“Dream is not
what you see in sleep. It is the thing which doesn’t let you sleep!”
- Dr. APJ Abdul Kalam
- Dr. APJ Abdul Kalam
देशाच्या कानाकोपऱ्यात,
वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य मंडळी अनेक स्वप्न बघतात, त्यांचा पाठलाग करतात आणि
ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात. काही स्वप्न आणि स्वप्नपूर्ती यांची दखल सगळ्या
समाजाने घ्यायला हवी अशी असतात. ती व्यक्तिगत स्वप्न नसतात. त्यांचा समाजावर प्रत्यक्ष
आणि अप्रत्यक्षपणे व्यापक परिणाम होणार असतो. आणि म्हणून ही स्वप्न जेव्हा पूर्ण
होतात तेव्हा सगळ्या समाजाने त्या जल्लोषात सहभागी व्हायला हवं. अशीच एक
स्वप्नपूर्तीची कहाणी म्हणजे ‘कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे’च्या ‘स्वयं’ची कहाणी.
अविश्वसनीय, रोमांचक आणि प्रेरणादायी.
मानव प्राण्याला पहिल्यापासूनच
आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांविषयी जबरदस्त आकर्षण आहे. जगभरच्या
गुहांमध्ये
भित्तीचित्रात, शिल्पांमध्ये याचे पुरावे सापडतात. पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असणारे
ग्रह इतरही आहेत का? उंच आकाशातून आपली पृथ्वी कशी बरं दिसत असेल असे कित्येक
प्रश्न मानवाला पूर्वीपासून पडत आहेत. अमेरिका-रशिया या शीतयुद्धाच्या काळात
दोन्ही देशांनी अवकाश संशोधनात मोठीच गती घेतली. चंद्रावर पहिलं पाउल ठेवण्याचं
श्रेय अमेरिकन माणसाला मिळालं तर पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवण्याचं श्रेय
रशियाला. आणि तेव्हापासून अवकाश संशोधनात वेगाने प्रगती होत गेली. त्याबरोबरच
संपर्क व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, माहिती दळणवळण या विषयात क्रांती झाली. भारत
या सगळ्यात कुठे होता? बराच मागे. आणि मागे असणं साहजिकच होतं. नुकत्याच स्वतंत्र
झालेल्या देशाने अचानक कशी काय प्रगती करावी? पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतः
पुढाकार घेत दूरदृष्टी दाखवत डॉ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली अवकाश
संशोधानासाठी एक समिती तयार केली. समितीचं अध्यक्षपद डॉ साराभाई यांच्याकडे होतं
आणि सचिव होते डॉ एकनाथ चिटणीस. हे डॉ चिटणीस मला पुणे विद्यापीठात शिकवायला होते.
ते सांगायचे की ज्यावेळी भारताने अवकाश संशोधन विषयात रुची घ्यायला सुरुवात केली
तेव्हा अनेक टीकाकारांनी नेहरूंवर ताशेरे ओढले. देशातला गांधीवादी गट तर दुखावला
होताच पण विरोधकही ‘देशात लोकांना प्राथमिक शिक्षण नसताना आत्ताच आयआयटी, अवकाश
संशोधन कशाला हवंय’ असा सवाल करत होते. परदेशी टीकाकार भारतासारख्या गरीब देशाने अवकाश
संशोधनात पडू नये असं म्हणत होते. पण पं. नेहरू आणि डॉ साराभाई यांनी कणखरपणा
दाखवला आणि भारतात अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली. राष्ट्रीय अवकाश संशोधन
समिती तयार झाली. पुढे स्थापन झालेल्या इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च
ऑर्गनायझेशनचं हे बीज. नुकतंच इस्रोने मंगळयान अवकाशात सोडलं आणि अमेरिका, रशिया
आणि चीन यांच्या बरोबरीने भारत आज अवकाश संशोधनात ताठ मानेने उभा आहे हे जगाला
दिसलं. याचं श्रेय पन्नास वर्षांपूर्वी दाखवल्या गेलेल्या दूरदृष्टीत आहे. हे आज
सांगायचा उद्देश असा की, या क्षेत्रात आपण छोटे, नवखे आणि साधनांची कमतरता असणारे
असूनही जी उत्तुंग झेप भारतीय अवकाश संशोधनाने घेतली ती अतुलनीय आहे. त्याच
प्रवासाचं छोटं प्रतिरूप म्हणजे ‘स्वयं’ची भरारी असं म्हणायला हरकत नाही. विज्ञान
संशोधनावरची निष्ठा, जिद्द, चिकाटी, नवख्या अननुभवी मंडळींवर टाकलेला विश्वास आणि
पाठीशी खंबीरपणे उभी असणारी व्यवस्था ही इस्रो आणि सीओईपीच्या ‘स्वयम्’ टीम मधली साम्यस्थळं
आहेत.
