Sunday, June 17, 2012

देवदास सारे!

गुंगी आम्हाला हवीशी वाटते 
दुःख पचविण्या थोडी घ्यावीशी वाटते. 

मनाने इतके कमजोर झालो आहोत,
की काहीही वाईट बघवत नाही, काहीही वाईट सहवत नाही.
मग उपाय म्हणून घ्यायची थोडी,
हळूहळू वाटे दुःखाचीही गोडी. 

या नव्या दारूचे नाव उत्सव आहे.
'केसरी'वाल्याने औषध म्हणून तयार केले,
औषधच आता दारू बनून 'लोकमान्य' झाले! 

जन्म स्वतःचा -साजरा केला.
मेल्यावर दहावाही साजरा केला. 
प्रत्येक वेळी गावजेवणे घातली,
स्वतःबरोबरच इतरांनाही पाजली. 

मेव्हण्याच्या बेष्ट फ्रेंडच्या चुलत काकाच्या नातवाला 
तब्बल सदतीस टक्के पडले की आम्ही 
सेलिब्रेट करतो.
बॉम्ब फुटल्यावर आपण वाचलो म्हणत,
सेलिब्रेट करतो.
'खाने वालोंको खाने का बहाना चाहिए' म्हणत 
सेलिब्रेट करतो. 
कशाबद्दल ते विचारू नका, 
कशाबद्दलही आम्ही
सेलिब्रेट करतो! 

भारताचे नशीब चांगले की इथे अनेक अनेक महापुरुष झाले. 
नसते इतके थोर लोक, तर जन्मदिवस कोणाचे असते साजरे केले?!
त्यांनी काय सांगितले हे फारसे नाही महत्वाचे,
सेलिब्रेट करण्या निमित्त तेवढे अगत्याचे. 

ही उत्सवाची दारू फार सहज चढते.
दारूच म्हणल्यावर काय, या दारूचीही सवय होते.
मग एक उत्सव पुरत नाही, दिवस मोकळा उरत नाही.
एकाचे दोन दोनाचे चार चारचे चारशे... लग्न जयंत्या मयत बारशे!
याचा उत्सव त्याचा उत्सव, ज्याचा त्याचा सर्वांचाच उत्सव,
वर्षाचे दिवस पुरेना तेव्हा एकाच दिवशी दोन-दोन उत्सव. 

सल्ला माझा, 
एकाच उत्सवात दुसरा उत्सव बेमालूमपणे मिसळावा. 
ईद दिवाळी बरोबर शॉपिंग उत्सव सुद्धा साजरा करावा!
जागरूक नागरिक वगैरे झालो तरीही आंदोलनांचाही उत्सव करावा! 

गुंगी महत्वाची, गोट्या खेळण्याचीही वर्ल्डसिरीज ठेवावी,
हे कमी वाटल्यास गोट्या प्रीमियर लीग साजरी करावी.
संघ जिंकल्यावर मुख्यमंत्रीसुद्धा बेफाम नाचतील गाणी गातील,
असा हा सोहळा आयोजित करावा, खुलेआम उत्सवाचा नशा करावा! 

सत्य पचवणे कठीण झाले. वास्तव बघणे नकोसे झाले.
आपण आपले गुंगीतच रहावे, सारे जग रम्य लागे!
सुख आपले, दुःख आपले सेलिब्रेट करूया.
श्वास घेणे, पाणी पिणे सेलिब्रेट करूया.
काहीही झाले तरी नशा हवा आहे,
सेलिब्रेट करूया, सेलिब्रेट करुया...!!

- तन्मय कानिटकर 

Tuesday, June 5, 2012

ओझी वाहणारी गाढवं

" वाल से सबकी फटती क्यूँ है? कोई जवाब नहीं इसलिए??" 


गुलाल सिनेमातला हा डायलॉग मला अतिशय आवडतो. खरोखरच प्रश्न विचारायला सुरुवात केली की लोक आधी दुर्लक्ष  करायचा प्रयत्न करतात. मग उडवा उडवीची उत्तरं देतात. तरीही प्रश्न विचारात राहायचं मग ते चिडतात, संतापतात. सगळ्यात शेवटी प्रश्न विचारणाऱ्यावर खरे/खोटे आरोप करतात. प्रश्न विचारायचा अधिकारच काय असा प्रतिसवाल करतात. आणि तरी प्रश्नकर्ता टिकून राहिला तर मात्र त्याला उत्तरं मिळतात किंवा उत्तरं नाहीत अशी शरणागती तरी मिळते. 

आपल्याला लहानपणापासून "मोठ्यांनी सांगितलं की ते प्रश्न न विचारता ऐकायचं अशी शिकवण मिळत असते." काही घरांत प्रश्न विचारायला मुभा असली तरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच. त्यापुढे प्रश्न गेले की मग 'लहान आहेस आम्ही सांगतो ते ऐक' असं दरडावून सांगितलं जातं. एकुणात काय तर मोठे सांगतील ते गपचूप ऐकायची संस्कृती. आणि अशा परिस्थितीत आपण वैचारिक दृष्ट्या गुलाम झालो तर नवल ते काय? 

माणूस मोठा होईपर्यंत प्रश्न विचारायचे विसरूनच गेलेला असतो. आणि इतर जगालाच असे नव्हे तर साधे साधे प्रश्न तो स्वतःलाही विचारणे सोडून देतो आणि माझ्या मते ते जास्त भयानक आहे. कारण स्वतःलाच प्रश्न विचारले नाहीत तर इतर जगाला कधी विचारताच येणार नाहीत. प्रश्नांमध्ये जी ताकद असते त्याला लोक भितात. त्यामुळे स्वतःला प्रश्न पडूच द्यायचे नाहीत अशी सवय अनेकांनी लावून घेतलेली असते. एकदा एखादा प्रश्न पडला आणि त्याचे उत्तर मिळाले नाही तर झोप लागणार नाही अशी भीती असते! आणि प्रश्न सुटावा म्हणून कोणाला विचारायचीही चोरी. बाहेरचे काय म्हणतील, मला हसतील का वगैरे वगैरे भंपक समजुती. मग प्रश्न पडूच द्यायचे नाहीत. आणि कोणाला पडत असतील तर त्याला दूर खेचायचे. त्याला म्हणायचं "बाबा रे कसले भयानक प्रश्न पाडून घेतोयस आणि स्वतःची झोप घालवतोयस. त्यापेक्षा ही घे एक अफूची गोळी. चघळत बस. सगळं विसरशील."
शिवाय दररोज बाजारात नवनवीन प्रकारच्या अफू येतंच असतात. आज काय तर आयपीएल, उद्या काय तर अजून काही, परवा तिसरेच काहीतरी....! 
....
माझा आयपीएल वर राग नाही...ना भोगवादी म्हणून टीकेची धनी होणाऱ्या आजच्या संस्कृतीवर. कारण या सगळ्या गोष्टी तर केवळ रोगाची लक्षणं आहेत. खरा रोग आहे की आपण प्रश्न विचारायचे विसरून गेलो आहोत. आपली माहिती घेण्याची, ज्ञान मिळवण्याची, बहुश्रुत होण्याची भूक संपली आहे. किंवा आपण ती या असल्या अफूच्या गोळ्यांची नशा करून करून संपवून टाकली आहे. स्वतःला एकही प्रश्न विचारावासा न वाटणं हे दुर्दैवी आहे. 
एक प्रयोग करून बघा, सकाळी उठल्यापासून आपण करतो त्या प्रत्येक कृतीबाबत प्रश्न विचार स्वतःला. आपल्या सवयींबाबत, आपल्या बोलण्याबाबत, आपल्या वागण्याबाबत, आपल्या श्रद्धांबाबत... आपल्या प्रत्येक गोष्टीबाबत प्रश्न विचारून स्वतःला भंडावून सोडा. आणि तुमच्या असं लक्षात येईल की जवळ जवळ ५०% गोष्टी आपण उगीच करत असतो, किंवा त्या करण्यामागे आपण कसलाही विचार केलेला नसतो. अगदी ऑफिस मध्ये पलीकडच्या टेबल वर बसलेल्या बाईंचे बॉस बरोबर कसे अनैतिक संबंध आहेत इथपासून ते पुढच्या महिन्यातली इंडिया-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सिरीज ऑस्ट्रेलियाच जिंकणार कारण दाउदने सगळं फिक्स केलेलं असतं इथपर्यंत आपण काहीही बोलत असतो. आणि हे बोलत असताना कुठलाही सारासार विचार आपण करत नसतो. इथेच आपण समजा स्वतःला प्रश्न विचारायची सवय ठेवली असती तर काय झालं असतं ते पाहू. आपण विचार केला असता- पलीकडच्या टेबल वरच्या बाईंचा आणि माझा काय संबंध? त्यांचे कोणाशी कसे संबंध असावेत हे मी ठरवू शकतो का?तो मला अधिकार आहे का? त्यांचे संबंध काही का असेनात ते अनैतिक आहेत हे कसं ठरवायचं? नैतिकता म्हणजे काय? आपल्याला जे कळलंय तेच सत्य आहे काय? की नाण्याची ती केवळ एक बाजू आहे? प्रत्येक गोष्ट काळी आणि पांढरी या दोनच सांगत बघता येते का? की ग्रे शेड्स पण असतात जगात? 
बाप रे! पहिल्याच प्रसंगावर आपण किती विचार केला आणि किती प्रश्न काढले. अजून असंख्य प्रश्न पाडून घेता येतील. आणि घ्यायला हवेत. कसलेच प्रश्न नाही पडले तर प्रगती होणार कशी? प्रश्न नाही पडले तर समाजात प्रगल्भता येणार कशी? 
आम्ही इथे स्वतःला प्रश्न विचारात नाही. प्रश्न पडून अस्वस्थ होत नाही, उत्तरं मिळाली नाहीत तर तळमळत नाही. कसलीच आस नाही. कसलाच ध्यास नाही. असलाच तर केवळ हव्यास. अफूच्या गोळीचा! आदल्या वेळची गोळी आता परिणामकारक नसते. म्हणून प्रत्येक वेळी नवीन काहीतरी...! 
.....
परिवर्तन हवे असेल तर प्रश्न विचारा. प्रश्न विचारल्याने उत्तरांचा शोध सुरु होईल. प्रश्नच नाही तर आजच्या अडचणींना उत्तरं तरी कशी मिळणार? 'हे असंच असतं' असं कोणी म्हणल्यावर 'का असंच असतं?' हे विचारणार आहोत का आपण? तर आणि तरच परिवर्तन होऊ शकेल. 
प्रश्न विचारा स्वतःला... प्रश्न विचारा पालकांना... प्रश्न विचारा आजूबाजूच्या प्रत्येकाला... उत्तरं मिळाली नाहीत तर झुगारून द्या त्या गोष्टी. भंपक गोष्टी. पण प्रश्न विचारायचे थांबू नका. वर्षानुवर्षे मूर्खासारख्या किंबहुना गाढवासारख्या सवयी लावून घेतल्या आहेत आपण. होय, गाढव आहोत शुद्ध... भंपक चालीरीती, समजुती आणि विचारांची गाठोडी  वाहण्या व्यतिरिक्त काय करतो आहोत आपण? 
एक गोष्ट वाचली होती लहानपणी- एक गाढव वाघाचं कातडं पांघरून वाघ बनायचा प्रयत्न करतं आणि कसं गोत्यात येतं.. आपलं आज तसंच झालं आहे. माणसाचा मुखवटा लावलेली गाढवं आहोत आपण आणि याच गोष्टीमुळे गोत्यात आलेलो आहोत.  गाढवपणा सोडून 'माणूस' होऊ त्या दिवशी आपला माणूस म्हणून उत्कर्ष होईल. तोपर्यंत ओझी वाहण्याची क्षमता तेवढी वाढवत राहू आणि त्यालाच प्रगती समजायचा 'गाढवपणा' करत राहू...!!!!