‘शिप ऑफ थिसिअस’ या नितांत सुंदर सिनेमात एक प्रसंग
होता. शेअर ब्रोकर असणारा नवीन नावाचा एक तिशीच्या आसपासचा मुलगा एका गरीब माणसाला
न्याय देण्यासाठी प्रचंड झटतो. त्याच्या परीने त्याला शक्य ते सारं करतो. पण सगळं
शक्य होत नाही. शेवटी थकून, काहीसा निराश होत तो त्याच्या आजीशेजारी बसतो. आजीने अनेक वर्ष सामाजिक काम
केलंय. तिला हे सगळे अनुभव, त्यावेळची निराशेची भावना हे अगदी नीट माहित्ये. ती त्याला फक्त एवढंच
म्हणते- ‘इतना ही
होता है|” बस्स.
त्यापुढे काही संवाद नाही. पण त्या वाक्यात सगळं काही आलं.
‘माझ्या हातात असणाऱ्या गोष्टी मी
केल्या आणि माझ्या हातात नसणाऱ्या गोष्टी मी स्वीकारल्या’ यात समाधान आहे हेच एक प्रकारे ती
आजी आपल्या नातवाला सांगते. एका अमेरिकन विचारवंताने बनवलेली एक प्रार्थना आहे. ‘सेरेनिटी प्रेयर’- मनःशांतीची प्रार्थना. त्या
प्रार्थनेचं मराठी रूप मी प्रसिद्ध लेखक डॉ अनिल अवचट यांच्या तोंडून पहिल्यांदा
ऐकलं होतं-
‘जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया.
जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे
अशक्य काय,
माझे मला कळाया, दे
बुद्धी देवराया’
मला ही प्रार्थना विलक्षण आवडते. माझ्या हातातल्या
आणि हातात नसणाऱ्या गोष्टी अशी विभागणी यात आहे. हातात नसणाऱ्या गोष्टी
स्वीकारायच्या आहेत. ते महत्त्वाचं आहेच पण एवढंच स्वतःला सांगून ही प्रार्थना
संपत नाही तर हातात असणाऱ्या गोष्टी मी निर्धाराने करायच्या आहेत हेही यामध्ये
आहे. पुढे जाऊन कोणत्या गोष्टी माझ्या हातातल्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे माझं
मलाच समजायला हवं असंही या प्रार्थनेत आपण स्वतःला सांगतो. दुसरं-तिसरं कोणी येऊन
सांगणार नाही, माझं
मलाच ते शोधायचं आहे.
मागे एका मित्राशी मी हे बोलत असताना तो म्हणाला “एखादी
गोष्ट आपल्या हातात नाही हा विचार करून डोकं शांत कसं राहील? उलट आपल्याला त्रास होणारी गोष्ट
आपल्या हातात नाही हे जाणवून जास्तच त्रास होतो आपल्याला”. एक क्षण विचार करता मला
पटलं त्याचं. पण दुसऱ्याच क्षणी जाणवलं की ज्या गृहितकावर/ समजुतीवर आधारित तो हे
बोलतोय तिथेच बहुधा गडबड आहे. इतरांचं वागणं, बोलणं हे मला त्रास होण्यामागचं
कारण आहे असं त्याचं गृहीतक होतं. “हे असं घडलं म्हणून मी चिडलो”, “तमुक व्यक्ती अशी वागली म्हणून
मी असा वागलो”, “अमका
असं काहीतरी वागला जे त्याने वागायला नको होतं म्हणून मी निराश झालो.” “तमक्या
तमक्याने या या विषयावर सिनेमा बनवला म्हणून मला राग आला”, “अमकं पद्धतीचं चित्र काढलं म्हणून
मला चित्रकाराबाबत तिरस्कार वाटू लागला”, अशा पद्धतीची वाक्य अनेकदा आपण बोलतो. आपल्या आजूबाजूच्या
मंडळींना बोलताना ऐकतो. किती सोपं आणि साधं आहे ना! माझ्या भावनांची जबाबदारी मी
सहजपणे झटकून मोकळा. ‘जे काही
घडलं ते दुसऱ्या माणसामुळे, त्याच्या वागण्यामुळे, निर्माण झालेल्या प्रसंगामुळे.’, असं ठरवून मोकळा!
मला वाटतं तीन टप्प्यात ही सगळी प्रक्रिया घडते.
पहिला टप्पा म्हणजे प्रत्यक्ष एखादा प्रसंग घडणे. मग समोरच्या व्यक्तीचं एखादं
वागणं किंवा बोलणं असेल. दुसरा टप्पा येतो त्या प्रसंगाचा मी माझ्या परीने अर्थ
लावणे. आणि तिसरा भाग म्हणजे त्या अर्थ लावण्यानुसार काढलेल्या निष्कर्षाला मी
माझी शाब्दिक किंवा कृतीतून प्रतिक्रिया देणे.
प्रसंग à अर्थ लावत निष्कर्ष काढणे à त्या निष्कर्षांना प्रतिक्रिया
देणे.
