे आणि सरकार बनवल्यावर कांगावा करायचा हा प्रकार बालिश आहे. वाजपेयींच्या एका भाषणात ते कॉंग्रेसला उद्देशून म्हणाले होते की विजयात नम्रता हवी, पराभवात चिंतन हवे. पण आजच्या भाजपच्या विजयात ना नम्रता आहे, ना पूर्ण बहुमत न मिळण्याच्या पराभवात असायला हवे ते चिंतन आहे. असलाच तर तो केवळ उन्माद आहे. वाट्टेल तिथे वाट्टेल त्या आघाड्या-युत्या करत राजकारण करणाऱ्या भाजपला आणि किंबहुना भारतातील कोणत्याही प्रस्थापित पक्षाला आम आदमी पक्षाला बोलण्याचा अधिकारच काय? उलट सत्ता बनवणाऱ्या पक्षाने अटी मांडाव्यात, पाठींबा देणाऱ्या पक्षाने नव्हेत हे अफलातून उदाहरण देणाऱ्या आम आदमी पक्षाचे कौतुकच करावयास हवे. 
आम आदमी पक्षाचा चेहरा मोहरा हा डाव्या पक्षांसारखा आहे असा आरोप अनेक जण करतात. विशेषतः भाजप कंपू मधून हा आरोप होताना दिसतो. या आरोपात बऱ्याच अंशी तथ्य आहे असे वरवर पाहता वाटेल. विशेषतः दिल्ली निवडणुकीत पक्षाने दिलेली आश्वासने बघता अनुदानाची खैरात आणि व्यापार-उद्योगांवर करांचे ओझे अशी काहीशी व्यवस्था आम आदमी पक्षाला अपेक्षित आहे की काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आम आदमी पक्षाच्या संकेतस्थळावर आम्ही डावे-उजवे यापैकी कोणी नसून विषय आणि प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक तेव्हा आवश्यक ती पावले उचलू असे म्हणलेले आहे. हा वरवर बघता पलायनवाद वाटू शकतो. पण नीट विचार करता फुटकळ वैचारिक-तात्विक वाद घालत चांगल्या लोकांची फाटाफूट होऊन एका चांगल्या प्रयोगाची शक्ती क्षीण करावी की प्रश्न समोर येतील त्यानुसार सविस्तर चर्चा, वाद करत पक्षाची भूमिका ठरवावी? दिल्ली मध्ये फुकट पाणी देणे कदाचित असेल परवडणारे. पण तीच भूमिका पुण्यातही घेतली पाहिजे असे बंधन आम आदमी पक्षामध्ये नाही. आणि ही लवचिकता महत्वाची आहे. हेच सुदृढ लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे.
नुकतेच पक्षाचे एक नेते योगेंद्र यादव यांनी पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा असल्याचे विधान केले. याचा गैरअर्थ घेतला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या संविधानाच्या सुरुवातीलाच भारत हा देशच समाजवादी असल्याचे स्पष्टपणे म्हणले असून तसे आपाआपल्या पक्षाच्या घटनेत स्पष्टपणे नमूद करणे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार बंधनकारक आहे. हे बघितले तर भारतातील सर्व राजकीय पक्ष हे ‘समाजवादीच’ आहेत. फरक फक्त इतकाच की आम आदमी पक्ष आपल्या स्वभावाला अनुसरून हे खुलेपणाने बोलून दाखवतो आहे. शिवाय खुला व्यापार, भांडवलवाद हा विशुद्ध स्वरूपात अस्तित्वात येणार असेल तर तो नाकारण्याचे काहीच कारण नाही हे आम आदमी पक्षही मान्य करेल. पण त्यासाठी भांडवलवाद आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या नावाखाली सगळा देश अंबानी-बिर्ला, बिल्डर आणि कंत्राटदारांच्या दावणीला बांधणारी आजची शासनव्यवस्था बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. ‘क्रॉनी कॅपिटलिझम’ पेक्षा समाजवाद शतपटीने चांगला आहे ही माझी ठाम भूमिका आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, परकी गुंतवणुकीला आज विरोध होतो कारण त्यांची अंमलबजावणी शंभर टक्के प्रामाणिकपणे होईल आणि पैशाच्या जोरावर बड्या कंपन्या सरकारला विकत घेणार नाहीतच अशी खात्री बहुसंख्य लोकांना वाटत नाही म्हणून. आम आदमी पक्षाचा प्रयत्न सरकारी यंत्रणेवरचा असलेला अविश्वास कमी करण्याचा आहे. आणि हा अविश्वास कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणेला कार्यक्षम आणि प्रभावी करणे आवश्यक आहे. आणि ते करायचे असेल तर यंत्रणेमधल्या कर्तव्यशून्य, बिनडोक आणि भ्रष्ट मंडळींना बाजूला सारावे लागेल. त्यासाठीच आम आदमी पक्ष उभा राहिला आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला समाजवाद की भांडवलवाद की तीन पंचमांश समाजवाद आणि एक चतुर्थांश भांडवलवाद आणि अजून काही वगैरे वगैरे गोष्टींमध्ये जाण्याची गरजच नाही.


