Showing posts with label कुटुंब. Show all posts
Showing posts with label कुटुंब. Show all posts

Monday, April 27, 2026

लोकशाही आणि लग्न

वास्तविक या विषयावर लेख लिहायचं पहिल्यांदा मनात आलं तेव्हा मी स्वतःलाच विचारलं की उगाच ओढून ताणून दोन अत्यंत भिन्न विषय एकत्र आणून मी खिचडी तर करत नाहीये ना? हे दोन्हीही विषय माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत हे कबूल. पण म्हणून त्यांचा परस्पर संबंध असलाच पाहिजे असं थोडीच? त्यानंतर मग माझ्याच मनातल्या सेन्सॉर बोर्डाने लेखाचा हा विषय बराच काळ अडगळीत टाकला. पण लग्न आणि लोकशाही, दोन्ही विषयच एवढे तगडे, एवढे विचार करायला लावणारे आहेत की फार काळ काही ते अडगळीत राहू शकले नाहीत. आणि मग जसजसा मी यावर विचार करू लागलो तसतसं मला जाणवलं की वरवर पाहता अगदी वेगळे भासणाऱ्या या दोन विषयांत अनेक समान धागे आहेत. इतकंच काय त्या दोन्हीचा एकमेकांवर अतिशय मोठा प्रभाव पडत आला आहे. त्याचाच वेध घेण्याचा हा एक प्रयत्न. 


लोकशाहीतले लग्न

लोकशाही ही तशी आधुनिक राज्यव्यवस्था आहे. प्राचीन भारतातली गणराज्य किंवा ग्रीक शहरांतली रिपब्लिक्स यांची कितीही उदाहरणं लोकशाही म्हणून दिली जात असली तरी आज ज्या अर्थाने लोकशाही आपण म्हणतो तशी ती त्या काळी असण्याचे पुरावे नाहीत. असलीच तर ती फार तर Aristocracy किंवा अभिजन वर्गाची कंपूशाही होती. पण सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार असणारी आधुनिक लोकशाही व्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यव्यवस्थांच्या यादीत अगदी अलीकडील व्यवस्था मानावी लागेल. तर या उलट लग्नव्यवस्था! मानवनिर्मित सामाजिक व्यवस्थांपैकी कदाचित सर्वात जुनी असणारी लग्नव्यवस्था! तब्बल दहा-बारा हजार वर्षांचा दांडगा इतिहास या व्यवस्थेला आहे. आजच्या सर्व धर्म, पंथ, भाषा, समाजव्यवस्थांपेक्षाही जुनी व्यवस्था म्हणजे लग्न. साहजिकच जेव्हा नवनवीन धर्म, पंथ, भाषा, रूढी, परंपरा आणि राज्यव्यवस्था तयार होत गेल्या त्या सगळ्यांमध्ये लग्नव्यवस्थेचं नियमन करण्याचा प्रयत्न दिसतो. कोणी कोणाशी लग्न करावे, लग्न केल्यानंतर पुरुषांनी काय करावे, स्त्रियांनी काय करावे, लग्न झालेल्या व्यक्तींचे अधिकार काय, लग्न न झालेल्यांचे अधिकार काय अशा कित्येक कायदे नियमांची चौकट आपोआप जगभरातल्या प्रत्येक समाजात निर्माण होत गेली. या व्यवस्थांमध्ये स्थळ-काळ-परिस्थितीनुसार  बदलही झाले. पण कित्येक बदल झाले तरी लग्नव्यवस्थेने सगळ्या समाजात असणारी आपली मध्यवर्ती भूमिका काही सोडली नाही. इतिहासात लग्नाच्या विषयाने चक्क राज्यव्यवस्थाच काय, पण धर्मव्यवस्थेलाही बदलायला भाग पाडलं. 

अगदी इंगलंडच्या चर्चचं उदाहरण बघा. इंग्लंडचा राजा आठवा हेनरी याने आपल्या कॅथरीन या पत्नीबरोबरचं लग्न संपवण्याची परवानगी पोप कडे मागितली. लग्न ही दैवी गोष्ट आहे आणि ते असं रद्द करता येणार नाही, असं म्हणत पोपने परवानगी नाकारली. पण राजा आठवा हेनरी हट्टालाच पेटला होता. आपल्या अॅन या प्रेयसीशी लग्न करता यावं म्हणून त्यावेळच्या इंग्लंडच्या संसदेत कायदा मांडून पोपचा याबाबत ढवळाढवळ करायचा हक्कच काढून घेतला आणि इंग्लंडच्या स्वतंत्र चर्चची स्थापना केली. हे घडलं इसवी सन १५३४ मध्ये. यानंतर चारशे वर्षांनी पुन्हा इंग्लंडमध्ये असंच लग्नाच्या विषयावरून सत्तांतर झालं. यावेळेस आठव्या हेनरी ऐवजी आठवा एडवर्ड कथेच्या केंद्रस्थानी होता. १९३६ मध्ये राजा एडवर्ड हा वॉलिस सिम्पसन नावाच्या एका घटस्फोटीत स्त्रीच्या प्रेमात होता. तिच्याशी लग्न करू इच्छित होता. पण एका घटस्फोटीत स्त्रीला इंग्लंडची जनता राणी मानणार नाही अशी भूमिका इंग्लंडच्या संसदेने, चर्चने, आणि सरकारने घेतली. आपल्या प्रेयसीशी लग्न की राजपद एवढे दोनच पर्याय उरल्यावर एडवर्डने लग्न निवडलं आणि राजपदावर पाणी सोडलं. 

अशी अनेक उदाहरणं इतिहासात दिसतात. लग्नाच्या नात्यातून राजकीय मैत्री निर्माण करणे हा पूर्वापार चालत आलेला जगभरच्या शासकांचा व्यवहार. लग्नव्यवस्था ही अशी राज्यव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग राहात आली आहे. लग्नविषयक नियम आणि कायदे तयार करणं, ते अंमलात येतील हे बघणं म्हणजे राज्यकर्त्यांची किंवा धर्मांच्या ठेकेदारांची समाजावर पकड असल्याचं निदर्शक. क्रांती झाली, कुठे सत्तांतर झालं की नव्या राज्यकर्त्यांनी लग्नव्यवस्थेविषयक कायद्यांकडे लक्ष वळवलं. नेपोलियनने त्याच्या काळात फ्रान्समध्ये लग्नाचे नवीन कायदे आणले, रशियात क्रांती झाली आणि कम्युनिस्ट लेनिनने सत्तेत आल्या आल्या जुने झारचे लग्नविषयक कायदे रद्द करून नवीन कायदे आणले. याच कम्युनिस्टांची सत्ता जात सोव्हिएत युनियन कोसळल्यावर नवीन लोकशाही रशियात लग्नाचे नवीन कायदे आणले गेले. चीनमध्ये क्रांती झाल्यावर १९५० च्या दशकात लग्नाविषयीचे जुने कायदे माओ त्से तुंगच्या कम्युनिस्ट सरकारने काढून टाकले. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानमध्ये सत्तांतर झालं आणि सत्तेत आलेल्या केमाल अतातुर्क पाशाने इस्लामी शरिया कायदा मोडीत काढून लग्नाविषयीचा आधुनिक कायदा आणला. लग्नाच्या संदर्भातले कायदे हा समाज नियंत्रण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे हे कोणत्याही चाणाक्ष राज्यकर्त्याला माहित असतं. भारतात १८९१ मध्ये लग्नासाठी मुलीचं किमान वय किती असावं याबद्दल ‘ब्रिटीश सरकारने कायदा करावा की न करावा’ हा वाद मोठा गाजला होता. इंग्रज सरकारला याविषयी कायदा करू दिला तर परकीय सरकार अधिक सामर्थ्यवान दिसेल ही लोकमान्य टिळकांची भीती होती. आजही आपल्याकडे उत्तराखंडने ‘लिव्ह-इन’ला लग्नाप्रमाणे कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा केलेला प्रयत्न असो किंवा पळून जाऊन लग्न करणाऱ्यांनी लग्नाची नोंदणी कुठे करायची याविषयी उत्तरप्रदेशचा कायदा असो, किंवा वेगवेगळ्या वेळी आंतरधर्मीय-आंतरजातीय लग्नविषयक कायदे करण्याबद्दल व्यक्त होणारी राजकारण्यांची मतं असो; राज्यकर्ते लग्नाच्या विषयात हात घालायला आणि त्यामार्फत समाज नियंत्रित करण्याला नेहमी तयार असतात. थोडक्यात काय तर जगभरची ही उदाहरणं बघितली तर आपल्या लक्षात येतं की लग्न आणि राजसत्ता यांचा अतिशय घनिष्ट संबंध राहिलेला आहे. 

सर्व सत्ताधाऱ्यांना हा जो नियम लागू होत होता त्यातून लोकशाहीची सुटका कशी होणार? जगभरच्या राजेशाहीची पीछेहाट होत गेली आणि लोकशाही नावाचा एक आधुनिक प्रकार अस्तित्वात आला खरा, पण इतर साऱ्या शाह्यांप्रमाणेच लोकशाहीनेही सर्व समाजाच्या चलनवलनाचा पाया बनलेल्या लग्नव्यवस्थेच्या नियमनात हात घालणं ओघानेच आलं. इतिहासात बहुतांशवेळा बहुतांश देशांमध्ये लग्नव्यवस्थेवर धर्मांचा पगडा होता. आठव्या हेनरीसारखे मोजके अपवाद सोडले तर राजसत्तेने धर्माचा या विषयातला अधिकार मान्य केलेला दिसतो. पण जसजसा एखादा समाज, एखादा देश लोकशाहीकडे जात गेला तसतसं ‘लग्नाला’ धर्मापासून बाजूला काढण्यात राज्यकर्त्यांना यश येत गेलं. लग्न म्हणजे काहीतरी ‘दैवी योजना’ असं बघण्यापेक्षा त्याकडे ‘नागरी सहजीवन’ (Civil Union) असं बघण्याकडे कल वाढू लागला. सुशिक्षित आधुनिक विचारवंत लग्नाला पारंपरिक जोखडातून मुक्त करण्याचा पुरस्कार करू लागले. दोन स्वतंत्र प्रौढ नागरिकांनी एकमेकांसोबत राहण्याचं ठरवणं आणि एकमेकांपासून वेगळंही व्हायचं ठरवणं या गोष्टीला राज्यकर्त्यांनी खळखळ न करता मान्यता द्यावी असा मतप्रवाह वाढू लागला. एकोणीसाव्या शतकापासून जगातल्या अधिकाधिक राज्यव्यवस्था लोकशाहीकडे जाऊ लागल्या. एका बाजूला लोकशाही प्रगल्भ, उदारमतवादी आणि सर्वसमावेशक होण्याचा हा काळ, तर त्याच वेळी समांतरपणे लग्नविषयक कायदेही प्रगल्भ होत जाण्याचा काळ. या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच घडत गेल्या. जगभरच्या परंपरावाद्यांनी उदारमतवादी लग्न कायद्यांना विरोध करायचा भरपूर प्रयत्न केला. पण तरीही लोकशाही देशांत मानवतावादी, समानतावादी लग्न कायदे वेगाने पुढे आले. नागरी सहजीवनाला खुलेपणा आला. लग्न हा दैवी प्रकार नसून एक ‘व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक करार’ आहे असं मानण्यापर्यंत गाडी येऊन पोहोचली. स्वतंत्र भारताचा लोकशाही देश म्हणून प्रवास सुरू झाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं हिंदू कोड बिल हे त्याचंच उदाहरण. अर्थात परंपरावाद्यांनी त्याला कडाडून विरोध केला. इतका की त्या कायद्यातल्या काही तरतुदी वगळून, बदलून मगच कायदा पास झाला. लोकशाहीत लग्नाविषयीचे कायदे करायचे तर ते लोकमताला फार डावलून करणं कठीण असतं. ‘तिहेरी तलाक’चा कायदा आपल्याकडे यायला कित्येक दशकं गेली. अमेरिकेसारख्या उठता बसता वैयक्तिक स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या देशातही लोकमताच्या विरोधात जाऊन लग्नाविषयीचे अधिक उदारमतवादी कायदे करण्याचं धाडस तिथल्या राज्यकर्त्यांना झालं नाही. पण लोकशाहीची गंमत ही असते की संसद किंवा सत्ताधारी बेलगाम नसतात. किंबहुना लोकशाहीला निव्वळ बहुमताची झुंडशाही बनू द्यायचं नसेल तर एकमेकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांची आवश्यकता असते. इंग्रजीत याला ‘A System of Checks and Balances’ म्हणतात. सुदृढ लोकशाहीमध्ये माणसाच्या मूलभूत हक्कांना हरताळ फासणारे नियम-कायदे यांना आव्हान देण्यासाठी न्यायालयाचा आधार घेता येतो. त्यामुळेच अमेरिका असो किंवा भारत, जे काम करण्याची हिंमत संसदेतले नेते दाखवू शकले नाहीत ते करण्यासाठी न्यायालये सरसावली. २०१५ मध्ये अमेरिकेत आणि २०१८ मध्ये भारतात न्यायालयांनी निकाल देत समलैंगिक संबंधांना संरक्षण दिलं. भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई अजूनही चालू आहे.  

माणसाच्या इतिहासात शेतीचा शोध लागून माणूस स्थिरावला आणि गावं वसवून राहू लागला, त्याबरोबर लग्नव्यवस्थेचा उदय झाला असं तज्ज्ञ मानतात. लग्नाने निर्माण होणारं कुटुंब हे संपूर्ण समाजव्यवस्थेचं मूलभूत एकक बनलं. आधुनिक लोकशाहीने मात्र प्रत्येक व्यक्तीला समाजाचं मूलभूत एकक मानलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं, मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लोकशाहीवर येते. स्वाभाविकच पारंपरिक लग्नव्यवस्थेमध्ये, लग्नविषयक कायद्यांमध्ये एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे व्यक्तीवर अन्याय होत असेल तर लोकशाही मूल्यव्यवस्था विरुद्ध परंपरावाद असा झगडा उभा राहतो. आत्तापर्यंत तरी लोकशाहीचाच विजय झाल्याची उदाहरणं जगभर जास्त संख्येने सापडतात. द इकोनॉमिस्टच्या ‘जागतिक लोकशाही निर्देशांकात’ जे देश सर्वात वरती आहेत तिथले लग्नविषयक कायदेही प्रगल्भ, खुले आणि अधिक मानवतावादी असल्याचं आपल्याला दिसून येतं. लग्नव्यवस्थेशी संबंधित कायदे म्हणजे त्यात लग्न, लग्न झालेल्या व्यक्तींचे विशेषतः स्त्रियांचे हक्क, घरगुती हिंसाचार, वारसाहक्क, दत्तक घेण्याचे अधिकार, घटस्फोट अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. लोकशाही निर्देशांकात पहिल्या सर्वच्या सर्व २५ देशांमध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता आहे, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कठोर उपाययोजना आहेत, घटस्फोट घेणे न्याय्य आहे, वारसाहक्क अधिक व्यापक आहे, नवरा बायको नात्यात समानतेला अधिक महत्त्व आहे. 

हा निव्वळ योगायोग नाही. लोकशाही आणि लग्नव्यवस्था यांचा दृढमूल संबंध आहे. किंबहुना एखाद्या देशातली लोकशाही किती प्रगल्भ आहे हे तपासायचं असेल तर तिथले लग्नविषयक कायदे बघावेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही!


लग्नातली लोकशाही

लग्नव्यवस्था निर्माण झाली ती शेतजमीन, घर या स्थावर मालमत्तेबाबत वारसाहक्क निश्चिती करण्यासाठी. पुरुषांना आपला वारस कोण हे नेमकं कळण्यासाठी स्त्रीला एकाच पुरुषाबरोबर बांधणे आवश्यक ठरले, त्यातून लग्नव्यवस्था उदयाला आली, असं तज्ज्ञ मांडतात. संततीला जन्म देणे, त्या संततीचे संगोपन करणे आणि मग त्या नव्या जीवाला मोठं झाल्यावर वारसाहक्काने संपत्ती मिळणे हा लग्नाचा उद्देश. सुमारे इ.स.पूर्व २३०० मध्ये असिरीयन संस्कृतीतली लग्नाचा करार लिहिलेली मातीची भाजलेली पाटी म्हणजे इतिहासातला आत्तापर्यंत सापडलेला लग्नविषयक पहिला लेखी पुरावा. ल्युकीपम आणि हताला या दोन व्यक्तींमधला हा लग्नविषयक करार आहे. त्यात असं म्हणलं आहे की ‘लग्नाच्या तारखेपासून दोन वर्षात बायकोला संतती न झाल्यास नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीकडून संतती मिळवण्याचा अधिकार असेल.’ बहुतांशवेळा एखाद्या दासीकडून अशाप्रकारे संततीप्राप्त केली जात असे. त्या काळातली ही ‘सरोगसी’! याच लग्न करारनाम्यात पुढे घटस्फोटाविषयीही लिहिले आहे. नवरा बायको यापैकी कोणीही घटस्फोट देण्याचे ठरवल्यास दुसऱ्याला चांदीच्या पाच मुद्रा देण्याचं आश्वासन यात आहे. साक्षीदार म्हणून चार अजून व्यक्तींची नावंही कोरलेली आहेत. लग्नाबद्दलच्या या पहिल्या वहिल्या ऐतिहासिक पुराव्यातून लग्नाचा सर्वात मुख्य हेतू संततीप्राप्ती हाच असल्याचं अधोरेखित होतं. दोन हजार वर्षांपूर्वीच्या ग्रीक लग्नांमध्ये मुलीचे वडील आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात देताना ‘औरस संततीप्राप्तीसाठी मी माझी मुलगी तुला देत आहे’ अशा आशयाचं वक्तव्य करत. भारतात तरी वेगळं काय होतं? अगदी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या लग्न निमंत्रणपत्रिकेत ‘शरीरसंबंध चिरंजीव अमुकअमुक यास वर नेमस्त केले आहे’ असा स्पष्ट उल्लेख  असे. 

लग्न हा एक व्यवहार असल्याचं आपल्या जगभरच्या पूर्वजांनी मानलं. लग्नाचं व्यवस्थाकरण करायचं तर त्यात प्रत्येक व्यक्तीची नेमकी भूमिका ठरवणं ओघानेच आलं. पाठोपाठ स्त्रीला दुय्यम स्थान मिळालं.  कमावता पुरूष आणि घर-मुलं याकडे बघणारी स्त्री अशी कामाची विभागणीही केली गेली. राजसत्तेमध्ये ज्याप्रमाणे राजा सर्वशक्तिमान होता, त्याचप्रमाणे कुटुंबाच्या राज्यात घरातला कर्ता पुरूष सर्वशक्तिमान होता. औद्योगिक क्रांतीनंतरच्या यंत्रयुगात माणसं आपल्या कामानिमित्त गावांकडून शहरांकडे गेली आणि कुटुंबाची व्यक्तीवर असणारी सत्ता सैल पडली. स्वतंत्र व्यक्तीच्या मताला, आकांक्षांना धुमारे फुटू लागले. याच काळात फुलणाऱ्या लोकशाही व्यवस्थांनी या गोष्टीला हातभार लावला आणि त्याचे स्वाभाविक पडसाद लग्नव्यवस्थेवर पडू लागले. बाहेरच्या दुनियेत राजसत्ता उलथवून न्याय, समता आणि स्वातंत्र्याचे नगारे वाजू लागल्यावर घरातल्या पुरुषी सत्तांना आव्हान दिलं गेलं नसतं तरच नवल! आज एकविसाव्या शतकात लग्नाचं, कुटुंबाचं लोकशाहीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचं प्रमाण कमी जास्त आहे. ग्रामीण शहरी भागानुसार ते वेगळं आहे, जाती-धर्मानुसार त्यात फरक आहे, शिक्षणानुसार या लोकशाहीकरणाचं प्रमाण भिन्न आहे. काहीजण लोकशाहीकरणाच्या या मार्गावर पुढे आहेत, तर काही थोडे मागे आहेत. पण जगभरच्या अर्थकारण आणि तंत्रज्ञान या गोष्टींमुळे बदललेल्या परिस्थितीचा रेटाच असा की (तालिबानी वृत्तीचे लोकसमूह वा देश वगळता) सर्वच समाजातील लग्नव्यवस्थेचा प्रवास लोकशाहीकरणाकडे होत आहे.     

लोकशाही म्हणजे निवडणुका असा काहींचा गैरसमज असतो. वास्तविक निवडणूक हा लोकशाहीमधला केवळ एक भाग आहे. लोकसंख्या जास्त असताना प्रत्येक छोटा मोठा निर्णय सगळ्यांनी एकत्र बसून घेणं शक्य नसतं, त्यामुळे दैनंदिन निर्णय घेण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो. निवडणूक ही लोकशाही यंत्रणेतली एक सोय आहे फक्त- पूर्ण लोकशाही नव्हे. लोकशाहीचा अर्थ हा की प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची. प्रत्त्येक व्यक्तीला न्याय, समानता, सन्मान आणि स्वातंत्र्याची हमी. लोकशाही म्हणजे वैविध्याला आणि मतभेदांना सुरक्षित अवकाश. लोकशाही म्हणजे समस्यांवर हिंसेने नव्हे तर चर्चेने तोडगा काढण्यासाठीची यंत्रणा. लोकशाही व्यवस्था ही प्रतिक्रियावादी नसून रचनात्मक आहे. त्यामुळे लग्नात, सहजीवनात आणि अर्थातच कुटुंबात लोकशाही येणे असं मी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ निव्वळ परंपरावादी पुरूषसत्ताक व्यवस्थेला आव्हान दिलं की झालं असं नव्हे. एकविसाव्या शतकात तर लग्नव्यवस्था आणि एकूणच मानवी नातेसंबंध अधिकच गुंतागुंतीचे झाले आहेत. पूर्वापार चालत आलेल्या लग्नात नवरा-बायको यांची परंपरेने, धर्माने आणि सामाजिक चालीरीतींनी जी भूमिका ठरवली, जी नियमावली ठरवली होती ती तर आता लोकशाहीकरणात कालबाह्य ठरते आहे. पण पुढची समस्या ही की जुनी कालबाह्य झाली आणि नवीन नियमावली मात्र अस्तित्वात नाही! 

जुन्या नियमावलीने लग्नाचा नवीन खेळ खेळता येणं तर शक्य नाही. म्हणजेच नवीन नियम बनवायला हवेत. आजच्या काळातलं माझं लग्न कसं असावं, त्यातली नवरा आणि बायको यांची भूमिका कशी असावी, त्यांच्या सहजीवनात त्यांच्या पालकांसह इतर नातेवाईकांची भूमिका कशी असणार आहे, पुढे होणाऱ्या संततीबाबत तिला वाढवताना घ्यायचे निर्णय घेताना काय धोरण असणार आहे, मूळात संतती होऊ द्यायची का; असे असंख्य विषय आहेत ज्याबाबत नवीन मांडणी करावी लागणार आहे. ही मांडणी कोणी राजसत्ता, वा धर्मसत्ता करेल अशी शक्यता नाही. आणि त्यांनी तसं करायचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट जागतिकीकरणाच्या या काळात टिकणारी नाही. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या लग्नाची स्वतःची अशी एक नियमावली तयार करावी लागणार आहे. 

लोकशाहीत एखादा कायदा किंवा नियम करायचा तर त्याचा प्रस्ताव तयार होतो, मग मसुदा तयार केला जातो, मग तो संसदेत मांडला जातो, त्यावर कधी संसदेच्या समितीकडून अभ्यास केला जातो, कधी लोकांसमोर खुला करून सूचना मागवल्या जातात, या सगळ्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये कायदा मांडला जातो, त्यावर चर्चा होते, मग तो पास होतो आणि एवढं सगळं झाल्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन कायदा अस्तित्वात येतो! लग्नातल्या लोकशाहीत लग्नाचे नियम तयार करायचे तर नवरा-बायको यांनी एकत्र बसून आपले नियम ठरवावे लागतील, चर्चा करावी लागेल, कधी नातेवाईक मित्र मंडळी यांच्या सूचना मागवून त्यावर विचार करावा लागेल, त्या सगळ्या गोष्टी नक्की करून अंमलात आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करावे लागतील. कधी तुम्हीच ठरवलेल्या नियमांत दुरुस्तीही करावी लागेल, कधी ते पूर्णपणे बदलावे लागतील. आणि त्याची सातत्याने तयारी ठेवावी लागेल. ही सगळी प्रक्रिया वाटते तेवढी सर्वांसाठी सोपी नाही. प्रश्न न विचारता परंपरा, रूढी, आज्ञा पाळायची सवय असलेल्या व्यक्तीला आपापले नियम करायचे आहेत ही गोष्ट दिशाहीन करणारी वाटू शकते. आज लग्नाच्या तथाकथित वयात असणाऱ्या मिलेनियल जनरेशनमध्ये जे गोंधळलेपण दिसतं ते याचमुळे! 

लोकशाहीत आवश्यक असणारेच गुण आपण लग्न आणि मानवी नातेसंबंधांमध्ये लागू करायचा प्रयत्न केला तर लग्नातली लोकशाहीही फुलेल. पारदर्शकता, समानता, प्रामाणिकपणा, विश्वास, सन्मान या तर मूलभूत गोष्टी आहेतच. पण त्याबरोबर एक अत्यंत महत्त्वाची गोष्टी आजच्या लग्नात अत्यावश्यक आहे- ती म्हणजे म्हणजे चर्चेचं कौशल्य आत्मसात करावं लागेल. ‘माझं म्हणणं तेच अंतिम सत्य’ या एकाधिकारशाहीकडे झुकणाऱ्या विचारांना मूठमाती द्यावी लागेल. समोरची व्यक्ती स्वतंत्र आहे, तिचं काही एक म्हणणं असू शकतं, तेही योग्य असू शकतं, या शक्यतांचा आदर करावा लागेल. ‘थोडं तू पुढे ये, थोडं मी पुढे येतो; दोघं मिळून मध्यममार्ग काढू’ असं म्हणतच पुढे जावं लागेल. हे झालं तरच वेगळं मत असण्याला सुरक्षित अवकाश निर्माण होईल, आणि समानतेच्या पातळीवरून परस्पर आदरावर आधारित नातं फुलेल. कोणाला आवडो वा न आवडो, लग्नात लोकशाही आली आहे, येणारच आहे. आता त्या लोकशाही मूल्यव्यवस्थेला तालिबानी पद्धतीने विरोध करायचा की, लग्नातली ही लोकशाही अधिक सुदृढ करत, नातं सुंदर करत, प्रत्येकाने एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून समृद्ध आणि आनंदी व्हायचं; हा निर्णय आपल्याला करायचा आहे! 

हुकुमशाही असो किंवा घरातल्या एका व्यक्तीची एकाधिकारशाही या गोष्टी वरवर पाहता आकर्षक वाटू शकतात. त्या व्यवस्था वेगवान असतात, कार्यक्षम असण्याची शक्यता असते, शिवाय कोणा एकावर जबाबदारी टाकून बाकीच्यांना डोकं वापरण्याच्या कामातून मुक्त होता येतं. पण आपण काय रोबो नाही. गुलाम तर नाहीच नाही. माणसामाणसांतल्या सुदृढ आणि निकोप नात्यांची आपल्याला ओढ आहे. त्याचीच संधी लग्नातली आणि राज्यव्यवस्थेतली लोकशाही आपल्याला देते. एकमेकांच्या साथीने, चर्चेने, कधी वादही घालत, एकत्र काहीतरी व्यवस्था उभारणं, त्यातल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणं, धडपडणं, त्यातून काहीतरी शिकणं, पुन्हा नव्याने प्रयत्न करणं आणि या सगळ्या प्रक्रियेत एकत्र असल्याने नाती प्रगल्भ होत जाणं; हे आपल्याला व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून, देश म्हणून समृद्ध करत जाणारं आहे. ही प्रक्रिया मला तर अगदी मोहवून टाकते, तुम्हाला?! 

(साप्ताहिक सकाळच्या २०२५ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध)


Friday, May 17, 2024

नात्यातल्या ‘स्पेस’चं गौडबंगाल...

