Sunday, October 24, 2010

प्रत्येकाचा उत्सव...!!

प्रत्येक देशात, देशातल्या विविध धर्मीयांमध्ये, त्यातल्या विविध पंथांमध्ये, वेगवेगळ्या घराण्यांमध्ये, वेगवेगळ्या लोकांचे असंख्य असे सण या जगात आहेत. राष्ट्रीय सण धार्मिक सण, कौटुंबिक सण अशी वर्गवारी केली जाते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गणेशोत्सव, दिवाळी, ईद, ख्रिसमस, लग्नाचा वाढदिवस, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, असे विविध उत्सव आपण साजरे करत असतो.... जगभर....!!
माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे असे म्हणतात...
एवढे वैविध्य आणि विलक्षण कल्पकतेने निर्मिलेले हे सण उत्सव माणसाच्या जीवनात अढळ स्थानी आहेत. धर्म किंवा राष्ट्रवादाच्या तत्वज्ञानाला विरोध करणारे कम्युनिस्ट लोकही त्यांचे त्यांचे दिवस साजरे करतातच. "क्रांती दिवस, मुक्ती दिवस" अशा नावांनी... एकूणच काय...तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी मानवाच्या जीवनातून सण उत्सव वगळणे शक्य होणार नाही.
जगातील सर्व देशांमध्ये, सर्व धर्मांमध्ये, पंथांमध्ये, जातींमध्ये, शहरांमध्ये, जंगलांमध्ये, खेड्यांमध्ये साजरा केला जातो असा एकमेव उत्सव म्हणजे "वाढदिवस".....!!!!

गेल्या काही वर्षात भोगवादी संस्कृती का काय म्हणतात त्याचा प्रभाव पडून सर्व काही साजरे करायची प्रथा पडली आहे असा काही लोक दावा करतात. त्यांचे म्हणणे काहीही असो, वाढदिवस साजरा करायची प्रथा या भोगवादी वगैरे संस्कृतीमुळे निर्माण झालेली नाही....त्याचे स्वरूप बदलले असेल...नव्हे बदलले आहेच...पण वाढदिवस साजराच केला जात नव्हता असे म्हणणे अडाणीपणाचे लक्षण ठरेल.... वाढदिवशी आईने ओवाळणे पूर्वीही होते...आत्ताही आहे. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करणारे कार्यकर्ते पूर्वीही होते आताही आहेत. वाढदिवस युरोपात आहे तसा अमेरिकेतही आहे...आणि आशियातही आहे.. तालिबान्यांच्या मध्यपूर्वेतही आहे...

खरे तर वाढदिवस साजरा करावे असे या दिवसात काहीच नसते. समजा मी २० वर्षांचा झालो तर यात आनंद व्यक्त करावे असे काय आहे? कधी कधी विचार करता मला असं वाटतं की वाढदिवस साजरा करण्यामागे माणसाची मूळची नैसर्गिक प्रवृत्ती कारणीभूत असावी. सगळ्याच प्राण्यांमध्ये असणारी "Survival" ची प्रवृत्ती. आपण जगामध्ये इतकी वर्षे टिकून आहोत, टिकून राहिलो आहोत याचा आनंद म्हणजे वाढदिवस.....!!!!! टिकून राहण्याच्या या आनंदाला आयुष्याच्या उत्तरार्धात ग्रहण लागायला सुरुवात होते. जसजशी पन्नाशी ओलांडली जाते.. हळू हळू आपल्या आयुष्यातले दिवस कमी होत असल्याची भावना वाढते. आणि पुढे पुढे तर वाढदिवस ही एक काहीशी नकोशी बाब होऊन जाते. सुरुवातीला वाटणारे "टिकून राहिलो" हे सुख समाधान संपत जाते. आणि पाचवा सत्ता संपादनाचा वाढदिवस साजरा करतानाच पंतप्रधानाला जशी खुर्ची सोडावी लागते तसेच काहीसे आयुष्याच्या उत्तरार्धात होत जाते.
"मी टिकून राहिलो" या प्रवृत्तीतून निर्माण झालेला वाढदिवस हा "वैयक्तिक उत्सव" असतो... त्यामध्ये समाजाच्या कोणत्याही घटकाचा संबंध नसतो. त्या व्यक्तीच्या आनंदात सामील होणे हा भाग वेगळा. ते आपण करतोच...नव्हे केलेच पाहिजे... त्यामुळे लोकांचा संबंध नसणे तरीही त्यांचा सहभागी असणे असे काहीसे वाढदिवस या "व्यक्ती उत्सवाबाबत" घडते.

इतका महत्वाचा, प्रत्येकाच्या आयुष्यात दर वर्षी येणारा "व्यक्ती केंद्रित" उत्सव कित्येक हजार वर्षांपासून आहे... आणि तरीही व्यक्तीवादाचे तत्वज्ञान आत्ता आत्ताचे आहे, कोणीतरी तयार केलेले आहे असे काही जण म्हणतात हा केवढा विरोधाभास.....!!!

भारतात प्राण्यांचेही उत्सव साजरे केले जातात. बैल पोळा, वसुबारस, नागपंचमी हे त्यातलेच काही... प्रत्येकाला महत्व मिळावं, जगातल्या प्रत्येक घटकाला काहीतरी किंमत असावी, मान असावा अशा विलक्षण समानतेच्या आणि परस्पर आदराच्या भावनेतून असे सण निर्माण झाले असावेत असं मला वाटतं. प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करणे हा "प्रत्येक व्यक्तीला महत्व" द्यायचा दिवस या एका विलक्षण लोकशाही केंद्रित विचारसरणीचा अप्रतिम नमुना...
महिन्याला ५०० रुपये मिळवणाऱ्या माणसाचा वाढदिवसही "एक दिवस" असतो...आणि ५ कोटी मिळवणाऱ्याचाही वाढदिवस "एकंच दिवस" साजरा केला जातो.
केवढी मोठी समानता जगातल्या सगळ्या भागात आहे....!!! माणसामध्ये समानता आणि परस्परांना आदर आणि महत्व द्यायची वृत्ती मुळातच असली पाहिजे. त्याशिवाय वाढदिवस हा वैयक्तिक उत्सव इतके हजारो वर्ष टिकला नसता...
वाढदिवशी रस्त्यातून चालताना सगळ्यांच्या नजर आपल्याकडे आहेत...आपण अतिशय महत्वाची व्यक्ती आहोत अशा थाटात आपण जात असतो... ते तसे वाटणे किती सुखावह असते... उत्सवमूर्ती बनणे, celebrity बनणे हे सगळ्यांनाच कुठे शक्य असते. पण वाढदिवशी "celebrity" म्हणून मिरवण्याचा मान प्रत्येकाला दरवर्षी मिळतो...!!!
आणि म्हणूनच जगभर साजरा केला जाणारा वाढदिवस हा "व्यक्तीकेंद्रित उत्सव" मला अतिशय प्रिय आहे....!!!!!!

