Thursday, April 14, 2011

सुपरहिरोच्या प्रतीक्षेत...


सुशिक्षित मध्यमवर्गीय मंडळी गेल्या काही दिवसात प्रथमच रस्त्यावर उतरताना दिसली... भ्रष्टाचार विरोधी कायद्यासाठी...! जन लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आणि भारतातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले..अण्णांना पाठींबा देण्यासाठी...! यामध्ये तरुण वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाला होता... तरुण मंडळींचा जोश, उत्साह, नवनवीन कल्पक घोषणा आणि प्रचंड उर्जा यामुळे मोर्चा, पथनाट्य वगैरे गोष्टी बहारदार झाल्या... टीव्ही वाले सरसावले, आणि दिल्ली, मुंबई, बेंगलुरू, चेन्नई, कोलकता, पुणे सगळीकडेच अण्णांच्या आंदोलनाला टीव्ही वाल्यांनी कव्हर केले... आणि मग चोवीस तास तेच तेच परत परत दाखवले... वातावरण अगदी भारून गेल्यासारखे झाले होते... क्रांती आता उद्यावर येऊन ठेपल्यासारखे लोक उत्साहात होते. भ्रष्टाचार लगेच संपणार आणि भारत महासत्ता बनणार या स्वप्नात प्रत्येक जण मश्गुल होता. अखेर आय पी एल सुरु होण्याच्या सुमारासच सरकारने अण्णांच्या मागण्या मान्य करून टीव्ही वाल्यांना मोठाच दिलासा दिला. आता टीव्ही वाले आय पी एल च्याही बातम्या दाखवू शकणार होते..! अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या तसे "जनतेचा विजय झाला" या समाधानात मध्यमवर्गीय लोक आपापल्या सुरक्षा कवचात परतू लागले... 

मला मात्र काहीतरी खटकत होते... खटकत आहे.. 
जन लोकपाल विधेयकाचा मसुदा सुमारे चाळीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा संसदेसमोर आला. देशातील भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी एक स्वतंत्र कायदेशीर यंत्रणा असावी या उद्देशाने हे विधेयक आले. आणि वारंवार हे विधेयक संसदेत पारित होऊ शकले नाही. आता पुन्हा नव्याने अण्णा हजारे यांनी या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. आणि याच मसुद्यासाठी अण्णांचे युद्ध सुरु आहे. 
जे हजारो लोक 'भ्रष्टाचार विरोधी भारत' असं म्हणत अण्णांना पाठींबा देण्यासाठी पुढे आले, रस्त्यावर उतरले, घोषणा दिल्या, त्यापैकी खरोखरच किती लोकांना जन लोकपाल विधेयकाबद्दल सविस्तर माहिती होती?? विधेयकाचा सरकारी मसुदा आणि अण्णांचा मसुदा किती लोकांनी संपूर्ण वाचला होता?? माझ्या मते ९०% लोकांना जन लोकपाल विधेयक नेमके काय आहे याची काडीमात्र कल्पना नव्हती... भ्रष्टाचार नष्ट व्हावा आणि आपण फारसे काही न करता अण्णा किंवा लोकपाल नामक एखादा सुपरहिरो हे काम करेल अशा भ्रामक समजुतीतून अनेक जण या आंदोलनामध्ये आले होते. 
मागच्या रविवारी, "सकाळ"च्या सप्तरंग पुरवणीमध्ये सचिन कुंडलकरचा एक लेख आला होता. त्यामध्ये सिनेमावर सामाजिक संस्कार करायची जबाबदारी टाकण्यावर त्याने टीका केली होती. "सिनेमा हे कथा सांगण्याचे माध्यम असून संदेश देण्याचे नव्हे... लोकांना सिनेमातून परस्पर समाज सुधारला तर हवे आहे. स्वतःहून काही करायची इच्छा नाही.." लेखातला हा भाग मला तंतोतंत पटला... सिनेमामधून जसा सामाजिक संदेश वगैरे दिला जावा आणि देश सुधारावा अशी फुटकळ आणि बिनडोक समजूत जी मंडळी करून घेतात त्यांनाच लोकपाल नामक सुपर हिरोचे नको इतके आकर्षण आहे असे माझ्या लक्षात आले आहे. एकदा लोकपाल आला की परस्पर भ्रष्टाचार संपून जाईल आणि मला काही करायची गरज नाही या अत्यंत पळपुट्या विचारसरणीचा हा परिणाम आहे. बरेच लोक हे फिल्मी जगात आहेत. फिल्म्स मध्ये जसा एक हिरो पूर्ण देशाला बदलवून टाकतो, भ्रष्टाचार नष्ट करतो तसा हा लोकपाल आता करणार आहे या विचाराने सगळे बेहोष झाले आहेत...आणि यामुळेच कुठेतरी वास्तवतेचे भान पूर्णपणे सुटलेले आहे असे माझे ठाम मत आहे. 
संपूर्ण आंदोलनामध्ये मोर्चांमध्ये राजकीय पक्ष आणि नेते याबद्दल पराकोटीचा तिरस्कार दिसून येत होता.. आणि या सगळ्यांना 'वठणीवर' आणायचा प्रयत्न म्हणून या लोकपाल कडे लोक पाहत असल्याचा मला (धक्कादायक) अनुभव आला. वास्तविक पाहता जो मध्यमवर्गीय समाज या आंदोलनाच्या वेळी रस्त्यावर आला होता त्यापैकी नेमाने मतदान करणारे फारच थोडे असतील. देशात आज जेमतेम ५०% लोक मतदानाला घराबाहेर पडतात. संसदेत बसणारे आपले प्रतिनिधी आणि आपले सरकार निवडण्यासाठी जे ५०% लोक घराबाहेरही पडत नाहीत ते राजकारण्यांवर टीका करत, त्यांना शिव्या घालत या आंदोलनात सामील झाले. खरे तर कलमाडी किंवा ए राजाच्या भ्रष्टाचारावर बडबड करणाऱ्या मूर्ख मध्यमवर्गीय मंडळींनी मतदान न करूनच या लोकांना निवडून दिले आहे ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी राजकारणी मंडळींना शिव्या घालायचा अधिकार यांना दिला कोणी? आणि ज्या मंडळींनी मतदान केले असेल त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचे कष्ट कधी घेतले आहेत का? साध्या आपल्या नगरसेवकालाही आपण कधी प्रश्न विचारले आहेत काय?? केवळ लोकपाल आला म्हणजे सगळे प्रश्न सुटतील असल्या कविकल्पनांमध्ये राहणे बंद करा... परिवर्तन हवे असेल तर आपण कंबर कसून आणि बाह्या सरसावून काम करायची गरज आहे. लोकपाल असेल तर आपले काम सोपे होईल इतकंच. आणि म्हणूनच लोकपाल आंदोलनाला माझा विरोध नाही. माझा विरोध आहे तो लोकपाल ला सुपरहिरो मानून स्वतः काहीही न करण्याच्या वृत्तीचा..इतकेच नव्हे तर लोकांना सुपरहिरो हवा आहे तो सगळ्या गोष्टी "तत्काळ' करण्यासाठी..सगळ्या गोष्टी ताबडतोब हव्या आहेत.. असे कसे होईल? गेली ६० वर्ष जो कचरा झाला आहे तो एका दिवसात कसा साफ होईल...?? हजारो लोकांनी जे गेल्या साठ वर्षात करून ठेवले आहे ते निस्तरायला लाखो लोकांचे एकाच दिशेने निदान काही वर्ष तरी प्रयत्न लागतील.. जे काही करायचे आहे ते आपण करायचे आहे. कोणीतरी बाहेरून येईल आणि आणि सगळं काही सुधारेल ही अपेक्षाच मुळी लोकशाही विरोधी आहे. लोकशाही म्हणजे 'लोकांची लोकांसाठी लोकांनी तयार केलेली शासनव्यवस्था'... मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे.. आणि म्हणूनच जर कोणी सुपरहिरो ची वाट बघत निष्क्रियपणे बसला असेल तर तो माझ्या दृष्टीने महामूर्ख असेल... 

लोकपाल विधेयकाचे जे होईल ते होईल...

पण परिवर्तनाचे काम तुम्हाला आम्हालाच करावे लागणार आहे. मी घरात बसून इंटरनेट वर अण्णा हजारे या पेजला 'लाईक' केले की माझे काम संपले असल्या भंपक विचारात कोणी राहू नये.. अण्णा हजारेंनीच आपल्याला माहिती अधिकार कायद्याचे शस्त्र दिले आहे. त्याचा वापर करत, संघटीत होऊन काम केले तरच यश मिळेल. लोकशाहीत राजकारण किंवा राजकारणी मंडळी आणि समाज यांच्यात फरक असू शकत नाही. त्यामुळे राजकारणात पडूनच राजकारण सुधारता येऊ शकते ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात घ्यावी. मानो या ना मानो, राजकारण अथवा राजकारणी लोकांना टाळून कोणी सुधारणा करू म्हणलं तर ते लोकशाही देशात सर्वस्वी अशक्य आहे.

अधिक व्यापक आणि सहभागी लोकशाही साठी, संपूर्ण पारदर्शकतेसाठी, व्यक्तीस्वातंत्र्यासाठी, प्रगल्भ समाजासाठी, सामाजिक न्यायासाठी, भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर कार्य करायची गरज आहे... तसे जर आपण करू लागलो तर आपल्यातला प्रत्येक जण सुपरहिरो ठरेल.. आणि कुठल्यातरी स्वप्नवत सुपरहिरोची गरजच आपल्याला उरणार नाही...!!!

Saturday, March 26, 2011

संधी चालून आली आहे... तुटून पडा....


फेब्रुवारी २०१२ मधल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकांसमोर येण्यासाठी लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी राजकारणी मंडळी फेसबुक वर येऊ लागली आहेत... असंख्य नगरसेवक नुकतेच फेसबुक वर आले आहेत. 'मनसे' त्यामानाने खूप आधीपासून इथे आहे. अगदी ऑर्कुट जेव्हा जोशात होते तेव्हाही मनसे बर्यापैकी नजरेसमोर असायचे. पण आता सगळ्याच पक्षाची मंडळी फेसबुक सारख्या खुल्या जागेवर येऊ लागली आहेत. यातले धोके अजून त्यांच्या लक्षात आले नाहीएत. आणि हे लोकांसमोर येणे धोक्याचे आहे हे लक्षात आल्यावर ही मंडळी इथून गायब होतील याबद्दल मला जराही शंका नाही.  
फेसबुक सारख्या खुल्या व्यासपीठावर येणाऱ्या या राजकारण्यांना आता आपल्या मनातले प्रश्न विचारून भंडावून सोडूयात... त्यांना जाब विचारूया... असंख्य गोष्टींचा... पुण्यात गेल्या पाच वर्षात न झालेल्या विकासाबद्दलचा जाब... पुतळा वगैरे सारख्या भावनिक गोष्टींचा मुद्दा करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना जाब विचारूया... पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था का सुधारू शकले नाहीत?? वाट्टेल तेव्हा सत्तेसाठी वाट्टेल त्या पक्षाबरोबर युत्या करत पॅटर्न बनवणाऱ्या लोकांना आपण जाब विचारायला नको? गल्ली बोळांमध्ये नगरसेवक निधी वाट्टेल तसा वापरत सिमेंटचे रस्ते करणाऱ्या नगरसेवकांना पुणेकरांचे पैसे वर आलेत का हा प्रश्न आपण विचारायला नको? निरुद्योगी लोकांना फुटपाथ वरची जागा अडवून बसायला बाकडी टाकण्यात आणि आधीच चालू अवस्थेत असलेले रस्त्यावरच्या दिव्यांचे खांब उखडून तिथेच परत नवीन खांब लावण्यात आपल्या नगरसेवकांनी किती पैसा पाण्यात घातला हे आपण विचारायला नको? आपले नगरसेवक कोणत्याही प्रश्नावर सखोल आणि अभ्यासपूर्ण भूमिका का मांडत नाहीत??? आपल्या नगरसेवकांची ऑफिसेस / संपर्क कार्यालये फुटपाथवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलेली का असतात??? आणि ज्यांची नसतात ते अशा लोकांविरुद्ध आवाज का नाही उठवत??? गावागावांमध्ये महिला एकत्र येऊन दारूचे गुत्ते बंद करत असताना एकाही नगरसेवकाला आपला वॉर्ड व्यसनमुक्त असावा असे वाटत नाही?? आपल्या वॉर्ड मधला कचरा उरुळीला कचरा डेपो मध्ये जाणार नाही तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही असा निश्चय गेल्या पाच वर्षात किती नगरसेवकांनी केला? आणि किती नगरसेवकांनी त्यासाठी यशस्वी प्रयत्न केला? आपल्या वॉर्ड मध्ये आपण होऊन वॉर्ड सभा घेत जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न किती नगरसेवकांनी केला? आपल्या वॉर्ड मध्ये एकही अनधिकृत हातगाडी/टपरी असणार नाही असे ठरवून तसे कर्तृत्व कोणत्या नगरसेवकाने घडवले आहे??? आपल्या वॉर्ड मध्ये एखादे रस्त्याचे वगैरे काम सुरु झाल्यावर किती नगरसेवकांनी माहिती अधिकार कायद्यानुसार कामाच्या सर्व माहितीचे तपशील कामाच्या जागी दर्शनी भागात लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत??? आपल्या नगरसेवकांची महापालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थिती किती...??? 

