प्रसंग एक- सिग्नल सुटायला साधारण ८-९ सेकंद बाकी असल्याचे दिसत होते... तेवढ्यात मागून
हॉर्न वाजायला सुरुवात झाली. तो वेळ खरे तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी
होता. पण कोणत्याही बाजूने वाहने येणे बंद झाले आहे म्हणल्यावर ८-९ सेकंद लवकरच
जाता येईल या आशेवर हॉर्न वाजायला सुरुवात झाली होती. शेवटचा सेकंद संपून हिरवा
दिवा लागताच मागून वाजणाऱ्या हॉर्न्सची संख्या आणि आवाज एकदम तिप्पट चौपट झाला.
आता हिरवा दिवा लागल्यावर त्या दिव्याचे प्रकाश किरण प्रकाशाच्या वेगाने म्हणजे ३
लाख किमी प्रती सेकंद या वेगाने लोकांच्या डोळ्यापर्यंत पोहचले. तेवढ्या वेळात
लगेच आपल्या पुढची गाडी हलेल अशी अपेक्षा करणे हा मोठाच विनोद...
प्रसंग दोन- अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत सत्ता मिळाल्यावर, किंवा नरेंद्र मोदी यांना
केंद्रात सत्ता मिळाल्यावर त्यांच्याकडे जादूची कांडी असल्याच्या अविर्भावात
अपेक्षा ठेवल्या गेल्या, ठेवल्या जात आहेत. आज दिवसभर काय केलेत? पाच दिवस झाले
तरी अजून एवढंही झालं नाही? ४० दिवसात तुम्हाला भ्रष्टाचार संपवता आला नाही?
पन्नास दिवसात तुम्हाला पाकिस्तानला वठणीवर आणता आलं नाही? श्या... तुम्ही तर अमुक
करणार, तमुक करणार अशी आश्वासनं तेवढी दिलीत. पण नुसती बोलाचीच कढी अन बोलाचाच भात
असा प्रकार दिसतोय... तुमच्यात काहीच अर्थ नाही. आमची निराशा झाली आहे.
प्रसंग तीन- पेट्रोल पंप. रांगेमध्ये साधारण सहा सात जण आपापल्या दुचाक्यांसह उभे आहेत.
नुकतेच पेट्रोल भरलेल्या माणसाने रोख रक्कम देण्या ऐवजी क्रेडीट कार्ड दिले आहे.
साहजिकच, पेट्रोल भरणारा कर्मचारी सुमारे पंधरा फुटांवर असलेल्या क्रेडीट कार्ड
मशीन जिथे ठेवले आहे त्या जागी गेला आहे. त्या मशीनमध्ये कार्ड फिरवून, पिन नंबर
भरून, मशीन मधून पावती काढून त्यावर गिऱ्हाईकाची सही घेतो आहे. या सगळ्या प्रक्रियेत
रांगेतल्या सहा सात जणांची अमूल्य अशी ७० सेकंद वाया गेली आहेत. रांगेतला शेवटचा
एक जण मोठ्याने ओरडतो- “ओSSS.. आटपा की लवकर. आम्हाला कामं नाहीत का. एकतर कार्ड
वगैरे साठी वेगळा माणूस ठेवा आणि ते झेपणार नसेल तर बंद करा कार्ड.” अशा पद्धतीने
एक आवाज उठल्यावर रांगेतले उर्वरित लोकही माना डोलवून किंवा काहीतरी बोलून त्याला
साथ देत आहेत. रांगेतून शेवटून दुसरा दुचाकीस्वार ‘इथे फार वेळ लागतो आहे’ असं
म्हणून गाडी वळवून निघूनही गेला...
प्रसंग चार- “अरे ते हाईक डाऊनलोड कर. वॉटसऐप पेक्षा जास्त वेगवान आहे.”, परवा एक मित्र
म्हणाला. माझ्या माहिती नुसार तर वॉटसऐप वर पाठवलेला संदेश अगदीच ताबडतोब पोहचतो.
आता त्याहून अधिक वेगवान म्हणजे नेमकं काय? एसएमएस पेक्षा वेगवान वॉटसऐप आणि
त्याहून वेगवान हाईक? तोच माझा मित्र वारंवार मोबाईल उघडून बघत होता. त्याने हाईक
वर तब्बल दीड मिनिटांपूर्वी पाठवलेल्या एका संदेशाला त्याचा मित्र (किंवा
मैत्रीण!) उत्तर देत नव्हता आणि ‘हाईक’च्या खासियतनुसार संदेश नुसते पोहचल्याची
खूण नव्हती, तर तो संदेश त्याने / तिने वाचल्याचीही खूण होती. दीड मिनिटे लागतात
उत्तर द्यायला? मित्र बिचारा अस्वस्थ झाला.
प्रसंग पाच- माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची फेसबुकची टाईमलाईन-
“पुण्यात बॉम्बस्फोट”
तीन मिनिटांनी- “स्फोट घडवणारे इंडियन मुजाहिदीन चे अतिरेकी असावेत. पुण्याचे पोलिस काय झोपले होते का? मोदी सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. सर्व मित्र मंडळींना आवाहन, घरातच थांबा. साखळी स्फोट देखील होऊ शकतात.”
त्यानंतर पाच मिनिटांनी- “बॉंब नसून हा सिलिंडरचा स्फोट असावा असे ऐकतो आहे...”
लगेच दोन मिनिटांनी- “बॉंबची निव्वळ अफवाच होती. संशयित बैगची बॉंब शोधक आणि नाशक पथकाने तपासणी केल्यावर त्यात केवळ कपडे असल्याचे निष्पन्न झाले आहे ”
हे महाशय मोबाईल वरून सातत्याने जगाला ‘अपडेट’ करत होते....
“पुण्यात बॉम्बस्फोट”
तीन मिनिटांनी- “स्फोट घडवणारे इंडियन मुजाहिदीन चे अतिरेकी असावेत. पुण्याचे पोलिस काय झोपले होते का? मोदी सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. सर्व मित्र मंडळींना आवाहन, घरातच थांबा. साखळी स्फोट देखील होऊ शकतात.”
त्यानंतर पाच मिनिटांनी- “बॉंब नसून हा सिलिंडरचा स्फोट असावा असे ऐकतो आहे...”
लगेच दोन मिनिटांनी- “बॉंबची निव्वळ अफवाच होती. संशयित बैगची बॉंब शोधक आणि नाशक पथकाने तपासणी केल्यावर त्यात केवळ कपडे असल्याचे निष्पन्न झाले आहे ”
हे महाशय मोबाईल वरून सातत्याने जगाला ‘अपडेट’ करत होते....
असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. हे सगळे बघता मला
असं लक्षात यायला लागलं आहे की आपली धीर धरण्याची क्षमता दिवसेंदिवस लयाला जात
चालली आहे. सगळ्याच गोष्टींचा वेग इतका वाढला आहे की विचार करायला वेळच नाही. कसलं
टिपिकल आजोबा स्टाईल बोलतो आहे ना मी... पण काय करणार, साला आजकाल दर दोन वर्षांनी
पिढी बदलते असं वाटतं. माझ्या बारावी पर्यंत आमच्या कॉलेजच्या ग्रुप मध्ये केवळ
एकाच व्यक्तीकडे मोबाईल होता. अशा आठवणी सांगणारा मी म्हणजे मागच्या पिढीचाच
झालो... असो. तर सांगायचा मुद्दा हा की, आपल्यातली, एकूणच समाजातली धीर नावाची
गोष्ट संपून गेली आहे की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. आपला पेशन्स संपल्याने
पेशंट झालो आहोत आपण.
घाई घाई घाई... सगळ्याची घाई. आणि आपल्याला
अपेक्षित वेळेत गोष्टी घडल्या नाहीत की प्रचंड अस्वस्थता, कधीकधी नैराश्य,
वैताग... आता अपेक्षाच चुकीच्या म्हणल्यावर अपेक्षाभंग होणारच. हिरवा दिवा लागल्या
लागल्या सिग्नलला उभी समोरची गाडी गायब व्हायला पाहिजे. रस्ता मोकळा असला पाहिजे
ही अपेक्षा फारच बालिश. ती पूर्ण नाही झाली की आपण वैतागतो, आणि आपला सगळा वैताग
गाडीच्या त्या बिचाऱ्या हॉर्नवर काढतो. मग तो हॉर्न जोरात कोकलतो. तो आवाज ऐकून
पुढचा माणूस सुद्धा वैतागतो. तो राजकारण्यांना शिव्या घालतो आणि म्हणतो, ‘पंधरा
दिवस झाले नवीन सरकार निवडून...अजून ट्राफिक काही कमी झालेला नाही...” तो तसाच
पुढे जातो आणि पेट्रोल पंपावर त्याला दिसते ही भली मोठी रांग. त्यात कोणीतरी
क्रेडीट कार्डावर पेट्रोल भरतो. तो मनातल्या मनात त्याची आई-माई काढून पेट्रोल
भरून वैतागलेल्या मनस्थितीत ठरलेल्या ठिकाणी पोहचतो. आपल्याला भेटायला येणारी आपली
मैत्रीण अद्याप पोहचलेली नसते. तो मोबाईल काढतो, त्यावर तिचे ‘last seen’ तपासतो.
दोन मिनिटांपूर्वीपर्यंत ही ऑनलाईन होती म्हणजे ही कदाचित अजून घरून निघालीच
नसावी. मग लगेच तो संदेश पाठवतो की ‘मी सीसीडी मध्ये पोचलो आहे.’ त्यावर तो संदेश
तिने वाचल्याची खूण उमटते. पण उत्तर काही येत नाही. नवीन वैताग. आधीचा हा सगळा
वैताग डोक्यात साठून राहिलेला आहे. तो सहज बसल्या जागी मोबाईलमध्ये फेसबुक
उघडतो... कुठेतरी बॉम्बस्फोट वगैरे दिसतं... मग लगेच इकडून तिकडून माहिती वाचत,
कसलीही शहानिशा न करता तो फेसबुकवर धडाक्याने पोस्ट्स टाकायला सुरुवात करतो. सगळा
वैताग त्या पोस्ट्स मधून जगासमोर मांडतो आणि खरेतर फेसबुक जगतात पसरवतो. ते सगळं
वाचून वैतागलेलो आपण कुठल्यातरी सिग्नलला उभे असतो, ८-९ सेकंद उरले असतानाही
समोरची गाडी हलत नाहीये हे पाहून आपण जोरजोरात हॉर्न देऊ लागतो.... आणि एक चक्र
पूर्ण होते! अशी कितीतरी चक्र... वैतागाची, नैराश्याची, संतापाची, हतबलतेची...