“I believe in America” या वाक्याने गॉडफादर सिनेमाची सुरुवात होते. पण
देशातल्या व्यवस्थेने पैशापुढे हात टेकलेले असतात. आणि एक अन्याय झालेला बाप व्यवस्थेवरचा
विश्वास उडाल्याने न्याय मागण्यासाठी येतो गॉडफादर कडे, डॉन व्हिटो कॉर्लीओन कडे. व्यवस्थेवरचा
विश्वास उडाला की गॉडफादर तयार होणारच!
कोणी एक बिल्डर शहराच्या काठावर असलेल्या एखाद्या गावातील शेतकऱ्याची
जमीन हडप करतो. शेतकऱ्याकडे कोर्टात जाण्याची ऐपत नसते. अशावेळी तो जमिनीवर एकतर
पाणी सोडतो किंवा एखाद्या गॉडफादर कडे जातो. आणि मग हे ‘गॉडफादर’ आपापल्या
लायकीप्रमाणे, उपद्रवमूल्याप्रमाणे बिल्डर लोकांशी चर्चा करतात. अखेर जमिनीच्या
निम्म्या किंमतीत सौदा होतो. शेतकऱ्याला काहीच मिळणार नसते तर त्याला निदान निम्मी
किंमत मिळते. बिल्डर निम्म्या किंमतीत जमीन घशात घालतो आणि हे गॉडफादर लोक या
व्यवहारात बिल्डर लोकांकडून मलई खातात. त्या जोरावर अजूनच सत्ता वाढवतात.
आज चार वर्ष महापालिकेशी संबंधित काम केल्यावर थोडेबहुत अधिकारी
परिवर्तन ला ओळखू लागले आहेत. परिवर्तन चे सदस्य काय म्हणतायत याकडे लक्ष देऊन ऐकू
लागले आहेत किंवा किमान तसा अभिनय तरी करत आहेत. या गोष्टीमुळे एक परिवर्तन सदस्य
म्हणून कधी मला पोकळ बरे वाटलेही. पण नंतर मला वाटले की, केवळ एका गटाचा मी सदस्य
झाल्यावर माझ्या अतिशय सामान्य आणि न्याय्य बोलण्याला महत्व दिले जात असेल तर नागरिक
म्हणून हा माझा पराभव आहे. मला गटाची ओळख सांगितल्याशिवाय सरकारी अधिकाऱ्यांकडून
आणि व्यवस्थेकडून महत्व मिळत नसेल, असे महत्व जे कोणत्याही नागरिकास अगदी सहजपणे
मिळालेच पाहिजे, ते मिळत नसेल तर व्यवस्था पार गंजली आहे असाच त्याचा अर्थ होतो.
पाडगांवकरांनी आपल्या एका कवितेत म्हणले आहे-
झुंडीत असता बरे वाटे,
झुंडीत असता खरे वाटे,
झुंडीत असता त्वरे वाटे,
भडकून उठावे.
एकट्याचे कापती पाय
एकट्याचा होतो निरुपाय
एकट्याची कोठेची हाय
डाळ शिजेना.
नपुंसकही झुंडीत
जाता
पौरुषाच्या करू लागे बाता
कोणासही मी भारी आता
म्हणू लागे.
पुण्यात काही संस्था संघटना अशा आहेत की त्यांनी फोन फिरवले तर वरिष्ठ
अधिकारी अतिशय आदबीने बोलतात, काही तर मिटींगच्या वेळी तर चक्क उठून उभे राहतात.
काही अधिकारी या संस्थांचे लोक आले की ताबडतोब चहा मागवतात आणि गप्पांचा फड
रंगवतात, आणि संस्था अगदी महापालिकेच्या भ्रष्ट आणि भंपक कारभारावर टीका करायला
आल्या असल्या तरी पुरत्या विरघळून जातात. कमिशनरने चहा पाजला आणि तब्बल तासभर आमचे
म्हणणे ऐकून घेतले याचेच या मंडळींना फार कौतुक असते. बाकी बदल घडवणे बाजूलाच
राहते. काहीतरी थातूर मातूर आश्वासन घेऊन हे संस्थांचे प्रतिनिधी बाहेर पडतात. आणि
समाजात यांना कमिशनरच्या मांडीला मांड लावून बसणारे म्हणून उगीचच विलक्षण प्रतिष्ठा
प्राप्त होते. अर्थातच काही सन्माननीय अपवाद आहेत जे असे नाहीत. पण ते अगदी थोडे.