Sunday, October 17, 2010

लॉक किया जाय?

सुमारे ८-९ वर्षांपूर्वी... मला आठवतंय, त्या वेळी शाळेत होतो मी, रात्री ९ वाजता कर्फ्यू लागल्यासारखे रस्ते ओस पडायचे...भारतातले तमाम लोक, टीव्ही ला चिकटून एक विलक्षण असा खेळ बघायचे... क्रिकेट नंतर इतका प्रसिद्ध झालेला आणि लोकांना वेड लावणारा हा एकमेव खेळ असावा... "आईये, आप और हम खेलते है ये अदभूत खेल जिसका नाम है- कौन बनेगा करोडपती...!!!" अमिताभने असं म्हणताच केबीसीचं ते टिपिकल म्युझिक वाजायचं...आणि सगळी जनता श्वास रोखून पुढचा प्रश्न काय आहे हे पहायची....
"करोडपती" मुळे भारतीय टेलिव्हिजन वर क्रांती झाली असे म्हणतात... अमिताभ बच्चन नव्वदीच्या दशकात लाल की काला बादशाह असले भुक्कड सिनेमे करत दिवस घालवत होता. पण केबीसीने त्याचेही आयुष्य पालटवून टाकले...! अमिताभ त्यानंतर एक दोनच वर्षात पुन्हा एकदा सुपरस्टार बनला... केबीसी ची नक्कल करायचा इतर टीव्ही चानेल ने खूप प्रयत्न केला. "सवाल दस करोड का" "छप्पर फाडके" असले कार्यक्रम अनुक्रमे अनुपम खेर आणि गोविंदा यांनी वेगवेगळ्या चानेल वर करायचे प्रयत्न केले. पण अमिताभ तो अमिताभ.... त्याची सर गोविंदा किंवा अनुपम खेर यांना कशी येणार...??!! ज्या अभिजात पद्धतीने, विलक्षण अशा आवाजात अमिताभ प्रेक्षकांना खिळवून ठेवत होता त्याच्या एक शतांश सुद्धा गोविंदा आणि अनुपम खेर ला जमत नव्हते.. आणि जमणे शक्यही नव्हते. कारण अमिताभ बच्चन या नावाला जे वलय आहे ते त्यांना नाही. प्रत्यक्ष लोकांशी बोलताना अमिताभ बच्चन ज्या अदबीने बोलत असे, खेळणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण कार्यक्रमात सामावून घेत असे त्याला तोडच नाही.
"कौन बनेगा करोडपती-द्वितीय" असं म्हणत केबीसी सिझन २ ची सुरुवात झाली होती. सिझन एक नंतर झालेल्या ब्रेक मुळे लोकही फ्रेश होते. पुन्हा एकदा अमिताभ आपल्या अफलातून स्वरुपात दिसणार या विशेष आनंदात लोक होते. त्याचबरोबर अनुपम खेर आणि गोविंदा सारखी चिल्ली पिल्ली लोकं सिझन २ च्या वेळेस नव्हतीच. त्यांचे कार्यक्रम केव्हाच बंद पडले होते. सिझन २ ची सुरुवात झाली आणि अमिताभ बच्चन ची प्रकृती खालावली. आता काय करावे, केबीसी चे प्रोड्युसर लोक चिंतेत पडले. "शो मस्ट गो ऑन" असं म्हणत त्यांनी सुपरस्टार असलेल्या किंग खानला पाचारण केले. आणि किंग खान ने केबीसी या उच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे आव्हान स्वीकारले....
अनुपम खेर आणि गोविंदा यांच्याकडे निदान "केबीसी"चे वलय नव्हते. पण केबीसी चे वलय असूनही आणि प्रचंड प्रेक्षक वर्ग असूनही शाहरुख अमिताभची उंची गाठू शकला नाही... अमिताभच्या बोलण्यात असलेला रुबाब, आणि उच्चभ्रूपणा शाहरुखला घेता आला नाही. त्यांनी त्याच्या नेहमीच्या पद्धतीने सूत्रसंचालन करायचा प्रयत्न केला. इतर वेळी अनेक ठिकाणी स्टेज वर चांगले वाटणारे शाहरुखचे सूत्रसंचालन केबीसीच्या स्टेजवर थिल्लर वाटू लागले. यात दोष शाहरुख चा नव्हता. पण केबीसी म्हणजे अमिताभ हे समीकरण इतकं फिट्ट झालं होतं की शाहरुखला फारसा वावच मिळाला नाही... अखेर जनतेने नाकारलं म्हणल्यावर प्रोड्युसर्स तरी काय करणार... केबीसी द्वितीय बंद झाले.
नुकताच केबीसी चा तिसरा सिझन सुरु झाला आहे. अमिताभ आपल्या अफलातून स्वरुपात अत्यंत अदबीने सूत्रसंचालन करतो आहे... स्टार ऐवजी आता सोनी वरती हा कार्यक्रम लागतो आहे. खेळातल्या नियमांमध्ये काही मोजके बदलही करण्यात आले आहेत. त्यामुळे मुळातल्या खेळाची रंगतही वाढली आहे. पुन्हा इतक्या वर्षांनी अमिताभ केबीसी करतोय या विचारानेच मस्त वाटले. पण कार्यक्रमाचं स्वरूप म्हणून काही गोष्टी अतिशय खटकल्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे "commercialization"... एक्स्पर्ट नामक एक लाईफलाईन सुरु करण्यात आली आहे त्यात चारू शर्मा नामक एक चमन मनुष्य बसवला जातो. पण त्याचबरोबर नुकत्याच रिलीज होऊ घातलेल्या सिनेमातले हिरो हिरोईन हजेरी लावतात. इतर कोणत्याही चानेल वरच्या टपरी reality show मधली ही गोष्ट केबीसी मध्ये असू नये असे मला मनापासून वाटले. मोबाईल कंपनीची, आयडिया ची जाहिरात करण्यासाठी खेळायला आलेल्या सामान्य खेळाडूंना डायलॉग लिहून देऊन ते पाठ करवून घेऊन तयार करून पाठवणे हेसुद्धा अत्यंत खटकले. इंडियन आयडॉल वगैरे पासून सहभागी लोकांच्या घरच्या लोकांचा व्हिडीओ वगैरे दाखवणे, इत्यादी गोष्टी लोक पाहत आहेत. तेच सर्व केबीसी च्या पडद्यावर नको वाटले.

