सुदैवाने
माझ्या खात्यात दोन-तीन जमेच्या गोष्ट होत्या. २००८ मध्ये, कॉलजमध्ये असताना आम्ही
काही मित्रांनी परिवर्तन या संस्थेची स्थापना केली आणि तेव्हापासून सातत्याने चालू
आमच्या सामाजिक-राजकीय कामामुळे एक व्यापक दृष्टीकोन तयार व्हायला मदत झाली होती.
माझं पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर काही काळ स्वतःचं स्वतंत्रपणे काम मी केलं.
त्यानंतर एका सामाजिक क्षेत्रातल्या सल्लागार कंपनीत नोकरी केली. नोकरीतली ही दोन
वर्षं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. ९ ते ५ अशी साचेबद्ध नोकरी मी कधीही
करणार नाही असं म्हणणारा मी नोकरीला लागलो कारण कंपनी सामाजिक क्षेत्रातली होती, म्हणजे माझ्या आवडीचा विषय. पण तरी ती ‘नोकरी’
होती. स्वच्छंदी वागण्याला मर्यादा होत्या. या नोकरीमुळे आपोआप माझ्यात शिस्त आली.
ठरलेला दिनक्रम असल्यावर एक सहज लय येते आयुष्यात, तसं झालं. दुसरा मोठा फायदा
झाला तो ‘सल्लागार’ कंपनीत काम केल्याचा. अशा कंपन्यांमध्ये एखाद्या विषयावर किती
तास, किती मिनिटे काम केलं यानुसार कामाचं शुल्क क्लायंट
कडून घेतलं जातं. याचा अर्थ असा तुमचं कंपनीसाठी असणारं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं
आहे आणि त्यात तुम्ही किती काम करू शकता यावर तुमची कार्यक्षमता ठरणार आहे. शिवाय
ते काम कारकूनी पद्धतीचं नाही. सल्लागार नात्याने कामाचा दर्जाही घसरून चालणार
नाही. दर्जा न खालावता, स्वतःच्या सर्वोत्तम कार्यक्षमतेने काम करण्याची पद्धतशीर
शिकवण त्या दोन वर्षात मला मिळाली. मी थेट अनुरूपचं काम करायला लागलो असतो तर हे
कधीही शिकलो नसतो. व्यवसायिक वृत्तीकडे जाण्याची सुरुवात नोकरीपासून झाली ती अशी!
माझ्या
कामाची सुरुवात झाली ती डॉ गौरी कानिटकर म्हणजे माझ्या आईच्या मार्गदर्शनाखाली.
अगदी लहानपणापासून, म्हणजे माझी आजी कार्यरत होती तेव्हापासून मी अनुरूपचं काम बघत
आलो आहे. कॉलेजात असताना मी अनुरूपच्या वेबसाईटवर प्रोफाइल्स अपलोड करण्याचं काम
करायचो, ज्याचे मला ५ रुपये प्रतिप्रोफाईल असे पैसे आईबाबा द्यायचे. तोच माझा
पॉकेट मनी असायचा. त्यामुळे अनुरूपचं काम चालतं कसं याची मला माहिती होती. २०१४
मध्ये मी अनुरूपच्या कामाला लागलो तेव्हा मी २६ वर्षांचा होतो.
मित्र-मैत्रिणींच्या घरी लग्नाबद्दल बोलणं चालू झालं होतं, त्यातले काहीजण
अनुरूपचे सदस्य झालेही होते. त्याचा मला फारच फायदा झाला. अनुरूपकडून किंवा
कोणत्याही विवाहसंस्थेकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे मला अगदी सहज कळत होतं.
नुसती माहिती मिळत होती असं नाही तर त्याच वयात मी असल्याने मला ते म्हणणं अधिक
नीट समजतही होतं.
या
सगळ्या गोष्टी विचारांत घेऊन काही महत्त्वाचे बदल अनुरूपच्या कामात करावेत असं मला
वाटत होतं. विशेषतः कामकाजाच्या पद्धतीत. आपण नवीन असतो तेव्हा आपण धडाधड निर्णय
घेऊन गोष्टी बदलून टाकू असं वाटत असतं. तो उत्साह महत्त्वाचा असला तरी त्याला
तारतम्याची जोड द्यावी लागते, हे तेव्हा कुठे कळत होतं! सुरुवातीच्या काळात माझे
माझ्या आईशी (म्हणजे माझ्या बॉसशी!) असंख्य छोट्या मोठ्या गोष्टीवरून खटके उडायचे.
कामकाजाच्या अनेक जुन्या पद्धतींवर मी कडाडून टीका करत तुटून पडायचो अगदी. पण
हळूहळू अनेक गोष्टी ‘अमुक पद्धतीनेच का केल्या जातात’ यामागचा विचार माझ्या लक्षात
येऊ लागला. कारणमीमांसा लक्षात आली. आणि त्याचवेळी त्या कारणमीमांसेला विचारात
घेऊनही नवीन काही बदल आम्ही केले. आधीच्या पिढीतली आई आणि तरुण पिढीतला मी; या
दोघांच्या विचारातून मध्यममार्ग काढले, जे कंपनीसाठी
सर्वोत्तम होते. यात कोण किती पावलं मागे आलं हा मुद्दा दुय्यम ठरू लागला; पहिल्या
वर्ष-दोन वर्षांच्या काळातच एकदा ही दिशा नक्की झाल्यावर पिढी वेगळी असूनही एकत्र
काम करताना अडचण येईनाशी झाली. यात माझ्या मोठ्या भावाचं- अमेयचंही योगदान आहे.
अनुरूपची पहिली वेबसाईट अमेयनेच बनवली होती आणि आजही तो अमेरिकेत राहून अनुरूपच्या
टेक्निकल कामाचं नियोजन बघतो. त्याच्या जागतिक दृष्टिकोनामुळेही आमच्या कामाला अधिक
चांगली दिशा येत गेली. आजही आम्हा तिघांमध्ये मतभेद होत नाहीत असं नाही. पण मार्ग
काढला जातो, जो अंतिमतः अनुरूपच्या आणि अनुरूपच्या सदस्यांच्या भल्याचा विचार करून
घेतलेला निर्णय असतो. गेल्या वर्षी आम्ही गुजराती भाषिकांसाठीही अनुरूप सुरू केलं
आणि आजी-आई-बाबा या सगळ्यांनी अनुरूपमध्ये केलेल्या डोंगराएवढ्या पायाभूत कामाचा
पुन्हा प्रत्यय आला. प्रस्थापित व्यवसायात येऊन प्रयोग करणं तुलनेने सोपं असतं. पण
गुजरात माझ्यासाठी नवीन होतं. इथे सगळ्या जुन्या-जाणत्यांचा अनुभव पुन्हा एकदा
महत्त्वाचा ठरला!
माझं
पदव्युत्तर शिक्षण मिडिया आणि कम्युनिकेशन स्टडीज् यातलं असल्याचा थेट फायदा झाला
आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून अनुरूपच्या मार्केटिंगची सूत्र हातात घेतली. एकविसाव्या
शतकात अनुरूपचं ब्रँडिंग कसं असावं याविषयी आम्ही असंख्य वेळा चर्चा केली. आई आणि
बाबा या दोघांनी अनुरूपचं काम करताना नुसतं वधू-वर सूचक मंडळासारखं काम
करण्यापेक्षा एक सर्वसमावेशक विवाहसंस्थेसारखं काम करण्याचा ध्यास घेतला. दोघंही
समुपदेशक म्हणून काम करायचे, आईने पुढे यातच तिचा
अभ्यास वाढवून थेट पीएचडी देखील केली. मला वाटू लागलं की हे सगळं ब्रँडिंगमध्ये
उतरलं पाहिजे. नुसता जोडीदार शोधून देण्यापेक्षा तुमचं लग्न टिकावं, फुलावं यासाठी
अनुरूपकडून जे काम केलं जातं ते लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं
आहे. अनुरूपचा विचार लोकांपर्यंत पोहचवू हे डोक्यात ठेवून, गेली दहा वर्षं
अनुरूपचं ब्रँडिंग केलं गेलं आहे. पारंपारिक जाहिरातींपासून ते सोशल मिडिया रील्स
पर्यंत प्रत्येक माध्यमाचा मी खुबीने वापर केला. त्याचा फायदा असा झाला की पालक
पिढीचा अनुरूपवर असलेला विश्वास तर अबाधित राहिलाच, पण नव्या
पिढीला अनुरूपची एक वेगळीच ओळख झाली. “अरेंज्ड मॅरेज म्हणजे काहीतरी बुरसटलेले,
जुने, कालबाह्य” अशी संकल्पना असणाऱ्या नव्या पिढीला त्यांचेच
विचारही अनुरूपच्या मंचावर ऐकायला मिळाले तेव्हा दोन्ही पिढ्यांमध्ये सेतू बांधला
गेला. मला वाटतं अनुरूपच्या ब्रँडिंगचं हे सर्वात मोठं यश आहे.
अनुरूपचे
आगळेवेगळे कार्यक्रम ही अनुरूपची खासियत असली तरी त्यांची संख्या वाढवण्याची गरज
होती. मी त्यावर भर दिला. अनुरूपचे काही मोजक्या शहरात वर्षाला जेमतेम १५
कार्यक्रम होत असत. आज जगातल्या भारत-अमेरिका-कॅनडा-ऑस्ट्रेलिया या चार देशातल्या
२५ शहरांत मिळून वर्षभरात १०० पेक्षा जास्त कार्यक्रम होतात. लवकरच जर्मनी आणि
इंग्लंड इथेही हे कार्यक्रम मी नेणार आहे. ऑनलाईन कार्यक्रमांची सुरुवात कोविड
दरम्यान झाली आणि आता कोविडनंतरही ते सुरू आहेत! बहुतांश कार्यक्रम हे
मुला-मुलींसाठी असल्याने आणि मी त्याच पिढीचा प्रतिनिधी असल्याने, त्यांना काय
रुचेल-पटेल-आवडेल याचा विचार मला करता आला आणि त्यानुसार कार्यक्रमांची रचना
बदलली. शाळेत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचा चांगलाच फायदा
मला आज अनुरूपचे कार्यक्रम घेताना होतो!
जो
अडसर सुरुवातीला मी आणि माझ्या आईसाठी होता तोच, अनुभव आणि पिढीचा अडसर मी आणि
अनुरूपमधल्या माझ्या सहकाऱ्यांमध्येही होता. घराणेशाहीचा फायदा घेऊन थेट डोक्यावर
कोणीतरी येऊन बसणार हे कोणालाच फारसं आवडत नाही. इथे मी नवखा अननुभवी तरुण थेट
संचालक म्हणून पदावर आलो होतो. तर दुसऱ्या बाजूला आईबाबांच्या बरोबरीने कंपनी मोठी
करण्यात योगदान दिलेल्या सहकारी. माझी आणि आईची कामाची पद्धतही अनेक बाबतीत अगदी
परस्परविरोधी असल्यानेही त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. पण त्यांचं मला मोलाचं
सहकार्य मिळत आलं आहे. माझ्या कधी अप्रगल्भ वागण्यालाही समजून घेतलं आहे.
एकमेकांकडून शिकत आमची सगळी उर्जा कंपनी मोठी करण्यात आम्ही लावतो आहे. आज दहा
वर्षांनी मागे वळून बघत मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं खरंतर लग्न म्हणजे
वेगळं काय असतं? व्यक्तीबरोबर कुटुंबाशीही लग्न होतं. वेगवेगळ्या पिढीचे लोक एकत्र
येतात. आचारविचारांची देवाणघेवाण होते. कधी खटके उडतात, वादही होतात. पण त्यावर आपण तोडगे काढतो, दोन्ही
बाजू अहंभाव सोडून दोन दोन पावलं पुढे येतात आणि गुण्यागोविंदाने नांदतात. जरी
कुटुंबातला व्यवसाय असला तरी अनुरूपच्या कुटुंबात येताना मी एक प्रकारे बाहेरूनच
लग्न होऊन आलो होतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून जाणं टाळता येण्यासारखं
नव्हतं बहुतेक. अनुरूपचं काम करताना कंपनी मोठी होण्याबरोबर मीही प्रगल्भ झालो, अनेक गोष्टी शिकलो. आधी होतो त्याहीपेक्षा मी अधिक चांगली व्यक्ती बनलो.
कोणत्याही नात्याकडून हेच तर अपेक्षित असतं ना!
(दि.२९ एप्रिल २०२४ च्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध.)
No comments:
Post a Comment