बाकी सगळे मात्र स्वतःला भ्रष्ट आणि किडलेल्या व्यवस्थेकडून काम करून घेऊ शकणारे
गॉडफादर समजतात, किंवा होऊ बघतात. आणि या त्यांच्या प्रयत्नात चार दोन कामे मार्गी
लागत असतीलही नाही असे नाही, पण मुळातली सामान्य नागरिकाला कसलीही किंमत न
मिळण्याची समस्या तशीच राहते.
व्यवस्थेचा भाग असलेलेच लोक गॉडफादर बनू पाहतात किंवा बनतात, तेव्हा
ते स्वतःची सत्ता वाढवण्यासाठी व्यवस्थेला अधिकाधिक कमजोर करायचा प्रयत्न करतात.
शिवाय संस्थांच्यामार्फत मिनी गॉडफादर बनू पाहणारे लोकशाही व्यवस्थेला अधिकच
पोखरतात. नागरिकांना कमजोर करून टाकतात. नागरिक जर सामान्य असेल, कुठल्या झुंडीचा
सदस्य नसेल तर तो सरकारी बाबुंसमोर लाचार बनतो. अशावेळी कोणातरी गॉडफादर वगैरेंसमोर
या बाबूंना लाचार बघून तो नकळतच त्या गॉडफादरचा आधी भक्त आणि मुख्य म्हणजे मतदार
बनतो. आणि या दुष्टचक्रातून लोकशाही व्यवस्था अधिकाधिक पोखरून निष्प्रभ होण्याची
प्रक्रिया घडते आहे. कुठल्याही झुंडीचा झेंडा खांद्यावर न घेता व्यवस्थेकडून न्याय
मिळू शकतो? खरे तर लोकशाही व्यवस्थेत मिळालाच पाहिजे. तो आज मिळत नाहीये हीच मोठी
खेदाची बाब आहे. आणि इथेच आपली लोकशाही किती कमजोर आणि पोकळ आहे याचा अंदाज येतो.
प्रगल्भ समाजात नेता नसतो, तर सगळे ‘मित्र’ असतात. नेता म्हणजे झुंडीचा
भाग बनणे. मग दुसरा नेता नवीन झुंड तयार करतो. पण मित्रत्व (Brotherhood) हे नेतृत्वापेक्षा
आणि नेत्यामागे मेंढरांप्रमाणे जाणाऱ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे, प्रगल्भ आहे.
कारण मित्रत्वाच्या संकल्पनेमध्ये प्रत्येकजण महत्वाचा प्रत्येकाला समान महत्व हे
आधारभूत मूल्य आहे. आणि हेच मूल्य लोकशाहीचाही आधार आहे. झुंडीच्या जोरावर
कोल्हेही वाघाला जेरीस आणतात. साहजिकच लोक कोल्हे बनायचा प्रयत्न करतात. पण आपण कोल्हेही
नाही आणि वाघही नाही. आपण माणसे आहोत, सुसंस्कृत समाजात राहू इच्छितो. बुद्धीचे
वरदान आपल्याला लाभले आहे. आपण ठरवले तर ही झुंडी आणि त्यांचे गॉडफादर निर्माण
करणारी व्यवस्था आपण बदलू शकतो.
हे बदलण्यासाठी आज दोन गोष्टी आहेत ज्या करायला हव्यात. गॉडफादर बनू
पाहणाऱ्या आणि बनलेल्या भंपक राजकारण्यांना आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना सामाजिक-राजकीय
जीवनातून उखडून टाकायला हवे. आणि दुसरे म्हणजे व्यवस्था ही कोणाच्या हातातलं बाहुलं
न बनता ती अधिकाधिक नागरिक केंद्रित बनली पाहिजे. नागरिकांना समर्थ करणारी बनली
पाहिजे. एकटा मनुष्य एका बाजूला आणि उरलेले एकशेवीस कोटी लोक एका बाजूला अशी
परिस्थिती आली तरी या देशात त्या व्यक्तीच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणारी,
लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणारी प्रगल्भ व्यवस्था आपल्याला उभारावी लागेल. काम
फार कठीण आहे. पाच-पन्नास-शंभर-दोनशे वर्षे लागतील हे मिळवायला. पण या दिशेने आपण
जितक्या तीव्रतेने प्रयत्न करू तितकी ही वर्षे कमी होतील असा माझा विश्वास आहे.
आपण कोल्हे बनून जगायचे की माणूस म्हणून जगायचे हा निर्णय आपल्यालाच
घ्यायचा आहे. माझ्यापुरते बोलायचे तर मी एक विवेकी सुसंस्कृत आणि लोकशाही समाजात माणूस
म्हणून जगू इच्छितो.
तुम्ही काय ठरवताय?
तुम्ही काय ठरवताय?
Well said
ReplyDelete