Thursday, September 27, 2012

‘सोय’वाद...!


गांधीवाद, मार्क्सवाद, माओवाद, हिंदुत्ववाद, समाजवाद, भांडवलवाद, यंव वाद अन् त्यंव वाद... अशा असंख्य वादांची, विचारसरणींची नावे आपण ऐकत असतो, वाचत असतो अभ्यासत असतो, अनेक जण ती आत्मसात सुद्धा करतात, काहीजण पुढे जाऊन त्याच्यात भर घालतात, प्रसार करतात. एकूणच अनेकदा आपले जीवन हे ठराविक विचारसरणीला बांधून आपण जगत असतो.
माझ्या कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी भेटायची संधी मिळत असते. अनेकांशी चर्चा होत असतात. आणि या सगळ्यातून राहून राहून जे जाणवतं ते हे की विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी असणारे फारच अल्प लोक आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके. बाकी लोक आपल्या सोयीनुसार, परिस्थितीनुसार हवी ती टोपी घालणारे- ‘सोय’वादी...

झोपडपट्टी नको हा मध्यमवर्गीय विचार तर आहे, पण मग त्या झोपडपट्टीतल्या लोकांनी जायचं कुठे असा समाजवादी विचारही आहे. एका बाजूला मॉल्स आणि झगमगाट हवा आहे, दुसऱ्या बाजूला बोलण्यात बाजारपेठेच्या वर्चस्वाला विरोधही आहे. एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भरभरून बोलणे आहे पण दुसऱ्याच बाजूला धर्म-व्यक्ती-श्रद्धा याबद्दल कोणी काही बोलल्यावर मारायला सरसावणारेही हेच लोक आहेत. एका बाजूला समोरच्याने आपली मते अपरिवर्तनीय ठेवावीत असा अट्टाहास आहे तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या भूमिका एकाच दिवसात चार वेळा बदलण्याची विलक्षण हातोटीही आहे. एका बाजूला स्वतःच्या गोष्टी, लफडी लपवण्यासाठी आटापिटा चाललाय, तर दुसऱ्या बाजूला जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक लफड्यांची माहिती मिळवण्यासाठी गुगल-फेसबुक आणि न्यूज चैनेल्स वर तासन तास घालवण्यात येतायत. एका बाजूला जातीभेद दूर ठेवायचा विचार आहे पण लग्न करताना मात्र पोटजातसुद्धा चालत नाही. बायको एकदम स्मार्ट करिअरिस्ट हवी पण तिने नवऱ्याच्या भोवती भोवती फिरावं, स्वयंपाक करावा अशा अपेक्षाही आहेत. पोराने वर्गात पाहिलं यावं अशी अपेक्षा आहे पण वक्तृत्व आणि टेबलटेनिस च्या स्पर्धा जिंकाव्यात अशी मनापासून मागणी आहे. सिस्टीम बिघडलीये आणि ती सुधारण्यासाठी आपल्यालाच हात पाय हलवायला लागणार आहेत हे कळूनही निष्क्रीय राहण्यात आनंद मिळवण्यात येतोय. फर्ड्या इंग्लिशमध्ये, एसी हॉलमध्ये उभं राहून पर्यावरण वाचवण्यावर भाषण द्यायचंय, पण त्याच कार्यक्रमात ‘मिनरल वॉटर’ची प्लास्टिक बाटली प्रत्येक वक्त्याच्या पुढ्यात ठेवलेली हवी आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून सगळ्या बाबतीत आपल्याला विचारलं जावं, आपला सल्ला घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे, पण जबाबदारी घेण्याची मात्र तयारी नाही. हक्क हवे आहेत, कर्तव्ये विसरायची आहेत. पोरांना टिळकांच्या आणि झाशीच्या राणीच्या बहादुरीच्या गोष्टी सांगायच्या आहेत पण त्यांनी काहीतरी वेगळे करायचा विचारही करायला बंदी आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद हवा आहे, पण गोमांस खाल्ल्याने काहीही होत नाही हे त्यांचं मत मात्र विचारात घेतलं जात नाही. हातात आय फोन-५ घ्यायचाय पण त्यावर ज्योतिषाचे अप्लिकेशन डाउनलोड करायचेय. वेडगळ अंधश्रद्धांमुळे बळी वगैरे देणाऱ्या खेडूत माणसाला तुच्छ लेखायचं पण कुठल्यातरी थोतांड बाबाचा अंगारा लावल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाहीये. फिरंगी टीव्ही सिरीयल मधले कमरेखालचे विनोद प्रचंड आनंद घेत बघायचे मात्र आपल्या सिरीयल मधल्या सुनेने टिकली लावलेली नसेल तर चालत नाही. इतिहासातल्या सोयीच्या गोष्टी तेवढ्या घ्यायच्या, गैरसोयीचा मजकूर सांगायचाच नाही. एका बाजूला लोकशाहीला शिव्या घालायच्या आणि हुकुमशाहीच हवी वगैरे बडबड करायची पण या बडबडीचे स्वातंत्र्य लोकशाही मुळेच मिळाले आहे हे सत्य स्वीकारायचे नाही. सत्यमेव जयते म्हणायचं पण सातत्याने स्वतःच्याच खऱ्या इच्छांना-विचारांना दाबून टाकून ‘असे काही नव्हतेच’ असे छान खोटे हसू चेहऱ्यावर आणत सांगायचे.
बरं या सगळ्यामध्ये तडजोडीचा सुवर्णमध्य गाठायचा प्रयत्न आहे असेही नाही. एकदा या टोकाला जायचंय तर दुसऱ्या वेळी दुसऱ्याचं टोकाला- सारे सोयीनुसार! हाच तो ‘सोय’वाद (conveniencism)..!

कदाचित मीही एक सोयवादी...!!

1 comment: