Saturday, January 20, 2018

नातं, आपलं जगाशी.

काही दिवसांपूर्वी आमची मित्रमंडळींमध्ये चर्चा चालली होती, नातं म्हणजे नेमकं काय या विषयावर. एका मित्राने वेगवेगळी नाती सांगितली, आई-बाबा, भाऊ, बहिण, नवरा, बायको वगैरे वगैरे. पण ही सगळी कोणकोणती नाती अस्तित्वात आहेत त्याची नावांची यादी झाली. प्रत्यक्षात नातं म्हणजे काय? काय असलं पाहिजे म्हणजे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी नातं आहे असं आपण म्हणू शकतो? एक मैत्रीण म्हणाली, प्रेम असलं पाहिजे. पण मग जी नाती प्रेमाशिवाय असतात, त्यांचं काय? आपले आपल्या ऑफिसमधले सहकारी, कोपऱ्यावरचा दुकानदार, व्यवसायातला भागीदार अशा अनेक मंडळींशी आपलं प्रेमाशिवायही नातं असतं. म्हणजे मग नातं म्हणजे काय हे ठरवताना प्रेमाचा काही संबंध नाही. मग नातं म्हणजे काय?
मला असं वाटतं, ‘सामायिक अनुभव’, इंग्रजीत ज्याला शेअर्ड किंवा कॉमन एक्स्पीरियंन्स असं म्हणता येईल, हा कोणत्याही नात्याचा पाया आहे. सामायिक अनुभव असेल तरच ते नातं आहे असं म्हणता येऊ शकतं. आपण आपल्या जुन्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटतो तेव्हा गप्पांमध्ये जुन्या आठवणी निघतात. किती साहजिक असतं ना हे? आपले सामायिक अनुभव आपण आठवतो आणि त्यामुळे आपण किती छान मित्र/मैत्रिणी आहोत याची जाणीव दोघांनाही होते. एकाच घरात वाढलेल्या दोन भावांचं एक सामायिक अनुभवविश्व तयार होतं आणि त्यांच्यात नातं तयार होतं. रक्ताचं नातं काहीही असलं तरी त्याला सामायिक अनुभवांची जोड नसेल तर ते नातं असेल का? आपण कित्येक वेळा बघतो की एखादी व्यक्ती जवळच्या नात्यातली असते पण कधी भेटच झालेली नाही. अशावेळी नावापुरतं नातं काही का असेना. प्रत्यक्षात ते नसतंच. ते परत निर्माण करायचं तर भेटणं, बोलणं या सारखे सामायिक अनुभव निर्माण करावे लागतात. या उलट काही वेळा एखाद्या संकटात एकत्र सापडलेले, एकमेकांना आधी न ओळखणारे लोक एकदम बांधले जातात. मुंबईत दर पावसाळ्यात बघतो आपण ते. कशामुळे होतं असं? अर्थातच- शेअर्ड एक्स्पीरियंन्स. किंवा एकत्र घेतलेला अनुभव. हा अनुभव, ही सामायिक काहीतरी असण्याची भावना दोन व्यक्तींमध्ये बंध तयार करते आणि आपण त्याला नातं म्हणतो.
नात्याला आपण आपल्या सोयीसाठी अनेक नावं दिली, नावांनुसार नात्यांना हक्क, कर्तव्ये आणि विशेषाधिकार वाटून दिले. एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या एखाद्याच व्यक्तीबरोबर सगळे सामायिक अनुभव असतील ही गोष्ट अशक्यच. त्यामुळे नातंही केवळ एकच असं असणार नाही हे उघडच आहे. एकाच व्यक्तीची अनेक नाती तयार होऊ लागली. सामायिक अनुभवांचं जाळं विस्तारत गेलं. आणि त्या नात्यांच्या बांधणीतून आपण समाज नावाची चीज उभी केली. वेगवेगळ्या प्रकारच्या सामायिक अनुभवांतून आपण जगाशी नातं तयार केलं आहे. आज माझं जगाशी, जगातल्या कित्येक गोष्टींशी भन्नाट नातं आहे याचं कारण माझे सामायिक अनुभव. एकाच स्टेडियममध्ये बसून आपल्या लाडक्या संघाला पाठींबा देणारे पाठीराखे एकमेकांशी एका नात्याने बांधले जातात कारण समोर घडणारा खेळाचा सामना आणि आपल्या आवडत्या संघाला पाठींबा देण्याची भावना या दोन्ही गोष्टी त्यांच्या सामायिक अनुभवात मोडतात.
दोन प्रकारचे मोलेक्युलर बॉंड्स असतात असं केमिस्ट्रीमध्ये शिकल्याचं आठवतंय. आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉंड्स. पहिल्या प्रकारात एक अणू दुसऱ्या अणूला आपला इलेक्ट्रॉन देतो. आणि त्या दोघांमध्ये बंध तयार होतो. तो आयोनिक बॉंड. पण दुसरा प्रकार जास्त रंजक. इथे दोन अणू एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. आणि या सामायिक इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून जो बंध तयार होतो तो कोव्हॅलंट बॉंड. पहिला प्रकार सुटसुटीत. अगदी कोरड्या व्यवहारासारखा. वस्तू घ्या, पैसे द्या, विषय संपला. पण दुसऱ्यात नुसता व्यवहार नाही. त्यामुळे या प्रकारात या बॉंड्सच्या साखळ्या तयार होतात. अधिकाधिक क्लिष्ट रचना यात तयार होऊ शकते. एकाची अनेकांशी नाती आणि नात्यांची साखळी. आपल्या समाजासारखंच की सगळं!
हे विस्ताराने मांडण्याचा उद्देश असा की या असंख्य नात्यांच्या मांदियाळीत एका नात्याला आपण जगभर अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि ते म्हणजे नवरा-बायको. अनेकदा मी माझ्याशी बोलणाऱ्या मुला-मुलींना अगदी मूलभूत प्रश्न विचारतो की त्यांना लग्न करण्याची इच्छा का आहे? त्यावर अनेकांकडून ‘शेअरिंग’ करायला जोडीदार असं एक उत्तर मिळतं. आपण हे म्हणतो, तेव्हा आपला आजचा दिवस कसा गेला एवढंच जोडीदाराला सांगणं म्हणजे शेअरिंग असं आपल्याला अपेक्षित असतं का? नक्कीच नाही. रिपोर्टिंग आणि शेअरिंगमध्ये फरक आहे ना. आपण एका व्यक्तीबरोबर हे जे लग्नाचं नातं निर्माण करू इच्छितो तेव्हा साधं दैनंदिन जगणंसुद्धा त्या व्यक्तीबरोबर सामायिक अनुभवाच्या कक्षेत कसं आणता येईल हे बघतो. नवरा बायको फिरायला जातात, जेवायला जातात बाहेर, एकत्र नाटक सिनेमा बघतात, एकत्र स्वयंपाक करतात, प्रदर्शनं बघतात, शॉपिंग करतात, वेगवेगळ्या समारंभांना जातात, काहीतरी एकत्र शिकतात, एकत्र पाळीव प्राणी पाळतात, एकत्र घर सजवतात, एकत्र नवीन पिढीला जन्म देतात, एकत्र नवीन पिढीला वाढवतात आणि या सगळ्यातून ते सातत्याने नवनवीन असे सामायिक अनुभव तयार करत असतात. सामायिक अनुभव सगळे चांगलेच असतात असं काही नाही. वाईटही असू शकतात. पण त्या सगळ्यांची गोळाबेरीज करत त्यांचं नातं कसं आहे ते ठरेल. इतरांप्रमाणेच आपल्या स्वतःबरोबरच्या नात्यालाही हे सामायिक अनुभवाचं तत्त्व लागू होईल. आपण एकटे असताना काय काय केलं, वाचलं, बघितलं, अनुभवलं यातून आपलं एक स्वतःशीही नातं तयार होत जातं.
लग्न करत असताना, जोडीदार निवडत असताना, म्हणजेच एक नवं नातं निर्माण करायला जात असताना वरवरच्या निव्वळ भौतिक गरजांशी निगडीत अपेक्षांच्या पलीकडे आपल्याला जायला हवं. आपल्याला कोणत्या व्यक्तीबरोबर, कोणत्या कुटुंबाबरोबर शेअर्ड एक्स्पीरियंन्स घ्यायला आवडणार आहे, आपल्या अनुभवांमध्ये कोणाला सामावून घ्यायला आवडणार आहे ही गोष्ट विचारांत घेणं महत्त्वाचंय. ही पहिली पायरी आहे. पुढेही अनेक पायऱ्या आहेत, पण त्याविषयी आता पुढच्या लेखांमध्ये. 
(दि.२० जानेवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)

