Tuesday, April 13, 2010

हे उपाय टिकाऊ नाहीत....

काल समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेने एक "निर्धार परिषद" आयोजित केली होती.... विविध संस्थांच्या प्रतिनिधींना यामध्ये बोलायची संधी देण्यात आली, तसेच अनेक संस्थांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. नागरिकांनी दिवसातला एक तास पुण्यासाठी द्यावा या संकल्पनेवर ही निर्धार परिषद आयोजित करण्यात आली होती.... विविध संस्थांच्या सदस्यांची लक्षणीय उपस्थिती, सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या गोष्टी या संपूर्ण कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं...
मुख्य कार्यक्रमापूर्वी प्रातिनिधिक स्वरुपात नदी पात्र स्वच्छ करायचा उपक्रम राबवण्यात आला. त्यासाठी २०० पेक्षा जास्त संख्येने लोक उपस्थित होते... इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या उपक्रमासाठी लोक एकत्र येतात ही गोष्ट फार मोठी आहे...आणि त्याहून महत्वाचा म्हणजे आशादायी आहे..!!

एवढ्या मोठ्या संख्येने विविध संस्थांना आणि नागरिकांना एकत्र आणण्याचे समर्थ भारत चे कसब कौतुकास्पद आहे.... मात्र... ह्या गोष्टी टिकाऊ नाहीत...
आज नदी पात्र स्वच्छ करायचा उपक्रम एक दिवस राबवल्याने नदी कायमची स्वच्छ होणार नाही. किंवा एखादा मोठा हॉल घेऊन असले कार्यक्रम केल्यानेही फार काही मोठे घडणार नाही.... कार्यक्रम पार पडला...आता एवढ्या संस्थांनी एकत्र येऊन काही भव्य दिव्य कार्य करून दाखवले तरच काहीतरी अर्थ आहे. तरच खऱ्या अर्थाने एकजूट झाली असे म्हणता येईल.... उद्या सरकारच्या अत्यंत वाईट अशा धान्यापासून मद्यनिर्मिती सारख्या योजनान्विरोधात आंदोलन करायची वेळ आल्यावर यातल्या किती संस्था एकजूट दाखवतील याबद्दल शंकाच आहे. निदान हा विषय जरा सामाजिक आहे. व्यसनाधीनतेशी संबंधित आहे.. पण एखाद्या अत्यंत राजकीय  स्वरूपाच्या मुद्द्यावर एकजूट होऊन ती सरकारला-विरोधी पक्षीयांना- आणि समस्त नेते मंडळींना दाखवून देत नाही तोवर हे कार्यक्रम हे स्वतःचेच समाधान आहे असे माझे स्पष्ट मत आहे... उद्या मेट्रो च्या अत्यंत चुकीच्या अशा योजनेविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरण्यात जर या संस्थांची एकजूट उपयोगी पडली तर आणि तरच अशा कार्यक्रमाची उपयुक्तता आहे. नाहीतर एखादा नाला साफ करणं किंवा वृक्षारोपण सोहळे करणं एवढ्यापुरतेच हे मर्यादित राहील...नाला साफ करणं हि गोष्ट सरकारने करायची असून ती सरकारनेच केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. कित्येक मूर्ख नगरसेवकांचे आणि बथ्थड बिनडोक आमदार खासदारांचे निधी पडून असतात...तसेच राहतात... त्याचा वापर करूनही कामे सरकारनेच केली पाहिजेत... लोक त्यासाठीच कर देतात, आणि कर दिल्यावरही जर लोकांनीच कामं करायची असतील तर सरकार कशाला पाहिजे?
त्यामुळे, प्रचंड प्रमाणात जी जनशक्ती निर्माण करायची ताकद या संस्थांच्या एकजूटीमध्ये आहे, तिचा वापर राज्यकारभार सुधारण्यासाठी व्हायला हवा.... सरकारने आपले कर्तव्य चोख बजावलेच पाहिजे हे ठणकावून सांगण्यासाठी हवा... पण तसे आत्ता होताना दिसत नाही... याचे मुख्य कारण म्हणजे अशा लोकशक्तीवर आधारित जनआंदोलनावरती या सगळ्या संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या लोकांचा अविश्वास...... कार्यक्रमात आलेल्या बहुतेक संस्थांचे प्रतिनिधी हे राजकीय प्रश्नांपासून स्वतःला अलिप्त ठेऊ इच्छिणारे असे होते... आणि त्याहून स्वतःच सरकारचे काम करून आपण समजासाठी फार मोठे काम केले यातच धन्यता मानणारे होते... अशा नेतृत्वाला झुगारून दिले पाहिजे. आणि झुन्जारपणे लढणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी स्थानापन्न केले पाहिजे.