अपेक्षांबद्दल बोलताना कोणत्याही लग्नाळू मुलाकडून किंवा मुलीकडून बोलण्यात हमखास येणारा शब्द म्हणजे ‘स्पेस’. नात्यात स्पेस देणारी व्यक्ती जोडीदार म्हणून सर्वांनाच हवी आहे. हे स्पेसचं गौडबंगाल नेमकं आहे काय? स्पेस देणं म्हणजे नेमकं काय हे मुला-मुलींना फार तपशीलांत नीट सांगता येत नाही आणि पालक तर याबाबत अजूनच गोंधळलेले दिसतात. पण हा मुद्दा जसा लग्नाआधी महत्त्वाचा आहे तसा कित्येक घटस्फोट प्रकरणांमध्येही प्राधान्याने बोलला जातो. आणि म्हणून लग्न टिकवणे आणि फुलवणे यासाठीही या ‘स्पेस’च्या विषयात खोलवर डोकवून गांभीर्याने बघणं आवश्यक आहे.

स्पेस म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर काही गोष्टी या फक्त माझ्या आणि व्यक्तिगत असू शकतात याला असणारी मान्यता आणि त्या गोष्टींसाठी अवकाश. आता या ‘काही गोष्टीं’मध्ये काय काय येतं? दोन व्यक्ती लग्न करतात तेव्हा ते एक प्रकारे स्वतःकडे असणारे स्रोत (रिसोर्सेस) वाटून घेण्याचं, शेअर करायचं ते मंजूर करतात. यात वेळ, ऊर्जा, माहिती, पैसा आणि प्रत्यक्ष स्पेस म्हणजे जागा (घर) या प्राथमिक गोष्टी झाल्या. समाजातलं एकमेकांचं, एकमेकांच्या कुटुंबांचं नेटवर्क, गुडविल हे रिसोर्सेसही वाटून घेतले जातात. पैसा आजपेक्षा उद्या जास्त-कमी मिळू शकतो, घर आज आहे त्यापेक्षा उद्या मोठं असू शकतं, ऊर्जा देखील मन आणि शरीराच्या तंदुरुस्तीनुसार वर खाली होऊ शकते. पण वेळ? ती एक गोष्ट अपरिवर्तनीय आहे. सर्वांसाठी दिवसाचे २४ तासच आहेत. वेळ नावाचा स्रोत मर्यादित असल्याने असेल कदाचित, पण ‘स्पेस’ बाबतच्या बहुसंख्य चर्चा एकमेकांना द्यायचा वेळ आणि स्वतःसाठी घ्यायचा वेळ या मुद्द्यांपाशी येऊन थांबताना मला दिसतात. पूर्वीच्या काळी स्त्री-पुरुष दोघांनाही व्यक्तिगत स्पेस किंवा प्रायव्हसी नावाचा प्रकार फारसा उपलब्ध नव्हता. जरा सुखवस्तू घरांमध्ये पुरुषांना ही चैन थोडीफार तरी उपलब्ध होती, स्त्रियांची मात्र सरसकट मुस्कटदाबी होती. विसाव्या शतकापासून हे चित्र टप्प्याटप्प्याने बदललं आणि एकविसाव्या शतकात तर खूपच बदल झाला. गेल्या शंभर वर्षांत ज्या प्रकारे अर्थकारणाने गती घेतली, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही कामासाठी घराबाहेर पडू लागल्या, तशी स्वतःच्या पैशाबाबत, स्वतःच्या वेळेबाबत स्वतःहून ठामपणे निर्णय घेण्याची स्त्री-पुरुष दोघांचीही ऊर्मी बळावली. त्यातूनच स्पेस देणाऱ्या जोडीदाराची अपेक्षा डोकावू लागली.

‘आता माझा सगळा वेळ तुझा, आणि सगळं एकत्र करू’ अशा कितीही आणाभाका लग्न करताना घेतल्या तरी व्यवहारात असं थोडीच होणार आहे? नोकरी, व्यवसाय असो किंवा अगदी घरगुती कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं असो; नवरा-बायको काय सदैव एकत्र नसतात. पण त्याबद्दल कोणी कधी आक्षेप घेत नाही. का नाही घेत? कारण तेच व्यावहारिक आहे हे सर्वमान्य आहे. पण काही गोष्टी या नवरा-बायकोने एकत्रच केल्या पाहिजेत अशी समजूत वर्षानुवर्षाच्या आपल्या मनावर ठसली गेलेली असते. ‘आणि ते नसेल तर लग्नच कशाला केलं?’ असा सवालही केला जातो. एक प्रकारे, त्या गोष्टी जोडप्याने एकत्र केल्या तरच त्यांच्या नात्याला अर्थ आहे असं मानलं जातं. गंमत अशी आहे की की यातल्या ‘त्या गोष्टींची’ यादी प्रत्येकाची वेगळी असू शकते. ती काळानुसार बदलते देखील! पूर्वीच्या काळी कॉफी शॉप मध्ये जाणं, हॉटेलात जाणं या गोष्टी आपल्या जोडीदाराबरोबरच कराव्यात असा प्रघात होता. आता ते उरलेलं नाही. म्हणजेच माझ्याकडे असणारे वेळ आणि पैसे यातले थोडे रिसोर्सेस मी लग्नाचा जोडीदार सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करणं हे आधीपेक्षा आता जास्त सहज स्वीकारलं जातंय. किंवा लग्नानंतर काही वर्षांनी हळूहळू नवरा-बायको सदैव एकत्र राहायचा प्रयत्न करण्याऐवजी अनेक गोष्टी एकमेकांशिवाय स्वतंत्रपणे करू लागतात. कालानुरूप नात्यांत झालेला हा बदल असतो. ही फक्त छोटीशी उदाहरणं दिली. पण यातून लक्षात येईल की स्पेसची मर्यादा एकदा ठरवली की काळ्या दगडावरची रेघ असा प्रकार नसतो. ती गोष्ट प्रवाही असते, बदलती असते, आजकालच्या भाषेत ‘Fluid’ असते. त्यामुळेच नुसत्या ‘मला स्पेस हवी’ या वाक्याला फारसा अर्थ नाही. आज प्रत्येक व्यक्तीला स्पेस आहेच. फक्त तुमची स्पेसची व्याख्या किती विस्तारलेली आहे हे बघायला हवं. आणि त्यासाठी मला स्पेस हवी म्हणजे नेमकं काय हवं, ते का हवं आहे याची स्पष्टता हवी.

एकदा स्पेस हवी म्हणजे नेमकं काय हवं आणि ते का हवं याची स्पष्टता आली की मग पुढचा फार महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे संवादाचा. एकविसाव्या शतकातली लग्न आधी असायची तशी सरधोपट असणार नाहीत. बदललेल्या जगातली नाती बहुरंगी, बहुढंगी आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच व्यक्ती व्यक्तीनुसार नात्यांच्या तऱ्हा बदलणार आहेत. पन्नास शंभर वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येकाचं काम ठरलेलं असायचं. तेच त्याने किंवा तिने करायचं ही रीत होती. अपवाद सोडून देऊ, पण रुळलेली वहिवाट हाच जगण्याचा मार्ग मानणारे बहुसंख्य होते. पण जगण्याच्या नवनवीन वाटा आजकालच्या पिढीने शोधल्या आहेत. यामध्ये नोकरी-व्यवसायाच्या वाटा तर आहेतच, पण मनोरंजनाच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, छंद-आवडी यातल्या आहेत. आता जेव्हा सरधोपट मार्ग सोडून आपण आडवाटेला लागतो तेव्हा अधिक कष्ट घ्यावे लागतात. कधी नवीन मार्ग तयारही करावे लागतात. आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद. आपल्या जोडीदाराशी दिलखुलास, मनमोकळा संवाद साधून आपल्याला स्पेस हवी म्हणेज नेमकं काय हवं ते सांगणं, त्यावर समोरच्याचं मत ऐकणं, विचारांची देवाणघेवाण करणं; आणि या सगळ्यातून विश्वासाचा पाया रचणं. त्या पायावरच स्पेसचा डोलारा उभा असणार आहे. हे नात्याच्या सुरुवातीला एकदाच करून पुरेसं नाही. कारण आपण बदलतो! तुम्ही, मी, आपले जोडीदार, आपल्यातली प्रत्येक व्यक्ती ही दोन वर्षांपूर्वी होती तशीच्या तशी असत नाही. आपल्याला येणाऱ्या भल्या बुऱ्या अनुभवांमुळे, नवीन शिक्षणामुळे, बघितलेल्या-वाचलेल्या-ऐकलेल्या नवीन गोष्टींमुळे, वयामुळे आपण सतत बदलत असतो. आणि म्हणून संवादाची ही सगळी प्रक्रिया निरंतर चालू ठेवण्याला पर्याय नाही.

संवादाला धरूनच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘जोडप्याची प्रायव्हसी’. आपण वैयक्तिक बाबतीत खाजगीपणाविषयी बोललो. पण खाजगीपणा ही गोष्ट जोडप्यांना आणि कुटुंबांनाही लागू होते. म्हणेज एखाद्या जोडप्याने त्यांच्यातल्या किती आणि कोणत्या गोष्टी तिसऱ्या व्यक्तींसमोर उघड करायच्या, लग्नानंतर निर्माण झालेल्या त्यांच्या दोघांच्याच ‘स्पेस’ मध्ये तिसऱ्या व्यक्तीला वा व्यक्तींना किती आतपर्यंत येऊ द्यायचं हे त्या दोघांनी एकमेकांशी संवाद साधून ठरवायला हवं. प्रत्येक नात्याची आपापली एक स्पेस तयार होत असते. नवरा-बायकोसारख्या जवळीक असणाऱ्या (intimate) नात्यांत हे अवकाश जपणं, निरोगी राखणं अत्यावश्यक असतं. एकमेकांचे आई-वडील, नातेवाईक, जवळचे मित्र-मैत्रिणी यांना आपल्या दोघांच्या स्पेसमध्ये किती येऊ द्यायचं याविषयी चर्चा व्हायला हवी. नवीन नात्यासाठी तर हे अधिकच महत्त्वाचं.  