Sunday, January 14, 2018

मी आणि पतंग

संक्रांतीच्या शुभेच्छांसोबत जे काही फोटो, चित्र फॉरवर्ड होतात त्यात हमखास पतंग असतो. संक्रांतीला पतंग उडवण्याची महाराष्ट्रात विशेष पद्धत नाही. गुजरात-राजस्थान बाजूला संक्रांत आणि पतंग यांचं नातं अधिक जवळचं. पण पतंग उडवायला निमित्त थोडीच लागायचं? लहानपणी आम्ही शुक्रवार पेठेत राहायचो तेव्हा भरपूर पतंग उडवायचो. आणि या पतंग उडवण्याचा कलेत माझ्या इतका अडाणी प्राणी माझ्यातरी बघण्यात नव्हता. मला आयुष्यात फार कमी वेळा पतंग नीट उडवता आलाय. एक तर आधी पतंग उडायचा नाही. उडालाच तर मला त्याला सांभाळता यायचं नाही. उडायला लागल्यावर आनंदाने मी भरपूर ढील देणार आणि मग पतंग माझं ऐकणं बंद करणार, असं फार वेळा घडायचं. कित्येक पतंग असेच वाया घालवल्यावर माझ्या मोठ्या भावाचा- अमेयचा आणि मित्रांचाही ओरडा खाल्लाय. नंतर मग अमेय मला पतंग हातातच द्यायचा नाही. त्याच्या मागे उभं राहून मांजाला ढील देणं किंवा मांजा गुंडाळून घेणं हेच माझं मुख्य काम बनलं होतं. किंवा पतंगाला मांजा बांधणे, शेपटी लावणे असं काय काय मी करायचो. त्यात मात्र मी तरबेज झालो. हाताची वीत करून मांजा गुंडाळायची पद्धत इतकी अंगात भिनलीए की आता लॅपटॉपची वायर पण तशीच गुंडाळली जाते.
गच्ची गच्चीत पतंग उडवणाऱ्या पोरांमध्ये स्पर्धा असायची तेव्हा दुसऱ्याचा पतंग कापायचा तर मांजाला धार पाहिजे. म्हणून मग रात्री बसून मांजाला खळ लावणे वगैरे उद्योग केल्याचं चांगलं लक्षात आहे. हे करताना आमचेही हात कापले गेलेत. पण ती त्यावेळी अभिमानाने मिरवण्याची गोष्ट वाटायची.

'मांज्यामुळे पक्षी जखमी' अशा बातम्या आता वाचायला मिळतात, पण त्यावेळी हे सगळं कुठे माहीत होतं? माहीत असतं तरी कळून घेतलं असतंच असं नाही. समोरच्याचा पतंग कसा काटता येईल हेच डोक्यात, बाकी जगाचं काही का नुकसान होईना. आपला समाज पण असाच कधी कधी लहान मुलांसारखा वागतो, नाही?! समाज हा लहान मुलासारखा वागतो म्हणून त्याला सतत कोणीतरी मायबाप सरकार लागतं का? आमच्या गावात आम्हीच सरकार असा अस्सल लोकशाही नारा देत, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला आणि एक प्रकारे प्रौढ, प्रगल्भ व्हायला घाबरतो का आपण? काय माहित.   

Friday, January 12, 2018

मोठी उडी!

लग्न म्हणजे काय? लग्न कधी करावं? करायलाच हवं का? मग करिअरचं काय? जमेल का आमचं? माझ्या कुटुंबाचं आणि जोडीदाराचं जमेल का? मला आत्ता आहे ते स्वातंत्र्य लग्नानंतरही मिळेल का? लग्न न करण्याचा पर्याय आहे का? जुन्या ‘रिलेशनशिप्स’चं काय करायचं? एकनिष्ठतेचं काय करायचं? वगैरे वगैरे अनेक प्रश्न माझ्या पिढीच्या प्रत्येकाच्या डोक्यात आहेत. त्या प्रश्नांवर थोडं मंथन करावं म्हणून हा लेख.