जे दिल्ली मध्ये घडलं तेच पुण्यात घडू शकतं का? याचं निःसंदिग्ध उत्तर होय असं आहे.
पण त्यासाठी तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना, प्रचंड कष्ट उपसावे लागतील, दिल्लीमधले लोक जसे मोठ्या विश्वासाने योग्य त्या बाजूला उभे राहिले तसे पुणेकरांनाही करावे लागेल. गुंडांना आणि बिल्डरधार्जिण्या भ्रष्ट मंडळींना घरी बसवावे लागेल. ‘कुछ नहीं हो सकता’ या मानसिकतेमधून पुणेकरांना बाहेर यावे लागेल. मुख्य म्हणजे दिल्लीमधले समस्त सामाजिक कार्यकर्ते आम आदमी पक्षासोबत उभे राहिले तसे पुण्यातलेही कार्यकर्ते या पक्षाशी जोडले गेले पाहिजे. ‘राजकारण नको’ या भूमिकेपेक्षा ‘चांगले राजकारण हवे’ ही भूमिका घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. एकजुटीला पर्याय नाही. आपण जर एकजूट दाखवणार नसू तर आपलं सामाजिक काम वगैरे सगळं थोतांड आहे. सामाजिक कामाच्या निमित्ताने ‘मी किती काम करतो देशासाठी’ असा पोकळ अहं जपण्याचे काम करण्यात काय अर्थ आहे? आणि याच विचाराने आम्ही या अभूतपूर्व चळवळीशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या प्रयोगात सामील होणं आणि हातभार लावणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी मानतो. आपलं म्हणजे केवळ सामाजिक कार्यकर्त्यांचं नव्हे, तर त्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे ज्याला आपली पुढची पिढी सुखाने जगावी असं वाटतं. माझ्या मागच्या पिढीने राजकारणाकडे दुर्लक्ष करून फार मोठी चूक केली आहे असं माझं मत आहे. तीच चूक आपल्याही पिढीने करावी यात कसलं आलंय शहाणपण?  

Friday, December 6, 2013

भूतकाळाचे भूत!

तिहास आठवला की आपले लोक एकदम भावनिक होतात. त्यांचे बाहू फुरफुरू लागतात आणि इतिहासात आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा ऐकून आम्ही मुळातच श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण व्हायला लागते. अशी भावना एकदा निर्माण झाली की, त्याच भावनेला खत-पाणी घालणारे नेते आवडू लागतात. मग त्यांनी वर्तमानकाळात भविष्यकाळ बिघडवणारा काही का गोंधळ घालेना, त्याने इतिहासाचे उदात्तीकरण करणारी भाषा अथवा कृती केली की आमचे महामूर्ख लोक त्याच्या मागे झेंडे नाचवत जातात. समाजाचा अभिमान हा समाजाने वर्तमानकाळात केलेल्या कृत्यांपेक्षा इतिहासावर अवलंबून राहू लागला की समजावे आपण निश्चितपणे अधोगतीकडे वाटचाल करत आहोत. या सगळ्यावर टीका केली की त्या इतिहासातील महान मंडळींचे आम्ही विरोधकच आहोत अशा नजरेने आमच्याकडे बघणे सुरु होते. मग अमुक व्यक्तीच्या नावाच्या वेळीच का टीका केली, तमुक वर का नाही केली, तुमची जात अमुक अमुक म्हणून बोललात हे, तमुक धर्म असता तर करू शकाल काय अशी टीका वगैरे वगैरे बिनबुडाच्या गोष्टी सुरु होतात. या ऐकल्या की आपण एक समाज म्हणून मानसिक रुग्ण आहोत याबद्दल खात्रीच पटते. मनोरुग्ण व्यक्तीप्रमाणेच मनोरुग्ण समाजानेही तातडीने मनोविकासतज्ञांची मदत घेणे आवश्यक असते. (मानसशास्त्रातील ख्यातनाम तज्ञ डॉ आनंद नाडकर्णी ‘मनोविकारतज्ञ’ याऐवजी मनोविकासतज्ञ हा शब्द वापरतात. मला तो फार आवडतो. मनाचा विकार दूर करणं यामध्ये नकारात्मकता आहे. पण मनाचा विकास हा कसा सकारात्मक शब्दप्रयोग आहे!) समाजासाठीचे मनोविकासतज्ञ असू शकतात साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक-प्राध्यापक... या मंडळींनी पुढे यायला हवे. ठामपणे योग्य त्या भूमिका मांडायला हव्यात. समाजाला शहाणे करण्यात महत्वाची भूमिका बजावायला हवी.

