Wednesday, November 17, 2010

"असल्या फंदात पडू नकोस..."

मध्यवर्गीय लोकांना सुरक्षिततेबाबत "पझेसिव्हनेस" तयार झाला आहे. एका सुरक्षित कवचात राहून आयुष्य जगण्याची सवय आणि आवड सगळ्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे जरा कोणी त्या कवचातून बाहेर पडून काही वेगळे करू लागला की त्याला मागे खेचत सुरक्षित कवचात आणण्याची स्पर्धा मध्यमवर्गीय करतात.
माझ्या ओळखीत कित्येक मुलं अशी आहेत की जे सुरुवातीला देशासाठी/समाजासाठी काहीतरी करावं या विचाराने आमच्या परिवर्तन संस्थेत आले, आणि नंतर "असल्या फंदात पडू नकोस" अशी घरून सक्त ताकीद मिळाल्यावर येण्याचे बंद झाले. त्यामुळे पहिल्या दिवसापासून परिवर्तन मध्ये असणारी स्वयंसेवकांची उणीव आज दोन वर्षांनतरही कायम आहे. घरात बसून सिस्टीम वर टीका करणं, मतदानालाही बाहेर न पडणं...बोलण्यात "हुकुमशाहीच हवी खरं तर.." असे उद्गार काढणं आणि एका बाजूला टिळकांपासून गांधींसकट सावरकरांपर्यंतच्या "स्वातंत्र्य" सैनिकांचे गुणगान करणं आणि कोणी काही चांगलं काम करू लागला की "बाकी काही उद्योग नसतील" अशी खोचक टीका करणं यापलीकडे मध्यमवर्ग काहीही विशेष करत नाही.

मध्ये एकदा अभय बंग यांचं एक भाषण ऐकलं... "सध्या समाज pleasure च्या मागे लागला आहे.. 'MORE pleasure, INTENSE pleasure, CONTINUOUS pleasure आणि UNENDING pleasure' हेच मध्यमवर्गाच्या आयुष्याचं ध्येय झाल्यासारखं झालं आहे." असं त्यावेळी अभय बंग यांनी सांगितलं. यामधल्या "Pleasure" या शब्दाच्या जागी "security" हा शब्द टाकला तरी ते सत्यच आहे...

परिवर्तन च्या माध्यमातून आम्ही नुकतेच राजकीय पक्षांच्या अतिक्रमणाबाबत चा प्रश्न हाती घेतला आहे. आमच्या एका सदस्याला त्याच्या लंडन मधल्या भावाचा फोन आला... "असल्या फंदात पडू नकोस.."!! राजकीय पक्ष म्हणले की मध्यमवर्गीय लोकांच्या मनात धडकी भरते. इतकी दहशत खरोखरच जर राजकीय पक्षांनी निर्माण केली असेल तर परिवर्तनचे काम दुप्पट गतीने आणि खरं तर दुप्पट आक्रमकतेने करायची आवश्यकता आहे. कारण दहशत असेल तिथे लोकशाही नांदू शकत नाही.
एका अत्यंत मागासलेल्या, स्वार्थी आणि क्षुद्र मनोवृत्तीचे दर्शन मध्यमवर्गीय लोकांशी बोलताना होते... आणि हे मध्यमवर्गाच्या रक्तातच आहे की "मध्यमवर्ग" या नावातच आहे कळायला मार्ग नाही... शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी एका माणसाने आपले आयुष्य लोकांसाठी खर्च करायचे ठरवले. पुण्यातल्या मध्यमवर्गीय क्षुद्र लोकांनी त्या माणसाची हुर्यो उडवली, टोमणे मारले, मागे खेचायचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला कुचेष्टेने ठेवलेले "सार्वजनिक काका" हे नाव पुढे मात्र अत्यंत आदराने घेतले जाऊ लागले ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ज्योतिबा फुले, टिळक, आगरकर, महर्षी कर्वे,  आंबेडकर, गांधी, सावरकर अशी कितीतरी उदाहरणे देता येतील... असंख्य.....!!!

भ्रष्टाचार नको असे प्रत्येकाला वाटते, पण एका बाजूला भ्रष्टाचार नसेल तर आपण इतर अल्प उत्पन्न गटाच्याच दर्जाचे होऊ या भितीमाधेही मध्यमवर्ग बुडाला आहे... 'समजा एखादे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सामान्यतः लोकांना जर ४ दिवस लागत असतील तर मला पण तेवढेच लागतील...त्यापेक्षा २०० रुपये देऊन २ दिवसात का ते करून घेऊ नये.' अशी मध्यमवर्गीय मनोवृत्ती भ्रष्टाचार शाबूत ठेवते. किंबहुना भ्रष्टाचाराला अभय देते. आणि तरी भ्रष्टाचार विषयावर व्याख्यान झोडणारे आणि ऐकणारे दोघेही मध्यमवर्गीयच असतात...!!!

शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्याच्या घरात... असं म्हणलं जातं... आजकाल तर अशी परिस्थिती आली आहे की शेजारी जरी शिवाजी जन्माला आला तरी आपले महाभाग त्यांच्याकडे जातील आणि त्या शिवाजी च्या आईला म्हणतील," काकू, तुमच्या मुलाला आवरा, फार व्रात्य झाला आहे. आत्ताच करा काहीतरी नाहीतर नंतर मुलगा पार वाया जाईल."
असे किती शिवाजी जन्माला येऊन बँक, सरकारी ऑफिस किंवा आय टी कंपनीत कारकुनाचं काम करत असतील काय माहित...
सगळ्यांचेच हे केवढे तरी मोठे नुकसान आहे....

मध्यमवर्ग बदलाला घाबरतो. वेगळेपणाला घाबरतो. पण अतिशय मोठा विरोधाभास असा की या बदलाचे, वेगळेपणाचे विलक्षण आकर्षण याच वर्गाला वाटत असते.(परिवर्तन बद्दल विलक्षण कुतूहल असणारे आणि कौतुक करणारे असंख्य भेटले. पण आपण होऊन काम करायची तयारी दाखवणारे जवळपास नाहीच...) पण त्यामुळे त्या बदलाचा एक भाग व्हावे असे मात्र त्यांना वाटत नाही. कारण सदैव कुठल्यातरी भीतीने मध्यमवर्ग ग्रासलेला असतो.. आणि ही “गमावण्याची” भीतीच सुरक्षिततेबाबतचा पझेसिव्हनेस निर्माण करते....

'मी आणि माझे छोटेसे कुटुंब... माझ्या कुटुंबाचं सुख...आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक सामाजिक वगैरे वगैरे सर्व प्रकारची सुरक्षितता या पलीकडे पहायचे नाही..' या क्षुद्र मनोवृत्तीच्या दलदलीत सगळा मध्यमवर्ग पुरता रुतलेला आहे... यातून या समाजाला बाहेर काढायचे काम जवळपास अशक्य आहे... कारण ही मनोवृत्ती सामान्य मानवी स्वभावाचा भाग आहे... त्यामुळे जोवर मध्यमवर्ग आहे तोवर ही मनोवृत्ती असेल... आणि म्हणूनच कोणत्याही परिवर्तनाच्या, बदलाच्या कार्यात मध्यमवर्गाचा पाठींबा कधीच मिळणार नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे... पाठींबा किंवा सहकार्य तर सोडाच उलट विरोध सहन करावा लागेल... पण ज्या दिवशी परिवर्तनाच्या तुमच्या उद्दिष्टांमध्ये तुम्ही सफल व्हाल तेव्हा हाच वर्ग नाकं मुठीत धरून तुमच्यासमोर लोटांगण घालायला येणार आहे याबद्दल मला जराही शंका नाही...

5 comments:

  1. Good article.... But overall mala waatla ki jaasta burden parents war padtay.. which is not true in every case, The prob is also with people (me inclusive) who want quick results, iam in no way saying they are not willing to work but just a little holding back is due to the fact the results, though far reaching are not instant.... Kautuk anekwela enough nasta, Kunasathich.. neither paalak nor mula.... What is lacking in my opinion is patience, drive and commitment... The article rocked though.. cheers!

    ReplyDelete
  2. 1.Parents war burden 'padtay' he mala manya nahi... parents te burden 'ghetat'....aplya "adult" aslelya mulacha/mulicha burden or pressure tyanni mulich gheu naye asa maza mat ahe...
    2. I'm not talking about those who have tried to 'do' something... I appreciate those efforts a lot.... As far as results are concerned, I won't be unhappy if we do not get results even though we tried hard.. i have a huge problem with those who simply do not even want to 'try'....!
    3. this article is about the overall mentality of the middle class... and its reaction to any "CHANGE"....
    It is all about the constant fear of almost everything... feeling of insecurity....

    Yes... patience and commitment are the most important factors... pan ya khuup nantarchya goshti zalya... adhi "mentality" badlawi lagel...

    ReplyDelete
  3. i would say not only madhyam varg..sagalech loka tasa vichar karatat...mhana tyala karana pan tashich ahet...udya apalyala kahi zala tar..ha vichar pratyekachya manat asatoch..may be lack of power he ek main reason ahe..because we all know what these useless politians will do...

    ReplyDelete
  4. Exactly... hi ji bhiti ahe na manaat ki politicians kay kartil hich atishay waeet ahe... hi bhiti joparyant jaat nahi towar koni kitihi kahi kela tari ya deshat kahich ghadun yenar nahi... ani ti bhiti ghalawnyasathi ek don lokannich kam karun chalnar nahi.. large numbers madhe ekatra yayla hawa....
    choice is yours..tumhala ahe tasa ghabrat jagaychay ki fight karat pudhchya generations cha rasta sopa karat jagaychay...

    ReplyDelete