३००० बसेस रस्त्यावर
आणून लोकांनी एक दिवस आपल्या वैयक्तिक गाड्या बाजूला ठेऊन खरोखरंच काय होऊ शकते
याचे ट्रेलर म्हणून या बस दिवसाकडे बघावे असा माझा दृष्टीकोन होता. आणि याच
विचाराने मीही माझी पेट्रोल खाणारी दुचाकी न वापरता सायकलने ऑफिसला गेलो.
या बस दिवसाबाबत माझ्या
नजरेस पडलेल्या /कानावर आलेल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया अशा-
“बस दिवस ही संकल्पना भुक्कड होती.”
“मी रोजंच बसने प्रवास करतो. आणि आज फरक इतकाच की
मला बसायला जागा मिळाली.”
“रोज माझ्या चारचाकीने माला ऑफिसला जायला २५ मिनिटे
लागतात. आज बसने गेले तर ७० मिनिटे लागली.”
“बसेस रिकाम्या धावत होत्या, आणि रस्त्यावर
दुचाकींची तुडुंब गर्दी होती. साहजिकच खूप बसेस आणि नेहमी इतक्याच दुचाक्या यामुळे
जास्तच ट्राफिक जाम झाला.”
“बस दिवस उत्तम होता उपक्रम. गेल्या २६
वर्षांच्या आयुष्यात मी प्रथमच बसने गेले. आणि इतकी सहज आणि सुटसुटीत बससेवा मिळाली
तर मी बस वापरायला तयार आहे.”
“मी गंमत म्हणून डेक्कन वरून बसने कोथरूड पर्यंत
जाऊन परत आलो. मज्जा आली. अर्थात कामं करायला गाडीच वापरली.(हे पुढचं वाक्य मी
प्रश्न केल्यावर दिलेलं उत्तर आहे!)”
“बस डेपो मध्ये नेहमीच्या बस लावायला जागा नाही
आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त बसेस आल्यामुळे लावायला जागाच नव्हती. वाट्टेल
तिथे बस उभ्या केल्या होत्या. एकूणच गोंधळ होता सगळा.”
“बस दिवसामुळे थोडाफार कमी झाला होता ट्राफिक असं
वाटलं तरी.”
नेमके काय घडले कसे
घडले, याबाबत प्रत्येकाचे मत, अनुभव वेगळे असतील. शिवाय पुण्याच्या कोणत्या भागात
काय घडले याबाबत तर नक्कीच मतांतरे असणार. या दिवशी व आधीही बहुसंख्य लोकांनी “याने
काय होणार किंवा एक दिवस बस वापरल्याने ट्राफिक कमी होणार का” अशी मते मांडली.
काहींनी “हा उपक्रम कसा सकाळने केवळ स्वतःची पब्लिसिटी करून घेण्यासाठी राबवला”
असेही मला ठणकावून सांगितले. विरोधी मते काहीही असो. माझे अजूनही प्रामाणिक मत आहे
की अशा प्रकारे उपक्रम घेणे स्तुत्यच आहे. या आणि अशा असंख्य ‘निमित्तांची’
निर्मिती करून एखादे चांगले काम पुढे नेता येऊ शकते, नेले जाते. याबाबत घेतल्या
जाणाऱ्या आक्षेपांकडे मी दुर्लक्ष करतो आहे असे नव्हे. किंवा त्यात तथ्य नाही असे
माझे मत आहे असेही नव्हे पण तरीही यातून काय काय होऊ शकते, काय होऊ शकत नाही अशी
मांडणी केल्यावर मला या उपक्रमाचे कौतुकच करावे वाटले आणि ते मी केलेच.
पण आता बस दिवस
संपला. इथून पुढे काय होतंय हे अतिशय महत्वाचे आहे. नुसत्या बस दिवस साजरा
करण्याने काहीही होणार नाही हे माझे मत आहेच. पण नुसता बस दिवस साजरा करणे हा जर ‘सकाळ’ने
ठरवलेला उपक्रम असेल तर त्यालाच पहिले पाउल मानून पुढची पावले इतरांनी उचलायला
हवीत. इथून पुढेही ‘सकाळ’नेच न्यावे हा अट्टाहास कशासाठी? तुमची आमची काहीच
जबाबदारी नाही का? ‘सकाळ’ने इथून पुढचे काम केले तर तो बोनस! नाही केले तर उर्वरित
काम आपण पूर्ण करू अशी धमक, असा विश्वास आणि इच्छा आपल्यामध्ये नसेल तर आपला समाज
तद्दन भंकस करणारा पराभूत मनोवृत्तीचा आहे असा निष्कर्ष काढावा लागेल.
इथून पुढे माझ्यामते ७ गोष्टी व्हायला हव्यात, आपण करायला हव्यात.
1) सकाळ सोशल फौंडेशनने या उपक्रमानिमित्त जमा
झालेल्या पै पै चा हिशेब जाहीर करावा.
2) सध्याच्या अस्तित्वात असलेल्या पीएमएमएल मध्ये
सुधारणा करण्यासाठी विवेक वेलणकर आणि जुगल राठींसारखे जे कार्यकर्ते लढत आहेत
त्यांच्या पाठीशी उभे राहावे. ‘सकाळ’ सह इतर वर्तमानपत्रांनीही आता त्यांच्या
लढण्याला अधिक प्रसिद्धी देण्याचे धोरण ठेवावे.
3) बससेवा सुधारण्यासाठी निधीची कमतरता आहे असली ओरड
नेहमीच होत असते. त्यामुळे बाकडी टाकणे किंवा तत्सम भंपक खर्च कमी करून तो पैसा
नवीन बस खरेदीकडे वळवण्यात यावा अशी आपापल्या नगरसेवकांकडे आग्रही मागणी करणे.
4) सर्वच नगरसेवकांनी आणि राजकीय पक्षांनी बस
दिवसाला पाठींबा दिला होता. त्यामुळे हे लक्षात घेऊन आपल्या नगरसेवकाने महिन्यातून
किमान एक दिवस बस/सायकल वापरावी असा आग्रह धरावा. विशेषतः ज्या दिवशी महापालिकेत
सर्वसाधारण सभा असेल त्या दिवशी. (तसं त्या नगरसेवकाने न केल्यास तो नगरसेवक भंपक
आणि केवळ दिखावा करण्याच्या लायकीचा आहे असे समजण्यास हरकत नसावी. लक्षात ठेवायला
हवे की, गांधीजी म्हणायचे बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. जो नगरसेवक स्वतःत बदल करत
नाही तो शहर काय बदलणार?)
5) आपल्या पातळीवर, आपल्या ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये
मित्रांच्या ग्रुपमध्ये आठवड्यातून एक दिवस वैयक्तिक वाहने न वापरण्याचा
एकत्रितपणे निर्णय घ्यायला हवा. आठवड्यातील इतर दिवशीही ‘कारपूलिंग’ करणे, सहज
शक्य असल्यास बस वापरणे हे आवर्जून केले पाहिजे. बदल छोट्या छोट्या पातळीवरूनच
होईल. परिवर्तन खालून वर झाले तरच टिकाऊ होईल.
6) इतर वर्तमानपत्र आणि माध्यमांनी या विषयाबाबत जे
भीषण मौन बाळगले आहे ते तोडायला हवे. याविषयावर, उपक्रमावर इतर माध्यमांनी टीका
केली असती तरी चालले असते. मात्र चर्चा-वादविवाद टाळण्याकडे आपला जर कल असेल तर ते
लोकशाहीला घातक आहे.
7) आज ३ नोव्हेंबर रोजी ‘पीएमपीएमएल प्रवासी दिवस’
होता. सर्व बस डेपोंमध्ये तक्रारी देण्याची खास सोय आज होती. किती राजकीय पक्षांचे
प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले आणि बससेवा सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक काही
केले हे बघणे फार रंजक ठरेल. कारण फ्लेक्स (मुळात पर्यावरण विरोधी मटेरिअल वापरून तयार
केले जाणारे फ्लेक्स!) आणि कापडी फलक लावत गावभर या उपक्रमाला पाठींबा असल्याचे
सांगणाऱ्या राजकीय पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे वर्तन किती पोकळ, उथळ आणि क्षुद्र
होते याची पुरेपूर कल्पना आपल्याला येऊ शकेल. माझ्या माहितीनुसार दर महिन्याला हा पीएमपीएमएल
प्रवासी दिवस असतो. बघुया यापुढे किती राजकीय नेते याकडे लक्ष देतात ते. विशेषतः विरोधी
पक्षीय.
एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही. ज्या सकाळने गुरुवारी पुणेकरांनी वैयक्तिक वाहने वापरणे कमी करून बस वापरावी यासाठी बस दिवसाचे आयोजन केले होते त्याच सकाळने लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ‘सकाळ ऑटो एक्स्पो २०१२’ हे प्रदर्शन आयोजित केले होते. याला दुटप्पीपणा म्हणावे की निव्वळ व्यवसायाचा भाग की अजून काही?
एक मात्र नक्की... तुम्ही आम्ही हात पाय हलवल्याशिवाय काहीही परिवर्तन होणार नाही. कोणीतरी बाहेरून येईल आणि सगळे ठीक करेल ही अपेक्षाच चुकीची आहे आणि आपण काही करून काहीही बदल होणार नाही हा निराशावादही तितकाच भंपक आहे. बदल होणार, आपण काही केले तर बदल नक्की होणार! आणि त्यासाठी राजकीय व्यवस्थेत शिरून प्रयत्न करावे लागतील. यापासून दूर पळून चालणार नाही.
No comments:
Post a Comment