प्रश्न विचारून भंडावून सोड्यात...!!! 
असे कितीतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत... ते विचारूया इथेच खुले आम.... त्यावर त्यांना जाब विचारुयात... एक नागरिक म्हणून या मंडळींना जाब विचारणे आपले कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला फेसबुक वर बसल्या बसल्या काही मिनिटांचा वेळ द्यावा लागणार आहे.. एवढेही करायची ज्याची तयारी नाही, तो या समाजव्यवस्थेचा, लोकशाहीचा आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू असेल.. स्वतःच्या आयुष्यात गुरफटून जाण्यात काहीही भूषण नाही... आज तुम्हाला आम्हाला फेसबुक मुळे या राजकारण्यांना जाब विचारायची संधी मिळाली आहे... ठरवले तर या संधीचे सोने करायची ताकद आपल्यामध्ये...सामान्य जनतेमध्ये आहे... प्रश्न हाच आहे की तुम्ही आम्ही ही संधी वाया घालवणार की या संधीचे सोने करणार...??? 

Thursday, March 17, 2011

हे चालणार नाही...!!!

परवाच पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो. तिथे फॉर्म सबमिशन ची एक भली मोठी रांग होती.. लोक सकाळपासून येऊन त्या वाढत्या उन्हात उभे होते. त्या लोकांमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न स्तरातले लोक सुद्धा होते. एखाद दुसरे उच्च आर्थिक स्तरातले कुटुंब गॉगल लावून उभे होते... एकूणच रांगेची शिस्त सगळ्यांना पाळावी लागत होती. आणि सगळेच 'समान' होऊन गपचूप रांगेत उभे होते. फरक असला तर फक्त कपड्यांमध्ये होता. उन्हाचा त्रास, सरकारी कामामुळे आलेली असहायता, फुकट जाणारा वेळ यामुळे सगळेच त्रस्त झाले होते.. 
तेवढ्यात एक माणूस मोबाईलवर बोलत बोलत रांगेच्या बाजूने पुढे आला. तिथे पोचताच त्याने फोन बंद केला आणि तिथे उभ्या सिक्युरिटी गार्डला एक व्हिजिटिंग कार्ड दिले आणि अमुक अमुक अधिकाऱ्याला दाखव असे फर्मावले. एकूणच त्या माणसाचा अविर्भाव, उच्चभ्रू कपडे यामुळे सिक्युरिटी गार्ड निमुटपणे आत गेला. पाचच मिनिटात तो बाहेर आला आणि त्याने त्या माणसाला थेट आत सोडले. सगळ्यांच्या समोरच हे घडले.. आपण इथे तासन तास उभं राहायचं आणि हे लोक मात्र वशिला लावून पुढे जाणार याला काय अर्थ आहे असे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उमटले. 
मध्ये थोडा वेळ गेला. एक पन्नाशीच्या बाई, पांढरे केस, बॉब कट केलेला, सोन्याच्या काड्यांचा चष्मा आणि एका कानाला लावलेला Black Berry!! भांबावल्यासारखी ती बाई इकडे तिकडे बघत फिरत होती. फिरता फिरता इंग्लिश मध्ये फोन वर बोलत होती. "सिक्युरिटी,सिक्युरिटी, प्लीज टेक धिस फोन. लो, बात करो.." असं म्हणत ती बाई रांगेच्या सगळ्यात पुढे उभ्या सिक्युरिटी गार्डपाशी आली. त्याने तो फोन हातात घेतला. एवढा महागडा फोन आयुष्यात पहिल्यांदाच हातात धरून मनोमन सुखावला असेल तो..!! त्या गार्ड ला फोन वर काहीतरी सांगण्यात आले. आणि त्याने त्या बाईंना आत सोडले. पुन्हा एकदा सर्वांसमक्ष घडलेला प्रसंग... आता मात्र लोक भडकले. ऊन वाढले होते, लोक आधीच वैतागले होते. २-३ जण उसळून पुढे आले आणि सिक्युरिटी गार्डशी भांडू लागले. "ऑफिसरला बोलवा, ही काय पद्धत झाली? ही लोकशाही आहे..." "वशिलेबाजी कसली चालवली आहे इथे??" "हे चालणार नाही...!" या २-३ लोकांना ताबडतोब रांगेतल्या सगळ्यांचाच पाठींबा मिळाला. त्यांच्या मनातलेच तर बोलले जात होते. आपल्यावर काहीसा अन्याय झाल्याची भावना सगळ्यांचीच होती... "हे चालणार नाही..." असं म्हणत एक काका पुढे झाले. आणि सिक्युरिटी गार्ड वर नजर ठेवू लागले, अजून एक दोन जण पण त्यांच्याबरोबर नजर ठेवायला उभे राहिले.. पुढच्या तासा दोन तासात काही लोक ओळख सांगून वगैरे आत जायचा प्रयत्न करू लागले. पण गार्ड ने त्यांना आत सोडले नाही. आपल्यावर नजर ठेवणाऱ्या लोकांची त्या गार्डला भीती वाटली.. आणि बघता बघता सगळे सुरळीत होत लोक रांगेने एक एक करत आत गेले कोणीही मध्ये घुसले नाही कोणाला घुसू दिले गेले नाही...!!!!