हे सगळे आज लिहिण्याचा उद्देश म्हणजे नुकतीच घडलेली घटना. पुणे विद्यापीठाचे नाव
बदलून आता ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव ठेवण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या सिनेटने बहुमताने पास करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. रस्त्याला, इमारतीला, विद्यापीठाला, एखाद्या शासकीय योजनेला ऐतिहासिक व्यक्तींचे नाव देण्याची पद्धत जगात सर्वत्र आहे. त्यात काही चूक नाही. यातून त्या व्यक्तींच्या कार्याची आठवण ठेवली जाते. समाजाने त्या व्यक्तींबद्दल व्यक्त केलेला आदर असेही या गोष्टीकडे बघितले जाते. त्यामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या रस्त्याला, विद्यापीठाला, योजनेला, इमारतीला ऐतिहासिक व्यक्तींचे नाव देण्यात काहीच गैर नाही. पण मुद्दा निर्माण होतो जेव्हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टींचे नाव बदलले जाते. जुने अस्तित्वात असलेले नाव पुसून किंवा त्यास बाजूला सारून कोणत्याही इतिहासप्रसिद्ध व्यक्तीचे नाव देण्याची आवश्यकताच काय? मूलतः नावाची गरज असते ओळख निर्माण होण्यासाठी. ती ओळख निर्माण झाली की मग व्यवहार सोयीचा होतो. पण नव्याने नाव देणे ही जुनी ओळख पुसण्याची क्रिया करून आपण काय साध्य करतो? जुनी ओळख पुसून इतिहास प्रसिद्ध व्यक्तींचे नाव त्या जुन्याच वास्तूला देऊन आपण केवळ आणि केवळ इतिहासाचे उदात्तीकरण करत असतो, बाकी काही नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले. वास्तविक ती वास्तू बघितली तर व्हिक्टोरियन वास्तुशास्त्राचा अत्युत्कृष्ट नमुना आहे. ब्रिटीशांचे राज्य आले म्हणून रायगड हा ‘फोर्ट एडवर्ड’ झाला नाही किंवा शनिवारवाडा हा ‘किंग जॉर्ज वाडा’ झाला नाही. तसेच ब्रिटीश निघून गेले तरी त्यांनी बांधलेल्या व्हिक्टोरिया टर्मिनस हे व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणूनच राहिले असते तरी बिघडले नसते. शिवाय शिवाजी महाराजांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तूला त्यांचे नाव देणे हा प्रकार तर शुद्ध तर्कदुष्ट आहे. पण या आणि अशा नामान्तरातून इतिहासाविषयीचा अभिमान इतका फुलवायचा की वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष व्हावे. वर्तमानातही तोच तो इतिहास उगाळत बसावे म्हणजे मग आम्ही इतिहासाचा अभिमान असणारे म्हणून वर्तमानात वाटेल ते केले तरी मते मिळवून सत्ताखुर्ची उबवत राहता येऊ शकते. कोणत्याही विचारी मनाला अक्षरशः उबग आणणारी गोष्ट आहे ही.
इतिहास वाचून अशी जिद्द निर्माण व्हायला हवी की आम्ही नवा इतिहास घडवू. पण तशी धमक तर निर्माण होत नाही, तशी कृती करण्याचा विचार सुद्धा आमच्या मनात येऊ दिला जात नाही, शिवाय इतरांनी काही वेगळे करायचे ठरवले तर त्याला वेड्यात काढण्यापुरते आमचे शौर्य उरते. थोडक्यात वागण्यात भ्याड पळपुटेपणा आणि बोलण्यात मात्र इतिहासातील शौर्याची गाथा अशा विरोधाभासी आणि खोट्या वातावरणात आपला समाज अडकून पडला आहे. किंबहुना वर्तमानातल्या वागण्यात आलेले षंढत्व झाकण्यासाठी मग इतिहासातल्या बहादुरीचे दाखले देत बसायचे इतकेच काय ते आम्ही मंडळी करत आहोत आणि हा माझ्या दृष्टीने एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे.

मी अशा समाजाचे स्वप्न बघतो आहे जिथे इतिहासातून प्रेरणा घेतली जाते ती नवनिर्मितीसाठी. जिथे नव्याने उभारलेल्या रस्ते, विद्यापीठे, इमारती यांना इतिहासप्रसिद्ध महान लोकांचे नाव देण्यात येत आहे ते त्यातून स्फूर्ती घेण्यासाठी. इतिहास उगाळत बसण्यासाठी नव्हे. जिथले लोक, असे इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची नावे दिली असतील तिथला दर्जा त्या नावांना साजेसा करण्यासाठी अहर्निश झटतील. जिथे लोक ऐतिहासिक वैर जपण्यासाठी किंवा आपले ऐतिहासिक श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी जुन्या गोष्टींची नावे पुसण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी एका अशा समाजाचे स्वप्न बघतो आहे, जिथे इतिहासापेक्षा नागरिकशास्त्राला अधिक महत्व मिळते आहे. इतिहासातील श्रेष्ठत्वापेक्षा वर्तमानातील प्रगल्भ नागरिकत्वाचा जास्त गंभीरपणे विचार होतो आहे...
आयुष्याच्या अखेरीला वृद्ध माणूस जसा जुन्या आठवणींमध्ये रमतो तसा जगातील सर्वात तरुण देश असा नावलौकिक असलेला आपला देश भूतकाळात रमत बसू नये एवढीच इच्छा. भूतकाळाचे हे भूत जितके लवकर आपल्या मानगुटीवरून खाली उतरेल तितके आपण अधिक परिपक्व समाज बनत जाऊ हे निश्चित. 

Thursday, October 17, 2013

परिवर्तनाचं पुढचं पाउल- माहिती अधिकार!

मतदान करणं, लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणं हे व्यापक परिवर्तनासाठी पाहिलं पाउल आहे. पण परिवर्तनाचं दुसरं पाउल आहे आपण निवडून दिलेल्या सरकारचा कारभार योग्य दिशेने चालला आहे ना हे बघणं. त्यासाठीच आपल्या हातात शस्त्र आहे माहिती अधिकाराचं!

