नुकताच ‘चि. व चि. सौ. कां.’ नावाचा ‘लिव्ह-इन’ दाखवणारा सिनेमा येऊन गेला. त्यात
मुलगा आणि मुलगी लग्न करण्याआधी एकत्र राहून बघायचं ठरवतात. सिनेमा बघताना दोन
गोष्टी माझ्या मनात आल्या. पहिली म्हणजे, लग्नाआधी जमतंय का बघू, असं म्हणत लिव्ह-इनचा पर्याय
स्वीकारला गेला. म्हणजे पुढे जाऊन लग्न करण्याची तयारी त्या नायक आणि नायिका यांची
होतीच. आयुष्यभर लिव्ह-इनचा पर्याय त्यांच्या डोक्यात नव्हता. आणि दुसरा मुद्दा
म्हणजे लिव्ह-इन ठरवत असताना ते हे नातं ‘अ-शारीर’ असेल असं ठरवतात. म्हणजे असं लिव्ह-इन
नातं, ज्यात
लैंगिक संबंध नसतील. (हे जरा गंमतीदार आणि अवास्तव असलं तरी, यामुळे निर्मात्यांना हा सिनेमा
नैतिकतेच्या समाजमान्य कल्पनांना छेद न देणारा आणि त्यामुळेच एक फॅमिली सिनेमा आहे
असं म्हणता आलं असावं!) २००५ मध्ये आलेल्या सलाम नमस्ते या सिनेमात लिव्ह-इन
दाखवलंय आणि एकत्र राहायला सुरुवात करण्याआधी साधारणपणे हेच दोन्ही मुद्दे सैफअली
खान आणि प्रीती झिंटा विचारांत घेतात. त्यावेळी एका चित्रपट परीक्षणात असं म्हणलं
गेलं होतं की, सिनेमा
ऑस्ट्रेलियात घडताना दाखवला आहे, कारण लिव्ह इन आपल्याकडे दाखवलं तर इतर सामाजिक, कायदेशीर बाजू विचारांत घ्याव्या
लागल्या असत्या आणि सिनेमाच्या कथानकात लुडबुड झाली असती. परंतु, २०१७ मध्ये आलेल्या ‘चि. व चि. सौ. कां.’ला ही अडचण विशेष भेडसावत नाही.
बारा वर्षात आपल्या समाजात पडलेला हा फरक आहे. सिनेमांतून तो समोर आला, इतकंच. हा जो समाजाच्या विचारांत फरक
पडलाय, त्यामुळे
एकदम सगळी लग्नसंस्था धोक्यात आलीये की काय?!
मध्यंतरी मी इंटरनेटवर एक यादी वाचत होतो. त्या यादीत
अनेक वर्षांपूर्वी अनेक मान्यवर तज्ज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ यांनी २००० साली किंवा त्यानंतर आपलं जग कसं असेल याची भाकितं
वर्तवली होती. लवकरच प्रत्येकाकडे छोटेखानी हेलिकॉप्टरसारखे वाहन असेल आणि तेच
भविष्यात मध्यमवर्ग वापरत असेल असं साठच्या दशकात एक भाकीत होतं. किंवा एकविसाव्या
शतकात माणसं कशी राहत असतील हे रेखाटताना एका चित्रकाराने हवामान नियंत्रणासाठी
संपूर्ण शहरावर एक प्रचंड मोठं काचेचं छत असेल असं दाखवलं होतं, एका प्रथितयश मासिकाने ते छापलंही
होतं. १९५५ मध्ये व्हॅक्युम क्लीनर कंपनीच्या मालकाने असं म्हणलं होतं की दहा
वर्षात अणूउर्जेवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर बाजारात आलेला असेल, वगैरे वगैरे अनेक भाकितं त्या
यादीत होती आणि अर्थातच सपशेल चुकीची ठरली. दुसऱ्या बाजूला ज्यांचा तर विचारही
नव्हता केला अशा गोष्टी आपल्या जगात अस्तित्वात आल्या आहेत. हे सगळं आठवायचं कारण हेच
की, आपल्याला असे अनेकजण भेटतात जे
अतिशय आत्मविश्वासाने ‘लग्नसंस्था हळूहळू नष्ट होणार आहे आणि काही वर्षांनी सगळे लिव्ह इन मध्येच
राहत असतील’ असं
भाकीत वर्तवतात. चूक-बरोबरच्या पलीकडे जाऊन, मला हे भाकीत थोडं घाईघाईचं वाटतं.
लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या मंडळींची संख्या वाढली म्हणजे हजारो वर्षांची
लग्नव्यवस्था एकदम उखडलीच जाईल का?! किंवा लग्न व्यवस्था आहे तश्शीच टिकून राहील अगदी हेही भाकीत जरा हट्टीपणाचं
नाही का?!
शंभर किंवा पन्नास वर्षांपूर्वी लग्न व्यवस्था जशी
होती तशी आज नाही. आणि आज आहे तशी अजून पन्नास वर्षांनी नसणार हे उघड आहे. बदल
होतच राहतात. पण स्वरूप बदललं तरी मूलभूत अशी ‘स्त्री-पुरुषाने एकत्र येऊन कुटुंब
सुरु करण्यासाठी’ तयार
झालेली लग्न व्यवस्था नष्ट झाली नाही याला काही कारणं आहेत. लग्न संस्था का
निर्माण झाली याकडे आपण गेलो तर ती इतके वर्ष कशी काय टिकून राहिली हे समजू शकेल.
टोळीने भटकंती करणारा मनुष्यप्राणी शेतीचा शोध लागल्यावर एका जागी स्थिरावला आणि
मग तिथेच घर बांधून राहू लागला. या काळात अर्थातच खाजगी मालमत्तेचा उदय झाला.
माझ्यानंतर माझं शेत, घर हे
कोणाला मिळावं या विचारांतून वारसाहक्काची कल्पना पुढे आली आणि त्यातून माझा वारस
कोण हे नेमकं कळावं या हेतूने एका स्त्रीने एकाच पुरुषाबरोबर राहून नवीन पिढीला
जन्म देण्याची प्रथा रुजली असावी असे मानले जाते. यातूनच लग्न व्यवस्था जन्माला
आली. टोळी प्रकार कमी होऊन, कुटुंबांमध्ये विभागलेला मानवी समाज तयार झाला. कुटुंबव्यवस्था ही या नव्या
समाजव्यवस्थेचा पाया बनली, आणि कुटुंबासाठी लग्न करणं आवश्यक होऊन बसलं. लग्न व्यवस्थेचा पाया हा असा
आहे. या मूलभूत गृहितकांना धक्का लागत नाही, किंवा याबाबतच्या मानवी समजुती
आणि रिती बदलत नाहीत तोवर लग्न व्यवस्थेला सहजासहजी धक्का लागेल असं मला वाटत
नाही.
लग्न व्यवस्थेला धक्का न लावता, लग्नापूर्वी एकत्र राहून तर बघू, हा प्रकार मात्र वाढत जाईल असं
मला मनापासून वाटतं. यामागे हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत- आर्थिक दृष्ट्या
पूर्ण स्वतंत्र होत जाणारी माझी पिढी, आर्थिक स्वायत्ततेतून येणारं स्वातंत्र्य उपभोगण्याची
संस्कृती, त्यामुळे
लग्न लांबणीवर टाकायचं ठरवणं तरी दुसऱ्या बाजूला अगदी नैसर्गिक अशी, बहुतांश लोकांमध्ये असणारी
भिन्नलिंगी व्यक्तींबद्दलची ओढ आणि या जोडीलाच नवनवीन तंत्रज्ञानाच्या अवाढव्य
करामती! ‘लग्न हा
आयुष्यातला ‘एक’ महत्त्वाचा टप्पा आहे. पण तो ‘एकमेव’ नाही, हे तत्त्वज्ञान आमच्या शहरी
सुशिक्षित पिढीने स्वीकारलं आहे. आधी कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक असायचा, त्यात आता बदल झालाय. आता समाजाचा
मूलभूत घटक हा ‘व्यक्ती’ आहे. त्यामुळे इतर सर्व
गोष्टींबरोबर समोरच्या व्यक्तीशी आपलं कसं जुळतंय हे आधी बघून घेण्याची इच्छा
मुला-मुलींमध्ये निर्माण झाली तर त्यात आश्चर्य काय?
आमच्या आधीच्या पिढीकडून लिव्ह-इनला होणाऱ्या
विरोधामागे लैंगिक शुद्धतेच्या, पावित्र्याच्या पारंपारिक संकल्पना आहेत. याविषयी गेल्या वेळच्या लेखात मी
सविस्तर भूमिका मांडली आहेच. मला वाटतं, नव्या युगात, नव्या विचारांसह, नव्या
तंत्रज्ञानाला विचारांत घेत, व्यक्ती-व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या कल्पनांची चांगली झडझडून
फेरमांडणी करायला हवी. कोणाला आवडो अथवा न आवडो, परिस्थितीच्या रेट्याने ती
फेरमांडणी होणार आहेच. पण त्यावेळची ओढाताण आणि संघर्ष आटोक्यात ठेवायचा, तर या फेरमांडणीसाठी आपणच पुढाकार
घेण्याला पर्याय नाही!
(दि. २४ मार्च २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या
पुरवणीत प्रसिद्ध.)
No comments:
Post a Comment