पं जवाहरलाल नेहरू आणि डॉ विक्रम साराभाई |
‘स्वयं’च्या कहाणीची
सुरुवात होते २००६ साली. स्थळ- COEP या संक्षिप्त रुपात प्रसिद्ध असणारे पुण्यातले
सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय- ‘कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे.’ या कॉलेजचे प्रसन्न
कुलकर्णी, क्षितिजा देशपांडे, तृप्ती रांका हे तिघं विद्यार्थी एकत्र आले. खगोलशास्त्राची
आवड हा समान धागा. ग्रह, तारे, आकाशगंगा, कृष्णविवरं अशा विषयांमध्ये त्यांना रुची
होती. आणि ही रुची असणारे आपल्यासारखे इतरही अनेकजण असतीलच असं वाटून त्यांनी कॉलेजमध्येच
अॅस्ट्रोनॉमी क्लबची सुरुवात केली. सामान्यतः कॉलेजमध्ये कलामंडळ, साहित्यमंडळ,
जिमखाना विभाग असे जे गट असतात त्यातच आणखी एका गटाची भर पडली- अॅस्ट्रोनॉमी क्लब.
एकदा क्लब सुरु झाल्यावर या क्लबचे अनेक उपक्रम सुरु झाले. कधी छोटे कॅम्प्स, कधी
अभ्यास चर्चा, कधी व्याख्यानं. या सगळ्यातच कधीतरी कृत्रिम उपग्रह आणि त्यामागे
असणाऱ्या तांत्रिक गोष्टींबाबत चर्चा झाली. अॅस्ट्रोनॉमी क्लबच्या विद्यार्थ्यांना
असं जाणवलं की हे एक असं क्षेत्र आहे जिथे इंजिनियरिंगच्या सर्व क्षेत्रांची गरज
आहे. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, टेलीकम्युनिकेशन्स
अशा इंजिनियरिंगच्या जवळपास सर्व क्षेत्रांची गरज अवकाश संशोधनात आहे. आयआयटी
मुंबईच्या विद्यार्थ्यांनी त्यावेळी एक उपग्रह तयार करायला घेतला होता. २००८ मध्ये
अभिषेक बाविस्कर हा अॅस्ट्रोनॉमी क्लबचा सदस्य असणारा विद्यार्थी सुट्टीतील
इंटर्नशिप करण्यासाठी आयआयटी मुंबईला गेला होता. त्यावेळी त्याच्या तिथल्या
मित्रांनी उपग्रहाचं ग्राउंड स्टेशन बनवायला तुम्ही मदत करू शकाल का असं विचारलं.
जर आपण ग्राउंड स्टेशन बनवायला मदत करू शकतो तर आपणच उपग्रह पण बनवू शकू का हा
विचार त्याच्या डोक्यात आला. आपणच उपग्रह बनवण्याची कल्पना त्याच्या डोक्यात बसली.
पुण्यात परत आल्यावर त्याने मोहित कर्वे, प्रिया गणदास, निश्चय म्हात्रे, पूनम
राणे या आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. ‘नुसतं डिग्री घेऊन कॉलेजमधून बाहेर पडायचं
नाहीये, तर खरंच काहीतरी करून दाखवायचंय अशी चर्चा त्यांच्यात अनेकदा व्हायची. आणि
असं काहीतरी समोर आल्यावर सगळ्यांनी उडीच मारली. याहून मोठं आव्हान काय असणार! बाविस्करने
लगेच सीओईपी चे त्यावेळचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांची भेट घेतली.
