आपल्या देशात साधारण १९३५ साली म्हणजे सुमारे ७५ वर्षांपूर्वी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला गेला असं म्हणायला हरकत नाही. १९३५ साली ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांमुळे भारतीयांना खुल्या निवडणुका हा प्रकार प्रथमच अनुभवता आला. काँग्रेस, मुस्लीम लीग सह सर्व प्रमुख पक्षांनी या १९३५ च्या सुधारणेप्रमाणे या निवडणुकीत भाग घेतला. आणि काँग्रेसने बहुतांश प्रमुख प्रांतांमध्ये सत्ता हस्तगत केली. अशीच अजून एक निवडणूक महायुद्धानंतर झाली. ज्यामध्ये काँग्रेस ने आधीप्रमाणेच वर्चस्व मिळवले. परंतु मुस्लीम बहुल प्रांतांमध्ये मात्र मुस्लीम लीग ने निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पाकिस्तान चे जाऊ द्या. पण भारतात मात्र लोकशाही शासनव्यवस्थेला सुरुवात झाली. १९५० साली बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे जगातले सर्वोत्तम गणले गेलेले संविधान भारताला मिळाले. पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली लोकशाही फुलत गेली. त्यांच्याच मुलीने, इंदिरा गांधी ने लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न केला, मात्र संविधान आणि लोकशाहीच श्रेष्ठ ठरून इंदिरेला नतमस्तक व्हावे लागले. अशा प्रकारे तावून सुलाखून भारतातील लोकशाही शासनव्यवस्था मजबूत झाली असे म्हणतात. ६० वर्षांमध्ये भारतातील लोकशाही एक आदर्श आहे असं कित्येकांचा दावा आहे.
छान...! तसे असेल तर खरच छान...!!
पण हा सगळा दावा वगैरे लोकशाही शासनव्यवस्थेबद्दलचा आहे. लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. अनेकांना असे वाटते की जी अनेक वर्षांपासून चालू असते ती संस्कृती. परंतु तसे नसते. संस्कृती ही काही वर्षातच निर्माण होऊन काही वर्षातच संपूही शकते. (तसे नसते, नाहीतर नुकत्याच टीकेच्या झोतात आलेल्या चंगळवादी संस्कृतीला "संस्कृती" म्हणले गेले नसते..!). लोकशाही संस्कृती भारतीय भूमीत ६० वर्षात अद्यापही रुजली नाही हा अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. शासनव्यवस्था रुजली... संस्कृती नाही....
लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती यातला फरक काहीसा टिळक आगरकर यांच्या वादासारखा आहे. आणि खरे तर काहीसा नव्हे तर त्यांच्यातला वाद हाच होता असे लक्षात येते. आधी लोकशाही संस्कृती की आधी लोकशाही शासनव्यवस्था हा तो वाद होय. महात्मा गांधी आणि सावरकर या दोन भिन्न वृत्तींच्या किंबहुना अगदी विरुद्ध वृत्तींच्या दोन महान नेत्यांनी आपापल्या परीने संस्कृती आणि शासनव्यवस्था एकाचवेळी पाहिजे असा प्रयत्न केला. दोघांनीही अन्यायी ब्रिटीशांवर हल्ले चढवले. दोघांनीही अस्पृश्यते विरोधात कार्य केले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला पाहिजे असे गांधींनी म्हणताच असंख्य स्त्रिया पारंपारिक बंधनं सोडून इंग्रजांविरुद्ध रस्त्यावर उतरल्या! सावरकरांच्या "गाय हा केवळ एक उपयुक्त पशू आहे. गायीचे मांस खाल्ल्याने काही होत नाही" अशा लिखाणाने समाज ढवळून निघाला. एकूणच समाजात आपापल्या परीने प्रगल्भता आणायचे आणि लोकशाही संस्कृती आणायचे प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर "लोकशाही संस्कृतीच्या" पाश्चात्त्य कल्पनांना दोघांनीही नाकारले. या देशातली लोकशाही या देशाच्या मातीशी निगडीत पाहिजे, इंगलंडची कॉपी नको असे दोघांनीही आग्रहाने मत मांडले. गांधी सावरकरांनंतर 'लोकशाही संस्कृती' साठी फार थोड्या प्रमाणात प्रयत्न झाले.
आपल्या इथल्या जवळपास ९० % लोकांना आता लोकशाही आणि निवडणूक हा प्रकार माहित आहे. संपूर्ण शासनव्यवस्था माहित नसेल कदाचित. पण आपण मत दिलं की सरपंच निवडून येतो हे गावच्या अडाण्यालाही आता माहित आहे. थोडक्यात आपला नेता आपण निवडायचा ही गोष्ट नवीन नाही. म्हणूनच लोकशाही शासनव्यवस्था रुजली आहे असे आपण म्हणू शकतो.
परंतु घराघरात असणाऱ्या हुकुमशाहीबद्दल काय म्हणावे?? धार्मिक हुकुमशाही बद्दल काय म्हणावे? खाप पंचायत बद्दल लिहिलेल्या लेखामध्ये मी धार्मिक हुकुमशाहीबद्दल लिहिले आहे. माझ्या आजच्या लेखाचा विषय हा घरात नसलेली लोकशाही हा आहे. पुरुषप्रधान संस्कृती ही आजच्या कुटुंबातील हुकुमशाहीला कारणीभूत आहे.
मध्यमवर्गीय, अतिशय आधुनिक सुख सोयींनी युक्त घरांमध्ये राहणाऱ्या, मक्डोनाल्ड्स मध्ये बर्गर खाणाऱ्या तरुण मुलाला साधे आपले करिअर निवडायचे स्वातंत्र्य कित्येकांच्या घरांमध्ये नसते ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या बापाने हुकुमत गाजवावी त्याच्या खालोखाल आई, मग मोठी ताई किंवा दादा आणि मग आपण. एक प्रकारची चातुर्वर्ण्य व्यवस्था मध्यमवर्गीय घरांमध्ये आहे असे वाटते मला. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे टिळकांचे वाक्य पालकच आपल्या मुलांना सांगत असतात. तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो, स्वातंत्र्य आणि स्वैराचार मधला फरक कोण ठरवणार??? देशाचे कायदे जसे लोक ठरवतात. (किंवा लोकसंख्या ज्या देशात प्रचंड असते तिथे लोकांचे प्रतिनिधी!), तसेच घरातले कायदे-नियम हे लोकांनीच म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ठरवावेत याला मी म्हणीन लोकशाही संस्कृती...!!!
मला आठवतंय, मी लहान असताना माझ्यात माझ्या मोठ्या भावात आणि आई बाबांमध्ये जोरदार भांडणे व्हायची. "करायला सांगितलं की गपचूप करायचं" असला हुकुमशाही प्रकार आमच्या घरात नव्हता.त्यामुळेच वादविवाद खूप व्हायचे. घरातल्या मतस्वातंत्र्याचा मी (वय साधारण १२) आणि माझा भाऊ (वय साधारण १७) पुरेपूर वापर करायचो. शेवटी अनेक बाबतीत आम्ही मतदान घ्यायचो. शेवटी बहुमताने जो निर्णय होईल तो घेतला जायचा. घरातली कामे हा एक मोठा प्रश्न प्रत्येक घरात असतो. तसाच तो आमच्याही घरात होता. स्वच्छता, भाज्या आणणे, अंथरूण-गाद्या आवरणे, इस्त्री करणे/ इस्त्रीला टाकलेले कपडे आणणे भाजी चिरणे, बिलं भरणे अशी एक ना असंख्य कामे.... यावरून होणाऱ्या भांडणांनी कंटाळून शेवटी बाबांनी एखाद्या कॉन्फरन्स (संसदच म्हणा एक प्रकारची) सारखे आम्हाला बसवले. आम्ही चौघे गोल बसलो. एकत्र बसून कामांची यादी केली. आणि सगळ्यांनी मिळून कामे ठरवून घेतली. त्याही वेळी वादविवाद झाले. पण समजूतदारपणे समोरच्याच्या बाजू लक्षात घेऊन आम्ही सर्व कामे विभागली. पुढे कित्येक महिने त्यावेळी ठरलेली पद्धत अमलात येत होती. माझे ठरलेले काम मी जर केले नाही तर सर्वानुमते मला शिक्षाही होत असे. पण माझे काम न करण्यामागे एखादे कारण असेल तर मात्र सर्वानुमतेच सूटही मिळायची. यालाच मी म्हणीन लोकशाही संस्कृती.
माझ्या ओळखीत कित्येक घरं आहेत जिथे लोकशाहीचा मागमूसही नाही. हुकुमांवर हुकुम तेवढे निघत असतात. (मग फतवा काढणाऱ्यांना शिव्या का देतात देव जाणे..!). माझ्या एका मित्राच्या घरी अगदी मोकळं वातावरण आहे. खुलेपणाने चर्चा आहे. पण काही बाबतीत, काही मुद्दे निघाले की तर्कशुद्ध चर्चा हा प्रकार लोप पावतो. त्याचा पूजा अर्चा करण्यावर विश्वास नाही. तो देवाला मानत नाही. परंतु त्याचे हे मत असू शकते आणि त्याच्या मतानुसार वागायचा त्याला हक्क आहे ही गोष्ट त्याचे पालक समजून घेत नाहीत. त्यामुळे त्याला घरात सत्यनारायण पूजेपासून गणपतीपर्यंत सारे करावे लागते. तसा स्पष्ट 'आदेशच' असतो त्याच्या वडिलांचा..!!!
एका मैत्रिणीच्या घरी तिच्या आईला तिनी घराबाहेर राहिलेलं आवडत नाही. म्हणजे दिवसभर मुलगी घराबाहेर असली तर आई बेचैन होऊन जाते. यातला काळजीचा भाग वगळूया. कारण ही माझी मैत्रीण तिच्या आजीच्या/मामाच्या घरी जरी गेली असेल तरी तिच्या आईला अस्वस्थपणा येतो. शेवटी तिची आई फर्मान काढते की आता घरातून बाहेर पडायचं नाही. घरात बस. घरात बसून काहीपण कर. काळजीमुळे एखादे बंधन घातले जाणे मी समजू शकतो, परंतु तशी काळजी वाटली म्हणून बंधन घातले आहे हे आपल्या पाल्याला सांगणे गरजेचे आहे. तसा संवाद आवश्यक आहे. माहिती अधिकार नावाचा एक उत्कृष्ठ कायदा आपल्या देशात आला आहे. त्याच्या नुसार सरकारने एखादा निर्णय घेतला की त्याचे कारण, पार्श्वभूमी या सर्व गोष्टी आपण होऊन सांगणे बंधनकारक आहे. तसेच आपल्या घरातल्या लोकशाहीतही घडले पाहिजे. वरील उदाहरणामध्ये आईने मुलीला घराबाहेर न जाऊ देण्याची कारणे सांगितली पाहिजेत. त्यावर शुद्ध तर्कावर आधारित चर्चा व्हायला पाहिजे. कित्येकदा मला असं वाटतं की याच तर्कशुद्ध चर्चेमध्ये आपला पराभव होईल की काय या भीतीपोटी पालक "चर्चा नकोय" असा सूर लावतात.
माझ्या अजून एका मित्राच्या घरातील गम्मत म्हणजे त्याचं सगळं घराणं लोकशाहीवादी, गांधींचे अनुयायी, शिवाय आणीबाणीच्या वेळी आजी आजोबा जेल मध्ये वगैरे गेलेले. अशा घरात काहीवेळा माझ्या त्या बिचाऱ्या मित्राला अजिबात स्वातंत्र्य नसते... रात्र रात्र मित्रांबरोबर तात्त्विक चर्चा करण्याची या मुलाला मोठी हौस. एखाद्या मित्राबरोबर कट्ट्यावर चर्चा सुरु झाल्यावर २-३ वाजता पोलिसांनी हटकल्यावर ती चर्चा संपते. या गोष्टीवरून त्याचे त्याच्या पालकांशी रोज खटके उडतात. अखेर त्याच्या वडिलांनी हुकुम काढला की घराचा असा नियम आहे की या घरात परत यायचं असेल तर ११ च्या आत यायचं नाहीतर घराबाहेर जायचं. आता हा नियम कोणी निर्माण केला?? हा नियम बनवताना कोणत्या लोकशाही मार्गाने याची चर्चा झाली होती?
पैसे कमावणारे ते पालक उच्च वर्णीय असतात... नव्याने कमवायला लागल्यावर मोठ्या भावाला किंवा बहिणीला अचानक मिळणारा मान तुम्हाला जाणवला नाही का?? तुम्हालाच लहान भाऊ/ बहिण असेल तर त्यांना एकदा विचारून बघा.... घरात असणाऱ्या वर्णव्यवस्थेची नीट कल्पना येईल तुम्हाला. रोटीच्या तुकड्यासाठी गावच्या पाटलापुढे गयावया करणारे शेतमजूर आणि पालक कमावून खायला घालतात म्हणून निमूटपणे त्यांचे ऐकणारे पाल्य यात मला तरी काहीच फरक दिसत नाही.
