
किती वर्ष अडकून राहणार
बंधनात या?
उखडा व्यवस्था बुरसटलेल्या
मुक्त करा जिवांना घुसमटलेल्या.
खोटे वागणे, खोटे बोलणे, खोटे ऐकणे
सारे काही खोटे,
तरीही त्यासच 'सत्य' म्हणणारे
नर्मदेचे गोटे.
संस्कृती वगैरे शब्दांनाही
अडकवले संकुचित अर्थात,
मनात एक, तोंडात एक, वागण्यात तिसरेच,
अडकलो दांभिकतेच्या चक्रात.
म्हातारा बापू सत्याग्रह
म्हणत गेला,
आम्हा अजून सत्य उमजेना,
अन कसला आग्रह झेपेना!
आम्ही खरे बोलायला घाबरतो,
खोट्या नैतिकतेच्या कल्पनांमध्ये अडकतो.
हे पाप हे पुण्य असल्या कल्पनांनी
पुरता बट्ट्याबोळ केला.
पण माणसाचेच मन- रोखणार कसे?
यानेच सगळा घोळ केला.
सगळेजण नैतिकतेच्या फूटपट्टीवर
मोजणार, याची आम्हाला भीती...
गुपचूप, चोरून काहीपण करा.
नाही कसली क्षिती.
"शी! काय अश्लील हे वागणे, काय अश्लील हे बोलणे"
आमचा विशेष गुणधर्म-
जे मनापासून आवडते, त्याला शिव्या घालणे!
मला हे आवडते म्हणले,
तर संस्कृतीचे कसे होणार?!
मला हे आवडते म्हणले
तर मी नीतिवान कसा होणार?!
कोणी नैतिकतेचे गुलाम, कोणी इतिहासाचे गुलाम.
नसानसात आमच्या गुलामगिरी भरलेली,
आहे परिस्थिती स्वीकारलेली.
जसा खरा नाही, तसाच मी आहे
दाखवण्यात आयुष्य आपले व्यर्थ,
वेगवेगळे मुखवटे चढवत
जगल्या आयुष्याला कसला आलाय अर्थ?
आमची परंपरा भव्य आहे
आमचा इतिहास दिव्य आहे.
परंपरेचा आम्हाला (पोकळ) अभिमान,
इतिहास ऐकून ताठ मान!
वास्तवाचे न्यून झाकण्यासाठी
किती भोंगळ झालो आम्ही.
भविष्याची जबाबदारी झिडकारत
किती ओंगळ झालो आम्ही.
इतिहास-परंपरा- व्यवस्था-रूढी
किती वर्ष अडकून राहणार
बंधनात या?
बंधनात जखडून ठेवले आम्हाला
वर्षानुवर्ष,
हीच खरी 'मुक्ती', पटवले आम्हाला
वर्षानुवर्ष.
बंधनांची जाणीव नसे आम्हां,
तर मुक्त काय होणार?
नवनिर्मितीच्या बाता कितीही जरी,
आमच्या हातून काय घडणार?
देणे मुक्ती,
कोणाच्या हातात आहे?
देण्यापेक्षा
ही घेण्याची गोष्ट आहे.
तेव्हाच घडेल काही, जेव्हा भिरकावून देऊ
गाठोडी दांभिकतेची.
तेव्हाच घडेल काही, जेव्हा गाडून टाकू
भीती सत्याची.
अस्वस्थ होऊन आतून आतून जळतो आहे.
उर्जा मिळत नाहीये पण धूर मात्र होतो आहे...
कोठडीत या धुराने घुसमटायला होतंय...
माझ्यासारखे अनेक आहेत,
मस्तक फिरून जाणारे, अस्वस्थ होऊन जळणारे...
उखडा व्यवस्था बुरसटलेल्या
मुक्त करा जिवांना घुसमटलेल्या...
किती वर्ष अडकून राहणार
बंधनात या?
नवे विचार कुणी मांडेल का
अंधारात या?
- तन्मय कानिटकर