
आजही माझं इतिहासावरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. पण तरीही, तरीही मला असं स्पष्टपणे वाटतं की आपला समाज आपल्या इतिहासाचा गुलाम झाला असल्याने आपली सामाजिक-राजकीय प्रगती खुंटली आहे.
![]() |
Shahrukh in film Swades |
स्वदेस सिनेमातला एक प्रसंग मला या अनुषंगाने आठवतो. त्या प्रसंगात मोहन भार्गव (शाहरुख खान) अमेरिकेच्या प्रगतीबद्दल बोलत असताना एक म्हातारे बुवा उठतात आणि म्हणतात की, "आपल्याजवळ असं काही आहे जे त्यांच्याकडे कधीच नव्हतं आणि कधीच नसेल..!".. मोहनला आश्चर्य वाटतं, तो विचारतो "ते काय?", तेव्हा त्याला उत्तर मिळतं- "संस्कार आणि परंपरा..." या उत्तरानंतर एकदम सगळी मंडळी खुश होतात आणि अमेरिकेची प्रगती ऐकून आलेला न्यूनगंड झटकून पटकन अहंगंड स्वीकारतात- आम्ही कसे महान..! (प्रत्येकाने आवर्जून पहा हा सिनेमा आणि यातला हा प्रसंग) यापुढे मोहन म्हणतो की, अमेरिकेचे स्वतःचे संस्कार आहेत आणि स्वतःच्या परंपरा आहेत. पण अमेरिका महान झली ती तिथल्या लोकांच्या कष्टामुळे...!
भारतीय मनोवृत्तीच्या दृष्टीने हा प्रसंग फार बोलका आहे. आज मला जाणवणारी सगळ्यात मोठी सामाजिक समस्या म्हणजे आपण इतिहासातून बाहेरच येत नाही. आणि म्हणूनच नवा इतिहास घडवूच शकत नाही. आमचे पूर्वज कसे थोर होते आणि इथे कसा सोन्याचा धूर निघायचा यातच आम्ही रममाण. 'ब्रिटीश आले आणि सगळं लुटून नेलं नाहीतर आम्ही आज अमेरिकेपेक्षाही श्रीमंत असतो' या विचारात आमचे तासन तास जातात. प्रत्यक्ष जात नसतील, पण डोक्यात मागे कुठेतरी आपण महान होतो आणि मुळातच आपण महान आहोत हा पोकळ अहंगंड आपण जपत आलो आहोत. आपले पूर्वज थोर होतेच याबाबत शंकाच नाही, पण ते कितीही श्रेष्ठ असले तरीही सध्या, वर्तमानकाळात आपला समाज अत्यंत बकवास आणि घृणा यावी इतका वाईट आहे हे जोवर आपण स्वीकारत नाही, तोवर कोणत्याही प्रकारची नवनिर्मिती आणि प्रगती आपण करूच शकणार नाही.

पण भविष्यात आपल्याला काय घडवायचे आहे, भविष्यात आपल्याला आपला देश कसा हवा आहे, त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे आहे याविषयी अत्यल्प चर्चा. या आणि अशा विषयांवर रिसर्च तर दूरच पण साधी माहितीही नसते. इतिहासाबद्दल बोलले आणि इतिहासावर (आणि इतिहासातल्या व्यक्तींवर) वर्तमानातल्या प्रश्नांची जबाबदारी टाकली की वर्तमानातला समाज भविष्य घडवण्याची जबाबदारी झटकू शकतो. मला तर वाटतं आपल्याला भविष्य घडवायची इछाच उरली नाहीये किंबहुना आपण भविष्य घडवू शकू याबाबतच शंका निर्माण झालीये, आपण भयानक न्यूनगंडाने ग्रासून गेलोय. आणि अशावेळी इतिहासातून स्फूर्ती घेण्याऐवजी आपण इतिहासाचे उदात्तीकरण करून न्यून झाकण्याचा प्रयत्न करतो आहोत.
अशाने आपला समाज कुठे जाणार आहे???
यासर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला जे आहे ते आवडते. आहे त्याच चौकटीत थोडेफार झालेले बदल आपल्याला चालतात. आपण "जैसे थे"वादी झालेलो आहोत. आपल्या देशात कधीच खालून वरून पूर्ण घुसळण झाली नाही. जी झाली, जे बदल झाले ते त्यामानाने टप्प्याटप्प्याने झाले. आपल्याकडे कधीही "क्रांती" झाली नाही. कायमच उत्क्रांतीच होत गेली. आहे त्या सिस्टीम मध्ये सुधारणा करत, थोडेफार बदल करत आपला समाज घडला आहे. काही मंडळींनी क्रांती घडवायचा प्रयत्न केला... आणि क्रांती म्हणजे शब्दशः क्रांती- आमूलाग्र बदल... शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी

इतिहासाचे माणसाच्या जीवनात काहीएक स्थान असते. इतिहासातून माणसाला स्फूर्ती मिळते, इतिहास रंजकही असतो. त्यामुळे मनोरंजन हेही इतिहासाचे कार्य मानले गेले आहे. इतिहासातून शिकण्याला महत्व आहे. पण हे सगळे का?? कारण आपण भविष्य घडवावे. नवा इतिहास घडवावा म्हणून.
पण इतिहासाचा वापर करून आपण अधिकाधिक निष्क्रिय आणि बेजबाबदार होत चाललोय का यावर खरोखरच खूप गांभीर्याने आणि खोलवर विचार व्हायला हवा. आपल्या राजकारणावरही इतिहासाचा इतका पगडा असण्याचे एकमेव कारण म्हणजे समाजावरच इतिहासाचा पगडा आहे.