आता कोणी म्हणेल "काय राव पालकांना तुम्ही गावच्या क्रूर पाटलाची किंवा हुकुमशहा ची उपमा देत आहात... असे कसे चालेल... शेवटी आई वडील असतात ते आपले..".
कबूल... सगळे कबूल...! भाव भावना प्रेम इत्यादी गोष्टी आल्याने काहीच नियमांमध्ये कायद्यांमध्ये शिथिलता येते, आणि ती आलीच पाहिजे. पण माझा मुद्दा एवढाच आहे की ही शिथिलता, हा समजूतदारपणा दोन्ही बाजूंकडून असायला हवा. आणि पालकांकडून तर जास्त, कारण ते वयाने मोठे असतात, परिपक्व असतात..(असतातच असे नाही पण निदान तसे मानले तरी जाते..!!). घराच्या नियमांना अपवाद फक्त वडिलांसाठी आणि माझ्यासाठी नाही याला समानता म्हणत नाहीत. जसे देशाचे तसेच घराचे...समानतेशिवाय लोकशाही नाही. घरातूनच लोकशाही संस्कृती निर्माण करायची असेल तर घरात प्रथम समानता हवी. गावचा पाटील किंवा हुकुमशहांशी मी तुलना करत नसून माझे म्हणणे स्पष्ट व्हावे म्हणून हे उदाहरण दिले.
अजून एक उदाहरण माझ्या एका मैत्रिणीचं, तिच्या घरात अतिशय मोकळं वातावरण. आई वडील डॉक्टर, एकुलती एक मुलगी, सर्वजण हुशार, छोटं सुखी कुटुंब..! पहिल्यापासून असलेल्या मोकळ्या वातावरणात मुलगी वाढलेली असल्यामुळे साहजिकच सर्व गोष्टी आईशी बाबांशी बोलायची सवय, परंतु आपल्या तरुण मुलीला बॉयफ्रेंड असू शकतो, ही सामान्य गोष्ट पचवायला त्यांना आता जड जाते आहे. त्यावरून घरात वाद सुरु झाले. वादांमधून मग तिनी घरी खोटे सांगणे सुरु झाले. अशा या परिस्थितून मुलीचे पालक बिथरले आणि ते हुकुमशाही पद्धतीने वागू लागले. परत ते आव तर असं आणतात की माझ्या मुलीला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे.
"आम्ही सांगितलं की गपचूप करायचं, आम्ही तुझ्या भल्याचंच सांगतोय" , अशा अविर्भावात पालक वागू लागले. इथे नेमके काय घडले? तर, पालक आणि पाल्यात्ला संवाद संपला, अविश्वास निर्माण झाला, आणि तो का संपला कारण पालकांनी आपल्या मुलीचा एक व्यक्ती म्हणून असलेला हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी लोकशाही कशी काय टिकावी? जिथे संवादाच होऊ शकत नाही, जिथे संवाद हा भीती, संशय आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर होतो, तिथे लोकशाहीचे स्वतंत्र वारे कसे खेळणार...??????
स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्या मुलाला/मुलीला, त्यांच्या मतांना मान देणं ही घरातील लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. आणि जोवर घरापासूनच लोकशाही संस्कृती निर्माण होत नाही. तोवर लोकशाही शासनव्यवस्था किती का रुजेना, लोकशाही संस्कृती मात्र मूळ धरणार नाही.
लोकशाहीची संस्कृतीचा विकास स्वतःपासून होत जाऊन नंतर कुटुंब, आजूबाजूचे लोक, नातेवाईक, सोसायटी, मोहल्ला, शहर, राज्य, देश अशा प्रकारेच होऊ शकतो....
लोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही संस्कृती निर्माण करणे आपल्याच हातात आहे...!!!
आणि लोकशाही संस्कृती शिवाय शासनव्यवस्थेला अर्थ नाही... आधी काय हवे हा टिळक आगरकर वाद असला तरी कधी ना कधी तरी दोन्ही हवे आहे ही गोष्ट कोणीच नाकारू शकणार नाही....
No comments:
Post a Comment