Sunday, July 25, 2010

लोकमान्य....!!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०)
टिळकांची महानता फक्त यामध्ये नाही की त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला... यामध्येही नाही की त्यांनी समाजसेवा केली... तर त्यांची खरीखुरी महानता यामध्ये आहे की त्यांनी भारतात आधुनिक राजकारणाचा पाया रचला... मुळात या देशात राजे राजवाड्यांचा काळ संपुष्टात येऊन इंग्रजी अंमल सुरु झाल्यावर "राजकारण" ही गोष्ट अस्तित्वातच नव्हती... न्यायमूर्ती रानडे किंवा इतर नेमस्त पुढारी समाज हिताची कामे करत होते, सरकारला विनंत्या करून काही मागण्या करत होते... पण ते काही राजकारण नव्हते... देशाच्या राजकारणाचा पाया रचण्याचे अत्यंत महत्वाचे आणि फार महान कार्य टिळकांनी केले... टिळक नसते तर ना सावरकर झाले असते ना गांधी.... आणि कदाचित ना मोहम्मद अली जिनाही....! टिळकांच्या साक्षीनेच सावरकरांनी पुण्यात विदेशी कापडाच्या होळी केली, टिळक लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर असतानाच गांधीजींचा राजकारणात प्रवेश झाला आणि टिळकांनीच रचलेला पाया गांधींना मिळाला, १९१६ सालचा टिळकांच्या पुढाकाराने झालेल्या हिंदू मुस्लीम ऐक्याचा लखनौ करार करतानाच मोहम्मद अली जीनांच्या राजकीय कारकिर्दीची खरीखुरी सुरुवात झाली...
लोकमान्य ही उपाधी मिळालेला एकमेव पुढारी म्हणजे टिळक... आणि खरोखरच ते होतेच "लोकमान्य"..!! महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात टिळक "लोकमान्य" होते... त्यांचे नेतृत्व संपूर्ण देशाने मान्य केले होते... इतके थोर कार्य त्या काळी करणे ही बाब सोपी नव्हती...

सामान्यतः कोणत्याही देशाचं आधुनिक काळातलं राजकारण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल बहुतेक सर्व राजकारणी हे एकतर लष्करात होते, वकील होते, विचारवंत होते, पत्रकार होते किंवा शिक्षक होते...
हिटलर(जर्मनी), चर्चिल(इंग्लंड), मुशर्रफ(पाकिस्तान), नासर(इजिप्त), सद्दाम हुसेन(इराक), आयसेनहॉवर(अमेरिका) ही मंडळी लष्करात होती व नंतर राजकारणात शिरली...
पंडित नेहरू(मोतीलाल-जवाहरलाल), महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार पटेल, मोहम्मद अली जिना, लेनिन(रशिया), किंवा सध्याचा बराक ओबामा आणि अगदी लालू प्रसाद यादवही(!!) हे सगळे वकील होते/आहेत...
महात्मा गांधी, फ्रान्सचे व्होल्तेअर आणि रुसो, लेनिन यांच्या विचारांनी क्रांती घडवून आणली...
इटलीचा बेनिटो मुसोलिनी हा पत्रकार होता...
मुसोलिनी हा शिक्षकही होता, चीनचा माओ त्से तुंग एक हाडाचा शिक्षक होता....

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हा असाधारण असा पुरुष या जगात होऊन गेला जो वकील होता, विचारवंत होता, पत्रकार होता आणि शिक्षकही होता...! अधिकृत रित्या लष्करात नसला तरी, तरुणपणी हा महामानव क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांनी उभारलेल्या बंडखोर टोळीमध्ये होता...