या सगळ्या गोष्टींमुळे केबीसी चे वेगळेपण कमी होत आहे असे माझे स्पष्ट मत आहे.. अर्थात जोवर अमिताभ आहे तोवर केबीसी इतर कशाहीपेक्षा वेगळेच राहील यात काही शंकाच नको.....

Saturday, September 25, 2010

परिवर्तन बद्दल थोडेसे....

२६/११/२००८ ला मुंबई वर झालेल्या हल्ल्याने जग हादरून गेले होते... एक प्रकारचा विलक्षण अस्वस्थपणा सगळीकडे पसरला होता... तशाच अस्वस्थ मनस्थितीत मी असताना मला इंद्रनील चा फोन आला-"भेटूया".
दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो. "आपण काहीतरी केला पाहिजे..." इंद्रनील बोलू लागला.
"अरे पण काय करणार?? दहशतवादावर आपण काय करणार??" -मी.
"दहशतवादावर नाही.. पण देशासाठी काहीतरी करायला सुरुवात तर करू, नुसते बसून तर राहू शकत नाही...."- इंद्रनीलला माझ्या शंका आणि नकारात्मक प्रश्न मुळीच आवडले नव्हते.
"ठीक आहे, पण काय करायचं आहे? झाडे लावा, सिग्नल पाळा हे लोकांना सांगायचं काम करणार आपण??"- मी काहीशा चेष्टेच्या सुरात त्याला विचारले.
"माहित नाही... त्याचा विचार आपण नंतर करू. काहीतरी करायचा विचार तर सुरु करू. त्यासाठी लोकांना गोळा करायला पाहिजे. यापुढे नुसतं बसून राहणं शक्य नाही. तू आहेस ना? "- इंद्रनील कमालीचा अस्वस्थ होता. मला लक्षात आलं की काहीतरी काम करायचं इंद्रनील ने ठरवलेच आहे. 'बघू तरी काय करतोय, याचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहू तरी!' असे काहीसे विचार करत मी त्याला होकार दिला. मग सलग दोन तीन वेळा आम्ही भेटलो. दरम्यान विक्रांत नावाचा एक मुलगाही आम्हाला भेटला. त्याच्याही डोक्यात असेच काहीसे विचार घोळत होते. 'मग एकत्रच काम करू' असे ठरले. आपल्या ओळखीच्या आणि काहीतरी करायची इच्छा असलेल्या सगळ्या मुलांची आपण एक मिटिंग घेऊ असे आमचे ठरले. मिटिंग साठी जागा हवी होती. मी आणि इंद्रनील बीएमसीसी चे त्या वेळचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे सरांकडे गेलो. त्यांना आमच्या डोक्यातले विचार सांगितले. आणि मिटिंग साठी एक वर्ग द्यावा अशी विनंती केली. सरांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला परवानगी दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले...! 
८ डिसेंबर २००८ ला आम्ही मिटिंग घेणार असल्याचे आमच्या ओळखीतल्या सगळ्यांना कळवले. जे इच्छुक असतील त्यांनी यावे असेही कळवले.
दुसऱ्या बाजूला २६/११ मुळेच अतिशय अस्वस्थ मनस्थितीत "आता स्वस्थ बसायचं नाही. आपण काही ना काहीतरी करायचंच" असं म्हणत हृषीकेश आणि त्याचे मित्र विचार करत होते. त्यांना होणाऱ्या मिटिंग बद्दल कळले. आपल्यासारखेच काही विद्यार्थी एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवत आहेत हे कळल्यावर ते सगळे आपण होऊन मिटिंग ला उपस्थित राहिले.
पहिल्याच मिटिंग ला किती लोक येणार आम्हाला शंका होती. पण सुमारे ३५-४० लोक उपस्थित होते. सुमारे दोन एक तासांच्या वादविवाद आणि चर्चेनंतर एक स्वतंत्र अशी संस्था आपण सुरु करावी आणि कामाला सुरुवात करावी असे ठरले. कामाचे स्वरूप काय असावे कसे असावे हे ठरवण्यासाठी पुन्हा भेटायचे ठरले. पुढचे २ दिवस काम विचार करण्यात गेले. स्वतंत्र संस्थेची आवश्यकता का आहे याबद्दल सर्वांना कळणे आवश्यक होते. शिवाय कामाचे स्वरूप हे इतर असंख्य संस्थांच्या तुलनेत वेगळ्या स्वरूपाचे असावे यावर आम्ही अनेकदा चर्चा केली.
Be the change you want to see...!!!

दुसऱ्या मिटिंग ला सुमारे ७०-८० लोक हजर होते. सर्वांमध्येच जोश होता. काहीतरी करायचा उत्साह होता. याचवेळी "परिवर्तन" हे आपल्या संस्थेचे नाव ठेवायचे ठरले. देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास व्यक्त करून संपूर्ण कायदेशीर मार्गाने आपण काम करायचे असेही नक्की झाले. बऱ्याच चर्चेनंतर "भ्रष्ट आणि अकार्यक्षम शासन" हेच देशाच्या प्रगतीच्या मार्गात असलेला एक मोठा अडसर असल्याचे एकमताने मान्य झाले. मग आपण काय करायचे? आपण ही शासनव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करायचा. "Governance" सुधारण्यासाठी प्रयत्ने करायचे. जिथे सरकारला, शासनव्यवस्थेला मदत लागेल तिथे मदत करणे.. आणि शासन चुकते आहे, अन्यायी आहे असे वाटते तिथे विरोध करणे अशी स्थूलमानाने दिशा आम्ही त्या दिवशी ठरवली. इतकेच नव्हे, तर आपण संस्था स्थापून प्रयत्न करत असतानाच ज्या काही इतर संस्था आणि संघटना या सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत आहेत त्यांनाही एकत्र आणायचा प्रयत्न आपण केला पाहिजे यावर एकमत होऊन, " सेतू " या स्वतंत्र मंचाची सुरुवात करण्याचेही ठरले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा अशा स्वरूपाचा आईसब्रेकर नावाचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्यानंतर  "मतदान जागृती" चे काम करायला सुरुवात केली. मतदान करा असे सांगत असतानाच कोणत्याच उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास तसे मत देण्याचीही सोय असते हे आम्ही लोकांना सांगू लागलो. फर्ग्युसन, बीएमसीसी, शामराव कलमाडी कोलेज, अशा विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदार नोंदणी आणि मतदान जागृती असे अभियान आम्ही राबवले. २००९ मध्ये असलेल्या दोन निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही सगळ्याची आखणी केली होती. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीचे दिवस आम्ही रस्त्यात उभे राहून मतदान जागृतीचे काम करत होतो. एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुका संपल्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होती. त्याही वेळी अशाचप्रकारचे काम आम्ही केले. परिवर्तन ची सुरुवात अशी एकदम मोठ्या संख्येने झाली तरी हळू हळू जसजसा २६/११ चा प्रभाव ओसरू लागला, तसतशी लोकांची संख्या रोडावू लागली. २६/११ चा सगळाच प्रभाव ओसरल्यामुळे आता एकूण सदस्यांची संख्या फारच थोडी होती. साप्ताहिक मिटिंग घेण्याची पद्धत पडून गेली होती. त्या मिटिंगना कधी कधी ४ कधी ८ तर कधी २ अशी उपस्थिती असायची. पण काम सुरु राहिले...कारण आता ज्यांना खरोखरच काम करायचे होते तेवढेच शिल्लक राहिले होते...!!
त्यानंतर सहभागी अंदाजपत्रक, शिक्षण शुल्क समिती मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न, माहिती अधिकाराचा वापर, निवडणुकीपूर्वीच आपल्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षांना जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली "जन विधानसभा" हा कार्यक्रम अशी विविध कामे परिवर्तन ने हातात घेतली.

फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात जर्मन बेकरी मध्ये झालेल्या स्फोटानंतर परिवर्तन सदस्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये तिथल्या कर्मचार्यांना मदत करायचे काम केले. त्यावर एक लेख 'सकाळ' च्या 'मुक्तपीठ' मध्ये प्रसिद्ध होताच असंख्य लोकांनी परिवर्तनचे सदस्य होण्याची तयारी दर्शवली. साहजिकच २६/११ प्रमाणे अचानक उत्साह निर्माण झालेल्यांची संख्या त्यात खूप होती. तरीही काही खूप चांगले सदस्य परिवर्तन ला मिळाले. 'बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या' गरजेनुसार त्यांना हव्या त्या पद्धतीची उपकरणे बनवण्याच्या कामात परिवर्तन ने हात घातला. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या जनवाणी संस्थेच्या मदतीने सध्या हा उपक्रम सुरु आहे. इतर काही संस्थांच्या मदतीने पुण्यातल्या टेकड्या वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यावर बांधकामांना परवानगी द्यायच्या सरकारच्या योजनेला परिवर्तनचा विरोध आहे.

आज परिवर्तन ची सदस्य संख्या 'कागदावर' पहिली तर २५० च्या घरात आहे... पण प्रत्यक्षात पहिली तर साधारणपणे २५ च्या आसपास आहे..!!! कोणत्याही सामाजिक संस्थेला भासणारी चांगल्या (आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नियमित) कार्यकर्त्यांची उणीव परिवर्तनलाही भासते... कोणत्याही इतर सामाजिक संस्थेला जाणवणारी पैशाची चणचण परिवर्तनलाही जाणवते. परंतु यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे ही गोष्ट आमच्या मनाशी नक्की आहे. आज परिवर्तन एक छोटासा गट आहे... फारसे संख्याबळ, आर्थिक ताकद आमच्यापाशी नाही.. पण जे सदस्य शिल्लक आहेत ते मनापासून केवळ आणि केवळ समाजासाठी/देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आहेत. आणि म्हणूनच परिवर्तन पावणेदोन वर्षानंतरही कार्यरत आहे...आणि तसेच ते कार्यरत राहील. आजचे छोटे परिवर्तन उद्या एक मोठी विधायक शक्ती बनलेली असेल याबद्दल मला काडीमात्रही शंका नाही.

Saturday, September 11, 2010

लोकशाहीच्या गप्पा....

आपल्या देशात साधारण १९३५ साली म्हणजे सुमारे ७५ वर्षांपूर्वी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला गेला असं म्हणायला हरकत नाही. १९३५ साली ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांमुळे भारतीयांना खुल्या निवडणुका हा प्रकार प्रथमच अनुभवता आला. काँग्रेस, मुस्लीम लीग सह सर्व प्रमुख पक्षांनी या १९३५ च्या सुधारणेप्रमाणे या निवडणुकीत भाग घेतला. आणि काँग्रेसने बहुतांश प्रमुख प्रांतांमध्ये सत्ता हस्तगत केली. अशीच अजून एक निवडणूक महायुद्धानंतर झाली. ज्यामध्ये काँग्रेस ने आधीप्रमाणेच वर्चस्व मिळवले. परंतु मुस्लीम बहुल प्रांतांमध्ये मात्र मुस्लीम लीग ने निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पाकिस्तान चे जाऊ द्या. पण भारतात मात्र लोकशाही शासनव्यवस्थेला सुरुवात झाली. १९५० साली बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे जगातले सर्वोत्तम गणले गेलेले संविधान भारताला मिळाले. पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली लोकशाही फुलत गेली. त्यांच्याच मुलीने, इंदिरा गांधी ने लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न केला, मात्र संविधान आणि लोकशाहीच श्रेष्ठ ठरून इंदिरेला नतमस्तक व्हावे लागले. अशा प्रकारे तावून सुलाखून भारतातील लोकशाही शासनव्यवस्था मजबूत झाली असे म्हणतात. ६० वर्षांमध्ये भारतातील लोकशाही एक आदर्श आहे असं कित्येकांचा दावा आहे.
छान...! तसे असेल तर खरच छान...!!
पण हा सगळा दावा वगैरे लोकशाही शासनव्यवस्थेबद्दलचा आहे. लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. अनेकांना असे वाटते की जी अनेक वर्षांपासून चालू असते ती संस्कृती. परंतु तसे नसते. संस्कृती ही काही वर्षातच निर्माण होऊन काही वर्षातच संपूही शकते. (तसे नसते, नाहीतर नुकत्याच टीकेच्या झोतात आलेल्या चंगळवादी संस्कृतीला "संस्कृती" म्हणले गेले नसते..!). लोकशाही संस्कृती भारतीय भूमीत ६० वर्षात अद्यापही रुजली नाही हा अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. शासनव्यवस्था रुजली... संस्कृती नाही....

लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती यातला फरक काहीसा टिळक आगरकर यांच्या वादासारखा आहे. आणि खरे तर काहीसा नव्हे तर त्यांच्यातला वाद हाच होता असे लक्षात येते. आधी लोकशाही संस्कृती की आधी लोकशाही शासनव्यवस्था हा तो वाद होय. महात्मा गांधी आणि सावरकर या दोन भिन्न वृत्तींच्या किंबहुना अगदी विरुद्ध वृत्तींच्या दोन महान नेत्यांनी आपापल्या परीने संस्कृती आणि शासनव्यवस्था एकाचवेळी पाहिजे असा प्रयत्न केला. दोघांनीही अन्यायी ब्रिटीशांवर हल्ले चढवले. दोघांनीही अस्पृश्यते विरोधात कार्य केले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला पाहिजे असे गांधींनी म्हणताच असंख्य स्त्रिया पारंपारिक बंधनं सोडून इंग्रजांविरुद्ध रस्त्यावर उतरल्या! सावरकरांच्या "गाय हा केवळ एक उपयुक्त पशू आहे. गायीचे मांस खाल्ल्याने काही होत नाही" अशा लिखाणाने समाज ढवळून निघाला. एकूणच समाजात आपापल्या परीने प्रगल्भता आणायचे आणि लोकशाही संस्कृती आणायचे प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर "लोकशाही संस्कृतीच्या" पाश्चात्त्य कल्पनांना दोघांनीही नाकारले. या देशातली लोकशाही या देशाच्या मातीशी निगडीत पाहिजे, इंगलंडची कॉपी नको असे दोघांनीही आग्रहाने मत मांडले. गांधी सावरकरांनंतर 'लोकशाही संस्कृती' साठी फार थोड्या प्रमाणात प्रयत्न झाले.

आपल्या इथल्या जवळपास ९० % लोकांना आता लोकशाही आणि निवडणूक हा प्रकार माहित आहे. संपूर्ण शासनव्यवस्था माहित नसेल कदाचित. पण आपण मत दिलं की सरपंच निवडून येतो हे गावच्या अडाण्यालाही आता माहित आहे. थोडक्यात आपला नेता आपण निवडायचा ही गोष्ट नवीन नाही. म्हणूनच लोकशाही शासनव्यवस्था रुजली आहे असे आपण म्हणू शकतो.
परंतु घराघरात असणाऱ्या हुकुमशाहीबद्दल काय म्हणावे?? धार्मिक हुकुमशाही बद्दल काय म्हणावे? खाप पंचायत बद्दल लिहिलेल्या लेखामध्ये मी धार्मिक हुकुमशाहीबद्दल लिहिले आहे. माझ्या आजच्या लेखाचा विषय हा घरात नसलेली लोकशाही हा आहे. पुरुषप्रधान संस्कृती ही आजच्या कुटुंबातील हुकुमशाहीला कारणीभूत आहे.
मध्यमवर्गीय, अतिशय आधुनिक सुख सोयींनी युक्त घरांमध्ये राहणाऱ्या, मक्डोनाल्ड्स मध्ये बर्गर खाणाऱ्या तरुण मुलाला साधे आपले करिअर निवडायचे स्वातंत्र्य कित्येकांच्या घरांमध्ये नसते ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या बापाने हुकुमत गाजवावी त्याच्या खालोखाल आई, मग मोठी ताई किंवा दादा आणि मग आपण. एक प्रकारची चातुर्वर्ण्य व्यवस्था मध्यमवर्गीय घरांमध्ये आहे असे वाटते मला. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे टिळकांचे वाक्य पालकच आपल्या मुलांना सांगत असतात. तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो, स्वातंत्र्य आणि स्वैराचार मधला फरक कोण ठरवणार??? देशाचे कायदे जसे लोक ठरवतात. (किंवा लोकसंख्या ज्या देशात प्रचंड असते तिथे लोकांचे प्रतिनिधी!), तसेच घरातले कायदे-नियम हे लोकांनीच म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ठरवावेत याला मी म्हणीन लोकशाही संस्कृती...!!!

मला आठवतंय, मी लहान असताना माझ्यात माझ्या मोठ्या भावात आणि आई बाबांमध्ये जोरदार भांडणे व्हायची. "करायला सांगितलं की गपचूप करायचं" असला हुकुमशाही प्रकार आमच्या घरात नव्हता.त्यामुळेच वादविवाद खूप व्हायचे. घरातल्या मतस्वातंत्र्याचा मी (वय साधारण १२) आणि माझा भाऊ (वय साधारण १७) पुरेपूर वापर करायचो. शेवटी अनेक बाबतीत आम्ही मतदान घ्यायचो. शेवटी बहुमताने जो निर्णय होईल तो घेतला जायचा. घरातली कामे हा एक मोठा प्रश्न प्रत्येक घरात असतो. तसाच तो आमच्याही घरात होता. स्वच्छता, भाज्या आणणे, अंथरूण-गाद्या आवरणे, इस्त्री करणे/ इस्त्रीला टाकलेले कपडे आणणे भाजी चिरणे, बिलं भरणे अशी एक ना असंख्य कामे.... यावरून होणाऱ्या भांडणांनी कंटाळून शेवटी  बाबांनी एखाद्या कॉन्फरन्स (संसदच म्हणा एक प्रकारची) सारखे आम्हाला बसवले. आम्ही चौघे गोल बसलो. एकत्र बसून कामांची यादी केली. आणि सगळ्यांनी मिळून कामे ठरवून घेतली. त्याही वेळी वादविवाद झाले. पण समजूतदारपणे समोरच्याच्या बाजू लक्षात घेऊन आम्ही सर्व कामे विभागली. पुढे कित्येक महिने त्यावेळी ठरलेली पद्धत अमलात येत होती. माझे ठरलेले काम मी जर केले नाही तर सर्वानुमते मला शिक्षाही होत असे. पण माझे काम न करण्यामागे एखादे कारण असेल तर मात्र सर्वानुमतेच सूटही मिळायची.  यालाच मी म्हणीन लोकशाही संस्कृती.