वास्तविक हा सिव्हील इंजिनियरिंगचा विद्यार्थी. अवकाश संशोधन आणि उपग्रह बनवणे
याच्याशी त्याचा काहीही संबंध येण्याचं कारण नव्हतं. पण डॉ सहस्त्रबुद्धे यांनी त्याच्या
डोळ्यातली चमक बघितली. जेमतेम एकोणीस वीस वर्षाच्या दहा बारा मुलांच्या इच्छेला
आणि आकांक्षेला मान देत डॉ सहस्त्रबुद्धे यांनी पुढाकार घेतला. आणि इथेच ‘स्वयं’च्या
दिशेने पावलं पडायला सुरुवात झाली. जानेवारी २००९ मध्ये या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या
सगळ्या विभागप्रमुखांना एक प्रेझेन्टेशन दिलं. वास्तविक फारशी माहिती आणि उपग्रह कसा
बनवावा हे माहित नसलेल्या विद्यार्थ्यांच्या त्या प्रेझेन्टेशनपेक्षाही
त्यांच्यातली जिद्द बघूनच सगळे प्राध्यापक प्रभावित झाले. कॉलेजने अधिकृतरित्या
विद्यार्थी उपग्रह निर्मितीच्या प्रकल्पाला मान्यता दिली. उपग्रह बनवण्याची टीम
तयार झाली. टीमची एकूण सदस्यसंख्या आताशा २५ झाली होती. ‘तुम्ही कष्ट करायला तयार
आहात का, सर्वस्व झोकून देऊन या प्रकल्पात रस घ्यायला तयार आहात का’ हाच या टीममध्ये
येण्यासाठीचा मुख्य निकष होता. विद्यार्थ्यांनी मिळेल तिथून उपग्रह बनवण्याचं
ज्ञान मिळवायला सुरुवात केली. परदेशातल्या काही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीही
उपग्रह बनवले होते. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी काय केलं होतं याचा अभ्यास
सुरु झाला. ‘स्वयम्’ नावाचा विद्यार्थी उपग्रह बनवण्याची प्रक्रिया सुरु झाली.
नुसता उपग्रह बनवून उपयोग
नव्हता. तो अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची मदत आवश्यक होती. “इस्रोचे
तत्कालीन प्रमुख जी माधवन नायर पुण्यात ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स
स्टडीज’ इथे व्याख्यान द्यायला आले होते. आम्ही उपग्रह टीमचे विद्यार्थी त्या
व्याख्यानाला गेलो. त्यावेळी चहापानाच्या वेळात जी माधवन नायर यांना आम्ही गाठलं आणि
उभ्या उभ्याच आमच्या कॉलेजबद्दल आणि विद्यार्थी उपग्रह प्रकल्पाबद्दल त्यांनी
सांगितलं. ते प्रभावित झाले आणि त्यांनी इस्त्रोच्या डॉ राघवमूर्ती यांचा नंबर आम्हाला
दिला. आणि अशाप्रकारे इस्रोचं मार्गदर्शन मिळायला सुरुवात झाली.”, पहिल्या
दिवसापासून या प्रकल्पात असणारा निश्चय म्हात्रे सांगतो. २०१०-११ मध्ये या
प्रकल्पाचा व्यवस्थापक म्हणून तो काम करत असतानाच इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉटिकल
कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठित असा लुइगी जी नेपोलिटानो पुरस्कार
त्याला मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी केवळ पहिली भारतीयच नव्हे तर पहिली आशियाई व्यक्ती
म्हणून निश्चय म्हात्रेची नोंद आहे. अवकाश संशोधनात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ३०
पेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
या सगळ्या प्रकल्पात
अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे माहिती आणि ज्ञानाचं हस्तांतरण. दरवर्षी
नवीन विद्यार्थी येणार, जुने विद्यार्थी पासआउट होऊन कॉलेजबाहेर पडणार हे चक्र
चालू राहणार असल्याने आधी केलेलं काम अतिशय नीट पुढच्या व्यक्तींकडे देणं हे मोठंच
आव्हान होतं. इस्रोचे अतिशय वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ वेदाचलम हे डॉ
सहस्त्रबुद्धे यांचे स्नेही होते. प्रकल्पाच्या सुरुवातीलाच डॉ वेदाचलमना
कॉलेजमध्ये दोन दिवस व्याख्यानांसाठी आमंत्रित केलं गेलं. त्यांनी विद्यार्थ्यांना
कानमंत्र दिला होता, “अनेक प्रकल्प केवळ सगळ्या गोष्टींच्या नीट नोंदी न ठेवल्याने
अयशस्वी ठरतात. काहीही करून तुमच्या सगळ्या प्रकापाचं डॉक्युमेंटेशन अतिशय चोख
ठेवा.” विद्यार्थ्यांनी हे शब्दशः पाळलं. थक्क करणाऱ्या शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्या
नोंदी ठेवल्या गेल्या. विद्यार्थी या प्रकल्पाबाबत किती गंभीर होते, किती नेटाने
काम करत होते याची कल्पना यातून येते. २०१२ मध्ये या टीमला रेडीओ कम्युनिकेशन
लायसन्स मिळालं. त्यानंतर वेगाने पुढच्या कामाला सुरुवात झाली. उपग्रहाचे ग्राउंड
स्टेशन उभारणे ही त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट. ऑक्टोबर २०१२ मध्ये हे काम पूर्ण
झालं. नोव्हेंबरमध्ये या ग्राउंड स्टेशनवर संदेशवहन करण्याची यशस्वी चाचणीही झाली.
पहिल्यांदा अवकाशात गेलेला मनुष्य म्हणजे युरी गागारीन. त्याचं छायाचित्र इंटरनॅशनल
स्पेस स्टेशनवरून पाठवण्यात आलं. सीओईपी मध्ये उभारलेल्या ग्राउंड स्टेशनवर ते
यशस्वीपणे स्वीकारलंही गेलं.
आता कामाने वेग घेतला.
इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून वारंवार कठोर चिकित्सा करून घेतली गेली. २३ मे २०१३ ला
इस्रो आणि सीओईपी यांच्यात करार केला गेला. सीओईपीने बनवलेला उपग्रह अवकाशात
प्रक्षेपित करण्याची तयारी इस्रोने या कराराद्वारे दाखवली. तांत्रिक अडचणी दूर
करण्यासाठी उपग्रह टीम सातत्याने कार्यरत होती. कधी टीम बंगळूरूला जाऊन इस्रोमध्ये
शास्त्रज्ञांशी चर्चा करत होती, कधी त्रिवेंद्रमला डॉ विक्रम साराभाई स्पेस सेंटरला
भेट देत होती. २०११ पासून दक्षिण आफ्रिका, इटली, चीन, इस्राइल इथे झालेल्या इंटरनॅशनल
अॅस्ट्रोनॉटिकल कॉंग्रेसमध्ये सातत्याने उपग्रह टीमच्या विद्यार्थ्यांनी आपले
अभ्यास सादर केले. डॉ अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ मनीषा खळदकर, डॉ पांडे, डॉ अहुजा अशा
कॉलेजमधल्या प्राचार्य-प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत होतंच,
पण त्याबरोबर डॉ वेदाचलम, डॉ राघवमूर्ती, डॉ प्रमोद काळे या मान्यवर शास्त्रज्ञांचं
मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नेहमीच उपलब्ध होतं. असं असलं तरी प्रत्यक्ष उपग्रह
बनवण्यामध्ये फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचाच सहभाग होता.
“फक्त विद्यार्थ्यांनीच बनवलेला असा ‘स्वयम्’ हा देशातला पहिला उपग्रह आहे. अन्य
विद्यापीठांनीही उपग्रह बनवले आहेत. पण त्या प्रकल्पांत प्राध्यापकांचा, माजी
विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता” असं अॅस्ट्रोनॉमी क्लबच्या पहिल्या तीन
सदस्यांपैकी एक असणारा प्रसन्न कुलकर्णी सांगतो.
९९० ग्रॅम वजनाचा सीओईपीच्या
विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘स्वयम्’ हा उपग्रह आणि अन्य १९ उपग्रहांना
घेऊन ‘पीएसएलव्ही-सी
३४’ (पीएसएलव्ही म्हणजे पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल) हा प्रक्षेपक २२ जून २०१६ ला
सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात
झेपावला. प्रक्षेपणानंतर साधारण १७ मिनिटांनी ‘स्वयम्’ प्रक्षेपकापासून वेगळा
झाला. पहिल्या ४५ मिनिटांत आपल्या अॅन्टेना योग्य परिस्थितीत आणून स्वयम् स्थिरावला.
आणि साधारण ११ वाजण्याच्या सुमारास उपग्रहाकडून सगळ्या यंत्रणा सुस्थितीत असल्याची
माहिती इस्रो आणि सीओईपीच्या ग्राउंड स्टेशनवर पोचली. फत्ते झाली. सीओईपीच्या
विद्यार्थ्यांनी बाजी मारली होती!!
२००६ मध्ये तीन
विद्यार्थ्यांना अॅस्ट्रोनॉमी क्लब सुरु करावा वाटतो, दोन वर्षांनी २००८ मध्ये
त्यातल्या एका सिव्हील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला आपल्या कॉलेजच्या
विद्यार्थ्यांनी मिळून एक उपग्रह बनवावा असं वाटतं, सुमारे पावणेदोनशे विद्यार्थी
यात वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या स्वरूपाचं योगदान देतात आणि अखेर २०१६ मध्ये
प्रत्यक्ष त्या ‘स्वयं’पूर्ण उपग्रहाचं अवकाशात प्रक्षेपणही केलं जातं. काय
रोमहर्षक प्रवास आहे हा. आणि आता सीओईपी ची ‘स्वयम्-२’ ची तयारी सुरु झाली सुद्धा!
‘झोपल्यावर पडतं ते
स्वप्न नव्हे, तर झोप उडते ते स्वप्न’ असं एपीजे अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे. जवळपास
८ वर्ष उपग्रह बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी अहोरात्र कार्यरत राहिले.
त्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणं अशक्यच होतं. या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीत दोन
गोष्टी आहेत ज्या मला अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे कदाचित आपण पास आउट
होऊ तेव्हा उपग्रह बनला नसेल, हे माहित असूनही विद्यार्थी पायाभरणी करत राहिले.
विज्ञानाशी असणारी निष्ठा आणि कर्तव्य म्हणून चिकाटीने आणि शिस्तीने काम करत
राहण्याची जिद्द या मुलांनी दाखवली. निष्काम कर्मयोग म्हणतात तो याहून वेगळा कुठे
असतो? दुसरं म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात व्यवस्थेची योग्य ती साथ लाभली,
संशोधकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर उत्तुंग गगन भरारी मारण्याची
क्षमता आपल्यामध्ये आहे याचं स्पष्ट उदाहरण म्हणून स्वयम् कडे बघायला हवं. “समोर
दिलंय ते शिका, नोकरी करा, आपला मार्ग सोडू नका” असं म्हणत जगणाऱ्या मंडळींकडून
कोणतेही क्रांतिकारी काम होऊ शकत नाही. प्रश्न विचारणं, कुतूहल जागृत ठेवणं,
आपल्या स्वप्नांना वेसण घालण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणं हाच परिवर्तनाचा मार्ग
होऊ शकतो. एक प्रकारे स्वयम् सारखे प्रकल्प आपल्याला जाणीव करून देतात की
शिक्षणक्षेत्रात किती अमुलाग्र बदलांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांना
मोकळं अवकाश दिलं तर अवकाशात जाणारे उपग्रहही ते बनवून दाखवू शकतात हे आपल्याला स्वयम्
सांगतो. आणि म्हणूनच या स्वप्नपूर्तीच्या जल्लोषात आपण सहभागी व्हायला हवं, त्याचबरोबर
पुन्हा पुन्हा आपल्या व्यवस्थांचं अवलोकन करायला हवं. आपण नुसते शिक्षणाचे कारखाने
काढलेत की खरंच ज्ञानदान करणारी विद्यापीठं काढली आहेत याचा विचार व्हायला हवं.
व्यापक दृष्टीने बघता स्वयम्
प्रकल्प म्हणजे नुसता उपग्रह बनवणे नाही. या कहाणीत नवा विचार करण्याचं आवाहन आहे,
आव्हानही आहे. त्यात स्वयंपूर्णता आहे तसं परस्पर ज्ञान देऊन एकत्र प्रगती करणंही
आहे. लवचिकता असली तरी शिस्त आहे. ‘स्वयम्’ मध्ये स्वातंत्र्य आहे तसंच सहकार्य
आहे. केवढ्या वेगवेगळ्या दृष्टीने या प्रकल्पाकडे बघता येऊ शकतं, त्यातून शिकता
येऊ शकतं. तसं बघण्याची दृष्टी मात्र आपल्याला विकसित करावी लागेल, करूया ना?!
(४ जुलै २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या साप्ताहिक विवेकमध्ये
प्रसिद्ध- http://www.evivek.com/Encyc/2016/7/2/pune091.aspx#.V3tllLh97IU)
मस्त
ReplyDeleteKhup chhan..
ReplyDeleteChhanach
ReplyDeleteSurekh..ashya jiddipudhe kharokhar ch aakash thengane
ReplyDeleteअतुलनीय आणि कौतुकास्पदच तोड़ नाही
ReplyDelete