‘स्पेस’ची अपेक्षा ही नजीकच्या गेल्या काही दशकांमधली असल्याने ‘ही सगळी आजकालच्या मुलांची थेरं/फॅड्स आहेत’ असं म्हणत पटकन टीकाटिप्पणी करण्याचा मोह आधीच्या पिढीतल्या अनेकांना होऊ शकतो. स्पेस मिळण्याची, व्यक्तिगत अवकाश जपण्याची शक्यता आणि संधी गेल्या काही दशकांत वाढली असली तरी माणसाची प्रायव्हसीची गरज आदिम आहे. अगदी प्राचीन इतिहासातही याविषयी मंथन झालेलं आढळतं. काय खाजगी मानावं आणि काय नाही याचे नियम आडाखे बदलत गेलेले दिसतात. आपण सामाजिक प्राणी असलो तरीही स्वतःबरोबर वेळ घालवण्याची आपल्याला आवड असते. आणि तो वेळ कसा घालवायचा हे फक्त आपण ठरवतो. कधीही कोणाला न दाखवता केवळ स्वतःपुरती कविता करणारी एखादी आजी आपल्याला माहित असते बघा! तेव्हा हे काहीतरी नवीन ‘फॅड’ नसून मानवी गरज आहे हे नक्की.

एकुणात ‘स्पेस’ या गोष्टीकडे थोडं खोलात जाऊन बघणं गरजेचं आहे. नात्यात आवश्यक वाटणारी स्पेस निर्माण करण्यासाठी दोघांमध्ये निकोप संवाद असेल, सहभाग असेल तर अशी स्पेस नात्यासाठी आणि अर्थातच व्यक्तीशः दोघांसाठीही वरदान ठरू शकते. तेव्हा याकडे ‘कुठली ही नवी ब्याद’ असं न बघता सकारात्मकपणे बघितलं पाहिजे.

(दि. ६ मे २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)

Thursday, April 11, 2024

अपेक्षा ठरवताना...

‘लापता लेडीज’ नावाचा एक सुंदर सिनेमा नुकताच येऊन गेला. त्यातल्या एका प्रसंगात सून आपल्या सासूने केलेल्या भाजीची स्तुती करते आणि त्यावर सासू ‘इश्श, स्वयंपाकाचं कौतुक थोडीच करतात’, असं म्हणत ते हसण्यावारी नेते खरी. पण सासूला ते कौतुक मनापासून आवडलेलं असतं. आणि मग ती सांगते की तिच्या माहेरी ती भाजी वेगळ्या पद्धतीने केली जायची जे तिला फार आवडायचं, पण इकडे सासरकडच्या मंडळींची वेगळी पद्धत होती. सून म्हणते की तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने भाजी करत जा की! सासू यावरही हसते आणि मग म्हणते, ‘खरंतर इतक्या वर्षात एवढं काय काय बदललं आहे की आता माझं मलाच लक्षात नाही की मला काय आवडत होतं.’ हे वाक्य पडद्यावरच्या सासूने उद्गारलं तेव्हा थिएटरमध्ये बसलेल्या तमाम स्त्रियांच्या तोंडून संमतीदर्शक उसासे बाहेर पडले. त्यांचा आवाज जाणवण्याइतका मोठा होता!

आज माझ्या पिढीच्या म्हणजे लग्नाळू वयातल्या मुला-मुलींच्या मनात लग्नाविषयीची जी काही भली-बुरी प्रतिमा असेल ती कशी बरं निर्माण होते याचा विचार केला तर त्याचं सर्वात पहिलं उत्तर म्हणजे त्यांचे आई-वडील. या मुला-मुलींनी त्यांच्या आई-वडिलांना स्वतःच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना ऐकलं आहे. “खरंतर मला अमुक अमुक करायचं होतं, पण लग्न झालं आणि राहून गेलं...”, “लग्न झाल्यावर ती एक इच्छा अपुरीच राहिली...”, “मला अमुकतमुक फार आवडायचं, पण लग्नानंतर ते करता आलं नाही...”, “मी माझा हा छंद जोपासायचो, पण लग्न झालं जबाबदाऱ्या आल्या आणि ते मागेच पडलं...”, “मी होते म्हणून निभावून नेऊ शकले,” ही आणि अशी अनेक वाक्यं कानावर पडतच ही पिढी मोठी झाली आहे. त्यांच्या मनात ‘लग्न ही एक जखडून टाकणारी व्यवस्था आहे’ किंवा ‘लग्न झालं की आवडीच्या गोष्टी सोडाव्या लागतात’ हा विचार मनात घर करणार हे स्वाभाविक नाही का? लग्न ही सुंदर गोष्ट आहे, लग्नामुळे माझ्या आयुष्यात काहीतरी मोलाची भर पडली असं ठासून म्हणणारे पालक विरळाच. याचा अर्थ सगळे स्वतःच्या संसाराला नावं ठेवतात असं नव्हे. किंबहुना बहुसंख्य पालक असंच म्हणतात की त्यांचं वैवाहिक जीवन छान आहे. पण वेगळे काही निर्णय घेतले असते तर आपल्या आयुष्यात याहून अधिक काहीतरी चांगलंही होऊ शकलं असतं, हा न उच्चारला जाणारा संवादही मुलं-मुली ऐकत असतात. मुला-मुलींच्या डोळ्यासमोर लग्नाच्या नात्याची, सहजीवनाची सर्वात पहिली आणि सर्वात जवळून बघण्यात असणारी ही प्रतिमा आहे. आपण वाचून-ऐकून-पाठांतर करून शिकतो त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी, जास्त प्रभावीपणे निरीक्षणातून शिकत असतो. पहिला शब्दही बोलता येण्याच्या आधीपासून आपण आपल्या आईवडिलांचं सहजीवन बघत मोठं होत असतो. आपण त्यातून जे शिकतो, त्याचं जे आकलन होतं त्याचा स्वाभाविक परिणाम आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवताना होत असतो.

पण गंमत ही की त्याचा सरसकट समान परिणाम होत नाही. म्हणजे जो परिणाम मुलावर होईल तोच मुलीवर होईल असं नाही. किंवा जो परिणाम सांगलीमधल्या मुलीवर होईल तोच पुण्यातल्या मुलीवर होईल असं नाही. कारण बघितलेल्या गोष्टींवर प्रक्रिया करण्याची पद्धत आणि क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. उदाहरणार्थ विचार करा की, एक घर आहे जिथे वडिलांना चहा अगदी हातात आणून देणारी आई आहे, ती जेवायलाही वाढते, जेवणानंतर स्वयंपाकघरातली आवराआवरही करते. आता अशा घरातल्या लहानपणापासून हे सगळं बघणाऱ्या मुलाला असं वाटण्याची शक्यता अधिक आहे की माझ्या बायकोने माझ्यासाठी हेच केलं पाहिजे. त्याच घरातल्या त्याच्या बहिणीला असं वाटू शकेल की लग्नानंतर हे असं करावं लागणार असेल तर मला मुळीच लग्न करायचं नाही! किंवा अजून एखाद्या मुलीला वाटेल की हे असंच असतं आणि मीपण हेच करायचं आहे. अशा अजून कितीतरी शक्यता आहेत! हे घडणं स्वाभाविक जरी असलं तरी आई-वडिलांच्या सहजीवनाबद्दलची आपली मतं, त्या आधारे तयार झालेली लग्नाविषयीची आपली मतं तर्काच्या कसोटीवर तपासून घ्यायला हवीत. यामध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही मतं आली. आपल्या आई-वडिलांचं सहजीवन अतिशय सुंदर आहे असं वाटत असेल तरी तो तुमच्या स्वतःच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवताना आधार म्हणून घेणं धोक्याचं आहे! आपल्या आई-वडिलांचं लग्न ज्या काळात झालं, तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लग्नाच्या नात्याकडून काय हवं ही अपेक्षाही कालानुरूप बदलत गेली आहे.

अनेकदा आम्हाला दिसून येणारी एक गोष्ट म्हणजे नवऱ्याबद्दल अपेक्षा ठरवताना वडिलांबद्दल असणाऱ्या प्रतिमेशी तुलना करणाऱ्या मुली आणि बायकोबद्दल अपेक्षा ठरवताना आईबद्दलच्या आपल्या डोक्यातल्या प्रतिमेशी तुलना करणारी मुलं. पन्नाशी-साठीला पोचलेल्या आपल्या आई-वडिलांकडे बघून पंचविशी-तिशीमधल्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे? या अशा अपेक्षांना खतपाणी घालणं पालकांनी देखील टाळायला हवं. “मला माझ्या वडिलांसारखा कर्तृत्ववान मुलगा नवरा म्हणून हवा” असं आपल्या मुलीचं वाक्य ऐकून किंवा “माझ्या आई सारखी घर, कुटुंब, काम सगळं सांभाळणारी प्रगल्भ बायको हवी” असं आपल्या मुलाच्या तोंडून ऐकून आई-वडिलांना अगदी भरून येतं. आपल्या मुला-मुलीला आपली कदर आहे याचं त्यांना बरं वाटतं. ते स्वाभाविकच आहे. पण अशावेळी पालकांनी हे सांगणं गरजेचं आहे की ‘आई’ म्हणून किंवा ‘वडील’ म्हणून मी वेगळा असतो; ‘बायको’ किंवा ‘नवरा’ म्हणून मी वेगळा असतो. तेव्हा ‘पापा की परी’ आणि ‘आईचा लाडका सोन्या’ या दोन्ही वर्गवारीत बसणाऱ्या मुला-मुलींनी त्यातून बाहेर येऊनच आपला जोडीदार शोधणं आवश्यक आहे.