आता यात जर कोणी प्रश्न केला की तू अमुक अमुक
पद्धतीनेच का बरं प्रतिक्रिया दिलीस तर सहजपणे आपण म्हणतो की ‘मूळापाशी गेलो तर लक्षात येईल की
टप्पा क्र १ मध्ये जो काही प्रसंग घडला आहे त्यामुळे असं झालं.’ वरवर बघता ते योग्यही वाटतं. ‘तिथून तर खरी सुरुवात झाली की’ असं म्हणत आपण स्वतःला पटवतो की
खरा दोष त्या प्रसंगाचाच किंवा त्यात असणाऱ्या व्यक्तीचा आहे. पण खरी गंमत अशी की, सगळी गडबड दुसऱ्या टप्प्यावर आहे, एखाद्या प्रसंगाचा अर्थ लावत
निष्कर्ष काढण्यामध्ये आहे. आपण आपली प्रतिक्रिया प्रसंगाला देत नसतोच मुळी. आपण
ती निष्कर्षाला देत असतो, जो निष्कर्ष आपण आपल्या पद्धतीने अर्थ लावून काढलेला असतो.
निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव, ज्ञान आणि समजुती यांचा आधार
घेतो. पण इथेच थोडीशी गडबड असेल तर? जसं कामाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी उपलब्ध असणारी माहिती
आणि ज्ञान तपासून बघतो आणि मग निर्णय घेतो, तसं व्यक्तिगत पातळीवर एखादा
निष्कर्ष काढताना आपण आपली माहिती, ज्ञान आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या समजुती आपल्याला वारंवार तपासून
बघायला हव्यात. आपल्याच समजुतींना प्रश्न केले पाहिजेत. माझ्या काही समजुती
तर्कविसंगत (Irrational) असतील तर त्या मला बदलायलाही हव्यात. जसं इतरांबद्दलच्या तर्कविसंगत समजुती
असू शकतात तशा त्या माझ्या स्वतःबद्दलच्या देखील असू शकतात. माझ्या समजुतींमध्ये
मी आवश्यक ते बदल केले तर आपोआप अंतिम निष्कर्षही बदलेल- आणि तेसुद्धा पहिल्या
टप्प्यातला प्रत्यक्ष प्रसंग न बदलता! अरेच्चा, किती सोपं झालं ना सगळं!? पहिल्या टप्प्यामध्ये असणारा
प्रसंग माझ्या हातातला नाही. पण तरीही मला मानसिक त्रास होत असेल तर दुसऱ्या
टप्प्यावर मला तर्कशुद्ध समजुती बाळगल्या पाहिजेत. म्हणजे मग तिसऱ्या टप्प्यावर
माझा मलाच होणारा त्रास मला टाळता येतो.
अरेंज्ड मॅरेजबाबत तर चांगलाच गोंधळ मनात असतो
अनेकांच्या. मध्ये आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमाच्या वेळी एक मुलगी म्हणाली, “केवढी भयानक आहे ही प्रक्रिया.
मला तर वेबसाईट उघडावी असंच वाटत नाही. आणि आई-बाबा तर सतत मागे लागलेत मुलं बघ, मुलं बघ म्हणत.”, त्यावर मी म्हणलं की ‘मुलांना भेट तरी. बघ भेटून काय
वाटतंय. आताच्या काळात एकदा भेट झाली की लगेच लग्न, असं नसतं. तुम्ही अनेकदा भेटू
शकता,
एकमेकांना थोडं जाणून घेण्याची संधी घेऊ शकता.’ त्यावेळी ती हो म्हणाली खरी, पण मनातून काय तिला पटलं नव्हतं.
आणि मग जरा वेळाने म्हणाली, “सगळा दोष आपल्या सिस्टीमचा आहे. आपल्याकडेपण ‘डेटिंग कल्चर’ वगैरे असतं तर या फंदातच पडावं
लागलं नसतं मला”. पुढे जाऊन ही आता पंतप्रधानांनापण दोषी ठरवणार की काय असा
गंमतीदार विचार माझ्या मनात येऊन गेला! विनोदाचा भाग जाऊ द्या, पण काय घडलं इथे? ‘अरेंज्ड मॅरेज ही पद्धत भयानक आहे, डेटिंग वगैरे पद्धतच खरी योग्य’ या आशयाचं गृहीतक तिच्या मनात
होतं. या भयानक अवस्थेतून जावं लागतंय मला, कारण म्हणजे ही सिस्टीम, असा निष्कर्ष तिने काढला देखील! लग्न
ठरवण्याच्या प्रक्रियेत असणारे पालक आणि त्यांची मुलं-मुली यांच्याशी बोलताना मला
जाणवतं की ते सतत खूप साऱ्या भावनिक आंदोलनांमधून जात असतात. ‘रोलर कोस्टर राईड’च असते ती एक. नकार न येणे, उत्तरं न मिळणे, हवा तसा प्रतिसाद न मिळणे, लग्न ठरण्याच्या प्रक्रियेला
अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणे वगैरे वगैरे. परंतु अशा प्रसंगांमध्ये आपल्याच
मनातल्या समजुतींच्या आधारे भलतेच निष्कर्ष काढून घेऊन स्वतःची मनःशांती ढळेल, असं वागणं काय शहाणपणाचं नाही
म्हणता येणार. माझ्या भावना, माझा आनंद, माझी
मनःशांती ही माझ्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही नाही, हे समजून घेत सुरुवात केली तर गोष्टी बऱ्याच सोप्या आणि आनंददायी होतील. मग, करूयात प्रयत्न?!
(दि. १९ मे २०१८ रोजी प्रकाशित महाराष्ट्र टाईम्सच्या ‘मैफल’ पुरवणीत प्रसिद्ध)