Saturday, November 19, 2011

दिवाळी फराळ...

मच्याकडे सगळेच खवय्ये आहेत. त्यामुळे दिवाळी फराळ हा प्रकार जोरदार असतो..! त्यातही आजीकडे एक दिवस फराळ कार्यक्रम असतो. त्यामुळे दिवाळी फराळ हा एकदम जिव्हाळ्याचा विषय... पण चकली-लाडू यापलीकडे जाऊन एका वेगळ्या प्रकारच्या फराळाची आमच्याकडे पद्धत आहे... अगदी वर्षानुवर्षे चालू असा वैचारिक फराळ...! 

आमच्याकडे दर वर्षी दिवाळी अंकांची मेजवानीच असते... दिवाळी अंक बाजारात आले की कपड्यांच्या दुकानात सेल लागल्यावर बायकांची जी अवस्था होते तीच माझी होते.. 
लहानपणी शाळेत असताना मी मला जे दिवाळी अंक हवे असायचे (उदा. छात्र प्रबोधन, किशोर, ठकठक, कुमार इ.) ते मी 'कमवायचो'..! 
शाळेला दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत सगळेच दिवाळी अंक बाजारात यायचे. त्याची किमतीसह यादी बाबा आणून ठेवायचे. आणि मी घरोघर फिरून दिवाळी अंकांची ऑर्डर घ्यायचो. सुरुवात अर्थातच नातेवाईक-मित्र अशी व्हायची. त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळाल्या की मग आईच्या मैत्रिणी, त्यांच्या सोसायट्या, मग दिसेल त्या बिल्डींग मध्ये घुसून सेल्समनगिरी करायचो. सहावी सातवीतला मुलगा घरपोच दिवाळी अंक विक्री करतोय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. माझा मित्र सोहम हा ज्ञान प्रबोधिनीत होता. त्यांना त्यांच्या शाळेने फटाके विक्री करायला सांगितलेली असे. त्यामुळे एक दोन वर्ष आम्ही एकत्रच बाहेर पडायचो. फटाके आणि दिवाळी अंक, घरपोच विक्री! दोघांच्याही हातात आपापल्या याद्या आणि एक ऑर्डर घ्यायची वही. 
ऑर्डर्स घेतल्या की मग अप्पा बळवंत चौकात जायचे, तिथल्या 'संदेश एजन्सी' मधून सगळे दिवाळी अंक विकत घ्यायचे आणि मग सगळ्या घरांमध्ये ते पोचते करायचे हा उद्योग दिवाळीचे आधी २ दिवस चालायचा... 'संदेश' मधून मला सवलतीच्या दरात अंक मिळायचे. प्रत्येक अंकामागे २०% सुटायचे. मग हे पैसे वापरून मी माझी दिवाळी अंकांची खरेदी करायचो...! जास्तीत जास्त दिवाळी अंक खरेदी करता यावेत म्हणून मी अक्षरशः दिवसभर ऑर्डर्स घेत भटकायचो. सतत हिशोब करून किती ऑर्डर्स अजून घ्यायला लागतील ते बघायचो. पण एकदा का माझे दिवाळी अंक हातात आले की मग पुढची सुट्टी जी जायची त्याला तोड नाही...!!! दिवसभर तंगड्या पसरून वाचत पडायचे...!!! तेव्हा लागलेली ही सवय आता आयुष्यात कधी सुटेल असं वाटत नाही... 
नेहमीप्रमाणेच याही वर्षी भरपूर दिवाळी फराळ झाला...! अंतर्नाद, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, अनुभव, साप्ताहिक सकाळ, जत्रा, माहेर, मानिनी, प्रपंच, आवाज, अनुवाद, चिन्ह अशा एकसे एक अंकांनी यावेळची दिवाळी भन्नाट गेली...!
त्यातले काही खास लेख प्रत्येकाने वाचावेत असेच आहेत. साप्ताहिक सकाळ मध्ये असलेला पुण्याच्या नदीवरचा लेख तुफान आहे. अतिशय अभ्यासपूर्ण...! पुण्यातली नदी, नदीचे प्रदूषण आणि सरकारची भूमिका अशा विविध गोष्टी या लेखात आहेत. 
महाराष्ट्र टाईम्स तर विलक्षण आहे... गेल्या ५० वर्षातले मटा मध्ये छापून आलेले उत्तमोत्तम लेख एकत्र करून छापले आहेत. गोविंदराव तळवलकरांच्या चीन हल्ल्यावारच्या एखाने या अंकाची सुरुवात होते... मग पु. ल., तेंडूलकर, हृदयनाथ मंगेशकर, इरावती कर्वे, आर के लक्ष्मण, नरहर कुरुंदकर, गदिमा, सुहास पळशीकर, कुमार केतकर, कुसुमाग्रज, सुनीताबाई देशपांडे, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर, नाना पाटेकर, व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गजांचे लेख एकाच अंकात मिळणे ही फारच मोठी मेजवानी होती...! यापैकी पुलंनी लिहिलेला बालगंधर्व यांच्यावरचा लेख, गदिमांचा आचार्य अत्रेंवरचा लेख, विजय तेंडूलकर, नारळीकर आणि नानाचा लेख तर फारच सुंदर. गोविंद तळवलकर यांचे सर्वच लेख अफाट..! महाराष्ट्र टाईम्स चा अंक हा नुसता वाचायचा अंक नसून संग्रही ठेवायचा अंक आहे. 
इतरही सगळ्याच दिवाळी अंकात खजिनाच आहे. अक्षर मधला मटा च्या ५० वर्षातल्या ३ प्रमुख संपादकांवर लिहिलेला प्रकाश अकोलकरांचा लेख, किंवा अक्षर मधला सोशल मिडिया वरचा स्वतंत्र विभाग, प्रपंच मधला "जगण्यावर शतदा प्रेम करावे" या विभागातले आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, अच्युत गोडबोले यांचे लेख, अंतर्नाद मधले लेख, चिन्ह मधले नाडकर्णी आणि भालचंद्र नेमाडे यांचे लेख, माहेर मधला डॉ अभय बंग यांच्या मुलाचा लेख, लोकसत्ता मधला गिरीश कुबेर यांचा लेख हे सर्वच फार वाचनीय आणि विचार करायला लावणारे आहे. 

लोकांनी दिवाळी अंकाचे वाचन केले तरी दिवाळीच्या महिन्याभरात लोकांची प्रगल्भता कित्येक पटींनी वाढेल. दिवाळीच्या निमित्ताने विचारवंत, तज्ञ, पत्रकार, जाणकार लोक आपण होऊन माहितीचा, विचारांचा खजिना उघड करत असतात. तो भरभरून घेणे आणि स्वतःला प्रगल्भ करणे आपल्याच हातात आहे. 
वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. कालच एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. बोलता बोलता तो म्हणाला ते एकदम पटलं. तो म्हणाला, आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात. एक फोटो कोणीतरी 'शेअर' करतो त्यावर कोणाचीतरी बदनामी असते. आणि कसलीही शहानिशा न करता असंख्य लोक त्याचा प्रसार करतात. आणि बेधुंदपणे या गोष्टी पसरतात लोक त्यावर विश्वासही ठेवतात. हे सगळं मुळीच चांगलं नाही असं माझं मत आहे. सर्वांगाने विचार करून, माहिती घेऊन, खोलवर वाचन केले गेले पाहिजे. समाज प्रगल्भ आणि सुसंस्कृत होणे गरजेचे आहे. 

Tuesday, November 1, 2011

चारित्र्य, कर्तृत्व वगैरे वगैरे...


मागे एकदा एक अप्रतिम ई मेल वाचला होता:
पुढील पैकी कोणता मनुष्य तुम्हाला नेता म्हणून आवडेल?
१) हा माणूस रोज दारू, प्रचंड सिगारेट. रात्र रात्र जागरणं तर रोजचीच.
२) हा माणूस दारू पितो शिवाय अनेक बायकांशी याची लफडी असल्याची सातत्याने चर्चा. शिवाय सत्ता जाऊ नये यासाठी धडपड.
३) हा माणूस कधीच दारू पीत नाही. सिगारेटला तर शिवतही नाही. एकच प्रेयसी, जिच्याशी लग्न. 

सर विन्स्टन चर्चिल  
यापैकी पहिली व्यक्ती आहे ग्रेट ब्रिटीश पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल, दुसऱ्याचे नाव आहे महान अमेरिकन अध्यक्ष फ्रांक्लीन डी रूझवेल्ट आणि तिसऱ्याचे नाव आहे एक भयानक हुकुमशहा अडोल्फ हिटलर!! 

किती लवकर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवून टाकतो ना?? विशेषतः व्यसन आणि लैंगिक चारित्र्य या बाबतीत तर भारतीय लोक ताबडतोब आपले मत बनवून टाकतात. त्यातही राजकारणाच्या बाबतीत एकदम हळवे होतात. सिनेमातल्या नट्या आणि नट यांची कितीही लफडी वगैरे असली तरी त्याविषयी फारसे वाईट कधीच वाटत नाही उलट त्या बातम्यांमध्ये जरा जास्तच रस असतो. पण एखाद्या राजकीय व्यक्तीचे कोणाशीही संबंध असतील तर मात्र आपल्या डोक्यातून ती व्यक्ती पार बादच होऊन जाते. अर्थात अमिताभ बच्चन चे अनेक नट्यांबरोबर संबंध होते (अशी चर्चा तरी होती, खरेखोटे अमिताभ, रेखा, जया यांनाच ठाऊक) तरीही निवडणुकीच्या रिंगणात त्याला मात्र या तराजूवर तोलले गेले नाही...! 
मस्तानी
सध्या फेसबुक वर राहुल गांधी च्या कोलंबियन मैत्रिणी वरून जोरदार चर्चा वगैरे चालू आहेत. किंवा उठ सूट नेहरूंच्या आणि लेडी माउंटबैटन यांच्या संबंधावरून टीका होत असते. असल्या भंपक भपकेबाज प्रचाराला आपले लोक बळी पडतात हे आपले खरोखरच दुर्दैव आहे. राहुल गांधी किंवा नेहरूंवर टीका करायची तर त्यांच्या कार्यावर करा, विचारधारेवर करा. या दोघांच्या किंवा इतर कोणाच्याही बाजूने बोलायचा माझा उद्देश नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की कोणाचेही काही का संबंध असेनात कोणाशीही, त्याने त्याच्या कर्तृत्वावर फरक पडत नाही ना हे महत्वाचे. त्यामुळे मूल्यमापन करायचे तर कर्तृत्वाचे करा, विचारांचे करा... त्यांचे लैंगिक चारित्र्य वगैरे कसे होते असल्या भंपक आणि फुटकळ गोष्टींचा बाऊ करणे थांबायला हवे. पण आपल्या इथल्या परंपरावादी बिनडोक लोकांना याबाबत अक्कल नाही आणि हे समजून घेण्याची प्रगल्भताही नाही.
आमच्या पुराणात-इतिहासात द्रौपदी पाच पांडवांची बायको होती. शिवाय प्रत्येक पांडवाच्या स्वतंत्र बायकाही होत्या. विवाहबाह्य संबंध होते, विवाह पूर्व संबंध होते. अर्जुनाने द्रौपदी असताना कृष्णाच्या बहिणीचे हरण केले म्हणून कोणी त्याच्या  कर्तृत्वावर आक्षेप घेत नाही. किंवा पाच पती असूनही द्रौपदीच्या धैर्याची आणि महानतेची स्तुतीच ऐकायला मिळते. कोणी शिवाजीचे मूल्यमापन शिवाजीच्या आठ पत्नी होत्या या गोष्टीवरून करू लागले तर त्या व्यक्तीला आपण वेड्यातच काढू...! मस्तानी होती म्हणून बाजीरावाचे शौर्य कमी होत नाही.

एखाद्या व्यक्तीची भरपूर लफडी असतील पण ती प्रचंड काम करणारी असेल, भ्रष्टाचार वगैरे दृष्टीने स्वच्छ असेल तरी आपल्या इथे एखादा एकपत्नीवाला भ्रष्ट गुंड मनुष्य विक्रमी मताधिक्क्याने निवडून येईल. असले बुरसटलेले मतदार असतील तर या देशात राजकीय प्रगती कधी होणारच नाही. विचार करण्याची पद्धती बदलल्याशिवाय राजकीय परिवर्तन टिकाऊ होणार नाही. अर्थात हे फक्त आपल्या इथे आहे अशातला भाग नाही. अमेरिकेतही एखाद्या राजकीय व्यक्तीचे विवाह बाह्य वगैरे संबंध असणे तिथल्या लोकांना पचत नाही. पण फ्रान्स चे उदाहरण आवर्जून द्यावे वाटते. फ्रान्सच्या अध्यक्षांनी सार्कोझी यांनी आपल्या पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेऊन इटालियन गायिका असलेल्या कार्ला ब्रुनी या आपल्या प्रेयसीबरोबर विवाह केला. तिथल्या मिडीयाने या गोष्टीवर भरपूर टीका टिप्पणी केली. विरोधी पक्षांनी तर हा मुद्दाच बनवला. देशाचा अध्यक्ष असे कृत्य करूच कसे शकतो असे म्हणत सार्कोझी यांच्यावर तोफ डागली. पण फ्रेंच जनता तिथल्या राजकारण्यांपेक्षा प्रगल्भ निघाली. त्यांनी विरोधी पक्षीयांना मुळीच भिक घातली नाही. आपल्याकडे हे होऊ शकते? 
सार्कोझी आणि कार्ला ब्रुनी
मुळात विवाह, लैंगिक संबंध वगैरे गोष्टी एखाद्याची वैयक्तिक बाब आहे आणि त्याबाबत इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही हे आपल्या लोकांना कळतच नाही. याचा अर्थ या सगळ्यावर कोणी टीका करूच नये असा माझा बिलकुल आग्रह नाही. ते स्वातंत्र्य नसेल तर लोकशाहीला काय अर्थ? फक्त टीका करायची तर तेवढ्या मुद्द्यापुरती करा. त्याचा संबंध उगीचच कुठेतरी जोडत बसायची गरज नसते. राहुल गांधीला कोलंबियन मैत्रीण आहे, किंवा प्रमोद महाजन यांची अनेक लफडी होती अशी चर्चा असते हि बाब मला पटत नाही किंवा आवडत नाही असे कोणाला म्हणायचे असेल तर त्यावर माझा मुळीच आक्षेप नाही. आणि कोणाचाही असूही नये. पण कोणी जर म्हणायला लागले की राहुल गांधी राजकीय नेता म्हणून भुक्कड आहे कारण त्याला कोलंबियन मैत्रीण आहे तर माझा आक्षेप आहे. कारण या वाक्यात ना प्रगल्भता दिसते ना बौद्धिक कुवत दिसते. 

एखाद्याची गर्लफ्रेंड आहे यात "लो मोराल्स" (Low morals) कसे काय झाले??? त्याच्या भावना, त्याचे प्रेम हे कोणावर असावे, कोणावर नसावे, कितीवेळा असावे, किती जणींवर/ जणांवर असावे याचा आणि इतरांचा काय संबंध?? यामध्ये लो मोराल्स म्हणजे कमी दर्जाची तत्वे काय आहेत?? ज्यामध्ये दोन्ही बाजूंची परस्पर संमती आहे, अशा कोणत्याही (लैंगिक, भावनिक, बौद्धिक, अध्यात्मिक इ.) प्रकारच्या नात्याला आक्षेप घेणारे इतर लोक कोण?? ती गोष्ट आवडली नाही असे असू शकते. पण त्याचा आणि राजकीय मुल्यमापनाचा काय संबंध? शिवाय काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलीने इतर मुलांशी बोलणे या गोष्टीलाही लो मोराल्स चे काम म्हणले जायचे. पुढे काळ बदलला. नंतर मुलामुलींमध्ये स्पर्श होण्याला समाजात आक्षेप असायचा. पण आजकाल सहज मिठी मारणं ही काय फार मोठीशी गोष्ट राहिली नाहीये. एकूणच काय तर आपण हळू हळू प्रगल्भ होतोय. या गोष्टी नगण्य आहेत हे समजून घेतोय. त्यामुळे लो मोराल्स वगैरे गोष्टी कधीच कायमस्वरूपी नसतात. तारतम्याने त्या बदलल्या जातात, बदलायच्या असतात नाहीतर आपल्यात आणि श्री राम सेने सारख्या भुक्कड लोकांमध्ये काहीच फरक राहणार नाही. "माझ्या राजकीय नेत्याने कसे जगावे याचा आदर्श घालून द्यावा" अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर मला त्याच्या बुद्धीची कीव करावी वाटेल. राजकीय नेत्याचे काम आहे राजकीय नेतृत्व करणे. लैंगिक नैतिकतेचे आदर्श घालून देणे हे राजकीय नेत्याचे कामच नाही. 

कोणतीही गोष्ट Black किंवा white असू शकत नाही. What about Grey shades? माणूस जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा त्याला असंख्य पैलू असतात. जे पैलू अनेकदा इतरांच्या समजुतीच्या कुवतीबाहेर असतात. दूरवरून एखादी गोष्ट judge करणे तितकेसे योग्य होत नाही ते त्यामुळे! एखाद्याचे असतील विवाहबाह्य संबंध किंवा एखाद्याच्या असतील एका मागोमाग एक १० गर्लफ्रेंड्स... यामध्ये कोणी कोणाचा विश्वासघात केला आहे कोण चूक कोण बरोबर याबाबत शंभर टक्के माहिती आपल्याला असू शकत नाही आणि असण्याची गरजही नाही. त्यामुळे कोणावरही वर वर पाहून ठप्पा मारण्याची चूक आपण करू नये. आणि हो सामाजिक नैतिकतेला मान द्यावा लागतो म्हणून तर आपल्या नेत्यांचे कोणाशीही कसेही संबंध असले तरी ते गुप्त ठेवावे लागतात. म्हणूनच सगळ्या बाबतीत दांभिकता आणि अप्रामाणिकपणा दिसून येतो. मी इथे लोकांवरच टीका करतो आहे जे आपल्या नैतिकतेच्या कालबाह्य संकल्पना सोडायला तयार नाहीत. शिवाय नैतिकतेचा आदर्श घालून घ्यावा ही झाली 'आदर्शवादी' संकल्पना. पण प्रत्यक्षात तसे नसेल तरी बिघडले नाही पाहिजे असे माझे म्हणणे आहे.
एखाद्या व्यक्तीला तुम्ही कामावर घेत असाल तर त्याची काम करायची क्षमता बघता की त्याची किती लफडी होती/आहेत हे बघता? CV मध्ये आजपर्यंतच्या गर्लफ्रेंड्स किंवा बॉयफ्रेंड्सची संख्या लिहितात का??? मग आपला सेवक (By the way, लोकप्रतिनिधी आपला सेवक असतो बर का!) निवडताना निवडणुकीतच आपण असल्या भुक्कड आणि उथळ विचारांच्या आहारी का जातो? 
एकूणच लैंगिक चारित्र्य आणि कर्तृत्व याचा काडीमात्र संबंध नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असताना केवळ प्रचारी आणि भंपक गोष्टींना एवढे महत्व का देतो? 
सुशिक्षित झालो तरी सुसंस्कृत आणि प्रगल्भ कधी होणार?? काहींना वाटेल लैंगिक चारित्र्य जर योग्य नसेल तर कसली आली आहे सुसंस्कृतता... पण सुसंस्कृतता लैंगिक चारित्र्यात नसून माणसाला माणसासारखे वागवणे, समोरच्याला आवश्यक स्वातंत्र्य देणे आणि त्याच्या स्वातंत्र्याचा, वैयक्तिक 'स्पेस'चा आदर करणे यामध्ये असते.

Friday, September 16, 2011

मी लोकपाल


अण्णांचे आंदोलन सुरु झाले १६ ऑगस्टला. त्याला आज एक महिना झाला. जन लोकपाल-लोकपाल- भ्रष्टाचार याविषयी गेल्या महिन्याभरात हजारो काय लाखो पाने लिहिली गेली... २४ तास काही लाख-कोटी मंडळींनी याविषयी बडबड केली. अण्णा हजारेंना एक 'मसीहा' च्या रुपात बघितलं गेलं आणि तिथेच सगळी गडबड झाली. अण्णा हजारे आले म्हणजे भ्रष्टाचार संपला अशा भाबड्या समजुतीत आपली मंडळी मश्गुल होऊन गेली. याउलट असंख्य बुद्धीवादी मंडळी या भाबड्या विश्वासावर टीका करत बसले. पण प्रत्यक्ष भ्रष्टाचार किंवा प्रशासनातील गैरकारभार रोखण्यासाठी प्रत्येकाने काय करायला हवे याचा योग्य आणि व्यापक विचार फारच थोड्या लोकांनी केला. उपोषण योग्य की अयोग्य. हा जनतेचा विजय आहे की नाही असल्या भुक्कड आणि खरेतर वरवरच्या प्रश्नांवर सातत्याने या बुद्धिवादी मंडळींनी कोरडी चर्चा केली. आंधळ्या अण्णा समर्थकांप्रमाणेच हे बुद्धिवादी म्हणवून घेणारे निर्बुद्ध लोकही आज निर्माण झालेल्या सामान्य लोकांच्या निष्क्रिय मानसिकतेला जबाबदार आहेत. 
अण्णांनी तरुणांना आंदोलन करा असे सांगितले. पण आंदोलन म्हणजे काय करा याचा कोणताही ठोस कार्यक्रम देण्यात आला नाही. गांधींच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला असंख्य पैलू होते. काही ठोस कार्यक्रम गांधींनी दिले होते. स्वदेशी, दारूबंदी, साक्षरता, अस्पृश्यता निवारण, स्वावलंबन, परदेशी मालावर बहिष्कार, सरकारी कामकाजावर बहिष्कार, संप, बंद असे असंख्य कार्यक्रम गांधींनी लोकांपुढे ठेवले होते. त्यामुळेच लोक इतक्या प्रचंड संख्येने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहज सामील होऊ शकले. आणि स्वातंत्र्य संग्रामात सातत्य राहिले. दुसरे गांधी म्हणून माध्यमांकडून आणि आंदोलन कार्त्यांकडून गौरवले गेलेल्या अण्णांनी लोकांसमोर कोणताच ठोस कार्यक्रम ठेवला नाही. त्यामुळे ही चळवळ हळू हळू थंडावत चालली आहे. जागरूक होऊनही लोक नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यग्र होऊ लागले आहेत. सिग्नल तोडू लागलेत. कामे करून घेण्यासाठी पैसे चारू लागलेत. परिवर्तन आणायचे तर फक्त हातात मेणबत्ती घेऊन काही होत नाही तर त्याबरोबरच स्वताहून अनेक दिवस-महिने-वर्ष सातत्याने प्रयत्न करावे लागतात याची जाणीव टीम अण्णांनी आंदोलन कर्त्यांना करून द्यायला हवी होती. शिवाय अण्णांनी उपोषण सोडल्यावर जो विजयाचा उन्माद आपण सगळ्यांनीच सगळ्या देशभर पाहिला तो आक्षेपार्हच नव्हे तर भयावह होता. हाती काहीच लागलेले नसताना लोक स्वतःवर खुश होत, अण्णांवर जबाबदारी टाकून मोकळे झाले आणि घरी जाऊन झोपले...!
अण्णांच्या निमित्ताने जी जागृती या देशात, विशेषतः सुशिक्षित शहरी मध्यमवर्गीयांमध्ये झाली आहे त्याला योग्य दिशा देण्याचे मोठे कार्य करायची गरज आहे. दिल्लीत जन लोकपाल आवश्यक आहेच आणि त्यासाठी लोक रस्त्यावर उतरले ही उत्तमच गोष्ट आहे. पण दिल्लीत जन लोकपाल आला तरी गल्लीतला भ्रष्टाचार तुम्हाला आम्हालाच थांबवावा लागेल याची स्पष्ट जाणीव आज लोकांना करून देण्याची गरज आहे. परिवर्तन खालून वरती होते. वरून खाली नाही. त्यामुळे या निमित्ताने जागरूक झालेल्या लोकांनी किमान आपल्या भागाची तरी जबाबदारी घ्यायला हवी. माझ्या भागात मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही- असा निश्चय आपल्यातल्या प्रत्येकाने करायला हवा. "मी लोकपाल" अशी आपली यापुढच्या काळात घोषणा असली पाहिजे. आणि अशा लोकपाल मंडळींचा एका भागातला गट म्हणजे लोकपाल गट....!!! असे लोकपाल गट शेकडोंच्या संख्येने शहरभर सुरु व्हायला हवेत. सरकारी जमा खर्चावर नजर ठेवणे, होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणे, निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला काम करायला लावणे अशा विविध मार्गांनी लोकपाल गट स्थानिक पातळीवरचे प्रशासन सुधारू शकतात. एकदा स्थानिक पातळीवर बदल घडायला सुरुवात झाली की तो बदल हळू हळू वर जायला लागेल. स्थानिक पातळीवरचे खालच्या स्तरातली नोकरशाही आणि राजकारणी मंडळी हाच तर वरच्या भ्रष्टाचाराचा पाया असतो. म्हणूनच पायापासून सुरुवात! 
हजारो मुंग्या प्रचंड ताकदवान अशा हत्तीला जेरीला अनु शकतात ही साधी गोष्ट या लोकपाल गटाच्या कल्पनेमागे आहे...! जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येऊन भ्रष्टाचार मिटवण्याच्या दिशेने कृती करत नाही तोवर असले पन्नास अण्णा सुद्धा भ्रष्टाचार संपवू शकत नाहीत. म्हणूनच लोकपाल गटांची आवश्यकता आहे. मी लोकपाल बनून माझ्या भागात एकही गैरप्रकार होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. तरच लोकशाही मजबूत आणि प्रगल्भ होईल. 
Updates (Date: 18th Sept 2011): कालच संभाजी बाग इथे लोकपाल गट सुरु करण्याविषयी प्राथमिक बैठक झाली. शहराच्या विविध भागातून आलेले सुमारे १०० लोक या बैठकीला हजार होते. अगदी खराडी पासून कोथरूड पर्यंत आणि कात्रज पासून पिंपरी चिंचवड पर्यंत च्या भागातून लोक आले होते. घोले रोड, कोथरूड, वारजे कर्वेनगर आणि सहकारनगर या पुणे महापालिकेच्या चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक अशा पाच लोकपाल गटांची सुरुवात काळ करण्यात आली आहे. अशाच प्रकारे इतर क्षेत्रीय कार्यालये अगदी प्रत्येक वॉर्ड मध्ये लोकपाल गट स्थापन करण्यात यायला हवेत. फेब्रुवारी २०१२ पासून पुण्यात १५२ आणि पिंपरी चिंचवड मध्ये १२४ नगरसेवक असणार आहेत. तेवढे लोकपाल गट खरेतर असायला हवेत..!! अशा स्थानिक पातळीवर लोकपाल गट कार्यरत झाले आणि त्यांचे मजबूत जाळे तयार झाले तर पुणे पिंपरी चिंचवड परिसरात भ्रष्टाचार तर कमी होईलच पण खरीखुरी प्रगल्भ लोकशाही नक्कीच येऊ शकेल...!
विशेष नोंद घ्यावी:- ज्यांना खरोखरच भ्रष्टाचार संपावा असे वाटते त्यांनीच सहभागी व्हावे. हा "कार्यक्रम" नाही. मेणबत्त्या वगैरे पेटवून घरी जाण्याचा सोपा मार्ग इथे नाही. ही एक गंभीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार संपवण्यासाठी कृती कशी करावी याविषयी चर्चा केली जाईल आणि त्या दिशेने 'कृती' करण्यासाठी लोकपाल गट तयार असतील

Tuesday, August 30, 2011

गैरसमजुतीच्या भोवऱ्यात...


अण्णांच्या निमित्ताने, देशभर चर्चा वादविवाद मोर्चे, आंदोलने, आरोप प्रत्यारोप यांचा पाऊस पडला. एकूणच फारसा मतदानाला कधी बाहेर न पडलेला, भ्रष्टाचाराला भरपूर हातभार लावलेला- पण मनातून भ्रष्टाचार नकोसा असलेला, एकूणच प्रस्थापित व्यवस्थेविषयी असंतोष बाळगणारा पण स्वतः काहीही करण्याची इच्छा असूनही धमक नसणारा असा मध्यमवर्ग अण्णांना पाठींबा द्यायला मोठ्या संख्येने रस्त्यावर आला. अण्णा म्हणतील तसे झाले तर कदाचित सर्व भ्रष्टाचार नष्ट होईल, देशातून सोन्याचा धूर निघू शकेल अशी भाबडी आशा बाळगणारा हा वर्ग (काही जणांना तर १ रुपयाला ४० डॉलर अशी आपली अर्थव्यवस्था झाली असेल अशी स्वप्नेही पडू लागली!). अर्थात या सगळ्यामध्ये असलेला लोकांचा सहभाग आणि सहभागामागे असलेली भावना ही शंभर टक्के प्रामाणिक होती याबद्दल मला जराही शंका नाही. अनेक लोक काहीतरी बदल घडतोय आणि आपण त्याचा भाग असला पाहिजे अशा भावनेनेही आले होते. 
अगदी पहिल्यापासून, एप्रिल मधल्या अण्णांच्या उपोषणापासूनच लोक राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या नावे बोंब मारत होते. प्रत्येक वेळी मोर्चा, सभा वगैरे साठी येणाऱ्या लोकांमध्ये राजकीय पक्षांबद्दल पराकोटीचा तिरस्कार दिसून येत होता. आपले राज्यकर्ते हे एकजात चोर आहेत आणि सगळ्यांना शनिवारवाड्यावर फाशी दिले पाहिजे असे म्हणणारेही असंख्य लोक मला या सगळ्या कालावधीत भेटले. लोकशाही मध्ये लोकच आपल्या राज्यकर्त्यांबद्दल असे म्हणताना पाहून मी चकित झालो. नाराज झालो. दुखावलो गेलो. 

फेसबुकवर आपल्या प्रोफाईल वर पॉलीटीकल व्ह्यूज या कॉलम मध्ये 'नॉट पॉलीटीकल' असे अभिमानाने लिहिणारे असंख्य लोक असतात. त्याचा या मंडळींना अभिमानही असतो. (यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा खूपच जास्त आहे. संसदेपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र महिलांना ५०% आरक्षण दिलेलं असताना एका बाजूला ही अवस्था!) अनेकदा आमच्या परिवर्तन संस्थेसंदर्भात असंख्य लोकांना भेटायची वेळ येते. परिवर्तन ही एक राजकीय संघटना आहे असे सांगितल्यावर लोक बिचकतात. 'म्हणजे कोणत्या पार्टीचे तुम्ही' असे संशयानेच विचारतात. 'निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण नव्हे, लोकांचे हक्क अधिकार याविषयी आम्ही काम करतो जे राजकीयच आहे' अशा आशयाचे ५ मिनिटांचे स्पष्टीकरण दिल्यावर लोकांचा आमच्यावर विश्वास बसतो. हे झालं सामान्य लोकांचं. ते एकवेळ ठीक आहे. पण आम्ही राजकीय नाही असे सामाजिक संस्थांचे लोक जेव्हा सांगतात तेव्हा माझं डोकंच फिरतं. स्वतःला जागरूक म्हणवणारा हा गट असून राजकीय नाही असे अभिमानाने सांगणे या सारखा महामुर्खपणा कोणत्याही लोकशाही देशात दिसणार नाही. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत उभारलेली राज्यकर्ती संस्था. जर संपूर्ण यंत्रणाच लोकांची असेल तर खुद्द लोकच अ-राजकीय कसे असू शकतात??? लोकशाहीमध्ये मानो या न मानो, आपण राजकारणाशी जोडलो गेलेलो असतोच. सकाळी चहातली साखर आणि वर्तमानपत्र इथूनच राजकारणाच्या प्रभावाची सुरुवात होते. आणि हा प्रभाव कायम सुरूच असतो. मनोरंजनापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत. सर्वत्र राजकारण आहेच आणि असणारच कारण ही लोकशाही आहे. 'मी राजकीय आहे' असे ज्या दिवशी आपण आणि आपल्यातले बहुसंख्य अभिमानाने म्हणायला शिकू त्या दिवशी या देशातली लोकशाही यशस्वी होऊन प्रगल्भ व्हायला लागली आहे असे म्हणता येईल. तोपर्यंत आपण अजूनही बाल्यावस्थेत आहोत. लोकशाहीच्या प्रगल्भतेच्या दृष्टीने तेराव्या चौदाव्या शतकात इंग्लंड मध्ये असलेली परिस्थिती आणि आत्ताची आपली परिस्थिती यात मला फार काही फरक जाणवत नाही. आपण उठता बसता टिळक-गांधी-सावरकर-नेहरू ही नावे घेतो, पण हे नेमके कशासाठी भांडले याची 'समज' फारच थोड्यांना आहे बहुतेक. माहिती अनेकांना आहे. पण माहिती असणे म्हणजे समज असणे असे नव्हे. हे लोक ब्रिटीशांच्या विरुद्ध लढले नाहीत. हे लढले भारतीयांच्या राजकीय हक्कांसाठी. जर युद्ध फक्त ब्रिटीशांच्या विरुद्ध असतं तर १५ ऑगस्ट नंतरही सुरु राहिलं असतं. लढाई होती ती राजकीय हक्कांसाठी. प्रत्येक भारतीय नागरिकाला राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी हे सगळे लोक लढले आणि आज पासष्ट वर्षानंतर तेच अधिकार हक्क वापरायला नकार देण्यात आपण धन्यता मानतोय. 

 नागरिक शास्त्र हा कंटाळवाणा विषय न राहता यातून प्रत्यक्ष राजकीय शिक्षण दिले गेले पाहिजे. आपण नागरिक म्हणून या देशाचे मालक आहोत, राजे आहोत. आपण आपले अधिकार नाही वापरले तर कोणीतरी आपल्यावर दादागिरी करणारच. आणि कोणीतरी दादागिरी करतंय म्हणून मी आपले अधिकार वापरतच नाही असे अभिमानाने सांगणे यात कसला आलाय शहाणपणा? लोकपाल येईल..पण ती एक केवळ व्यवस्था असेल. आणि लोकपालाची व्यवस्था तेव्हाच सक्षम असेल जेव्हा खुद्द नागरिक सक्षम असतील, राजकीय दृष्ट्या जागरूक असतील. अ-राजकीय  या शब्दातच अराजक आहे. तेव्हा आपल्याला एक सक्षम लोकशाही व्यवस्था हवी आहे की अफगाणिस्तान-पाकिस्तान सारखे अराजक याचा विचार आपण केला पाहिजे. आज जी लोकशाही आपल्या इथे शिल्लक आहे तिचा सपशेल पराभव होईल. म्हणूनच अराजकाला आमंत्रण देणारी अ-राजकीय असण्याची विचारधारा मोडून काढली पाहिजे. आपल्यातला प्रत्येक जण राजकीय आहे... राजकीय असलाच पाहिजे. राजकीय विचारधारा काय पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण ती असली पाहिजे एवढे मात्र निश्चित. 
अ-राजकीय असण्याने आपण फार स्वच्छ शुद्ध, निरपेक्ष, निस्वार्थी असल्याचा गैरसमज अनेकांना होतो. या गैरसमजाच्या भोवऱ्यात आपण अडकलो आहोत. यातून आता बाहेर येऊया. आपल्या लोकशाहीला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवूया. 

Friday, August 19, 2011

एक वर्ष

जानेवारी २०११
बऱ्याच दिवसांनी एक ओळखीचा मुलगा गणूला भेटला. "काय रे काय करतोस आजकाल?", गणूने विचारले. 
"मी एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे", तो कार्यकर्ता उद्गारला. गणूच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. असे काहीतरी शब्द तो प्रथमच ऐकत होता. "अरे माहिती अधिकार कायदा येऊन साडेपाच वर्ष उलटली तुला हा कायदा माहित नाही?", कार्यकर्त्याने गणूला विचारले. पण गणूने तुच्छतेने नकारार्थी मान हलवली. जणू ही गोष्ट माहित असणे गरजेचे नाही. कार्यकर्ता नाराज झाला. त्याने आपल्या संस्थेचे महत्व गणूला सांगितले. माहिती अधिकार कायद्याबद्दल सांगितले. गणूला आनंद झाला. "खरंच खूप चांगले काम करता रे तुम्ही. ऑल द बेस्ट!", गणूने कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या. कार्यकर्ताही आज आपण एकाला जागरूक नागरिक बनवले या खुशीत निघून गेला. 

एप्रिल २०११ 
क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर फर्ग्युसन रोड वर जो दंगा घातला होता त्यातले स्वतःचे फोटोज गणू फेसबुक वर अपलोड करत होता. तेव्हढ्यात त्या कार्यकर्त्याने गणूला पिंग केले. 
karykarta: kay re kasa ahes?
Ganu: mast! tu?
k: sadhya jordar kama chalu ahet re. Anna hazarencha uposhan ahe. corruption door karnyasathi. 
Ganu: kay mast match zali re final... ek number jinklo apan..! dhoni chi ti shewatchi six mhanje tar ahahaha! 
k: kharay... pan ata aplyala corruption against match jinkaychie... 
Ganu: hm
K: Aik udya Balgandharv chowk te Shaniwarwada asa candle march ahe, anna hazare yanna support karnyasathi.
Ganu: ok..
K: tar nakki ye march la.. 
Ganu: hmm baghto..try karto. baki kay?
K: kahi nahi re. udyachi tayari chalue... tu volunteer mhanun join ka hot nahis? khup important cause ahe re... 
Ganu: chalo g2g... jara kam ahe. c u l8r, bye, tc. 

७ ऑगस्ट २०११
गणू बालगंधर्व चौकातून जात होता. तेवढ्यात त्याला समोर झाशीच्या राणीच्या पुतळ्याखाली २५-३० जणांचा घोषणा देणारा जमाव दिसला. "अरे काय चालू आहे हे?" कार्यकर्त्याला पाहून गणूने विचारले. 
"निषेध मोर्चा! अरे गणू, आपला पुण्याचा खासदार भ्रष्ट आहे आणि तिहार जेल मध्ये आहे. हे आपण सहन नाही केले पाहिजे. याचा निषेध तू मी आणि सगळ्या पुणेकरांनी मिळून केला पाहिजे. सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"फारच छान, तुमचा हेतू फारच उत्तम आहे. मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेला... गेलाच...! 

१८ ऑगस्ट २०११
जिकडे तिकडे अण्णांच्या आंदोलनाच्या बातम्या. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतायत सगळ्या शहरांमध्ये. एक दिवस गणूला त्याच्या मित्रांचा फोन येतो. "अरे गणू, उद्या एक मोर्चा आहे. अण्णांना पाठींबा देण्यासाठी. आपण जाऊया. संध्याकाळी ६ वाजता." गणूने थोडा वेळ आढेवेढे घेतले. "अरे चल रे... मोर्चा संपल्यावर सगळे मस्त जेवायला जाऊ कुठेतरी..." मित्राने आग्रह केल्यावर गणू तयार झाला. अखेर गणू आपल्या मित्रांबरोबर बालगंधर्व चौकात हजार होतो जिथून मोर्चाची सुरुवात होणार असते. 
"अरे तू इथेसुद्धा आहेस वाटतं?" कार्यकर्त्याकडे पाहून गणू आश्चर्याने विचारतो.
"म्हणजे काय? मी पहिल्यापासून आहे न या आंदोलनात...!", कार्यकर्ता उद्गारतो. 
"अरे हो की... विसरलोच..", पुढे काही गणू बोलणार एवढ्यात घोषणांचा आवाज येतो- " एक सूर एक ताल" त्यापाठोपाठ आजूबाजूचे सगळे ओरडतात," जन लोकपाल जन लोकपाल"... 
सगळेच जण मोर्चाबरोबर चालू लागतात. जोरदार घोषणा झेंडे, बोर्ड यांनी वातावरण एकदम झकास तयार झालेले असते.'मी अण्णा हजारे' लिहिलेली गांधी टोपी घालून गणूही मोर्चात चालू लागतो. मोर्चा यशस्वी होतो... आपण केलेल्या प्रचंड देशसेवेमुळे गणू त्या रात्री अतिशय समाधानाने झोपी जातो. 


नोव्हेंबर २०११
अण्णांचे आंदोलन संपलेले असते. अण्णा आणि सरकार यांच्यात उभयपक्षी मान्य तोडगा निघतो. गणूचे नेहमीचे उद्योग सुरळीत चालू असतात. एक दिवस रस्त्यात कार्यकर्ता भेटतो. त्याच्या आजूबाजूला २५-३० लोकांचा घोषणा देणारा जमाव असतो. "अरे काय रे हे?", गणू कार्यकर्त्याला विचारतो.
"आपल्या खासदाराने अजून राजीनामा दिला नाहीये. असा भ्रष्ट आणि स्मृतिभ्रंश झालेला खासदार आम्हाला नको हे आपण सरकारला सांगितलं पाहिजे."- कार्यकर्ता.
"खरंय रे तुझं म्हणणं...", गणूला पटते. 
"सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेलाच...! 

जानेवारी २०१२ 
पुणे महापालिकेच्या निवडणुकांची धामधूम चालू असते. जिकडे तिकडे घोषणा, पत्रके, सभा! गणू एकदा रस्त्यावरून जात असतो तेव्हा त्याला रस्त्यात उभा राहून पत्रके वाटणारा कार्यकर्ता दिसतो. "अरे काय रे हे?" गणू विचारतो. 
"मतदान जागृती. पुढच्या आठवड्यात निवडणूक आहे. मतदान कर नक्की. मतदान करणे हा आपला लोकशाही हक्क तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते आपले कर्तव्य आहे." 
"नक्की करणार मतदान...!"- गणू.
मतदानाच्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने आणि लागूनच शनिवार रविवार आल्याने गणू आणि मित्रमंडळी कोकणात ट्रीप ला गेले...

"लोकशाही म्हणजे काय हेच आपण पार विसरून गेलो आहोत." अतिशय निराश मनस्थितीत कार्यकर्ता फेसबुक वर आपले स्टेटस अपडेट करतो. त्याच्याच खाली त्याच्या 'वॉल' वर गणूचे कोकण ट्रीप चे फोटोज अपलोड केलेले दिसत असतात. कार्यकर्ता निराश होतो. हताश होतो... पण तेवढ्यात गणूने नव्याने अपलोड केलेला फोटो त्याच्या वॉल वर दिसतो ज्यामध्ये गणू मतदान केल्यावर बोटावर केली जाणारी खूण दाखवत असतो... कार्यकर्त्याला आश्चर्य वाटते. फोटोच्या खाली गणूने लिहलेले असते- "कोकणात निघण्या आधी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र उघडल्या उघडल्या मतदानाचा अधिकार बजावला. माझा प्रतिनिधी भ्रष्ट असणार नाही याची मतदान करताना तरी मी काळजी घेतली आहे..!" 
 थोड्याच वेळात अनेकांचे असे फोटोज फेसबुक वर झळकू लागले. प्रयत्न वाया गेले नव्हते... कार्यकर्त्याला उत्साह आला. आणि त्याने अधिकच धुमधडाक्यात कार्याला सुरुवात केली...!