Saturday, August 1, 2020

लोकमान्य

आज लोकमान्यांचा १०० वा स्मृतिदिन. 

लोकमान्य टिळक हा माझ्या अत्यंत प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. टिळकांवर पुरोगामी मंडळींकडून नेहमी खरमरीत टीका केली जाते आणि त्यातले कित्येक मुद्दे आजच्या दृष्टिकोनातून रास्तच आहेत! पण कोणत्याही महापुरुषाकडे बघताना एकेका वेळी त्यांनी घेतलेली भूमिका, एखाद्या वेळचे वर्तन यापलीकडे जात त्यांची असणारी मनोभूमिका, दृष्टिकोन आणि त्या व्यक्तीचा झालेला एकूण प्रवास, संपूर्ण जीवनपट; असा सगळा विचार करावा लागतो. टिळक याला अपवाद असायचं कारण नाही. सुरुवातीला सनातनी ब्राह्मणांचे पुढारी असणारे टिळक, दंगली झाल्या तेव्हा मराठी हिंदूंचे पुढारी बनले. प्लेग, दुष्काळ आणि ब्रिटिश जुलूम अशा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या काळात ते शेतकरी वर्गापर्यंतही पोचले आणि बघता बघता महाराष्ट्राचे नेते झाले. आणि १९०५ पासून थेट राष्ट्रीय नेते बनले. १८८० ची सनातनी विचारधारा घेऊन ते या स्थानावर पोहोचणं शक्यच नव्हतं. त्यांच्या भूमिका, त्यांचा दृष्टिकोन हळूहळू व्यापक होत गेला, विकसित होत गेला. हे विकसित होत जाणं मला मोहवून टाकतं.

मंडालेच्या तुरुंगातून सुटल्यावर तर ज्या प्रमाणे त्यांनी कामगार चळवळीबद्दल आस्था ठेवली ती बघता टिळक हळूहळू समाजवादाकडे झुकत होते की काय असं वाटतं. इंग्लंडला जाऊन लेबर पार्टीबरोबर मैत्रीचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना देणगी देखील दिली. (पुढे याच पक्षाच्या सरकारने भारताला स्वातंत्र्य द्यायचा निर्णय घेतला!). रशियन कम्युनिस्ट क्रांतीचंही त्यांनी स्वागत केलं. पुण्याच्या पेठेतला सनातनी दृष्टिकोन टप्प्याटप्प्याने व्यापक होत आंतरराष्ट्रीय होत गेला. आणि तरी पाय घट्ट मातीत. त्यामुळे कोणत्याही विचारधारेला त्यांनी भारतीय नजरेतून जोखून बघितलं. बाहेरच्या देशातलं आपल्याही देशात जसंच्या तसं आणावं असा भाबडेपणा नव्हता. मला वाटतं गांधींनी स्वतःला गोखल्यांचं शिष्य म्हणवलं तरी ते खरंतर टिळकांचाच हाही वारसा घेऊन पुढे गेले. म्हणून तेही लोकांना आपलेसे वाटले. या मातीतले वाटले.

टिळक नुसते पुस्तकी आदर्शवादी नव्हते. डोळ्यासमोर आदर्श असणं त्यांना अमान्य नव्हतं, पण 'आज' काय करणं शक्य आहे आणि काय नाही याची मांडणी करून, जे शक्य आहे त्यावर काम करणं यावर त्यांचा आयुष्यभर भर होता. इतकं विवेकनिष्ठ (rational) राहणं आपल्याला रोज साध्या साध्या बाबतीतही जमत नाही सहजपणे. 'जेवढं मिळेल ते आनंदाने स्वीकारायचं आणि उरलेल्यासाठी प्रयत्न करत राहायचं' हे त्यांचं सूत्र ज्याला त्यांनीच नाव दिलं- प्रतियोगी सहकारिता. ब्रिटिशांनी काही सुधारणा दिल्यावर जहाल आदर्शवादी मंडळींचा आग्रह होता आपण 'खाईन तर तुपाशी' हीच भूमिका घ्यावी, मवाळ मंडळींना जे मिळतंय त्यालाच तूप म्हणायचं होतं. टिळकांनी मध्यममार्ग काढला, विवेकनिष्ठ मार्ग काढला. त्यावेळी अग्रलेखाचं शीर्षक होतं- 'उजाडलं पण सूर्य कुठे आहे?' म्हणजे उजाडलं असं म्हणायला त्यांनी हात आखडता घेतला नाही, पण सूर्य नाही हेही सांगितलं.

व्यक्तिशः मला, भूमिका, विचारधारा विकसित होत जाणं आकर्षक वाटतं. ते मानवी आणि नैसर्गिक वाटतं. स्थळ-काळ-परिस्थितीनुसार विचार बदलणं, व्यापक होणं हे माणूस म्हणून प्रगल्भ होण्याचं लक्षण आहे, असं मला वाटतं. त्यामुळे लहानपणीच कसे टिळक 'टरफलं उचलणार नाही' म्हणणारे बाणेदार व्यक्ती होते या कथे (narrative)पेक्षा आक्रमक, हट्टी आणि सनातनी टिळक पुढे संयत, उदारमतवादी आणि अधिकाधिक विवेकनिष्ठ होत गेले हे narrative जास्त महत्त्वाचं वाटतं. लहानपणापासून हेच सांगायला हवं खरंतर. आपले महापुरुष हे सुरुवातीपासून सुपरहिरो होते यापेक्षा; सामान्य माणूस असणाऱ्यालाही बदलता येतं, सुधारता येतं, अधिक कष्ट घेत, वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय करून घेत विकसित होता येतं हा संदेश महत्त्वाचा आहे.


No comments:

Post a Comment