Tuesday, August 26, 2014

द थर्ड कर्व्ह

मन्सूर खान हे नाव आपल्याला ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’ किंवा
‘जोश’ या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून परिचित आहे. जाने तू या जाने ना या चित्रपटाचा सहनिर्माता म्हणूनही काहींना हे नाव परिचित असेल. आमीर खानचा चुलत भाऊ म्हणून काहीजण मन्सूर खान यांना ओळखत असतील. मात्र ही सर्व ओळख बाजूला पडून त्यांची एक स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण होईल असं एक दोनशे पानी पुस्तक मन्सूर खान यांनी नुकतंच लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे- ‘The Third Curve- the end of growth as we know it' किंवा मराठीत सांगायचे तर ‘तिसरा आलेख- आपल्याला माहीत असलेल्या आर्थिक वाढीचा शेवट’. पुस्तकाचं नाव बघता आणि प्रस्तावना बघता हे पुस्तक अर्थशास्त्रावर आहे असा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. पुस्तक निम्मं वाचून झाल्यावर हे जागतिक उर्जा प्रश्नावर आहे असं वाटू लागतं पण हाही एक गैरसमजच. ‘उर्जा हेच वैश्विक चलन आहे’ असे ठामपणे मांडत मन्सूर खान या पुस्तकात उर्जा, पर्यावरण आणि अर्थशास्त्र या सगळ्यांची सांगड घालतात. आणि हेच या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं वेगळेपण आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच “सत्याकडे उघड्या डोळ्यांनी बघा, अन्यथा सत्य तुमच्याकडे बघून घेईल” अशा आशयाचे वाक्य लिहिलेले आहे. एका दृष्टीने मन्सूर खान या पुस्तकासाठी वाचकाची मानसिक तयारीच करतात. पुस्तक पाच प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. पहिले प्रकरण ‘संकल्पना आलेख’ (concept curve) आणि ‘वास्तव आलेख’ (reality curve) अशा दोन प्रमुख आलेखांची ओळख करून देते. अतिशय सुंदर उदाहरणं देऊन आणि सोप्या भाषेत हे लिहिल्याने हे दोन्ही आलेख आपल्या डोक्यात फिट्ट बसतात. ते नीट समजणे आवश्यकही आहे कारण पुढची प्रकरणे वाचताना आपण सातत्याने या पहिल्या प्रकरणांचा आधार घेतो. संकल्पना आलेख ज्या मूलभूत तत्वावर आधारित आहे त्याचाही पूर्ण पुस्तकात वारंवार उल्लेख येतो. ते तत्व म्हणजे – निरंतर वेगवान संख्यात्मक वाढ (Perpetual Exponential Quantitative Growth). Exponential शब्दाचे नेमके मराठी भाषांतर वेगवान असे नसून ‘घातीय’ असे आहे. म्हणजे एखाद्या संख्येचा घात एकाने वाढवल्यावर ज्या प्रमाणात वाढ होते त्याला घातीय वाढ म्हणतात. 102 म्हणजे 100. इथे 10 चा घात आहे 2. हाच घात ‘एक’ने वाढवला आणि 3 असा केला तर? 103 म्हणजे 1000 अशी संख्या होईल. घात अवघ्या एकाने वाढवल्यावर तब्बल ९०० ची वाढ झाली. म्हणजेच वेगवान वाढ झाली. या पुस्तकाच्या अनुषंगाने घातीय या अवघड शब्दाऐवजी वेगवान हा सोपा शब्द वापरायला हरकत नाही. ‘निरंतर वेगवान संख्यात्मक वाढ’ या तत्वावर संकल्पना आलेख आधारलेला आहे असं स्पष्ट करून हे प्रकरण संपते.

‘खनिज तेल म्हणजेच पेट्रोलियम पदार्थांचे आता शक्य तितके सर्वात जास्त उत्पादन घेऊन झाले आहे, आणि आता हे उत्पादन प्रतिवर्षी कमी कमी होत जाणार आहे’ असे भयावह वास्तव मांडणाऱ्या दुसऱ्या प्रकरणाचे नाव आहे- ‘खनिजतेल उत्पादनाचे शिखर’ (Peak Oil). विविध आकडेवारी, शास्त्रज्ञांचे दाखले, विविध देशांच्या सरकारी संस्थांच्या अभ्यासाचे अहवाल अशा गोष्टी आपल्यासमोर मांडत मन्सूर खान सप्रमाण असं सिद्ध करतात की इथून पुढे खनिज तेलाचे उत्पादन कमी होत जाणार असून त्यावर आधारित असलेली आपली संपूर्ण अर्थव्यवस्था आज धोक्यात आहे. आजवर आपण खनिज तेल वापरात गेलो ते अत्यंत वेगात वाढणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेचे मुख्य इंधन म्हणून. अनेकदा आपण असं वाचतो की जगातले तेल २०५० साली संपणार असून आजतरी त्याची चिंता करण्याचे कारण नाही. मात्र अत्यंत अधिकृत आकडेवारीसह लेखक आपल्यासमोर हे मांडतो की सर्व जगाने ५% वाढीचा दर ठेवला आणि आज होते आहे त्या पद्धतीने प्रगती केली तर पुढच्या १४ वर्षात पृथ्वीवरील सर्व खनिज तेल संपून जाईल. हा वाढीचा दर अगदी ३% पर्यंत खाली आणला तरी २३ वर्षात तेल संपून जाईल. भारत आणि चीन सरकारे आज ७-८% वाढीच्या दराचे उद्दिष्ट ठेऊन घोडदौड करत आहेत हे बघता परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना यावी. सर्व जगाने ७% वाढीचा दर ठेवल्यास आपल्या हातात अवघी १० वर्षे आहेत आणि आपण ‘तेल संपेल तेव्हा बघून घेऊ’ या भ्रमात राहणं धोक्याचं आहे हे मन्सूर खान आपल्याला वारंवार सांगतात.

इथपर्यंत परिस्थिती विषद केल्यावर आपल्या मनात साहजिकच ‘पर्यायी उर्जा स्त्रोत’ याविषयी विचार येऊ लागतात. सोलर एनर्जी, विंड एनर्जी वगैरे विषयी अपण वाचलेलं असतं. हेच भविष्य आहे असंही कोणीतरी ठासून म्हणलेलं आपल्याला आठवत असतं. पण तेल नसलेल्या जगात हे पर्यायी उर्जा स्त्रोत टिकू शकतील का असा प्रश्न मन्सूर खान उपस्थित करतात. आणि पुन्हा एकदा अधिकृत आकडेवारीसह आणि कारणमीमांसेसह ते आपल्याला सांगतात की तेलाला पर्याय म्हणून उभे राहणारे हे उर्जा स्त्रोत म्हणजे केवळ एक मृगजळ आहे. पुस्तकातील हे सर्वात मोठे प्रकरण आहे. दोनशेपैकी तब्बल साठ पाने या एकट्या प्रकरणावर खर्ची पडली आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे ‘पर्यायी उर्जास्त्रोत आहेत, असणार आहेत, काहीतरी शोध लागेलच, काहीतरी होईलच’ या सगळ्यावर आपली असणारी अंधश्रद्धा. हा सगळा भाबडा आशावाद दूर करण्यासाठी मन्सूर खान यांना बरेच लेखन करावे लागले आहे. पण या प्रकरणाच्या शेवटी वाचकाची खात्री पटते की आपले जग आता मोठ्या संकटात आहे. उर्जा संकट आल्याने अर्थव्यवस्था धोक्यात आहेत आणि या सगळ्यात आपण पर्यावरणाचे नुकसान केल्याने जी संकटे उभी राहत आहेत ती वेगळीच.

चौथे आणि पाचवे प्रकरण खरे तर अत्यंत महत्वाचे आहे. चौथ्या प्रकरणात संकल्पना आलेख आणि वास्तव आलेख हे दोन आलेख सोडून तिसरा आलेख कोणता हे सांगितले आहे तर त्या तिसऱ्या आलेखापर्यंत कसं पोहचावं याविषयीची चर्चा पाचव्या प्रकरणात आहे. मात्र अत्यंत महत्वाचे असूनही चौथे प्रकरण जरा अर्धवट सोडल्यासारखं वाटतं. चौथ्या प्रकरणात उल्लेखलेला ‘तिसरा आलेख’ हा निसर्गनियमांवर आधारित आहे असं सांगितलं असलं तरी त्याची यथायोग्य सविस्तर अशी कारणमीमांसा दिलेली नाही. किंवा तो आलेख आला कोठून, ‘नैसर्गिक’ कसा आहे म्हणजे काय याबद्दलचं उदाहरणांसह विवेचन सुद्धा नाही. त्यामुळे तिसऱ्या आलेखाची संकल्पना पुरेशी स्पष्ट होत नाही. वास्तविक पाहता पहिली तीन प्रकरणे इतकी सविस्तर आणि मुद्देसूद पद्धतीने मांडलेली असताना हे चौथे प्रकरण असं अर्धवट किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं असं मन्सूर खान यांनी का सोडावं हे अनाकलनीय आहे. कारणमीमांसा नसल्याने चौथ्या प्रकरणाच्या मांडणीत जोर येत नाही आणि पुस्तकाचं नाव असलेल्या ‘तिसऱ्या आलेखाबाबत’च वाचकाला पटवून देण्यात हे प्रकरण कमी पडतं. पुस्तकाची रचना एकूण अशी आहे की आधीच्या प्रकरणावर पुढचे प्रकरण आधारलेले आहे. साहजिकच चौथे महत्वाचे प्रकरण वाचकाला पुरेसे पटवणारे नसल्याने पाचव्या प्रकरणाचा प्रभाव कमी होतो. पण तरीही, पाचव्या प्रकरणासाठी लेखकाने अधिक कष्ट घेतल्याचं जाणवतं. आणि शेवटी, संपूर्ण पुस्तक वाचून संपवून खाली ठेवताना, ‘संकल्पना आलेख’ आणि ‘वास्तव आलेख’ यापलीकडे जाऊन आता तिसऱ्या आलेखाकडे कसं जावं याविषयीच्या या मुद्देसूद विवेचनाने एकूण पुस्तकाचा आलेख नक्कीच पुन्हा वरती गेलेला असतो! काय करायला हवे यापेक्षा इथून पुढे आपला दृष्टीकोन कसा असावा याबाबत लेखक शेवटच्या प्रकरणात विचार मांडतो, जे महत्वाचे आहे. अन्यथा, लेखकाने प्रत्यक्ष कृती आराखडे (action plans) सांगितल्यास वाचक हा त्या आराखड्यांच्याच गुण-अवगुणांत अडकून पडू शकतो. एकुणातच उर्जाप्रश्न हा एखाद्या व्यक्ती, देश अथवा सरकारचा नसून संपूर्ण मानवजातीचा आहे. कारण यातच मनुष्यप्राण्याच्या भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे या पाचही प्रकरणातून आपल्या लक्षात येतं.


‘द थर्ड कर्व्ह’ हे एखाद्या शालेय पाठ्यपुस्तकासारखं आहे. भरपूर चित्र, आकृत्या, आलेख, उदाहरणे, आकडेवारीचे तक्ते आणि अतिशय सोपी भाषा यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसालाही उर्जाप्रश्न, पर्यावरण आणि अर्थकारण या गोष्टी परक्या वाटणार नाहीत. पुस्तकाचा आशय, मांडणी आणि एकूणच शैली या सर्वच दृष्टीने हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं असं मी सुचवेन. मी तर म्हणतो, सगळ्यांनी दोन दिवस आपल्या दैनंदिन जीवनातून चक्क सुट्टी काढून हे दोनशे पानी पुस्तक वाचून काढायला हवं, कारण आपण ज्या दिशेला प्रचंड वेगात घोडदौड करत आहोत ती दिशाच चूक आहे, हे जितकं लवकर आपल्या लक्षात येईल तितकं योग्य त्या दिशेला वळणं सोपं होत जाईल...!

No comments:

Post a Comment