आपण मोठं होताना अनेक जोडप्यांना बघत असतो. आई-वडील हे सगळ्यात जवळून आणि लहानपणापासून बघितलेलं जोडपं त्यामुळे त्यांचा परिणाम मोठा असतो. पण जसजसे मोठे होत जातो तसतसे अनेक जोडपी बघतो. आई-वडील, मामा-मामी, भाऊ-वहिनी, मित्र-मैत्रिणी अशी कितीतरी उदाहरणं. आणि या जोडप्यांकडे बघून त्यातून आपल्याला आवडीच्या नावडीच्या गोष्टी एक एक गोळा करत आपली आपल्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षांची यादी बनत जाते, आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षेची एक प्रतिमा उभी राहते. मनात प्रतिमा तयार होणं हा खूप स्वाभाविक भाग आहे. सिनेमाचं ट्रेलर बघून सिनेमाबद्दल प्रतिमा निर्माण करण्यापासून ते भाषण कलेवरून राजकीय नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यापर्यंत आपला मेंदू काम करतच असतो. किंबहुना आपल्या कल्पनाशक्ती आणि सृजनाचा तो अविभाज्य भाग आहे. पण प्रश्न निर्माण होतात जेव्हा प्रतिमेलाच वास्तव मानून आपण पुढे जाऊ लागतो. या प्रतिमेच्या चौकटीत अडकल्याने होतं असं की, वास्तवापेक्षा प्रतिमेच्याच प्रेमात पडायला होतं. आणि आपल्या अपेक्षांची चौकट तर्कशुद्ध विचारांच्या आधारावर आहे का हे न तपासता, तीच चौकट घेऊन जोडीदाराचा शोध सुरू होतो. एकदा अशी चौकट तयार झाली की अपेक्षा या अपेक्षा न राहता मागण्या बनू लागतात आणि मग गडबड होण्याची शक्यता वाढते.

आपण, आपले आई-वडील, आपलं कुटुंब, आणि एकूणच आपलं अनुभवविश्व याबाहेरही बरंच मोठं जग आहे. जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही याच विश्वातून येणार आहे. ती आपल्याच चौकटीत बसते आहे का हे बघणं म्हणजे झापडं लावून चालण्यासारखं आहे. विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेमध्ये, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा डोळ्यावर आपल्याच अपेक्षा/मागण्यांच्या चष्म्यातून न बघता समोरच्या व्यक्तीकडे एक स्वतंत्र माणूस म्हणून बघत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अशाप्रकारे कोरी पाटी ठेवून भेट झाली तर समोरच्याला अधिक नेमकेपणाने जाणून घेण्याची शक्यता तर वाढेलच, पण त्याबरोबर आपली आणि त्या व्यक्तीची अनुरूपता अधिक विवेकनिष्ठ पद्धतीने तपासून घेणं शक्य होईल. थोडक्यात, अपेक्षांच्या मागण्या न होऊ देता त्यांना अपेक्षाच ठेवून, मोकळ्या मनाने जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत पुढे जाणं हिताचं आहे.

(दि. १ एप्रिल २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)

Friday, March 8, 2024

समानतेची ऐशीतैशी

अरेंज्ड मॅरेजच्या म्हणजे ठरवून लग्न करण्याच्या बाबतीत एक सातत्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे अपेक्षा ठरवताना आजच्या एकविसाव्या शतकातही डोकावणारा पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा. ‘यातल्या कित्येक अपेक्षा कालबाह्य झालेल्या आहेत’ असं कट्ट्यावर गप्पांमध्ये ठामपणे म्हणतील, असेही लोक लग्नाच्या बाबतीत अचानक बुरसटलेल्या विचारांचे कसे बनतात हे माझ्यासमोर खरोखरं एक कोडंच आहे. “अरेंज्ड मॅरेजमध्ये आहोत म्हणून सगळ्या गोष्टी बघतो आहोत, लव्ह असतं तर हा प्रश्नच नसता आला” असा बाळबोध युक्तिवाद करून आपल्या अतार्किक आणि अवास्तव अपेक्षांचा बचाव केला जातो. स्त्री-पुरुष नातेसंबंधांतले आजच्या काळात बदललेले आयाम समजून न घेता जोडीदाराविषयीच्या अपेक्षा नक्की करणे म्हणजे भविष्यातल्या वैवाहिक कलहाचं बीजारोपणच. आणि म्हणूनच जोडीदार निवडीच्या प्रक्रियेच्या वेळीच याविषयीचं मंथन आवश्यक आहे.

हजारो वर्षांच्या लग्नाच्या इतिहासात, सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे लग्नात स्त्रियांचं काम काय आणि पुरुषांचं काम काय याची विभागणी झाली. सगळे धर्म आणि संप्रदाय हे मानवाचं जगणं नियंत्रित करण्याविषयी ठोस काही नियम सांगत असल्याने लग्नविषयक नियम आपोआप आले आणि त्यातून लिंगआधारित श्रमविभागणी पक्की झाली. त्याला राजसत्तेची म्हणजे कायद्याचीही जोड मिळाली. यात हजारो वर्षं मूलभूत आणि व्यापक असा बदल झाला नाही. पण आधी युरोपातली औद्योगिक क्रांती आणि गेल्या शतकात सुरू झालेली इंटरनेट क्रांती याने जगभरच्या हजारो वर्षांच्या सामाजिक व्यवस्थांना मुळापासून हादरवून सोडलं. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पारंपरिक श्रमविभागणी आता कालबाह्य झाली आहे.

अरेंज्ड मॅरेज मधल्या अपेक्षांची काही उदाहरणं देतो म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते अधिक स्पष्टपणे लक्षात येईल. लग्नानंतर मुलीने आपलं घर सोडावं आणि दुसऱ्या शहरातला नवरा असेल तर आपलं शहर आणि नोकरीही सोडावी ही अपेक्षा असते. पण हेच एक मुलगा का नाही करू शकत हा विचारही केला जात नाही! मुलाप्रमाणेच मुलीनेही अभ्यास केला आहे, शिक्षण घेतलं आहे, कष्टाने नोकरीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे पण लग्न म्हणल्यावर तिने मात्र या सगळ्यावर पाणी सोडायचं? ही कुठली मानसिकता? मध्यंतरी एका नाशिकमधल्या मुलाशी बोलत होतो आणि त्याची तक्रार होती की मुंबई-पुण्याच्या मुली नाशिकला जायला तयार नाहीत. ही तक्रार काही नवीन नाही. पण ‘एखाद्या मुलीशी तुझं जमत असेल तर तू का नाही जात पुण्याला?’ हा माझा प्रश्न त्याच्यासाठी नवीन होता. तो गडबडला. मग त्याला घर-आईबाबा-नोकरी हे सगळे बचाव आठवले. पण ‘यातल्या कुठल्या गोष्टी मुलीच्या आयुष्यात नाहीत?’ या माझ्या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हतं. जी गोष्ट करण्याची अपेक्षा आपण समोरच्या व्यक्तीकडून करतो आहोत ती करण्याचं धैर्य आणि आत्मविश्वास स्वतःत आहे का हे तपासून बघायला नको का? मी करणार नाही, पण तुला हे जमायला हवं हा अट्टाहास तर्कशुद्ध आहे का? आणि दोष त्या मुलाचा नाही. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मुलगा देखील लग्नानंतर आपलं शहर नोकरी सोडून जाऊ शकतो, या शक्यतेची कल्पनाच त्याला कधी कोणी दिली नाहीये. मागे मला एक जोडपं साताऱ्यात भेटलं होतं. मुलगी साताऱ्यात व्यवसाय बघते आणि तिचा मूळचा पुण्यातला डॉक्टर नवरा तिथे काम करतो. तिने तिथून बाहेर पडण्याऐवजी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पुण्यातून साताऱ्यात जाऊन तिथे क्लिनिक सुरू करणे हा अधिक व्यवहार्य निर्णय असल्याचं त्यांनी चर्चा करून ठरवलं. हे उदाहरण आहे सामंजस्याचं, पुरुषी अहंकार दूर ठेवून तारतम्याने निर्णय घेतल्याचं. लग्न म्हणजे नवरा-बायको हे विरुद्ध बाजूचे दोन गट नसून, नवराबायकोची अशी आपली एक टीम आहे आणि दोघांनी मिळून काही निर्णय घ्यायचे आहेत हा भाव ठेवला म्हणजे अहंकार दूर ठेवून व्यावहारिक आणि समाधानकारक निर्णय घेणं शक्य होतं. दोघांपैकी कोण करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहे, कुठे कुठे कामाच्या संधी उपलब्ध आहेत किंवा नाहीत, अशा गोष्टींचा साधक बाधक विचार करून निर्णय घेणं शक्य आहे. ‘तू सून या नात्याने माझ्या आई-वडिलांची काळजी घेशील ना?’ या प्रश्नच चुकीचा आहे. त्या ऐवजी वाक्य असं असायला हवं की आपण दोघे मिळून चौघांची म्हणजे आपल्या दोघांच्याही आईवडिलांची काळजी घेऊ.    

मागे एकदा मी एके ठिकाणी बोलताना हेच सगळं मी मांडत होतो आणि श्रोत्यांमधले एक काका मध्येच उठून म्हणाले, सगळा प्रश्न मुली फार शिकल्यामुळे निर्माण झाला आहे. मी हे वाक्य अनेकदा ऐकलं आहे. ‘रस्त्यावर वाहनांचे अपघात होतात याचं कारण माणसाने चाकाचा शोध लावला’ हे वाक्य जितकं हास्यास्पद आहे तेवढंच त्या काकांचा युक्तिवाद. अपघात चाकाच्या शोधामुळे होत नाहीत, तर वाहनं बेशिस्तपणे चालवल्यामुळे होतात. तसंच मुली शिकल्यामुळे प्रश्न निर्माण झाले नसून; मुली शिकल्या, स्वावलंबी झाल्या, स्वतंत्र विचार करू लागल्या ही गोष्ट मुलग्यांना आणि (त्यांच्या पालकांनाही) हाताळता येत नसल्याने, कालबाह्य अपेक्षा कवटाळून बसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. मुलीला ‘स्वयंपाक येतो का’ हा प्रश्न वरवर पाहता चुकीचा नाही. स्वयंपाक हे महत्त्वाचं जीवनकौशल्य आहे, ते मुलगा असो वा मुलगी दोघांनीही आत्मसात करायला हवं. पण तो प्रश्न इतका सोज्वळ थोडीच असतो? त्या प्रश्नाबरोबर ‘वेळ पडली तर तुलाच स्वयंपाक करावा लागेल’ हा गर्भित अर्थ मुलींना खटकणार, यात आश्चर्य काय?

मुलग्यांना आणि त्यांच्या पालकांना समानतेची तत्त्वं स्वीकारणं आणि आत्मसात करणं हे अत्यावश्यक
आहेच. पण तेच मुली आणि त्यांच्या पालकांनाही करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल बोलल्याशिवाय हे लेखन पूर्ण होऊ शकत नाही. लग्नाच्या जोडीदाराबाबत अपेक्षा ठेवताना घर चालवण्याची म्हणजे कमावण्याची ‘प्राथमिक जबाबदारी’ ही मुलाचीच आहे असं आजही बहुसंख्य मुली आणि त्यांचे पालक मानताना दिसतात. मुलाने काही न कमावता घर सांभाळलं तरी आमची काही हरकत नाही
, असं अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत म्हणणाऱ्या मुलींची संख्या जवळ जवळ शून्य आहे; पण आमची मुलगी फार काही कमवत नाही, आणि मुलानेच अर्थार्जनाचा भार उचलायचा आहे असं म्हणणारे पालक जागोजागी दिसतील. मुलाचा पगार, वय, उंची, शिक्षण मुलीपेक्षा जास्तच हवं ही काही समानतेच्या विचारांतून येणारी मागणी नाही. पुण्या-मुंबईत स्वतःचं घर आहे का हा प्रश्न नेहमी मुलांनाच विचारला जातो. मुलांनी ज्या समानतेची कास धरली पाहिजे असं मी वर म्हणलं आहे, तो मार्ग दुहेरी आहे. मुलींनी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे. समानतेची फळं चाखायची, पण त्याबरोबर येणारी जबाबदारी घ्यायची नाही, हा दुटप्पीपणा कामाचा नाही.

“स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत म्हणून ते समान असूच शकत नाहीत, त्यांना निसर्गाने दिलेल्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत” या फुटकळ वक्तव्याच्या आड स्त्री-पुरुष भेदाचं भोंगळ समर्थन काहीजण करताना दिसतात. ‘काळे-गोरे हा निसर्गाने केलेला भेद आहे’ या नावाखाली गुलामगिरीची भलामण करणारे गोरे वंशवर्चस्ववादी आत्ता आत्तापर्यंत मिरवत होते, त्याच पद्धतीचं हे वक्तव्य असतं. सारखेपणा (Similarity) आणि समानता (Equality) यात गल्लत करून ही असली वक्तव्यं केली जातात. नैसर्गिक सारखेपणा नाही हे उघड आहे, पण संधींबाबत, वागणूक आणि निवडीबाबत समानता असू शकते की नाही?

स्त्री-पुरुष समानतेचं वातावरण हा आजच्या आपल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीबरोबर आपल्या दैनंदिन जीवनपद्धतीचा भाग बनला आहे, आणि भविष्यातही असणार आहे. हे बदलायचं तर आपल्या समाजाचा ‘तालिबान’ करावा लागेल, आणि ते कोणालाच नको आहे! या बदललेल्या परिस्थितीत जुळवून घ्यायला काय करावं याच्या काही सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे एखाद्या अपेक्षेच्या मागे ‘मुलगी आहे म्हणून’ किंवा ‘मुलगा आहे म्हणून’ हा विचार असणार असेल तर ती अपेक्षा तर्कशुद्ध विचारांच्या कसोटीवर तपासून बघायला लागेल. दुसरं म्हणजे ‘हीच गोष्ट मी मुलाला/मुलीला सांगितली असती का?’ असा प्रश्न स्वतःला विचारून बघावा आणि आपलं आपल्यालाच उत्तर मिळेल! आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवात स्वतःपासून करणे आहे. जी अपेक्षा समोरच्याकडून आहे, त्याबाबत आपण स्वतः कुठे आहोत हे तपासणे. समजूतदारपणा आणि तारतम्य हे गुण आपल्या जोडीदारात असावेत ही अपेक्षा सगळ्यांची आहे, पण आपण सामंजस्य आणि तारतम्याने आपण आपल्या अपेक्षा ठरवतो आहोत का हेही तपासायला हवं.

एकविसाव्या शतकातली लग्नं ही विसाव्या शतकातल्या लग्नांसारखी असणार नाहीएत हे वास्तव जितकं लवकर मुलंमुली आणि त्यांचे पालक स्वीकारतील तितकी ही लग्नं टिकण्याची आणि नाती बहरण्याची शक्यता वाढेल. अन्यथा, घटस्फोट आणि उसवलेल्या नात्यांचं वाढलेलं प्रमाण इथून पुढे अधिकच वाढत जाईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही! 

(दि. २६ फेब्रुवारी २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध)

Tuesday, March 5, 2024

अरेंज्ड मॅरेज विरुद्ध लव्ह मॅरेज?!

आपल्या रोजच्या बोलण्यात, लग्नाच्या बाबतीत एक ढोबळ विभागणी दिसते. कुटुंबाने बघून, ‘ठरवून लग्न लावणे’ म्हणजे आपल्या बोलण्यात असणारं अरेंज्ड मॅरेज. आणि कुटुंबाऐवजी दोन व्यक्तींनी आपापल्या आवडीनुसार लग्न करणे म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाह अशा व्याख्या केल्या जातात. पण आज एकविसाव्या शतकातल्या चोविसाव्या वर्षात इतकं स्पष्ट काळं-पांढरं असं काही उरलंय का? की बदललेल्या काळात अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेज या दोन तथाकथित टोकांना टाळत मधला काहीतरी मार्ग शोधला जातोय?   


आज शेकड्याने लग्नविषयक वेबसाईट्स आहेत. त्याबरोबर डेटिंग अॅप्स आहेत. स्वतःसाठी अनुरूप जोडीदार घरबसल्या शोधण्यासाठी हे नवीन मार्ग उपलब्ध तयार झाले आहेत. तंत्रज्ञानाची अशी साथ नव्हती त्या काळात प्रेमविवाहासाठी मर्यादित अवकाश उपलब्ध होतं. स्त्री-पुरुषांची पहिली मोकळी भेट होऊ शकेल अशा संधीच फार थोड्या उपलब्ध होत्या. मैत्री आणि प्रेम तर फार पुढच्या गोष्टी राहिल्या. साहजिकच जेवढी-केवढी उपलब्ध संधी आहे त्यात प्रेमात पडलो तर प्रेमविवाह, नाहीतर पारंपारिक पद्धतीने ठरवून विवाह; ही प्रथा होती. अगदी आत्ता आत्ता वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत याच प्रकारे विवाह ठरत होते. पण गेल्या तीस वर्षांत झालेल्या आर्थिक-सामाजिक बदलांमुळे आणि गेल्या वीस वर्षांत आलेल्या नवीन तंत्रज्ञानाने या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीला पार सुरुंगच लावला.

स्मार्ट फोन्स आणि सोशल मिडिया क्रांती आली. कुठेही बसून, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीशी संवाद साधण्याची किमया या काळात घडू लागली होती. याचा परिणाम असा झाला की माणसाला आधी कधी नव्हती एवढी ‘पर्यायांची उपलब्धता’ निर्माण झाली. नुसती उपलब्धता असून उपयोग नाही, त्याचा लाभ घेण्याची आर्थिक क्षमताही असावी लागते. पण त्याच सुमारास जागतिकीकरणाबरोबर शहरी मध्यमवर्गात आलेल्या आर्थिक समृद्धीमुळे ती क्षमता देखील आली. पर्यायांची उपलब्धता आल्यावर साहजिकच त्याचा परिणाम जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेवर देखील झाला. आत्तापर्यंत माझ्या ओळखीच्या किंवा प्रत्यक्ष भौतिक परिघातल्याच व्यक्तींचा मी संभाव्य जोडीदार म्हणून विचार करत असे, आता परीघच विस्तारला. प्रेमविवाहासाठी आवश्यक अश्या स्त्री-पुरुष भेटीच्या संधी तंत्रज्ञानाने वाढवल्या आणि साहजिकच प्रेमविवाहाकडे कलही वाढला. हे होत जाणं स्वाभाविक आहे. एखादी व्यक्ती जसजशी शिकते, कामात प्रगती करते, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनते तसतसा कोणीतरी दुसऱ्याने आपल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याऐवजी स्वतःच निर्णय घेण्याकडे कल वाढतो. आता हे प्रेमविवाह वाढू लागले त्याचा परिणाम अरेंज्ड मॅरेजवर म्हणजेच ठरवून लग्न करण्याच्या प्रक्रियेवर होऊ लागला. पण गाडी इथेच थांबली नाही. अरेंज्ड मॅरेजचा उलटा परिणाम फिरून प्रेमविवाहांवर देखील होऊ लागला! साहजिकच हळूहळू आज अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेज या दोन्ही प्रकारांमधली दरी कमी झाली आहे. आणि नेमकं काय घडलंय हे बघणं कमालीचं रंजक आहे.