आठ वर्षांपूर्वी २००५ साली, ऑक्टोबरच्या १२ व्या दिवशी माहिती अधिकार कायदा या देशात आणला गेला. अशी दाट शक्यता आहे की, त्यावेळी या कायद्याची ताकद आमच्या राजकारण्यांना
समजली नसावी. अन्यथा हा कायदा आणण्याचे त्यांचे धाडस झाले नसते. किंवा अतिशय स्पष्ट कल्पना असल्यानेच, राजकारण्यांना डोईजड होऊ घातलेल्या नोकरशहांवर वचक ठेवण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकतो हे जाणून घेऊन हा कायदा पास करण्यात आला असावा. कारणे काहीही असोत. हा कायदा या देशात आला आणि यामुळे भ्रष्टाचार आणि गैरप्रकार उघडकीस येण्याची मालिकाच सुरु झाली. इतकी वर्ष ज्या गोष्टी दबून राहत होत्या त्या नाममात्र शुल्क भरून कोणत्याही नागरिकाला सहजपणे बघता येऊ लागल्या. सरकारचा गलथान कारभार उघड होऊ लागला. जर सरकार आमचं आहे तर, सरकारी कागदपत्रे बघण्याचा आम्हाला पूर्ण हक्क आहे या पायावर माहिती अधिकार कायदा उभा आहे. तेव्हा सुरक्षा विषयक महत्वाच्या कागदपत्रांचा अपवाद वगळता कोणतेही सरकारी दस्तऐवज आज नागरिकांना उपलब्ध आहे. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात माहिती अधिकार कायद्याला विशेष महत्व आहे हे निश्चित.

गैरवापर वगैरे सगळं साफ खोटं आहे.

या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाल्यावर चहू बाजूंनी ओरडा सुरु झाला की कायद्याचा गैरवापर होतो आहे. याच्या इतकं बिनबुडाचं वाक्य दुसरं काहीही नसेल. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीचा वापर करून “पैसे द्या नाहीतर माहिती उघड करू” असं अधिकाऱ्यांना म्हणे ब्लैकमेल केलं जातं. मुळात, अधिकाऱ्याने काहीतरी चुकीचं केल्याशिवाय त्याला ब्लैकमेल कसं करता येईल? कर नाही त्याला डर असणार नाही. पण स्वतः भ्रष्टाचार आणि गैरकारभार करायचा आणि तो उघडकीस आणीन अशी धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या माणसाला नावे ठेवायची ही कुठली पद्धत? अर्थात सिग्नल तोडल्यावर पकडणाऱ्या पोलिसाने लाच मागू नये तसेच ब्लैकमेल करण्या सारख्या घटना घडत असतील तर ते चूक आहे यात शंका नाही. पण सिग्नल तोडणाऱ्या व्यक्तीला दंड भरावा लागला पाहिजे यासाठी पोलीस असणं तर आवश्यक आहेच. माहिती अधिकार कायदा हा एक प्रकारचा पोलीस आहे. भ्रष्टाचाराच्या गल्लीत नो एन्ट्री असतानाही घुसणाऱ्या लोकांना पकडणारा. गडबड अशी आहे की गल्लीत घुसणारे लोक एवढे जास्त आहेत की आहेत ते पोलीस पुरे पडत नाहीत. शिवाय मध्यंतरी जसा वाहतूक पोलिसालाच मारहाण करण्याचा प्रकार पुण्यात घडला होता तसा माहिती अधिकार कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्नही केला जातोच. पण तरीही हे माहिती अधिकार कार्यकर्तारुपी पोलीस पुढे येत राहणार यात काही शंकाच नाही. कारण नो एन्ट्रीमध्ये गाडी घुसवल्यावर जशी वाहतूक ठप्प होते तशी देशाची सगळी प्रगतीही ठप्प झाली आहे. ती सुरळीत करायची तर अधिकाधिक प्रशिक्षित पोलीस तयार करणं आम्ही आमचं, परिवर्तनचं, कर्तव्य समजतो.
दुसरा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होतो की ते उगीचच कोणतीही माहिती मागतात. हे म्हणणेही बिनडोकपणाचेच लक्षण. कारण कोणती माहिती ‘उगीच’ मागितली आहे आणि कोणती माहिती जरुरीची हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा? खुद्द अधिकारीच ठरवणार का की अमुक अमुक गोष्ट जरुरीची नाही? याबाबतीत अजूनही एक मुद्दा येतो तो म्हणजे शासकीय कारभारातली हवी ती नेमकी माहिती मागणं सामान्य नागरिकासाठी जवळपास अशक्य आहे. अशावेळी मग