ऐंशी-नव्वदच्या दशकात जन्माला आलेली आम्ही मंडळी प्रचंड बदल बघत मोठी झालो आहोत. आणि या बदलांना सगळ्यात मोठा रेटा दिलाय तो तंत्रज्ञानाने. तंत्रज्ञानाने आपलं सगळ्यांचं जीवन अमुलाग्र बदललं आहे. एवढा बदल, मला नाही वाटत आजवर इतर कोणत्याही पिढीच्या वाट्याला मोठं होताना आला असेल. आणि या बदलांना तोंड देता देता, आत्मसात करता करता जुनं जग आणि नवीन जग यात तुफान ओढाताण होत होत नवनवीन प्रश्न निर्माण होतायत. आता काही जण म्हणतील, की हे तर प्रत्येक पिढीच्या बाबतीत झालंय, हे नवीन नाही. कागदावर हे म्हणणं बरोबर वाटलं तरी बदलांची वारंवारिता (Frequency) आणि तीव्रता (Intensity) ही आत्ता कित्येक पटींनी जास्त आहे. आणि कदाचित ती वाढतच जाणार आहे. तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यात अनेक सुख-सोयी आल्या हा झाला केवळ एक भाग. पण इतरांना जाणून घेण्याची, इतरांकडे बघण्याची, इतरांशी बोलण्याची अशी एक प्रचंड मोठी खिडकी तंत्रज्ञानाने उघडून दिली. आणि या खिडकीमुळे आपण विचारांच्या दृष्टीने स्वतंत्र व्हायला चालना मिळाली. ‘आपण आणि आपल्या आजूबाजूचा परीचयातला समाज’ या डबक्यातून आपण एकदम मोठ्या महासागरात येऊन पडलो. आपल्या आजूबाजूचेही आलेच या महासागरात. पण तरी महासागरात आल्यावर क्षितीजं रुंदावली. ‘कोण काय म्हणेल’ ही भीती तुलनेने कमी झाली. जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुठेतरी माझ्यासारखं इतरांपेक्षा वेगळे विचार असणारं कोणीतरी असू शकतं आणि त्या कोणातरीबरोबर मी संपर्क साधू शकतो, विचारांची देवाणघेवाण करू शकतो ही शक्यता आपल्याला पारंपारिक बंधनांच्या खड्ड्यातून खेचून बाहेर काढू शकते. आपण स्वातंत्र्याच्या दिशेने चालू लागतो. गावाकडच्या मंडळींना शहरात आल्यावर जी स्वातंत्र्याची अनुभूती मिळते तीच आता सर्वच ठिकाणच्या लोकांना मोठ्या प्रमाणावर घरबसल्या मिळण्याची सोय उपलब्ध झाली. ही नवीन तंत्रज्ञानाची ताकद आहे. या स्वातंत्र्याच्या अनुभूतीमुळे विचारांच्या आणि आकांक्षांच्या कक्षा विस्तारल्या. जगात लोक काय काय विचार करतात, एकमेकांना कसं वागवतात, सामाजिक बंडखोरी कशी करतात, त्या मागच्या प्रेरणा काय असतात, विचारधारा काय असते अशा कित्येक गोष्टी आपल्या समोर सहजपणे उलगडत असतात. कितीही घ्याल ते कमीच आहे! साहजिकच माझं विचारांचं अवकाश एकदम मोठं होत जातं. आज एकाच दिवशीच्या वर्तमानपत्रात ऑनर किलिंगची बातमी आणि पॉलिअॅमरी सारख्या विषयावरचा लेख असू शकतो. कारण या वर्तमानपत्राच्या वाचकाच्या भाव विश्वात जसा ऑनर किलिंग अस्तित्वात असणारा समाज आहे तसंच देशोदेशीचे कलाकार, विचारवंत, लेखक आणि त्यांचं नातेसंबंधांवरचं म्हणणं हेही आहे. अर्थातच या माहितीच्या प्रचंड माऱ्यानंतर आमची पिढी गोंधळात पडली नसती तरच नवल.

कुटुंब या शब्दाची व्याप्ती आता कमी होत गेली आहे असं अनेकदा म्हणलं जातं. विभक्त कुटुंब, फ्लॅट संस्कृती अशा गोष्टींवर टीका केली जाते. कुटुंब या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती कमी झालीये का याबद्दल मला शंका आहे. पण कुटुंबाची व्याख्या आणि कुटुंबाकडून असणाऱ्या अपेक्षा बदलल्या आहेत हे मात्र खरं. शहरं मोठी झाली, कामाचे तास वाढले, त्याबरोबर माझं पारंपारिक कुटुंब छोटं होत गेलं. चुलत-मामे-मावस भावंडं आधीपेक्षा दूर गेली. नित्यनेमाने संपर्क असावा अशी रक्ताच्या नात्यातली माणसं कमी झाली. रक्ताच्या नात्यांतली कित्येक मंडळी वर्षातून एकदा एखाद्या लग्नात वगैरे भेटू लागली, किंबहुना नुसती दिसू लागली. नाती टिकण्यासाठी आणि फुलण्यासाठी आवश्यक असा शेअरिंगचा भाग संपलाच. “मी आयुष्यात ज्यांना सगळं मिळून तीन वेळा भेटलोय त्यांनाही मी लग्नाला आमंत्रण द्यायचं हे काय मला पटत नाही.”, माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं. असं म्हणणारे आज काही कमी नाहीत. ही भावना आमच्या पिढीच्या मुला-मुलींमध्ये आहेच. केवळ मी अमुक घरात जन्माला आलो म्हणून माझ्याशी जोडले जाणारे नातेवाईक आता मला जवळचे वाटत नाहीत. आणि जवळचे वाटले नाहीत तरीही त्यांना जवळचे मानण्याचं, त्यांना माझं कुटुंब मानण्याचं पारंपारिक बंधनही डबक्यातून महासागरात आलेल्या मला नकोसं वाटतं. असं असेल तर मग कुटुंबाची व्याप्ती कमी झाली आहे या म्हणण्यात चूक काय? तर गफलत अशी आहे की, कुटुंबाची व्याख्या बदलून आमच्या पिढीने नव्याने ज्यांच्याशी जवळचे नातेसंबंध तयार केले त्या सर्वांना स्वतःच्या नकळतच कुटुंबियांचा दर्जा दिला आहे. त्यामुळे व्याप्ती कमी झाली आहे यापेक्षा व्याख्या विस्तारली आहे हे म्हणणं अधिक योग्य ठरेल. माझे मित्र-मैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय, शेजारी, ऑफिसमधले सहकारी, असे अनेकजण माझ्या या नव्या कुटुंबात सामील होत जातात. ज्यांना मी निवडलेलं असतं. अगदी माझ्या रक्ताच्या नात्यांतल्या एखाद्याबरोबर माझं असं काही मस्त नातं निर्माण होतं की रक्ताचं नातं दुय्यम ठरतं. माझं आणि माझ्या पिढीच्या मंडळींचं प्राथमिक कुटुंब हे अशा ‘तयार केलेल्या नात्यांचं’ आहे.
स्वातंत्र्याची अनुभूती वाढण्याचं तंत्रज्ञानासह अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेल्या जगात व्यक्ती व्यक्तीला मिळालेली आर्थिक स्वायत्तता. गेल्या चार-पाच दशकात स्त्रिया कमवायला बाहेर पडल्या तेव्हा आर्थिक स्वायत्तता असणाऱ्यांचं समाजातलं प्रमाण एकदम वाढलं. पारंपारिक असे जातीचे आणि त्याबरोबर येणाऱ्या व्यवसायांचे जोखड निघून जाऊन नोकरदार मध्यमवर्ग अधिक विस्तृत झाला. तेव्हाच पुरुषही कुटुंबाच्या व्यवसाय किंवा पारंपारिक उपजीविकेच्या मार्गावर अवलंबून नसल्याने स्वायत्त होत गेला. ही स्वायत्तता गेल्या तीस वर्षांच्या जागतिकीकरणाच्या काळात अजूनच वाढली. साहजिकच कुटुंबावरचं अवलंबित्व कमी झालं.

कुटुंबव्यवस्थेशी निगडीत या बदलांचा आढावा घेतल्याशिवाय लग्न या विषयाकडे आपल्याला वळता येत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लग्न हाच पारंपारिक कुटुंबव्यवस्थेचा पाया आहे. पण वर उल्लेखलेल्या नव्या कुटुंबव्यवस्थेसाठी लग्न ही पूर्वअट नाही. साहजिकच लग्न ही गोष्ट थोडी मागे पडते. कमी प्राधान्याची बनते. अस्तित्वात असणाऱ्या नव्या कुटुंबव्यवस्थेत सगळ्या गरजा पूर्ण होत असतील तर मला लग्न केल्याने नव्याने काय मिळणार हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. बौद्धिक, भावनिक, भौतिक आणि लैंगिक अशा माणसाच्या चार प्रमुख गरजा आहेत. यातल्या पहिल्या तीन तर माझ्या नव्या कुटुंबाकडून पूर्ण होतातच होतात, पण चौथी लैंगिक गरजही पूर्ण होणे सहज शक्य असते. विवाहपूर्व शरीरसंबंधांचं अस्तित्व नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अजून याला व्यापक मान्यता नाही. पारंपारिक समजुतींचा जबरदस्त पगडा असल्याने या गोष्टीला लपवून ठेवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. पण तरीही, ती अस्तित्वात आहेच. आणि अस्तित्वात आहे याचाच अर्थ लैंगिक गरजही भागण्याचे मार्ग आज उपलब्ध आहेत. ‘माझ्या चारही गरजा भागत असताना मी लग्नाच्या फंदात का पडू’ असा साहजिक प्रश्न अनेकांना पडतो. त्यातही लग्नाला जोडले गेलेले शब्द-वाक्य यांचा दोष फारच मोठा आहे. लग्न म्हणजे बंधन, लग्न म्हणजे तडजोड, लग्न म्हणजे स्वातंत्र्य संपले, लग्न म्हणजे बायकोची कटकट, लग्न म्हणजे सासूशी भांडण, लग्न म्हणजे मित्रांसाठी आता वेळ नाही वगैरे वगैरे असंख्य वाक्य असतात. ‘माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होत असताना किंवा पूर्ण होण्याची शक्यता असताना मी या सगळ्या नकारात्मक आणि कटकटीच्या गोष्टी का बरं स्वीकारू? आपण होऊन स्वतःच्या पायावर धोंडा कशाला पाडून घ्यायचा’ असा विचार अनेकजण करतातच. तरीही ते पुढे जाऊन लग्न करतात, लग्नासाठी विवाहसंस्थांमध्ये नाव नोंदवतात कारण आपल्या आजूबाजूच्या मंडळींचं एक दडपण घेतलं जातं. डबक्यातून महासागरात आलो तरी आपल्याबरोबर डबक्यातून आलेली मंडळी आजूबाजूलाच असतात आणि त्यांचं मत पूर्णपणे डावलण्याचं धैर्य सगळ्यांना दाखवता येत नाही, काहीजण ती लढाई टाळूही बघतात. ज्याची त्याची निवड असते. यात चूक-बरोबर असं काही नाही, पण आहे हे असं आहे.

लग्नव्यवस्था कुठून अस्तित्वात आली इकडे आपण एकदा गेलं पाहिजे म्हणजे मग लग्न का करायचं किंवा नाही याचं उत्तर मिळू शकेल. हजारो वर्षांपूर्वी टोळी बनवून राहणारा मनुष्यप्राणी हा मातृसत्ताक पद्धतीने राहत होता म्हणतात. मुलांना वाढवणं, संगोपन करणं ही जबाबदारी अर्थातच स्त्रियांची होती. वडील कोण आहे हा प्रश्न बिनमहत्त्वाचा होता. मुलं आईवरून ओळखली जात. पुढे मग झालं असं की माणसाला शेतीचा शोध लागला. शेतीच्या शोधाबरोबर खाजगी मालमत्ता ही संकल्पना अस्तित्वात आली आणि त्याबरोबर माझी खाजगी मालमत्ता मी मेल्यावर कोणाकडे जाणार या विचारांतून माझा वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला. शिकारीप्रमाणेच शेती करण्याची मुख्य जबाबदारी देखील पुरुषांकडेच होती. त्यामुळे माझा वारस कोण हे पुरुषाला कळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी एका स्त्री-बरोबर एकच पुरुष असेल तर त्या स्त्री ने जन्म दिलेले अपत्य त्या पुरुषाचेच असेल, या सगळ्या विचारांतून लग्न नावाची संकल्पना अस्तित्वात आली. थोडक्यात, ‘आपला वारसा पुढे नेण्यासाठी नवीन पिढीला जन्म देणे’ हा लग्नाचा प्राथमिक उद्देश आहे.  लग्न का करायचं, आणि लग्न कधी करावं या दोन्ही प्रश्नांच्या उत्तराकडे जाण्याआधी हा लग्नाचा प्राथमिक उद्देश लक्षात घेणं अत्यावश्यक ठरतं. आयुष्यभराचा जोडीदार, हक्काचा माणूस, समजून घेणारी, आधार देणारी, सुख-दुःखात साथ देणारी अशी ‘एकच’ व्यक्ती हवी ही आपली नैसर्गिक गरज नसून, वर्षानुवर्षे परंपरेने आपल्याला तसे वाढवले असल्याने तयार झालेली विचारधारा आहे. सिनेमा-काव्य यातून या विचारधारेला खतपाणीच मिळालं. संपर्क माध्यमांची कमतरता, आर्थिक-राजकीय अस्थिरता अशा सगळ्या जुन्या काळात कदाचित या व्यवस्थेने सामाजिक स्थैर्य देत मानवजातीला मदतच केली असू शकते. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. आजच्या काळात मात्र आपली विचारधारा ही नैसर्गिक नसून कृत्रिमपणे निर्माण केलेली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे लग्न का करायचं याच्या उत्तरांमध्ये नवीन पिढीला जन्म देणे आणि तेही वारसा हक्क देण्याच्या दृष्टीने हे दोन मुद्दे फार महत्त्वाचे ठरतात. लग्न कधी करावं याबाबत डॉक्टर मंडळी आपलं मत मांडतातच त्यामुळे त्याबाबत खोलात मी जाणार नाही. पण लग्नाचा उद्देश हा नवीन पिढीला जन्म देणे हा आहे हे लक्षात घेतल्यावर तो उद्देश पुरा करण्यासाठी आपलं शरीर सर्वोत्तम अवस्थेत असतानाच लग्न करणं हे तर्कशुद्ध (लॉजिकल) आहे. आणि इथेच लग्न कधी करावं याचं उत्तर मिळतं. आज आमच्या पिढीची जीवनशैली ही अतिशय सुखाची आणि सर्व सोयींनी युक्त अशी आहे. अशावेळी लग्न करून एका दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान देऊन स्वतःचा कम्फर्ट झोन सोडणं ही गोष्ट बहुतेकांना कठीण जाते आणि मग हळूहळू घरात पालकांशी वादही व्हायला लागतात. आई-वडील मागे लागतात ‘लग्न कर’ म्हणून. आणि आपण मात्र मुळीच तयार नसतो. योग्य वयातच सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात या पालकांच्या वाक्यात लग्नाचा मूळ उद्देश डोकावतो आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं नजरे आड करता येत नाही. एकुणात मोठ्या कचाट्यातच ही पिढी अडकून बसली आहे.


मग यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं करावं काय? मला वाटतं, परिस्थितीच्या रेट्यामुळे आपली कुटुंबाची व्याख्या बदलली आहे हे समजून घेणं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वीकारणं ही पहिली पायरी असू शकते. लग्न हा आयुष्याचा एक भाग आहे, नक्कीच महत्त्वाचा, पण एक भाग आहे, एकमेव नव्हे हेही समजून घ्यायला लागेल. लग्न करताना त्याबद्दलची आपली कारणमीमांसा पक्की असली पाहिजे. मी लग्न का करतो/करते आहे, हे नेमकं माहित असायला हवं.’लोक म्हणतात म्हणून’, ‘आता सगळेच मित्र करतायत म्हणून, अशी उथळ विचारधारा बाजूला ठेवायला हवी. मला माझ्या लग्नातून आणि लग्न ज्या व्यक्तीशी करणार आहे त्या व्यक्तीशी निर्माण होणाऱ्या नात्याकडून काय हवं आहे, मी काय देऊ शकतो, माझ्या चारही गरजा या एकाच जोडीदाराकडून पूर्ण व्हाव्यात अशी माझी अपेक्षा असणार आहे का? तसे नसल्यास त्याची दुसरी काही सोय असणार आहे का? त्याबद्दल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खुलेपणे बोलू शकणार आहात ना, खोटेपणापेक्षा नवीन नातं तयार करताना आपण प्रामाणिक वागणुकीचा पाया रचू शकणार ना; अशा सगळ्या सगळ्या मुद्द्यांवर आमच्या पिढीने सविस्तर विचार करण्याची गरज आहे. याचे कुठे कोचिंग क्लासेस नाहीत, ना याचं काही टेक्स्टबुक. व्यक्तीनुसार बदलतील हे विचार. आणि हा विचार करताना आपण महासागरात आहोत, हे लक्षात घेऊन जुन्या डबक्यातल्या आजूबाजूच्या मंडळींची चिंता न करण्याचं धोरण ठेवावं लागेल. स्वतंत्र मनोवृत्तीने, तर्कसंगत विचार करत आपण निर्णय घेणं शिकण्याची गरज आहे. ‘माझ्या निर्णयाला मीच जबाबदार, यातले यश आणि अपयश दोन्ही माझेच’ हा प्रगल्भ विचार घेत पुढे जाणं गरजेचं आहे. मला माहित्ये की हे सगळं काही सोपं नाही. आपली कुटुंबाची व्याख्या जितकी सहजपणे आणि कदाचित नकळतपणेही बदलली तसं नातेसंबंधांच्या किंवा लग्नाच्या बाबतीत होणार नाही. इथे कदाचित विशेष प्रयत्न करावे लागतील. पण ते करणं हेच आमच्या पिढीसाठी आणि पुढच्याही पिढ्यांसाठी गरजेचं आहे. ही एक उडी आहे. तंत्रज्ञान ज्या वेगात पुढे जातंय त्याबरोबर पुढे जाताना फरफट होऊ नये यासाठी आम्हाला प्रगल्भ व्हावं लागेल. त्या प्रगल्भतेच्या दिशेने मारायची ही उडी आहे. उडी मारताना जसं थोडं मागे जाऊन आपण पळत येऊन मग उडी मारतो, तसंच पुन्हा एकदा जरा मागे जात, आपण निर्माण केलेल्या व्यवस्था, समजुती आणि परंपरा यांना तर्कशुद्ध विचारांच्या कसोटीवर घासून पुसून तपासून आम्हाला उडी मारायची आहे. एक मोठी उडी! 

(जानेवारी २०१८ मध्ये विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्या युवा विशेषांकात प्रसिद्ध.)

Friday, January 5, 2018

दख्खनची राणी

आज कित्येक वर्षांनी डेक्कन क्वीनने पुणे-मुंबई प्रवास केला. पूर्वी ते जणांचं कम्पार्टमेंट पुरेसं मोठं
वाटायचं. आता ते छोटं वाटतं. गाडी सुरु व्हायला काहीच वेळ असताना एक जोडपं आलं आणि पाठोपाठ एक आई-मुलगी अशा एकदम तीन स्त्रिया आल्या. तेव्हा पटकन कोणीही काहीही न बोलता दोन्ही बाजूच्या सहा-सहा जणांच्या कम्पार्टमेंट्स मधल्या जागांची आदलाबदल वगैरे झाली. अगदी सहजपणे घडलं हे. कोणी काही विचारलं नाही, बोललं नाही. मग एका बाजूला पाच स्त्रिया, आणि त्यातल्या एकीचा नवरा असे ६ बसले गेले. दुसऱ्या बाजूला आम्ही ६ आडदांड बाप्ये. जागा अजूनच कमी झाल्याचा भास झाला तेव्हा मला. एवढं घडतंय तोवर दख्खनची राणी निघाली.
सुरुवातीचा काही काळ थंड शांततेत गेल्यावर मग माझ्या समोरच्या माणसाच्या हातात 'सामना' बघून आमच्या गप्पा सुरु झाल्या. अरुण नाव त्यांचं. पन्नाशीचे असावेत साधार. पुढे गप्पांमधून समजलं की कट्टर शिवसैनिक. पूर्वी कुठलेतरी शाखाप्रमुख वगैरे होते म्हणाले. "सतरा वर्षांचा असताना पहिल्यांदा बाळासाहेबांना ऐकलं आणि त्यांचा भक्तच झालो", ते म्हणाले. एकदा राजकारणाच्या गप्पा सुरु झाल्यावर बाकीचेही सहभागी झाले. एकजण शरद पवार समर्थक तर दुसरे होते ते पूर्वी कॉंग्रेसचे पाठीराखे होते पण आता मोदींनी जादू केलीये म्हणत होते. पण हे म्हणता म्हणताच राहुल गांधी आता जरा मोठा झालाय असंही म्हणत होते. चौथे जे काका होते, ते मात्र सगळ्याच राजकारण्यांना एकजात शिव्या घालत होते. ते म्हणाले, "मी वेगवेगळ्या निवडणुकांत वेगवेगळ्या लोकांना मतं दिली आहेत आजवर. कम्युनिस्ट ते आम आदमी पार्टी, व्हाया शिवसेना-भाजप-मनसे, पण एकही पक्ष लायकीचा नाही." त्यामुळे गेल्या पालिका निवडणुकीत 'नोटा' वापरलं असं म्हणाले. 
तेवढ्यात डेक्कन क्वीनचं प्रसिद्ध ऑम्लेट आणि कटलेट आलं. ते घेऊन पहिला घास घेईपर्यंत काही काळ शांतता झाली आणि मग खाता खाता पुन्हा चर्चा सुरु. मी सगळं फक्त शांतपणे ऐकत होतो. मध्येच एखादा प्रश्न विचारून बोलायला उद्युक्त करत होतो इतरांना. शेतकरी आत्महत्या का करतात याविषयावर एकदा चर्चा येऊन गेली. पण यातलं कोणालाच फारसं माहित नाही म्हणल्यावर चर्चेची गाडी मुंबईवर आली. आमच्यातले तिघेच मुंबईकर होते. सेनेचे अरुण म्हणाले, "आम्ही मराठी माणसाला पुरेसा न्याय नाही देऊ शकलोय. अजून बऱ्याच गोष्टी करायला हव्या होत्या. मला वाटलं होतं राजसाहेब काहीतरी करतील. पण तसं काय घडत तरी नाहीये." मी त्यांना विचारलं की तुम्ही नाही का मनसेमध्ये गेलात, तर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. शिवसेनेला दगा कसा देऊ? राज आणि उद्धव यांनी एकत्र आलं पाहिजे. मी राजसाहेबांच्या सभांना जातो, मला ते आवडतात. पण काम सेनेचंच करणार.". 
"पर्यावरण हा मुद्दा मोठाय आणि त्यावर कोणताच पक्ष काहीच बोलत नाही", असं ते शरद पवार समर्थक काका म्हणाले. शिवाय भ्रष्टाचार सगळ्याच पक्षात आहे असंही बोलणं झालं. त्यावर इतरांनी दुजोरा दिला. असं करत करत शेवटी, सगळेच पक्ष सुधारण्याची गरज आहे असा एकमताने निष्कर्ष निघाला. "मग सगळे चांगले लोक बाहेर पडून वेगळा पक्ष का काढत नाहीत?", असं ते सुरुवातीपासून सगळ्यांना शिव्या घालणाऱ्या काकांनी विचारल्यावर सेनेचे अरुण म्हणाले, तसं केलं तर त्यांचा पुन्हा 'आप' होईल. त्यापेक्षा प्रत्येकाने आपापला पक्ष सुधारण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. पक्ष भेद असले म्हणून एकमेकांच्या उरावर बसायची गरज नाही, एकोप्याने चांगलं काम करता येतं अशीही चर्चा झाली. कल्याण स्टेशन आलं तेव्हा चर्चा हळूहळू थंड होऊन एक दोघांना डुलकी लागू लागली होती.

थोड्या वेळाने मी दरवाजात वारा खात उभा राहिलो. दरवाजातच खाली एक एकोणीस-वीस वर्ष वयाचा मुलगा बसला होता. नुसतं बघितल्यावर, याची आयुष्यात यो यो हनी सिंगच्या पलीकडे संगीतातली रुची गेली नसेल असा दिसणारा. पण त्याने मोबाईलवर कौशिकी चक्रवर्तीचं गायन लावलं होतं. आणि तल्लीन होऊन तो ऐकत होता. समोर आलेली व्यक्ती ही राजकारणी असो नाहीतर सामान्य माणूस, किती पटकन आपण एखाद्याबद्दल आपल्या मनात प्रतिमा तयार करतो ना? कित्येकदा तर चुकीचीच... हा विचार मी करत असतानाच दख्खनची राणी दादर स्टेशनमध्ये शिरली. आणि मी बाहेर पडून मुंबईच्या सकाळच्या त्या अवाढव्य गर्दीत मिसळून गेलो.

Monday, December 25, 2017

मैं भी पोस्टमन, तू भी पोस्टमन...

“...पोस्टमन म्हणजे, मजकुरातून अगदी अलिप्त राहून, माणूस म्हणजे फक्त पत्त्याचा धनी एवढंच ओळखतात...पोस्टाचं देवासारखं आहे. पोस्टमन देईल ते आपण निमूटपणे घ्यावं. देणारा तो, घेणारे आपण. शेवटी काय हो, आपण फक्त पत्त्यातल्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच असतो.”
- ‘माझे पौष्टिक जीवन’, पु.ल.देशपांडे.

पुलंच्या इतर अनेक लेखनाबरोबर या ‘माझे पौष्टिक जीवन’ची कितीतरी पारायणं आपल्यातल्या
अनेकांनी केली असतील. मला आठवतंय, पहिल्यांदा मी हे वाचलं होतं तेव्हा ‘गर्दी बघत किंवा रस्त्यातली मारामारी बघत उभा पोस्टमन मी कधीही बघितलेला नाही. एकवेळ पोलीस उभा दिसेल पण पोस्टमन आपलं काम करत असतो’ हे वाक्य वाचल्यावर कित्येक दिवस मी पोस्टमन मंडळींचं बारकाईने निरीक्षण केलं होतं. आणि खरोखरच सदैव पत्र पोचती करायला सायकल मारणारे पोस्टमन बघून मला त्यांच्याविषयी विशेष आदर वाटला होता.

अर्थात पंधरा वीस वर्षांपूर्वीची ही आठवण डोक्यात यायचं काही कारण नव्हतं. पण एकामागोमाग घडणाऱ्या घटना, समोर येणाऱ्या धक्कादायक गोष्टी यामुळे पोस्टमन मंडळींची आठवण आली. पण आता मला आधीसारखा आदर न वाटता भीतीच वाटू लागलीये. कारण पोस्टमन बदललेत. म्हणजे आपले पोस्टाचे पोस्टमन अगदी आधीसारखेच असतीलही. पण सोशल मिडियावरच्या पोस्टमन मंडळींनी कोणत्याही विचारी माणसाच्या मनात अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. आपल्याला नेमकं झालंय तरी काय? आपल्यापर्यंत फेसबुक-ट्विटर आणि त्याहीपेक्षा व्हॉट्सअॅपमार्फत पोहचणारी प्रत्येक गोष्ट पुढे कोणाकडे तरी पाठवण्याची पोस्टमनची ड्युटी करण्याचा आपण आटापिटा का करतो? आपल्या सगळ्यांना पोस्टमन का व्हावंसं वाटतंय हा प्रश्न गेले अनेक दिवस माझ्या डोक्यात घर करून आहे.
सोशल मिडिया आणि इंटरनेट या गोष्टी लोकशाहीला मजबूत करणाऱ्या आहेत, यामुळे सामान्य माणसाला व्यक्त होण्याचा, आवाज उठवण्याचा मार्ग मिळेल आणि यातून लोकशाही सुदृढ होईल असा एक भाबडेपणा माझ्यात परवा परवापर्यंत होता. लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळाल्याने काही चूक घडलंय असं नव्हे. पण स्वतः व्यक्त होण्यापेक्षा, दुसऱ्या कोणाचंतरी व्यक्त होणं खऱ्याखोट्याची शहानिशा न करता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणं यातून एक मोठाच राक्षस पैदा झाला आहे. सोशल मिडियाच्या सुरुवातीच्या काळात गांधीजी-नेहरू यांच्याबद्दल कित्येक खोट्यानाट्या गोष्टी, फोटोशॉप केलेली छायाचित्रे पसरवली गेली होती. कोणाकडून पसरवली गेली? तर या नव्या पोस्टमन मंडळींनी कसलाही पुढचा मागचा विचार न करता या गोष्टी बेधडकपणे पुढे धाडून दिल्या. हळूहळू इतर विचारधारांचे लोकही या नव्या माध्यमांना सरावले, या राक्षसाच्या ताकदीची त्यांना कल्पना आली आणि मग त्यांच्याकडूनही साफ साफ खोट्या गोष्टी अतिशय सराईतपणे सोशल मिडियावर टाकल्या जाऊ लागल्या. नव-पोस्टमन वर्गाकडून त्या सर्वदूर पोचतील याची तजवीज केली गेली. मंत्री-लोकप्रतिनिधी यांनीही वेगवेगळ्या वेळी आपल्याकडून या सगळ्यात हातभार लावला. परदेशातल्या शहरांचे किंवा विकासाचे फोटो आपल्या कामगिरीचे कौतुक म्हणून या मंडळींच्या चक्क अधिकृत सोशल मिडिया खात्यांवरून शेअर केले गेले. लोक पोस्टमन बनू बघत असतील तर ते आपलेच प्रतिनिधी नाहीत का?! त्यामुळे तेही पोस्टमनसारखेच वागले, त्यात आश्चर्य काय? कोणताही राजकीय पक्ष, कोणतीही राजकीय विचारधारा आज या उद्योगांत नसल्याचं दिसून येत नाही. खोट्याचा एवढा प्रचंड महापूर याआधी कधी होता काय आपल्या आयुष्यात?
फेसबुक-ट्विटरच्या ज्या काही थोड्या मर्यादा होत्या त्या व्हॉट्सअॅपने पार मोडीत काढल्या. परवाचा किस्सा सांगतो. एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये, ज्यावर सुमारे सव्वाशे लोक आहेत, एका माणसाने एका महापुरुषाच्या पुस्तकातला एक उतारा टाकला. एका विशिष्ट जातीच्या मंडळींवर तोंडसुख घेणारा तो मजकूर आणि त्यासोबत पुस्तकाचे नाव आणि पान क्रमांक इत्यादी तपशीलदेखील दिलेले होते. मजकूर अगदी खरा भासावा, अशा पद्धतीने संदर्भ वगैरे देण्यासह काळजी घेतली गेली होती. परंतु, त्या मजकुराची पहिली तीन-चार वाक्ये सोडली तर पुढचा बहुतांश मजकूर मूळ पुस्तकात नव्हताच. किंबहुना मूळचा मजकूर वाचल्यास त्यातून पूर्णपणे वेगळा अर्थ निघत होता. काही अभ्यासू मंडळींनी पुस्तकाच्या त्या पानांचे फोटोच त्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्याने हा खोटेपणा उघड झाला. पण असे कितीवेळा घडते? केवळ पोस्टमन बनण्याच्या एका व्यक्तीच्या अनिवार ओढीमुळे किती नुकसान होऊ शकते याचं हे छोटं उदाहरण आहे. बरे, हे सगळे पोस्टमन पुलंच्या पोस्टमनसारखे अलिप्त नसतात. ते जो मजकूर पोचवतात तो वाचून त्यांचं पित्त खवळलेलं असतं. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीसमूहाबद्दल पराकोटीचा द्वेष वाटू लागतो. याच भावनिक अवस्थेत त्याला असेच इतर अनेक शहानिशा न केलेले अर्धवट, संदर्भ सोडून पाठवलेले मजकूर अन्य पोस्टमनकडून मिळत राहतात. आणि हळूहळू त्याच्या मनातला कडवटपणा भीतीदायक अवस्थेला जाऊन पोचतो. डोळ्यांवर चष्मे चढतात, माणसांना लेबलं चिकटतात आणि माणूस माणसापासून दुरावतो. या अशा वातावरणात सामाजिक सहिष्णुता जपावी तरी कशी? कोणत्याही स्फोट होऊ शकेल असं ठासून दारुगोळा भरलेलं कोठार झालंय आपलं मन, शांतता कशी मिळेल?

हे प्रकार फक्त राजकीय मुद्द्यांपाशी थांबत नाहीत. सणांना शुभेच्छा देणारे संदेश, रोज न चुकता पुढे ढकलले जाणारे ‘शुभ सकाळ’, ‘शुभ रात्री’ असले संदेश याबरोबरच संपूर्णतः चुकीचे वैद्यकीय सल्लेही शहानिशा न करता पुढे पाठवले जातात ही गोष्ट एखाद्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार होऊ शकते याचा विचार केला जातो का? ही असली पोस्टमनगिरी करताना आपण आपले मेंदू नेमके कुठे गहाण टाकलेले असतात हे मला काही उलगडत नाही. एखाद्या अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आपण तत्काळ पोस्टमन बनत पुढे ढकलून देतो आणि प्रत्यक्षात असे काहीही न घडल्याचे दिसून येते तेव्हा स्वतःच्या कृत्याची किमान लाज वाटण्याची संवेदनशीलता आपल्यामध्ये उरली आहे की नाही? ‘अमुक अमुक लेख माझ्या नावे व्हॉट्सअॅपवर फिरतोय परंतु तो मी लिहिलेला नाही’ अशा आशयाचा खुलासा देण्याची वेळ किती वेळा आणि किती लोकांवर आपण आणणार आहोत? ‘आयुष्यात लवकर उठणे का योग्य आहे इथपासून ते आपल्या पूर्वजांनी लावलेले शोध’ इथपर्यंत अनेक बाबतीतलं नाना पाटेकर आणि विश्वास नांगरे पाटील यांचं म्हणणं मला व्हॉट्सअॅप मेसेजमधून मिळालं आहे. म्हणजे म्हणणं भलत्याच कोणाचं तरी आणि खाली नाव मात्र नाना किंवा नांगरे-पाटलांचं असा सगळा उद्योग. काही मंडळी, ‘आला तसा फॉरवर्ड केला आहे’ अशा आशयाची ओळही लिहितात. त्यातून काय साध्य होतं नेमकं? खरं-खोटं याची शहानिशा न करता मी आलं ते पुढे ढकलण्याचा बिनडोकपणा आपण केला आहे एवढंच काय ते ही मंडळी आपण होऊन जाहीर करत असतात. काय मिळवतो आपण या असल्या बिनडोक उद्योगांतून?

गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने सोशल मिडियाच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याचं आता उघड झालंय. रशियाने पसरवलेल्या चुकीच्या माहितीचा प्रसार तब्बल १४६ मिलियन म्हणजे तब्बल १४.६ कोटी फेसबुक युझर्सपर्यंत पोचलं असू शकेल असं खुद्द फेसबुकनेच मान्य केलंय. युट्यूबवर ११०६ व्हिडीओज् आणि तब्बल छत्तीस हजार पेक्षा जास्त ट्विटर खाती यांची पाळेमुळे रशियात आहेत ज्यांचा चुकीची माहिती पसरवण्यात वाटा आहे.[1] आणि हे सगळं तर अजून हिमनगाचं केवळ टोक आहे. द इकॉनॉमिस्टच्या लेखात एक छान वाक्य आहे- ‘रशियाने अमेरिकेवर हा हल्ला केल्यावर अमेरिकन लोक आपापसांत, एकमेकांवर हल्ले करण्यात मग्न झाले.’ मागे कधीतरी एकदा गणपतीच्या मूर्तीची विटंबना केल्याची अफवा पसरून पुण्यात वातावरण तंग झालं होतं. त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला होता, ‘एक समाज म्हणून आपल्याला आपापसांत झुंजवणं किती सोपं झालंय!’ आज तर सोशल मिडिया आणि तमाम पोस्टमन मंडळींमुळे आपण अजूनच हतबल झालोय. द डार्क नाईट सिनेमातला जोकर म्हणतो ना, “मॅडनेस इज लाईक ग्रॅव्हिटी, ऑल यू नीड इज लिट्ल पुश!”. फक्त एक छोटासा धक्का द्या, सगळा वेडेपणाचा धोंडा गडगडत अंगावर येईल, अशी अवस्था झालीये आपली.

मला वाटतं आपल्या देशातल्या या सगळ्या बदलांकडे बघताना लोकपाल आंदोलन हा एक महत्त्वाचा टप्पा मानायला हवा. लोकपाल आंदोलनात सामील झालेल्या हजारो लोकांनी मोठ्या अभिमानाने आणि एक प्रकारे आशेने ‘मैं हूँ अण्णा’ लिहिलेली टोपी घातली होती. ‘मैं भी अण्णा, तू भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा’ ही घोषणा दुमदुमली होती. तेव्हापासून हळूहळू, सोशल मिडियाच्या राक्षसाला खाऊ-पिऊ घालत, पोस्टमन बनून ताकद देत मोठं केलंय. ‘मैं भी पोस्टमन, तू भी पोस्टमन, अब तो सारा देश है पोस्टमन’ इकडे आपण वेगाने वाटचाल केलेली आहे. पण आता हे रोखायला हवं. हा जो नव-पोस्टमनवर्ग तयार झाला आहे त्याला रोखायला हवं. सुरुवात स्वतःपासून करूया. इंडियन पोस्ट खातं आणि त्यांचे सगळे पोस्टमन उत्तम काम करत आहेत आणि आपण रेम्या डोक्याची पोस्टमनगिरी करण्याची मुळीच आवश्यकता नाही हे समजून घेऊयात. कोणताही व्हॉट्सअॅप-फेसबुक-ट्विटर किंवा अन्य कोणत्याही सोशल मिडिया वरचा मजकूर, शक्य तेवढी सर्व शहानिशा केल्याशिवाय, पुढे ढकलण्याचा गाढवपणा न करण्याचा निश्चय करूयात. एवढं साधं पहिलं पाउल तरी उचलता येईल ना आपल्याला? प्रगल्भ समाजासाठी आपल्याला हे करावंच लागेल.

(दि.  २५ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या 'साप्ताहिक विवेक'मध्ये प्रसिद्ध. http://www.evivek.com/)



[1] https://www.economist.com/news/leaders/21730871-facebook-google-and-twitter-were-supposed-save-politics-good-information-drove-out?cid1=cust/ednew/n/bl/n/2017112n/owned/n/n/nwl/n/n/ap/77921/n