‘अमुक-अमुक व्यक्ती समोर आली अन् बस्स मी प्रेमात पडलो आणि आम्ही लग्न केलं’ असल्या फिल्मी विचारांमध्ये आजकालची पिढी मला दिसत नाही. उलट अगदी प्रेमविवाहच करायचा असं म्हणणारेही दैवाच्या भरोशावर बसून असतात असं नव्हे तर स्वतःहून विशेष प्रयत्न करतात. आणि हे प्रयत्न मोबाईल डेटिंग अॅप्स मार्फत होतात. या मार्गाने लग्नापर्यंत पोहोचलेल्या एखाद्या प्रेमविवाहाचा प्रवास हा काहीसा असा होतो- पर्यायांची उपलब्धता आणि तंत्रज्ञान यांचा वापर करत आपल्यासाठी उपलब्ध निरनिराळे पर्याय तपासले जातात. त्यातल्या बऱ्या-वाईट गोष्टी बघितल्या जातात, कधी त्याचं विश्लेषण होतं, मग भेटायचं ठरतं, म्हणजेच ‘डेट’ वर जायचं ठरतं. पहिली भेट दोघांनाही आवडली की मग पुन्हा भेटायचं ठरतं, गप्पा होतात, मोबाईलवर मेसेजिंग होतं, पुन्हा पुन्हा भेटी होतात, आणि मग लग्न करायचं ठरतं, कुटुंबांना सांगितलं जातं आणि अखेर लग्न होतं. बघा हं, ‘जोडीदार निवडीच्या स्पष्ट उद्देशाने एक माध्यम निवडणं, त्यावर निरनिराळे पर्याय बघणं, भेटायचं ठरवणं आणि भेटल्यावर, बोलल्यावर लग्नाचा निर्णय घेणं’ हा प्रवास आजच्या अरेंज्ड मॅरेजच्या प्रवासापेक्षा वेगळा आहे का?

आता ठरवून लग्न करण्याच्या प्रक्रियेकडे बघू. अरेंज्ड मॅरेज असं म्हणल्यावर अतिशय गंमतीदार आणि कालबाह्य प्रतिमा अनेकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. त्या प्रतिमेत तीन गोष्टी प्रामुख्याने असतात- एक म्हणजे रूप-पगार-वय-उंची-जात-पत्रिका या पारंपारिक अपेक्षांना मिळणारं प्राधान्य; दुसरं म्हणजे ‘बघण्याचा’ कांदे-पोहे कार्यक्रम; आणि तिसरं म्हणजे फारशी ओळख झाली नसतानाही लग्न करणे. बदललेल्या काळात निदान शहरी सुशिक्षित वर्गात तरी ही प्रतिमा आणि प्रत्यक्ष घडणारी प्रक्रिया यात कमालीचा फरक आहे. पूर्वी ओळखी-पाळखीतून वा पारंपरिक वधू-वर सूचक केंद्रातून प्रक्रिया सुरू व्हायची. आता त्या जागी माध्यम बदलून आधुनिक विवाहसंस्था आहेत. पुढे प्रक्रीयेतल्या तीन गोष्टींपैकी पहिल्या म्हणजे अपेक्षांविषयी बघू. रूप-पगार-वय-उंची-जात-पत्रिका या अपेक्षा आजही आहेत हे खरंच. पण हे झालं वरवरचं निरीक्षण. या अपेक्षांबरोबर मनमिळावू, समजूतदार असे स्वभावविशेष, आवडी-निवडी यांनाही महत्त्व आलं आहे. नुसत्या सुरुवातीच्या जुजबी गोष्टी जुळल्या म्हणजे चांगलं स्थळ असं म्हणत कोणीही पुढे जात नाही. लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली आणि लाईफ व्हॅल्यूज् म्हणजे जीवनमूल्ये यांचाही विचार अंतिम निर्णयाच्या आधी केला जातो. अरेंज्ड मॅरेज प्रतिमेतली दुसरी गोष्ट म्हणजे बघण्याचा कार्यक्रम. आजकाल पारंपरिक कांदे-पोहे कार्यक्रमही कालबाह्य झाले आहेत. शिवाय पहिल्या भेटीला ‘बघण्याचा’ कार्यक्रम म्हणणं हेही मागासलेपणाचं लक्षण आहे हे आजच्या पिढीचं ठाम आणि योग्य मत आहे. पहिली भेट ही मुलीला/मुलाला ‘बघण्याची’ नसून, एकमेकांना जाणण्याची एक पायरी आहे. आणि जाणण्यासाठी दोघांनीही मोकळ्याढाकळ्या गप्पा मारल्या तर अधिक छान! साहजिकच पहिली भेट बहुतांश वेळा बाहेर एखाद्या कॉफीशॉपमध्ये होते. काही काळापूर्वी आमच्याकडून एक लग्न ठरलेलं जोडपं आम्हाला भेटायला आलं होतं त्यांनी त्यांची पहिली भेट पहाटे व्यायाम म्हणून टेकडीवर फिरता फिरता गप्पा मारत केली! पहिली भेट चौकटीबद्ध कांदेपोहे कार्यक्रमात व्हायला हवी ही कालबाह्य अपेक्षा केव्हाच मोडीत निघाली आहे! आणि अरेंज्ड मॅरेज प्रतिमेतली तिसरी गोष्ट म्हणजे लग्नाआधीची एकमेकांशी असणारी अल्प ओळख. पण गंमत अशी की पहिल्या भेटीपासून ते लग्न होईपर्यंतचा कालावधी हा आजकाल काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंतचा असतो! एका किंवा दुसऱ्या भेटीत निर्णय घेऊन पुढच्या महिन्यात लग्न करून मोकळी होणारी उदाहरणं अपवादानेच दिसतील. बहुतांश वेळा घडताना असं दिसतं की एक भेट होते, पहिली भेट आवडली दोघांनाही की मग पुन्हा भेटायचं ठरतं, गप्पा होतात, मोबाईलवर मेसेजिंग होतं, पुन्हा पुन्हा भेटी होतात, कुटुंबांना सांगितलं जातं आणि मग लग्न करायचं ठरतं, आणि अखेर लग्न होतं.

अरेच्चा! हे सगळं तर ऐकलेलं वाटतंय ना? जोडीदार निवडीच्या स्पष्ट उद्देशाने एक माध्यम निवडणं (म्हणजे इथे विवाहसंस्था/ मॅट्रिमोनी कंपनी निवडणं), त्यावर निरनिराळे पर्याय बघणं, भेटायचं ठरवणं आणि भेटल्यावर, बोलल्यावर लग्नाचा निर्णय घेणं, हीच तर प्रक्रिया आजकालच्या अनेक प्रेमविवाहांत पण दिसते असं आपण आत्ताच  जवळपास सव्वातीनशे शब्दांपूर्वी बघितलं! हे सगळं सांगायचा मुख्य उद्देश हा की ‘आम्हाला अरेंज्ड मॅरेज करावं लागतंय’ अशी नकारात्मक भावना कोणत्याही मुलाने वा मुलीने मनात बाळगण्याचं कारण नाही. दोन्ही प्रक्रियांमध्ये पूर्वी इतका फरक राहिलेला नाही. आणि मला विचाराल तर हे फार चांगलं आहे. याचं कारण असं की आधीच्या काळातले पर्यायांच्या अभावी अविचाराने वा फिल्मी स्वप्नाळू विचार करून केले जाणारे प्रेमविवाह असोत किंवा पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीला बळकट करणाऱ्या बुरसटलेल्या अपेक्षा ठेवून ठरवून केलेली लग्नं असोत; दोन्ही व्यवस्थांमध्ये दोष होते. हे दोन्हीतले दोष बाजूला सारत पुढे जाण्याची संधी आज उपलब्ध आहे.

अगदी एका वाक्यात सांगायचं तर, आधीच्या काळात अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेज हे शब्दही दोन परस्परविरोधी प्रक्रियांचं वर्णन करायला वापरले जायचे, पण आजकालची लग्न ही ‘लव्हली अरेंज्ड’ असू शकतात, किंवा काळजीपूर्वक विचार करून, सर्व गोष्टी तपासून म्हणजेच ‘अरेंज्ड लव्ह’ देखील असू शकतात! काळाच्या या टप्प्यावर कालबाह्य गोष्टी टाकून देऊन, तर्कशुद्ध आणि विवेकनिष्ठ विचार करत आपला जोडीदार शोधण्याची संधी आजची मुलं-मुली घेऊ बघत आहेत, हे माझ्या मते मोठं आशादायी चित्र आहे!

(दि. ५ फेब्रुवारी २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध)