Friday, August 19, 2011

एक वर्ष

जानेवारी २०११
बऱ्याच दिवसांनी एक ओळखीचा मुलगा गणूला भेटला. "काय रे काय करतोस आजकाल?", गणूने विचारले. 
"मी एक माहिती अधिकार कार्यकर्ता आहे", तो कार्यकर्ता उद्गारला. गणूच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. असे काहीतरी शब्द तो प्रथमच ऐकत होता. "अरे माहिती अधिकार कायदा येऊन साडेपाच वर्ष उलटली तुला हा कायदा माहित नाही?", कार्यकर्त्याने गणूला विचारले. पण गणूने तुच्छतेने नकारार्थी मान हलवली. जणू ही गोष्ट माहित असणे गरजेचे नाही. कार्यकर्ता नाराज झाला. त्याने आपल्या संस्थेचे महत्व गणूला सांगितले. माहिती अधिकार कायद्याबद्दल सांगितले. गणूला आनंद झाला. "खरंच खूप चांगले काम करता रे तुम्ही. ऑल द बेस्ट!", गणूने कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या. कार्यकर्ताही आज आपण एकाला जागरूक नागरिक बनवले या खुशीत निघून गेला. 

एप्रिल २०११ 
क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर फर्ग्युसन रोड वर जो दंगा घातला होता त्यातले स्वतःचे फोटोज गणू फेसबुक वर अपलोड करत होता. तेव्हढ्यात त्या कार्यकर्त्याने गणूला पिंग केले. 
karykarta: kay re kasa ahes?
Ganu: mast! tu?
k: sadhya jordar kama chalu ahet re. Anna hazarencha uposhan ahe. corruption door karnyasathi. 
Ganu: kay mast match zali re final... ek number jinklo apan..! dhoni chi ti shewatchi six mhanje tar ahahaha! 
k: kharay... pan ata aplyala corruption against match jinkaychie... 
Ganu: hm
K: Aik udya Balgandharv chowk te Shaniwarwada asa candle march ahe, anna hazare yanna support karnyasathi.
Ganu: ok..
K: tar nakki ye march la.. 
Ganu: hmm baghto..try karto. baki kay?
K: kahi nahi re. udyachi tayari chalue... tu volunteer mhanun join ka hot nahis? khup important cause ahe re... 
Ganu: chalo g2g... jara kam ahe. c u l8r, bye, tc. 

७ ऑगस्ट २०११
गणू बालगंधर्व चौकातून जात होता. तेवढ्यात त्याला समोर झाशीच्या राणीच्या पुतळ्याखाली २५-३० जणांचा घोषणा देणारा जमाव दिसला. "अरे काय चालू आहे हे?" कार्यकर्त्याला पाहून गणूने विचारले. 
"निषेध मोर्चा! अरे गणू, आपला पुण्याचा खासदार भ्रष्ट आहे आणि तिहार जेल मध्ये आहे. हे आपण सहन नाही केले पाहिजे. याचा निषेध तू मी आणि सगळ्या पुणेकरांनी मिळून केला पाहिजे. सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"फारच छान, तुमचा हेतू फारच उत्तम आहे. मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेला... गेलाच...! 

१८ ऑगस्ट २०११
जिकडे तिकडे अण्णांच्या आंदोलनाच्या बातम्या. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतायत सगळ्या शहरांमध्ये. एक दिवस गणूला त्याच्या मित्रांचा फोन येतो. "अरे गणू, उद्या एक मोर्चा आहे. अण्णांना पाठींबा देण्यासाठी. आपण जाऊया. संध्याकाळी ६ वाजता." गणूने थोडा वेळ आढेवेढे घेतले. "अरे चल रे... मोर्चा संपल्यावर सगळे मस्त जेवायला जाऊ कुठेतरी..." मित्राने आग्रह केल्यावर गणू तयार झाला. अखेर गणू आपल्या मित्रांबरोबर बालगंधर्व चौकात हजार होतो जिथून मोर्चाची सुरुवात होणार असते. 
"अरे तू इथेसुद्धा आहेस वाटतं?" कार्यकर्त्याकडे पाहून गणू आश्चर्याने विचारतो.
"म्हणजे काय? मी पहिल्यापासून आहे न या आंदोलनात...!", कार्यकर्ता उद्गारतो. 
"अरे हो की... विसरलोच..", पुढे काही गणू बोलणार एवढ्यात घोषणांचा आवाज येतो- " एक सूर एक ताल" त्यापाठोपाठ आजूबाजूचे सगळे ओरडतात," जन लोकपाल जन लोकपाल"... 
सगळेच जण मोर्चाबरोबर चालू लागतात. जोरदार घोषणा झेंडे, बोर्ड यांनी वातावरण एकदम झकास तयार झालेले असते.'मी अण्णा हजारे' लिहिलेली गांधी टोपी घालून गणूही मोर्चात चालू लागतो. मोर्चा यशस्वी होतो... आपण केलेल्या प्रचंड देशसेवेमुळे गणू त्या रात्री अतिशय समाधानाने झोपी जातो. 


नोव्हेंबर २०११
अण्णांचे आंदोलन संपलेले असते. अण्णा आणि सरकार यांच्यात उभयपक्षी मान्य तोडगा निघतो. गणूचे नेहमीचे उद्योग सुरळीत चालू असतात. एक दिवस रस्त्यात कार्यकर्ता भेटतो. त्याच्या आजूबाजूला २५-३० लोकांचा घोषणा देणारा जमाव असतो. "अरे काय रे हे?", गणू कार्यकर्त्याला विचारतो.
"आपल्या खासदाराने अजून राजीनामा दिला नाहीये. असा भ्रष्ट आणि स्मृतिभ्रंश झालेला खासदार आम्हाला नको हे आपण सरकारला सांगितलं पाहिजे."- कार्यकर्ता.
"खरंय रे तुझं म्हणणं...", गणूला पटते. 
"सामील हो आमच्या मोर्चात.", कार्यकर्त्याने गणूला आवाहन केले. 
"मी जरा जाऊन आलोच १० मिनिटात. कधी निघणार आहे मोर्चा?",- गणू.
"लवकर ये, १५ मिनिटात चालायला लागू आम्ही."- कार्यकर्ता. 
"हो हो आलोच..." असे म्हणून गणू गेलाच...! 

जानेवारी २०१२ 
पुणे महापालिकेच्या निवडणुकांची धामधूम चालू असते. जिकडे तिकडे घोषणा, पत्रके, सभा! गणू एकदा रस्त्यावरून जात असतो तेव्हा त्याला रस्त्यात उभा राहून पत्रके वाटणारा कार्यकर्ता दिसतो. "अरे काय रे हे?" गणू विचारतो. 
"मतदान जागृती. पुढच्या आठवड्यात निवडणूक आहे. मतदान कर नक्की. मतदान करणे हा आपला लोकशाही हक्क तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते आपले कर्तव्य आहे." 
"नक्की करणार मतदान...!"- गणू.
मतदानाच्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने आणि लागूनच शनिवार रविवार आल्याने गणू आणि मित्रमंडळी कोकणात ट्रीप ला गेले...

"लोकशाही म्हणजे काय हेच आपण पार विसरून गेलो आहोत." अतिशय निराश मनस्थितीत कार्यकर्ता फेसबुक वर आपले स्टेटस अपडेट करतो. त्याच्याच खाली त्याच्या 'वॉल' वर गणूचे कोकण ट्रीप चे फोटोज अपलोड केलेले दिसत असतात. कार्यकर्ता निराश होतो. हताश होतो... पण तेवढ्यात गणूने नव्याने अपलोड केलेला फोटो त्याच्या वॉल वर दिसतो ज्यामध्ये गणू मतदान केल्यावर बोटावर केली जाणारी खूण दाखवत असतो... कार्यकर्त्याला आश्चर्य वाटते. फोटोच्या खाली गणूने लिहलेले असते- "कोकणात निघण्या आधी सकाळी ७ वाजता मतदान केंद्र उघडल्या उघडल्या मतदानाचा अधिकार बजावला. माझा प्रतिनिधी भ्रष्ट असणार नाही याची मतदान करताना तरी मी काळजी घेतली आहे..!" 
 थोड्याच वेळात अनेकांचे असे फोटोज फेसबुक वर झळकू लागले. प्रयत्न वाया गेले नव्हते... कार्यकर्त्याला उत्साह आला. आणि त्याने अधिकच धुमधडाक्यात कार्याला सुरुवात केली...! 

Thursday, July 14, 2011

मुंबई ब्लास्ट नंतर...

परिवर्तन या आमच्या संस्थेची सुरुवात झाली तेव्हा नुकताच २६/११ चा दहशतवादी हल्ला झालेला होता. त्यामुळे अचानक अनेकांना आता आपण देशासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले होते. त्यांचे हे वाटणे काही दिवसच टिकले. जसजसे दिवस गेले आणि २६/११ च्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली. तात्पुरत्या विचारांनी उगीचच आपण समाजासाठी फार काहीतरी करतोय अशा भावनेने आलेले सगळे गळत गेले. काहींचे तर गेल्या दोन वर्षात मी तोंडही पाहिले नाही. असे का घडले असे या गेलेल्या लोकांना विचारले तर प्रत्येक जण असंख्य कारणे सांगेल. असो. ती कारणे ऐकण्यात मला मुळीच रस नाही. 
एक सव्वा वर्ष उलटले आणि पुण्यात जर्मन बेकरी मध्ये बॉम्ब स्फोट झाला. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत परिवर्तन चे सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांना मदत करत होते. माझ्या या अनुभवावर मी दैनिक सकाळ मध्ये एक लेख लिहला होता. तो वाचून असंख्य लोकांना पुन्हा एकदा आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले. आमच्या पुढच्या मिटिंग ला पुन्हा एकदा ७०-८० लोक हजार होते. जसजसे दिवस गेले आणि जर्मन बेकरीच्या घटनेचा प्रभाव ओसरू लागला तसतसे सुरुवातीला आमच्या मिटींगला असणारी ७०-८० ची संख्या कमी कमी होत जाऊन ८-१० वर आली. 
काल पुन्हा मुंबई मध्ये ब्लास्ट झाले आहेत. पुन्हा असंख्य लोकांच्या डोक्यात आपण देशासाठी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे असणार. ते लोक येतील, आणि उत्साह असेपर्यंत टिकतील. नंतर आपल्या कामात गुंग होतील- पुढचा ब्लास्ट होईपर्यंत...!!! 
प्रत्येकाला वैयक्तिक उद्योग आहेत, अभ्यास आहे, मित्र आहेत, करियर आहे. उलट करियर सोडून परिवर्तनचं काम करू नका असं आमचा फाउंडर मेंबर हृषीकेश प्रत्येकाला सांगतो. तो असे सांगतो कारण त्याला हे पक्क माहित्ये की आपले सगळे उद्योग सोडून हे कार्य करायची गरज नाही. 

आमचा एक मेंबर आहे, तो भेटला की सांगतो, "अरे यार नेक्स्ट मिटिंग ला नक्की येणार. पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा संपत आहे. मग सगळा वेळ परिवर्तनला"
त्यानंतर दोनेक महिने उलटून जातात,"अरे गावाला गेलो होतो."
मग पुन्हा महिन्या दोन महिन्यांनी त्याचा चेहरा दिसतो,"अरे, कॉलेज आणि सबमिशन्स वगैरे चालू झालंय. अजिबात वेळ नाही." 
पुढच्या भेटीच्या वेळी,"अरे कॉलेज मध्ये इव्हेंट्स चालू आहेत. त्यात सगळ्यात मी आहे. सॉरी."
आणि मग त्याच्या पुढच्या भेटीच्या वेळी पुन्हा एकदा त्याची परीक्षा दोन आठवड्यांवर आलेली असते. 
काय म्हणावे याला...! 

इच्छा तेथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे. खरोखरच सकाळी ९ ते रात्री १० असे काम करणारे लोक मी पाहतो जे एवढे जास्त आपल्या कामांमध्ये व्यग्र असतानाही काहीतरी समाजासाठी करत असतात. आणि दुसऱ्या बाजूला हे एक उदाहरण...!!
असो.... ज्याला काम करायची इच्छा आहे तो कशातूनही वेळ काढतो आणि काम करतो. ज्याला इच्छा नाही, त्याला वेळ कधीच मिळत नाही. 
एक चारोळी या निमित्ताने आठवते:
वेळ नाही ही एक सबब आहे;
वेळ काढणं हे एक कसब आहे.
सबब-कसब असा हा खेळ आहे;
ज्याला जमतो त्याला वेळ आहे..!!


एकच विनम्र आवाहन, सातत्याला महत्व आहे. तात्पुरत्या गोष्टींना नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला कालच्या ब्लास्ट मुळे अचानक देशासाठी काम करावे वाटत असेल त्यांनी स्वतःलाच एकदा विचारून घ्या की हे तात्पुरते वाटणे आहे की खरोखरची तळमळ?? आणि तात्पुरते असेल तर विचार झटकून देऊन आपल्या नेहमीच्या उद्योगाला लागा. ते स्वतःशीच अधिक प्रामाणिक वागणे असेल. 

Saturday, July 9, 2011

संघर्ष अपरिहार्य आहे...

"प्रेम, शांती, करुणा, दया ही जीवनातील खरोखरच सर्वोच्च मुल्ये आहेत. आणि आपण ती विसरून नाही चालणार. आम्ही हेच काम करतो. आपण एकमेकांना प्रेमाने वागवला पाहिजे. भांडण असूया इर्षा या गोष्टी काढून टाकून प्रेमाने एकमेकांना आनंद देत जगलं पाहिजे," नईम बोलत होता",आम्ही तरुणांबरोबर यासाठीच काम करतो. कारण आपण तरुणच उद्याचे जग घडवणार आहोत. प्रेमाने वागल्याने जागतिक शांतता शक्य आहे.", इथून पुढे ऐकताना मला कंटाळा येऊ लागला,"कारण सर्व धर्मांमध्ये हेच सांगितले आहे. आणि गरिबांची गरजूंची सेवा हेच आपले परम कर्तव्य आहे.",का मी ही सगळी बकवास ऐकत होतो ?? नईम बोलतच होता,"अगदी शाळेतल्या मुलांपासून आम्ही याचे शिक्षण देतो. ही प्रियांका, ही म्युनिसिपालीटीच्या शाळेत जाऊन यासंबंधी मुलांशी बोलते. त्यांना सेवा करायला शिकवते.. माझ्या मते आपल्यासारख्या तरुणांनी सेवाकार्याला वाहून घेतले पाहिजे आणि विश्वमानव (Cosmo-human) बनायला हवे."
बकवास...बकवास... फक्त बकवास....!!! 
सुमारे अर्धा तास मी ही बडबड ऐकत होतो... एक लाख स्वयंसेवक असल्याचा दावा करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचा हा कार्यकर्ता. आणि करुणा आणि प्रेमाचा संदेश सगळ्या जगामध्ये देणं आणि प्रेमाची बंधुभावाची विश्वसंस्कृती निर्माण करणं हा या संस्थेचा उद्देश. भारतातच असले भंपक विचार पैदा होतात की जगभर याची मला कल्पना नाही. पण या असल्या विचारांची मला विलक्षण चीड आहे. मला त्या नईम ची कीव करावी वाटली. "काम अवघड आहे. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. एक दिवस नक्की यश मिळेल." असं तो शेवटी म्हणल्यावर मी मनातल्या मनात पोट धरून हसलो. कोणत्या जगात राहतात ही माणसं?? यांना आजूबाजूला काय चालू आहे याची कल्पनाच नाहीये की हे झोपल्याचं सोंग घेतायत...????

समाजासाठी काम म्हणजे काहीतरी 'सेवा करणे' अशी बहुतेकांची कल्पना असते. अनाथ मुलांशी जाऊन खेळणे, वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांशी गप्पा मारणे, कष्टकरी मंडळींमध्ये जाऊन आपणही थोडेफार श्रम करणे (किंवा राहुल गांधी करतो तसले नाटक तरी करणे), झोपडपट्टीत जाऊन कम्प्युटर शिकवणे, रस्त्यावर उभ्या भिकाऱ्यांना (उगीचच चार चौघात) चिल्लर ऐवजी दहा रुपयाची नोट काढून देणे. अशा विविध गोष्टी असंख्य लोक अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. "मी दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी कार्य केले", असला उर्मट अहंभाव जोपासण्या पलीकडे यातून काही एक साध्य होत नाही असं माझं ठाम मत आहे. कोणीही कोणाचा उद्धार करू शकत नाही. आणि "सेवा" करून तर नाहीच नाही... 

आपण एखाद्या रोगावरची लस घेतो म्हणजे नेमके काय करतो? आपण आपल्या शरीरातील लढाऊ पेशींना एखाद्या रोगाच्या विषाणूंशी लढायचे प्रशिक्षण देतो. संघर्ष करायला तयार करतो. संघर्ष आपल्या रक्तातच असतो.
आपल्या हक्कासाठी किंवा "प्रेमाने करुणेने" जगण्याच्या किंवा या विषयी बोलण्याच्या आपल्या अधिकारांसाठीही संघर्ष करावा लागतो. अनाथालयात जाऊन मुलांशी खेळणे सोपे आहे. पण अनाथाश्रम उभारणे, वाढवणे हा संघर्ष आहे आणि म्हणूनच अवघड आहे. आमच्या परिवर्तन संस्थेत दर काही दिवसांनी एखाद दुसरी व्यक्ती येते जिला समाजासाठी काहीतरी सेवा करायची असते. स्वतःचा अहं सुखावण्यासाठी सर्वांना दिसेल अशी सेवा करणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आपण फार सगळं सोपं काहीतरी शोधत असतो...सतत... अशा व्यक्तींना आम्ही अगदी निक्षून सांगतो की परिवर्तन संस्था ही संघर्षासाठी आहे सेवेसाठी नाही. 
काही लोकांना मी फार टोकाला जाऊन बोलतोय असं वाटेल. पण नीट विचार करा. कोणीतरी काहीतरी सेवाभाविपणे केलं म्हणून कोणाचा आजपर्यंत उद्धार किंवा प्रगती झाली आहे का??? कधीच नाही. जगात असे एकही उदाहरण नाही. 
उलट सर्व मोठ्या होऊन गेलेल्या माणसांनी एकच मंत्र समाजाला दिला- संघर्ष....!!!! 
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की, तुला राज्य नको म्हणून तू युद्ध सोडून जाऊ शकत नाहीस. तुझ्या हक्कासाठी, सूडासाठी, क्षात्रधर्मासाठी तुला संघर्ष करावाच लागेल.
समर्थ रामदास स्वामी- बलोपासनेला पर्याय नाही, कारण स्वदेशासाठी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी बलोपासना आवश्यक आहे.
"आम्ही समुद्रावर लढू, जमिनीवर लढू, आकाशात लढू. वेळ पडली तर कॅनडा मधून लढू. पण आम्ही शरण जाणार नाही. नाझी जर्मनीचा पराभव झाल्याशिवाय आमचा संघर्ष थांबणार नाही",- विन्स्टन चर्चिल च्या या वीरश्रीपूर्ण भाषणाने अख्ख्या इंग्लंड मध्ये जोश आला होता.
"शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा"- बाबासाहेब आंबेडकर. 
"बंदुकीच्या नळीतून सत्ता येते. (संघर्ष...!)"- माओ त्से तुंग.
शेवटचे आणि सगळ्यात महत्वाचे- महात्मा गांधी..!! अहिंसात्मक स्वातंत्र्यसंग्राम... 'संग्राम'...युद्ध... संघर्ष!!! गांधींनी सेवेचे महत्व अचूक ओळखले होते... पण सेवेला राजकारणात आणि व्यवहारात अवास्तव महत्व नव्हते दिले. 
सेवा हा माणसाच्या स्वभावाचा भाग असायला हवा कर्तव्याचा नाही. हक्कांसाठी, समानतेसाठी, अधिक चांगल्या राहणीमानासाठी, समाधानासाठी, बौद्धिक-वैचारिक-वैज्ञानिक-शारीरिक प्रगतीसाठी, अधिकारांसाठी संघर्ष अपरिहार्य आहे. सेवा माणसाच्या वैयक्तिक प्रगतीसाठी आवश्यक आहे असे मी मानतो. सेवेमुळे माणूस निर्मळ राहायला मदत होते. सेवेमध्ये स्वतःला विसरून कार्य करणे अभिप्रेत असते. आणि यातूनच अहंभाव बाजूला ठेऊन संघर्ष करायची वृत्ती जन्माला येते. आणि ते महत्वाचे असते कारण संघर्ष करताना अहंकाराने कार्यहानीच होते. 
सेवा अत्यावश्यक असली तरी, ती सहजतेने व्हायला हवी. स्वभावाचा भाग बनून. म्हणून गांधींनी आश्रम पद्धत स्वीकारली. सेवा ही नित्यनेमाची गोष्ट बनून गेली. आणि म्हणूनच गांधी आणि त्यांचे अनुयायी संघर्ष ही गोष्ट अधिक जबाबदारीने आणि कर्तव्यभावनेने करू शकले. कारण त्यांच्या मस्तकावर सेवा करायच्या जबाबदारीचं ओझं नव्हतं... परिवर्तन संघर्षासाठी असलं तरी पुण्यात जर्मन बेकारी मध्ये झालेल्या स्फोटानंतर आमचे अनेक सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये सेवाकार्य करत होते. पण ते सहजतेने आलेले होते. त्यात जबाबदारीचे ओझे नव्हते. खरे कार्य त्यानंतर सुरु झाले- असे पुन्हा होऊच नये यासाठी प्रयत्न...! 
"सेवा हा स्वभाव... संघर्ष हे कर्तव्य..." हाच आपला मंत्र असला पाहिजे. नाहीतर विश्व मानव वगैरे भंपक विचारांच्या ओझ्याखाली आपण इतके दबून जाऊ की आजूबाजूच्या भयानक वास्तवतेची जाणीवच बोथट होऊन जाईल. 

Saturday, July 2, 2011

नदीकाठच्या वाळवंटात...


आम्हाला कुठल्यातरी अशा ठिकाणी जायचं होतं जिथे फारसं कोणी जात नाही. तिथे असं काहीतरी पाहिजे जे आधी फारसं कोणीच पाहिलेलं नाही. शिवाय १० ते २५ जून अशा तारखाच आम्हाला शक्य असल्याने या तारखांना हवामानही चांगले असणे ही आमची अट होती. एवढेच नव्हे तर संपूर्ण खर्च प्रत्येकी १५-१६ हजारांच्या आत व्हायला हवा होता. एवढ्या सगळ्या अटी पूर्ण करणारी एक जागा आम्हाला सापडली....!! स्पिती...!!! 


पाच मुलं, तीन मुली, एक ड्रायव्हर आणि एक गाडी- तवेरा..! शिमल्याहून सुरुवात झाली. पूर्व दिशेने आम्ही शिमल्याच्या बाहेर पडलो आणि राष्ट्रीय महामार्ग नं.२२ ला लागलो. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून तिबेट मध्ये जात नाही तरीही या महामार्गाला तिबेट महामार्ग म्हणतात. किन्नौर जिल्ह्यात आम्ही शिरलो. इथले सौंदर्य मी पाहिलेल्या इतर हिमाचल च्या सौंदर्यापेक्षा थोडेफार वेगळे होते. हिमालयात एरवी आढळणारी डोंगरातली हिरवी मैदाने दिसत नव्हती. इथे उंचच उंच शिखरं. सरळ सोट कडे, आणि खळाळत वाहणारी सतलज नदी...
का कुणास ठाऊक सतलज नदी मला उगीचच ओळखीची वाटते. "एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेन्थ का जमावी आणि का जमू नये, याला काही उत्तर नाही. पंधरा वीस वर्षे परिचय असणारी माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी मोडण्यापलीकडे त्यांचा आणि आपला संबंध जात नाही. भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसं क्षणभरात जन्मांतरीचं नातं असल्यासारखे दुवा साधून जातात. सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात.", पुलंच्या रावसाहेब मधल्या या ओळी मला आठवल्या. माणसांप्रमाणेच नदीलाही ही गोष्ट लागू होते हे मला माहित नव्हतं. जन्मापासून पाहत असल्यामुळे पुण्याच्या मुळा मुठा नद्या (?) आपल्या वाटतात असं वाटायचं... पण सतलजला पाहताच ती 'आपली' वाटून गेली...! मी २ वर्षांपूर्वी जेव्हा गंगा पहिली तेव्हा या नदीचा रंग निळा नसून भगवा आहे असा भास झाला होता. आणि गंगेबद्दल आदर वाटूनही आपलेपणा वाटला नाही. या आधी तीन वेळा बियासचं बघूनही ती कधी आपली वाटली नव्हती. याउलट महाराष्ट्रातल्या कृष्णेबद्दल मात्र जिव्हाळा वाटतो. एकूणच मला नद्यांचे विलक्षण आकर्षण आहे. विशेषतः डोंगरांमधून उगम पावून सपाट प्रदेशात येईपर्यंतचा त्यांचा प्रवास अतिशय मोहक असतो. पुढे मग घनदाट मानवी वस्ती सुरु होते आणि नदी घाण करायची यंत्रणा रात्रंदिवस राबते...

आमचा सगळा रस्ता सतलजला लागूनच होता. कधी आम्ही जरा उंचीवर जायचो खाली दरीत सतलज वाहताना दिसायची. कधी आम्ही अगदी नदीच्या किनाऱ्याच्या उंचीवर यायचो. ज्यूरी नावाच्या गावी आम्ही महामार्ग सोडला. आणि उजवीकडे वळून सरळ उंच चढण चढायला सुरुवात केली याच रस्त्यावर 'इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस' चे प्रशिक्षण केंद्र आहे. त्याच्या शेजारीच एक वीज निर्मिती केंद्र आहे. त्याच रस्त्याने अजून चढण चढत आम्ही सराहन नावाच्या गावी पोचलो.
किन्नौर भागाच्या राजाची राजधानी म्हणजे सराहन. शेकडो वर्षे इथले राजे निर्धोकपणे राज्य करत होते. उरलेल्या भारतात सुलतान झाले, बादशाह झाले, छत्रपती आणि पेशवे झाले, मधेच अफगाणी अब्दाली येऊन गेला, तरी इथले राज्य अबाधित राहिले. मग ब्रिटीश आले. ब्रिटीशांच्या अंमलाखाली संस्थानिक म्हणून इथे राजे होतेच. १९४७ साली देशातील इतर शेकडो संस्थानिकांप्रमाणेच सराहनचे संस्थानही बरखास्त झाले. इथे एक सुंदर राजमहाल आणि अप्रतिम भिमकली मंदिर आहे.
बस्पा नदी (सांगला खोरे)
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तिबेट महामार्गावरून आम्ही सतलजच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने आमचा प्रवास सुरु केला. सराहन पासून सत्तर एक कि.मी. वर महामार्गावरच्या करछम नावाच्या गावी एक छोटे धरण बांधण्यात आले आहे. तिथेच बस्पा नदी येऊन सतलज ला मिळते. आम्ही करछम ला उजवीकडे वळून बस्पा नदीच्या काठाने निघालो. बस्पा च्या आजूबाजूला उंचच उंच डोंगर असले तरी त्यांचे कडे सरळ सोट नव्हते. नदीकाठच्या दोन्ही डोंगरांमध्ये अंतर होते. त्यामुळे एकूणच सर्व प्रदेश मोठा वाटत होता. बस्पा चे पात्रही उथळ पण रुंद होते. सांगला गाव मागे टाकून आम्ही रकछम गावी राहिलो. याच रस्त्यावर पुढे गाडी जाऊ शकणारे भारतातले शेवटचे गाव- चीटकुल होते. रकछामच्या रात्री बस्पाच्या काठावर आम्ही समोर खळाळणारे नदीचे पात्र, आणि आमचा नाच गाण्याचा दंगा...!!! अविस्मरणीय...!!

संपूर्ण पंधरा दिवसांमधला सर्वात सुंदर प्रवास आम्ही पुढच्या दिवशी केला. पुन्हा एकदा आम्ही तिबेट महामार्गाला लागलो आणि उत्तर-पूर्व दिशेने सतलजच्या डाव्या काठाने प्रवास सुरु केला. आत्तापर्यंतचे सतलज चे खोरे हिरवेगार होते. पाईन - देवदार ची झाडे होते. एकूणच डोंगरांवर जागा मिळेल तिथे झाडे होती, असंख्य ठिकाणी पिवळी जांभळी फुले होती. पण करछम चे धरण सोडले आणि अवघ्या काही मिनिटातच दृश्य पालटू लागले. उंच झाडे दिसेनाशी झाली. खुरट्या काटेरी झुडुपांची संख्या वाढली. डोंगरांचा रंग हिरवा होता तो हळू हळू करडा तपकिरी होऊ लागला. जिकडे तिकडे मातीच माती... नुसती कोरडी माती... मोठमोठाले दगड. अतिशय तीव्र उतार. त्यावर लांबून वाळू वाटेल असे छोट्या आकारांचे असंख्य दगड. एखाद्या Construction site किंवा स्टोन क्रशर च्या जागी असल्यासारखे वाटत होते. नदीचा रंग हिरवा निळा आणि फेसाळता पांढरा होता तो करडा तपकिरी झाला. डोंगरांना वेगळे करत, कापत वेगाने वाहणारी सतलज... आणि तिच्या आजूबाजूला सगळे उघडे बोडके कोरडे डोंगर....!

महामार्गावरच खाब/काह नावाचे गाव लागले. सतलज आणि स्पिती नदीचा संगम...! पूर्वेकडून येणारी सतलज आणि उत्तरेतून येणारी स्पिती... सतलज स्पितीच्या मोठ्या बहिणीसारखी दिसते... याच ठिकाणी आमचा आणि सतलजचा संबंध संपला... सतलजला उजवीकडे मागे टाकून आम्ही उत्तरेला निघालो. स्पितीच्या काठावरून. सतलज मध्ये जसा आम्ही बदल पहिला तसा स्पितीमध्ये दिसला नाही. स्पिती सतलज च्या संगमापासूनच करडी तपकिरी होती... आणि जसजसे आम्ही तिच्या उगमाकडे जात गेलो तसतसा तिचा रंग अधिक अधिक फिका होत गेला. नंतर आम्ही काझा गावी गेलो तेव्हा तर नदीचे काठ पांढरट होते आणि नदी अतिशय फिक्या तपकिरी रंगाची...! काह पासून थोड्याच अंतरावर आम्ही महामार्ग सोडला आणि पुन्हा एकदा उजवीकडे वळण घेत चढण चढू लागलो. रस्ता वेडीवाकडी वळणे घेत नदी पात्रापासून खूपच उंचावर गेला. नंतर नदी दिसेनाशी झाली. एक दोन टेकाडे ओलांडत आम्ही "मलिंग" नावाच्या गावी जाऊन पोचलो. इथेच होता नाको तलाव. नाको तलाव अतिशय स्वच्छ निळ्या पाण्याचा. त्याचे काठ अतिशय नीट बांधून काढलेले. तलावाच्या आजूबाजूलाही विलक्षण स्वच्छता. गावात शिरल्या शिरल्याच ग्राम पंचायतीच्या वतीने लावलेला बोर्ड दिसतो- "सार्वजनिक जागी धूम्रपान, मद्यपान आणि अश्लील वर्तणूक करण्यास बंदी". इथे येणारे भरपूर फिरंगी टूरीस्ट पाहून हा बोर्ड लावलेला असण्याची शक्यता आहे. पण अर्थातच या बोर्डकडे दुर्लक्ष केले जात असणार. कारण धूम्रपान तर सर्रास चालू होते...! असो... नाको तलवाजवळच बौद्ध माठ आहे. कित्येक वर्षांपूर्वी बांधलेला. सराहन नंतर या भागात सर्वत्र बौद्ध- तिबेटीयन झेंडे फडकताना दिसतात. याच मठाच्या आवारात एक बुद्ध मुर्तीही आहे.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही एक डोंगर उतरून महामार्गाला लागलो. स्पिती बरोबर आमचा प्रवास उत्तर दिशेला सुरु राहिला. दर थोड्या अंतराला आजूबाजूचे रूप पालटत होते. नदीमध्ये आम्हाला सदैव दोन प्रवाह जाणवत होते. विशेषतः वळणांवर दोन impact points दिसत होते. एकाच नदीमध्ये दोन प्रवाह कसे असू शकतात? सदैव नदीबरोबरच आमचा प्रवास असल्याने सातत्याने निरीक्षण चालू होते. चांगो नावाच्या गावी रस्त्याने स्पिती चा उजवा काठ सोडला आणि एका वेळी एकाच वाहन जाऊ शकेल अशा पुलावरून आम्ही स्पितीच्या डाव्या काठावर आलो. सूमदो गावी तिबेट महामार्ग संपला. इथून एक रस्ता उजवीकडे तिबेट च्या दिशेने जातो, दुसरा स्पितीच्या उजव्या काठावरून उगमाच्या दिशेने. या गावी बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची आवक जावक होते. इथे बार्टर सिस्टिमच चालते. अन्नधान्य चीनी हद्दीतल्या लोकांना दिले की ते उत्तम दर्जाचे स्वस्तातले स्वेटर्स आपल्या लोकांना देतात. इकडचे दुकानदार हेच स्वेटर्स टूरिस्ट लोकांना विकून भरपूर नफा कमावतात. अर्थात एकूणच लोकसंख्या कमी असणे, हा भाग अतिशय दुर्गम असणे आणि भारतीय लष्कराचे इथले अस्तित्व यामुळे या स्मगलिंग चे प्रमाण कमी आहे. ही सगळी माहिती आम्हाला पुढे काझा मधल्या एका दुकानदार बाईने सांगितली..!

सूमदो वरून डावीकडे वळण घेऊन आम्ही काझाच्या दिशेने निघालो. नदीमध्ये अजूनही दोन स्वतंत्र प्रवाह जाणवत होते. एखादा थोडा उंचवट्याचा भाग आला की दोन प्रवाह वेगळे होऊन मध्ये एक खंजिरीच्या आकाराचे बेट तयार झालेले दिसे. अशी असंख्य बेटे नदी पत्रात दिसत होती... अखेर शिच्लिंग नावाच्या गावी आम्हाला दोन प्रवाहांचा उलगडा झाला. इथे पिन नावाची नदी येऊन स्पितीला मिळत होती. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा होता. पिन नदीच्या उगमाच्या दिशेने गेले की राष्ट्रीय अभयारण्य आहे जिकडे हिमालयीन चित्ते आढळतात. आम्ही स्पिती बरोबरच उत्तरेला जात राहिलो. आणि अखेर काझा नावाच्या गावी पोचलो. लाहौल स्पिती जिल्ह्यातले हे दोन नंबरचे सर्वात महत्वाचे ठिकाण. सराहन- नाको रस्त्यावर पुह नावाचे गाव आहे. पुह ते काझा या भागात येण्यासाठी परदेशी नागरिकांसाठी विशेष परवाना काढणे बंधनकारक असते.

पिन नदी आणि स्पितीचा संगम सोडल्यापासून आश्चर्यकारक रित्या स्पितीचे पात्र उगमाच्या दिशेने मोठे मोठे होत गेले. काझाला स्पितीचे पात्र मुठा नदीच्या जवळ जवळ पाच ते सहापट मोठे होते. नदी अजिबात खोल नव्हती. शिवाय एकसलग पण नव्हती. पण विस्तीर्ण पत्रातच असंख्य ओहोळ तयार झालेले. मध्ये मध्ये वाळूची बेटे. पांढरी वाळू. नदीच्या आजूबाजूचे डोंगर मात्र आधीसारखेचसारखेच करडे तपकिरी... संपूर्ण खोऱ्यात वाऱ्यामुळे किंवा डोंगरांवरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे विलक्षण आकार तयार झालेले. कुठे प्रचंड आकाराचे वारूळ असावे असे डोंगर तर कुठे अगदी आखीव रेखीव बांधलेल्या किल्ल्याप्रमाणे आकार.. अगदी बुरुजांसकट!! आणि हे सगळे प्रचंड आकाराचे. मधेच एके ठिकाणी पांढऱ्या वाळूमध्ये प्रचंड आकाराचे काळे उंचवटे.. कसे तयार झाले माहित नाही...! सारेच विलक्षण... निसर्गाची किमया...!

"की" च्या बौद्ध मठातील धर्मगुरू.
दुसऱ्या दिवशी काझातून आम्ही "की" नावाच्या ठिकाणी एक हजार वर्षे जुना बौद्ध मठ पाहायला गेलो. दुरून हा मठ विलक्षण विलोभनीय दिसतो. आणि या उंचावरच्या मठावरून खाली स्पिती नदी, त्याच्या काठी असणारी हिरवीगार शेते दिसतात. आणि या सगळ्याच्या मागे मातकट डोंगर उतार आणि त्यावर शुभ्र पांढरा बर्फ...!!! मठात आत गेल्यावर एका बौद्ध धर्मगुरूने आमचे स्वागत केले. मी पाहिलेल्या माणसांमध्ये हा मनुष्य सर्वात निर्मळ आणि स्वच्छ होता...आणि कदाचित तितकाच गूढही...! जवळजवळ टक्कल, चष्मा, बारीक मिशी, आणि ओठांवर सदैव एक स्मितहास्य. सुमारे २० वर्षांपूर्वी खोटं बोलून नेपाळमधल्या आपल्या घरून पळून तो इथे आला होता. त्याने आम्हाला सर्वांना बिनदुधाचा अप्रतिम चहा दिला. मग आम्ही एका शांत खोलीत गेलो. तिथे काही दिवे जळत होते. दलाई लामांचे फोटो होते. भिंतीवर चित्र काढलेली होती. एके ठिकाणी कित्येक वर्ष जुनी असलेली हस्तलिखिते नीट मांडून ठेवली होती. एकूणच त्या खोलीत धीर गंभीर आणि अध्यात्मिक वातावरण होते. "और भी मंदिर है यहाँ पे, लेकिन मेरे ख्याल से दो ही देखो लेकिन दिल से देखो.." धर्मगुरूचे हे म्हणणे आम्हाला पटले आणि आम्ही त्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
इथून पुढचा टप्पा होता जगातील सर्वात उंचावरचे वसलेले गाव- किब्बर...!
मोहेंजोदारोची आठवण करून देणारे स्पिती खोऱ्यात दूरवर वसलेले एक गाव
किब्बर कडे दूरवरून पाहिल्यावर मोहेंजोदारोच्या घरांची आठवण होते... बैठी धाब्याची घरं... एका घराच्या गच्चीत आम्ही चढून बसलो होतो. तुफान वारा आणि त्यामुळे थंडी...! कदाचित "की" च्या बौद्ध मठाचा परिणाम असेल पण किब्बर मध्ये आम्ही सगळेच खूप शांत आणि विचारमग्न झालो होतो. 

ज्या घराच्या गच्चीत बसलो होतो त्या घराच्या मालकिणीने आम्हाला चहासाठी घरात बोलावले. अतिशय साधे सुटसुटीत पण मोठे घर. एका खोलीच्या मध्यभागी चूल, हेच त्यांचे किचन, डायनिंग आणि हॉल. मध्यभागी चूल असल्याचा फायदा असा होतो की संपूर्ण खोली उबदार होते. भिंतीला लागून भारतीय बैठक पसरलेली.. त्याच्या पुढ्यात टेबलासारखा लाकडी ओटा. अप्रतिम वाफाळता चहा...!!!  "आप हमारे मेहमान हो... आप किसी भी घर में जाओ, सब चाय पिलायेंगे लेकिन कोई भी पैसे नहीं लेगा.", त्या चहा देणाऱ्या बाईने आम्ही देऊ केलेले पैसे नाकारले. किब्बर काय श्रीमंत गाव नाही. पण तरीही येणाऱ्या लोकांना पाहुणे मानत आपल्या परिस्थितीनुसार त्यांचे स्वागत करायची पद्धत तिथे आहे.

काहीतरी विलक्षण वेगळ्या भावना, विचार सगळ्यांच्या डोक्यात होत्या. जणू आम्ही नेहमीच्या जगात नव्हतोच. कारण आम्ही समोर पाहत होतो ते वेगळेच काहीतरी होते. इथली माणसं, त्यांचा निर्मळपणा, इथलं खडतर जीवन, या थंड वाळवंटात शेती करणारे लोक, निसर्गाचे रौद्र भीषण रूप... सारेच विलक्षण...
दुसऱ्या दिवशी लोसर नावाच्या गावी राहून आम्ही रोहतांग मार्गे मनालीमध्ये आलो... काझा ते लोसर सगळा प्रवास आम्ही स्पिती च्या डाव्या काठावरून केला. काझा नंतर स्पिती हळू हळू छोटी होत गेली. जसजसे उगमाकडे जाऊ लागलो तसा तिच्या पात्राचा आकार छोटा झाला. "कुन्झुम पास" या ठिकाणी आम्ही पोचलो आणि आमचा आणि स्पिती चा संबंध संपला. अवघी एखाद दुसरी टेकडी सोडून स्पिती चा उगम होता. स्पितीच्या उगमापासून ते स्पिती सतलजला मिळेपर्यंतचा सर्व प्रवास आम्ही पाहिला... स्पितीच्या उगमापासून शेवटापर्यंतचा हा प्रवास कमालीचा सुंदर आहे. आजूबाजूला सदैव वाळवंट... विविध प्रकारचे खडक, माती, प्रचंड वेगवेगळ्या रंगाचे दगड... आणि हिमालयाच्या पर्वतराजीला कापत पुढे जाणारी स्पिती....!!
 स्पिती...! 
"की" चा बौद्ध मठ
स्पितीचा अनुभव अभूतपूर्व होता. काहीतरी मौल्यवान असे आम्हाला या सगळ्या प्रवासात मिळाले... जे शब्दात सांगणे अशक्य आहे...

Sunday, June 26, 2011

निरुत्तर...


मनातले असंख्य विचार
भसाभस कागदावर उतरवले,
उगीचच लोकांना
भडाभडा सांगितले.
शहाणपणाचा आव आणला,
थोडाफार भाव खाल्ला!
मी नेहमी असाच वागतो का?
मी नेहमी असाच का वागतो??
उत्तरं नाहीत...
मी बसलोय तिथून बियास दिसत नाहिए,
पण तिचं अस्तित्व मात्र जाणवतंय.
तिचा खळाळणारा आवाज नसता तरी,
तिचं असणं जाणवलं असतं का?
तिचं असणं का जाणवलं असतं??
उत्तरं नाहीत...

कोणी म्हणतं, मेल्यावरही आपण 'असतो',
आत्मारूपी उरतो.
माझ्यानंतर माझं 'असणं'
कोणाला जाणवेल का?
कोणाला का जाणवेल??
उत्तरं नाहीत...

कोणी म्हणलं, दोनच दिवस महत्वाचे-
जन्माला आलो तो, आणि
जेव्हा कळतं
जन्माला का आलो तो!
खरंच असं असतं का?
खरंच असं का असतं??
उत्तरं नाहीत...

तीन प्रश्न नेहमीचेच-
कुठून आलो?
का आलो?
कुठे चाललो?
यांची उत्तरं शोधायची का?
यांची उत्तरं का शोधायची??
उत्तरं नाहीत...

एकजण म्हणला,"तुझे विचार भुक्कड आहेत"
दुसरा म्हणला," तू मुळातच मद्दड आहेस"
तिसरा म्हणला," तू भोंदूच नाहीस,
तर कमअक्कलही आहेस"
"छे छे माझ्या मते तर तू
अगदी अस्सल आहेस,"
चौथा उद्गारला.
माझे फक्त चौथ्याशीच पटते,
प्रत्येकाचं असंच असतं का?
प्रत्येकाचं असंच का असतं??
उत्तरं नाहीत...

डोक्यातले शेकडो प्रश्न,
मी नेहमीच निरुत्तर होतो.
प्रश्नांच्या समुद्रात डुंबत राहतो,
पण तरीही,
कधीच,
उत्तरं नाहीत...

तन्मय कानिटकर
२५/०६/२०११