असे शेकडो प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात. अगदी कॉलेज ची फी भरतानाही कोणी मध्ये घुसला तर मागचे लोक आरडा ओरडा करतात. हीच गोष्ट सगळीकडे घडते. "हे चालणार नाही" असं म्हणत जेव्हा लोक जागरूक होतात तेव्हा राज्यकर्त्यांना झुकावेच लागते... आज खरोखरच सरकार वर नजर ठेवायची गरज आहे. त्या काकांप्रमाणे प्रत्येक जागरूक नागरिकाने हे काम करायला हवं. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे शास्त्र आपल्याकडे आहे. एकदा का नागरिकांची सगळ्या गोष्टींवर बारकाईने नजर आहे हे सरकारला जाणवू लागले की अपप्रवृत्ती, अकार्यक्षमता, गैरकारभार, भ्रष्टाचार या सगळ्याला आळा बसेल... वरच्या उदाहरणात जसे मी तासन तास उभा आहे आणि कोणीतरी पुढे येऊन घुसतो आहे आणि सरळ आत जातो आहे या मुळे जी अन्यायाची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तीच भावना आपलाच कर रूपाने दिलेला पैसा राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी खिशात घालताना पाहून निर्माण व्हायला हवी. किंबहुना ती अधिक गंभीर आणि अधिक आक्रमक असली पाहिजे. कारण प्रश्न केवळ अन्यायाचा नसून कष्ट करून घाम गाळून आपण कमावलेल्या पैशाचा आहे...
ज्या दिवशी "हे चालणार नाही" असं म्हणत सरकारवर नजर ठेवायला पुढे येतील त्या दिवशी प्रशासन पातळीवरच्या व्यापक परिवर्तनाची सुरुवात होईल... माहिती अधिकाराबाबत जागरूकता,प्रसार आणि परिणामकारक वापर या तीन गोष्टींनी हे साध्य करणे शक्य आहे...

Saturday, February 26, 2011

म्हणून...

'परिवर्तन' कशासाठी?
कोणीतरी विचारले -

हम दो हमारे दो,
चौकोनी कुटुंब
चौकटीतच राहिले,
म्हणून...

'आपण सामान्य' म्हणत
गुंड, पुंड, झुंडीला
घाबरले,
म्हणून...

राजकारण नको
म्हणणारे वाढले,
राजकारण करू
म्हणणारे 'काढले',
म्हणून...

'चलता है'
म्हणणारे वाढले,
'नहीं चलेगा'
म्हणणाऱ्यांना मारले,
म्हणून...

'खाणे' अगदी
नित्यनेमाचे झाले,
निमित्त काढून 'पिणे'
रोजचेच झाले.
खाण्यासाठी 'नोटा'
पिण्यासाठी 'धान्य'
सारे सोयीचे झाले,
म्हणून...

टू जी - थ्री जी
राष्ट्रकुल-बिष्ट्रकुल
'खेळ' केले,
म्हणून...

बदला म्हणून
बदल्या झाल्या,
इमानी लोक
शून्य उरले,
म्हणून...

वेळेला चहा लागतो,
वेळ साधण्यासाठी 'चहा पाणी'
सवयीचे झाले,
म्हणून...

इतिहास खोडून
नवा लिहिला,
भविष्यकाळ नव्याने
जुनाच लिहिला,
म्हणून...

'भाऊ' 'आबा'
'दादा' 'बाबा'
या सगळ्यांवर 'साहेब'
उदंड झाले,
म्हणून...

लढतो म्हणणारा
ठार झाला
उघडकीस आणणारा
गायब झाला
तरी सगळे गप्पच बसले,
बाकी जाऊ द्या हो, पण
षंढ थंड लोक पाहून
डोकेच फिरले,
म्हणून...

तन्मय कानिटकर
२५/०२/२०१०

Monday, February 14, 2011

लोकशाहीची भिंत...

चीनच्या राजधानीमध्ये बीजिंगमध्ये त्याननमेन चौकात एका बाजूला पोस्ट ऑफिस आहे. त्याची मोठीच्या मोठी भिंत त्यानानमेन चौकाला लागूनच आहे. १९७९ साली अचानक या भिंतीला विलक्षण महत्व आले.... असंख्य लोक या भिंतीवर येऊन पोस्टर्स चिकटवू लागले.. चित्र काढू लागले संदेश लिहू लागले... कम्युनिस्ट राजवटीत दबल्या गेलेल्या सर्जनशीलतेला मुक्त द्वार मिळाल्याप्रमाणे लोक या भिंतीवर आपल्या मनातल्या गोष्टी लिहू लागले... चीन सारख्या कट्टर कम्युनिस्ट देशातले लोक या भिंतीवर उघडपणे लोकशाहीची मागणी करू लागले. एक दिवस एक पोस्टर झळकले त्यात खुद्द चेअरमन माओंवर टीका केलेली होती. मग तशा आशयाची असंख्य पत्रके या भिंतीवर दिसली. माओ यांच्या अपरोक्ष त्यांची पत्नी जियांग हिने केलेल्या अत्याचारांचा निषेध केला जाऊ लागला. रोज शेकडो नवीन पोस्टर्स! एक दिवस एका विद्यार्थ्याने याच भिंतीवर आठ कलमी मागणीपत्र लावले. बहुपक्षीय शासनपद्धती, खुल्या निवडणुका, लोकप्रतिनिधींचे सरकार, भक्कम न्यायव्यवस्था, वृत्तपत्रीय स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचाराचा बिमोड, नागरिक म्हणून मूलभूत अधिकार इत्यादी गोष्टी या मागणीपत्रात अंतर्भूत होत्या.  मग त्या पाठोपाठ असंख्य लोकांनी आपापली मते नोंदवली. लोकशाहीच्या बाजूने कौल दिला. असंख्य चित्रे, व्यंगचित्रे या भिंतीवर येऊ लागली. भ्रष्ट आणि गुन्हेगार अशा लोकांना शिक्षा करण्याची मागणी करणारी शेकडो हजारो भित्तीपत्रके या भिंतीवर लागली. कम्युनिस्ट चीनचा संस्थापक असलेल्या माओवर टीका होणारी पत्रके लागताच बीबीसी आणि अमेरिकन वार्ताहरांनी ही खबर जगभर पसरवली. आणि याच पाश्चात्य वार्ताहरांनी त्यानानमेन चौकातील या भिंतीला नाव दिले "लोकशाहीची भिंत!".... लोकांचा क्षोभ उफाळून आला होता, त्यांनी अपली मते या भिंतीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवली. पुढे पुढे तर आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करायची ही कल्पना चीनी लोकांना इतकी आवडली की चीन मधल्या सगळ्या शहरांमध्ये गावोगावी अशा प्रकारच्या असंख्य लोकशाहीच्या भिंती उभ्या राहू लागल्या. लोक त्यावर लोकशाही, खुल्या निवडणुकांची मागणी करू लागले. कम्युनिस्ट सरकारने अगदी स्त्री पुरुष संबंधांबाबतही काही वेडगळ कायदे करून ठेवले होते. त्यावर हल्ला होणारीही पत्रके या भिंतींवर झळकू लागली. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुनरुच्चार करत या लोकशाहीच्या भिंतीने चीनी कम्युनिस्ट पक्षाला हादरवून सोडले. अखेर एक दिवस लष्कराला हुकुम सुटले आणि लष्कराने लोकशाहीच्या सर्व भिंती साफ केल्या. त्यावर लिहिणाऱ्या लोकांना  कैद केले. दडपशाहीचा वरवंटा सर्वत्र फिरवला. पण लोकशाहीच्या भिंतीने सरकारच्या मनात आता आपल्या हातातून सत्ता जातीये की काय अशी धडकी भरवली..!!!