माझ्या ओळखीत कित्येक घरं आहेत जिथे लोकशाहीचा मागमूसही नाही. हुकुमांवर हुकुम तेवढे निघत असतात. (मग फतवा काढणाऱ्यांना शिव्या का देतात देव जाणे..!). माझ्या एका मित्राच्या घरी अगदी मोकळं वातावरण आहे. खुलेपणाने चर्चा आहे. पण काही बाबतीत, काही मुद्दे निघाले की तर्कशुद्ध चर्चा हा प्रकार लोप पावतो. त्याचा पूजा अर्चा करण्यावर विश्वास नाही. तो देवाला मानत नाही. परंतु त्याचे हे मत असू शकते आणि त्याच्या मतानुसार वागायचा त्याला हक्क आहे ही गोष्ट त्याचे पालक समजून घेत नाहीत. त्यामुळे त्याला घरात सत्यनारायण पूजेपासून गणपतीपर्यंत सारे करावे लागते. तसा स्पष्ट 'आदेशच' असतो त्याच्या वडिलांचा..!!!
एका मैत्रिणीच्या घरी तिच्या आईला तिनी घराबाहेर राहिलेलं आवडत नाही. म्हणजे दिवसभर मुलगी घराबाहेर असली तर आई बेचैन होऊन जाते. यातला काळजीचा भाग वगळूया. कारण ही माझी मैत्रीण तिच्या आजीच्या/मामाच्या घरी जरी गेली असेल तरी तिच्या आईला अस्वस्थपणा येतो. शेवटी तिची आई फर्मान काढते की आता घरातून बाहेर पडायचं नाही. घरात बस. घरात बसून काहीपण कर. काळजीमुळे एखादे बंधन घातले जाणे मी समजू शकतो, परंतु तशी काळजी वाटली म्हणून बंधन घातले आहे हे आपल्या पाल्याला सांगणे गरजेचे आहे. तसा संवाद आवश्यक आहे. माहिती अधिकार नावाचा एक उत्कृष्ठ कायदा आपल्या देशात आला आहे. त्याच्या नुसार सरकारने एखादा निर्णय घेतला की त्याचे कारण, पार्श्वभूमी या सर्व गोष्टी आपण होऊन सांगणे बंधनकारक आहे. तसेच आपल्या घरातल्या लोकशाहीतही घडले पाहिजे. वरील उदाहरणामध्ये आईने मुलीला घराबाहेर न जाऊ देण्याची कारणे सांगितली पाहिजेत. त्यावर शुद्ध तर्कावर आधारित चर्चा व्हायला पाहिजे. कित्येकदा मला असं वाटतं की याच तर्कशुद्ध चर्चेमध्ये आपला पराभव होईल की काय या भीतीपोटी पालक "चर्चा नकोय" असा सूर लावतात.
माझ्या अजून एका मित्राच्या घरातील गम्मत म्हणजे त्याचं सगळं घराणं लोकशाहीवादी, गांधींचे अनुयायी, शिवाय आणीबाणीच्या वेळी आजी आजोबा जेल मध्ये वगैरे गेलेले. अशा घरात काहीवेळा माझ्या त्या बिचाऱ्या मित्राला अजिबात स्वातंत्र्य नसते... रात्र रात्र मित्रांबरोबर तात्त्विक चर्चा करण्याची या मुलाला मोठी हौस. एखाद्या मित्राबरोबर कट्ट्यावर चर्चा सुरु झाल्यावर २-३ वाजता पोलिसांनी हटकल्यावर ती चर्चा संपते. या गोष्टीवरून त्याचे त्याच्या पालकांशी रोज खटके उडतात. अखेर त्याच्या वडिलांनी हुकुम काढला की घराचा असा नियम आहे की या घरात परत यायचं असेल तर ११ च्या आत यायचं नाहीतर घराबाहेर जायचं. आता हा नियम कोणी निर्माण केला?? हा नियम बनवताना कोणत्या लोकशाही मार्गाने याची चर्चा झाली होती?
पैसे कमावणारे ते पालक उच्च वर्णीय असतात... नव्याने कमवायला लागल्यावर मोठ्या भावाला किंवा बहिणीला अचानक मिळणारा मान तुम्हाला जाणवला नाही का?? तुम्हालाच लहान भाऊ/ बहिण असेल तर त्यांना एकदा विचारून बघा.... घरात असणाऱ्या वर्णव्यवस्थेची नीट कल्पना येईल तुम्हाला. रोटीच्या तुकड्यासाठी गावच्या पाटलापुढे गयावया करणारे शेतमजूर आणि पालक कमावून खायला घालतात म्हणून निमूटपणे त्यांचे ऐकणारे पाल्य यात मला तरी काहीच फरक दिसत नाही.
आता कोणी म्हणेल "काय राव पालकांना तुम्ही गावच्या क्रूर पाटलाची किंवा हुकुमशहा ची उपमा देत आहात... असे कसे चालेल... शेवटी आई वडील असतात ते आपले..".
कबूल... सगळे कबूल...! भाव भावना प्रेम इत्यादी गोष्टी आल्याने काहीच नियमांमध्ये कायद्यांमध्ये शिथिलता येते, आणि ती आलीच पाहिजे. पण माझा मुद्दा एवढाच आहे की ही शिथिलता, हा समजूतदारपणा दोन्ही बाजूंकडून असायला हवा. आणि पालकांकडून तर जास्त, कारण ते वयाने मोठे असतात, परिपक्व असतात..(असतातच असे नाही पण निदान तसे मानले तरी जाते..!!). घराच्या नियमांना अपवाद फक्त वडिलांसाठी आणि माझ्यासाठी नाही याला समानता म्हणत नाहीत. जसे देशाचे तसेच घराचे...समानतेशिवाय लोकशाही नाही. घरातूनच लोकशाही संस्कृती निर्माण करायची असेल तर घरात प्रथम समानता हवी. गावचा पाटील किंवा हुकुमशहांशी मी तुलना करत नसून माझे म्हणणे स्पष्ट व्हावे म्हणून हे उदाहरण दिले.

अजून एक उदाहरण माझ्या एका मैत्रिणीचं, तिच्या घरात अतिशय मोकळं वातावरण. आई वडील डॉक्टर, एकुलती एक मुलगी, सर्वजण हुशार, छोटं सुखी कुटुंब..! पहिल्यापासून असलेल्या मोकळ्या वातावरणात मुलगी वाढलेली असल्यामुळे साहजिकच सर्व गोष्टी आईशी बाबांशी बोलायची सवय, परंतु आपल्या तरुण मुलीला बॉयफ्रेंड असू शकतो, ही सामान्य गोष्ट पचवायला त्यांना आता जड जाते आहे. त्यावरून घरात वाद सुरु झाले. वादांमधून मग तिनी घरी खोटे सांगणे सुरु झाले. अशा या परिस्थितून मुलीचे पालक बिथरले आणि ते हुकुमशाही पद्धतीने वागू लागले. परत ते आव तर असं आणतात की माझ्या मुलीला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे.
"आम्ही सांगितलं की गपचूप करायचं, आम्ही तुझ्या भल्याचंच सांगतोय" , अशा अविर्भावात पालक वागू लागले. इथे नेमके काय घडले? तर, पालक आणि पाल्यात्ला संवाद संपला, अविश्वास निर्माण झाला, आणि तो का संपला कारण पालकांनी आपल्या मुलीचा एक व्यक्ती म्हणून असलेला हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी लोकशाही कशी काय टिकावी? जिथे संवादाच होऊ शकत नाही, जिथे संवाद हा भीती, संशय आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर होतो, तिथे लोकशाहीचे स्वतंत्र वारे कसे खेळणार...??????
स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्या मुलाला/मुलीला, त्यांच्या मतांना मान देणं ही घरातील लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. आणि जोवर घरापासूनच लोकशाही संस्कृती निर्माण होत नाही. तोवर लोकशाही शासनव्यवस्था किती का रुजेना, लोकशाही संस्कृती मात्र मूळ धरणार नाही.
लोकशाहीची संस्कृतीचा विकास स्वतःपासून होत जाऊन नंतर कुटुंब, आजूबाजूचे लोक, नातेवाईक, सोसायटी, मोहल्ला, शहर, राज्य, देश अशा प्रकारेच होऊ शकतो....
लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही संस्कृती निर्माण करणे आपल्याच हातात आहे...!!!
आणि लोकशाही संस्कृती शिवाय शासनव्यवस्थेला अर्थ नाही... आधी काय हवे हा टिळक आगरकर वाद असला तरी कधी ना कधी तरी दोन्ही हवे आहे ही गोष्ट कोणीच नाकारू शकणार नाही.... 

Tuesday, August 17, 2010

दुष्काळात तेरावा.....!

12 Sun Signs

नुकतेच ऐकिवात आले की बारा राशींमध्ये मारामाऱ्या सुरु झाल्या आहेत. ३६० अंशाचे आकाश प्रत्येकी ३० अंश या पद्धतीने शेकडो वर्षांपूर्वीच विभागले गेले असताना तेराव्या राशीचा नुकताच लागलेला "शोध" हे या राशींमधल्या भांडणाचे मूळ आहे. तेराव्या राशीला नेमके किती अंश द्यावेत आणि ते कोणी द्यावेत यावरून हा वाद सुरु असल्याचे समजते. नवीन आलेल्या राशीने आपल्याला समान वागणूक मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. नवीन राशीला पश्चिमी लोक 'ओफियोकस' असे म्हणत असले तरी, नव्या राशीच्या चित्रावरून "भुजंगधारी" असे मराठी नाव देण्यात आले आहे.
ophiuchus

पार्श्वभूमी:
सुमारे २३०० वर्षांपूर्वीच्या ज्योतिषी आणि संशोधक लोकांनी गणित करणे सोपे जावे यासाठी केवळ बाराच राशींना मान्यता दिली. शिवाय पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार त्यावेळचे लोक "१३" हा आकडा अशुभ मानत असत. (तेव्हा तेरा तेरा तेरा सुरूऊSSSSSSर हे गाणे नव्हते नाहीतर तेरा आकडा कायमचा काढूनच टाकण्यात आला असता.असो.) त्यामुळे (प्रत्यक्षात असल्या तरी) तेरा राशी नकोत असा निर्णय घेऊन भुजंगधारी राशीला काढून टाकण्यात आले. इतिहासात झालेल्या आपल्यावरचा अन्याय दूर करण्याचे या राशीने ठरवले आणि जोतीबा फुल्यांपासून नेल्सन मंडेला, चे गव्हेरा यांच्यासकट आंबेडकरांपर्यंत सर्वांना स्मरून "भुजंगधारी" राशीने 'समानतेसाठी' लढा चालू केला. आपला लढा तीव्र करतानाच "सत्यशोधक" समाज त्या राशीला उपयोगी पडला... आपल्या बद्दलचे सर्व ऐतिहासिक सत्य या राशीने जगासमोर ठेवले. अखेर जगाने तेराव्या भुजंगधारी राशीला मान्यता दिली. पण तिथेही या राशीने "कोणाची मेहेरबानी नकोय. मला माझे जन्मसिद्ध हक्क हवेत" असा बाणेदारपणा दाखवत "तेरावी" रास म्हणवून घ्यायला साफ नकार दिला. मीन नंतरची अशी शेवटची रास न होता या राशीने सरळ सरळ वृश्चिक आणि मकर यांच्या मध्ये घुसखोरी करत आपली जागा बनवली. सबब मोठ्या भांडणाला सुरुवात झाली.

जगभर स्वागत..!!
जगातल्या अनेक ज्योतिष वगैरेंनी तेराव्या राशीला पाठींबा दिला असून आता अतिशय क्लिष्ट आणि अवघड गणिती प्रक्रिया करता येणे शक्य असल्याने तेरावी रास असावीच असा ठराव जागतिक ज्योतिष परिषदेने नुकताच पास केल्याचे समजले. इतकेच नव्हे तर बारा प्रस्थापित राशी विरुद्ध एक अन्यायाखाली पिचली गेलेली रास याचे स्वरूप प्रस्थापित उच्चवर्गीय विरुद्ध शोषित कनिष्ठवर्गीय असे असल्याचे जागतिक कम्युनिस्ट चळवळीने जाहीर केले आहे. अशा प्रकारे भरगोस पाठिंब्याच्या बळावर भुजंगधारी राशीला ३६० अंशाच्या आकाशात विशेष आरक्षण देण्याची मागणी होत असल्याचे दिसून आले आहे. 




राजकीय उलथापालथ
तेराव्या राशीचा "शोध" लागताच तिला देण्यात आलेले मराठी नाव पाहून मनसे आणि शिवसेनेने या राशीला संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे. प्रथम कोणी मान्यता दिली यावरून दोन्ही पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी या राशीबाबत "इटली" मधील शिलालेखात असलेले उल्लेख पाहून ताबडतोब मान्यता दिली आहे. भाजप ने यावर अद्याप मौन बाळगले असून 'या बाबत जाहीर भूमिका व धोरण ठरवताना अंतर्गत संघर्ष उफाळून येईल की काय या चिंतेत सध्या गडकरी असल्याचे' एका वरिष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. पवार साहेबांनी (नेहमीप्रमाणेच) दोन वेगवेगळ्या मुलाखतीत दोन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी भूमिका मांडल्या आहेत. रिपाइं च्या नेत्यांनी ही रास दलित रास असल्याचे सांगून आरक्षणाच्या कल्पनेला पाठींबा दर्शवला आहे. त्यासाठी वेळ पडल्यास आम्ही आंदोलनही करू असा इशारा आठवल्यांनी दिला.
एकूणच राजकीय वर्तुळात या राशीमुळे खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. आणि पुढचे अधिवेशन या प्रश्नावरून वादळी होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

भारताची भूमिका:
"नव्याने निर्माण झालेला राशींचा प्रश्न हा एक आंतरराष्ट्रीय प्रश्न असून भारत यामध्ये आपले कर्तव्य चोख बजावेल", असे आज पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी संसद सदस्यांची सर्वपक्षीय अशी एक विशेष समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. संबंधित समिती येत्या काही महिन्यात इटली, ग्रीस, चीन, दक्षिण अमेरिका, इजिप्त अशा प्राचीन संस्कृती असलेल्या देशांचा अभ्यास दौरा करेल व या प्रश्नावर सखोल अहवाल पुढच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडेल असे ठोस आश्वासनही पंतप्रधानांनी या वेळी दिले.

पाकिस्तानकडून (पुन्हा एकदा) भारताची कॉपी..!
भारताची या आंतरराष्ट्रीय प्रश्नावर असलेली तातडीची प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानने इस्लाम आणि राशी यांचा संबंध काय यावर विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. संबंधित समितीमध्ये एकूण ८ सदस्य असून त्यापैकी पाच जण पाकिस्तानी लष्करातले अधिकारी आहेत, दोन जण आयएसआय एजंट असून उरलेला एक सदस्य मौलवी आहे. संबंधित समितीचा अभ्यास दौरा पाकव्याप्त काश्मीर पासून सुरु होऊन पेशावरमध्ये संपेल असे वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिले आहे.

विरोधी सूर...
'तेरावी रास ही खरी रास नसून तोतया रास आहे, त्यामुळे तिचा निषेध करावा' असा ठराव इतर बारा राशींनी केला आहे. यासाठी घेण्यात आलेल्या सभेचे अध्यक्षपद वृश्चिक राशीने भूषवले व आपल्या भाषणात भुजंगधारी राशीवर कडाडून हल्ला चढवला व या नव्या राशीच्या घुसखोरीमुळे मकर वृश्चिक रास यांना किती त्रास सहन करावा लागत आहे याबद्दल सांगितले. 'आपल्यामध्ये आपण नव्या राशीला सामावून घेऊ वाटल्यास काही अटी घालू, पण एकदम दुसरेच टोक न गाठता मध्यम मार्ग शोधू.' अशी भूमिका तूळ राशीने मांडली मात्र फारसे अनुमोदन न मिळाल्याने हा ठराव फेटाळण्यात आला.
दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने "मुळात बारा
राशींनाच आम्ही मानत नाही तेव्हा तेराव्या राशीला आम्ही मान्यता देण्याचा प्रश्नच येत नाही." असे पत्रक प्रसिद्धीस दिले. त्याचबरोबर दाभोलकरांनी पंतप्रधानांच्या विशेष समिती नेमण्याच्या निर्णयावर कडक टीका केली.
"तेरावी रास आधी असती तर कदाचित माझा सिनेमा लोकांना आवडला असता", असे हताश उद्गार अविनाश गोवारीकर यांनी खाजगीत काढल्याचे वृत्त एका सिने मासिकात प्रसिद्ध झाले. मात्र गोवारीकर यांनी तातडीने आपण असे काहीच न म्हणल्याचे जाहीर केले.
'राशीचक्र' हा कार्यक्रम बंद पडल्याने लोकांना निखळ मनोरंजन मिळेनासे झाले असल्याची टीका
शरद उपाध्ये यांनी केली.
महाविद्यालयीन विद्यार्थी व विशेषतः विद्यार्थिनी यांना तेराव्या राशीचा जबरदस्त धक्का बसला आहे आणि लिंडा गुडमन ची पुस्तके चुकीची असल्याचे सिद्ध होणार या विचारांनी त्या कावऱ्याबावऱ्या झाल्या आहेत. बायबल सारखे लिंडा गुडमन चे पुस्तक
वाचणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचाही प्रयत्न केला म्हणे. तिची रास आधी "लिब्रा" होती आता ती "व्हर्गो" झाल्याने तिला धक्का बसून तिने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या तेराव्या राशीला हाकलून लावा अशी मागणी समाजातील विविध स्तरातून उच्चरवाने होत आहे.


मुळातच असलेल्या बौद्धिक दुष्काळात हा तेरावा आल्याची खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केली. लवकरात लवकर हा दुष्काळ संपो आणि प्रखर बुद्धिमत्तेचा सुकाळ सर्वत्र पसरो अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

संपादकीय
टीप:- आमच्या या वृत्तस्थळासकट इतर सर्व वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांना खाद्य पुरवणाऱ्या या तेराव्या राशीचे शतशः आभार....!!!!!