मला कोणाचाही अपमान करायचा नाही, मात्र काल स्टेजवर बसलेल्यांपैकी एखादा अपवाद वगळता एकही व्यक्ती मला लढाऊ वाटली नाही... सगळे वयाने ज्येष्ठ... आपल्या तरुणपणी अटलबिहारी वाजपेयी नाहीतर जेपींच्या प्रभाखाली कामाला सुरुवात केलेले, वयानुरूप अनेक वर्षात उर्जा हरवून बसलेले असे दिसत होते. आता कोणी म्हणेल की, ते अमुक अमुक आहेत ते सतत कार्यरत असतात.... पण कार्यरत असणे म्हणजे जनआंदोलनाचे नेतृत्व स्वीकारण्याची कुवत असणे नव्हे.... सद्यपरिस्थितीत जेव्हा आता खरोखरच सर्वकंष क्रांतीची गरज आहे.... कार्यक्रम करून मश्गुल राहणाऱ्या आणि आम्ही केवढे काम करतो पण समाज बदलतच नाही असे म्हणणाऱ्या या लोकांच्या हाती नेतृत्व देणे ही गोष्ट मोठी धोकादायक आहे. त्यामुळे प्रथम या लोकांचे नेतृत्व मोडीत काढावे लागेल. फार कटू असे हे कार्य असेल... पण करावे लागेल..... खूप मनापासून तळमळीने चुकीचे काम करणारे बऱ्याचदा देशकार्यात अडसर ठरू शकतात.... "सेतू" या परिवर्तनच्या आमच्या उपक्रमामार्फत मला या सगळ्या लोकांचे नेतृत्व मोडीत काढायचे आहे.... काट्याने काटा काढावा लागतो.... सेतू चे काम हे सर्व संस्थांना एकत्र बांधणे हेच आहे... एकजूट तयार करणे हेच आहे.... मात्र त्यापुढे जाऊन या एकजूटीचा वापर थेट राजकीय जन आंदोलनात वापरता आला पाहिजे अशा पद्धतीनी सेतू ची रचना तयार व्हायला हवी....
जनआंदोलन हे NGO किंवा संस्थात्मक स्वरुपात चालत नाही हे या नेतृत्वाला कोणीतरी सांगितले पाहिजे. आपले फोटो पेपरात छापून आणायचे प्रसिद्धी मिळवायची असल्या उद्देशांनी काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे... आणि असे लोकच जर या  संभावित एकजुटीचे नेतृत्व करू लागले तर कार्य पुढे तर जाणार नाहीच...उलट चार पावले मागे येईल....

एक दिवस नदी पात्र साफ करून आणि कार्यक्रमात बडबड केल्याने परिवर्तन घडून येणार नाही... हे असले उपाय टिकाऊ नाहीत......

2 comments:

  1. वस्तुस्थिती. केवळ वस्तुस्थिती. इथे प्रदर्शित केलेला विचार चांगला आहे, स्तुत्य आहे. तरीही; आपल्या देशात अशी काही क्रांती बिंती होणं अशक्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अनेक चांगले नेते, पुढारी, समाजसेवक होऊन गेले इथे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण असं आहे की चिखलात कमळं उगवली तरी चिखल चिखलच रहातो. माफ़ करा मला, माझा कुणाला दुखविण्याचा उद्देश नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलीय, एवढंच मत आहे माझं.

    अर्थात, ते जर कुणी चुकीचं ठरवून दाखवलं तर त्या व्यक्तीएवढाच आनंद मला होईल.

    ReplyDelete
  2. नेते पुढारी होऊन गेले आणि तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे... परंतु यामागचा सर्वात महत्वाचं कारण आहे की जे काही काम जे काही थोडेफार चांगले लोक करत आहेत, ते वेगवेगळे राहून करत आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नाही, एकी नाही. आणि मी याच लेखात म्हणलंय त्याप्रमाणे, एकजुटीला पर्याय नाही... जर एकत्रितपणे प्रयत्न केले गेले, चांगल्या शक्ती एकत्र आल्या तर नक्कीच आपल्याला हवे ते परिवर्तन घडून येईल... आणि हो, परिस्थिती हात असताना क्रांती आल्याचे इतिहासात उदाहरण नाही... उलट परिस्थिती सहन करायच्या पलीकडे गेल्यावरच क्रांती येते असा इतिहासाचा दाखला आहे...
    आपल्या देशाची अवस्था आधीच इतकी वाईट झाली आहे की अजून काय वाईट होणार?! आपले काम खूप अवघड आहे, कष्टाचे आहे... पण तुझ्या माझ्यासारखे सामाजिक जाणीव असलेले लोक जर एकत्र आले तर अशक्य नक्कीच नाही...!!!

    ReplyDelete