सुमारे ३२ वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीच्या भिंतीने कमाल घडवून आणली... चीन मध्ये नव्हे...तर चीन पासून हजारो मैल लांब देशात....इजिप्त मध्ये..!!

सलग तीस वर्ष सत्ता गाजवणाऱ्या होस्नी मुबारक यांना हाकलून लावायची मागणी सर्वत्र होऊ लागली..लोकांच्या मनातील असंतोष प्रकट होऊ लागला... आधुनिक काळाला साजेशी अशी आधुनिक लोकशाहीची भिंत इजिप्त मधल्या लोकांनी विचार व्यक्त करायला मते मांडायला वापरली... या आधुनिक लोकशाहीच्या भिंतीचे नाव- "फेसबुक". फेसबुक वरील "पेज" मधून हजारो लोक एकत्र आले. त्यांनी होस्नी मुबारक यांच्या राजवटीचा निषेध केला. त्यांच्या त्यांच्या फेसबुक अकौंट वरील "wall" वर असंख्य लोक विचार व्यक्त करू लागले, एकत्र येऊ लागले.. पाहता पाहता वातवरण बदलले. अवघ्या काही दिवसात लाखो लोक मुबारक राजवाटीविरोधात उभे राहिले. आधुनिक लोकशाही भिंतीच्या, फेसबुकच्या, ताकदीने सारे जग स्तिमित झाले. जगभरचे वार्ताहर इजिप्त मध्ये आले. इथल्या लोकांचे मन जाणून घेऊ लागले. आणि १८ दिवसांच्या लोकांच्या उग्र आंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना राजीनामा द्यावा लागला.... आधुनिक लोकशाहीच्या भिंतीची कमाल...!!!

सोशल नेट्वर्किंग वेबसाईट्स वापरून काय घडू शकते याचे हे एक उदाहरण आहे... ही एक "लोकशाहीची भिंत" आहे.. त्यावर भ्रष्टाचार करणार्यांना उघड करा, आपल्याला काय वाटते ते लिहा, तक्रार करा, आरोप करा.... हा आवाज आज न उद्या सरकार पर्यंत जाणारच आहे याची खात्री बाळगा...त्याचा पुरेपूर वापर करून मोठ्यातल्या मोठ्या भ्रष्ट लोकांना आपण निष्प्रभ करू शकतो. आपल्याला जे वाटतं, ते या भिंतीवर लिहले पाहिजे... इथेच विचारविनिमय घडेल..भ्रष्ट आणि गैरकारभार करणाऱ्या लोकांना, लोकप्रतिनिधी,राजकारणी, अधिकारी वर्ग इ सर्वांना आपण या लोकशाहीच्या भिंतीच्या माध्यमातून वठणीवर आणू शकतो. एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही-आम्ही हे घडवू शकतो....!!!