उपलब्ध सगळी माहिती घेऊन त्यातल्या चुकीच्या गोष्टी हुडकणे अधिक सोयीचे. उदाहरणार्थ समजा मला एखाद्या शासकीय प्रकल्पात गैरकारभार आहे असे वाटले पण तो गैरकारभार नेमका कुठल्या पातळीवर आहे हे मला माहित नसेल (आणि माहित होणार तरी कसे?!) तर त्या विशिष्ट प्रकल्पाशी संबंधित सर्व फाइल्स ची प्रत माहिती अधिकारात मागवतो. कायद्याप्रमाणे त्याचे प्रति पान दोन रुपये शुल्कही भरतो. यात आता माझ्याकडे अनेक कागदपत्रे अशी येतात जी अंतिमतः उपयुक्त नसतात. पण म्हणून काय मी माहिती मागवूच नये काय?
थोमस अल्वा एडिसनने आपल्या शंभराव्या प्रयोगात बल्बचा शोध लावला. पण त्या आधी बल्ब बनवण्याचे ९९ प्रयोग फसले होते अशी गोष्ट सगळ्यांनीच लहानपणी वाचली-ऐकली असेल. ‘माहिती अधिकारात नेमके काय हवे तेवढेच मागा, जरुरीपुरतेच असेल ते’ असे म्हणणे म्हणजे एडिसनने थेट शंभरावाच प्रयोग का नाही केला असा प्रश्न विचारण्यासारखे आहे.
अधिकाऱ्यांचा अजून एक आक्षेप म्हणजे इतके अर्ज येतात की आम्हाला काम करायला वेळच मिळत नाही. या म्हणण्यात काही अंशी तथ्य आहे. पण काहीच अंशी. कारण मुख्य मुद्दा असा की सरकारी ऑफिस मध्ये माहिती अधिकारी हे पद निर्माण करून त्या पदावर एक व्यक्ती नेमली जावी असे हा कायदा सांगतो. पण बहुतेक सर्व सरकारी ऑफिसात आहेत त्यापैकीच एखाद्या अधिकाऱ्याला ‘माहिती अधिकारी’ बनवले जाते. मग तो मनुष्य एकावेळी दोन दोन कामे कशी करणार? साहजिकच त्याला वेळ कमी पडतो. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल तर यातून सरकारचाच नाकर्तेपणा उठून दिसतो. आणि कायद्यात बिलकुल त्रुटी नाही हे स्पष्ट होते.
काही लोकांचा आक्षेप असतो की अनेक लोक माहिती अधिकार सामाजिक कामांसाठी न वापरता वैयक्तिक कारणांसाठी वापरतात. या आक्षेपामुळे माहिती अधिकार ही गोष्ट कुठल्या तरी चळवळ्या माणसांसाठीच आहे असा गैरसमज पसरला आहे. पण आम्ही हे ठामपणे सांगू इच्छितो की व्यक्तिगत कारणासाठी माहिती अधिकार कायदा वापरण्याचा या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा हक्कच आहे. किंबहुना ते अपेक्षितही आहे. एखाद्या आजोबांचे पेन्शन सरकारी बाबू विनाकारण अडवून ठेवत असेल तर? लाच मागत असेल तर? तर ते आजोबा “कोणत्या कायद्याखाली वा नियमाखाली पेन्शन अडवण्यात आले आहे, नेमकी प्रक्रिया काय आहे, असे पेन्शन बेकायदेशीरपणे अडवणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार करायची असल्यास कोणाकडे करावी. तक्रार केल्यावर त्यावर कार्यवाही करण्याची मुदत कोणत्या कायदानुसार किती आहे असे असंख्य प्रश्न” विचारू शकतील. या त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी त्यांनी माहिती अधिकाराचा कायदा वापरला तर चूक काय आहे त्यात?
शिवाय महत्वाचे म्हणजे माहिती मागताना त्यामागचे कारण देण्याचे बंधन नाही. त्यामुळे एखादी गोष्ट व्यक्तिगत कामासाठी आहे वा व्यापक सामाजिक कामासाठी हे अधिकारी स्वतःच ठरवू शकत नाही. अनेक व्यक्तींवर अन्याय होत असतो. त्यांच्यामागे कायम कोणत्यातरी संघटनेचे बळ उभे असू शकत नाही. तसे असण्याची जरुरीही नाही. भारत देशातल्या प्रत्येक स्वतंत्र नागरिकाला माहिती अधिकार कायद्याचा वापर करून अशा पद्धतीचा स्वतःवरील प्रशासकीय अन्याय दूर करता येऊ शकतो.
थोडक्यात, माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर होतो हा ओरडा साफ खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. कायदा मोठा प्रभावी ठरत असल्याचीच पावती म्हणजे याविरुद्ध होणारा प्रचार!

कायद्याच्या गळचेपीसाठी सरसावलेले राजकारणी

माहिती मागण्याच्या अर्जाला शब्द मर्यादा असावी, एकच गोष्ट एका अर्जात मागावी वगैरे अटी महाराष्ट्र सरकारने घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण या विरोधात महाराष्ट्रातील एकाही राजकीय पक्षाने ठाम भूमिका घेतल्याचे आम्ही ऐकलेले नाही. तरी ही गोष्ट मामुली भासावी अशी गोष्ट माहिती अधिकाराच्या बाबतीत नुकतीच घडली.
काही महिन्यांपूर्वी या कायद्यानुसार नेमल्या गेलेल्या केंद्रीय माहिती आयुक्ताने असा महत्वपूर्ण निकाल दिला की राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायदा लागू होतो. आणि या निकालानंतर बहुतांश राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण पक्ष चालवण्यासाठी पक्षाला कुठून पैसा येतो, खर्च कुठे केला जातो, पक्षांतर्गत लोकशाही पाळली जाते का हे प्रश्न माहिती अधिकारात विचारले गेले तर या पक्षांची अक्षरशः पळता भुई थोडी होईल. भ्रष्टाचार आणि गुंड-झुंडीच्या जोरावर पक्षाचे उद्योग चालू असल्याचे उघड्या वागड्या स्वरुपात लोकांसमोर येईल या विचाराने पक्षनेत्यांची झोप उडाल्यास नवल नाही. त्यामुळे अखेर केंद्रीय माहिती आयुक्ताचा निर्णय रद्दबातल ठरवणारी कायदा दुरुस्ती संसदेत मांडण्यात आली. माहिती अधिकार कायद्याची गळचेपी करण्यासाठी सरसावले ते लोकांनीच निवडून दिलेले खासदार.
सत्ताधारी कॉंग्रेसकडून संसदेत हे दुरुस्ती विधेयक मांडले गेल्यावर सत्तेचे डोहाळे लागलेल्या भाजपनेही या विधेयकाचे सुरुवातीला समर्थन केले[1]. आणि आता भाजपने भूमिका बदलून विरोध केल्यावर[2] हे विधेयक स्थायी समितीकडे पुढील विचारासाठी सुपूर्त करण्यात आले आहे. हे विधेयक जेव्हा संसदेत प्रत्यक्ष चर्चा आणि मतदानासाठी येईल तेव्हा सर्व पक्षांची भूमिका अधिक स्पष्ट होईलच. पण तेवढी वाट पाहण्याचीही गरज नाही. कारण केंद्रीय माहिती आयुक्ताने ३ जून २०१३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ६ आठवड्यांच्या आत[3], म्हणजे १५ जुलै पूर्वी सर्व राष्ट्रीय पक्षांनी जनमाहिती अधिकारी नेमणे, कायद्याच्या सेक्शन ४ नुसार सर्व माहिती आपण होऊन उघड करणे इत्यादी गोष्टी करणे अपेक्षित होते. सहा राष्ट्रीय पक्षांपैकी कोणी याची अंमलबजावणी केली आहे काय हे बघितल्यास एकही नाही असे उत्तर खेदाने द्यावे लागते. (पहा सर्व पक्षांच्या अधिकृत वेबसाईट) या सर्व गोष्टींवरून आम्ही नेमके काय समजायचे?? या पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत यायची इच्छा नाही काय?
संसद ही भारतात सार्वभौम आहे. पंतप्रधान लोकांमधून थेट निवडला जात नाही. तो निवडला जातो आपण निवडून दिलेल्या खासदारांमधून. त्यामुळे चांगला माणूस म्हणत कोणालाही पंतप्रधान म्हणून निवडून दिला गेला तरी संसद चालते ती तिथल्या ५४३ खासदारांच्या मार्फत. कायदे पास होतात २७२ खासदारांचे बहुमत असलेल्या पक्षाच्या (वा आघाडीच्या) जोरावर. या देशातले कॉंग्रेस, भाजप, समाजवादी, कम्युनिस्ट, बसप इ प्रमुख राष्ट्रीय पक्ष पारदर्शक व्यवहार नाकारणार असतील तर हा मोठा गंभीर मामला आहे असे आमचे मत आहे. आणि पारदर्शक व्यवहार आम्ही करणार नाही असे म्हणणारे पक्ष देशाचा कारभार कितपत पारदर्शक पद्धतीने करतील याविषयी आम्हाला दाट शंका आहे. आणि पारदर्शकता नसेल तिथे भ्रष्टाचार आणि गैरकारभार मूळ धरणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच, आमचे सर्व पक्षांना असे आवाहन असेल की तुम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे हे स्वतःहून ‘कृतीशीलपणे’ दाखवून द्या आणि सर्व माहिती उघड करा.

‘माहिती’ ही फार मोठी ताकद

आजचा माहितीचा अधिकार अत्यंत प्रभावी आहेच. पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये सरकारी यंत्रणा कमी पडल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः सेक्शन ४ बाबत. या माहिती अधिकार कायद्याच्या सेक्शन ४ मध्ये नेमकं आहे काय? या कलमामध्ये कोणत्याही शासकीय कार्यालयाने स्वतःहून कोणती माहिती प्रसिद्ध करावी याची यादी दिलेली आहे. या यादीत १७ गोष्टींचा समावेश होतो. त्यात सर्व कर्मचारी-त्यांची पदे-कर्तव्ये, त्यांना मिळणाऱ्या वेतनाचा तपशील, संबंधित शासकीय कार्यालयाकडून जे कार्य केले जाते त्याचे तपशील, ज्या कायद्यानुसार ते कार्यालय काम करते तो कायदा, स्वतःची कार्ये पार पडण्यासाठी ठरवलेली मानके, बैठकांचे वृत्तांत, आर्थिक अंदाजपत्रक, जमा-खर्चाचे तपशील अशा काही महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश होतो. अशा गोष्टी नागरिकांना सहजपणे बघण्यासाठी वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध व्हायला हव्यात असे हा कायदा सांगतो. शिवाय दरवर्षी ही माहिती अद्ययावत करणेही कायद्याला अपेक्षित आहे. या सेक्शन ४ ची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची मुहूर्तमेढ रोवली जाईल याबद्दल आम्हाला शंका नाही. पण सरकारी ऑफिसात हे होताना दिसत नाही.
माहिती अधिकारात लोकांनी अर्ज करण्याची वाट का पहावी? सरकारने आपण होऊनच सर्व माहिती लोकांपर्यंत पोहचवली तर लोक अतिशय सजग आणि खरोखरच ताकदवान होतील. शासनव्यवस्थेतले बहुतांश प्रश्न हे अपारदर्शक कारभारामुळे सुरु होतात. आमचे सर्व कायदे आम्हाला सहजपणे बघायला उपलब्ध होत नाहीत. महापालिका कोणत्या कायद्याच्या आधारे चालते, कोणत्या नियमांच्या आधारे कामकाज होते, पुण्याचा विकास आराखडा कोणत्या कायद्याच्या आधारे बनवण्यात आला अशा कित्येक गोष्टी कधी बघायलाच मिळत नाहीत. बाजारात जाऊन पुस्तक खरेदी करणे दरवेळी शक्य नाही. शिवाय कायद्यात बदल होत असतात, दुरुस्ती होत असते. तेवढी दुरुस्ती झाली की लगेच पुन्हा नवीन पुस्तक विकत घेणार काय? माहिती तंत्रज्ञान उपलब्ध होऊनही कित्येक वर्ष उलटली. त्याचा वापर करून सर्व माहिती, कायदे, नियम वेबसाईटवर आणि डिजिटल स्वरुपात आणणे मुळीच मुश्कील नाही. पण आमच्या वेबसाईट सुद्धा इतक्या दर्जाहीन असतात. संसदेची वेबसाईट मात्र खरोखर अप्रतिम आहे. त्यावर नवीन विधेयके, खासदारांची सर्व माहिती, त्यांची सभागृहातली उपस्थिती, त्यांनी विचारलेले प्रश्न, त्यावर सरकारने दिलेले उत्तर अशा सर्व गोष्टींचे तपशील आहेत. हेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि विधानपरिषदेच्या वेबसाईटवर का असू शकत नाही? हेच आपल्या महापालिकांत का असू शकत नाही? पुण्याला आय.टी. हब म्हणतात पण याच पुण्याच्या महापालिकेच्या मुख्य सभेचा सर्वात अलीकडचा वृत्तांत तुम्हाला वाचायला मिळत नाही. महापालिकेच्या वेगवेगळ्या समित्यांनी केलेले ठराव बघायला मिळत नाहीत. अपारदर्शक कारभार चालूच राहतो आहे वर्षानुवर्षे. आणि कोणत्याही पक्षाने पारदर्शकतेचा मुद्दा लावून धरल्याचे दिसूनही येत नाही. 
मागे याविषयी एका महापालिका अधिकाऱ्यापाशी मी बोलत होतो तर तो अधिकारी म्हणला की, “अहो कायदे लोकांना बघण्यासाठी ठेवले तरी लोकांना काय कळतंय त्यातलं”. माझं यावर उत्तर असं आहे की जोवर तुम्ही त्यांना या गोष्टी वाचायला, बघायला आणि समजून घ्यायला संधी उपलब्ध करून देणार नाही तोवर लोकांना न कळणं साहजिकच नाही का? माहिती अधिकार कायदा काय फक्त कायदे तज्ञांनी वापरला का? उलट बहुतांश माहिती अधिकार कार्यकर्ते हे सामान्य नागरिक आहेत. स्वानुभवातून शिकले आहेत. कायदा वाचून शिकले आहेत. लोकांसाठी माहितीचे दरवाजे खुले करा आणि मग बघा लोक किती उत्साह घेतात ते. इथे आज सारेच अगम्य. नेमके काय चालू आहे, कोणत्या कायद्यानुसार याचा काही पत्ताच लागत नाही. अशा परिस्थितीत लोक सरकारपासून दूर जाऊ लागतात. लोकांमध्ये लोकशाही विषयी उदासीनता पसरण्यामागे या सरकारी लपवाछपवीचा फार मोठा हात आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. लोकांना विश्वासात घ्यायला हवे. त्यांच्यापर्यंत माहिती पोहचवायला हवी. निर्णयप्रक्रियेत सामावून घ्यायला हवे. आणि ते करण्यातच आमचे प्रमुख राजकीय पक्ष मागे राहणार असतील तर त्यांना जाब विचारण्याची धमक आपल्याला बाळगायला लागेल आणि जाब विचारूनही पारदर्शक व्यवहाराला नाकारणाऱ्या मंडळींना मात्र घरी बसवण्याची प्रगल्भता आपल्याला दाखवायला लागेल.
आजच्या स्थितीत कायदे आणि नियम याबाबत राजकारणी आणि नोकरशाही यांना लोकांपेक्षा अधिक माहिती आहे. त्यामुळे ते अधिक लोकांपेक्षा वरचढ ठरतात. पण ज्यावेळी लोकांना त्यांच्याइतकीच माहिती उपलब्ध होईल त्यावेळी आपण प्रगल्भ लोकशाहीच्या दिशेने जाऊ लागलो आहोत असे म्हणता येईल.


Sunday, October 6, 2013

निष्फळ जल्लोष

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ‘वरीलपैकी कोणीही नको’ असे बटन मतदान यंत्रावर असावे असा निर्णय दिला. त्यावर मध्यमवर्गीय सुशिक्षित मंडळींनी आता सगळं राजकारण सुधारणार असं म्हणत जल्लोष सुरु केला असला तरी माझी याबाबतीतली वेगळी मतं आहेत जी ठामपणे मांडायला हवीत.

या निर्णयामुळे आता तरी लोक मतदानाला बाहेर पडतील असं अनेकांना वाटतं. मतदानाची
टक्केवारी आता वाढेल आणि लोकशाही सुधारेल असाही आशावाद काहींनी व्यक्त केला. मला असं वाटतं की मतदानाची खालावलेली टक्केवारी हा मुख्य रोग नाहीच. मुख्य रोग आहे राजकीय अनास्था. मतदान कमी होणे हे केवळ मुख्य रोगाचे लक्षण आहे. राजकीय अनास्थेमुळे मतदान कमी झाले आहे. राजकारणाविषयी आमच्या मध्यमवर्गीय समाजाला काही सोयरसुतकच उरलेले नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. आपल्यावर कोण राज्य करायला येत आहे, आलेले लोक कशाप्रकारे राज्य करत आहेत याकडे बारकाईने नजर ठेवायची क्षमता आमच्या मध्यमवर्गात आहे. पण स्वतःची जबाबदारी तर पार पाडणे तर दूरच, उलट सरकारला शिव्या घालत बसायचे हीच वृत्ती दिसून येत आहे.
मागच्या लोकसभेच्या वेळचा एक किस्सा. त्यावेळी ओळखीतल्या एका काकांना मी विचारले की तुम्ही मतदान का नाही केलेत? त्यावर उत्तर आले की “उभे सर्व उमेदवार एकसारखेच आहेत. काही फरकच नाही. सब चोर है.” मग मी त्यांना सर्व उमेदवारांची नावे विचारली, उमेदवारांच्या आणि पक्षांच्या जाहीरनाम्यावर त्यांचे मत विचारले, पण त्या काकांना यापैकी काहीच माहित नव्हते. त्यांनी कोणाचे साधे प्रचार पत्रकही नीट वाचले नव्हते. मग माझा साहजिकच पुढचा प्रश्न होता की जर तुम्हाला काहीच माहित नव्हते तर ‘सगळे सारखेच आहेत’ या निष्कर्षाला तुम्ही कसे आलात? काकांकडे उत्तर नव्हते.
हा किस्सा परवा एका मित्राला सांगितल्यावर तो म्हणला की, “सगळेच लोक सगळ्या उमेदवारांचा जाहीरनामा वगैरे वाचतील ही तुझी अपेक्षा जास्तच आहे. आपले लोक एवढे जबाबदार नाहीत.” मग या म्हणण्यावर माझा सवाल असा आहे की, जर निवडणुकीच्या वेळी लोक किमान पातळीवरचा विचारही करत नसतील, इतके जर ते बेजबाबदार असतील, तर अशा बेजबाबदार व्यक्तींच्या हातात ‘वरीलपैकी कोणीही नको’चे कोलीत द्यावे का? आधीच नकारात्मक असलेला वर्ग, अविचाराने ‘कोणीच नको’ चे बटन दाबून मोकळा होणार नाही कशावरून? यामुळे खरंच चार चांगले उमेदवार उभे असतील ते तर ते भरडले जाणार नाहीत कशावरून? आमचे सुशिक्षित लोक उपलब्ध पर्यायातून एक पर्याय निवडायचे पाउल उचलत नाही आणि उपलब्ध पर्याय अयोग्य वाटत असल्यास एखादा पर्याय द्यायलाही पुढे येत नाही. मतदान केल्यावर निवडून आलेल्या माणसाची जबाबदारी येते कारण त्याला तुम्ही निवडलेले असते. पण ती जबाबदारी नको म्हणून मतदान करायचेच नाही. आणि पर्याय द्यायचा तर तेवढी धमक सुद्धा नाही. शिवाजीराजे जन्माला यावे पण शेजारच्याच्या घरात हीच आमची मानसिकता. बरे, शेजारी महाराज जन्माला आले तर त्यांना मदत करावी हीसुद्धा वृत्ती नाही. त्यांना खाली कसे खेचता येईल याचेच विचार. अशा परिस्थितीत ब्रिटिशांनी यायचे काय परत राज्य करायला? अर्थात आमच्या कित्येक लोकांनी एवढी लाज सोडली आहे की ब्रिटिशांनाच बोलवा राज्य करायला असं म्हणायलाही ते कमी करणार नाहीत.

निवडणूक याचा अर्थ ‘निवडणे’. कोणीच नको असे म्हणून आपण काय साध्य करणार आहोत? काही लोकांनी असा मुद्दा मांडला की निदान यानिमित्ताने राजकीय पक्ष चांगला उमेदवार देतील. हेही आम्हाला साफ नामंजूर आहे. एकही चांगला उमेदवार राजकीय पक्ष आज देत नाहीत असे नाही. आणि दिले तरी लोक त्यांची माहिती घेऊन त्यांना सजगपणे निवडून देण्याचा जबाबदारपणा दाखवतील याची खात्री नाहीच. राजकीय पक्षांचे उमेदवार तेव्हाच सुधारतील जेव्हा त्यांच्यापेक्षा अधिक चांगला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभा राहिल. आणि केवळ चांगला उमेदवार उभा राहिल्यावर तो निवडून येऊ शकतो असे उदाहरण तयार करायला लागेल. पण असा एखादा चांगला उमेदवार उभा राहिला तर त्याला निवडून आणण्याची जबाबदारी मतदारांवर येते. निवडणुकीच्या रिंगणात माणसाला पर्याय माणूसच असू शकतो, ‘कोणीच नको’ हा काही पर्याय असू शकत नाही. यातून केवळ नकारात्मक भावना पसरण्याचं काम होईल आणि उलट परिवर्तनाचं काम अजूनच दूर जाईल. सिस्टीमच्या बाहेर राहून सिस्टीम सुधारेल अशी एखाद्याची भावना असेल तर माझं काही म्हणणं नाही. पण अशी भावना बहुसंख्य लोकांची असेल तर मात्र आपण अराजकाच्या दिशेने जात आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे.
कायद्याच्या दृष्टीने, संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने, मला सर्व उमेदवारांना नाकारायचा अधिकार असला पाहिजे हे शंभर टक्के खरे असले तरी अधिकारासोबत जबाबदारी येते. जबाबदारीच्या बाबतीत सार्वत्रिक अंधार असताना हा अधिकार म्हणजे एक कोलीत बनू नये एवढीच इच्छा. शिवाय यामुळे ताबडतोब परिवर्तन होणार असे स्वप्नरंजन करणेही धोक्याचे. कारण त्यातून स्वप्नभंगाचं दुःख तेवढं पदरात पडेल.

राजकारणात शिरून चांगल्या लोकांना पाठींबा देऊन, त्यांना मत देऊन, निवडून आणूनच राजकारण सुधारता येईल. ‘कोणीच नको’ असं म्हणून नाही. तेव्हा हा पर्याय उद्या मतदान यंत्रावर आल्याने राजकारण आमूलाग्र बदलणार आहे असा जल्लोष करणाऱ्या सुशिक्षित मध्यमवर्गीय मंडळींना माझे कळकळीचे आवाहन असेल की हा जल्लोष निष्फळ आहे हे वेळीच ओळखून आपण राजकीय प्रक्रीयांशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे. 

(दि. ३ नोव्हेंबर २०१३ रोजी दै. महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित)