सध्या काही संस्था, नेते, गट,हितसंबंधी, राजकारणी लोक संपूर्ण भारतीय समाजाला मध्ययुगात नेण्याची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. मग ते कोणत्याही धर्माचे असोत. मुस्लीम कट्टर वादामुळे जागतिक दहशतवादाची समस्या आ वासून उभी असतानाच मध्ययुगीन हिंदू कट्टरवादी लोकांमुळे राष्ट्रीय समस्या निर्माण झाली आहे. ती समस्या समोर यायला निमित्त झाले 'खाप पंचायत' प्रकरणाचे...
ज्या हिंदुत्ववादाचा (किंबहुना राष्ट्रवादाचा) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुरस्कार केला त्याचा पूर्ण विसर आजच्या "सावरकरवादी किंवा हिंदुत्ववादी" म्हणवणाऱ्या आजच्या नेत्यांना पडलेला आहे. खाप पंचायतीचा प्रकार हा केवळ घृणास्पद नसून तिरस्करणीय आहे. काय खाप पंचायत? कसली खाप पंचायत?? यांना वाट्टेल ते निर्णय घेण्याचे आणि ठराव करायचे अधिकार कोणी दिले?? हेच लोक वाट्टेल ते कायदे बनवणार, हेच ते राबवणार, न्यायाधीश पण हेच लोक आणि शिक्षा जाहीर करून ती अमलात आणणारे लोकही हेच??? ही कुठली मुलखावेगळी पद्धत?? भारत देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे हे खाप पंचायत वाले उजळ माथ्याने हिंडू कसे शकतात??? देशाच्या संविधानाचा जाहीर अपमान करणारे लोक समाजाचे पुढारीपण कसे मिरवतात?? आणि हे असेच चालू राहिले तर कसले संविधान आणि कसले काय... देश चालला मध्ययुगातल्या अंधारयुगाकडे......
हे सगळे थांबले पाहिजे..... तेही ताबडतोब.... हिंदू संस्कृतीमधल्या उदात्त महान विचारांना डावलून मागासलेल्या चुकीच्या समाजविरोधी समजुती समाजात पसरवून, त्यायोगे दहशत पसरवून स्वतःचे महात्म्य वाढवणारे खाप पंचायतवाले लोक हे समाजाचे शोषण करणारे आधुनिक काळातले उच्च वर्णीय ठरतील खरेखुरे दहशतवादी ठरतील...आणि हेच मुस्लीम कट्टर पंथीय उलेमा आणि मुल्ला मौलवी वगैरेंनाही लागू होते. या क्षुद्र लोकांना वेळीच रोखले नाही तर देशात अराजक माजेल... आणि त्यांना रोखण्याची ताकद आपल्या संविधानात आहे. पण जोपर्यंत संसदेत बसलेले आणि देशाचे नेतृत्व करणारे तद्दन भिकार राजकारणी इच्छा शक्ती दाखवत नाहीत तोपर्यंत संविधान म्हणजे कागदाचा कपटा आहे.... देशाच्या महान संविधानाचा अपमान करणाऱ्या या अराजकवादी अंधार युगातल्या खाप पंचायत आणि मुल्ला मौलवी उलेमा लोकांना कठोर शासन केलं पाहिजे.
खाप पंचायतवाल्यांची एक मागणी वाचून हसूच येते आणि त्याचबरोबर धडकीही भरते...... लग्नाचे कमीतकमी वय कायद्याने कमी करायची मागणी त्यांनी केली आहे..याविषयी १७ जुलैला रोहतक येथे होणाऱ्या 'महापंचायत' मध्ये ठराव होणार आहे. मुलांचे लग्नाचे कमीतकमी वय २१ वरून १७ वर आणावे आणि मुलींचे १८ वरून १५ वर आशी या लोकांची मागणी आहे...
हे ऐकून मला इतिहासात वाचलेला टिळकांच्या काळी झालेला वाद आठवला... मुलींचे लग्नाचे वय १२ वरून १४ वर नेण्यासाठी कायदा करण्यात आल्याने महाराष्ट्रभर वादंग माजले होते... पण कायदा झाल्यावर मुळातच सुसंस्कृत असलेल्या ब्रिटीश लोकांनी त्याची कठोर अंमलबजावणी केली. हळू हळू समाजानेही हा बदल मान्य केला. पूर्वी फक्त सुधारकांपुरताच मर्यादित असलेला हा बदल समाजात सर्वत्र पसरला. हे लग्नाचे वय हळू हळू वादांसहित वाढत गेले. आणि अखेर विवाहाच्या वेळी मुलीने सज्ञान असणे आवश्यक आहे या अतिशय सुसंकृत आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाला अनुसरून लग्नासाठी मुलीचे कमीत कमी वय १८ ठरवण्यात आले तर मुलाचे २१. गेली अनेक वर्षे बाल विवाह थांबवण्याचे सरकारने आणि अनेक सामाजिक संस्थांनी अथक प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन बाल विवाहांचा दर मोठ्या प्रमाणात कमी झाला. समाजाच्या प्रगल्भतेचे हे लक्षण आहे.
याबरोबरच सध्या चर्चेत असलेला महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे खाप पंचायतीने अनेक ठिकाणी "ऑनर किलिंग" या प्रकाराला दिलेली मान्यता. धर्मबाह्य कृती करणाऱ्या व्यक्तीला किंवा काही बाबतीत संपूर्ण कुटुंबालाच ठार मारण्याची प्रथा म्हणजे ऑनर किलिंग. कुटुंबाच्या किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या/गावाच्या तथाकथित प्रतिष्ठेला तडे जाईल असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबांना ठार मारण्याच्या घटनांनी देश हादरून गेलेला आहे. अशा घटना हरियाणासारख्या एका कोपऱ्यातल्या राज्यात घडल्यावरच देशभरातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रतिगामी संघटनांनी डोके वर काढले आहे. अशा संघटना लोकांच्या धार्मिकतेचा फायदा उठवून जनशक्ती आपल्या बाजूला खेचत आहेत. आणि याच जनशक्तीच्या आधारावर म्हणजेच अर्थातच मतपेटीच्या आधारावर आपल्याला हवे ते घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी यांना ठेचण्याचे काम आपण करायचे सोडून आयत्या बिळावर नागोबा बनून यांचेच मुद्दे उचलून धरायचे राजकारण्यांना सुचावे यासारखे दुर्दैव कोणते?
हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला आणि काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल हे देशविरोधी, समाजविरोधी खाप पंचायतीच्या बाजूने जोरदार मतप्रदर्शन करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष मात्र काहीच विशेष मत व्यक्त न करता, जिंदाल यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगत आहे. पण जिंदाल यांचे हे मत चुकीचे असल्याचे सांगून, त्याला विरोध करण्याचे धारिष्ट्य काँग्रेस मध्ये नसल्याचे दिसले आहे. भाजप तर या सर्वावर एक शब्दही बोलायला तयार नाही. इतक्या प्रतिगामी असणाऱ्या खाप पंचायातीविरोधात एकही स्त्री खासदार, आमदार किंवा स्त्री नेतृत्वाला एक शब्दही उच्चारावा वाटू नये हा "स्त्री मुक्ती"च्या घोषणांचा दारूण पराभव आहे. आंतरजातीय तर सोडाच पण आंतरधर्मीय, आंतरदेशीय विवाह होऊन भारतातील सर्वात महत्वाची व्यक्ती बनलेल्या श्रीमती सोनिया गांधी नवीन जिंदाल यांना कशा काय आपल्या नेत्या म्हणून चालतात हे मात्र मला कळेनासंच झालंय....!! दलित स्त्री शी लग्न करणाऱ्या मुलाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या खाप पंचायतीला लोकसभेच्या दलित सभापती चालतात असे दिसते...
याचबरोबर अजून एक उद्विग्नता आणणारी गोष्ट म्हणजे एकाही धार्मिक/अध्यात्मिक नेत्याने (रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर इ.) या सगळ्याचा जाहीर निषेध व्यक्त केलेला नाही. भारताला समर्थ बनवण्याची घोषणा करणाऱ्या रामदेवबाबांना खाप पंचायतीचे सामर्थ्य अपेक्षित आहे काय???? तसे नसेल तर मग त्यांच्या बोलण्यात, जाहीर निवेदनात या सगळ्याचा निषेध का नाही???
सुसंस्कृतता, विविधतेत एकता, घटनेने दिलेली समानता या गोष्टींचा आपण भारतीय अभिमान बाळगतो... मात्र खाप पंचायत आणि मुल्ला मौलवी वगैरेंसारख्या घटनाबाह्य संस्थानांमुळे समाजाच्या प्रगल्भतेवर, सुसंस्कृततेवर, एकतेवर, समानतेवर घाला घातला जातोय. आणि यामुळे देश खिळखिळा होतो आहे.. एकात्मतेच्या दृष्टीने तर खिळखिळा होतोच आहे. पण वैचारिक, बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्याही खिळखिळा होतो आहे. आणि राष्ट्राचे इतके अपरिमित नुकसान होत असताना आपल्या स्वार्थी, अडाणी, निष्क्रिय आणि निर्बुद्ध अशा राजकारण्यांनी मूग गिळून बसावे याचा तुम्हाला संताप येत नाही काय??? डोके फिरून जात नाही काय?? अशा वेळी भाजप सारखे हिंदूंचे कैवारी असल्याचा आव आणणारे पक्ष हिंदू धर्माची ही क्रूर विटम्बना पाहून त्याचा कडक निषेध का करत नाहीत? मतपेटीवर डोळा ठेऊन देशहितावर तिलांजली सोडणारे हे गेंड्याच्या कातडीचे काँग्रेसचे लोक कधीपर्यंत आपले नेतेपद मिरवणार आहेत?? कुटुंबाच्या विरोधात जाऊन आपल्या आयुष्याचा लग्नाचा निर्णय घेणाऱ्या एका २३ वर्षीय मुलीला ठेचून मारण्याचा आदेश देणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या मुल्ला मौलवींना अटक का होत नाहीत?? काँग्रेस आणि तसले तद्दन भिकार तथाकथित सेक्युलर पक्ष किती वर्ष क्षुद्र कट्टरपंथीयांचे लांगुलचालन करणार आहेत?????
पुढच्या वेळी मताची भिक मागायला तुमच्या दरवाजावर हे लोक आले तर त्यांना हे कटू प्रश्न विचारण्याचे कष्ट आता तरी आपण घेणार आहोत का?? की अजूनही आपण मतदानाच्या दिवशी सुट्टीच आहे असे मानून, महाबळेश्वरला नाहीतर माथेरानला जाणार आहात????
खाप पंचायत आणि तसलेच मुल्ला मौलवी हा केवळ समाजातल्या एखाद दुसऱ्या रुढीचा प्रश्न नसून हा प्रश्न आहे संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याचा. वैचारिक, बौद्धिक, भावनिक स्वातंत्र्याचा.. देशाच्या सार्वभौमत्वाचा... देशाच्या संविधानाचा...
प्रश्न गंभीर आहे... आणि त्यावर उपाययोजनाही गंभीरच असली पाहिजे...
No comments:
Post a Comment