Friday, April 26, 2013

समानतेची ऐशीतैशी


दिल्ली आणि (आपल्या आदरणीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार) भारतात सर्वत्र होणाऱ्या बलात्कारांवर सध्या सातत्याने चर्चा घडत आहेत. स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना सेक्स ऑब्जेक्ट म्हणून कसं बघितलं जातं, समानता ही घरातून सुरु व्हायला पाहिजे वगैरे वगैरे.

स्वातंत्र्य, समानता हे शब्द नुसतेच लेख आणि भाषण करताना गोड मानून घ्यायची आपली खोड आहे असं वाटतं मला. मनापासून आपण हे मुळीच मानत नाही. आणि वागणुकीत तर हे अजिबातच नसतं. ‘तुमची समानता गेली खड्ड्यात.. मुली आणि मुलं यांच्यात फरक आहे आणि मी फरक करणार’ असं म्हणण्याचं धाडस सुद्धा आमच्या लोकांमध्ये नाही. धाडस नाही आणि स्वातंत्र्य आणि समानता याविषयी बुरसटलेल्या विचारांना सोडून द्यायची धमकही नाही अशा कोंडीत सापडलेले आपल्यातले बहुतांश लोक निव्वळ दिखाऊ बडबडवीर आहेत. एकुणात जे वैचारिक दारिद्र्य आपल्या समाजात आहे ते या दांभिकतेचाच परिपाक आहे. कुणाला काही खुलेपणाने बोलायची चोरी, कोणी काही मोकळेपणे वागू लागला की समाज त्यांना नावं ठेवणार. समाज म्हणजे कोणी तिसरे लोकं नाहीत. समाज म्हणजे आपणच. बलात्कार झाला की मुलगी कोणत्या कपड्यात होती, मित्राबरोबर असेल तर ती आणि मित्र काही चाळे तर करत नव्हते ना अशा शंका कुशंकांनी आमचे डोके व्यापले जाते हे ते वैचारिक दारिद्र्य. कारण कुठेतरी आपण अजूनही त्याच बुरसटलेल्या विचारांमध्ये जगतो आहोत की मुलींनी मर्यादाशील असावे. कसल्या मर्यादा? काय मर्यादा? कोणी ठरवायच्या या मर्यादा? खाप पंचायत ठरवणार होय मर्यादा?
विवाहपूर्व शारीरिक संबंध असणे ही मुळातच ‘एक भयानक गोष्ट’ या नजरेने बघायची भंपक प्रथा आपल्याकडे आहे. त्यातही मुलाला फारसा दोष दिला जात नाही. पण मुलीने असे काही केले असल्यास अचानक ती मुलगी एक चारित्र्यहीन आणि कधीकधी तर चक्क बाजारू आहे असे मानण्यापर्यंत आपली मजल जाते. चारित्र्याच्या बाष्कळ कल्पनांच्या आधारावर जेव्हा भेदभाव करायला सुरुवात होते तेव्हा समाजात विकृतीला सुरुवात होणारच. किंबहुना कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता परंपरा आणि संस्कृतीच्या नावे एखादी गोष्ट करत बसलो, त्यातही विशेषतः ती लैंगिक प्रेरणेसारख्या अत्यंत नैसर्गिक बाबतीत स्वतःला दामटवण्याचा प्रयत्न करत राहिलो की विकृतीला सुरुवात होणार. मग कधी ती बलात्कार करून खून करण्याच्या पातळीपर्यंत गंभीर होणार तर कधी दुरूनच का होईना पण प्रत्येक स्त्रीकडे सेक्स ऑब्जेक्ट या नजरेने बघणे या पातळीपर्यंत जाणार. या सगळ्याला, तज्ञ मंडळी म्हणतात तशा टीव्ही वरच्या जाहिराती वगैरे असतील कदाचित जबाबदार (मला हे फारसे पटत नाही, पण सध्या असे मानूया की ते म्हणतात तसे आहे!), पण त्यांच्यापेक्षाही जर काही जबाबदार असेल तर ती आहे कुटुंब व्यवस्थेतली असमानता. मुलाला आणि मुलीला समान वागवणं म्हणजे हवं ते शिकू देणं आणि प्रॉपर्टी मध्ये समान वाटा देणं इतकं मर्यादित आहे असं वाटत नाही मला. मुलींनाही मुलाइतके ‘स्वतांत्र्य’ असल्याशिवाय समानता आहे असे मानता येणार नाही. स्वातंत्र्य म्हणजे खरेखुरे स्वातंत्र्य. दिखाऊपणा नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, स्वतःच्या आयुष्याचे काय करायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य.
आज मी एक मुलगा म्हणून मला हवं त्या वेळी घरी येतो, रात्री उशीराही. हवं तेव्हा हवं त्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे राहायला जाऊ शकतो. पण बहुतांश मुलींना, माझ्या आजुबाजुच्याच मुलींना, हे स्वातंत्र्य नाही. आजच्या असुरक्षित वातावरणात पालकांकडून मिळणारं स्वातंत्र्य केवळ काळजीपोटी कमी होणे समजण्यासारखे आहे. पण डोक्यात मागे कुठेतरी ‘चांगल्या घरातल्या मुली उशिरापर्यंत बाहेर रहात नाहीत’ असा विचार नसतो असे म्हणता येणार नाही. अशाने मग मुलींचे घरी खोटे बोलणे सुरु झाले तर आश्चर्य वाटायला नको. माझ्या ओळखीतली एक मुलगी सातत्याने घरी खोटे सांगून इकडे तिकडे जात असते. यात मला तरी तिच्या पालकांचा सपशेल पराभव दिसतो की, तिच्या घरी ती मोकळेपणाने आणि ठामपणाने ती कुठे जात आहे हे सांगू शकेल असे वातावरणच नाही. स्मगल करून आणलेल्या वस्तूंना जशी वॉरन्टी नसते तशीच एखादी व्यक्ती चोरून जर एखादी गोष्ट करत असेल तर ती योग्य आहे की अयोग्य हे सांगता येऊ शकत नाही. अयोग्य असले वागणे तरी ते सुधारण्याची शक्यताच नसते कारण चोरून केल्याने कोणाला त्याचा थांगपत्ताच लागत नाही. जिथे मुळात चूक आहे हेच माहित नाही तिथे ते सुधारणार कसे? घरात मोकळे वातावरण, संवाद आणि परस्पर विश्वास नसेल तर लपवाछपवी होणार. आणि कुटुंबात पारदर्शकता नसणं हे काही बरं लक्षण नव्हे.
मुलींना समान वागणूक देण्यासाठी मुळात त्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे, आणि स्वतःच्या बळावर स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या मुलींकडे आदराने बघितले गेले पाहिजे. नाहीतर समानतेच्या गप्पा मारणारा दांभिक आणि विकृत असा समाज बनून राहू आपण...

2 comments: