Sunday, March 31, 2013

सरकारी कार्यालयांचा बागुलबुवा


रकारी कार्यालय म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं - एखाद्या जुन्या पिवळट रंग असलेली उदासवाणी इमारत, आतमध्ये ठेवलेले अगदी सरकारी दिसणारे फाइल्सचे ढीग, त्या ढिगाच्या आड लपलेला एखादा उदासवाणा चेहरा करून बसलेला कर्मचारी, आपण जाताच त्या कर्मचाऱ्याच्या कपाळावर ‘काय ही नवी ब्याद’ अशा अर्थाचे आठ्यांचे जाळे पसरणार आणि आपण काहीही बोलायच्याही आतच त्यांच्या डोक्यात “साहेब आज नाहीएत, उद्या या” ठराविक उत्तराची ‘टेम्प्लेट’ मनात तयार होऊन ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटणार! हे काल्पनिक चित्र आपल्या डोक्यात इतके पक्के बसलेले असते की यापेक्षा वेगळे काही अनुभवाला आले तर ते सरकारी कार्यालय नव्हेच अशी ठाम समजूत करून घेणारेही सापडतील!

परवा एक मैत्रीण आपल्या पुण्यातील एका क्षेत्रीय कार्यालयात गेली होती. (काय करणार, जन्म दाखल्याचं काहीतरी काम आल्याने जावंच लागलं!), त्यावेळी तिथे किमान एक अख्खा दिवस जाईल, अशा मानसिक तयारीने ती गेली होती आणि काम होऊन अवघ्या १० मिनिटात बाहेर पडल्यावर तिला इतकं आश्चर्य वाटलं की भेटेल त्याला सरकारी कार्यालयातली ही ‘जादू’ सांगत होती!!
असो, तर सांगायचा मुद्दा असा की, जर आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर अनेकदा केवळ कल्पनेनेच आपण निष्कर्षाला पोहचतो. आणि या चुकीच्या निष्कर्षाला जाण्याच्या सवयीचा सर्वाधिक फटका माझ्यामते सरकारी कार्यालयांना बसला असेल! काही लोक स्वतःला अगदी वेगळे आणि क्रिएटीव्ह वगैरे समजत असतील पण प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातल्या या काल्पनिक भीतीवरून सर्वच जण भरपूर क्रिएटीव्ह असतात हे अगदी स्पष्ट आहे!

वर वर्णन केल्याप्रमाणे अनेक सरकारी कार्यालये अशी उदासवाणी दिसतात यात शंकाच नाही. पण कर्मचाऱ्यांबाबत मात्र आपली कल्पना सपशेल चुकते. ‘परिवर्तन’ या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना मी अक्षरशः किमान शे-दीडशे शासकीय कर्मचाऱ्यांना भेटलो असेन. पण त्यातले जेमतेम चार-पाच वगळता बाकी सर्वांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. अनेकांनी आमच्या कामाला प्रोत्साहन दिले, कौतुक केले, सल्ले दिले, मदत केली. शासकीय कर्मचारी हे शेवटी याच समाजाचा भाग आहेत. तुम्हाला आणि मला जसा बदल व्हावा असं मनापासून वाटतं, तसं ते त्यांनाही वाटत असतंच. अशावेळी व्यवस्था सुधारण्याची जिद्द बाळगत २०-२५ वर्षांचे तरुण धडपड करताना त्यांना दिसतात तेव्हा त्यांच्यातही एक जोम येतो आणि अतिशय उत्साहात येत ते मदत करतात. आणि हाच अनुभव बहुतांशवेळा आमच्यातल्या प्रत्येकाने घेतला आहे.

वाईट अनुभवही आलेच. पण त्याहीवेळी आपण शांत राहणे हिताचे. त्यावेळी आवाज चढवणे, कटकट करणे या गोष्टींनी आधीच वाईट वागणारा कर्मचारी अजूनच तिरसट वागतो. महापालिकेत सध्या आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचारी आहेत. साहजिकच सध्याच्या कर्मचाऱ्यांवर जास्तीचा भार असतो. त्याशिवाय निवडणूक, आधार कार्ड, जनगणना अशी जास्तीची कामं त्यांच्यावर येतंच असतात. वर राजकारणी मंडळींचा दबाव. हे सगळे असूनही त्यांनी त्यांचे काम उत्तम पद्धतीने करणेच अपेक्षित आहे यात शंका नाही, पण कायम लढाई मारायला निघालेल्या सैनिकासारखे जाण्यापेक्षा समजुतीने घेत काम केल्याने त्यांच्याही डोक्याला ताप होत नाही आणि आपल्याही... शिवाय कामही होते. अर्थात त्यांचा कामचुकारपणा दिसल्यास नागरिक म्हणून आपले हक्कांचे आणि अधिकारांचे शस्त्र उगारायला मुळीच हरकत नाही.(त्यासाठी आधी आपले अधिकार आणि हक्क नेमके माहित करून घ्यायला हवेत!). पण ती वेळ क्वचित येते असा माझा अनुभव आहे!
तुम्ही माहिती अधिकारात माहिती मागायला गेल्यावर बहुतांश कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर काय ही ब्याद हेच उमटते हे खरे आहे. पण अगदी ब्रिटीश काळापासून रुजलेल्या बंदिस्त नोकरशाहीला ७-८ वर्षांपूर्वी आलेला माहितीचा अधिकार कायदा एकदम कसे बदलवेल? आपल्याला थोडी वाट पहावी लागेल. नव्या बदलांना पटकन जुळवून घेण्याची कला शासकीय यंत्रणेत अभावानेच आढळते. यंत्रणेचा अवाढव्य पसारा हे जसे कारण आहे तसेच लोक आणि यंत्रणा यांच्यातला परस्पर अविश्वास हेही यामागे कारण आहे. परस्पर सामंजस्य, विश्वास आणि शिस्त यातून सरकारी कार्यालयांचा कारभार सुधारू शकतो. पण यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असेल तर आणि तरच हे घडेल याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. त्यामुळे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यात आपण सामील झाले पाहिजे. सरकारी कार्यालये ही कधी न जाण्याची नव्हे आपल्या नित्य येण्या-जाण्याची ठिकाणे बनायला हवीत. आणि हे सगळे करत असताना धीर धरणे, संयम राखणे आणि तरीही नेटाने काम करणे याला महत्व आहे. शंभर वर्षे घट्ट रुजलेल्या नोकरशाहीत परिवर्तन घडवायचे तर ते चार-दोन दिवसांत थोडीच होणार आहे? बदल हळू हळूच होईल, पण जो होईल तो दीर्घकालीन असेल!
मग करायची न सुरुवात?!

(दि ३० मार्च २०१३ रोजी महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध)

Tuesday, March 12, 2013

लोकसहभाग आणि मोहल्ला कमिट्या


लोकशाहीत शासन व्यवस्थेतला, गव्हर्नन्स मधला, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे याबाबत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. पण हा सहभाग वाढवावा कसा? यासाठी काही व्यासपीठे आहेत काय? आम्हाला सहभागी व्हायचे आहे पण कसे सहभागी होऊ असे विचारणाऱ्या नागरिकांना द्यायला काही उत्तर आहे काय?
हो! उत्तर आहे- मोहल्ला कमिटी!
पुणे महानगरपालिका
पुणे महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये (ward offices) आहेत. नागरिकांची सामान्य कामे त्यांच्या त्यांच्या भागातच व्हावीत, त्यांना महापालिकेच्या मुख्य बिल्डींगपर्यंत यायचे कष्ट पडू नयेत आणि विकेंद्रित पद्धतीने शासनव्यवस्था उभी राहावी यासाठी या क्षेत्रीय कार्यालयांची उभारणी झाली आहे. कोथरूड, वारजे-कर्वेनगर, घोले रोड, कसबा, भवानी पेठ, सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कोंढवा, हडपसर, येरवडा, ढोले पाटील रोड, औंध, टिळक रोड आणि नगर रोड अशी ही क्षेत्रीय कार्यालये पुण्यात आहेत.   
पुण्यातील नैशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज (NSCC) या अतिशय जुन्या, जाणत्या आणि प्रभावी सामाजिक संस्थेच्या मागणीवरून दि. २६ ऑक्टोबर २००५ रोजी पुणे महापालिका आयुक्तांनी एक आदेश काढला आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोहल्ला कमिटीच्या बैठका सुरु करण्याचे त्यात नमूद केले. नागरिकांच्या दृष्टीने ही फारच मोठी गोष्ट होती. मोहल्ला कमिटीच्या बैठका म्हणजे काय तर नागरिकांनी एकत्र यावे त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी आणि समस्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांपुढे मांडाव्यात. यातून सरकार-नागरिक असा सुसंवाद वाढेल. नागरिकांच्या समस्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना समजतील आणि एकूणच सुशासनाच्या दिशेने वाटचाल होईल या आशेवर सुरु केलेल्या बैठका. या बैठकांना कोणताही नागरिक उपस्थित राहू शकतो. तसेच क्षेत्रीय अधिकारी आणि त्याच्या हाताखालचे कर्मचारी या बैठकांना उपस्थित असतात. गेल्या ७-८ वर्षात नागरिकांनी अशा प्रकारे या उपक्रमात सहभागी होत कित्येक समस्यांचे निराकरण करून घेतलेही आहे. या बाबतच्या चिकाटीचे आणि हा उपक्रम जिवंत ठेवण्याचे सर्व श्रेय हे NSCC च्या सदस्यांना जाते आणि त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच. ज्या सातत्यपूर्ण पद्धतीने हे झाले ते निश्चितच कौतुकास्पद होते.

पण तरीही दिवसेंदिवस शहराची परिस्थिती का बिघडते आहे? लोकसहभाग वाढण्याच्या ऐवजी कमी कमी का होत चालला आहे? माझ्या दृष्टीला दिसणारी मूलभूत कारणे दोन. त्यातल्या पहिल्या आणि महत्वाच्या कारणाचा समाचार घेऊया.
या मोहल्ला समितीच्या बैठका गुरुवारी घेण्यात येतात.(तसे आयुक्ताच्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.) म्हणजेच बहुसंख्य नोकरदार वर्गाचा कामाचा दिवस. साहजिकच इच्छा असूनही त्यांना सहभागी होता येत नाही. लोकांना सुट्टी कधी असते असा विचार करता पिंपरी चिंचवडचा औद्योगिक भाग वगळता, बहुसंख्य लोकांना शनिवार-रविवार सुट्टी असते असेच आपल्या लक्षात येईल. खरे तर या बैठका रविवारीच व्हाव्यात. कारण शनिवारपेक्षाही रविवारी सुट्टी असणाऱ्यांची संख्या अधिक. पण सरकारी कामे रविवारी कशी होणार! तेव्हा तडजोड म्हणून शनिवारी व्हाव्यात! म्हणजे अनेक विद्यार्थी, नवमध्यमवर्गातील अनेक लोकांना येणे शक्य होईल. शनिवारी मोहल्ला कमिटीच्या बैठका ठेवल्या तरी लगेच लोकांचा त्याला भरपूर प्रतिसाद मिळू लागेल आणि परिवर्तन होईल असा माझा दावा नाही. किंबहुना असे कोणाला वाटत असेल तर त्याच्या अकलेची तारीफच करायला हवी. पण निदान लोकसहभागाचे दरवाजे अधिकाधिक उघडण्याकडे आपला कल असला पाहिजे. गुरुवारी बैठका घेऊन दरवाजे बंद करून काय साध्य होणार? अशाने मोहल्ला कमिट्या या निव्वळ फार्स बनतील. मोहल्ला कमिटीच्या बैठका अधिकाधिक खुल्या आणि सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न व्हायला नको काय? सध्या या बैठकांना सरासरी १० ते १२ नागरिक हजार असतात. उपस्थित नागरिकांचे सरासरी वय ५५-६० असे असते. जगातील सर्वात तरुण देश असे आपल्या देशाला म्हणले जात असताना त्यांच्या सोयीचा विचार या बैठकांचा दिवस ठरवताना होऊ नये हे शुद्ध बिनडोकपणाचे लक्षण आहे. सुरुवात गुरुवारी झाली म्हणून ते बदलू नये हे म्हणणे म्हणजे पहिले सरकार कॉंग्रेसचे होते तर आताही कॉंग्रेसच सत्तेवर असावे असे म्हणण्यासारखे आहे. निःपक्षपाती निवडणुका होऊन ज्याचे सरकार यायचे ते येवो. मुद्दा हा की सुरुवात काही झाली तरी आता ती पद्धत बदलू नये या बोलण्याला कुठलाही तर्कसंगत आधार नाही.

नैशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज (NSCC) या संस्थेची बैठक शनिवारी महापालिका भवनात असते (एका सामाजिक संस्थेची बैठक महापालिका भवनात होणे कायदेशीर आहे काय याबाबत मला शंका आहे. पण सध्या ते जाऊ द्या!) आणि म्हणून क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठका शनिवारी घेण्यात येऊ नयेत अशी भूमिका २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी मांडली आहे. मात्र ही भूमिका स्वीकारार्ह नाही. कारण क्षेत्रीय कार्यालयातील बैठका या कोणा एका संस्थेसाठी नसून नागरिकांसाठी खुल्या आहेत. त्याची सुरुवात या संस्थेने केली आहे याबद्दल आदरच आहे. पण सुरुवात केली त्यांनी म्हणून नागरिकांसाठी असलेला उपक्रम त्यांच्या सोयीने व्हावा हे हास्यास्पद आहे. तसेच त्यांचे असेही म्हणणे आहे की “नागरिकांच्या कमिट्या वेगळ्या आणि क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठका वेगळ्या. तुम्ही नागरिकांना एकत्र करून नागरिकांची कमिटी तयार करा आणि त्यात होणाऱ्या गोष्टी जे लोक गुरुवारी क्षेत्रीय कार्यालयातल्या बैठकांना जातात त्यांच्याकडे द्या. तुम्ही सर्वांनीच तिकडे जाण्याची काय गरज.” पण त्यांचे हे म्हणणेही मान्य करता येत नाही कारण जर हा उपक्रम नागरिकांसाठी खुला असेल त्यांनी परत स्वतंत्रपणे स्वतःला सोयीच्या वेळी एक कमिटी स्थापन करून नंतर गुरुवारी जाणाऱ्या मंडळींबरोबर समन्वय साधायचा, त्यांना आपला मुद्दा पटवून द्यायचा, त्यांनी तो मुद्दा गुरुवारी मांडला का याकडे लक्ष द्यायचे?? या सगळ्या गोष्टी जर नवख्या नागरिकाला सांगायच्या ठरवल्या तर तो वैतागून जाणार आणि परत कधीही इकडे फिरकणार नाही. अधिकाधिक नागरिकांना आपल्याला सहभागी करून घ्यायचे असल्यास त्यांची सोय बघावी हे कोणताही मार्केटिंगमधला माणूस सांगेल. गोष्टी सोप्या करा, लोक तुमच्याकडे येतील. लोकांनी सुट्टी काढून, स्वतःची अडचण करून, काय वाट्टेल झाले तरी जमवून यावे ही पारंपारिक पुणेरी मानसिकता सोडली पाहिजे. (पुणेरी अशासाठी की, ‘आम्ही आमच्या पद्धतीने वेळ ठेवणार दुकानाची. गिऱ्हाईकाला यावे वाटले तर तो येईल’ अशी पुण्यातल्या दुकानदारांची खास पद्धत आपल्या ओळखीची आहेच!)
शिवाय गुरुवारच्या बैठकीला जे औपचारिक रूप आहे ते नागरिकांना एकत्र आणून नुसत्या तयार केलेल्या समित्यांना कसे काय येऊ शकेल? अधिकृत आदेशाद्वारे सुरु झालेल्या या क्षेत्रीय कार्यालयातील बैठकांना काहीएक महत्व आहे. आणि म्हणूनच बहुसंख्य नागरिकांना सोयीचा पडेल असेल असाच दिवस अधिकृत अशा क्षेत्रीय कार्यालयातील बैठकांसाठी निवडणे योग्य होईल. अन्यथा नागरिकांऐवजी एका संस्थेला झुकते माप देण्याचा प्रकार घडतो आहे असे आपल्याला खेदाने म्हणावे लागेल. ज्याला व्यक्तीशः माझा प्रखर विरोध असेल.

सध्याच्या मोहल्ला कमिट्या आवश्यकतेपेक्षा कमी प्रभावी असण्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे मोहल्ला कमिट्यांना आलेले तक्रार निवारण केंद्राचे स्वरूप. नागरिक त्यांच्या भागातल्या रस्ता नीट नाही, रस्त्यावरचे दिवे नाहीत, फुटपाथ वाईट आहे, कचरा उचलला जात नाही अशा विविध समस्या बैठकांत मांडतात. त्या समस्या क्षेत्रीय अधिकारी तत्परतेने लिहून घेतो. हाताखालच्या अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करायचे आदेश देतो. याशिवाय मागच्या महिन्याच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत काय झाले, त्यावेळी आलेल्या तक्रारींवर प्रशासनाने काय कार्यवाही केली याचेही तपशील उपस्थितांना दिले जातात.
पण मुद्दा असा आहे की, महापालिकेची एखादी सेवा नीट मिळत नसेल (उदा. रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन इ.), तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी कोणत्याही नागरिकास मोहल्ला कमिटीच्या बैठकीची वाट बघण्याची गरज नसते. तो कोणत्याही दिवशी जाऊन ही तक्रार करू शकतो. त्या तक्रारीवर काहीही कार्यवाही झाली नाही तर त्याबाबत जाब विचारायची जागा म्हणजे मोहल्ला कमिटी, तक्रारी करण्याची नव्हे! मोहल्ला कमिटीच्या बैठकीत धोरणात्मक चर्चा व्हायला हवी. मोहल्ला कमिटीच्या बैठकीत क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जी जी कामे केली असतील त्याचे हिशोब तपासावेत. मोहल्ला कमिटीने एखाद्या प्रश्नाबाबत मूलभूत चर्चा करून भूमिका मांडावी. मोहल्ला कमिटीने वर्क ऑर्डर्स, टेंडर्स याबाबतीत कोठे काही भ्रष्टाचार तर होत नाहीये ना याकडे लक्ष द्यावे. मोहल्ला कमिटीने नागरिकांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जात आहे ना याकडे लक्ष द्यावे, मोहल्ला कमिटीने नगरसेवकांच्या बनलेल्या प्रभाग समित्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे, मोहल्ला कमिटीने वॉर्डस्तरीय निधी वापराकडे लक्ष द्यावे, त्यात काही गैर तर होत नाहीये ना याकडे लक्ष द्यावे, मोहल्ला कमिटीने शहराच्या धोरण विषयक बाबतीत मत मांडावे, ठराव मांडावेत, पाठींबा द्यावा, निषेध करावा, आवाहने करावीत.... खऱ्या अर्थाने नागरिकांचे व्यासपीठ बनायची संधी मोहल्ला कमिटी या उपक्रमाला आहे...!

या उपक्रमात अचानक लोक सहभागी होणार नाहीत. आत्ता असलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतील. या उपक्रमातून लोकशक्तीचा परिणामकारक प्रत्यय द्यायला लागेल. तसा आशावाद निर्माण करावा लागेल. पण ज्याक्षणी मनातली मरगळ टाकून लोक काम करायला तयार होतील त्या क्षणी त्यांच्यासाठी व्यासपीठ तयार असले पाहिजे. लोक आले तर मग त्यांची सोय बघू असे म्हणता येणार नाही. नाहीतर मग त्यांच्यात आलेला उत्साह विरून जाईल किंवा गैरमार्गाला लागेल. लोकांच्या परिवर्तनाच्या इच्छेला योग्य दिशेला नेण्यासाठी, त्यातून विधायक काही घडवण्यासाठी मोहल्ला कमिटी हा प्रभावी मार्ग ठरू शकेल याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. गरज आहे ती हा उपक्रम अधिकाधिक नागरिक केंद्रित करण्याची, त्याचे स्वरूप तक्रार करण्याचे ठिकाण असे न ठेवता निर्णय घेण्यात सहभाग घेणारी यंत्रणा असे करण्याची. मूलभूत, दीर्घकालीन आणि व्यापक स्वरूपाचे परिवर्तन घडवायचे तर, व्यक्ती, संस्था, नोकरशाहीची सोय यापलीकडे जाऊन सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी आणावे लागेल...

माझ्या या विचारांशी काहीजण सहमत नसण्याची दाट शक्यता आहे. पण नीट समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास माझी भूमिका नक्कीच पटेल. तरी काही जणांना पटली नाही तर माझा नाईलाज असेल. शेवटी काय हो,  झोपलेल्याला जागं करता येतं... झोपेचं सोंग घेणाऱ्याला कोण आणि कसं जागं करणार?  

Wednesday, February 20, 2013

शहाण्यांचा देश


साडेसहा दशकांची बघून ही दुरवस्था, मनी माझ्या संताप साठला,
षंढ थंड आपण, हृदयांत आपल्या का नाही अजून वडवानल पेटला?

निष्क्रीय जनता पाहून सत्तानगरीत हर्ष अपार दाटतो,
एकच नाही, हरेक रंगाचा झेंडा डौलाने फडकू लागतो.
कोणी म्हणे तिरंग्यात चरखा हेच भविष्य देशाचे,
कोणी म्हणे भगवा हेच जीवन या पवित्र भूमीचे,

तिसरे लाल विळे कोयते, तर निळे चक्र एकाचे.


कोठे अतिवृष्टी तर, कोठे दुष्काळी वैराण मुलूख सारा
थेंबासाठी तडफडे जीव कोठे, कोठे रस्त्यांवर वाहे धारा
वाहून जाती कोणी कधी तूफानात,
भटके शहरोशहरी कोणी भीषण दुष्काळात.
निसर्ग वारंवार असा सत्ताधाऱ्यां फळफळला,
दशदिशांनी पैशाचा पाऊस धो धो कोसळला. 

संपवण्या येथील अधर्म, धरतीवर कोणी अजून नाही अवतरला
इथले निष्क्रीय लोक पाहून तो केव्हाच आल्या पावली परत गेला.
बदल हवा तर तो आपणच घडवायचा, हे नाही जोवर समजायचे,
बडबड अन् चर्चा केली कितीही, परिवर्तन नाही तोवर व्हावयाचे.

भ्रष्ट सिस्टीमशी लढणाऱ्याला कोणी म्हणे हा ठार पागल आहे.
भोगणाऱ्याला कोणी म्हणे बिचारा, भ्रष्ट सिस्टीमचा बळी आहे.
पागल व्हावे की बळी जावे, निवड शेवटी तुमचीच असणार.
दुर्दैव हे, आज तरी बळी जायलाच सगळे लोक आहेत तयार.

आनंदात मश्गुल आपण की, आजचा दिवस जगता आला,
कोणी सांगावे, जर उद्या स्वार्थासाठी कोणी आपला बळी दिला.
थोडेफार भाग्य असेल तर होणार बातमी ती एका दिवसाची,
जास्त असेल भाग्य जरा, तर त्यात भर काही हजार मेणबत्त्यांची.
पुढे सगळे शांत होणार,
बळी जायला लोक रांगा तेवढ्या लावणार.

पोरगी सहज उचलून नेली, बंदूक दाखवत तिजोरी लुटून नेली,
पागल तुम्ही कधी होणार?

गांडीखाली बॉम्ब फुटला, विकून देश पुरता बरबाद केला,
पागल तुम्ही कधी होणार?
साडेसहा दशके चालू तमाशा, शहाणे होऊन बघितलात,
मला सांगा आता,
पागल तुम्ही कधी होणार?


Sunday, February 17, 2013

हे आमचे गुरुच नव्हेत !


रदेशी कपड्यांवर बहिष्काराची मोहीम सुरु झाली तेव्हा त्याला अधिक धार प्राप्त करून देण्यासाठी देशातली पहिली परदेशी कापडाची होळी पेटली ती पुण्यामध्ये मुठेच्या काठावर. या होळीचे नेतृत्व केले होते फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विनायक दामोदर सावरकर या तेजस्वी तरुणाने. अशा या भडक माथ्याच्या देशप्रेमी युवकाच्या कृतीकडे अभिमानाने बघण्याऐवजी फर्ग्युसनच्या प्राचार्यांनी, रेन्ग्लर र.पु.परांजपे यांनी, या स्वातंत्र्यवीराला होस्टेल मधून काढून टाकले आणि दंडही ठोठावला. देशप्रेमाची दीक्षा देण्याच्या उद्देशाने आपण सुरु केलेल्या फर्ग्युसन कॉलेजाच्या प्राचार्यांची ही कृती बघून लोकमान्य टिळक संतापले आणि त्यांनी केसरी मध्ये अग्रलेख लिहिला- ‘हे आमचे गुरुच नव्हेत !’.

आजची परिस्थिती काही फार वेगळी आहे असे मानायचे कारण नाही. गोऱ्या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याला आपल्या कॉलेजात बंदी घालणारे महाभाग जसे स्वातंत्र्यपूर्व काळात होते तसेच आता स्वातंत्र्य असतनाही सरकारच्या विरोधात उठणारे आवाज कॉलेजात मात्र आज दाबले जातात. परिवर्तन या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जेव्हा कोणत्याही कॉलेजात जातो, तिथे विद्यार्थ्यांशी बोलू इच्छितो, त्यांना राजकीय परिवर्तनाच्या कार्यात खेचू इच्छितो तेव्हा आमच्या या कार्याच्या आड येतात ते तिथले प्राध्यापक आणि प्राचार्य. अर्थात काही सन्माननीय अपवाद आहेत, नाही असे नाही. पण ते अत्यल्प आहेत. बहुतांश प्राध्यापक आणि प्राचार्य हे ‘आमच्या कॉलेजात राजकारणाची ब्याद नको’ अशा मनोवृत्तीचे आहेत. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाची गोडी निर्माण व्हायला हवी, राजकीय बाबींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसायला हवा. तरुणांनी राजकारणात यायला हवे असे सगळेच म्हणतात. पण विद्यार्थ्यांना राजकीय परिवर्तनाच्या कार्यात सहभागी करून घ्यायला आमच्यासारख्या संस्थांनी जावे तर आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवणारे हेच लोक असतात. राजकीय विषयांवर चर्चा घेण्यासारख्या निरुपद्रवी गोष्टींवरही हे लोक बंदी घालतात तेव्हा यांच्या अकलेची तारीफ करावी वाटते. देश उभारणीच्या गप्पा मारणारे हे लोक तरुणांना राजकारणापासून दूर नेणारे आणि पर्यायाने देशाला अराजकाकडे नेणारे कृत्य करत असतात तेव्हा यांना ‘गुरु’ कोणत्या तोंडाने म्हणावे?

आम्हाला काम करताना जाणवते, विद्यार्थ्यांची सगळ्या विषयांवर काही विशिष्ट मते आहेत, व्यवस्थेबद्दल राग आहे, परिवर्तन व्हावे अशी इच्छा आहे पण त्यांना व्यासपीठ नाही. पालक आणि गुरुजन हे दोघेही आपापल्या पद्धतीने तरुणांच्या राजकीय जाणिवांची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न करत असताना तरुणांनी जावे कोठे? मग कुठे कुठे हे लोक फ्लैशमॉब किंवा मेणबत्ती मोर्चा काढून व्यक्त होत आहेत. पण त्यांच्या या व्यक्त होण्याने जेव्हा परिवर्तन घडत नाहीये तेव्हा त्यातले बहुतांश हे ‘कुछ नहीं हो सकता’ म्हणत भंपक, उदासीन आणि निष्क्रीय नागरिक बनत आहेत तर काहीजण नुसतेच उद्विग्न होत आहेत, अस्वस्थ होत आहेत.
देशातील बहुतांश जनता आज तरुण वर्गात मोडते. याच वर्गाची होणारी राजकीय मुस्कटदाबी बंद केली पाहिजे. त्यांच्या राजकीय जाणीवांना फुलवले पाहिजे, त्यांना योग्य दिशेने नेले पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची आणि तरुणांची शक्ती जेव्हा आपल्या कोशातून बाहेर येते तेव्हा प्रस्थापितांची बोबडी वळते असा जगाचा इतिहास आम्हाला सांगतो. पण इतिहास हा स्मारकं, पुतळे आणि भाषणं या पलीकडे कधी न्यायचाच नाही असे आमच्या प्राध्यापकांमध्ये आणि प्रचार्यांमध्ये पाळले जाते. आणि ते तरी काय करणार म्हणा. ते स्वतःच निष्क्रीय भंपक वर्गात मोडणाऱ्या नागरिकांपैकी असतात किंवा जे तसे नसतात ते त्यांच्या त्यांच्या शिक्षण मंडळांचे विश्वस्त वगैरे असणाऱ्या ‘शिक्षणसम्राटांचे’ मिंधे असतात. या दोन्ही गटात न मोडणारे लोक जर कोणी असतील तर राजकीय प्रक्रीयांशी इतके फटकून कसे वागतात हे माझ्या कल्पनेच्या पलिकडचे आहे. कदाचित ते निव्वळ भेकड असतात. अशा आमच्या निष्क्रीय किंवा भेकड किंवा पैशाचे मिंधे झालेल्या प्राध्यापक आणि प्राचार्यांकडून काय अपेक्षा करणार आणि काय बोलणार. त्यांच्या विद्वत्तेविषयी शंका नाही. अनेक प्राध्यापक आणि प्राचार्य आपापल्या विषयांत तज्ञ आहेत. काहीजण कदाचित इतके विद्वान असतील ज्यांच्या तोडीची दुसरी व्यक्ती त्या विषयांत, संपूर्ण देशातही मिळणार नाही. पण तरीही... असे असले तरीसुद्धा... आमचे ‘गुरु’ म्हणवून घ्यायला लायक आहेत असे मानता येत नाही.

आम्ही एका अशा महाविद्यालयीन व्यवस्थेची अपेक्षा करतो आहोत जिथे नुसते नोकऱ्या कशा कमवायच्या याचे शिक्षण न मिळता, एक सुदृढ आणि प्रगल्भ नागरिक कसे बनावे याचे शिक्षण मिळेल. आणि लोकशाहीतला प्रगल्भ नागरिक हा राजकीय प्रक्रीयांशी परिचित असतो, देशांतील घडामोडींशी जोडलेला असतो, प्रसंगी राजकीय प्रक्रियांमध्ये सहभागीही होतो. लोकशाहीमध्ये राजकारणाशी फटकून राहण्याचा बिनडोकपणा शिकवणारी महाविद्यालयीन व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे शिलेदार बनलेल्या प्राचार्य आणि प्राध्यापकांना आम्ही नाकारतो आणि लोकमान्यांचेच शब्द वापरून आम्ही ठणकावून सांगतो की ‘हे आमचे गुरुच नव्हेत !’

Monday, January 28, 2013

मेळघाटातले प्रजासत्ताक- जे दिसले ते


माझ्या शहरी मानसिकतेमुळे आणि ७३वी घटना दुरुस्ती, ग्राम स्वराज, ग्रामसभांच्या माध्यमातून काही गावांनी केलेली प्रगती अशा गोष्टींबद्दल वाचलं असल्याने उगीचच ग्रामीण भागाची एक रोमांटीक अशी प्रतिमा माझ्या मनात होती. किंवा जी गावे अविकसित असतील तिथले लोकंच करंटे असले पाहिजेत अशी काहीशी दुसरी प्रतिमा मनात होती.. या दोन्हीला छेद देणारा अनुभव म्हणजे मेळघाट.

कालच २६ जानेवारीला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र बनून त्रेसष्ट वर्ष झाली. घटना समितीने बनवलेले संविधान २६ जानेवारी १९५० पासून भारत देशात लागू झाले. या संविधानाप्रमाणे आपण भारतीय नागरिकांनी आपल्या प्रस्तावनेतच भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य आणि समानता यांची हमी दिली. आणि म्हणूनच या प्रस्तावनेची सुरुवात होते ‘वी, द पीपल ऑफ इंडिया’.

भारताचे संविधान, ती बनवण्याची प्रक्रिया, डॉ बाबासाहेबांचे कर्तृत्व, घटना समितीच्या इतर सदस्यांचे योगदान, घटना समितीत झालेले वाद-चर्चा, त्यानिमित्ताने ‘भारत’ कसा असावा याविषयी झालेली विचारांची घुसळण या सगळ्याबद्दल मी वाचतो, जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा माझं मन उचंबळून येतं. गेल्या ६२ वर्षात कितीतरी गोष्टी घडल्या या देशात. कधी युद्धे, कधी आणीबाणी, कधी एकाच पक्षाला न भूतो न भविष्यति बहुमत तर कधी पाच वर्षात चार वेळा निवडणुका. पण संविधान आणि संविधानाने घालून दिलेली लोकशाही प्रक्रिया अबाधित राहिली.

माझ्या या अशा संविधान प्रेमाच्या पार्श्वभूमीवर एका प्रशिक्षणाच्या निमित्ताने मला कुपोषण आणि बालमृत्यू साठी कुप्रसिद्ध अशा मेळघाटात जाण्याची संधी चालून आली. ‘मैत्री’ ही संस्था गेली तब्बल १३ वर्ष मेळघाट मधल्या आदिवासी भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, शेती या विषयांत तिथे राहून सतत कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘मैत्री’ बरोबर काम करणारे स्थानिक कोरकू स्वयंसेवक वेगवेगळ्या ग्रामपंचायतींवर निवडून गेले. निवडून गेल्यावर कशाप्रकारचे काम करणे अपेक्षित असते, कायदा काय सांगतो, स्थानिक प्रश्नांचा विचार कसा करावा, त्यावरचे उपाय कसे अंमलात आणावेत, याविषयी चर्चा व्हावी असे ‘मैत्री’ला वाटले. आणि म्हणूनच पुण्यात राजकीय प्रक्रिया आणि प्रशासन याविषयी अभ्यास करणारा आमचा एक गट तिकडे जावा असे ठरले. अशी संधी सोडणार कशी!
अमरावतीपासून परतवाड्याला जायला साधारण दोन तास लागतात. परतवाड म्हणजे पूर्वी ब्रिटिशांची छावणी होती म्हणे. इथे लष्करी परेड चालत असे. म्हणून ब्रिटीश मंडळी या भागाला ‘परेड वॉर्ड’ म्हणत. याचाच अपभ्रंश म्हणजे परतवाड. शहरीकरणाचा वास लागलेलं बकाल अस्वच्छ असं गाव आहे हे. इथून मेळघाटात जाणारे रस्ते आहेत. त्या दिशेला निघालं की लवकरच चढण सुरु होते. आणि रम्य निसर्ग दिसू लागतो. सातपुड्याचा हा भाग. इथले डोंगर आपल्या सह्याद्री सारखे रौद्र नव्हते. चढण चढून वरती गेलं की काही काळ सपाट भाग. पुन्हा थोडी चढण. असे सौम्य स्वरूपाचे हे डोंगर. दूरवर काही ठिकाणी सरळसोट कडे दिसत होते. पण ते बरेच दूर होते.

रस्त्यात काटकुंभ नावाचे गाव लागले. या गावात बरेच जण कित्येक वर्षांपूर्वी मध्य प्रदेशहून आलेले आणि आता ठेकेदारी करून श्रीमंत झालेले लोक आहेत अशी माहिती आमच्या ड्रायव्हरने प्रफुल्ल ने बोलता बोलता दिली. त्याने आजूबाजूचे काही मोठे बंगले दाखवले. अगदी टोलेजंग म्हणावे असे ते नसले तरी त्या भागात बहुसंख्य घरांचा असलेला आकार बघता ते अवाजवी मोठे दिसत होते यात शंकाच नाही. इथून राहू गावापर्यंत ठीकठाक रस्ता. तिथून पुढे आम्ही जिथे जाणार होतो त्या चिलाटी गावापर्यंत मात्र अगदीच वाईट रस्ता. मध्ये हतरू गाव लागतं. तिथेच बाजार भरतो आणि इथली ४-५ गावांची मिळून असलेली गट ग्रामपंचायत पण हतरूच्या नावेच आहे. हतरू ग्रामपंचायतीतच चिलाटी येतं.

मेळघाटात जाताना माहिती अधिकार वगैरे गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की माहिती अधिकार ही गोष्ट पुण्यात सहजसाध्य आणि साहजिक वाटत असली तरी इकडे मेळघाटात माहितीचा अधिकार कोसो दूर आहे. माझ्या शहरी मानसिकतेमुळे आणि ७३वी घटना दुरुस्ती, ग्राम स्वराज, ग्रामसभांच्या माध्यमातून केलेली प्रगती अशा गोष्टींबद्दल वाचलं असल्याने उगीचच गावाची एक रोमांटीक अशी प्रतिमा माझ्या मनात होती किंवा जी गावे अविकसित असतील तिथले लोकंच करंटे असले पाहिजेत अशी काहीशी दुसरी प्रतिमा मनात होती.. या दोन्हीला छेद देणारा अनुभव म्हणजे मेळघाट.

आम्ही पोचायच्या आधीच निरोप देऊन बोलावून घेतलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच वगैरे मंडळी गप्पा मारत बसली होती. जेवण खाण उरकल्यावर मग आम्ही गप्पांना सुरुवात केली. “हम सरपंच थे पांच साल, लेकिन ग्रामशेवक कुछ बताता ही नहीं.”, एका माजी सरपंचाने हिय्या देऊन बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला आमच्यासारख्या अनोळखी लोकांसमोर बोलायला गावकरी मंडळी थोडी बिचकत होती. पण गेली १३ वर्षे मेळघाटात राहून त्यांच्यातलेच बनून गेलेल राम आणि मधू यांच्यासारखे ‘मैत्री’चे स्वयंसेवक आमच्यासोबत असल्यामुळे हळूहळू सगळे जण खुले होऊन बोलू लागले. सुरुवातीला “ग्रामसेवक बताता है वैसा होता है” इथपासून ते “हमारे हात में कुछ नहीं. सब आमदार के हात में है” इथपर्यंत काहीही बोलणं चालू होतं.
चर्चेतून ‘आता आम्ही काही करूच शकत नाही’ ही निराशा त्यांच्या बोलण्यातून बाहेर येत होती. ही हतबलता, नैराश्य आपल्या शहरी भागात पण दिसते. पण तिथले हे नैराश्य कृतीप्रवण वाटले. ‘आमची परिस्थिती वाईट आहे आम्हाला माहित आहे. पण काहीतरी तरी केले पाहिजे’ असा उत्साह दिसून येत होता. तो तात्पुरताही असेल कदाचित. आता लगेच ही मंडळी तिकडचा कायापालट करून दाखवतील असा माझा काही दावा नाही. पण निदान चार-दोन चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करून बघुया असा सूर मेळघाटातल्या या अशिक्षित कोरकू मंडळींचा होता, जो माझ्या मते नक्कीच आशादायी होता.

सर्वेसर्वा ग्रामसेवक
आमच्याशी गप्पा मारत होते ते सगळे ‘लोकप्रतिनिधी’ होते. लोकांनी थेट निवडणुकीने त्यांना निवडून दिले होते. मी आजपर्यंत अनेकदा लोकप्रतिनिधींशी गप्पा मारल्या आहेत. पण लोकांनी निवडून दिलेला माणूस हा तिथल्या मतदारांपेक्षा वेगळा असा उठून दिसत नाही हा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता! असे हे लोकप्रतिनिधी ग्रामसेवाकापासून ते कलेक्टर पर्यंतच्या नोकरशाहीला वैतागले होते, माहितीच्या अभावाने आपल्याला काही करता येत नाही हे जाणवूनही काहीच करू न शकलेले हे सगळे लोक चिडले होते, निराश होते. इथे बहुसंख्य लोक कोरकू आदिवासी. यांची मुख्य भाषा कोरकू. पण सगळेजण हिंदी बोलतात. मराठी मात्र जवळ जवळ शून्य. आता अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा भाग असलेल्या या मेळघाटात जेव्हा शासकीय योजना, पत्रके मराठीत येत असतील त्यावेळी कोरकू मंडळींना त्यातले फारसे काही उमगत नसणार ही बाब उघड आहे. आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा ग्रामपंचायतीचा ‘सचिव’ म्हणवला जाणारा ग्रामसेवक घेतो. ग्रामसेवक म्हणजे नेमला गेलेला नोकरशाहीतील माणूस. तो शिकलेला असतो. महापालिकेत कमिशनरचं जे महत्व तेच ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवकाचं. ग्रामपंचायत सदस्यांना त्याने माहिती द्यावी, गावाच्या कारभारात मदत करावी, कायदेशीर बाबतीत सल्ला द्यावा आणि ग्रामपंचायत ठरवेल ते निर्णय अंमलात आणायचे हे या ग्रामसेवकाचे मुख्य काम. असे असताना ग्रामसेवक केवळ लिहिता वाचता येतं या मुद्द्यावर ग्रामपंचायत सदस्यांना भारी पडतो. वाट्टेल त्या कागदांवर किंवा चक्क कोऱ्या धनादेशांवर हा ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि सरपंचाच्या सह्या घेतो. “ग्रामसेवक को सब मालूम रेहता है | वो कागज लेके घर आ जाता है, फिर हम वो जहां बोले वहां सही करते है |” असे सगळ्यांनीच सांगितले.

मध्यंतरी घडलेला एक किस्सा आम्हाला ऐकवण्यात आला. एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने सरपंचाच्या परस्पर खोट्या सह्या करून जवळ जवळ तीन लाख रुपये बँकेतून काढले. बँक मैनेजरला शंका आल्याने त्याने तक्रार नोंदवली. यामुळे प्रथम सरपंचाला पोलीस पकडून घेऊन गेले. पुढे ग्रामसेवक दोषी असल्याचे सिद्ध झाले आणि सरपंचाची सुटका झाली. पण या प्रकरणात सरपंच सुटला तरी कायम सुटेल असे नाही हे आमचे म्हणणे सगळ्यांना पटले.

दर महिन्याला ग्रामपंचायतीच्या बैठका होणे, वर्षातून चार ग्रामसभा होणे, आर्थिक ताळेबंद बघणे, अंदाजपत्रक (बजेट किंवा अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक हा शब्दही त्यांनी कधी ऐकला नव्हता.) या मूलभूत गोष्टी ज्या कायद्याने होणे अपेक्षित आहे त्याही तिथल्या ग्रामपंचायतीत घडत नाहीत. अर्थात कागदोपत्री सगळे होत असते अगदी नीट सुरळीत. पण प्रत्यक्षात मात्र यातले काहीच होत नाही असे मला सांगण्यात आले. जेव्हा जेव्हा ग्रामसेवक गावात येतो (मुद्दलात तो ग्रामपंचायत असते त्या गावी रहात नाही हे पचवणेच काहीसे जड गेले मला!), तेव्हा तेव्हा ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच त्याच्याकडे सगळ्या तक्रारी सांगतात. त्यावर ग्रामसेवक यथाशक्ती उत्तरं देतो. आणि कामं करण्याचं आश्वासन देतो. त्यापैकी अर्धा एक टक्का कामं पूर्ण होत असतील. या सगळ्या प्रकारात परिस्थितीमुळे आलेली लाचारी दिसली. सगळे अधिकार जणू ग्रामसेवकाच्या हातात आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य याचक आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या मंडळींची ही अवस्था तर सामान्य नागरिकाला किती किंमत असेल याविषयी बोलायलाच नको.

अर्थात याचा अर्थ सगळेच्या सगळे ग्रामपंचायत सदस्य असे हतबल आहेत असे नव्हे. काही लोकांना अर्धवट काहीतरी माहिती आहे. ज्या आधारे ते ग्रामसेवकाशी हुज्जत घालू शकतात. ग्रामसेवक मग अशांची न्युसन्स व्हाल्यू म्हणजेच उपद्रव मूल्य ओळखून सरपंच किंवा त्या सदस्याला काही शेकिंवा फार तर हजारभर रुपये देतो आणि गप्प करतो.


“कधी कधी ग्रामसेवक सरपंचांला परतवाड्यात बोलावून घेतो तिथल्या सरकारी गेस्ट हाउस मध्ये राहण्याची सोय फुकट होते. तिथे त्या सरपंचाची बडदास्त ठेवली जाते. आणि दुसऱ्या दिवशी जाण्याआधी ग्रामसेवक पुढे करेल त्या कागदांवर सरपंच निमूट सह्या करतो.”- असे ‘एकताई ग्रामपंचायत’ सदस्याने सांगितले.

शासनात ग्रामपंचायतीच्या वरची पातळी म्हणजे पंचायत समिती. आणि त्यावर जिल्हा परिषद. आम्हाला भेटलेल्या एकाही ग्रामपंचायत सदस्याने चिखलदरा पंचायत समिती आणि अमरावती जिल्हा परिषद इथल्या कोणत्याही अधिकाऱ्याशी कधीही थेट संवाद साधला नव्हता. तालुका पातळीवर असणारा गटविकास अधिकारी (BDO- Block Development Officer) हा आपले म्हणणे ऐकेल यावरच त्यांचा विश्वास नव्हता.

शिवाय चिखलदरा आणि अमरावती हे चिलाटी पासून अतिशय दूर आहे. दळणवळणाची साधनं नाहीत. वर्षातून किमान ४-५ महिने इथले अनेक रस्ते बंद असतात. काही ठिकाणचे पूल वाहून जातात. हतरू गावात दिवसातून एक एसटी बस सध्या येऊ लागली आहे. जी रात्रीपर्यंत पोचते. मुक्काम करून पहाटे परत जायला निघते. साहजिकच गावकऱ्यांना तालुका किंवा जिल्हा पातळीवर संवाद साधायचा असेल तर ग्रामसेवकाची मदत लागते. अन्यथा योजनांची माहिती मिळणार नाही, गावासाठी पैसे मिळणार नाहीत अशी भीती.

सेमाडोह नावाच्या गावापासून हतरू पर्यंतचा रस्ता कित्येक वर्ष खराबच आहे. हा रस्ता झाल्यास परतवाड्यापासून हतरूला यायचा रस्ता ३०-३५ किमी ने कमी होईल. सगळ्यांच्याच बोलण्यात या रस्त्याचा उल्लेख आल्याने हा तिथला महत्वाचा रस्ता असावा. पण गेल्या १३ वर्षात १२ वेळा हा रस्ता दुरुस्त केला गेला आणि दर वर्षी पावसाळ्यात तो वाहून गेला. अशी माहिती ‘मैत्री’च्या राम या स्वयंसेवकाने सांगितली. या रस्त्यासाठी आंदोलने झाली. पत्रव्यवहार झाले पण काही हालचाल नाहीच. “असेच चालू राहिले तर एक दिवस इथले आदिवासी सुद्धा नक्षलवादी होतील”, उद्विग्न होऊन राम सांगत होता, “लोक तयार आहेत. चिडलेले आहेत. रस्ते, पाणी यासारख्या माफक अपेक्षाही पूर्ण होत नसतील तर ते तरी काय करणार.”
तक्रारी घेऊन चिखलदरा पर्यंत जाऊन यायचं म्हणजे किमान एक दिवस जातो. शिवाय दीड दोनशे रुपये खर्च येतो कमीत कमी. अमरावतीला जायला लागलं तर अजूनच जास्त खर्च. किती वेळा जाणार, तक्रार करणार, किती वेळा हलवणार सरकारी यंत्रणेला, जी ढिम्म हलत नाही.
राम म्हणाला की या रस्त्याच्या विषयावरून गेल्या विधानसभा निवडणुकीत इथल्या भागातल्या ४० गावांनी मिळून मतदानावर बहिष्कार टाकला होता. एकही मत दिले गेले नाही. पण या गावातली सगळी मिळून वस्ती १८-२० हजार जेमतेम. त्यामुळे कोणीही या गोष्टीकडे पोकळ आश्वासने देण्यापलीकडे फार लक्ष दिले नाही. आणि सगळी परिस्थिती जैसे थे. आम्ही या देशाचा भाग आहोत की नाही? “नहीं तो हमें हमारे हाल पे छोड दो” ही मानसिकता तिथली परिस्थिती बघितल्यावर लक्षात येते.


ग्रामपंचायतीचा संगणक सरपंचाच्या घरी!
आमच्याशी गप्पा मारायला आलेल्यांत २४ वर्षीय कालू बेठेकर हा एकदम उत्साही कोरकू तरुण होता. ‘गेली काही वर्षे ‘मैत्री’चा स्वयंसेवक असणारा नुकताच हतरू ग्रामपंचायत सदस्य म्हणून विक्रमी मताधिक्क्याने निवडून गेला आहे. आणि त्याने धडाक्याने कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीसाठी एक शिपाई, एक कम्प्युटर ऑपरेटर नेमलेला असतो. याची माहिती मिळताच त्याने प्रथम शिपाई आणि तो ऑपरेटर हे दोघेही कार्यालयीन वेळात म्हणजे दिवसभर १०-५ या वेळात ग्रामपंचायत कार्यालयात असले पाहिजेत असा आग्रह धरला आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे दिवसभर उघडे नसते ही धक्कादायकच गोष्ट होती. कालू स्वतः सुशिक्षित असल्याने आणि संगणक हाताळता येत असल्याने त्याने ग्रामपंचायतीचा संगणक आणि त्याबरोबर असणारा प्रिंटर, इंटरनेट या गोष्टी ताबडतोब मागवून घेतल्या. ग्रामपंचायतीचा संगणक होता त्या ऑपरेटरच्या घरी. ग्रामपंचायतीचा फोन सुद्धा त्याच्याचकडे. हीच परिस्थिती हतरू बरोबरच इतरही ग्रामपंचायतीमध्ये आहे असे सगळ्यांनीच सांगितले. एकताई ग्रामपंचायतीच्या या सगळ्या गोष्टी सरपंचाच्या घरी असल्याचे एका सदस्याने सांगितले.  अशी सगळी चर्चा झाल्यावर सगळ्यांनीच कालूच्या पावलावर पाउल टाकून दिवसभर कार्यालय उघडे पाहिजे आणि ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायत कार्यालयात असल्या पाहिजेत असा आग्रह धरायचे ठरवले ही मोठीच आशादायक गोष्ट!

महिलांचा सहभाग
आमच्या गप्पांमध्ये काही महिला लोकप्रतिनिधीही लाजत बुजत सहभागी झाल्या होत्या. त्यात एक सरपंच बाई पण होत्या. आरक्षण आल्याने त्यांची सरपंच पदावर वर्णी लागली होती. जे चित्र शहरात दिसतं तेच तिथेही होतं. ज्यांना आरक्षणामुळे उभं राहणं शक्य झालं नव्हतं त्यांच्या या बायका उभ्या राहिल्या होत्या. पुण्याहून तिकडे गेलेल्या गटातली प्रज्ञा त्यांच्याशी बोलली तेव्हा त्या जरा अधिक मोकळेपणे बोलू लागल्या. अर्थात त्यांना कसलीच फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. पण पाणी आणि आरोग्य या प्रश्नांवर त्यांच्यात विशेष आस्था असल्याचे निरीक्षण प्रज्ञाने नोंदवले.

मागे एकदा महिला आरक्षणावर बोलताना माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती, “महिला आरक्षणामुळे बळजबरी होऊन का होईन ना एकदा व्यवस्थेत येऊ लागल्या की त्या असा काही वेगळाच विचार करून प्रचंड बदल घडवू शकतील की आश्चर्याने तोंडात बोटे घालावी लागतील. अनेक बाबतीत महिला पुरुषांपेक्षा वेगळा विचार करणार हे स्वाभाविकच नाही का?!”, तिचे हे म्हणणे मला यावेळी आठवले. कारण सहभागी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाही पुरुषाने आरोग्य या बाबीचा साधा उल्लेखही केला नव्हता!

शाळांची स्थिती
मेळघाटातल्या कुपोषणावर आणि शैक्षणिक स्थितीवर अनेकांनी खूप अभ्यास करून सविस्तर लिहिले असेल. मी त्याबद्दल काही लिहावे एवढे मला माहीतही नाही. मात्र जे दोन अनुभव ऐकले ते नमूद करणे आवश्यक वाटते. कारण ते दोन्ही ‘प्रजासत्ताक’शी संबंधित आहेत.

परतवाड ते चिलाटी या प्रवासात काटकुंभ गावापासून मी राहू गावापर्यंत मी राम बरोबर दुचाकीवर आलो. त्यावेळी एक पक्की बांधलेली इमारत त्याने दाखवली आणि तो म्हणाला, “ही ‘आश्रमशाळा’ आहे. आमदाराच्या संस्थेची आहे. आश्रमशाळा असल्याने मुलांच्या राहण्या खाण्याची सोय सुद्धा इथेच होते. शिवाय मेळघाट आणि कुपोषण हे समीकरणच असल्याने या आश्रमशाळेतल्या मुलांना पोटभर आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी खास तरतूद असते. आठवड्यातून एकदा चिकन, रोज अंडी, आणि जेवणात सर्व भाज्या इत्यादी. साहजिकच २-३ हजार रुपये महिना प्रत्येक मुलामागे खर्च आहे जो सरकार अनुदान देऊन उचलतं. शाळेला दरवर्षी अनुदान येतं साडेतीनशे मुलांचं. प्रत्यक्षात २५ -३० मुलं आहेत इथे.”
मी विचारलं, “असं का बरं? मुलं येत नाहीत का?”
त्यावर राम म्हणाला “शाळेत येऊन फायदाच होत नाही. मास्तर जागेवर नसतो. मुलांना वेळेत खायला मिळतंच असं नाही. काहीच शिकवलं जात नाही. अशा परिस्थितीत मुलांनी तरी काय करावं? मुलं पळून जातात मग.”
सुन्न मेंदू.

दुसरा अनुभव चिलाटी गावातला. आम्ही येण्याच्या २-३ दिवस आधीचीच घटना म्हणजे गावातल्या शाळेचा मास्तर दारू पिऊन घरीच पडला होता. शाळेत मास्तर नसला म्हणजे मध्यान्ह भोजन म्हणून जी खिचडी मिळते मुलांना तीही मिळत नाही. भुकेली मुलं चिडली. बंडखोरी उफाळून आली. सगळी मुलं सरळ शाळेच्या शिपायाच्या घरावर जवळ जवळ चालूनच गेली. त्याला शिवीगाळ केली. त्याच्याकडून भांडाराची किल्ली हस्तगत केली. आणि भांडार उघडून स्वतः खिचडी करून खाल्ली.

मोटारसायकली आणि मोबाईल्स
चिलाटी मध्ये अजूनही वीज नाही. नुकतेच तिथे खांब उभारून तारा टाकण्यात आल्या आहेत असे आम्हाला कळले. पण घराघरात मीटर वगैरे लावून वीज नाही. तारेवर थेट आकडे टाकून काहींनी वीज चोरून घेतली आहे. अशीच परिस्थिती बहुतांश गावांमध्ये. पण अनेकांकडे मोबाईल फोन आहेत! वास्तविक तिथे कोणत्याच कंपनीचे नेटवर्क येत नाही. मोबाईल बंद करून ठेवावा लागतो. असे असताना यांच्याकडे मोबाईल्स आले कसे आणि का?
रामने मला सांगितलं की गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका उमेदवाराने आपल्या पक्षाच्या चिन्हाचा स्टीकर लावून शेकडो मोबाईल्स या भागात वाटले आहेत. आता त्याचं करायचं काय हे लोकांना माहित नाही. मग मोबाईल फोनचा उपयोग गाणी ऐकण्यापुरता केला जातो बस!

हळूहळू इथले लोक सोयाबीन सारखी नगदी पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे तुलनेने अधिक पैसे हातात खेळू लागले आहेत. या पैशांचं करायचं काय असा प्रश्न आहे. मग मोबाईल्स घेणे ओघानेच आले. गेल्या काही वर्षात वाढलेल्या मोटारसायकली ही एक ठळक गोष्ट. रस्ते आणि एकूणच दळणवळण याविषयी मी वरती लिहिलेच आहे. रस्ते नाहीत, बस नाही. अशा परिस्थितीत मोटारसायकल ही गोष्ट फारच उपयुक्त ठरल्यास नवल नाही.

-----

इथला सगळ्यात गंभीर प्रश्न हा संपर्काची व दळणवळणाची साधनं नसणं आणि शिक्षणाचा अभाव ही आहेत असं वाटलं मला. या दोन्ही गोष्टी नसल्याने वा अत्यल्प असल्याने इथल्या लोकांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नाही. एका दृष्टीने इथल्या लोकांचे शोषणच चालू आहे. शेतकऱ्यांवर वा मजुरांवर थेट जुलूम जबरदस्ती केली जाते का, अन्यायकारक वागणूक मिळते का याची मला त्या जेमतेम दोन दिवसाच्या मुक्कामात कल्पना आली नाही. पण विकास होऊ न देणे किंवा संधीच हिरावून घेणे हा अन्याय आहे. आपल्या देशाचे संविधान प्रस्तावनेतच प्रत्येक नागरिकाला समान संधीची हमी देतं. पण या दुर्गम भागातल्या आदिवासींना मात्र ही संधी नक्कीच मिळत नाही हे दिसून येत आहे. मेळघाटात 'मैत्री’ सारख्या संस्था गेली कित्येक वर्षे आरोग्य- शिक्षण या प्रश्नांवर भरीव काम करत आहेत. म्हणून इथली परिस्थिती जरा तरी बरी असावी. पण झारखंड, छत्तीसगड या अप्रगत राज्यातील दुर्गम आदिवासी भागात काय अवस्था असेल याचं विचारही भयावह आहे. ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ आपण झालो असे आपण १९५० सालीच जाहीर केले आहे आणि ते अजूनही प्रत्यक्षात अवतरलेले नाही असे शहरी भागातही आपण ओरडून बोलत असतो. ग्रामीण आणि आदिवासी भागात ते मैलोनमैल दूर आहे. इथली परिस्थिती बघून मी अंतर्मुख झालो... अस्वस्थ झालो.

नुकत्याच झाल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मी जे पाहिलं ते तुम्ही माझ्या लिखाणातून बघावं, शक्य होईल तेव्हा प्रत्यक्ष जाऊनही बघावं आणि माझ्यासारखेच अस्वस्थ व्हावं... आणि या अस्वस्थतेतूनच, तळमळीतूनच इतर समाज घटकांसाठी काहीतरी करायची तीव्र इच्छा तुमच्याही मनात निर्माण होईलच याबद्दल मला शंका नाही.

तन्मय कानिटकर