Monday, June 17, 2013

स्थितप्रज्ञ पुणेकर!

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर एक ट्रक ताबा सुटल्याने अर्धा फुटी दुभाजक ओलांडून पलीकडच्या बाजूला जातो आणि समोरच्या बाजूने येणाऱ्या गाडीतील प्रवाशांना कसलाही अपराध नसताना अपघातात जीव गमवावा लागू शकतो, अतिक्रमण करून नाले बुजवले आहेत आणि मग धो धो पाऊस कोसळल्यावर पाण्याला जायला जागाच न उरल्याने ते पाणी हौसिंग सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये घुसू शकते त्यात कदाचित एखादा लहानगा वाहून जाऊन जीवही गमावेल, मित्राबरोबर काहीतरी छान खावे म्हणून वैशाली-रुपाली किंवा जर्मन बेकरीमध्ये बसलेल्या मंडळींना स्फोटात आपला जीव गमवावा लागू शकतो, रस्त्यावरून आपल्या बहिणीसोबत चालत असताना अचानक शेजारची वीस फुटी भिंत कोसळून जीव गमवावा लागू शकतो, आयुष्यभर कष्टाने साठवलेली लाखो रुपयांची पुंजी खर्च करून खरेदी केलेले घर बेकायदा इमारतीत असल्याने जमीनदोस्त झाल्याची घटना डोळ्यांदेखत बघावी लागेल, रस्त्यावरून फिरणारी तुमची २० वर्षांची मुलगी सुरक्षित नसेल आणि चार वर्षाच्या मुलीलाही कुठे काय परिस्थितीला तोंड द्यावे लागेल याची कल्पनाही करता येणार नाही, बेरोजगार लोक तुमच्या दारात खंडणी घ्यायला उभे राहतील, आणि त्यांच्या हातात पिस्तुल असल्याने तुम्हीही आपली प्रामाणिकपणे कमावलेली रक्कम गुपचूप त्यांच्या हवाली कराल, आणि अशा कितीतरी गोष्टी... घडत आहेत, घडणार आहेत...

पण तरीही समस्त पुणेकरांची स्थितप्रज्ञाची अवस्था संपत नाही हे आम्हाला निश्चितच कौतुकास्पद वाटते. केजरीवाल आणि अण्णांचे भक्त असलेले आमचे एक मित्रवर्य, पुणेकरांवर सातत्याने संतापतात. त्यांचे म्हणणे असे की राजकारण्यांनी पुण्याची आणि देशाची पुरती वाट लावलेली असताना पुणेकर वर्षभरात १०० कोटींचे सिनेमे बघतात, आयपीएल ला उदंड प्रतिसाद देतात, नाटक-मैफिली वगैरेंची रेलचेल चालू असते, शनिवार रविवारी तर पुण्यातले एकही हॉटेल ओस न पडण्याची खबरदारी खवय्ये पुणेकर एकत्रितपणे घेतात. पण आमचा आमच्या मित्राला सवाल आहे की रसिक पुणेकरांनी, राजकारणासारख्या अरसिक विषयांत रस घ्यावा अशी अपेक्षाच कशी काय करता येईल? भजी-पाव आणि कटिंग चहा बरोबर आघाड्या आणि युत्यांचे राजकारण चघळणे यामध्ये पुणेकरांचा असलेला उत्साह पाहता त्यांना राजकारणात अपरंपार रस आहे असा निष्कर्ष अडाणी मंडळी काढू शकतील. पण त्यांना आमचे सांगणे असे की, इतरांना शिव्या घालणे हा उद्योग पुणेकरांना अतिप्रिय असल्याने आणि राजकारणी हे शिव्या घालायचे अधिकृत केंद्र असल्याने त्यांचा उल्लेख पुणेकरांच्या तोंडी येतो इतकेच. पूर्वी आपल्या क्रिकेट टीमचा उल्लेख अधिक होत असे, पण सध्या भारतीय क्रिकेट टीमची सुधारलेली कामगिरी पाहता त्यांना शिव्यांची लाखोली वाहायची पुणेकरांची संधी हिरावली जात आहे. तरी समस्त पुणेकर, क्रिकेट मधल्या पॉवर (की पवार?) प्ले विषयी खमंग चर्चा करून थोडीफार कसर भरून काढत आहेतच. असो, तर सांगायचा मुद्दा एवढाच की एक्स्प्रेस वे वर कोणी मेले, शिंदेवाडीत कोणी वाहून गेले किंवा दांडेकर पूल परिसरात भिंत कोसळून त्याखाली कोणी गाडले गेले तरी मनाची शांती ढळावी इतके लेचेपेचे पुणेकर नाहीत.

पुणेकर चांगल्या कार्यात पुढे येत नाहीत असा आरोप काही स्वयंघोषित कार्यकर्ते मंडळी करतात त्यांची कीव करावी असे आम्हाला वाटते. वास्तविक पाहता इतर कोणत्याही नगरापेक्षा पुण्यनगरीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या प्रमाणाबाहेर असल्याची आमची खबर आहे. उठसूट कोणत्याही विषयांत आपल्याला कळते असा दावा करत रस्त्यावर उतरणाऱ्या थोर संस्था पुण्यात आहे हे कोण नाकबूल करेल? काहींची तर ताकद इतकी की त्यांना संस्था म्हणण्यापेक्षा संस्थाने म्हणणे अधिक श्रेयस्कर! आता या संस्थानांमध्ये विशिष्ट प्रकारचे हितसंबंध जोपासणारी मंडळी वाढीला लागल्यास त्याचा दोष मानवी स्वभावास द्यावा लागेल. स्वतःच्या ‘अहं’ मुळे महत्वाच्या नागरी प्रश्नांवरही एकत्र न येण्यामागे मानवी स्वभाव हेच कारण आहे. आता निसर्गदत्त अशा मानवी स्वभावापुढे पुणेकर तरी काय करणार!

देशभरात बदल घडवण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर येत असताना पुण्यात ती संख्या जेमतेम शंभरच्या आसपास फिरावी यामध्ये आम्हाला पुणेकरांच्या सहनशक्तीचा विजय दिसतो. वयाच्या तेविसाव्या वर्षी हसतमुखाने फाशी जाणाऱ्या क्रांतिकारकाचे धैर्य अंगी बाणवत पुणेकर हसतमुखाने आपले खड्ड्यात जाणे सहन करतात हे लाख मोलाचे आहे. दिल्ली वगैरे बाजूला सध्या वातावरण फार तापलेले असल्याचे आम्ही ऐकून आहोत. पण दिल्ली म्हणेल तसे वागण्याचा बाणेदार पुणेकरांचा स्वभाव नसल्याने, थंड गोळा बनून पडून राहण्यात पुणेकरांनी धन्यता मानली आहे याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडे. वास्तविक राजकीय परिवर्तनासाठी झटण्याची पुणेकरांची परंपरा असल्याचे सांगितले जाते पण आपण अत्यंत पुरोगामी असून जुन्या संकल्पनांपेक्षा निष्क्रियतेच्या नवीन विचारांवर आधारित आमचे आयुष्य घडवू असा स्पष्ट संदेश पुणेकरांनी दिल्याचे पाहून मन भरून येत नाही तो खरा पुणेकर म्हणता येईल काय?!
येत्या निवडणुकीत देशात इतरत्र असहनशील मंडळींनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या तरी बहुसंख्य बहाद्दर पुणेकर आपली शांती ढळू देणार नाहीत, मतदानाला सपशेल दांडी मारून आपल्या धैर्याचा आणि स्थित्प्रज्ञतेचा आदर्श साऱ्या दुनियेसमोर ठेवतील. अखेरीस आमचे राज्यकर्ते आमच्या स्थितप्रज्ञतेवर तर विसंबून आहेत याची जाण सुज्ञ पुणेकरांना आहेच! त्यांचा हा विश्वास पुणेकर सार्थ ठरवतील असा विश्वास आम्हाला वाटतो.  

No comments:

Post a Comment