पुण्यातल्या डेक्कन कॉलेज मध्ये शिकत असताना पुण्यातल्याच वासुदेव बळवंत फडक्यांच्या क्रांती हालचालींपासून दूर राहणे बळवंतराव टिळकांना अशक्यच होते... इंग्रजांचे राज्य उलथवून टाकायचे असा निश्चय केल्यावर आणि त्यासाठी हातात शस्त्र घेण्याची तयारी केल्यावर बळवंतराव पुरते झपाटून गेले... त्यांनी लष्करी क्रांतीचा बारकाईने अभ्यास केला... त्यादृष्टीनी तयारीही आरंभली, मात्र पुढे फड्क्यांशी पटेनासे झाल्याने बळवंतराव यातून बाहेर पडले...
पुढे वकील झाल्यावर वकिली करायची आणि बक्कळ पैसा कमवायचे सोडून बळवंतरावांनी आपले आयुष्य देशासाठी खर्च करायचे ठरवले... त्याचीच सुरुवात झाली "शिक्षक" होण्यापासून...! डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापून संपूर्ण प्रांतामध्ये सर्वोत्तम शाळा (न्यू इंग्लिश स्कूल) आणि महाविद्यालय (फर्ग्युसन महाविद्यालय) सुरु करण्यामध्ये आणि नावारूपाला आणण्यात टिळकांचा सिंहाचा वाटा होता हे तर सर्वांना माहित आहेच... पण त्याचबरोबर वकिली चा अभ्यास करणाऱ्यांसाठी टिळक 'लॉ क्लास' चालवत.. टिळक एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते...
शिक्षक असतानाच त्यांच्यावर नवी जबाबदारी येऊन पडली. टिळक "मराठा" नावाच्या नवीन इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक झाले आणि त्यांच्या पत्रकाराच्या कारकिर्दीला सुरुवात झाली... पुढे केसरी या मराठी वर्तमानपत्राचेही ते संपादक आणि मालक झाले. केसरी मधले टिळकांचे कार्य लोकांच्या इतके पसंतीस उतरले की आयुष्यभर "केसरीकार टिळक" या नावानेच लोक टिळकांना ओळखायचे...
विचारवंत किंवा तत्वज्ञ म्हणून टिळकांनी आपल्या काळात भारतीय समाजात एक अभूतपूर्व स्थान मिळवले होते... वेदांच्या मूळ स्थानाविषयी गंभीर अभ्यास करून एक विलक्षण मूलगामी असा "आर्क्टिक होम इन वेदाज" असा संशोधनपर ग्रंथ लिहणारे जसे टिळक होते तसेच मंडालेच्या तुरुंगात भगवतगीता अभ्यासून त्याचा स्वतंत्र अन्वयार्थ लावून "गीतारहस्य" सारख्या वैचारिक ग्रंथाची निर्मिती करणारेही टिळकच होते...!!!

आजच्या राजकारण्यांबद्दल न बोलणेच बरे... पण टिळकांच्या काळीसुद्धा त्यांच्याइतके प्रतिभावान राजकारणी नव्हते. वकील, शिक्षक, पत्रकार, विचारवंत म्हणून ज्यांना नाव आहे असा एकही राजकारणी जगाच्या इतिहासात आपल्याला सापडत नाही...

लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा महात्मा गांधींचा राष्ट्रीय राजकारणातला उदय मानला जातो... आणि म्हणूनच कदाचित काँग्रेसी राजकारण्यांनी कायमच टिळकांची पुण्यतिथी साजरी केली, आणि गांधींची जयंती....!!!
लहानपणापासून मला आठवतंय तेव्हापासून शाळेमध्ये किंवा बाहेरही कायम टिळक पुण्यतिथीला खास कार्यक्रम वगैरे असत... शाळेत 'टिळक' हाच विषय घेऊन वक्तृत्व स्पर्धा असायच्या, बाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने वगैरे असायची...
असे का? हा प्रश्न मला कायम सतावत असे.... आपल्यापैकी कोणालाच २३ जुलै ही टिळक जयंतीची तारीख माहित नसते... आपण १ ऑगस्टची पुण्यतिथी न पाळता टिळकांचीही जयंती साजरी का करू नये??
आणि साजरी करावी म्हणजे काय? सुट्टी द्यावी? बिलकुल नाही... किंबहुना कोणत्याही महापुरुषाच्या जन्मदिवशी सुट्टी देणे योग्यच नाही असे माझे मत आहे... उलट त्या दिवशी आपण दुप्पट काम केले पाहिजे...!!!
आणि म्हणूनच टिळक जयंतीला देशासाठी, समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा निश्चय करूनच आपण या निष्काम कर्मयोगाची शिकवण देणाऱ्या लोकमान्य राजकारण्याचा सन्मान करू शकू...

No comments:

Post a Comment