Saturday, May 4, 2013

चुकण्याची परवानगी हवी आहे.


रवा वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान देताना माहिती अधिकार कार्यकर्ते वेलणकर संगत होते, जवळच जायचं असल्यास यायला नाकारणाऱ्या उर्मट रिक्षावाल्यांबाबत तक्रार करता येते फक्त एक SMS पाठवून. पण लोक तक्रार करायलाही धजत नाहीत. लोक म्हणतात “रिक्षावाला घरी येऊन मारहाण करेल.” आता काय बोलावे यावर...

मध्ये एकदा एका कॉलेज मध्ये मी माहिती अधिकार कायदा आणि एकूणच ‘परिवर्तन’च्या कामाविषयी लेक्चर द्यायला गेलो होतो. शासनव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न, नगरसेवकांच्या कामावर लक्ष ठेवणं, भ्रष्टाचार उघड करणं असं एकूण आमच्या कामाचं स्वरूप ऐकल्यावर एकजण उभा राहिला आणि मला विचारलं, “अत्तापार्यंत किती धमक्या आल्या तुला?” त्यावर मी ठामपणे उत्तरलो, “एकही नाही.” आजवर आम्हाला धमक्या वगैरे कधीही आलेल्या नाहीत, हे खरेच आहे! या प्रसंगानंतर एका मित्राशी बोलताना आमचा विषय निघाला की एकूण समाजात प्रचंड असुरक्षितता ठासून भरली आहे. प्रत्येक जण घाबरलेला आहे. कशाला न कशाला. कोणी पालकांपासून ते राजकारणी लोकांना, कोणी पैसे न मिळण्याला, कोणी स्पर्धेत मागे पडण्याला, कोणी समाज आपल्याला नावं ठेवेल याला, कोणी बॉम्बस्फोटांना, कोणी स्वतःच्या अनारोग्याला, कोणी दुसऱ्याच्या गरिबीला, कोणी स्वतःच्या श्रीमंतीला, कोणी एकटेपणाला, तर कोणी गर्दीत हरवून जाण्याला, कोणी भावनांना तर कोणी थंडपणाला, कोणी सगळं विश्वच आपल्याविरुद्धच्या कट कारस्थानात गुंतले असल्याच्या समजुतीला... घाबरले आहेत सगळे कशाला न कशाला तरी. आणि म्हणूनच आपण एक प्रकारच्या पारतंत्र्यात आहोत अजूनही. भयमुक्त जीवन नसेल तर ते खरेखुरे स्वातंत्र्य आहे असे मानता येत नाही.
माझं म्हणणं ऐकल्यावर तो माझं मित्र म्हणाला की याचा अर्थ तुला लोकांनी भीती वगैरे सगळं बाजूला ठेवून वाट्टेल तसं वागायला हवं आहे. मी त्याला म्हणलं वाट्टेल तसं म्हणजे बेजबाबदार वागणूक मला अपेक्षित नाही. भयमुक्तता à स्वातंत्र्य à जबाबदारी असा हा प्रवास का असू शकत नाही? “with great power comes great responsibility”. स्वातंत्र्याची शक्ती हातात आल्यावर त्याचं दुरुपयोग तेवढा होईल इतका निराशावाद मला मंजूर नाही. स्वातंत्र्याच्या शक्तीतून नागरिक अधिक जबाबदार होतील. ही प्रक्रिया एकदम होणार नाही. सुरुवातीला चुका होतील... पडायला होईल. पण शेवटी अधिक जबाबदार समाज आपण तयार करू शकू. मूल लहान असताना ते आपल्या बोटाला धरून चालू लागतं तो आधार एकदम सुटल्यावर सुरुवातीला धडपडतं पण अखेर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकतं. “अरे तू धडपडतो आहेस, त्यामुळे कायम हात धरून चाल” असं आपण म्हणत नाही. नाहीतर ते मूल स्वतःच्या पायावर आधाराविना चालण्याचे शिकणारच नाही. अगदी तसंच समाजाचं आहे.

पहिल्यांदा लोकांना मतदानाचा अधिकार देण्याचे इंग्लंडमध्ये ठरले तेव्हा अमीर उमराव म्हणाले की लोकांना जमणार नाही हे. पण लोकांना जमणार नाही या विचारांना डावलून लोकशाही रुजली. त्यानंतर सर्वाच्या सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा श्रीमंत मतदार म्हणाले की गरिबांना कळणार नाही की कोणाला मत द्यावं. पण हे मत असणाऱ्यांचा विरोध डावलून सर्व प्रौढ पुरुष नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. पुढे स्त्रियांनी नेटाने मागणी केल्यावर जेव्हा सर्व प्रौढ स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा कित्येक विचारवंत वगैरे मंडळींनी सुद्धा स्त्रियांना मतदान करू दिलं नाही पाहिजे कारण त्यांना राजकारणातलं काहीही कळत नाही असं मत मांडलं होतं. पण याही मताच्या चिरफाळ्या करत सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला. आणि अजूनतरी इंग्लंडमधली लोकशाही बुडली नाहीए. स्वातंत्र्य दिलं गेलं आणि त्या स्वातंत्र्यानेच त्यांना जबाबदार बनवलं. हे युरोपातल्या कित्येक देशात जे लागू होतं ते भारतात लागू होऊ शकत नाही असं नाही. स्वायत्तता दिल्यावर भारतात कित्येक ठिकाणी, ग्रामसभांच्या मार्फत ग्रामपंचायतींनी आपल्या गावांचा कायापालट करून दाखवण्याची किमया केली आहे. राळेगणसिद्धी, हिवरे बाजार ही त्यातलीच काही उदाहरणे. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की, स्वातंत्र्यापाठोपाठ जबाबदारी येते. आणि जबाबदारी पेलण्याच्या प्रक्रियेतून जबाबदार समाज!
जबाबदार आणि प्रगल्भ समाज जर आपल्याला उद्या हवा असेल तर त्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण व्हायला हवे. अगदी घरापासून, समाजातल्या सर्वात मूलभूत अशा कुटुंब व्यवस्थेत याची सुरुवात व्हायला हवी आहे. ‘चुकलास/चुकलीस तरी हरकत नाही, आम्ही तुझ्या सोबतच आहोत’ हा विश्वास लहान मुलांना आणि मग खरेतर कुठल्याही वयातल्या व्यक्तींना द्यायला हवा. याचा अर्थ चुकांवर पांघरून घालणे नव्हे. पण चूक सुधारण्याची संधी आवश्यक आहे. चूकच होऊ नये म्हणून जी अवजड बोजड घट्ट चौकट आपण समाजात उभी करतो आहोत त्याने उलट चुका लपवण्याचा प्रयत्न आणि त्यातून नवीन चुका असे गंभीर चक्र तयार होण्याची शक्यता निर्माण होते. चूक वर्तणूक म्हणजे चुकीचा मनुष्य नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय चूक काय बरोबर काय हे त्रिकालाबाधित सत्य (ultimate truth) असल्याच्या अविर्भावात न बघता प्रत्येक गोष्टीकडे कार्यकारणन्याय (the law of cause and effect) लावून बघण्याची गरज आहे.

माझे आई बाबा दररोज, व्यवसायाचा एक भाग असल्याने, असंख्य तरुण मुलामुलींशी बोलत असतात. त्यांच्या निरीक्षणानुसार अनेक मुलं मुली निर्णयक्षमतेत अत्यंत कमी पडतात. एखादा निर्णय घेण्याची कुवत (capacity) असूनही धमक (courage) मात्र दाखवण्यात पुढे नसतात. आणि यामागे सगळ्यात मोठा वाटा आहे, असं मला वाटतं, तो चुकण्याचा भीतीचा. चुकण्याचा भीतीपोटी निर्णय घेण्याची जबाबदारी टाळण्याकडे जर आपला कल होत असेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं. चुकण्याची भीती नसेल तर स्वतःहून घेतलेल्या निर्णयांची जबाबदारीही स्वतः घेण्याची धमक आपल्यात येईल. आणि मग माझ्या करिअरचा निर्णय वडिलांनी करावा, लग्नाचा निर्णय आईनी करावा, मुलांचा निर्णय बायकोने करावा असा पळपुटेपणा आपण दाखवणार नाही.
एखाद्या व्यक्तीला मनापासून वाटत असतं की मी अमुक अमुक क्षेत्रातच करिअर करावं. पण तो/ती हा निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही कारण त्याला/तिला चुकण्याची भीती घालण्यात पालकांपासून समाजातले सगळेच घटक आघाडीवर असतात. ‘त्यापेक्षा इंजिनियर झालास तर फटक्यात नोकरी मिळून सेटल पण होशील.’ असं म्हणल्याने आपण कुठेतरी आपल्याही नकळत आपण त्या व्यक्तीला कुबड्या देत असतो असं मला वाटतं. एक साचेबद्ध आयुष्य जगण्याचे बंधन निर्माण करत असतो. त्या व्यक्तीला दुबळे करत असतो. आणि मग अशाच व्यक्तींचा एक दुबळा समाज बनून आपण राहू लागतो. दुबळा समाज, दुबळा देश. दुर्बलता मनातून सुरु होते. आपल्या समाजातली मुलं मी शास्त्रज्ञ होतो असं म्हणत नाहीत. शिक्षण संपलं की स्वतःचा व्यवसाय सुरु करणार आहे आणि माझं ध्येय या देशातील पहिल्या दहातली कंपनी उभारणं हे आहे असंही म्हणणारेही विरळाच. एखाद्या मध्यमवर्गीय घरातली मुलगी मी स्टोन क्रशिंगचं युनिट मला उभारायचं आहे असं म्हणली तर पालकांचे डोळे पांढरे होतील.

साचेबद्ध आयुष्यावरून मला मी बघितलेली एक शॉर्ट फिल्म आठवली. त्या फिल्म वर मी एक लोकमत मध्ये लेखही लिहिला होता. आवर्जून वाचा आणि फिल्म पण बघा- ‘आयुष्याचे मैन्युएल’.

वेगळेपणाला मज्जाव हा केवळ समाजात टिकाव लागेल की नाही या भयापोटी होतो. आत्मविश्वास कमी असणे हे भितीमागचे मुख्य कारण. आणि मग या भीतीतून तयार होते ते निलाजरे भ्याड वर्तन. वर्षानुवर्षे गुंड मंडळी आपली पिळवणूक करत असले तरी त्यांच्याविरोधात ‘ब्र’ सुद्धा उच्चारायचे धाडस या समाजात निर्माण होत नाही. उलट निर्लज्जपणे आपल्या दुर्बलतेचे समर्थन करण्यात आपण धन्यता मानतो आणि मग बलात्कार झाला, बॉम्ब फुटले किंवा सरबजितसिंगची हत्या झाली की अश्रू गाळतो. सारे दुर्बलतेचेच अविष्कार. आपलं काहीतरी चुकेल या मानसिकतेने आपला समाज दुर्बल बनला आहे. आणि शेवटी काय हो, निसर्गाचा नियम आहे. दुर्बल प्राण्यांना नष्ट व्हावे लागेल. survival of the fittest!

हे टाळायचे असेल तर चुकण्याची परवानगी मिळायला हवी. कोणाकडून मिळेल ही परवानगी? प्रथम स्वतःकडून. मग कुटुंबाकडून आणि मग समाजाकडून. ही परवानगी घेताना आपल्याला याच समाजाचा भाग असल्याने अशीच चुकण्याची परवानगी इतरांनाही द्यावी लागेल. त्यांना सांभाळून घ्यावे लागेल. परस्पर विश्वास निर्माण करावा लागेल. मगच निर्भय वागण्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल.. निर्भया वगैरे नावे दिली तरीपण ते प्रतीकात्मक आहे हे लक्षात ठेवावं लागेल कारण त्याने निर्भय समाज निर्माण होणार नाहीए. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर चूक होणे मानवी आहे. चूक सुधारणे दैवी आहे. पण चुकण्याची परवानगीच नाकारणे हे राक्षसी आहे. आपण आधी राक्षसाचे मानव तर होऊया. मग देवमाणूस होण्याकडे वाटचाल करता येईल. प्रगल्भ आणि जबाबदार समाज बनता येईल. 

3 comments:

  1. फार आवश्यक वेगळा पैलू अत्यंत समर्पक रीतीने मांडला आहे.
    बिघडल्याशिवाय घडत नाही.पूल च्या भाषेत
    '' आम्ही बी घडलो तुम्ही बी घडणा '' हि प्रक्रिया समाजात सुरु झाली पाहिजे !

    ReplyDelete
  2. पोस्ट आवडली.

    1) "प्रत्येक जण घाबरलेला आहे. कशाला न कशाला. कोणी पालकांपासून ते राजकारणी लोकांना, कोणी पैसे न मिळण्याला, कोणी स्पर्धेत मागे पडण्याला, कोणी समाज आपल्याला नावं ठेवेल याला, कोणी बॉम्बस्फोटांना, कोणी स्वतःच्या अनारोग्याला, कोणी दुसऱ्याच्या गरिबीला, कोणी स्वतःच्या श्रीमंतीला, कोणी एकटेपणाला, तर कोणी गर्दीत हरवून जाण्याला, कोणी भावनांना तर कोणी थंडपणाला, कोणी सगळं विश्वच आपल्याविरुद्धच्या कट कारस्थानात गुंतले असल्याच्या समजुतीला... घाबरले आहेत सगळे कशाला न कशाला तरी. आणि म्हणूनच आपण एक प्रकारच्या पारतंत्र्यात आहोत अजूनही. भयमुक्त जीवन नसेल तर ते खरेखुरे स्वातंत्र्य आहे असे मानता येत नाही."
    यातल्या वाक्यावाक्याला सहमत. माझ्या मनात नेमके हे विचार येत असतात.

    2) "एखाद्या व्यक्तीला मनापासून वाटत असतं की मी अमुक अमुक क्षेत्रातच करिअर करावं. पण तो/ती हा निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही कारण त्याला/तिला चुकण्याची भीती घालण्यात पालकांपासून समाजातले सगळेच घटक आघाडीवर असतात."
    यासंबंधी खालचं वाक्य पटतं अगदी.
    The Fear of Failure is Often Worse than Failure Itself.

    3)थोडं विषयांतर होईल कदाचित. पण -
    'चुकण्याची परवानगी' हे मला लहान मुलांना वाढवतानाही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे असं वाटतं. जसं की आपण म्हणतो किंवा तज्ञ म्हणतात की मुलांच्यात आणि आई-वडिलांच्यात एक विश्वासाचे नाते पाहिजे म्हणजे मग ती मुलं स्वतःची काळजी/भीती/दडपण आई-वडिलांबरोबर शेअर करतील. पण यासाठी मूल अगदी लहान असल्यापासून आई-वडिलांना तसे प्रयत्न करायला हवेत एक विश्वासाचं नातं तयार करायला. म्हणजे काय तर लहान मुलांच्या लहान-सहान किंवा एखाद्या मोठ्या चुकीवर पालक कसे रिअ‍ॅक्ट होतात हे पहाणे रोचक आहे. आपण अशा पद्ध्तीने रिअ‍ॅक्ट झाल पाहिजे की मुलांपर्यंत या सगळ्या भावना पोहोचल्या पाहिजेत की,
    - तूझी चूक झाली आहे, पण ठीक आहे, असं होतं.
    - पुढच्या वेळेस असं करू नको, आणि आत्ता झालेली ही चूक अशी सुधार.
    - आणि आम्ही तुझ्या नेहमीच पाठिशी आहोत.

    हे कसं घडवून आणायचं ते प्रत्येक पालकानं विचार करून ठरवावं. पण याबद्दल या गोष्टी करता येतील,
    - लहान मुलांच्या चुकांवर नॉर्मली पालकांची प्रतिक्षिप्त क्रिया अशी असते ती म्हणजे मुलांशी आवाज चढवून बोलणे किंवा १ रट्टा देणे. पण मला वाटतं की लहान-सहान चुकांबद्द्ल 'हे तू वागलास/वागलीस ते मला आवडलं नाही. पूढच्या वेळेस असं करू नको असं समजावून सांगण' हे करावं. आणि झालेली चूक कशी सुधारावी ते समजावून सांगावे. मग ही चूक म्हणजे डब्यातून सांडलेले गहू का असेनात. मग ही चूक सूधारायला शिकवणे म्हणजे ते गहू मुलाला/मुलीला सोबत घेऊन गोळा करून ठेवणे हे करावे..

    कारण एखाद्याला चूकायची परवानगी देण्याबरोबरच, त्या व्यक्तिच्या मनात आपली चूक झाली आहे खरी आणि ती चूक आपण सूधारायला पाहिजे, त्यासाठी अमूक केले पाहिजे किंवा परत ही चूक आपल्याकडून होऊ नये यासाठी प्रयत्न आपण केले पाहिजेत याची जाणीव निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

    ReplyDelete
  3. खूप मस्त …आवडला …अनुराधा कुकनूर !!

    ReplyDelete